चविने खाणार…कोचिनला

Written by  on May 31, 2020

बरेच दिवस झाले एकही खाण्यावर पोस्ट नाही. म्हणून आजची पोस्ट लिहायला घेतली आहे. इथे कोचीन ला आलो की आवर्जून जायची काही ठिकाणं आहेत माझी. तसं कोचीन वेस्टर्न रीजन मधे येत नाही, पण नेव्ही च्या कामा साठी  इकडे यावं लागतं.  जर हे काम सोडलं तर कोचीनला येण्याचे काहीच काम नाही.

मेडिकेटेड गरम पाणी….

इथे आल्यावर काही जागा नक्की केल्या गेल्या आहेत . दिवसभर तर साईटवर म्हणजे पोर्टवर असतो, मग एकदा आत गेलं की पुन्हा बाहेर चालत  केवळ जेवणासाठी येणं  कंटाळवाणं होतं, म्हणून दुपारचं लंच स्किप केलं जातं. पोर्ट मधे प्रायव्हेट कार्स अलाउड नसल्यामुळे चालतच फिरावं लागतं सगळीकडे…

मंगळवारी इथे आल्यावर लोकल ऑफिस मधे जाउन आमचा एक जुना मित्र आहे सध्या इथला ब्रांच मॅनेजर, त्याला भेटलो. शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर रातको कहा जानेका? म्हंटल्यावर त्याने इथल्या रामवर्मा क्लब चं नाव घेतलं. हा क्लब १०० वर्षांपेक्षा पण जुना आहे. पुर्वी अगदी इ्लीट क्लास इंग्रज या क्लबचे मेंबर्स असायचे. त्यांच्या नंतर देशी  टॉप क्लास इथे येतो. म्हणे मेंवरशिप मिळणं पण कठिण आहे.

फिश टिक्का केरला स्टाइल..ऍम्बियन्स खुपच सुंदर आहे क्लबचं.. जवळपास दीडतास बसलो होतो क्लब मधे. इथली स्पेशालिटी म्हणजे फिश टीक्का .. मोहरीची डाळ वाटून लावल्याने एक तिव्र असा सुगंध असलेली आचारी स्टाइलचा फिश टिक्का आणि आणि चिकन सॉसेजेस.. एकदम मस्त आहेत ड्रिंक्स सोबत म्हणून खायला. आम्ही तिघं होतो, जवळपास तीन चार प्लेट तर नक्कीच संपवल्या असतील दोन्ही डिश मिळून. फिश तर इतकं सॉफ्ट की एकदम तोंडात घातल्या बरोबर विरघळणार. इथे कोचीनला आलो की बांगडे, सुरमई, पापलेट.. हे सगळं विसरायचं.. इथे आलो की फक्त टुना फिश खायची असा माझा दंडक आहे. मग ती टुना फिश बऱ्याच प्रकारात समोर येते. त्या पैकी एक टिक्का हा माझा आवडता प्रकार.

गन पावडर

बराच वेळ बसल्यावर, मग जेवायला कुठे जायचं? तर आंद्रा स्टैल नावाचं हॉटेल आहे क्लब पासून दोन मिनिटांच्या अंतरावर.. अगदी चालत जाण्यासारखं.. त्याचं नांव नक्की करण्यात आलं. आता केरळात येउन आंध्रा स्टाइल जेवण

कसं काय प्रिफर करतो मी? तर ही जागा न टाळता येण्यासारखी आहे. जोश जंक्शन पासून अगदी १०-२० फर्लांग असेल.. इथे व्हेज , नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण मिळतं. तसंही चिकन आणि फिश खाऊन झालं होतंच.. त्यामुळे व्हेज जेवणच मागवलं.शेजारीच तंदूर रेस्टॉरंट पण आहे.. ते पण बरंय..

समोर आधी एक केळाचं पान आणुन ठेवलं. आणि ती फेमस आंध्रा चटणी (चिंचेचा कोवळा पाला +चिंच+ मिरची)  आणि ती पावडर चटणी असलेलं ते स्टॅंड टेबलवर आणून ठेवलं. मी त्या चटण्यांना गनपावडर म्हणतो. इतक्या तिखट असतात त्या दोन्ही. मग एखाद्या पंगती मधे वाढायला यावं त्याप्रमाणे आधी एक वेटर येउन दोन तीन  भाज्या,रस्सम, सांबार आणि दही वगैरे वाढून गेला.

जेंव्हा तो  वेटर भात वाढायला येतो, तेंव्हा त्याने वाढणं सुरु करण्याआधीच नको नको म्हणायचं, म्हणजे तुम्हाला हवा तेवढाच वाढला जाईल भात. 🙂 नाहीतर एका सेकंदामधे मोठा डोंगर तयार होतो आपल्या समोर….एकदा तर तो डोंगर बघून भिती वाटते की कसा संपणार हा म्हणून.. पण एकदा सुरु केलं की लवकरच सगळं संपतं. खूप टेस्टी जेवण असतं इथलं.. व्हेज -नॉन व्हेज का्हीईही असो.. इथे एकदा व्हिजीट मस्ट!!

खाणे हा माझा अगदी आवडता पास टाइम. अगदी खरं सांगायचं तर खाण्यावर अगदी मनापासुन प्रेम करतो मी. अरे हे तर रोहनचं वाक्य !!!

इडीअप्पम सोबत स्ट्यु.. हे कधी कधी कोकोनट ग्रेव्ही मधे पण असतं.

दुसरा दिवस सकाळी वूड्लॅंड हॉटेलमधे गेलो होतो इडिअप्पम खायला इडीअप्पम आणि स्ट्यु – बेस्ट कॉम्बीनेशन आहे. थोडं आंबट जास्त वाटलं ईडीअप्पम , पण चांगलं लागत होतं.. मग शेवटी इडली वडा ऑर्डर करुन लवकर नाश्ता संपवला आणि साईटला गेलो. हे वुडलॅंड हॉटेल खुप चांगलं झालंय आजकाल. हार्बर व्ह्यु मधे नेहेमी उतरतो पण सध्या कुठली तरी डॉक्टर लोकांची कॉन्फरन्स असल्यामुळे  सगळं हॉटेल बुक करुन ठेवलंय त्या लोकांनी.. वुडलॅंडस्चं इंटीरियर पण मला आवडलं. रेस्टॉरंट एकदम मस्त आहे. टिपिकल मल्लू टच आहे डेकोरेशनला..

दुपारी चक्क दोन वाजता काम आटोक्यात आलं, आणि लंचसाठी वेळ मिळाला.. म्हणून दुपारी मेट्रोपोल मधे जाउन

हॉटेल वुडलॅंड्स

ऑथेंटीक केरळा फुड ट्राय करायचं हे ठरवलं. इथे गेल्यावर फिश करी (अर्थात टुना फिश) आणि उकडा भात . किंचित लालसर असलेला हा भात ह्यांचं कॉम्बो एकदम अप्रतिम.. ही टुना फिश जी आपल्या कडे खुप महाग असते ती इथे स्वस्त असल्यामुळे मुबलक प्रमाणात मिळते. टुना चं मीट अगदी देशी चिकन सारखं असतं. एकदा खाल्लं की पापलेट , सुरमाई एकदम मिळमिळीत वाटायला लागेल. मीटमधे देशी चिकन प्रमाणे रेशे असतात.. अल्टीमेट डिश आहे ती.

केरळा लंच

केरळ लंच.. टुना फिश करी राइस आणि व्हेज साईड डीश

इथली ती  भाजी ज्यामधे केळी , शेवग्याच्या शेंगा आणि इतरही काही भाज्या मिक्स असतात तीच नाव आता विसरलो पण ती एक भाजी आणि दुसरी म्हणजे बिन्सची भाजी कोंकणी पद्धतीने नारळ घालुन केलेली एकदम झकास.. सोबतीला आणखीन दोन ग्रेव्ही असलेल्या भाज्या आणि सांबार वगैरे होतंच..

सगळं संपवून अगदी आकंठ तृप्त होऊन उठलो आणि त्या वेटरने आणून ठेवलेलं ते गुलाबीसर रंगाचं गरम पाणी प्यायलो. हे लोकं जेवताना गरम पा्णी पितात – कोंकणातल्या प्रमाणेच.त्या पाण्यामधे कसली तरी मुळी उकळुन घातल्यामुळे त्याला तो टिपिकल लालसर रंग येतो.. साब ऐस्क्रिम?  म्हंटलं नै मंगताय…. !!!! 🙂 अरे जागाच नव्हती हो आइस्क्रिम साठी..

२४ तास कॉफी शॉप.

रात्री जेवायचं नाही हे आधीच ठरवून टाकलेलं होतं. पण रात्र झाल्यावर जेंव्हा फिरायला निघालो तेंव्हा इथलं २४ तास कॉफी शॉप आहे तिकडे पाय वळलेच.. आणि तिथे गेल्यावर एक पुट़्टू विथ चेना केरी  🙂 म्हणजे चना करी मागवली. पुट़्टु माझी फेवरेट डिश आहे. ही कशाही बरोबर खाता येते. बांबुच्या आत तांदुळाची जाडसर पावडर आणि नारळ एकत्र करुन भरतात आणि मग ते वाफवतात. खुप सुंदर चव येते त्या तांदुळाला , नारळात वाफवल्यामुळे.

काही लोकं वाफवतांना एखादं लिंबाचं पान किंवा, गाजर किस वगैरे पण सोबत टाकतात ज्यामुळे एक वेगळी चव आणि फ्लेवर येतो. लिंबाचं पान घालुन केलेला पुट़्टू मला खुप आवडतो. या पुट़्टु सोबत चना मसाला आणि दोन आप्पलम .. जबरी कॉम्बो आहे.. शेवटी कॉफी घेउन ऊठलो आणि परत आलो.

२४ तास कॉफी शॉप. म्युझियम समोरचं

पुट्टू विथ चना करी.

पुट्टू विथ चना करी.. मस्त डिश आहे ही.

.केरळला असतांना आपले काही लोकं पण दिसतात हॉटेल्स मधे. त्यांची ऑर्डर करण्याची पद्धत बघून जरा नवल वाटतं. ते इथे पण पराठा, रोटी वगैरे मागवतात. इथे आल्यावर इथल्या स्पेशल डेलिकसीज जर तुम्ही खाल्ल्या नाहीत तर काय अर्थ आहे? इथे आलात तर हे सगळे दिलेले प्रकार, आणि अजुन एक प्रकार आहे सालन नावाचा, सालन विथ पराठा हा पण नक्की ट्राय करा..

खूप मोठं होतंय पोस्ट.. म्हणून आता थांबवतो. इथेच पुढच्या वेळेस अजुन काही जागा… इथल्या कव्हर करीन..

म्हातारा नवरा अन, कुंकवाला आधार.

Written by  on May 31, 2020

काही वर्षापुर्वी आमच्या नागपूर ऑफिस ला कामानिमित्य जाणे झाले. तसं पाहिलं तर नागपूर ऑफिस लहानसे होते. इन मिन १६ लोकं होते काम करणारे, आणि एक १७वी चंदा नावाची मुलगी. ती रोज सकाळी येऊन झाडणे, टेबल स्वच्छ करणे डस्टबिन्स स्वच्छ करणे वगैरे काम करायची. पण ह्या वेळी मात्र चंदा सोबतच अजून एक मुलगी दिसली. साधारण पंचविशी मधली असावी. कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात दोन पदरी मंगळसुत्र आणि जुनीच पण स्वच्छ साडी नेसलेली. ती टेलेक्स मशिन वरून आलेले  टेलेक्स मार्क करून प्रत्येकाच्या टेबल वर आणुन ठेवत होती. आमच्या ऑफिस मधे नवीन भरती, आणि ती पण प्युनच्या लेव्हलची गेल्या कित्येक वर्षापासुन बंद होती, तेंव्हा ही कोण? हा प्रश्न अस्वस्थ करत होता.

समोर बसलेल्या मित्राला विचारले, ही कोण रे? तर म्हणाला ही संजय ची बायको रोहिता! संजय  म्हणजे कंपनीच्या जीपचा ड्रायव्हर. नबाब खान म्हणून एक ड्रायव्हर रिटायर्ड झाल्यावर, त्याच्या जागी ह्या संजयला डेली वेजेस वर ठेवले होते कामाला. २५-२६ चा संजय एक दिवस अचानक पणे हार्ट बर्न ने गेला. अगदी काही  कारण नव्हते जाण्याचे! . घरची परिस्थिती म्हणजे हातावरचे पोट. आकस्मित पणे वारल्या मुळे त्याची मुलगी आणि लहान मुलगी एकदम रस्त्यावर आली ,शेवटी नागपुरच्या ब्रांच मॅनेजरने  तिला मदत म्हणुन डेली वेजेस वर कामावर ठेवलं.  तशी रोहिता शिकलेली. चक्क दहावी पास झाली होती. तेंव्हा आलेले टेलेक्स वगैरे किंवा डाक कोणाच्या नावे आहे, ते तिला समजायचे,म्हणून प्युन चे काम तिला दिले गेले.  तिचा काम करण्याचा आवाका वाखाणण्यासारखा. नोकरीची गरज असलेला माणुस कधी पण लक्षात येतो.तर असो, इथे विषय रोहिताचा नाही.

एक गोष्ट मात्र सारखी खटकत होती,संजय वारला, म्हणजे ही विधवा, मग गळ्यात मंगळसुत्र आणि कपाळाला कुंकू कसे काय? थोड्या वेळाने ती टेबलवर चहा घेऊन आली, तेंव्हा तिला विचारलेच, तर म्हणाली,  आज हे जरी नसले तरी आजही ह्या मंगळसुत्राचा आणि कुंकवाचाच तर आधार आहे. सुरुवातीला काही दिवस हे वापरणं बंद केलं होतं, तर लक्षात आलं, की विधवेकडे पहाण्याचा लोकांचा दॄष्टीकोन अजिबात चांगला नसतो, इनडायरेक ऍडव्हान्सेस, आणि इतर वेळी हिचा नवरा नाही , म्हणजे ही आता ऍव्हेलेबल आहे, ह्या भावनेतुन लोकांच्या केल्या गेलेल्या कॉमेंट्स चा खूप त्रास व्हायचा. स्वतःचाच राग यायचा, मी काय ’तशी” बाई आहे का? आणि जर  नाही तर माझ्याकडे हे लोकं असे का ऍप्रोच होतात? पण नंतर मात्र  गळ्यात काळी पोत, आणि कपाळाला कुंकू  पुन्हा चिकटवले आणि  लोकं एकदम अदबीने वागतात, एक प्रकारचा दरारा असतो ह्या कुंकू/मंगळसुत्राचा! कोणी तरी आहे, ह्या स्त्री च्या मागे, ही एकटी नाही . म्हणुन पुन्हा वापरणे सुरु केले आणि हा त्रास   अगदीच संपला जरी नाही तरी आटोक्यात आला.

तसेही अगदी लहान असतांना पासुन कपाळावर टिकली लावायची सवय , लग्न झाल्यावर कुंकू मधे बदललं. सवयीचा भाग म्हणुन संजय गेल्यावर काही दिवस रोज सकाळी कुंकवाच्या बाटली कडे हात जायचा, पण नाही, आता ते लावायचं नाही , कारण संस्कार आडवे यायचे. पण आता मात्र  विश्वास बसलाय की कुंकवाची टिकली आणि मंगळसूत्र म्हणजे स्त्री चे एक अदृष्य शस्त्रंच असतं. कोणाची हिंमत होत नाही सहजपणे वाईट नजरेने बघायची.

एकदम पटलं तिचं बोलणं. घरात अगदी म्हातारा नवरा असला, तरीही समाजात किंमत असते स्त्रीला, ही गोष्ट वाईट की चांगली ह्याचा उहापोह करत नाही. पण ही एक सत्य परिस्थिती आज नाकारता येत नाही. लग्न न झालेली सिनेमा नटी , सगळ्यांची स्वप्न सुंदरी असते, पण एकदा तिचे लग्न झाले की मग मात्र बऱ्याच जणांच्या स्वप्नातूनही तिची हकालपत्ती होते. मानवी स्वभाव आहे हा. एखादी अती सुंदर स्त्री जर एखाद्या अगदी मरतुकड्या माणसाबरोबर जात असेल, तरी पण तिला छेडायचा कोणी प्रयत्न करत नाही. एक अनामिक भिती असते लोकांच्या मनात. हेच कारण असावे, की पुरातन काळापासून एक म्हण चालत आली आहे, “म्हातारा नवरा, कुंकवाला आधार!” अगदी चार शब्दात स्त्री चं आयुष्य  रेखलं आहे. पटॊ अथवा, ना पटॊ, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

हसू..

Written by  on May 31, 2020

“साब, हसो .. छे बार हो गया, आप बराबर नई हसता है,  मेडम देखो कैसे मस्त हसती है , आप हसो ना, टेन्शन नय लेनेका”

त्याने ऑर्डर सोडली. आमच्या लग्नाचा विसावा  (की तेविसाव्या? जाऊ द्या, काय फरक पडतो?) वाढदिवस असावा, आम्ही सगळे म्हणजे मी, सौ, आणि मुली फोटॊ स्टूडीओ मधे फोटॊ काढायला गेलो होतो.  फोटोग्राफर इतका फास्ट होता, की इस्माईल प्लिज, म्हणायचा आणि दुसऱ्याच क्षणी क्लिक करायचा. त्याने इस्माईल प्लिज म्हटल्याबरोबर बायको आणि मुलींच्या चेहेऱ्यावर एकदम हुकुमी हास्य यायचं,  पण मला काही हसणे जमत नव्हते. मी त्याला म्हणत होतो, की अरे बाबा, इस्माइ बोलने के बाद मुझे थोडा टैम तो दो हसनेके लिये.. पण  चार पाच वेळ फोटो काढल्यावर पण त्याला काही माझं’ इस्माईल कॅप्चर करता आलं नाही..

हसू येणे हे असेच असते, जेंव्हा यायचं असेल तेंव्हा  तुमच्या नकळत येते, अगदी विनाकारण पण येते , आणि नसेल यायचे तर, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीही  येत नाही . एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या बॉस समोर बसले असता, तेंव्हा अचानक एखादा जुनी घटना आठवते, आणि नकळत हसू फुटतं . बॉस काहीतरी कामाचं खूप महत्त्वाचं सांगत असतो, आणि तेंव्हा तुमच्या चेहेऱ्यावर हसू पाहिलं, की त्याची जाम चिडचिड होते, ’व्हाट्स फनी? लेट मी नो, आय विल आल्सो लाफ” हा डायलॉग प्रत्येकानेच आयुष्यात कधी ना कधी तरी ऐकला असतो.

जेंव्हा हसू येतं तेंव्हा अगदी धबधब्यासारखं खो खो करत येतं, कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीही ओठावरचे हसू काही थांबत नाही. ओठ बंद केल्यावर,   तुमचे सगळे शरीर  गदा गदा हलत हसत असते. त्यातल्या त्यात डोळे तर खूप मिश्किल असतात, एकदा हसायला लागले, की ओठ बंद केल्यावर पण हसत असतात, हसणारे डोळे इतके काही सांगून जातात की ज्या साठी लाखो शब्दंही पुरेसे पडणार नाहीत.

हसणारे डोळे म्हणजे? आठवा, तुमचे लग्न झाल्यावर तुम्ही आजीला जेंव्हा पहिला नमस्कार करायला जाता तेंव्हाचे तिच्या डोळ्यातले हसू, किंवा जेंव्हा तुम्ही एखादी परीक्षा पास होता, कॅंपस मधे सिलेक्ट होता , तेंव्हा तुमच्या आईवडिलांच्या   डॊळ्यात  उमटलेले हसू आठवून पहा त्या डोळ्यांमध्ये हसू असतं, आणि सोबतच गर्व पण असतो – आपल्या मुला, मुली बद्दलचा! हे सगळं आठवा  मग मी काय म्हणतोय ते लक्षात येइल.

’अमेरिकाज फनिएस्ट व्हिडीओ” नावाचा एक कार्यक्रम सौ. खूप आवडीने पहाते. त्या मधे ’फन” म्हणजे काय असतं? तर  धडपडणे. सारखे कोणीतरी काही तरी करतांना पडत असतात, आणि त्याचे लहान लहान व्हिडीओ असतात. बरेचदा अगदी तीन चार वर्षाचं मुल सायकल वरून अगदी उलटसुलट पडतं आणि त्या मागे रेकॉर्डेड हसू ऐकवतात, आणि हा असा व्हिडिओ फनी व्हिडीओ म्हणून पोस्ट केलेला असतो. मला स्वतःला ते व्हिडीओ पाहून अजिबात हसू येत नाही, तर मनात ” अरेरे.. किती लागलं असेल बिचाऱ्याला हा विचार येतो.  कोणी कशावर हसायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

त्याच कार्यक्रमात , लग्नाच्या व्हिडीओ मधे नवऱ्या बायकोने एकमेकांना केक (ने) भरवणे ( शब्दशः अर्थ घ्या, चेहेऱ्यावर केक ने लेप देणे )  व्हिडीओ पण नेहेमीच दाखवतात.  त्याच्या लग्नात केक हा केवळ  नवरा नवरी ने एकमेकांच्या चेहेऱ्यावर माखण्य़ा साठी बनवतात का? हा प्रश्न नेहेमी पडतो मला. मानवी स्वभाव आहे झालं, हसू येतं ते दुसऱ्याच्या फजितीवर.

जर समजा राहूल गांधी किंवा सोनिया गांधी केळाच्या साला वरून घसरून पडले, तर त्यांना कोणी हसणार नाही, तर खरंच काही लागलं का म्हणून काळजी करतील. या जगाचा हा नियमच आहे, कमकुवत माणसाला हसा, त्याची टिंगल टवाळी करा.. कारण बिचारा करून करून करेल तरी काय? पडला तर धडपडत उठेल, केविलवाणा हसेल आणि दुःखाच्या कळा मनातल्या मनात जिरवत  लाजे खातर तुमच्या नजरा चुकवत समोरून निघून जाईल.   पण हसू हे असंच असतं, जेंव्हा येतं तेंव्हा येतच असतंम- कमकुवत माणसाची फजिती पाहून तर  जास्त येतं.

हे हसू येणं पण मोठं विचित्र असतं, बरेचदा एखाद्याने काही सांगणे सुरु केले की ओठाच्या कोपऱ्यातून अपमानकारक ( कंटेम्प्ट) हास्य पण बरेचदा दिसते.त्याचा अर्थ असतो , मला माहिती आहे , की तू मूर्ख आहेस! पण यातली गम्मत अशी की, समोरच्या माणसाला ते लक्षात येत नाही, आणि तो आपण सांगितलेल्या गोष्टीवर दुसरा माणूस हसला म्हणून खूश होतो.

कधी हसावे आणि कधी नाही , याला पण काही नियम नाहीत, पण तरीही समजा असते, तर ते कसे असते याची उदाहरणं समोर देतोय.  जसे  तुमच्या हातात सोलले संत्रे   आणि समोरच्या  माणसाच्या हातात ” संत्र्याची साल “असेल तेंव्हा हसू नये, कटींग करायला बसले आहात, न्हावी कानामागचे केस वस्तऱ्याने साफ करतोय तेंव्हा , बॉस ची काही चूक झाली असेल तेंव्हा,  तुमच्या कडे सुटे पैसे नसताना कंडक्टर कडे पाहून, शाळेत सर शिकवत असतांना सरांच्या शर्टची बटन्स खाली वर लागलेली असताना, गर्ल फ्रेंड सोबत असेल, तुम्ही पिझा खायला गेला आहात, आणि तिच्या ओठाच्या दोन्ही कोपऱ्यात चिझ /केचप लागलेले असते तेंव्हा, तिला कधी शिंक आली, आणि तिने रुमालाने नाक पुसण्या आधी तुम्हाला तिचे नाक दिसले तरीही ते  पाहून कधीच हसू नये.अशी अनेक उदाहरणे देता येतील, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ” बायकोचे चुकले असतांना, आणि तुम्ही तिची चूक पकडली असतांना तर अजिबात हसू नये!”

चक्रधरांच्या एका कविते मधे त्यांनी असे लिहिले आहे ..
ये हसीं एक चमत्कार है,
चेहेरे के भूगोल मे
होठोंके विभिन्न कोणीय प्रसार है!
पिताजी हसें तो फटकार है,
मां हसे तो प्यार है,
बिबी हसे तो पुरस्कार है,
पती हसे तो बेकार है,
उधार देने वाला हसे तो इन्कार है,
लेने वाला हसे तो उसकी हार है,
दुश्मन हसें तो कटार है
पागल हसे तो विकार है,
व्हिलन हसे तो हाहाकार है,
पडोसी हसे तो प्रहार है,
दुकानदार हसे तो भार है,
हिरो  हसे तो झंकार है,
हिरोइन हसे तो बहार है,
प्रेमिका हसे तो इजहार है,
प्रेमी हसे तो फुहार है,
ओ हसिं,
“तू धन्य है! तुझे धिक्कार है’
क्योंकी जहा नहीं आनी चाहिये
वहा आनेमे देर नहीं लगाती है,
एक पल मे महाभारत कराती है!

या जगात हसणं सगळ्यात महत्त्वाचे आहे, तुम्ही हसायला लागला की  ते संसर्गजन्य असल्याने तुमच्या संपर्कात येणारे सगळे  हसू लागतात.   स्वतःवर केलेले हास्य हे नेहेमीच सगळ्यांना हसवते.

असं म्हणतात की मानवाला हसू येतं, आणि  जनावराला नाही. एवढाच काय तो दोघांमधे फरक आहे. म्हणजे च याचा अर्थ हा की, जो हसत नाही तो जनावरासारखाच  आहे.

कोणाचं हसू कशात, तर कोणाचं कशात! नेत्यांचे हासू असतं ते पैशाच्या खोक्यात, बाळाचे हसू , आईच्या ओठात, विद्यार्थ्याचे हसू, केटी न लागल्याच्या रिझल्ट मधे, बायकोचे हसु नवऱ्याच्या पाकिटात, नवऱ्याचे हसू बायकोच्या हसण्यात! आणि हो मंत्र्यांचे हसू, केजरीवालच्या हातात!

 

 

 

 

(चक्रधर यांच्या कवितेवर.)

मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..

Written by  on May 30, 2020

गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला जायचा.

लग्न झाल्या पासून किंवा मुली झाल्या नंतर  त्यांच्या समोर  मात्र कधीच आकाश कंदील बनवला नव्हता. दर वर्षी असं जरुर वाटायचं की या वर्षी नक्की बनवु म्हणून.. पण   बांबूच्या काड्या न मिळाल्यामुळे राहुन जायचं. गेल्या विस पंचविस वर्षापासून  आकाश कंदील आमच्या घरी लागायचा, पण विकतचा.. ! आजकाल तर त्यांना माझं सांगणं खोटं वाटायला लागलं होतं. म्हणून या वर्षी तरी आकाश कंदील काहीही झालं तरीही घरीच बनवायचा हे पक्कं ठरवलं होतं… 🙂

सौ. म्हणते पूर्वीच्या काळी मुलांना बिझी ठेवायला म्हणून आई वडील  आकाश कंदील घरी करायला लावायचे. काल आकाश कंदील बनवायला घेतला तर, मी पण पहा ना दिवस भर नेटवर बसलो नव्हतो आकाश कंदील करायचा म्हणुन. म्हणजेच सौ. च्या कॉमेंट मधे तथ्य आहेच  काहीतरी.. असो..जरी ते खरं असलं तरी मान्य न करणं आपल्या हातातच आहे नां?? 🙂

या वेळी मात्र ठरवून टाकलं की आकाश कंदील नक्कीच करायचा.. अगदी काही झालं तरीही….. या वर्षी घरी केलेला आकाश कंदीलच लावायचा! अजुनही आठवलं की कसं मस्त वाटतं. आजची पोस्ट आहे आकाश कंदिलावरची.

बाजारात कितीही आकाशकंदील विकत मिळत असले तरीही घरच्या आकाश कंदीलाची त्याला सर येत नाही. आकाश कंदील करायचा म्हणजे त्याची तयारी आधी पासुन सुरु करावी लागते. सगळ्यात आधी आवश्यकता असते ती एका बांबूच्या काड्यांची. जर बांबू पुर्ण पणे सुकलेला असेल तर त्याला तासून त्याच्या लहान लहान काड्या बनवणे जमत नाही. त्या साठी त्या बांबूला पाण्याच्या पिंपात रात्रभर बुडवून ठेवावा लागायचा. थोडा भिजला की मग त्याचे हवे तसे तुकडे करता येतात.बांबू तासायला म्हणून कुऱ्हाडीला खूप धार करावी लागायची.

इथे मुंबईला आकाश कंदील बनवायचा तर बांबू आणणार तरी कुठुन?? मिलियन डॉलर प्रश्न?? शेवटी किचनमधल्या कोपऱ्या मधे असलेली केरसुणी (आका झाडू, कुंचा किंवा तुम्ही त्याला जे काय म्हणता ते) दिसली. तिकडे नजर गेली आणि सौ. ला पुर्ण कल्पना होतीच की मी आता काय करणार. पण त्यावर काहीही कॉमेंट द्यायचे तिने टाळले.

केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..

केरसुणीच्या मधे पॅकिंग करता वापरलेल्या बांबुच्या काड्या..

तो कुंचा घेउन बाल्कनीमधे गेलो, आणि सगळं बांधलेला प्लास्टिकचा दोर सुटा केला. त्या  केरसूणीच्या मधे काही बांबूच्या काड्या होत्या त्या काढून घेतल्या. एका केरसूणीच्या मधे ७ काड्या मिळाल्या, मला हव्या होत्या १४ काड्या. म्हणून दुसऱ्या केरसुणीची पण वाट लावली. नंतर साळसूद पणे दोन्ही केरसुण्या एकत्र करुन एक नवीन केरसुणी बनवून बांधून ठेवली, आणि वर पुन्हा सौ. ला हे पण सांगितलं की बघ, आधीपेक्षा पण चांगली करुन ठेवली आहे …  🙂

धाकटी मुलगी सारखी आता तुम्ही काय करताय? किंवा आता तुम्ही काय करणार? या काड्यांचा आकाश कंदिल कसा काय तयार होईल? असे असंख्य प्रश्न विचारुन भंडाउन सोडत होती.

लहानपणी सुतळी चिकण मातीच्या पाण्यात भिजवून आकाश कंदिल करतांना वापरायचो. त्या साठी लगणारी चिक्कण माती,तुळशीच्या कुंडितील काढून वापरायचो. आकाश कंदिलाचा साइझ खुप मोठा असायचा म्हणुन बांबूच्या काड्या पण खूप जाड  जूड असायच्या. तेंव्हा साध्या ट्विलच्या दोऱ्याने मिडियम साईझचा आकाश कंदिल बनवता यायचा , पण मोठा बनवायचा म्हट्लं तर सुतळी वापरावी लागायची.आणि सुतळी मजबुत रहायला चिक्कण माती.

या वेळच्या आकाश कंदिलाचा साईझ अगदी लहानच आहे म्हणून,  आता मात्र साधा दोरा आणि फेविकॉल वापरुन फ्रेम बनवायचं ठरवलं.  पण कुठल्या आकाराच आकाशकंदील बनवायचा हे ठरल्याशिवाय   काड्यांचे तुकडे.. त्यांची साइझ कशी असावी हे ठरवू शकत नव्हतो.

मुलीला  विचारलं की डायमंड शेप की स्टार शेप?? तर स्टार शेप चा विजय झाला. आणि त्या अनुषंगाने  चार एकाच आकाराचे त्रिकोण करायला १२ काड्या , आणि त्या दोन स्टार्स ला एकत्र जोडण्यासाठी सहा तुकडे असा साधा सरळ हिशोब करुन कामाला लागलॊ.

  बांबूच्या काड्या एका आकारात कापायला अडकित्ता वापरला

मला हव्या तशा एकाच मापाच्या १२ काड्या घेउन,आधी त्यांना एकाच लांबीचे  कापले आणि नंतर  स्टारची फ्रेम बनवली. साधा रीळाचा दोरा वापरुन कच्ची फ्रेम तयार झाली.

कागद चि कटवण्यासाठी मैद्याची खळ बनवायची घरच्या स्टोव्ह वर. आई ओरडायची, पण दुर्लक्ष करायचं झालं. सगळ्यांच्याच घरी हाच खेळ सुरु असायचा..आकाश कंदिल.. मित्र घरी येउन बघून जायचे, मदत पण करायचे. या वेळेस मात्र फेविकॉल का जबाब नहीं… 🙂

वर लावायचा कागद कुठला? तो तर घरी नव्हताच?? म्हणून तो पर्यंत फ्रेम पक्की करुन ठेवावी असा विचार केला. ६ पदरी दोरा केला, आणि त्याला फेविकॉल लाउन प्रत्येक जॉइंट भोवती गुंडाळले. अर्धा डबा फेविकॉल वापरले . १०० ग्राम चा डबा होता तो! इतकं करुन फ्रेम सुकत ठेवली पंख्याखाली.

चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.

चला, शेवटी जमलं एकदाचं.. चांगलं चार तास घालवल्यावर..दोन त्रिकोण करुन एकावर एक जोडले स्टार बनवायला.

संध्याकाळी मार्केटला जाउन पतंगीचा कागद विकत आणला. पण तो चि कटवायचा कसा?? हे विसरल्या सारखं झालं होतं. म्हणजे त्याचे तुकडे करुन लावायचे की एकच मोठा तुकडा लावून जास्तीत जास्त भाग कव्हर करण्याचा प्रयत्न करावा, हेच लक्षात येत नव्हतं. शेवटी सरळ लहान लहान तुकडे करुन चिकटवले तर ते मजबुत होतील असं लक्षात आलं आणि म्हणून कागदाचे तुकडे ( अंदाजे मापा प्रमाणे ) केले.

आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .

आकाश कंदिलाचं स्ट्र्क्चर.. फेविकॉल माखलेल्या चार पदरी दोऱ्याने पक्का करुन सुकत ठेवलाय .

काड्यांना फेविकॉल लावून त्यावर कागद चिकटवले आणि शेवटी तो ढांचा एकदाचा आकाश कंदीला प्रमाणे दिसू लागला. पण सगळा आकाश कंदील एकाच रंगाच्या कागदाने बनवल्यामुळे तो खास सुंदर गेट अप काही येत नव्हता.सौ.च्या म्हणण्याप्रमाणे त्याला सुंदर शी लेस लावली तर तो चांगला दिसेल , म्हणून उद्या येतांना लेस आणून लाउ असं ठरलं.

आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.

आता मात्र दिसतो हा आकाश कंदिला सारखा.

तसं , दुसऱ्या एखाद्या रंगाचा कागद घेउन त्याच्या पट़्ट्या पण वापरलया असत्या तरीही चाललं असतं. पण लेस मुळे काम सोपं होईल , आणि दिसायला पण जास्त चांगलं होईल म्हणून लेस आणायचं ठरवलं.

आता लेस लावल्यावर मात्र आकाश कंदिल एकदम मस्त दिसायला लागला. पतंगीचा कागद वापरला आणि आतमधे एक ६० चा बल्ब लावला की बाहेर खूप छान प्रकाश पडतो, म्हणून जिलेटीन च्या ऐवजी पतंगिचा कागद वापरण मला आवडतं.

हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही मिळुन एकत्र केलेली.. :)

हा आहे पुर्ण झालेला आकाश कंदिल , आणि सोबतंच ’ती’ केरसुणी , मी दोन्ही केरसुण्या एकत्र करुन बनवलेली.

अमरावतीला , अगदी लहान साइझ चा आकाश कंदील करून मग त्याला पतंगाच्या दोऱ्याला बांधुन उंच उडवायची पध्दत अजुनही आहे. त्या साठी एक लहानसा आकाश कंदील स्पेशली बनवावा लागतो. त्या आकाश कंदिलाला बहुतेक लाल रंगाचा एक जिलेटिन चा कागद वापरत.  दिवाळी आली, की रात्रीच्या वेळेस  आकाशामधे तुम्हाला असे बरेचसे आकाश कंदील उडतांना दि्सतील. या आकाश कंदीलामधे मेणबत्ती लावण्याची व्यवस्था केलेली असायची.

आकाश कंदील जर उडवायचा असेल तर एकच गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तुम्हाला एक मोठी पतंग  जी उडतांना खुप स्थिर उडते अशी घ्यावी लागते. आधी पतंग उडवायची मग नंतर दोऱ्याला एक लांब दोरा बांधुन त्याला आकाश कंदील बांधायचा. मोठी असल्यामुळे पतंग त्या आकाश कंदीलाला अगदी सहज पणे उंच घेउन जाते.

हा आकाश कंदील मी बनवलाय खूपखूप वर्षांच्या नंतर… त्यामुळे काही फारसा सफाईदार पणे जमलेला नाही. पण जस्ट आपला एक मजेशीर एक्स्पिरिअन्स शेअर करावा म्हणून इथे पोस्ट केलंय…

दिवाळिच्या दिवसात निरभ्र आकाशात आकाश कंदील उडवण्यातली मजा काही वेगळिच .. गच्चीवर पलंगावर पडुन रहायचं आणि उंच उंच जाणारा तो आकाश कंदील पहात रहायचं. गेले ते दिवस.. ते गाणं आहे ना गुलझारचं, दिल ढुंढता है… माझं आवडतं आहे ते… 🙂

डेस्परेट मायक्रोसॉफ्ट

Written by  on May 30, 2020

मायक्रोसॉफ्ट आणि गुगल मधलं भांडण म्हणजे कोक आणि पेप्सी मधलं भांडण या मधे थोडासा फरक आहे. कोक – पेप्सी ह्यांची पद्धत जरा निराळी असते. म्हणजे एखाद्या देशामधे ते गेले, की आधी लोकल एस्टॅब्लिश्ड प्लेअर्स बरोबर ते कॉम्पिट करुन त्यांना नामशेष  करतात,एकदा का लोकल प्लेअर्स नी या दोघांच्या पुढे लोटांगण घातलं की मग सगळ्या लोकल ब्रॅंडस बंद करुन सगळ्या शेल्फ वर फक्त पेप्सी किंवा कोक दिसे  पर्यंत या दोन्ही कंपन्या मित्र असतात… पण एकदा का लोकल लोकं नामशेष झाले की ह्या दोन्ही कंपन्या एकमेकांशी कॉंपिट करण्यासाठी तयार असतात..  ही स्ट्रॅटेजी अगदी जगभर वापरली जाते.

मायक्रोसॉफ्ट्चं आणी गुगल यांचं भांडण हे जगजाहीर असलं तरिही ते असे एकेमेकावर आरोप प्रत्यारोप करित नाहीत. गुगल चं एक आहे कुठलंही प्रॉडक्ट लॉंच करतांना आधी बीटा व्हर्जन लॉंच करते. म्हणजे प्रॉडक्ट अंडर डेव्हलपमेंट, या उलट मायक्रोसॉफ्ट कधीच बीटा व्हर्शन लॉंच करित नाही. ( विंडॊज याला अपवाद ) आणि मग मात्र दर ८-१० दिवसांनी एखादा पॅच रिलीज करतात. माझ्या लॅपटॉपवरचं आय ई ८ मी अपडेट केलं . पण तेंव्हापासुन जेंव्हा कधी ते वापरतो तेंव्हा पासून बरेचदा क्रॅश होतं . नाही… मी गुगल क्रोम वापरत नाही. मी फायरफॉक्स वापरतो आणि मला ते सगळ्यात जास्त आवडते. मी आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात घाणेरडी जाहिरात आहे ही. इतकी वाईट जाहिरात केली म्हणजे त्याची चर्चा होते आणि पुर्ण मायलेज मिळतं. नंतर पब्लिक आउट क्राय म्हणून जाहिरात मागे घ्यायची, हे नेहेमीचंच आहे.
माझ्या मते मायक्रोसॉफ्ट चं प्रिमियम प्रॉडक्ट म्हणजे एम एस ऑफिस.. आता गुगल लवकरच लिनक्स बेस्ड ऑफिस लॉंच करणार आहे. आज ऑफिस ओरिजनल लोड करतो म्हंटलं तर कमीतकमी तिन हजार आठशे रुपये लागतात. खरंच इतकं वर्थ आहे कां ते? जर मायक्रोसॉफ्ट ने प्रॉफिट रेंज कमी केली नाही तर अर्थातच बरेच लोक गुगलचं सॉफ्ट वेअर नक्कीच ट्राय करतिल ( मी इनक्लुडेड) 🙂

प्रत्येक कंपनीला आपल्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्याचा पुर्ण अधिकार आहे. पण ती जाहिरात कशी असावी , यावर पण थोडा कंट्रोल असायला हवा.मायक्रोसॉफ्ट ने जेंव्हा हे आय ई ८ लॉंच केलं तेंव्हा एक जाहिरात रिलिझ केली होती. ती पाहुन हे लक्षात येतं की किती डेस्परेट आहे मायक्रोसॉफ्ट ह्या प्रॉडक्ट च्या बाबतित. इथे दिली आहे ती जाहिरात – ओ माय गॉड आय प्युक , मायक्रोसॉफ्ट ला ही टंग इन चिक जाहिरात वाटते.कदाचित ही जाहिरात लवकराच यु ट्य़ुब वरुन पण विथड्रॉ केल्या जाइल असे वाटते. अतिशय घाणेरडी जाहिरात आहे . स्वतःच्या रिस्क वर पहा.. 🙂

बर्गर किंग हे नेहेमीच अशा  क्रुकेड जाहिराती काढत असतं. आता सध्या सुरु असलेली लक्ष्मी चं चित्र असलेली बर्गर किंगच्या जाहिरातीच्या विरुध्द बऱ्याच हिंदु लोकांनी आवाज उठवलाय. पण अजुन तरी ही जाहिरात मागे घेतलेली नाही. बर्गरकिंगला लक्ष्मीचंच चित्र का वापरावं वाटलं? जिझस पवित्र नाही कां?जर असेल तर मग तिथे जिझस का दाखवला नाही??

अशा अनेक जाहिराती आहेत अजुनही अव्हेलेबल… पण….!

अभी तो मै जवान हूं..

Written by  on May 29, 2020

भानुरेखा  गणेशन… ही कोण बया??

पडला ना प्रश्न? बरं उमरावजान रेखा?? हं.. तिच !  तिचा जन्म १० ऑक्टॊबर १९५४ मधे झालेला. म्हणजे ती माझ्यापेक्षाही ६ वर्ष मोठी.तसा कुठल्याही हिरोइनच्या प्रेमात वगैरे मी कधीच पडलो नाही.   कुठल्याही  हिरोइन्स वर क्रश वगैरे कधीच नव्हता. फक्त त्यांचा प्रेझेन्स आवडायचा पडद्यावरचा, एवढंच.

जेमिनी गणेशन आणि पुष्पा गणेशन ह्या दक्षिण भारतीय दांपत्याची ही कन्या!आई आणि वडील दोघंही कलाकार, त्यामुळे हिचं लहानपण सेट्स आणि स्टुडीओ मधेच गेलं. त्यामुळेच असेल की ती वयाच्या तेराव्या वर्षी पण कॅमेरा फेस करतांना अगदी ऍट इज होती.

वयाच्या १३ व्या वर्षी तिने हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला होता. तिने जेंव्हा हिंदी सिनेमात कामं सुरु केलीत तेंव्हा तिला हिंदी पण नीटसं येत नव्हतं. पण लवकरच शिकली ती.. आणि तिच्या हिंदी उच्चाराचे बेस्ट परफॉर्मन्स म्हणजे उमराव जान..अगदी कुठल्याही अंगाने तिने उर्दू उच्चार करतांना मद्रासी असेंट जाणवू दिला नाही. इव्हन हेमा मालिनीचे उच्चार अजूनही असेंटेड वाटतात. म्हणूनच रेखाचे या बाबतीत कौतुक करावे लागेल.

फक्त वहिदा रेहमान मला खूप आवडायची( जुन्या चित्रपटातील) आणि जेंव्हा माझं वय होतं सिनेमे पहायचं तेंव्हा पर्यंत तीने सिनेमात हिरोइन म्हणून काम करणं बंद केलं होतं.. अर्थात एखाद दुसरा सिनेमा यायचा.. जसा अमिताभ बच्चन  बरोबरचा एक आला होता.. तो “अरे भैय्या एक चाय देना खडा चम्मच मलाई मारके वाला” पण तो पर्यंत ती हिरोइन म्हणून पार संपलेली होती आणि आईचे रोल करायला लागली होती.

रेखा बद्दल बोलायचं तर तिचा पहिला चित्रपट सावन भादो (१९७०) मधे तिला नवीन निश्चल बरोबर पाहिला होतं. दोन ठोकळे एका सिनेमात, असं काहिसं वर्णन करता येइल त्या सिनेमाचं. त्या मधे ति म्हणजे एक टिपिकल मड्डू मुलगी..भरपूर लठ्ठ , आणि दंडामधे रुतणारे ब्लाउझ घालणारी.. अशी दाखवली गेली. तिच्या मधे अजिबात ग्लॅमर, सौंदर्य नव्हतं.. अगदी मिडीऑकर दिसायची ती तेंव्हा.

नंतर चेही चित्रपट ज्यात एक धर्मेंद्र बरोबरचा अरे राफ्ता राफ्ता देखो, गाणं असलेला ,मधे पण तशीच जाड आणि ठोकळा दिसली होती….  आणि आमिताभ बरोबरचा खुन पसिना मधे थोडा बरा वाटला तिचा फॉर्म!

सुरवंटाचं फुलपाखरात रुपांतर होतं, आणि ते एकदम सुंदर दिसायला लागतं. तसंच काहिसं झालं रेखाचं.. तिचा एक चित्रपट आला होता, खुबसुरत .. त्या नंतर मात्र, रेखाकडे अगदी १०० टक्के दुर्लक्ष करणारे लोकं पण या फुलपाखराला ’खुबसुरत’ मधे पाहुन एकदम आश्चर्य चकित झाले होते. आपण नेहेमी पहातॊ तिच का ही रेखा?? त्या चित्रपटात तिचा सुंदर चेहेरा, फॉर्म आणि अभिनय .. अगदी वादातीत आहे. हा चित्रपट पण मी बरेचदा पाहिला. खरं सौंदर्य तिचं खुलून दिसलं.. या सिनेमात. त्यासाठी तिने किती वेळा कॉस्मेटिक सर्जरी केली, आणि कसं वजन कमी केलं, हे तिला एकटीला च माहिती असेल.

तिने साकारलेली उमराव जान… लाजवाब!!!! अगदी जिवंत केलंय तिने ते कॅरेक्टर.. काय अभिनय केलाय तिने? आणि किती सुंदर दिसली आहे त्यात नाही कां? तसाच शेखर सुमन सोबतचा तो कामसुत्र सिनेमा पण मला खूप आवडला होता. त्या मधला तो रेखा  चा सीन.. ज्यामधे ती ते खूप मोठे सोन्याचे दागिने घालुन येते आणि शेखर सुमन एक एक करुन सगळे काढतो.. आणि नंतरच्या दुसऱ्या एका सिन मधे एक लपवलेली कळ दाबते आणि  तो दागिना एकदम खळ्ळकन जमिनीवर पडतो तो.. खूप आवडला होता.  तेंव्हाचे तिच्या चेहेऱ्यावरचे भाव .. मार्व्हलस…! नंतरचे पण इतर प्रसंग.. बरेच आहेत त्या सिनेमातले. पण इतर सगळे विसरल्या सारखे झाले आहेत. केवळ हा दागिन्यांचा, आणि दुसरा म्हणजे ती ते पांघरुण ओठांनी ओढुन काढते तो लक्षात राहिलाय माझ्या.कोणी काहिही म्हणो, माझ्या मते हा चित्रपट रेखाचा सर्वोत्तम चित्रपट..

अमिताभ बच्चन बरोबरचे तिचे जवळपास २० चित्रपट … आणि ही जोडी अगदी सुपर हिट होती हिंदी सिनेमात.. सिलसिला नंतर मात्र तिने अमिताभ बरोबर काम केलं नाही..  ( कारण सगळ्यांनाच माहिती आहे 🙂 )त्या नंतरच्या प्रत्येक चित्रपटात रेखा, ही एक ’प्रेक्षणीय’ ( मुद्दाम सुंदर शब्द वापरत नाही) दिसली होती. रिसेंटली तिला पाहिलं होतं कुठल्यातरी एका फिल्म फेअर अवॉर्ड मधे. सोनेरी रंगाची साडी, चेहेऱ्यावर खूप वेळ खपून चढवलेला मेकप, की जो खरडून काढला तर कमीत कमी एक किलो पावडर , क्रीम, आणि लिप्स्टीक मिळेल असा होता.स्वतःचं वय लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यातुन डोकावत होता. इतका गॉडी मेकप आणि भडक कपडे फक्त दक्षिणात्य बायकाच करू शकतात.

आता ५४ वय झालंय . म्हणजे वेळीच लग्न होऊन मुलं बाळं झाली असती तर ती आता आजी म्हणून मिरवली असती. पण तसं झालं नाही! तिने केलेली लग्नं पण  खूपच वादग्रस्त घटना होत्या. त्यावर आता काही लिहित नाही.

आज रेखा आठवली कारण तिचं ते स्टेटमेंट की महाराष्ट्र शासनाने देऊ केलेलं लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड तिने नाकरलंय, ती म्हणते,लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड  ह्या नावावरून असं वाटतं की आता माझं सगळं काही संपलंय, आणि मी म्हातारी झाली आहे, म्हणून ते अवॉर्ड घेण्यास तिने नकार दिलाय.

बरं, या पुर्वी रेखाने असेच अवॉर्ड्स हे फिल्म फेअर आणि तत्सम फंक्शन्स मधे स्वीकारले होते. मग आताच तिला काय झालं? रेखाचा एक प्रॉब्लेम आहे, स्वतःला ती अजूनही तरुणच समजते. ५४ म्हणजे अगदी राइप नाही पण मॅचुअर्ड वय म्हणता येइल. हा पुरस्कार स्विकारणं म्हणजे, आपण आता म्हातारे झालो आहोत हे मान्य करणं असा होईल अशी तिला ्भीती वाटली असावी..

राजकपुर गौरव पुरस्कार घेण्याचे तिने नाकारले आणि ही पण एक न्युज झाली. राज ठाकरेंनी ताबडतोब, त्यावर आपलं  म्हणणं सांगितलं.. आणि मला वाटतं राज ठाकरेंनी दिलेली ’समज’ तिच्या समजली असावी.

जे काही कारण असेल ते असो.आत्ताच न्युज वर दाखवताहेत की तिला आज पुरस्कार दिला जाईल ,म्हणजे तिने स्वीकारला वाटतं पुरस्कार.. म्हणजे हा लेख उगाच लिहिला.. जे काय असेल ते असू दे… पण रेखा इज रेखा.. नो कम्पॅरिझन. .

द लोनली पिपल….

Written by  on May 29, 2020

नागपुरचा एन आय टी गार्डन.. अतिशय सुंदर मेंटेन केलेलं आहे हे.

आत्ताच प्रभात फेरी आटोपून आलो. हल्ली दररोज न चुकता एक तास तरी फिरून यायचा पायंडा पाडलाय. नागपुरला एक बगिचा आहे , त्रिमूर्ती नगरला. काल जेंव्हा या बगिचा फिरायला गेलो, तेंव्हाच जाणवलं की असा बगिचा मुंबईला नाही. अतिशय सुंदर मेंटेन केलेला आहे. आजचा विषय़ हा ’बगिचा’ नाही.

बगिचा मधे सकाळी ५-३० ची वेळ. बहुतेक सगळे वयोवृद्ध लोकं बगिचामधे आले होते. बगिचा अतिशय सुंदर आहे. जॉगिंग ट्रॅक जवळपास अर्धा किमी ते पाउण किमी अंतराचा आहे. अतिशय सुंदर हिरवळ , आणि त्यात काल तर मस्त पाउस होता सकाळी. हातात आईची पिवळ्यारंगाची छत्री घेउन मी फिरायला गेलो होतो. 🙂

या बगिचात अगदी पहाटे म्हणजे ५-३० वाजता कांही मध्यमवयीन आणि कांही  वयोवृद्ध लोकं काठी टेकत आले होते. काही म्हातारे लोकं तर केवळ गप्पा मारत बसलेले दिसले. एक गोष्ट लक्षात आली, की वय वाढलं की मग मरणाची भिती वाटू लागते आणि मग तरुण पणी केलेली शरीराची हेळसांड भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जातात.कांही लोकं अगदी ट्रॅक सुट घालुन तर कांही नाईट ड्रेस मधे कान टोपी मफलर गुंडाळून होते – जसे मांडी न घालता येणारे लोकं जेंव्हा मांडी घालण्याचा प्रयत्न करित होते, किंवा हात उंच करण्याचा प्रयत्न करित होते तेंव्हा मात्र खरंच केविलवाणं दिसत होतं………. असो….

जे कोणी लोकं बगिचात होते त्या पैकी प्रत्येक माणुस वेगवेगळा व्यायाम करित होता. कोणी योगा, तर कोणी इतर आसनं . काही लोकांचं लक्षात आलं की त्यांचा हात त्यांना वर करता येत नाही तर काही लो्कांना मांडी घालता येत नाही. ही लोकं आपल्याला जे जमत नाही तेच करण्याचा अट़टहासाने करण्याचा प्रयत्न करित होते. ज्यांचं वय  खूप जास्त झालंय अशा एक आज्जी, ज्यांना कदाचित संधिवात त्रास असाव्या त्या  तर एका बेंच वर बसून एका हाताची बोटं उखळीत मुसळ फिरवल्या प्रमाणे फिरवत दुसऱ्या हाताने फिरवत  होत्या. प्रत्येकाचा आपापल्या परीने  आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न करित होते, कदाचित आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये अशी इच्छा पण असावी या मागची.. पण अगदी खरं लिहितोय.. या मधे   कांही प्रयत्न हे अगदी केविलवाणे वाटत होते.

एका बाजुला योगा शिबिर सुरु होतं . तिथे  एक स्वामी योगा शिकवत होते. मी जवळपास दिड तास ट्रॅक वर फिरलो, आणि या दिड तासात या सगळ्या मंडळींचं अवलोकन केलं. यात दोन प्रकारचे वृध्द दिसले, एक म्हणजे सुखवस्तू आणि दुसरे म्हणजे त्रासलेले.. एक त्रासलेल्या आज्जी तर बेंच वर आजोबांच्या शेजारी बसून दिड तास सारखी कसली तरी कम्प्लेंट करित होत्या. पण काही मात्र अगदी इमाने इतबारे व्यायाम करण्याचा प्रयत्न करित होते.एक आजोबा वय बहुतेक ६० च्या वर असावं, स्किपिंग करतांना पण दिसले- आता या वयात स्किपिंग केल्याने प्रोस्ट्रेटचा त्रास होऊ शकतो हे त्यांना कोणी सांगितलेलं दिसत नव्हतं.. म्हणून ते काम आज मी केलं.. नको तिथे नाक खुपसायची सवय आहेच ना मला…

कांही तरुणी पण दिसल्या. जॉगिंग करता आलेल्या. तसेच कांही आंबट शौकीन पण होते त्या मुलींच्या मागे पुढे जॉगिंग करणारे. चला , या निमित्ताने का होईना , तरुण जॉगिंग करतात हे पाहुन बरं वाटलं. कालच्या पावसामुळे वातावरण खुप मस्त झालेलं होतं. झाडावरची फुलं … छान दिसत होती.सकाळी घरुन निघालो तेंव्हा शेजारच्या घराच्या दारावरचा चमेलिचा मांडव फुलांनी डवरला होता आणि सुवास मन वेधून घेत होता.दीर्घ श्वास घेउन हा गंध श्वासात समावून घ्यायचा प्रयत्न केला..

बहुतेक रोज फिरणारे लोकं हे ठरलेले असतात, त्यांच्या मधे मी एकटाच नवीन असल्यामुळे सगळे लोकं हा कोण एलियन? म्हणून  पहात होते. मी मात्र सगळ्यांकडे पाहून ओळखीचं स्मित देऊन त्यांना हा कोण असावा बरं- कुठे पाहिलंय याला?? असा विचार करायला उद्युक्त करित होतो.स्मित दिल्यामुळे त्यांना कदाचित वाटत होतं की मी कोणी ओळखीचा आहे म्हणून.. असो..

हेल्थ जुस…

फिरणं झालं, आणि बगिचाच्या गेटजवळ एक माणुस रंगीत द्रव्य असलेल्या बाटल्या घेउन बसलेला दिसला. त्याच्या समोर जाउन उभा झालो, तर त्याने सांगितले की हे सगळे जुस आहेत. अगदी आवळा, कारलं, कडुलिंब, तुळस, आलं, लिंबु, बिट, गाजर, गव्हाचे अंकुर, दुधी, असे अनेक रस होते. आणि हेल्थ अवेअरनेस म्हणा हवं तर.. बरेच लोकं ते जुस पित पण होते. मी पण एक कडुलिंब आणि आवळा जुस घेतला. हा विकणारा माणुस सांगत होता की रोज सकाळी साडेतीन वाजता उठून जुस बनवून आणतो आणि इथे सकाळी ५ वाजताच येउन बसतो. प्रत्येक जुसची खासियत माहिती आहे या माणसाला.बराच वेळ गप्पा मारल्या त्याच्याशी. म्हणाला, हल्ली विक्री चांगली होते… लोकांचा अवेअरनेस वाढलाय हेल्थ बद्दलचा..

राजिवचं सध्या चेन्नई ला काम सुरु आहे.चेन्नाइ ला त्याला एक प्रोजेक्ट मिळालाय. नेहेमी चेन्नै ला जावं लागतं ( या गावाचं नांव पुर्वी चांगलं मद्रास होतं, पण मद्रासी लोकं लुंगी नेसतात, आणि त्याला चेन – नसते, म्हणुन नांव चेन्नाई -( चेन -नाही) ठेवलं असावं असं वाटतं. तो कांही दिवसांपूर्वी चेन्नाईला गेला असता, तिथे पार्थसारथी नगरला उतरला होता. तिथे एक मंदिर आहे. त्या मंदिराचं आर्किटेक्चर खुप चांगल आहे म्हणून तिथे तो नेहेमी जायचा. तिथे कधीही गेलात तरी बरेचसे वृध्द लोकं बसलेले दिसायचे. दोन तिन दिवसांच्या नंतर सहज एकाला विचारले, की मी इथे सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही आलो, तरी पण तुम्ही इथेच असता? हे कसं? तर ते आजोबा म्हणाले, इथे येउन बसणाऱ्यांची मुलं परदेशी गेलेली आहेत. इथे घरी वेळ जात नाही, म्हणून आम्ही सगळे इथे येउन एकत्र वेळ घालवतो. पैसा भरपूर आहे.. पण करायचं काय? या वयात नातवंडांना खेळवण्याची इच्छा नातवंडांचे फोटो पाहून पुर्ण करावी लागते.

राजिवला  हात धरुन बराच वेळ त्यांनी बसवून ठेवलं. कदाचित हात सोडला तर तो लवकर निघुन जाइल.. म्हणुन असेल… विचारलं, तु काय करतोस, म्हणाला आर्किटेक्ट आहे, तर ते म्हणाले की बरं झालं तु आय टी मधे इंजिनिअरिंग नाही केलंस ते.. कमीत कमी तुझ्या मुलांना तरी तुझे आई वडील म्हातारपणी पाहू शकतील ,खेळवू शकतील.

हा प्रश्न केवळ परदेशी जाणाऱ्यांचाच नाही.. इथे आमच्या इथे पण भारतात घर सोडुन आई वडिलांपासुन दुर रहाणारे लोकं आहेतच ना? मग केवळ परदेशी कोणी गेला, ्म्हणून त्याला  आई वडिलांनी   दोष देणे योग्य वाटत नाही,मुलांचं पण आपलं करिअर असतंच..
.भारतात राहुन आईवडिलांना वर्षा्नू वर्षं न भेटणारे लोकं पण आहेतच.. !! बरेच आई वडील, जे फायनान्शिअली स्टेबल आहेत ते एकटं रहाणच पसंत करतात. त्यांना पण त्यांची स्पेस हवीच असते.

असो विषयांतर होतंय .. एक सांगावसं वाटतं.. नागपुरचा कायापालट झालाय बऱ्याच बाबतीत.. :)लेख फार मोठा होतोय, म्हणून संपवतो इथेच…

शाळा एके शाळा….

Written by  on May 28, 2020

शाळेचा पहिला दिवस आठवतो कां? नाही ? मला तर अगदी स्पष्ट आठवतोय. बऱ्याच गोष्टी आठवताहेत जुन्या.. कालच माझ्या एका स्नेह्यांच्या मुलाने पहिल्यांदा उभे राहिल्याचा पोस्ट टाकला तेंव्हाच एकदम जाणवलं की असे कित्येक आनंद असतात, ज्याची किंमत पैशात करता येत नाही. जसे मुलाने उभे रहाणे, पहिले पाउल टाकणे,पहिला दात पडणे,पहिली दिवाळी, पहिली    होळी , निरर्थक बडबडीतून.. बघ- तो बाबा म्हणतोय, किंवा त्या बडबडीला मुर्त स्वरुप देण्याचा प्रयत्न करणे.

मुलगी असेल तर आई सोबत मधे मधे करुन दिवाळीत काढलेली पहिली रांगोळी ,थोडी मुलगी मोठी झाल्यावर ,दिवाळीचा फराळ बनवतांना आईच्या मधे मुलीने केलेली मदत  (?)  … लुडबुड म्हणजे  आईला शंकरपाळ्यांचे तुकडे करुन देणे, चकली साचाने काढून देणे, लाडू वळणे, अगदी अजिबात जमले नाही तरीही…शाळेचा पहिला दिवस.. गोष्टींच्या आठवणी सुद्धा अगदी प्राइसलेस!!!! जगातील कितीही पैसा हा आनंद विकत घेउन देउ शकत नाही. मास्टरकार्डने हा शब्द काढला.. मला खूप आवडतो.

माझ्या मुली लहान होत्या तेंव्हा डिजिटल कॅमेरे नव्हते. सुरुवातीला माझ्या कडे एक फिक्स्ड फोकस कॅमेरा होता , त्यावरच सगळे  फोटॊ काढून टेवले आहेत. त्या मधे पहिल्यांदा स्वतःच्या हाताने सॉक्स घालतानाचा फोटो, बुटाची लेस बांधणे जमल्यावर काढलेल्या फोटोत आनंद दिसतो चक्क. कॅमेऱ्यामधे कधीही फिल्म टाकलेली असायची. म्हणजे कुठल्याही वेळेस फोटॊ काढता यायचे. माझ्या घरी मुलींचे १८ वर्षात जवळपास ८० अल्बम झाले आहेत ३६ फोटोंचे 🙂

नंतर मग मी याशिका चा एस एल आर कॅमेरा घेतला होता. सौ ला खूप राग आला होता, म्हणे उगाच पैसे खर्च करतोस.. काय करायचा इतका महागाचा कॅमेरा  .. आज ते पटतंय , कारण त्या काळी १३ हजाराचा घेतलेला कॅमेरा आता चक्क अडगळीत पडलाय.तो कॅमेरा घेतल्यावर तर बरेच दिवस लागले किती अपार्चर, किती फिल्म स्पिड, शटर स्पिड आपल्या फायद्या साठी कशी वापरायची, म्हणजे मधले पिक्चर शार्प राहिलं आणि बाजूचे अंधूक.. पण मजा आली होती शिकायला पण.

तसेच व्हिसिआर, रेकॉर्ड प्लेअर .. माफ करा जरा डायव्हर्ट होतोय विषयापासून…डिजिटल युगात ते बाकी बरंय की कुठलेही फोटॊ काढल्यावर प्रिंट काढून यायची वाट पहावी लागत नाही, तर काढून ताबडतोब कम्प्युटर वर पहाता येतात.पूर्वी मजा यायची , फॊटॊ काढल्या पासून ते प्रिंट होऊन येई पर्यंत जी हुर हुर रहायची त्याची मजा वेगळीच होती.

ही जी आठवण आहे ती साधारण १३ वर्ष जुनी आहे. कन्या रत्न नंबर दोन..( जी सध्या नॉन मॅट्रिक पास आहे , म्हणजे दहावीला आहे हो या वर्षी) खरंच एक रत्नं आहे. लहान असतांना,रोज ताई शाळेत जातांना पहायची  ती , आणि मग ताई यायची वेळ झाली की आई सोबत बस स्टॉप पर्यंत जायची रोज.. तिला बरोबर कळायचं घड्याळाचे काटे ठरावीक ठिकाणी गेले, की आई चल नं.. आपण ’ताई आणू’ म्हणून आई च्या मागे लागायची. तर तिला शाळा, बस, पुस्तकं, दप्तर- (स्कुल बॅग) इत्यादींची खूपच आवड होती.रोज ताई बरोबर शाळेत म्हणून हट्ट धरुन बसायची.

अगदी लहानपणापासून स्केच पेन आणि कागद दिला की बराच वेळ खेळत बसायची. शाळा खरोखर सुरु होण्यापूर्वी  तिला खूप अट्रॅक्शन होतं शाळेचं.. ताई साठी नवीन डबा, वॉटर बॅग आणायला गेलं की हिच्या साठी पण घ्यावी लागायची नाहितर, नुसता थयथयाट करुन घर डोक्यावर घ्यायची

तर होता होता दिवस भुर्र कन उडून गेले. आणि तिची पण शाळेत  जायची वेळ आली. तिची पण ऍडमिशन सेंट झेवियर्स मधे केली. ऍडमिशन इंटर्व्ह्युच्या वेळेस सगळं अगदी खाड खाड म्हणुन दाखवलं. शाळेमधले प्री पायमरी साठी सुंदर बेंच होते लहानसे- गुलाबी अन लाल रंगाचे. ते पाहूनच खूश झाली होती ती.

शाळेच्या आदल्या दिवशी आमचं मार्केटींग झालं . स्वारी अगदी  खुशीत होती. दप्तर, लाल डबा, लाल वॉटरबॅग आणि लाल ड्रेस.. आणला. ह्या सगळ्या वस्तू शाळेतच मिळाल्या. घरी आल्यावर सगळा ड्रेस घालुन आणि दप्तर मागे अडकवून पाहिलं. आरशासमोर जाउन मटकुन झालं. मी कशी दिसते????? म्हणून सगळ्यांना विचारुन झालं. आणि ड्रेस  काढून ठेव म्हंटलं तर खरं तर जिवावर आलं होतं तिच्या.. तरी पण शेवटी झोपली एकदाची!

rasika1’डी- डे’ आला एकदाचा . सकाळी ऊठल्या बरोब्बर शाळॆची तयारी ! दोन डबे, चार बुच्च्या ( वेण्या) , दोन वॉटरबॉटल , दोन दप्तरं तयार होती. दोघी मुली  जेष्ठा कनिष्ठा शाळेत जायला तयार झाल्या होत्या. मोठ्य़ा मुलीने आपला ताईपणाचा हक्क अबाधित राखुन तिला बरंच ट्रेनिंग दिलं होतं, मीसशी कसं बोलायचं, शाळेत कसं वागायचं वगैरे वगैरे…आम्हाला वाटत होतं की ती रडेल म्हणून, पण अगदी मोठ्या आनंदामधे बसमधे बसली  आणि टाटा केला..  हा  फोटो आहे पहिल्या दिवशीचा..

आणि हा आहे दुसऱ्या दिवशी चा……

rasika2दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी शाळा म्हणजे काय ते कळल्यावर  मग मात्र.. सकाळी आई माझा पोटा दुखतॊ…. म्हणून अशी गडाबडा लोळली होती.. शाळेत जायचं नाही म्हणून. पण रडत नव्हती , डोळ्यातून अगदी एक टिपूस पण नव्हता पाण्याचा. पण वैताग मात्र १०० टक्के दिसत होता. 🙂 हा फोटॊ मलाखूप आवडतो, आणि तिला अजिबात आवडत नाही.. कशाला काढला हा फोटो म्हणते नेहेमी मला…  :)खरं तर हे फोटॊ स्कॅन करुन टाकायचे होते पण फार पुर्वी एकदा व्हिजीए कॅमेऱ्याने फोटोचे फोटो काढून पोस्ट केल्यामुळे जरा ब्लर्ट आले आहेत.

सगळ्यात शेवटी.. बेस्ट पिरियड ऑफ लाइफ कुठला? बाळपणीचा.. मस्त पैकी दुध प्यायचं, आणि हाताच्या मुठी चोखत पडून रहायचं , सगळ्यांची गम्मत पहात.. कंटाळा आला की भोकाड पसरायचं ( हा नागपुरी शब्द आहे बरं कां… म्हणजे रडायचं) म्हणजे कोणीतरी उचलून घेतच आहे.. नुसती मज्जाच मज्जा… आहे की नाही?

चविने खाणार इंदौरला- २

Written by  on May 28, 2020

इंदौरला गेलो आणि परत आल्यावर खादाडी ची पोस्ट नाही ….?? हे कसं शक्य आहे?? इंदौर म्हणजे खवैय्यांचं ठिकाण. आधीच्या पोस्ट मधे बऱ्याचशा जागा कव्हर केल्या आहेतच, तरी पण त्या जागांच्या व्यतिरिक्त इतर जागा इथे कव्हर करतोय.

इंदौरला पोहोचलो आणि सरळ साईटला जायला म्हणून टॅक्सिमधे बसलो. जेट लाइट या भिकार एअरलाइन्सने प्रवास केल्यावर , डिप्लेनिंग झाल्याबरोबर खूप भूक लागलेली होती. विमानात शंभर रुपयाला सॅंडविच, वगैरे अव्हेलेबल होते.  कोल्ड रोल्स.. व्हेज आणि चिकन पण होते. पण ते थंड सॅंड्विच मला अजिबात आवडत नाहीत, विचार केला, की इंदौरला उतरलो की सरळ कुठे तरी मस्त पैकी गरमा गरम पोहे हाणु या.

कारमधे बसलो, आणि सरळ पेटलावद , झबुआ च्या दिशेने प्रवास सुरु केला. इंदौर शहरात न जाता, सरळ बायपास पकडून आम्ही निघालॊ. एका ठिकाणी हॉटेल अरुण मधे पोहा आणि समोसा फेमस आहे असं ड्रायव्हर म्हणाला, आणि त्याने गाडी लावली पार्किंग मधे. आम्ही जरा घाईत होतो, त्या मुळे फारसा वेळ ना घालवता नाश्ता आटोपून झबुआ रोडला लागलो.  चांगलं खाय़ला असलं पण  जर वेळ नसेल तर जस्ट पोट भरणं हाच उद्देश असतो. इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही फारसं.

दुसऱ्या दिवशी सकाळी नेहेमी प्रमाणे ५६ दुकानला व्हिजीट झाली. लवंग शेव, लसुण शेव, आणि रतलामी शेव विकत घेतली आकाश के नमकीन मधून.तसंही आकाश के नमकीन प्रसिद्ध आहेतच इथले , आणि मुलींना पण खूप आवडतात..

091020092022मधुरम मधून थोडं स्वीट्स घेतलं विकत . मधुरम मधल्या मिठाईची मजाच निराळी.मुंबईची मैदा युक्त पेढा आणि मिठाई खाउन खूप कंटाळलेला होतो.

मधुरम मधे गेल्यावर पहिले  एक (मिश्रण) ड्रिंक मिळतं , ते म्हणजे लस्सी, रबडी, ड्राय फ्रुट्स चं मिक्स.. अफलातून ड्रिंक आहे हे.. या वेळेस बरेचसे फोटो ग्राफ्स डिलिट झाले कम्प्युटरला कॉपी करतांना. अगदी ४-५ फोटोच शिल्लक आहेत.ह्या ड्रिंक चा फोटो पण डिलिट झाला. पण एक सांगतो , कधी इंदौरला गेलात तर मधुरम मधलं हे  पेय नक्कीच ट्राय करा. अप्रतिम चव असते ह्याची..ह्याला काय म्हणतात ते विसरलो आता.

आणि एक ग्लास घेतला की बस्स..इतकं जड  असतं पचायला, की दिवसभर भुक लागणार नाही याची गॅरंटी… अहो सहाजिकच आहे नां.. रबडी+श्रीखंड+दुध+ड्रायफ्रुट्स.. !! डायटींग वाल्यांनॊ , हे तुमच्या साठी नाही..

091020092014हे सगळं खाणं झाल्यानंतर मात्र ठरवलं, की फार जास्त झालंय, तेंव्हा आजचं लंच स्किप करावं.ठरवल्या प्रमाणे वागणं फारच कमी वेळेस जमतं.

असं ठरवलं की मग खाताना उगाच जास्त गिल्टी वाटत नाही..:)

मी जेवायला बसलो की गिल्टी कॉन्शस मुळे स्वतःलाच बजावत असतो, की आज गोड खायचं नाही,पण जेंव्हा ते समोर येतं तेंव्हा मी थोडा केलेल्या निश्चया पासून ढळतो.. स्वतःच्या मनाला समजावत, की बाबा रे हे तुला चालत नाही तू जास्त गोड खाउ नकोस वजन वाढेल.. वगैरे वगैरे… आणि मग मनसोक्त ताव मारतो समोर येईल त्या वस्तुवर.. आणि अशी आवडीची गोष्ट असेल तर मग .. क्या कहना??

मधुरम वाल्याने पेठ्याचं पान.. एक नवीन मिठाई दिली खायला . अप्रतिम टेस्ट होती. घरच्या साठी पण बांधुन घेतली. तिकडूनच थोड्य़ा कस्टमर्सला भेटायला गेलो.. आणि दुपारी दोन वाजे पर्यंत नुसता कामातच बिझी होतो.

091020092017आमचा डिलर शर्माजी बरोबर होताच. म्हणाला आज तुम्हाला एका बेस्ट जागी नेतो.. मी म्हंटलं सुध्दा.. अरे नको आता, सरळ रात्रीच बघु या. .. त्यानेच आठवण करुन दिली , रात्री ८-३० ची फ्लाईट आहे, म्हणजे इथून ६ वाजताच निघावे लागेल. ट्राफिक खूपच असतो,   एक तास तरी लागेल. तेंव्हा रात्रीचं जेवण विसरा.. आपण थोडं थोडं लाइट खाउ या काहीतरी..

कार त्याने वळवली आणि एका दुकानासमोर पार्क केली. राम बाबु के  पराठे …  आग्रा का मशहुर पराठेवाला दुकान अब इंदौर मे..थोडं बेसमेंटला होतं दुकान एका मोठया कॉम्प्लेक्स मधे. माझा खाण्यातला इंटरेस्ट आमच्या सगळ्या मित्रांना आणि नेहेमीच्या संबंधातल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळे कुठेही गेलॊ की आमचे मित्र वगैरे आवर्जून चांगल्या जागा दाखवतात. पराठे आणि लाईट??  धन्य हो!!! काय म्हणणार? मुकाट्याने गाडीतून उतरलो आणि त्या हॉटेल कडे मोर्चा वळवला.

091020092016हॉटेल मधे शिरल्या बरोबर एक समोर थंडगार पाण्याचे ग्लासेस आणून ठेवले. अजुन ही फारशी भुक लागलेली नव्हती. सकाळचं अजुन उतरलेलं नव्हतं.सेटल झाल्यावर मेनु कार्ड बघितलं, मी म्हणालो, मला एक आलुपराठा, एक मटर मेथी पराठा अऔर.. .. शर्माजींनी थांबवलं.. म्हणाले इथे एक पराठा संपवा, नंतरच दुसरा ऑर्डर करा. कारण एकाच पराठा पुरेसा होईल कदाचित.. आम्ही चौघं होतो, मग असं ठरलं की मेथी-मटर पराठा, दाल ( उडद-मुंग दाल )पराठा,स्विट  कॉर्न पराठा, आणि मिक्स व्हेज पराठा मागवून शेअर करु या..

थोडं थांबावं लागलं . कंटाळा येउ नये म्हणून त्याने मातीच्या कुल्हड मधे मसाला ताक आणून ठेवलं. या मातीच्या कुल्हड मधे चहा किंवा इतर काहीही प्यायला मला खूप आवडतं. एक वेगळा मातीचा वास येतो तो मस्त वाटतो.पराठ्यांची वाट बघत आम्ही ते ताक संपवलं, आणि रिपीट केली ऑर्डर..

जवळपास दहा मिनिटांच्या नंतर समोर थाळी आणून ठेवली. त्या थाळी मधे पराठा, आलु का झोल, आणि लाल भोपळ्याची एक वेगळ्या प्रकारे केलेली भाजी,आणि कढी.. इतकं होतं. सोबतच चिंचेची चटणी. या चटणीची स्पेशॅलिटी म्हणजे यात फक्त चिंच गुळ नव्हता, तर त्या मधे  भरपूर सुंठ घातलेली होती. सुंठेमुळे एक मस्त पैकी फ्लेवर आला होता त्या चटणीला.

पराठ्याचा एक तुकडा मोडला आणि तोंडातून शब्द बाहेर पडले.. वाह!!! क्या बात है.. शर्माजी माझ्या कडेच माझ्या रिऍक्शन कडॆ पहात होते. मला आवडलेलं बघून त्यांचा पण चेहेरा उजळला. इथे पराठ्यामधे कांदा, लसुण अजिबात वापरले जात नाही. चार तुकडे होते प्लेट मधे , प्रत्येक पराठ्याची चव वेगळी.. अप्रतिम.त्यातल्या त्यात मला मेथी मटर मिक्स पराठा खूप आवडला .

इतर पराठे पण चांगले होते चविला.  पराठा म्हंटलं की आपल्या नजरेसमोर तव्यावर थोडं तेल किंवा तुप लाउन केलेला पराठा हे चित्र डोळ्यापुढे येते.. इथे मात्र तसं नाही. पराठा हा तुपात चक्क तळलेला असतो. सोबत असलेला आलू का झोल म्हणजे बटाट्याची भाजी, भरपूर पातळसर रस्सा असलेली , ह्या भाजी बरोबर पराठा अप्रतिम लागतो. सोबतच ती कोहोळ्याची ( लाल भोपळ्याचा लच्छा) थोडा आंबट गोड चविचा असतो, तो लच्छा म्हणजे पण स्पेशॅलिटी आहे या रामबाबुची. तळल्या मुळे तो पराठा  एकदम क्रिस्पी असतो-कडक पणा नाही तर खमंग पणा येतो तळल्यामुळे. बहुतेक शॅलो फ्राय करित असतील ..

पहिलं सर्व्हिंग संपलं.. एका पराठ्यामधेच पोट भरलं होतं, पण शर्माजी म्हणाले, इथला पापडका पराठा ट्राय करो.. म्हणून आम्ही तो पापडाचा चुरा भरलेला पराठा मागवला. फारशी भुक नसतांना पण  सगळं संपलं..

स्विट डिश???? शर्माजींना नको म्हंटलं स्विट डिश. कारण फुल झालो होतो. तरी पण थोडा एक स्पेशल आयटम ट्राय करो म्हणुन त्यांनी  शेवटी स्विट डिश म्हणून पुन्हा  आर के पी स्पेशल स्विट पराठा मागवला.

हा स्विट पराठा म्हणजे एक ’वाह’ डिश.. समोर ठेवला त्याने आणि दोनच मिनिटात संपला. या पराठ्यामधलं स्टफिंग होतं, ग्रेटेड पनिर, मावा, बदाम, पिस्ता, काजु …. केशर वगैरे वगैरे.. अल्टिमेट डिश होती ही. पहिल्यांदा तर एकच मागवली होती, पण नंतर पुन्हा एक रिपीट केला.

आणि शेवटी पुन्हा एक ग्लास कुल्हडमधलं ताकं संपवून जेवण संपवलं.. आणि नक्की ठरवलं.. की आता उद्यापर्यंत काहीच खायचं नाही…. 🙂

आजोबा उवाच!…

Written by  on May 27, 2020

कित्ती कित्ती हुशार आहेत नाही का करुणानिधी आजोबा? त्यांना पहा सगळं -सगळं कळतं ! आता हेच बघा ना,  त्यांना एक जावईशोध लागलाय.. की प्रभाकरन टेररिस्ट नाही.  (हॅः.. काहीच्या काही बोलतात झालं, असं म्हणताय कां? बरोबर आहे तुमचं.) हा शोध कसा लागला म्हणता? अहो साधी गोष्ट आहे, तो म्हणे ह्या करुणानिधी आजोबांचा मित्र आहे.

बरं का, आपल्या ह्या करुणानिधी आजोबांच्या मित्राच्या ग्रुपने आपले दिवंगत पंतप्रधान श्री राजीव गांधी ह्यांचा खुन केलेला आहे. जी लोकं इन्व्हॉल्व्ह्ड होती ना त्या टेरर प्लॉट  मधे ती अजूनही जेल मधे सडताहेत. आणि तरी पण प्रभाकरन टेररिस्ट नाही.

अरे काय हे, तुम्ही असं कसं विचारता की त्या खुनी व्यक्तिंना फांशी का झाली नाही म्हणून? आपल्याकडे लोकशाही आहे नां.. म्हणून तर आपले राजकीय नेते आणि पार्लमेंट  अजूनही सुप्रीम कोर्टाने आदेश  देऊनही अतिरेक्यांना फाशी देत नाही. कायदेशीर पणे कायद्यातल्या पळवाटा शोधण्यात आपल्या नेते मंडळींचा वेळ जातो. आता अफझल गुरु ला फाशी दिली तर अल्पसंख्यकांची भावना दुखावतील ना..आणि मतं मिळणार नाहीत. म्हणून अफझल गुरु सारखा प्राणी पण मजेत दिवस काढतोय तिहारमधे.आपला देशातला कायदाच तसा आहे!राजकीय इच्छाशक्तीच नाही कांही करायची.

करुणानिधीनी आज अजुन एक वक्तव्य केलंय.. की नलीनी ला ( जिला जन्म ठेपेची सजा झालेली आहे रा्जीव गांधींच्या खुनाबद्दल) सोडून द्यावे..ती सध्या नेल्लोर जेल मधे आहे. ह्या म्हाताऱ्याला खरंच काय  झालंय हेच कळत नाही. मला पण आता काय लिहावं ह्याच्याबद्दल हेच कळत नाही.

दी मॅन इज ऑलवेज नोन बाय द कंपनी ही किप्स..  🙂 जर करुणानिधींचे मित्र ‘असे प्रभाकरन सारखे’ असतिल तर करुणानिधी पण प्रभाकरन सारखे आहेत असे समजायचे कां?   न बोललेलेच बरे.मतांसाठी माणुस  कुठल्या थराला जाउ शकतो ते इथे तामिळ नेत्यांकडे पाहुन लक्षात येतं. करुणानिधी हे पण म्हणताहेत की प्रभाकरनचा मार्ग जरी चुकीचा असला, तरी तो ज्या गोष्टी साठी भांडतोय ती योग्यच आहे…..?????????(छः! काहीतरीच  काय! )

आता दररोज तामिळ निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे भारतामधे परत येत आहेत. तेंव्हा त्यांनी पुन्हा भारतामधे येऊन उपद्रव सुरु केला नाही म्हणजे मिळवले.

पाकिस्तान पण काश्मीर मधल्या दहशतवाद्यांना ’फ्रिडम फायटर’ किंवा मुजाहिदिन म्हणते. आणि अगदी ह्याच धर्तीवर करुणानिधी  पण बोलतात. त्यांच्या सारख्या जेष्ट नेत्याने असं बोलतांना जरा विचार करायला हवा.. पण देवाने जीभ दिलेली आहे ना..मग लावा टाळ्याला, आणि बोला काय वाट्टेल ते! अशी मेंटॅलिटी फॉर्म झालेली आहे करुणानिधी    आणि वायकॊ ची..मला असं वाटतं की म्हातारचळ लागलाय करुणानिधी आजोबांना  !

काय लिहावे  हेच कळत नाही.. पण करुणा निधीचे नाव वाचले की मग मात्र मनातल्या  मनात … @!*&^%&*$#@()*&**@[email protected]$!!!  अशा शिव्या.. ज्या इथे लिहु शकत नाही त्या द्यायची इच्छा होते..  :)नाहितर उत्तरेला काश्मीर आहेच, पुर्वेला मिझोराम, नागालॅंड आहेतच, आणि हैद्राबादला आंध्रा मधे  नक्षलवादी आहेतच, राहाता राहिला तामिळनाडू आता तिथे शांतता राखली जावी अशी इच्छा आहे ! बस्स!

तसेच आज अब्दुल रहामान अंतुले ( आमच्या विदर्भात का बे   रहमान किडे झाले का बे xxत.. असं म्हणतात.. कुठे ते विचारु नका…!)यांनी पण काही मुक्ताफळं उधळली आहेत. एक्स मुख्य मंत्री जर असा काही बोलत असेल तर काही खरं नाही ह्या देशाचं…!केवळ राजकीय फायदा मिळावा म्हणून असं बोलणाऱ्या नेत्यांना आता जनतेनेच त्याची जागा दाखवली पाहिजे.

सगळीकडचे आरक्षण मान्य होतं लवकर.. पण लोकसभेतील आणि राज्यसभेतील ३३ टक्के महिला आरक्षण अजूनही बिल पास झालेले नाही. ते लवकर व्हावे असे वाटते म्हणजे अशा म्हातारचळ लागलेल्या नेत्यांची तिकिटं बरोब्बर कापली जातील!जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तरुण लोकांना तरी तिकिटं द्यावीत.. म्हणजे अशा कबरित पाय लटकलेल्यांना जरा साइडट्रॅक करता येइल.