सुकेळी

Written by  on September 2, 2014

महालक्ष्मी सरस नावचे एक प्रदर्शन भरले आहे सध्या मुंबईला लिलावती हॉस्पिटलच्या समोरच्या प्रांगणात. घरगुती उद्योजकांना लोकांपर्यंत   पोहोचता यावे ( मधे कोणी एजंट न ठेवता) म्हणून सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या सहकारी संस्थांचे स्टॉल्स लागलेले आहेत. हरेक्रिश्नजींचा फोन आला होता, म्हणाले की ह्या प्रदर्शनात श्रीरामपुरच्या स्टॉल वर हुरड्याचे थालीपीठ खूपच छान आहे, तेंव्हा नक्की जाऊन या . हुरड्याचे थालीपीठ खाऊन किती वर्ष झाली ते आठवले, आणि तिथे जायचेच हे नक्की केले मनामध्ये – आणि थालीपीठ खाल्या वर रात्रीचे जेवण टाळायचे हे मनात ठरवून (डायट कंट्रोल बॉस…!)

प्रदर्शनात गेल्यावर काही गोष्टी नजरेस पडल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की आपल्या बऱ्याच जुन्या गोष्टी आता नजरेआड होत चालल्या आहेत.आपण जे काही पाहिलंय ते कदाचित पुढची पिढी पाहू पण शकणार नाही. स्वतःचाच अनुभव सांगतो, काही गोष्टी ज्याबद्दल मी स्वतः    लहानपणी   फक्त वाचलं होतं आणि जे कधीच पाहिलं पण  नव्हतं- ते इथे पहायला मिळालं. मांडे म्हणजे फक्त एक म्हणीत वापरलेला शब्द-  “कोंड्याचा मांडा करणे” इतकीच माहीत होती- पण मांडा म्हणजे नेमकं काय ते इथे पहायला मिळालं . ज्या गोष्टी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या पैकी तीन गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटल्या . आपल्या पिढीला कमीत कमी पहायला किंवा चाखायला तरी मिळाल्या असतील, पण कदाचित पुढल्या पिढीला हे प्रकार म्हणजे नेमकं काय ? हे समजणार पण नाही.

चुलीवर पालथं ठेवलेले मडके, आणि त्यावर मांडे शेकतांना

या पैकी पहिली गोष्ट म्हणजे मांडे ( हा प्रकार मी पुर्वी मनसेच्या खाद्योत्सवात पहिल्यांदा खाल्ला होता) . मैद्या मधे पुरण भरून त्याची पोळी लाटली जाते, आणि नंतर ती हातावर ताणून मोठी केल्यावर खापराच्या मडक्यावर चुलीवर भाजली जाते. मडक्यावर भाजल्याने त्याला एक वेगळीच खरपूस चव आणि स्वाद येतो- अशी खमंग पुरण भरलेली पोळी, त्यावर तुपाची धार . हा पदार्थ खरं सांगायचं तर मला फारसा अपील झाला नाही. ना धड गोड, ना धड फिक्का असा हा पदार्थ , पण एक पूर्वापार चालत आलेला पदार्थ म्हणून महत्त्वाचा. पुर्वी मनसे उत्सवात साधे मांडे- पुरण न भरलेले आणि आणि भरीत खाल्लं होतं. ते कॉम्बो या पुरण भरलेल्या पेक्षा जास्त आवडले होते. सध्या डायट सुरु आहे, त्यामुळे पुरणाच्या मांडे या प्रकाराला हात लावलाच नाही मी, आणि एक मांडा मात्र सौ. आणि मुलींसाठी घेतला. जवळपास दोन फुट व्यासाचा असलेला तो एकच मांडा तिघींना पुरेसा झाला.

दुसरी गोष्ट म्हणजे बाजरीची खिचडी! बाजरीची खिचडी म्हणजे फक्त बाजरी आणि मुगाची डाळ कुकर मधे शिजवायचे असे नाही, कारण तसे केले तर खातांना तोंडामधे बाजरीची साल येते. हा प्रकार मी लहान असतांना माझी आई पण घरी करायची. बाजरी उखळात कांडून त्याचे सालं काढायची, आणि मग नंतर खिचडी प्रमाणे मुगाच्या डाळी सोबत शिजवून वांग्याच्या भरीत, दही आणि दाण्याच्या चटणी बरोबर वाढायची. जळगांवकरांच्या स्टॉल वर बाजरीच्या खिचडीचा बोर्ड पाहिला, आणि आधी तिथे धाव घेतली. कदाचित घरी बाजरी सोलून त्याची साल काढणे शक्य होत नसल्याने, हा पदार्थ येणाऱ्या काळात नामशेष होण्याचे चान्सेस जास्त दिसतात .

सुकेळी, सोनकेळी, सुकवलेली केळी, वसईची केळी,

वसईच्या काउंटरवर सुकेळी विकायला ठेवलेली होती. चॉकलेट प्रमाणे केळीच्याच सुकलेल्या पानात पॅक केलेली ही सुकेळी !

सुकेळी हे तर बरेचदा ऐकले होते, आणि सुकेळी पण . कित्येक दिवस तर मला मुंबईला मिळणारी ’वेलची केळी’ म्हणजेच ’सुकेळी’ असे वाटायचे. एका मुंबईकर मित्राने तर ’राजेळी’ केळी म्हणजेच ’सुकेळी’ असे ठासून सांगितले 🙂 पण मला एवढं बाकी नक्की माहीती होतं की ’सुकेळी’ फक्त वसईलाच तयार होतात,राजेळी केळी तर फक्त चिप्स साठीच वापरतात, तेंव्हा ती सुकेळी असूच शकत नाही हे पक्कं ठाऊक होतं- त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. पण या ’सुकेळी’   म्हणजे नेमकं काय ह्याचं मात्र नेहेमीच कुतूहल वाटत  होतं.

सध्या खादाडी जवळपास बंदच आहे, पण थॅंक्स टू ऋजुता दिवेकर – तिच्यावर एक वेगळं पोस्ट लिहीणार आहे . प्रदर्शना मधे एक चक्कर मारली. जवळपास ५०% स्टॉल्स ला भेट दिली. एक वसईच्या महीला उद्योगाचा स्टॉल होता. त्या स्टॉल वर केळीच्या सालात काहीतरी गुंडाळून चॉकलेट प्रमाणे फक्त ९ इंच लांबीचे ठेवलेले दिसत होते. माझ्या बाजूला उभ्या असलेल्या एका स्त्री ने “सुकेळी काय भाव दिलीत?” म्हणून विचारले.. आणि काउंटरवरच्या बाईंनी समोर ठेवलेली एक केळ्यांच्या पानांची सुबकपणे बांधलेली पुरचुंडी उचलून समोर धरली, आणि म्हणाल्या ” फक्त ८० रुपये”! आपसूकच कान टवकारले गेले, आणि मी पण हात समोर केला. 🙂

सुकेळी, सोनकेळी,sukeli, sonkeli

चांगली पिकलेली केळी घेऊन बांबूच्या जाळीवर उभ्या ठेवून उन्हात सुकत घातल्या जातात . दिवसभर सुकतांना त्यामधून त्यातून जे पाणी खाली गळते ते गोळा करून त्या गोड पाण्यामध्ये रात्री त्या केळी पुन्हा बुडवून दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा उन्हात सुकत घालतात. ते पाणी म्हणे अगदी मधासारखे असते. हीच प्रक्रीया केळी पुर्णपणे केळाचं सुकेळ होई पर्यंत रिपीट केली जाते  .  बराच वेळ खाणारा प्रकार आहे हा. केळामधून सुकतांना जो गोड ज्युस खाली गळतो त्याच ज्युस मधे भिजवल्याने आणि उन्हात सुकवल्याने केळाला मधात घोळवल्या सारखी मस्त चव येते. मला तर सुकेळी खातांना बरेचदा सुक्या अंजीराची -आणि मधाची पण आठवण करून देणारी चव वाटली . एक सुकामेवा किंवा त्यापेक्षाही अधिक चांगला प्रकार वाटला मला .

फ्रिज शिवाय बाहेर रहाणारा हा पदार्थ तयार करणे फार त्रासाचे काम आहे. आणि हल्ली मागणी पण कमी झाल्यामुळे इतर या सुकेळींचे मॅन्युफॅक्चरींग बंद झाले आहे. याचं वाईट वाटतं की लवकरच ही सोनकेळी फक्त पुस्तकातच वाचायला मिळतील असे वाटते. मी ऑफि समधल्या जन्माने मुंबईकर असलेल्या काही मित्रांना विचारले, पण त्यांनीही हा प्रकार फक्त ऐकून माहीती आहे असे म्हणाले.

येणाऱ्या दिवसात असे बरेच प्रकार नामशेष होणार आहेत , अर्थात नवीन काही तरी सुरु हॊईलच.. पण या गोष्टींना मात्र नक्की मिस करणार आहे मी

पुन्हा एकदा शिवाजी राजे माझ्या नजरेतुन

Written by  on September 1, 2014

या चित्रपटाचा रिव्ह्य़ु इतक्या ठिकाणी आलेला आहे की सगळी कडे गुडी गुडी लिहिल्या गेलंय. तरी पण माझ्या दृष्टीतून हा चित्रपट कसा वाटला? ह्याचा उहापोह केलाय इथे.

आजच मी शिवाजी भोसले बोलतोय ^(http://rangmarathiche.com/goto/http://msrb2.erosentertainment.com/) हा पहायला गेलो होतो.  ह्या चित्रपटाबद्दल आधीच इतकं काही वाचलं होतं त्यामुळे अपेक्षा पण खूप होत्या. आमच्या घरी मराठी सिनेमाला जायचं म्हंटलं की माझ्या मुली अजिबात तयार नसतात. अपेक्षेप्रमाणे मोठी मुलगी आली नाहिच. आणि धाकटी पण माझे चांगला चित्रपट आहे म्हणून अशुअर केल्या नंतरच, अगदी मोठ्या रेझिस्टन्सनेच तयार झाली.मोठी मुलगी आता या वर्षी पासून इंजिनिअरिंग कॉलेज ला जाणार, म्हणून कदाचित तिला हल्ली आई बाबांच्या बरोबर बाहेर जाण्यापेक्षा मैत्रिणींच्या बरोबरच सिनेमा पहाणं जास्त रुचत असावं.raje

मला वाटतं खूप दिवसांच्या नंतर मल्टीप्लेक्स मधे मराठी चित्रपट लागला, आणि तो पण प्राइम टाइम मधे. ह्यामागचे कारण प्रोड्युसर्स आणि मल्टीप्लेक्सचे मालक ह्यांच्या दरम्यान असलेला वाद आहे का? की महेश मांजरेकरांचा ’वट’? काहिही असो.. पण हा सिनेमा मल्टीप्लेक्स मधे पहातांना  बरं वाटलं. अर्थात टॅक्स फ्री तिकिट पण ११८ रुपये आहे .

सध्या मुंबईला उन्हाळा आहे. फोन करुन तिकिटं बुक केली होती गोरेगांव हब मधे. हल्ली ही एक चांगली सोय झालेली आहे.पुर्वीसारखा सिनेमा पहायला जायचं म्हणजे एकतर थिएटरवर जाउन तिकिटं काढून आणायची किंवा ब्लॅक ने घ्यायची. ’ती’ ब्लॅक वाली माणसं हळू आवाजात दस का पचास म्हणत फिरणारी टपोरी पोरं पण आजकाल इतिहास जमा झाली आहेत.  माझ्या मुलींना ब्लॅक म्हणजे काय हे अजुन माहिती नाही.. काळाचा महिमा दुसरं काय.. थिएटरला पोहोचलो आणि काउंटरवर जाउन नंबर सांगून तिकिटं घेतली.

दुपारी एक चा शो होता. सकाळी हेवी ब्रेकफास्ट झालेला होता. तर एकदाचे थिएटरमधे पोहोचलो. आधी बरेच रिव्ह्युज वाचले होते ते खालील प्रमाणे आहेत. निरनिराळ्या कम्युनिटीच्या वर हा मोस्ट डिस्कस्ड टॉपिक होता. ह्या सिनेमाचं परीक्षण इतक्या ठिकाणी वाचलं आहे की आता जे काही लिहीन, ते पण पुर्व ग्रह  दूषित नसावे अशी इच्छा आहे.

महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपट म्हंटल्यावर जरा जास्तच अपेक्षा होत्या. एक चित्रपट म्हणून हा aचित्रपट तुम्हाला ३ तास खुर्ची ला खिळवुन ठेवण्यासाठी पुरेसा आहे. प्रत्येक फ्रेम बघतांना जाणवते की महेश मांजरेकरांनी पुर्ण अभ्यास करुनच हा चित्रपट काढलेला आहे. अर्थात बरेच वेळेस हा चित्रपट पहाताना तद्दन दुय्यम दर्जाचा एक मसाला चित्रपट पहातो आहे असेही वाटते. महेश मांजरेकर शिवाजी  महाराजांच्या वेशात थोडा जास्तच म्हातारा वाटतो.

माझी मुलगी म्हणाली की बाबा, शिवाजी महाराजांनी जेंव्हा अफझल खानाला मारले तेंव्हा ते ६० वर्षाचे नव्हते.  महेश मांजरेकरांच्या चेहेऱ्यावरच्या सुरुकुत्या पण मोजता येतात. तसेच महाराजांचा आत्मा हा घोड्य़ावर बसुन प्रवास करतो असे फिल्मी प्रसंग अगदी बी ग्रेड सिनेमामधे शोभून दिसतात.

शिवाजी महाराजांना घोड्य़ावर बसलेले दाखवले आहे . त्यांचा जेंव्हा वरचा अर्धा भाग दाखवतात तेंव्हा ते ठीक दिसतात ,पण जेंव्हा साइड शॉट घेतला आहे तेंव्हा ते महाराजांचे बारिक मांड्या -पाय अगदी (लुकडे पाय)अगदी नजरेला बोचतात. महेश मांजरेकरांच्या चेहेऱ्यावरचा अल्कोहलिक लुक पण बरेचदा जाणवतो.एखादा चांगला तरुण अभिनेता ह्या भुमिकेत जास्त रुचला असता. पण महेश मांजरेकरांना पडद्यावर स्वतः वावरण्याचा मोह आवरला नाही.

सुरुवातीला ज्या पद्धतिने  दिनकर मारुती भोसले चा प्रत्येक परप्रांतीय अपमान करतांना दाखवलेला आहे ते पण अगदी टिपिकल हिंदी फिल्मी वाटते. बॅंकेमधला मॅनेजर ज्या पद्धतिने त्याला घाटी वगैरे म्हणून अपमान करतो, तो प्रसंग  ??? बॅंकांमधे युनियन्स वगैरे असतात ह्याचा विसर पडलेला दिसतो मांजरेकरांना.. की फक्त चित्रपटाचा टेंपो बिल्ड अप करायचा म्हणून असं  अती कल्पना रंजन  करण्यात आलं असावं असं वाटतं.

त्या फिल्मी डायरेक्टरला भोसडल्या नंतरचा प्रसंग काय किंवा त्या दुकानदाराने अपमान करण्याचा प्रसंग काय जरा अतिरंजित वाटतात. थोडंफार खरे वाटणारे प्रसंग घेतले असते तर चित्रपट पहायला जास्त मजा आली असती.कधी कधी असंही वाटतं की, पहिल्या अर्ध्या भागामधे असे अतिरंजित प्रसंग म्हणजे मराठी माणसाच्या अपमानाचे प्रसंग भरले नसते तर दुसरा भाग इतका अपिलिंग झाला नसता हे ही तितकेच खरे.

प्रत्येक वेळेस सिनेमा पहायला गेलं की मग मल्टीप्लेक्स मधे पॉप कॉर्न्स ४० रुपये, पेप्सी ४० रुपय अशा किमती कां असतात? हा प्रश्न तर नेहेमीच सतावत असतो. सुरक्षेच्या नावाखाली तुमच्या हातातली पाण्याची बाटली पण फेकून द्यायला लावतात, म्हणजे त्यांच्या कडली पाण्याची बाटली तुम्ही विकत घ्यालंच….त्या दिनकर भोसले सारखं माझं पण रक्त उसळलं होतं.. पण आठवलं हे आयुष्य आहे सिनेमा नाही… 🙂

bदिनकर भोसले, ज्या पध्दतिने चांदोरकर कॉलेजमधे मुलाला ऍडमिशन मिळण्यासाठी प्रयत्न करतांना दाखवला आहे, तो प्रसंग – म्हणजे पहिली भेट एकदम मस्त दाखवली आहे. पण नंतर मोबाइल फोनने संभाषण रेकॉर्ड करण्याचा प्रसंग अगदी बाळबोध वाटतो.ह्याच शॉट मधे डी वाय पाटील मधे डोनेशन घेत नाही असंही हा दिनकर सांगुन जातो..  🙂 (?)

पहिला भाग म्हणजे हळू हळू तुमच्या मनामधे रागाची लेव्हल वाढली पाहिजेच आणि तुमचे रक्त उसळलेच पाहिजे अशा पद्धतिने शुट केलेला आहे. तुम्ही मराठी आहात, तुमच्या समोर एका मराठी माणसाला सतत मान खाली घालायला लागते , तेंव्हा तुमच्या मनात रागाची लेव्हल अगदी अत्युच्च पातळीवर नेण्याचे काम वर निर्देशित प्रसंग करतात.

तो एक बी एम सी मधला प्रसंग, की ज्या मधे दिनकर भोसले त्या बीएमसी ऑफिस मधे जाउन लेक्चर देतो अन त्या साहेबाचे मन परिवर्तन करतो, हा प्रसंग रिअल लाइफ मधे अगदी अशक्य कोटीतला आहे पण रिल लाइफ मधे खपून जातो.

उस्मान पारकर च्या मुलाच्या कीडनॅपिंगचा प्रसंग आणि नंतर ताबडतोब उस्मान पारकर चे मन परिवर्तन होणे एकदम  बालिश आणि न पटण्यासारखे वाटते. इतकं सोपं असतं जिवन तर काय मजा आली असती नाही कां?

महाराजांचा आत्मा घोड्य़ावर बसुन दिनकर भोसलेच्या मुलाला वाचवायला येतो, त्या प्रसंगा मधे 11अगदी शेवटचा धक्का बाइकला लागे पर्यंत तिथे पोहोचत ना हित .जर तो महाराजांचा आत्मा असेल तर त्याला प्रतापगडावरुन यायला घॊडयाची गरज काय? आत्म्याला घोड्यावर बसून कां यावे लागते असे प्रश्न मनात निर्माण होऊ न देता हा चित्रपट पहा.  आवडेल तुम्हाला…!!!बरेचदा साइड शॉट मधे घोडा जरा महाराजांपेक्षा जास्तंच धिप्पाड वाटतो.

मकरंद अनसापुरेचे डायलॉग्ज फारच मनाला  पटणारे आहेत. का रे शिवाजी महाराजांचा तो धडा इतिहासात  आहे कां? की वगळला का इतिहासातून? हलकेच कोपरखळी मारुन जातात आणि आपसुक हसू पसरतं.. तसेच केसात  गजरा अन गांवभर नजरा हा डायलॉग हास्याची खसखस पिकवतो  आणि मल्टीप्लेक्स मधे पण टाळ्या घेउन गेला.

dहे इतकं जरी असलं तरीही चित्रपट पहातांना काहीच कमतरता जाणवत नाही. तुम्ही अगदी मेस्मराइझ होऊन चित्रपटगृहात बसलेले असता. कुठेही हा चित्रपट कंटाळवाणा होत नाही. वर उल्लेखलेल्या  सगळ्या त्रुटी असल्या तरीही बऱ्याच पॉझिटीव्ह गोष्टी पण आहेत की ज्या मुळे सिनेमा पहातांना मस्त वाटतो. जसे  महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, सगळ्यांचेच अभिनय, सिनेमात नसलेली लावणी किंवा प्रेम गीतं .. 🙂

म्हणून माझं एक सजेशन.. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर नक्की पहा.. आणि तो पण सिनेमा हॉल मधे जाउन.. सिडी वर नाही.. फार कमी चांगले मराठी चित्रपट येतात, त्या पैकी एक म्हणून हा नेहेमीच लक्षात राहील ..

अर्थात हा चित्रपट एक ऐतिहासिक चित्रपट नाही हे लक्षात घ्या आणि मग पाहिला तर या चित्रपटात काही वावगं वाटणार नाही हे बाकी १०० टक्के खरं!
थोडक्यात काय ?? तर   तर्क वगैरे गुंडाळून ठेवा ,जस तुम्ही मुन्नाभाई बघतांना गुंडाळून ठेवला होता तसाच..आणि डॉक्टर मांजरेकरांनी पुर्ण अभ्यास  करुन (!) बनवलेला  हा  चित्रपट नक्की पहा!!

झपाटलेले…

Written by  on September 1, 2014
Capture

संपादक मंडळ, दृश्यकला खंड,:–वासुदेव कामत, वसंत सरवटे, दिपक जेवणे,दिलीप करंबळेकर, सुहास बहुळकर, साधना बहुळकर, गोपाळ नेते, रंजन जोशी, दिपक घारे, सुपर्णा कुलकर्णी

आपल्याकडे कलेबद्दल इतकी अनास्था आहे, की समजा कोणाला चित्रकारांची नावे विचारली, तर राजा रवी वर्मा , हुसेन या शिवाय तिसरे नाव कोणाला आठवणार नाही.घर बांधायला खर्च केला जाईल, पण दिवाणखान्यात  लावायला एखादे पेंटींग विकत घेतांना मात्र हजारदा विचार करतील.

तसा माझा कला क्षेत्राशी अजिबात काही संबंध नाही. गेल्या पाच  वर्षापासून सुपर्णा ( माझी सौ.) चरित्र कोशाच्या चित्रकला खंडाची सहसंपादक  म्हणून काम  करीत असल्याने , बरेचदा खंडा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी जमा केलेली फोटो, चित्र आवर्जून दाखवायची . आता गाढवापुढे वाचली गीता, असा काहीसा तो प्रकार सुरुवातीला असायचा.

"निरंजनी" हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र,niranjani by haldankar,

“निरंजनी” हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र

पण मग नंतर तिने जेंव्हा एकदा हळदणकरांचे हातात दिवा घेतलेल्या तरूणी चे “निरंजनी” नावाचे पेंटींग ,किंवा “मंदिरपथगामिनी” हा शिल्पकार गणपतराव म्हात्रे  ह्यांच्या  शिल्पाचा फोटो  किंवा नानासाहेब करमरकरांनी बनवलेल्या त्या बाळाच्या मूर्ती आणि त्यामधले बारकावे , आणि कलात्मक दृष्ट्या रसग्रहण करून दाखवल्यावर मात्र या सगळ्या प्रकारात एकदम खूप इंटरेस्ट निर्माण झाला. अर्थात या विषयावर लिहिण्याइतका माझा अभ्यास जरी नसला, तरी मूर्त, अमूर्त “चित्रकला एंजॉय करणे’ चित्रांचे प्रकार, माध्यम, पोत आणि शिल्पांचं रसग्रहण करण्या इतपत तरी प्रगती झालेली आहे. त्यामुळे कधी जहांगीर समोरून गेलो, तर पूर्वी त्याला बगल देऊन जे जायचो, त्या ऐवजी एक लहानशी चक्कर तरी नक्कीच मारतो हल्ली.

राजा रवी वर्मा सगळ्यांनाच माहिती आहे, पण सोलापूरच्या त्याच काळातील चंद्रवर्मा बद्दल कोणी काही ऐकलेले पण नाही.मला पण माहिती नव्हती 🙂 असे अनेक ज्ञात अज्ञात चित्रकार, आहेत की ज्यांची माहिती या कोशात आहे. ती कशी मिळवली हे जर लिहीतो म्हंटलं तर त्यावर पण एखादा कोश निर्माण होऊ शकेल, इतकं काम केलं गेलंय या साठी.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

आमच्या घरी पण चक्क दृष्यकलामय वातावरण निर्मिती झाली होती. ती घरी आली , की दररोज काही तरी नवीन सांगायची . दृष्य कला खंडा बरोबरच संगीत खंडाचे पण काम सुरु होतेच. त्याही क्षेत्रातील बरीच मनोरंजक माहिती कानावर पडत होती. या पूर्वी तिने ’ साहित्य खंडाचे” कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले होते, त्या खंडाचे मुख्य संपादक डॉ. सुभाष भेंडे  होते, खंड पूर्ण होई पर्यंत प्रत्येक लेखकाचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि आडनाव अगदी तोंडपाठ झाले होते तिचे!  इतक्या नोंदी (चित्रकला, संगीत, साहित्य) हाताखालून गेल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही विषयावर ती लेख लिहू शकते- हा कोश निर्मितीचा फायदा!

कोश म्हंटलं की श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव आठवते. वयाच्या उण्यापुऱ्या ५३ वर्षात त्यांनी जे काम करून ठेवलंय त्याला तोड नाही, हे मी आज अधिकार वाणीने म्हणू शकतो, याचे कारण मी स्वतः काही “झपाटलेल्या” लोकांना एकत्र येऊन शिल्पकार चरित्र कोश निर्मितीच्या दरम्यान सहा वर्ष काम करतांना पाहिले आहे. सुहास बहुळकर, दिपक घारे यांनी तर दररोजचे ८ -१० तास या कोशा साठी खर्च केलेले आहेत.वसंत सरवटे ह्यांना प्रकृती स्वास्थ्या मुळे जरी दररोज येता येत नव्हते, तरी पण शक्य होईल तेंव्हा ते येऊन जायचे.  त्यांचे योगदानही खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यांनी ५ वर्ष अक्षरशः झपाटल्यासारखे काम केलेले आहे, आणि म्हणूनच हा खंड पूर्णत्वास जाऊ शकला.

आज पर्यंत चित्रकला या विषयावर एकही कोश निर्माण झालेला नाही, त्यामुळे चित्रकारांची , मूर्तिकारांची माहिती गोळा करणे हे खूप कठीण काम होते. या पुढे चित्रकला किंवा मूर्तिकला ज्याला उपयोजित दृश्यकला म्हटले जाते त्याच्या अभ्यासासाठी हा खंड म्हणजे एक मूळ स्त्रोत ठरणार आहे. या खंडा मधे जी चित्र प्रसिद्ध करायची होती ती काही पर्सनल कलेक्शन मधली, तर काही महाराष्ट्रातील काही म्युझियम मधे होती. ही पेंटींग्ज आज पर्यंत कधीच कुठेही प्रसिद्ध झालेली नाहीत, त्यामुळे ही चित्र कुठेही उपलब्ध नाहीत.

ह्या चित्रांचे फोटो मिळवण्यासाठी अगदी गावो -गाव फिरायला जावे लागले. सोबत एक कॅमेरा, फोटोग्राफर घेऊन प्रत्येक चित्राचे किंवा मूर्तीचे चित्र काढून त्याच्या मूळ मालकाची खंडात प्रसिद्ध करण्यासाठी लागणारी परवानगी सुहास बहुळकर यांनी स्वतः गावोगाव फिरून मिळवून आणली. अर्थात हे काही सोपं काम नव्हतं, पण सुहास बहुळकर यांनी ते लीलया पूर्ण केलं. त्यांनी एकदा बोलतांना सांगितलं होतं, की बरीच दुर्लभ चित्र अगदी धूळ खात पडलेली होती, आणि त्यांच्यावरची धुळ झटकून आम्ही त्याचे फोटो काढून आणले. फोटो काढतांना जर मूळ पेंटींग फ्रेम केलेले असेल, तर मधल्या काचेचे रिफ्लेक्शन येऊ नये म्हणूनही बराच द्राविडी प्राणायाम करावा लागला.या खंडात जितके नवीन चित्रांचे फोटो टाकले आहेत, त्या प्रत्येक फोटो मिळविण्यामागे  काय करावे लागले, ह्याची पण एक कहाणी आहे.

कोश ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2013/05/e0a495e0a58be0a4b61.jpg)हा जो काही ग्रंथ तयार होणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील चित्रकार, आणि त्यांची कला यांची माहिती सांगणारा पहिला कोश असल्याने ह्याचे फार मोठे महत्त्व आहे. आज पर्यंत गेल्या दोनशे वर्षात कुठल्याही कलाकाराचे किंवा त्याचे कलेचे डॉक्युमेंटेशन झालेले नसल्याने हा कोश या पुढे संदर्भग्रंथ म्हणून वापरला जाणार आहे.

शेजारी ते जे वाक्य लावले आहे ना , ते तिने अगदी पुरेपूर अनुभवलेले आहे.

.हे पोस्ट कशासाठी?  तर ४ मे २०१३ रोजी  हा कोश प्रकाशित झाला आणि ५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाल्याचे, अगदी कृत कृत्य झाल्याचे  भाव चेहेऱ्यावर घेऊन जेंव्हा सुपर्णा घरी आली, तेंव्हाच ठरवले, की बायकोचे कौतुक तर करायलाच हवे – नाही का??