या वाक्यांवर माझा विश्वास नाही..

Written by  on June 3, 2020
खोटारडे कुठले..

सगळी कडे खोटे पणा भरलाय नुसता..हे चित्र पहा..

इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा..
१) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला  :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल 🙂 इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स अजिबात नाही  !
२)बायको नवऱ्याला :-  प्रसंग असा की नवरा  फिरायला निघण्यासाठी  तयार होऊन बसलेला आहे तेंव्हा आतून आवाज येतो, हो…….. हो… मी आलेच दोन मिनिटात.. !
३)  छे.. अजिबात लठ्ठ दिसत नाहीस तू.
४) मी तुम्हाला मदत करायला निवडणूक लढवतो आहे.
५) मित्र:-अरे मी दिले नाही तुला पैसे परत अ्जून?? च्यायला,  बघ विसरूनच गेलो, मला वाटलं की मी परत केले पैसे  तुला.
६)   मी तुझे पैसे पुढल्या रविवारी नक्की देईन बघ! तुला आठवण करून देण्याची वेळच येऊ देणार नाही मी.
७)  पार्टी नंतर :-  इतका कधीच टाईट झालो नव्हतो यार.. थोडी जास्तच झाली आज.  पण आजची ही पहिलीच वेळ  बरं का, आपलं असं होण्याची. 🙂
८)   या पुढे पुन्हा नाही पिणार इतकी 🙂
९)  नकॊ..तुला ते वापरायची  त्याची गरज नाही, ” पिल” घेतली आहे मी
१०)  मी फार   लठ्ठ दिसते का या ड्रेस मधे??, उत्तर :- छे, अजिबात नाही…
११) जूनी मैत्रीण भेटली की :- अगं अजिबात बदलली नाहीस बघ तू. अगदी २० वर्षाची असतांना दिसायची ना , तश्शीच दिसतेस अगदी.
१२)   माझ्या बायकोचा शिपी :- मॅडम ब्लाऊज / ड्रेस नक्की देतो बघा उद्या सोमवारी.
१३) नेता इलेक्शन पूर्वी मतांचा जोगवा मागताना:- मी वचन देतो , की मी निवडून आल्यावर….
१४) तुला काय म्हणायचे आहे ते मला अजिबात समजलेले नाही. ( बायको जेंव्हा चिडते तेंव्हा )
१५) माझ्या मैत्रिणी असल्या तरी माझ्या बायकोचा त्यावर  काही आक्षेप नसतो
१६) माझे मित्र असले तरी माझ्या नवऱ्याचा काही आक्षेप नसतो.
१७) माझ्या मित्राने/ मैत्रिणीने रात्री फोन केला तरी बायको/ नवरा गैर समज करून घेत नाही.
१८) आय एम सॉरी, मला काही बोलायचा अधिकार नाही,  पण मला असं वाटतं की….
१९)  एक नेता:-मराठी लोकांना अधिकार मिळायलाच हवा.
२०) मी हे तुझ्या भल्यासाठीच  सांगतोय/ सांगते आहे..
२१) एक जाहिरात :- व्यायाम न करता वजन कमी करा. एक महिन्यात दहा किलो पेक्षा जास्त  🙂
२२) “ओके.. मी तुला फोन करतोच एक पंधरा मिनिटानंतर”
२३) आय डिडन्ट डू इट! ( हे कशा बद्दल ते सांगायलाच हवे का?)
२४) ५० टक्के डिस्काउंट सेल*   कंडिशन्स अप्लाय (???  )
२५) तुमचा फोन होल्ड ठेवण्यात आलेला आहे, लवकरच आमचे कस्टमर केअर प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. आणि पाच मिनिटे होल्ड केल्यानंतर.. ” सॉरी, आमचे सगळे कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्ह व्यस्त असल्याने आता तुमचा फोन घेऊ शकत नाही, क्षमस्व!”
२६) बायको चिडलेली असताना आणि    असतांना  विचारले , ” तुला काय झालंय?” उत्तर असतं काही नाही!
२७)  आता नवीन आणि सुधारित, मोठ्या पॅक मधे. ( खरी गोष्ट ,  आधी १०० ग्राम चं पॅक ८० ग्राम केलं असते, आणि फक्त पॅकिंग चं डिझाइन बदललेले असते)
२८) अरे मी सिगरेट तर कधी पण सोडू शकतो. माझा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा आहे. आताच  म्हणजे सहा महिन्यापूर्वी एक महिन्यासाठी सोडली होती. 🙂
२९) लोरिअल चं क्रिम वापरल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात.
३०) हॉर्लिक्स घेणाऱ्या मुलांची वाढ बोर्नव्हिटा घेणाऱ्या मुलांपेक्षा दुप्पट होते.. ( लवकरच १२ फुटाची मुलं दिसायला लागायला हवी आता.)
३१) लग्नापूर्वी गर्लफ्रेंड ला :- मला तुझ्या बद्दल जसे वाटते, तसे कोणा बद्दल कधीच वाटले नाही.तुझं मन इतकं छान आहे, की मी तुझ्याकडे आकर्षित झालोय.
३२) माझ्या जिवनात आलेली तू पहिलीच मुलगी/मुलगा आहेस .
३३)तुझे डोळे जगात सगळ्यात सुंदर आहेत. ( प्रत्येकाने हा डायलॉग वापरलेला असतोच – काय खरं की नाही?)
३४)तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याशी कधी तरी खोटं बोलेन का?
३५)  लग्नापूर्वी:-फार तर फार एक किंवा दोन बिअर घेतो मी.  तशी ड्रिंक्सची मला फारशी आवड नाही.
३६)  बायको:-  तू लग्नाचा वाढदिवस विसरलास तरी मला राग आलेला नाही.
३७)  एक्स समोर आल्यावर :-माझं लग्न तुझ्याशी व्हायला हवं होतं .
३८) साहेब मिटींग मधे आहेत, त्यांना फोन देता येऊ शकत नाही.
३९) चॅट रुम  प्रोफाईल :- ६ फुट ६ इंच उंची, अ‍ॅथलेटीक बॉडी, ८० किलॊ वजन , वय २५ आणि फोटो सलमानचा. किंवा मुलगी असेल तर, ५ फुट ९ इंच उंची, गोरा रंग, लांब केस, सुंदर चेहेरा, वय १९ -२०आणि फोटो एखाद्या नटीचा.
४०) बस्स.. काही नको, फक्त एक ग्लास पाणी चालेल.. ( मनातून तर असतं की या उन्हात मस्त सरबत वगैरे दिलं तरी चालेल)
४१) मी माहेरीच निघून जाते बघ आता.. मग बस एकटा ! (वाट पहात रहा, कधीच जाणार नाही ती 🙂 )
४२) त्या सुंदर मुलीच्या  एक्स चित्राच्या लिंक वर मी  कधीच क्लिक केले नाही.
४३) मी आज पर्यंत कधीच अ‍ॅडल्ट साईट पाहिलेली नाही.
४४) मला तिचा स्वभाव जास्त आवडला म्हणून लग्न  केलं. शारिरीक आकर्षण नाही    ( खरंच?? )
४५) मला बरं वाटत नाही,  म्हणून मला सुटी हवी आहे.
४६) मला तुझ्याशी फक्त मैत्रीच करायची आहे, फक्त मैत्री ..
४७) मी ड्राइव्ह करतोय, नंतर बोलू आपण.
४८) मी मिटींग मधे आहे , नंतर करतो फोन ( हे बरेचदा खरं पण असू शकतं),
४९) आय डोन्ट मीन इट!
५०)  आय मिस यू,आय लव्ह यू, 🙂
५१) माझं पूर्वी कधीच कोणावर प्रेम नव्हतं, अगदी एकतर्फी पण नाही . तूच पहिली/ पहिला आहेस बघ.
५२) बायकोला लग्नापूर्वी :- आय प्रॉमीस.. नक्की बदलेन  माझी “ही” ( ही म्हणजे कुठली तरी तिला न आवडणारी) सवय मी.
५३)स्त्रियांचे नेहेमीचे वाक्य :-  माझं वजन, वय,  ………… इतकं आहे.
५४) बायको नवऱ्याला :- हा ड्रेस मी सेल मधे घेतलाय, चक्क ७० टक्के डिस्काउंट होता .
५५) मला तुझा तो इ मेल मिळाला नाही, बहुतेक स्पॅम मधे गेला असेल, नाही तर मी नक्कीच रिल्पाय केला असता.
५६) पैशाचा प्रश्न नाही, प्रिन्सिपल चा आहे !
५७) सगळ्यात मोठं अ्सत्य- जेंव्हा तुम्ही एखादे सॉफ्ट्वेअर लोड करता तेंव्हा एका बॉक्स ला क्लिक करता त्यावर लिहिलं असतं ”  आय हॅव रीड अ‍ॅंड अ‍ॅग्रीड द    टर्म्स अ‍ॅंड कंडीशन्स”
५८) मला तुझ्या शिवाय इतर कुठल्याही मुली बद्दल/ मुला बद्दल तसं फिलिंग वाटलं नव्हतं
५९) ब्रेकप च्या वेळेस. तू फार चांगली आहेस, तुला माझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा मिळायला हवा. ( जेंडर प्रमाणे वाक्य बदला )
६०) मी अगदी मनापासून सिरियसली बोलतोय.. अगदी खरंच सांगतो, तुझा विश्वास का बसत नाही?
६१) मी तुला काय करायचं हे सांगायची माझी इच्छा नाही, पण ——– तू असं का करत नाहीस?
६२) ट्रस्ट मी 🙂 पोहो्चतोच मी १५ मिनिटात.. प्लिज वाट पहा थोडी.
६३) बस झाले की आता, किती लिहायचं मी एकट्यानेच? तुम्हाला अजून काही माहिती असतील तर तुम्ही लिहा की खाली कॉमेंट्स मधे.

पुरस्कार.

Written by  on June 3, 2020

पुरस्कार कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून ठेवलेले आहे.

सिनेमा साठी ,पूर्वी फक्त फिल्म फेअर पुरस्कार होता, आता त्याच स्वरूपाचेच निरनिराळ्या नावाने चार पाच तरी नवीन पुरस्कार दरवर्षी दिले जातात. ज्यांना फिल्म फेअर मिळाला नाही, ते ह्या पुरस्कारावर समाधान मानताना ्दिसतात. टीव्ही चं पण तसंच, स्टार टिव्ही तर केवळ स्वतःच्याच चॅनल वरच्या कार्यक्रमांवर पुरस्कार देत सुटलाय. मग त्या मधे अगदी बेस्ट बहू, बेस्ट लडकी, बेस्ट दादी वगैरे असंख्य पुरस्कार आहेत- असे की ज्या मुळे प्रत्येकी एक तरी मिळतोच.

शाळेत जाणारा अगदी केजी मधे शिकणारा मुलगा पण बक्षीस या संकल्पनेने  भारावलेला असतो. मला आठवतं, एकदा माझी धाकटी मुलगी शाळेत असतांना तिच्या शाळेत राखी मेकिंग काँपीटीशन होती. राखी घरून बनवून न्ययची होती. सौ. ने एक सुंदर तिरंगा झेंड्य़ाच्या रंगाची राखी बनवून दिली. त्या राखीला मिळालेले पहिले बक्षिस घेऊन जेंव्हा मुलगी घरी आली, तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी लपवता येत नव्हता. पण आई जवळ जाऊन म्हणाली, ” अगं पण हे बक्षिसं तुलाच मिळालंय, कारण ती राखी तूच बनवली होती  ना?” . हे वाक्य ऐकून खरंच खूप बरं वाटलं, की  त्या लहान वयातही ही जाण होती, की बक्षिस जर मिळवायचं, तर त्या साठी आपल्या स्वतःच्या कर्तुत्वाने! असो, विषयांतर होतंय.

हल्ली बरेचदा पेपर मधे कुणाला तरी कसला तरी पुरस्कार मिळाल्याचे छापून येत असते. कुठली तरी स्वयंसेवी संस्था जीवन गौरव, किंवा इंजिनिअरींग/मेडिकल,/समाजसेवा / किंवा इतर कुठल्याही क्षेत्रा मधे केलेल्या योगदानाबद्दल  पुरस्कार मुक्त हस्ते वाटत असतात. आणि हे करत असतांना आपण हे एका सामाजिक जाणिवेतून करीत आहोत हे सारखे ठसवण्याचा प्रयत्न पण करत असतात. हे पुरस्कार ज्याला मिळतात, बरेचदा त्याला स्वतःला पण आपण काय योगदान दिलेले आहे हे माहिती नसते.

या पुरस्कार देणाऱ्या संस्थांची नावं पण कधी कोणी आयुष्यात ऐकलेली नसतात,  पण तुम्हाला एखादा इ मेल येतो, की तुमच्या अमुक अमुक क्षेत्रातल्या  भरीव योगदाना बद्दल तुम्हाला आम्ही एक पुरस्कार  देण्याचे योजले आहे,  तेंव्हा तुम्ही पुरस्कार घेण्यासाठी येऊ शकाल का? पुरस्कार वितरण  मुंबई, किंवा दिल्ली वगैरे सारख्या कुठल्यातरी ठिकाणी अमुक अमुक तारखेला आयोजित केलेला आहे . आता हा असा इ मेल पाहिल्यावर कोणीही नक्कीच भारावून जातो आणि  आपल्या कार्याची कोणीतरी नोंद घेतोय, हे पाहून कृत कृत्य होतो.

इ मेल पाहिल्यावर आधी त्या संस्थेच्या वेब साईट वर जाऊन तुम्ही चेक करता, की ती संस्था खरंच अस्तित्वात आहे की कोणी तुमच्यावर प्रॅक्टिकल जोक करतोय. वेब साईट वर संस्थेद्वारे पुरस्कृत केल्या गेलेल्या व्यक्तींचे फोटो, आणि पूर्वी झालेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा असतो. ते पाहिल्यावर विश्वास बसतो, आणि तुम्ही  ताबडतोब उत्तर पाठवून मग तो मी हा पुरस्कार स्वीकारण्य़ास येत आहे, हे कळवून मोकळा होता.

होता होता पुरस्काराचा दिवस उजाडतो, तुम्ही पुरस्कार स्वीकारण्यास जाता. छानसा कार्यक्रम होतो एखाद्या हॉल मधे. शंभर दोनशे लोकं आलेले असतात. तुमच्या प्रमाणेच इतरही २०-२५ लोकं असतात की ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे असे.   कार्यक्रम सुरु होतो, तुम्ही दिलेल्या तुमच्या क्षेत्रातल्या योगदाना बद्दल एक लहानसं भाषण करून एक ट्रॉफी आणि  मान पत्र  तुम्हाला दिलं जातं. कुठल्या तरी चॅनलचे कॅमेरामन आलेले असतात, शुटींग , फोटोग्राफी होते, वृत्तपत्राला पण या कार्यक्रमाची प्रेस नोट पाठवली जाते.  सगळं काही कसं व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी पेपरला पण बातमी येते, बातमीचे कटींग नंतर तुम्हाला आवर्जून पाठवले जाते, टिव्ही वर पण लहानशी बाईट दाखवली जाते .

या  अशा कार्यक्रमासाठी खर्च किती होत असेल? एक हॉल संध्याकाळ साठी भाडे- साधारण दहा हजार, आणि इतर खर्च ( अल्पोपहार वगैरे) दहा हजार म्हणजे एकंदरीत तीस हजार. असो.

कार्यक्रम झाल्यावर ,  अल्पोपहारानंतर त्या संस्थेचे संचालक , सेक्रेटरी म्हणतात, की आमची ही संस्था असे उपक्रम नेहेमीच राबवीत   असते- आणि स्वयंसेवी संस्था असल्याने खर्चाची मोठी ओढाताण होते.  ते असंही म्हणतात, की हे जे काही सुरु आहे, ते केवळ तुमच्यासारख्या लोकांच्या मुळेच. कारण दर वेळी आम्ही जेंव्हा कोणाचा सत्कार करतो, तेंव्हा ते अशाच पुढील कार्यक्रमासाठी म्हणून दहा विस हजाराची मदत संस्थेला करून जातात. सेक्रेटरी हे पण सांगायला विसरत नाहीत, की  कोणा एका माणसाने एक लाखाची मदत पण केली होती.   तुम्हाला ते पूर्वी ज्या लोकांनी मदत केलेली आहे, त्यांची छायाचित्रे आणि चेक चे फोटो दाखवले जातात.

हे सगळं पाहिल्यावर तुम्ही पण आपले चेक बुक काढून लोकलाजेस्तव का होईना ,रु. २००००/-   चेक देता आणि ती पाचशे रुपयांची ट्रॉफी, मानपत्र आणि काही फोटो  घेऊन घरी येता, स्कॅन केलेले पेपर कटींग सोबत  फेस बुक वर  पोस्ट करण्यासाठी.

किती पगार म्हणजे पुरेसा पगार??

Written by  on June 2, 2020

समजा मन्थली ग्रॉस सॅलरी १ लाख रुपये आहे

आता आपण खर्च बघू…

इन्कम टॅक्स ३३०००/- रु.

घराचा हप्ता.. ३००००/- रु. (खर्च टोट्ल.. ६३०००/- रु.)

पेट्रोल खर्च,, ७००००/रु. ( खर्च टोटल ८५०००/-रु)

खाणे पिणे रशन वगैरे फळं, भाज्या, दुध, शाळेची फिस, स्कुल बस चा खर्च .. १५०००/- रू.( खर्च टोट्ल. १०००००/- रु)

या व्यतिरिक्त खालिल खर्च आहेतच!

+दुचाकी बायकोची आणि मुलांची

+ पॆ्ट्रोल दुचाकीचे

+सोसायटि चार्जेस

+ ईले्क्ट्रिक बिल

+मोबाईल बिल

+बाहेर खाणं

+करमणुक

+कपड शुज, सिडी,वगैरे…

+मेडिकल एक्स्पेन्सेस

+सुटी मधे फिरायला जाणे.

इत्यादी इत्यादी……

थोडक्यात जसे इन्कम वाढते तसे खर्च वाढतात..

समजा  या परिस्थितित सुध्दा  एखादा माणुस जर दर महिन्याला

५-६ हजार सेव्ह करत असेल तर , म्हणजे दिवसाला १००- २०० रुपय

मित्रानो.. इतके पैसे तर कुली, भिकारी आणि मोची पण वाचवतात. आणि त्यांना इतर खर्च पण नाहीत, जसे इएमाय  घराचा,कारचा, खर्चिक शि्क्षण ,इत्यादी इत्यादि….

ह्याचा अर्थ असा नि्घतो की जर एखादा माणुस जरी महिन्याला एक लाखा्पर्यंत कमावत असेल तरिही त्याच्या मधे आणि भिकाऱ्याच्या स्टेटस मधे  फायनानशिअली काही फरक नाही..

आय टी मधले जॉब रेसेशन

Written by  on June 2, 2020

33ई सकाळ मधे एक लेख आलाय रेसेशन बद्दल. त्या लेखाची सुरुवातच अशी आहे की एक इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट म्हणतोय की त्याचं कॅंपस इंटर्व्ह्यु मधे सिलेक्शन झालं होतं ,पण अजुन कॉल आलेला नाही. माझ्या एका मित्राच्या मुलीचं पण असंच झालंय. गेले ४ महिने वाट पहाते आहे अपॉइंटमेंट लेटरची….! कधी फोन केला एच आर डिपार्टमेंटला तर म्हणतात, वुइ विल कॉल यु व्हेन एव्हर निड अरायझेस…

ह्या विषयावरचे माझे विस्तृत मत मी सकाळवर टाकले होते पण, सकाळने फक्त पहिल्या दोन ओळीच नेटवर प्रसिध्द केल्या, आणि बाकी सगळं एडीट केलं..म्हणुन ह्या पोस्ट चे औचित्य.

रेसेशन म्हंटलं की डॊळ्यापुढे आधी सबप्राइम क्राइसेस येतात आणि यु एस मधल्या एकॉनॉमी वर तोंड सुख घेणं सुरु करतो आपण. पण ह्याच गोष्टीला एक दुसरा पण ऍंगल आहे आणि त्या दृष्टीने विचार करणे अतिशय आवश्यक आहे.

आज पासून साधारणतः ८-१० वर्षापुर्वी आयटी हे एक नवीन फिल्ड होते. सोबतच बी एस सी क्म्प्युटर सायंस सुरु झाले होते. मार्केट मधे  कम्प्युटर बद्दल नॉलेज असणाऱ्यांची डिमांड खूप होती, आणि संख्या कमी होती.. कंप्युटर सायंस मधले ग्रॅज्युएट्स मिळेनासे झाल्या बरोबर , इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग च्या   काही स्मार्ट इंजिनिअर्स नी ( ईतर ब्रॅंचेस च्या) कम्प्युटर ट्रेनिंग चे कुठले तरी क्रॅश कोर्सेस करुन आय टी मधे जॉब्ज मिळवणे सुरु केले.

आयटी कंपन्यांचं भांडवल म्हणजे मॅन पॉवर. रॉ मटेरियल म्हणजे पण मॅन पॉवर.. पण आय टी मधे काम जास्त कधी मिळणार? जेंव्हा बेसिक इंजिनिअरिंग उद्योग चांगले चालतील तेंव्हा.

अमेरिकन कंपन्यांनी आउट सोअर्सिंग सुरु केले होते, ह्याचा फायदा इन्फोसिस , सत्यम आदी कंफन्यांनी करुन घेतला.कामं खुप होती,  पण मॅन पॉवर  पुरेशी अव्हेलेबल नव्हती,कंपन्यांच्या लक्षात आले की थोड्याफार ट्रेनिंग ( म्हणजे जॉब स्पेसिफिक ट्रेनिंग) वर कुठलाही ग्रॅजुएट हे काम करु शकतो, म्हणून  आय टी कंपन्यांनी कॉमर्स आणि आर्ट्स ग्रॅज्युएट्स पण  नोकरीवर ठेवणे सुरु केले गेले.

अजुन एक मोठ्ठं स्थित्यंतर झालं. दर चौका मधे एक इंजिनिअरिंग कॉलेज सुरु झाले, पुर्वी जे पुर्ण महाराष्ट्रात फक्त ७ कॉलेजेस होती ती आता १००० च्या वर झालेली होती .कुठलाही विद्यार्थी आता इंजिनिअर बनू शकत होता. पैशापुढे शिक्षण ’संस्थाने’गुडघे  टेकुन बसले होते.. नवीनच स्व-घोषित शिक्षण महर्षी आपल्या तुंबड्या भरण्याचे नवीन नवीन उपाय शोधू लागले- जसे रिझर्व्ड सीट्स, मॅनेजमेंट कोटा इत्यादी .

या सगळ्या इंजिनिअरींग कॉलेजेस मधे , आणि आय टी ची डीमांड वाढल्याने जवळपास प्रत्येकच कॉलेजने आय टी शाखा उघडल्या.प्रत्येक कओलेज मधे कमित कमी एक वर्ग, आणि क्लास मधे साधारण ७० मुलं!  दर वर्षी कमीत कमी ७० हजाराच्या आसपास आय टी इंजिनियर्स तर महाराष्ट्रातच इंजिनियर्स तयार होऊ लागले. एम एस सी क्म्प्युटर झालेले वेगळे..ते पण कॉंपिटीशन ला होतेच इंजिनिअर्स च्या , त्यांची मोजदाद अजुन केलेली नाही.

इतकं सगळं लोकं होते तरी पण  आय टी कंपन्यांमधे अजुनही भरपूर  जॉब्ज  ओपनिंग्ज होते. जॉब हॉपर्स अगदी ग्रास हॉपर्स प्रमाणे इकडून तिकडे उड्या मारीत होते. थोड्या जास्त पगारावर जॉब्ज चेंज करणाऱ्यांची संख्या खूपच वाढली होती.लव्ह युवर जॉब, ऍंड नॉट युवर कंपनी हे नारायण मुर्तींचं वाक्य अगदी प्रमाण मानून प्रत्येक इंजिनिअर कुठल्यातरी कंपनीत स्थिरावण्या पेक्षा, इकडे तिकडे रिझुम पोस्ट करित होता. हेड हंटर्स पण सारखे इंडिव्हिज्युअली फोन करित होतेच लोकांना व्हेरियस जॉब्ज साठी. एखाद्या रॉ इंजिनिअरला दोन वर्ष ट्रेनिंग द्या, आणि तो लगेच दोन वर्ष झाले, आणि थोडंफार काम शिकला,  की दुसरी कडे जॉब घेणार. कंपन्या म्हणजे ट्रेनिंग सेंटर्स झाले होते.

डॉलर टु रुपी कन्व्हर्शन रेट चांगलाच झाला होता.डॉलर्स मधे पेमेंट मिळाल्यामुळे कंपन्यांची किटी खुप फुगली होती. अमेरिकेत लोकांना नोकरीवर ठेवल्यास महाग पडते म्हणून मग कंपन्यांनी भारतातुन लोकांना  ऑन साईट पाठवणे सुरु केले .अगदी सुमार दर्जाची मुलं अणि मिडिऑकर पण त्या मुळे पण परदेशी जाउन स्थिरावली.तिथे गेल्या बरोब्बर दुसरे जॉब् पहाणे सुरु केले.   मुलांनी   ऑन साइट काम मिळाले नाही म्हणून सुद्धा जॉब्ज चेंज करणे सुरु केले होते काही लोकांनी.

ह्या जॉब हॉपिंगवर उपाय म्हणून बेंचर्स चा कन्सेप्ट जन्माला आला. मोठ्या मोठ्या कंपन्या गरज नसतांना पण काही लोकं नोकरी वर घेउन बसवून ठेवू लागल्या होत्या. म्हणजे एखाद्याने नोकरी सोडली की लगेच ह्या मागच्या बेंचर्स पैकी एक समोर घेउन त्याला काम द्यायचे म्हणजे कामाचे नुकसान होणार नाही.ह्या बेंचर्सला बेसिक ट्रेनिंग देण्यासाठी मोठ नोठे ट्रेनिंग डिपार्ट्मेंट्स सुरु करण्यात आले होते. ह्या कन्सेप्ट ला मुर्त स्वरुप देण्यासाठी कॅंपस इंटर्व्ह्यु मधे मुलांना सिलेक्ट करुन ’बुक’ करुन ठेवू लागले. पुढे जेंव्हा ४-६ महिन्यात रिक्वायरमेंट निघाली की ह्या मुलांना बोलवायचे……. सगळी कडे आनंदी आनंद होता.

आता इंजिनिअरिंग ईंडस्ट्रिज जोरात चालत होत्या. इंडेक्स जवळपास २० हजारावर पोहोचण्याच्या तयारीत होता.इन्फ्रास्ट्रक्चर इंडस्ट्रीचा बुमींग पिरियड होता.  इन्फ्रास्ट्रक्चर चांगले चालले आणि बिल्डींग कन्स्ट्रक्शन्ला चांगले दिवस आल्यामुळे , स्टिल, सिमेंट, मशिनरी मॅन्युफॅक्चर्स आणि  इंजिनिअरिंग कंपन्यांना चांगले दिवस आले. प्रत्येकच कंपनी बोनस शेअर्स देत होती. आता काम वाढलं म्हणून  बऱ्याच कंपन्यांमध्ये इ आर पी सुरु करण्यात आले होते. त्यामुळे  इंजिनिअरिंग कंपनीमध्ये पण आय टी बेस्ड जॉब्ज ओपनिंग निघाले. इआरपी इम्प्लिमेंटेशन ची किंमत करोडॊ रुपयांमधे होऊ लागली.आणि आय टी ट्रेंड लोकं मिळणं आणि  टिकणे मुश्कील झालं होतं.

इंटर्नेट बॅंकिंग आणि तत्सम ऑन लाइन शेअर्स ट्रेडींग सारख्या बऱ्याच गोष्टी सुरु झाल्या होत्या, इथे आय़ टी ट्रेंड लोकांची डीमांड वाढली होती. म्हणजे अर्थ शास्त्रामधला एक सोपा सिद्धांत.. डिमांड जास्त आणि माणसं कमी… म्हणजे नेट आउट कम की पगारामधे वाढ.त्या मुळे त्यांनी पण लोकांना भरमसाठ पगार देणे सुरु केले होते. कसंही करुन मॅन पॉवर टिकवायची हाच मुख्य हेतू होता….. कंपन्यांनाही काहीच प्रॉब्लेम्स नव्हते कारण त्यांचे इनकम डॉलर्स मधे होते…

आय टी मधे खुप जास्त काम करावं लागतं म्हणून खुप जास्त पगार आहे  असे नाही. केवळ डीमांड अन सप्लाय रेशो मधे खुप तफावत असल्यामुळे पगार जास्त दिला जायचा असे मला वाटते.. अर्थात मी चूक असू शकतो.पण हे माझे मत आहे. हा माझा ब्लॉग आहे म्हणून मी इथे   मला जे काही वाटते ते लिहायचे ठरवले आहे.आय टी मधे काम करणारे आणि इतर ठिकाणी काम करणारे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स सारखेच कामं करतात. त्यांच्या बुद्धिमत्ते मधे पण काही फारसा फरक नसतो, किंबहुना ती सारखीच असते. तरी पण आय टी मधे ग्रॅज्युएशन केले म्हणजे या मुलांना इतर स्ट्रिम मधल्या मुलांपेक्षा जास्त  ( दुप्पट ) पगार मिळत होता ज्या  मुळे इतर मुलांमधे इन्फेरिअरिटी कॉम्प्लेक्स आला होता.

24आता नेमकं उलटं झालंय.. रेसेशन चे परिणाम म्हणजे  पहिले जे इटालियन कॉफी व्हेंडिंग मशिन्स ( ज्यांची कॉफि ७० रुपये पडायची )होती ती निघून इंडीयन मशिन्स लागली.एच ओ डी सी कुपन्स वगैरे कमी करण्यात आले, काही कंपन्यांनी बंद पण केलेत. अमेरिकन ’आका’ आता बराच  सुस्तावलेला होता. दिलेल्या ऑर्डर्स कॅन्सल होऊ लागल्या होत्याच. असलेल्या लोकांनाच कामे नव्हती, तेंव्हा अजुन जास्त लोकं घेउन करायचे काय ?

एच १ बी जो ह्या आयटी कंपन्यांचं बॅक बोन आहे तोच कॅन्सल करणे सुरु झाले होते ओबामांच्या भाषणानंतर. जर तुम्हाला  बेल आउट पॅकेज घ्यायचं असेल तर तुम्हाला एच १ बी डिपेंडंट कंपनी राहुन चालणार नाही . आणि जर तुम्ही एच १ बी डीपेंडंट असाल तर मात्र तुम्हाला या पॅकेजेस चा फायदा घेता येणार नाही  ह्या सरकारच्या स्टॅंड मुळे अडचणीत अजुन वाढ झाली.म्हणजे नोकऱ्या कमी झाल्या, बरेच लोकं परत भारतामधे आले. आणि जे अजुन तिथे टिकुन आहेत त्यापैकी बऱ्याच लोकांना अजूनही परत यावं लागेल असं दिसतंय.

कॅंपस इंटर्व्यु बंद झाले. आय आय एम मधे पण जे करोडॊ रुपयांचे पॅकेजेस वाटले जात होते (मेरिलिन वगैरे अमेरिकन कंपन्यांकडून) ते आता रॅशनलाइझ झाले होते. पुर्वी आय आय एम त्यांच्या कॉलेज मधे कॅंपस इंटर्व्ह्यु घेण्यासाठी पैसे मागायचे, आता या वर्षी त्यांच्याकडे मोठ्या कंपन्या कॅंपस इंटर्व्ह्यु घ्यायला गेल्याच नाहीत. जे कोट्य़ावधी रुपयांचे  ( एखादा मुलगा एखाद्या इन्स्टिट्य़ूट मधे शिकला म्हणजे त्याची लायकी एकदम करोडॊ रुपये कशी  होते  हा मला पडलेला एक    प्रश्न आहे) पॅकेजेस होते ते आय आय एम मधे ७ ते १० लाखावर आले . बी ग्रेड चे मॅनेजमेंट्स कॉलेजेस ( अरे माफ करा मंडळी, ही कॉलेजेस स्वतःला बीझिनेस स्कुल्स म्हणवतात…म्हणजे काय मुलांना उगिच आपण हार्वर्ड मधे शिकतोय असं वाटावं म्हणुन. 🙂 ) त्यातल्या मुलांची तर अजूनच वाईट परिस्थिती झालेली आहे. अगदी २ लाखावर कामं करायला पण मुलं तयार आहेत. पुर्वी जी मुलं  ( एम बी ए फिनान्स वगैरे झालेली) इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज कडे तुच्छतेने पहायची ती आता ईंटर्व्ह्यु करता तिथेच अप्लाय करताहेत.

तर पुन्हा आपण आय टी कडे वळु या. सध्या जी मुलं आय टी मधे इंजिनिअरिंग करुन लाखो रुपयांच्या नोकऱ्यांचे स्वप्न पहात होती , त्यांना जॉब्ज मिळणे कठिण झाले आहे. त्यांनी  आता जमिनिवर उतरायची वेळ आलेली आहे.  इतर स्ट्रिम च्या इंजिनिअर्स प्रमाणे  मिळेल त्या नोकऱ्या करण्याची मानसिक तयारी करावी..तुम्ही पण इतर इंजिनिअरिंग ग्रञ्युएट्स पेक्षा काही फार जास्त हुषार आहात असे नाही, आणी आता रेसेशन मुळे नौकऱ्या पण कमी झालेल्या आहेत.

अजुन बरेच लोकं जे ऑन साइट आहेत ते पण परत येतिल. म्हणजे ट्रेंड मॅन पॉवर आहे पण काम नाही अशी परिस्थिती.. सोबतच ,फक्त महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस दर वर्षी ७० हजार मुलं फक्त आय टी स्ट्रिम मधली बाहेर काढेल.

येणाऱ्या काळात किंवा काही वर्षांनी  जरी कामं वाढली तरी पगार पुर्वी सारखे अव्वाच्या सव्वा  मिळणार नाहित ह्याची खुण गाठ मनाशी बांधणे आवश्यक आहे असे मला वाटते.या उलट आता आय टी मधे अती जास्त अव्हेलेबल असलेल्या मॅनपॉवर मुळे दिड ते दोन लाखांच्या पॅकेजेस वर ऑफर केले जाणार नाही असा माझा अंदाज आहे.आणि अशा पगारावर पण  नौकऱ्या करण्याची तयारी मानसिक तयारी ठेवायला हवी..

जेट एअर वेज, किंग फिशर, टाटा , किर्लोस्कर वगैरे कंपन्यांप्रमाणे सध्या ज्यांची नोकरी सुरु आहे त्यांचे पण पगार ३० टक्के ते ४० टक्के  किंवा त्या पेक्षा जास्त पण कमी होऊ शकतील असा माझा अंदाज आहे…

हा लेख वाचुन घाबरुन जायचे कारण नाही .डिझर्वींग कॅंडीडॆट्स ला अपॉर्च्युनिटिज तर नक्कीच रहाणार आहेत तेंव्हा, पुल अप युवर सॉक्स ऍंड स्ट्रार्ट हंटींग फॉर अ जॉब.

फेरीवाला

Written by  on June 1, 2020

एक चतुर्थांश रस्त्यावर सामान पसरवून दिवसभर धंदा करणाऱ्याला तुम्ही फेरीवाला म्हणू शकता का? अर्थात नाही!

पूर्वीच्या काळी उच्च ती शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी अशी एक म्हण होती. माझे आजोबा नेहेमी म्हणायचे ही म्हण. पण आजच्या जगात तसं आहे का? मला वाटतं या म्हणीचा थोडा क्रम बदलला आहे. उच्च व्यापार, मध्यम नोकरी कनिष्ठ शेती असा काहीसा क्रम होऊ शकेल.

उच्च व्यापार म्हंटल्यावर डोळ्यापुढे एकदम अंबानी आणि टाटा बिर्ला येतात, पण  हा लेख लिहितांना ते लोकं अपेक्षित नाहीत.   इतरही लहानमोठे धंदा करणारे लोकं आहेतच, त्यांच्याबद्दल लिहायच आहे आज. आता धंदा करायचा म्हंटलं तर,  सगळ्यात चांगला धंदा असलेला कोणता आहे?? बराच विचार केल्यावर याचं एकच उत्तर एकच लक्षात आलं, ते म्हणजे फेरीवाल्याचा  .

कदाचित थोडं आश्चर्य वाटेल, पण खरोखरच या धंद्या इतका सोपा आणि किफायतशीर धंदा कुठेच नाही.   हल्ली रस्त्याच्या कडेला फुटपाथ वर काय मिळत नाही? ज्या कुठल्या गोष्टी दुकानात मिळतात, तशाच / त्याच वस्तू फुटपाथ वर पण मिळतात. इलेक्ट्रॉनिक सामान ते कपडे किंवा भाजी, फळं वगैरे काहीही वस्तू दुकानाच्या समोरच्या फुटपाथवर मिळते. दादरच्या मार्केट मधे कधी गेला असाल तर दुकानांच्या समोरच्या फुटपाथवर अगदी दुकानाच्या प्रवेशद्वारापाशी पण हे फेरीवाले रस्ता अडवून बसलेले दिसतात.

मी फेरीवाल्याचा धंदा सगळ्यात उत्तम का म्हणालो? तर याचं कारण म्हणजे, या फेरीवाल्यांना काहीच करायची गरज नसते, सेल्स टॅक्स, इनकम टॅक्स, व्हॅट नंबर, सीएसटी नंबर, दुकानाचं रजिस्ट्रेशन,वगैरे काहीच  करायची गरज नसते.  स्वतःच्या मालकीचा धंदा असल्याने  कधी रेसेशन मधे नोकरी जाईल  का ? पिंक स्लिप मिळेल का? व्हि आर एस वगैरे   अगदी कशाची काळजी नसते.  कार्पोरेशन चा फुटपाथ आणि एक पथारी एवढ्याच गोष्टींच्या जोरावर फेरीवाले धंदा केला जाऊ शकतो.

कार्पोरेशनची फेरीवाला हटाव वाली गाडी आली की आपलं सामान उचलून पळायचं आणि ती गाडी केली की मग पुन्हा तिथेच आपली पथारी अंथरायची. मुंबईकरांना पण या कार्पोरेशनच्या तमाशाची सवय झालेली असते. उगाच काही तरी कार्पोरेशनचे लोकं ह्या फेरीवाल्यांना उठवल्याचे नाटक करतात, पण पुन्हा दुसऱ्याच दिवशी सगळे फेरीवाले त्यांच्या नेहेमीच्या ठिकाणी बसलेले दिसतात.

दादरला सुविधा मधे फक्त कपडे विकले जातात, बेडेकर फक्त मसाले , पापड लोणची विकतात, पणशीकरांकडे मिठाई शिवाय काही मिळत नाही, बजाज वाले रिक्षा विकतात, मारुती फक्त कार . कारण या लोकांना धंदा सारखा बदलणे शक्य नसते.   वर्षभर धंदा सारखाच चालत नसतो. काही दिवस खूप विक्रीचे तर काही मंदीचे असतात. एखाद्या महिन्यात मंदी असली तरीही त्यांना दुकानं बंद ठेवता येत नाहीत. लाईट बिल, फोन बिल, दुकानाचं भाडं वगैरेचा खर्च  सुरु असतोच.. खर्च सुरु आहे, म्हणून दुसरं काही विकणे सुरु करता येत नाही.

फेरीवाल्यांचं नेमकं या उलट असतं. पावसाळ्यात केवळ छत्री रेनकोट विकणारा फेरीवाला, थंडीच्या दिवसात स्वेटर्स विकतांना दिसतो. ज्या गोष्टीची मागणी , त्या गोष्टी आम्ही विकणार हा यांचा व्यापारी बाणा असतो.  आज भाजी विकणारा फेरीवाला, उद्या तुम्हाला फळं विकतांना दिसू शकतो. उन्हाळ्यात केवळ हापूसचे आंबे विकणारा फेरीवाला सिझन संपला की सिताफळं किंवा इतर फळं विकतांना दिसू शकतो. इथे बिझिनेस डायव्हर्सिफिकेशन फार सोपं असतं.

फेरीवाल्यांचं आणि तुमचं -आमचं नातं हे लव्ह-हेट रिलेशनशिप सारखं असतं. लोकल मधून उतरल्यावर, घरी जातांना पटकन भाजी , फळं घ्यायची तर तुमचं लक्ष रस्त्यावरच्या फेरीवाल्याकडे जाते, तेंव्हा तो फेरीवाला हवा हवास वाटत असतो, पण रस्त्यावरून चालतांना त्याची अडचण व्हायला लागली की त्याचा राग येतो. फेरीवाल्यांना एस्टॅब्लिश करण्यामागे आपला पण हातभार असतोच.जर लोकांनीच त्यांच्याकडून खरेदी केली नाही, तर ते आपोआपच निघून जातील.   पण तसं होत नाही, कारण आपल्याच रोजच्या जिवनाचे ते अंग झालेले आहेत.

मालाड स्टेशनच्या जवळ असलेल्या आमच्या नेहमीच्या भाजीवाल्या कडून भाजी घेतांना त्याला सहज विचारलं, की दररोज किती फायदा निघतो? तर म्हणाला की  संध्याकाळचे पाच ते आठ इथे बसतो, आणि तेवढ्या वेळात सगळा खर्च जाता  कमीत कमी   ६०० ते १००० रु. पर्यंत  तरी सुटतातच. खर्च फक्त  धंदा करण्यासाठी द्यावा लागणारा   हप्ता .

मुंबईच्या लोकांच्या नशीबात फुटपाथ वर चालण्याचं सुख अजिबात नाही. कुठल्याही भागात गेलात तरी फुटपाथ हे फेरीवाल्यांनी काबिज केलेले आहेत. इथे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांचा कैवार घेणारे बरेच राजकीय नेते आहेत. फेरीवाले उठवले, की  मेघा पाटकर , शबाना आझमी ,राजकीय नेते वगैरे लोकांना एकदम यांचा कळवळा येतो, आणि मग विस्थापित झालेल्या फेरीवाल्यांचे पुन्हा प्रस्थापन करावे म्हणून आंदोलनं सुरु केली जातात. “फेरीवाल्यांना विरोध” म्हणजे “गरिबांना विरोध” अशी प्रतिमा तयार होण्याची भिती असते ना म्हणून राजकीय तुटपुंजे नेते ( गावगुंड) पण यात सहभागीहोतात .

फेरीवाला या शब्दाची शब्दशः व्याख्या ही “डोक्यावर पाटी घेऊन , आपल्या कडला जिन्नस फिरून विक्री करणारे” अशी केली जाऊ शकते. किंवा फार तर गाडी वर भाजी, वगैरे ठेऊन गाव भर भटकत विक्री करायची हा पण अर्थ घेतला जाऊ शकतो, पण हे फेरीवाल्यांच्या जागा पण ठरलेल्या असतात. वर्षानुवर्ष हे लोकं एकाच ठराविक जागेवर बसून, वाहतूकीला अडथळे निर्माण करत   अगदी ५०-५० वर्ष धंदा करतांना दिसतात. आधी वडील, आणि नंतर मग वारसा हक्काने ती फुटपाथ वरची जागा मुलांना मिळते आणि ते  पण एकाच ठिकाणी तोच धंदा ,   करताना दिसतात. रस्त्याने चालतांना पादचाऱ्यांसाठी पण जागा शिल्लक रहात नाही, आणि या गर्दी मधून कथ्थक करत आपला मार्ग काढावा लागतो.

फेरीवाले हे कायम फिरत धंदा करणारे, ते प्रस्थापित कधीच नसतात, मग ते  “विस्थापित” कसे काय होऊ शकतात हा मला पडलेला प्रश्न आहेच.  कारण रस्त्यावर बसून धंदा करणारे आणि दिवसाकाठी हजार एक रुपय कमावणारे ( गरीब) फेरीवाले..   जर एकाच जागी बसून विक्री क्रऊ लागले तर त्यांना  फेरीवाले कसे म्हणता येईल?  मेघा पाटकर ला एकदा विचारायची आहे ही गोष्टं!

“फेरीवाल्यांकडुन वस्तू विकत घेऊ नका” वगैरे उपदेश करण्यासाठी ही पोस्ट लिहिलेली नाही. अगदी सहज काय वाटेल ते लिहिलंय. एक गोष्ट सहज लक्षात आली, की जर हे फेरीवाले नसते तर मी काय केलं असतं? उत्तर सोपं आहे, ” दुकानात जाऊन चार पावलं जास्त चालून आपल्याला हवी ती वस्तू विकत घेतली असती. फेरीवाल्यांना हलवणे काही कठीण नाही.  ठाण्याला असतांना  चंद्रशेखर यांनी हे करून दाखवले, ठाण्याहून जेंव्हा त्यांची नागपूरला बदली झाली, तेंव्हा त्यांची बदली कॅन्सल व्हावी म्हणून  जनतेनेच निदर्शने केली होती.    पुढे नागपूरला गेल्यावर तिथले पण फुटपाथ मार्केट कुठल्याही राजकीय दबावाखाली न येता   हटवून दाखवले. वर्षानुवर्ष महापालिकेवर राज्य करणाऱ्या शिवसेनेचे नेते हे करू शकतील, पण त्यांच्या मधे असलेला    इच्छाशक्ती चा अभाव हेच कारण होऊ शकते.

काय पटतंय  की नाही? सगळ्यात सोपा आणि चांगला व्यवसाय हा फेरीवाल्याचाच आहे.

पुणेरी पगडी…

Written by  on June 1, 2020

Mahadev_Govind_Ranadeजर मी तुम्हाला या शेजारच्या फोटॊ मधली व्यक्ती कोण आहे हे विचारले तर कमीत कमी ९९ टक्के लोकं लोकमान्य टिळक हे नाव अगदी खात्रीपुर्वक  सांगतील.  याचे कारण? अगदी सोपे आहे. आजही आपल्याला कुठल्याही नेत्याचा चेहेरा लक्षात नसतो, तर त्यांची व्यक्ती रेखा ही वेषभूषेवरून लक्षात ठेवण्याकडे आपला कल असतो.बरेचदा तर त्या व्यक्तीची वेषभूषा म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख झालेली असते.  या  फोटो मधे  त्यांनी  घातलेल्या त्या पगडी   मुळे आपले सुप्त मन ह्या व्यक्ती म्हणजे  लोकमान्य टिळक आहेत असे निर्देश जागृत मनाला  देते, आणि जागृत मन ते मान्य पण करते.  वर दिलेला फोटो म्हणजे पुणेरी पगडी चा ज्यांनी  समाजा मध्ये वापर रुळवला, त्यांचा  म्हणजे न्यायमूर्ती माधवराव रानडे यांचे आहे,  आणि आजचे पोस्ट आहे ते म्हणजे पुणेरी पगडी बद्दल.

आपली संस्कृती , म्हणजे इतिहास असतो  का? नाही, मला तरी  तसे वाटत नाही. पण  बरेचदा   आपल्या इतिहासाला  आपण आपली संस्कृती  समजून विचारांची गल्लत करतो. महाराष्ट्रात पूर्वी फेटा, टोपी , मुंडासे किंवा इतर वगैरे डोक्याला बांधल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही अशी पद्धत होती. त्यातल्या त्यात मग समाजातील स्थानानूरुप डोक्यावरचे शिरस्त्राण बदलले जायचे

आमच्या घरी सकाळी जो टीनाच्या डब्यात पाव बटर घेऊन विकायला यायचा, तो मुल्ला डोक्यावर काळी पर्शियन  उंच गोंडा लावलेली टोपी घालून यायचा, तर कल्हईवाला हा डोक्यावर मुंडासे बांधलेला असायचा.दुधवाला ( भैय्या नाही) डोक्यावर पांढरी टॊपी घातलेली , बहुतेक वेळेस तर डोक्यावर काय आहे हे जाती धर्माप्रमाणे ठरलेले असायचे. नंतर काही वर्षातच हे सगळे बंद झाले, आणि   लोकं डोक्यावर काही न घालता फिरणे सुरु झाले. एके काळी बोडख्याने फिरणे अशुभ समजले जायचे तीच गोष्ट सिनेमा मुळे फॅशन म्हणून गणली जायला लागली.

हल्ली लग्ना मधे डोक्यावर पगडी ( फेटा नव्हे) बांधण्याचा प्रकार सुरु झालेला आहे. महाराष्ट्रीयन लोकं पण लग्ना  खास ऑर्डर देऊन येणाऱ्या प्रत्येक वऱ्हाड्याच्या डॊक्यावर राजस्थानी पद्धतीने पगडी बांधून घेतांना दिसतात- मला प्रश्न पडतो आपण मराठी मग  ” लोकं फेटा का नाही बांधून घेत? ” शेवटी मराठी संस्कृतीचे , स्वराज्याचे प्रतीक आहे तो फेटा किंवा पगडी !  पण दुर्दैवाने आपण त्याला विसरलो आणि राजस्थानी पगडी जवळ केली आहे.   कमीत कमी पुण्याला तरी सगळे मराठी लोकं लग्नात फेटा किंवा पुणेरी पगडी का वापरत नाहीत हा प्रश्न मनात येतोच.

हे सगळं झालं तरीही पुणेरी पगडीची स्वतःची ओळख अजूनही टीकुन आहे. दगडुशेठ हलवाई च्या गणपती ला पण हीच पगडी घातलेली आहे.  पुणेरी पगडी नियमित वापरणारी शेवटची व्यक्ती म्हणजे सेतू माधवराव पगडी.  त्यांच्या बरोबर  पुणेरी पगडीचा   वापर संपला आणि ही फक्त सरकारी समारंभात एखाद्याला मान देण्यासाठी वापरायची वस्तू झालेली आहे.नुकताच सिनेकलाकार जितेंद्रचा सत्कार करतांना त्याला पण हीच पुणेरी पगडी घातली गेली होती, आणि त्याचे फोटो पण बरेच ठिकाणी पेपर मधे झळकले, आणि तेंव्हा पासूनच या विषयावर काही तरी लिहायचा विचार करत होतो.

पुणेरी पगडी चा इतिहास खूप मनोरंजक आहे.    पुणेरी पगडी ची माहिती शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण नेट वर अजिबात काहीही  माहिती मिळाली नाही.

पुणेरी पगडी ही नियमित वापरात आणली, ती  न्यायमूर्ती माधवराव रानडे यांनी. सुरुवात माधवरावांनी केली  आणि    जे एस करंदीकर, डॉ. डीडी साठ्ये, तात्यासाहेब केळकर कवडे शास्त्री,  लोकमान्य टिळक, सेतू माधव पगडी वगैरे बरेच लोकं ही पगडी नियमित वापरू लागले. उच्चभ्रू रुची चे लक्षण म्हणजे पुणेरी पगडी  हा समज रुढ झाला, आणि  कदाचित त्या मुळेच शिक्षण क्षेत्रातले लोकं, उच्च विद्याविभूषित लोकं, न्यायदान क्षेत्रातील, सरकारी उच्च पदस्थ मराठी अधिकार्‍याचे शिरस्त्राण म्हणजे पुणेरी   पगडी हे समीकरण रुढ झाले.

पगडीची  किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडीची किंमत ठरायची ती त्यावर वापरलेल्या जडजवाहीर, किंवा सोन्याचा जरतारी कामामुळे.

पगडी बनवणे सोपे काम नव्हते.  कोष्टी  समाजाचे अती कुशल कारागीर  लोकंच हे काम करू शकायचे.  दर पंधरवड्यात एकदा  घरी येऊन ९ इंच रुंदीचा आणि ६५  वार लांबीचा  कपडा  वापरून ही पगडी बनवली जायची. १७ व्या शतकापासून  जी पारंपारिक पद्धत होती तीच  पद्धत १९-२०  व्या शतकातही  वापरली जायची. प्लास्टर ऑफ पॅरीस, किंवा मातीचा  चा डोक्याच्या आकाराचा डाय बनवला जायचा.  त्यावर कांजी केलेले कापड वापरून आणि शिवून पगडी  बांधायचे काम केले जायचे. एकदा पगडी बांधून घेतली की ती साधारण पंधरा दिवस तरी चालायची.

पगडीच्या प्रत्येक भागाला एक विशिष्ट नाव आहे. माथा म्हणजे, डोक्यावरचा भाग, कोका किंवा पोपट म्हणजे वर असलेला उंचवटा. ह्या भागावरच पगडीचे देखणे पण अवलंबून असते. जर हा भाग चुकला की मग पगडी ची शान शिल्लक रहात नाही. पगडी घातल्यावर  हा  भाग नेहेमी उजव्या डोळ्यावर यायला हवा असा

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

पुणेरी पगडी आणि त्या पगडीच्या निरनिराळ्या भागांची नावे.

रिवाज होता. जरतार म्हणजे शोभेसाठी  जरीचे काम केलेले  असायचे  . पूर्वी खरी सोन्याची तार काढून त्याचे कलाबतू आणि जर बनवून व वापरली जायची.  घेरा म्हणजे घेरा, त्याबद्दल काही सांगता यायचं नाही. वर दिलेल्या फोटो मधे सगळे भाग दाखवले आहेत.  पगडी च्या आतल्या भागात  लवकर खराब होऊ नये आणि घालतांना सुखकर व्हावे म्हणून मुलायम कपडयाचे अस्तर लावले जायचे.

पगडी बनवण्यासाठी प्राजक्ताच्या फुलांच्या देठापासून  किंवा तेरड्याच्या फुलांपासून तयार केलेला लाल रंग   वापरला जायचा.   लाल रंग वापरण्याचे कारण फक्त एवढेच की तो रंग लवकर खराब होत नाही, आणि चांगला दिसतो.  आजही पगडी बनवली जाते, पण पद्धत एकदम बदललेली आहे . फॅक्टरी डाय कपडा एकत्र घड्या करून वापरला जातो. बरेचदा कागदी पल्प बनवून त्याचा बेस बनवून तो सेट झाल्यावर त्यावर कपडा शिवून पगडी बनवली जाते. आणि एक बाकी खरे की जुना आकार अजूनही मेंटेन केला जातो.

२००९ मधे पुणेरी पगडी संघ या दहा लोकांच्या गृप ने,  या पगडी ला जॉग्रोफीकल इंडीकेशन मिळवून दिले  ज्यामुळे   पुणेरी पगडी ही पुण्याची प्रॉपर्टी  किंवा प्रोप्रायटरी  आयटम झालेली आहे . पुण्याच्या बाहेर ही पगडी किंवा अशा प्रकारची  पगडी पुणेरी पगडी म्हणून विकली जाऊ शकत नाही. आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे, आणि या पगडीचा वापर कमीत  लग्न कार्यात वगैरे  नियमित पणे  होत रहावा असे वाटते , आणि ते आपल्याच हातात आहे, अहो सुट घालुन लग्नाला उभे रहाण्यापेक्षा पगडी घालून उभे राहिले तर किती छान दिसेल नाही का?? कारण  आजही पुणेरी पगडी म्हणजे पुण्याची शान आहे.