चुल ते गॅस..

Written by  on July 30, 2014

राजाभाऊ सकाळी उठले, आणि पेपर मधे  ’वर्षाला फक्त ६ गॅस सिलेंडर्स सवलतीच्या दरात मिळतील’, नंतर मात्र दामदुप्पट पैसे मोजावे लागतील  अशी बातमी वाचली, आणि  त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.  क्षणात त्यांचं बालपण डोळ्यांसमोर तरळलं.   ओली लाकडं आणल्या गेली म्हणून धुराने ओले झालेले डॊळे पुसणारी आई आठवली.

राजा भाऊंच्या घरी ओटा नव्हता, गॅस नव्हता ( त्या काळी कोणाच्याच घरी गॅस नव्हता, श्रीमंत लोकांकडेच असायचा  स्टोव्ह) “-  तर चुलीवर फोडलेली लाकडं वापरून स्वयंपाक केला जायचा. लाकडं आणायचं काम काकांच असायचं. आई पाटावर बसून स्वयंपाक करायची, आणि  आम्ही समोर पाट-पाणी घेऊन जेवायला बसायचो.   हे दृष्य सगळ्यांच्याच घरी लहानमोठ्या प्रमाणात विदर्भात दिसून यायचं. चुलीची पण बरीच उस्तवार करावी लागायची. सकाळी उठल्यावर शेणाचे पोतेरे घेऊन चूल सारवून तयार केली जायची. हळद, कुंकू वाहिल्या शिवाय चूल पेटवली जायची नाही . एखाद्या वेळेस जर लाकडं ओली आली की मग स्वयंपाक करतांना धुराने   खोकून तिचा जीव नकोसा व्हायचा.  हातातल्या फुंकणी ने लाकडावर फुंकर मारतांना आईचा होणारा कासावीस झालेला चेहेरा अजूनही आठवला आणि राजा भाऊंचं मन उगाच भरून आलं.

ज्या दिवशी संध्याकाळच्या फार जास्त काही करायचं नसेल तर त्या  वेळेस कोळशाची शेगडी वापरली जायची. स्वयंपाक घरात आई स्वयंपाक करतांना तिच्या गळ्यात मागून हात घालून झुलतांना तिला त्रास होत असेल, राजा भाऊंना  पोळेल, म्हणून तिला  भीती वाटायची आणि मग ती ’मेल्या पडशील ना, भाजून घेशील स्वतःला’,  म्हणून  त्यांना दूर करायची- आणि जर ऐकलं नाहीच तर हातातल्या फुंकणीने एक फटका पण द्यायची. चुली वर एका बाजूला ’वैलावर” वरणाचं भांडं शिजायला ठेवलेलं असायचं. मुख्य भागात, आधी भाकरी, पोळी किंवा भात शिजवला जायचा.

गेल्या कित्येक वर्षात वरण आणि भात वेगवेगळा शिजवला होता का असं विचारलं तर कदाचित उत्तर देतांना खूप विचार करून उत्तर द्यावं लागेल गृहिणीला. पूर्वीच्या काळी राजा भाऊंच्या घरी एक पितळेचा कुकर  आणला गेला होता. तेंव्हा राजाभाऊंच वय असेल ५-६ वर्ष.  तो कुकर म्हणजे पण नाविण्य़ होतं, एक मोठा डब्या सारखा, आणि त्या मधे पाणी घालून त्यात डाळ, तांदुळाची भांडी  ए्कावर एक  ठेऊन चुलीवर ठेवले की  एकदम दोन्ही  शिजवले जायचे.डाळ तांदुळ एकदम शिजवले जातात याचं आश्चर्य खूप दिवस वाटायचं. घरी  कोणी  आईच्या  ओळखीच्या काकु आल्या की तो कुकर दाखवला जायचा.  त्याला शिटी वगैरे काही नसायची. पण लवकरच प्रेशर कुकर   मिळायला लागला, आणि ह्या कुकर चं नाविण्य़ संपलं. घरोघरी स्वयंपाक घरातून शिट्यांचे आवाज ऐकू येऊ लागले .

दिवस कसे पटकन बदलत जातात. आमच्या पिढीने जितकं यांत्रिकीकरण पाहिलं आणि अनुभवलं तितकं आमच्या आधीच्या पिढीला पहायला मिळालं नाही.  ’वाटणासाठी” पाटा वरवंटा वापरला जायचा, तर कुटायला  खलबत्ता. कोथिंबीर मिरची ची चटणी वाटतांना थोडं मीठ घेतलं की वाटणं सोपं पडतं हे आईनेच सांगितलं होतं राजाभाऊंना. सणाच्या दिवशी आईला बरेचदा  राजाभाऊ  स्वयंपाकात मदत करायचे .

कोणाचा उपवास असला की मग त्या दिवशी दाणे कुटायला  खलबत्त्यात  घेउन कुटताना खाण्याची मजा यायची. अजूनही खलबत्त्यात कुटलेला दाण्याचा लाडू राजाभाऊ मिस करतो. नंतर ते एक दाणे बारीक करायचं यंत्र आलं ,आणि खलबत्ता ओट्याखालच्या कोपऱ्यात दुर्लक्षित होऊन पडला.दाणे कुटणे आणि खोबरं किसणे हा आवडीचा उद्योग होता राजाभाऊंचा. या मिक्सरने खोबरं किसणे इतिहासजमा  झालंय़.

सकाळी पाणी तापवायला एक तर तांब्याचा बंब किंवा जर लाकडं नसतील तर मग भुशाची शेगडी सर्रास वापरली जायची.  भुसा म्हणजे लाकडं कापताना सॉ मिल मधे खाली पडणारा लाकडाचा भुरका..शेगडी  मधला एक लोखंडी पाइप लावून त्या भोवती भुसा दाबून भरला की मग मधला पाईप काढून घ्यायचा, आणि  शेगडी तयार व्हायची. मधल्या भागात निखारा ठेवला , की पटकन पेटायची शेगडी.  हे शेगडी भरायचं काम राजाभाऊंचंच! एकदा पेटवली की सगळ्यांच्या आंघोळीचे पाणी तापवून व्हायचे.

घाई – गर्दी ची वेळ असली, की मग आईची चिडचिड व्हायची. भाज्या चिरण्यासाठी ’चॉपिंग ट्रे आणि सुरी’ नव्हती, तर विळी वर भाजी चिरली जायची .  सुरी फक्त खाटकांनी वापरायची असते (!) असा विचार होता आईचा.कोथिंबीर खूप बारीक चिरण्या  मुळे आईच्या अंगठ्यांना विळीच्या ब्लेड वर दाबल्या जाऊन  नेहेमी चिरे पडलेले असायचे. आता दिवस बदलले,   मिक्सर आलं, अगदी नकळत  प्रत्येक गोष्टीसाठी कुठलं तरी यंत्र वापरणे सुरु झाले. खवणे, कुटणे, दळणे  सगळं काही मिक्सर/ग्राइंडर  मधे केलं जायला लागलं. स्वयंपाक तोच, फक्त पद्धती मधे फरक पडत गेला. प्रत्येक गोष्ट सोपी होत गेली 🙂

राजाभाऊंच्या लहानपणीचा काळ ( म्हणजे राजाभाऊ ५-६ वर्षाचे असताना,)युद्धोत्तर काळ होता, नुकतंच चायना युद्ध संपलं होतं .सगळ्या  वस्तूंची टंचाई होती. साखर, तांदूळ वगैरे तर फक्त काळ्या बाजारातच मिळायची. नंतर लवकरच रॉकेल पण शॉर्टेज मधे गेलं आणि रॉकेल मिळणं म्हणजे एक कठीण कर्म होतं. फक्त चूल पेटवण्या पुरतं जरी मिळालं तरी नशीब अशी परिस्थिती होती. ’प्रायमस” कंपनीचा पितळी स्टोव्ह आमच्या घरी होता. त्या स्टोव्हची पण एक वेगळीच उठाठेव करावी लागायची, पेटवण्या पूर्वी गरम करण्यासाठी  म्हणून एक काकडा असायचा, तो रॉकेल मधे बुडवून गळ्यात हार घातल्या सारखा त्या बर्नर वर घातला की  स्टोव्ह कसा पटकन पेटायचा. कधी तरी बर्नर मधे अडकलेला कचरा काढायला म्हणून एक पिन पण असायची. रॉकेल च्या शॉर्टेज मुळे स्टॊव्ह फक्त सकाळी आणि दुपारी चहाला वापरला जायचा. या पितळी स्टोव्ह शिवाय अजून एक म्हणजे ’वातींचा स्टोव्ह’ पण असायचा. त्याचा आवाज नसल्याने शांतपणे जळत रहायचा तो. दुपारचे तीन चार ची चहाची वेळ झाली घरोघरी स्टोव्हचे आवाज ऐकू यायचे.

हळू हळू स्टोव्ह अडगळीत गेला आणि त्याची जागा गॅसच्या शेगडीने घेतली. त्या शेगडीला रबरी ट्युब असते, म्हणून  राजाभाऊंचे तीर्थरूप कित्येक वर्ष सोवळ्याच्या स्वयंपाकासाठी गॅस वापरू देत नसत -खरं म्हणजे ते तर गॅस विकत घेण्याच्या पूर्ण  विरोधात होते, पण नंतर काळाची गरज म्हणून कॉम्प्रोमाईज केले.

हळू हळू दिवस बदलत गेले. जमिनीवर बसून स्वयंपाक करायची पद्धत कधीच इतिहास जमा झाली . ( म्हणूनच अर्थ्रायटीस चा त्रास वाढलाय का आजकालच्या पिढीला?). राजाभाऊंनी उगीच   आठवून की आपण शेवटचं मांडी घालून जमिनीवर कधी बरं बसलो होतो??  नाही आठवत.. ..कदाचित सहा महिने तरी झाले असतील.

स्वयंपाक केला की एकदाची सगळी भांडी समोरच्या खोलीतल्या डायनिंग टेबल वर नेऊन ठेवले, की जेंव्हा ज्याला वाटेल तेंव्हा तो जेवून घेतो. प्रत्येकाच्या वेळा तशा वेगवेगळ्याच असतात जेवण्याच्या. एक म्हण आहे,” द फॅमिली विच डाइन्स टुगेदर स्टेज टुगेदर” पण तरीही ….. स्वयंपाकघरातल्या यंत्रां सोबत घरातली माणसंही यंत्रा प्रमाणे वागू लागली आहेत. आयुष्य इतकं धकाधकीचे झाले आहे, की हल्ली  डायनिंग टेबलवर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवायला बसण्याचे दिवस संपले आहेत. ज्याला जेंव्हा वेळ मिळतो तेंव्हा तो जेवून घेतो. कुटुंबातले सगळे एकत्र कधी जेवले तर रविवार सोडून इतर दिवस आठवत नाही.

राजाभाऊंना आ्ठवलं , जेंव्हा मनमोहन पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते, तेंव्हा मिडीयाने त्यांच्या पत्नीला विचारले की तुम्हाला काय वाटते, तर त्या म्हणाल्या होत्या, की “आता तरी गॅस सिलेंडर भाव वाढवू नये म्हणजे झाले”  पण मनमोहन सिंगनी काही ऐकलेले दिसत नाही. चांगली शिक्षा करणार आहेत त्यांना त्यांची बायको.. 🙂

या पुढे लाकूड मिळणे पण सोपं नाही, रॉकेल तर कधीच मिळत नाही, मायक्रोवेव्ह वापरायचं, तर इलेक्ट्रिसिटीचे पण भाव खूप वाढले आहेत- कारण एमएसईबीची वितरण व्यवस्था  पण तर प्रायव्हेट कंपन्यांना आंदण दिलेली आहे.

आता मनमोहना साठी एकच प्रश्न आहे राजा भाऊंच्या मनात, तुम्ही घरगुती  सिलेंडर्स  कार साठी, हॉटेल साठी वगैरे वापरली जातात, म्हणून भाव वाढवले आहेत असे म्हणता, अहो मग त्या चोरीच्या सिलेंडर विक्रीवर आळा घाला ना , गॅस कंपनी सरकारची, डिस्ट्रिब्युटर्स सरकारचे…. मग प्रॉब्लेम काय आहे? पण हे सगळं  न करता, सामान्य जनतेला वेठीला का धरतो आहेस  रे बाबा?  सगळ्या ऑइल कंपन्या सरकारीच तर आहेत, मग थोडा प्रॉफिट कमी का करत नाहीस रे तू?” गप्प बसलाय मुग गिळून तो मनमोहन.. राजा भाऊंना स्वतःचाच राग आला..

” अरे बाबा, आम्ही सामान्यांनी खायचं तरी काय?? कोळसा?”  …….. पण   लगेच त्यांना आठवलं, छे छे.. तो पण  त्यांनीच तर  खाऊन टाकलाय ना.

कॉन गेम-अंधश्रध्दा

Written by  on July 20, 2014

राइस पुलर- तामिळनाडू , केरळा मधे ह्या गोष्टींचं खूप वेड आहे. परवा एका तामिळ मित्रा बरोबर बसलो असतांना टीव्ही वर एक कार्यक्रम सुरु होता. होता अर्थात तामिळ मधे पण बरेचसे शब्द होते इंग्लिश मधे म्हणून बरंच कळत पण होतं. आणि जे काही कळत नव्हतं ते सांगायला आमचा मित्र होताच.

हल्ली तामिळनाडु, केरळ, बंगालात एक  नवीन फॅड आलंय. म्हणतात की काही सुपरनॅचरल गोष्टीं आहेत आणि त्यासाठी बरेच खरेदीदार आहेत अगदी वाट्टॆल ती किंमत देऊन विकत घ्यायला. उदाहरणार्थ राइस पुलर किंवा नाग मणी हे अगदी मोस्ट सॉट फॉर वस्तूमधे मोडतात.(या नागमण्याचे बरेच फोटो आहे गुगल सर्च करा फोटॊ सर्च..) या व्यतिरिक्त अशा गोष्टीं मधे अजूनही बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.या अशा गोष्टींसाठी खूप गिऱ्हाइकं वाट पहात आहेत, तेंव्हा तुम्हाला मिळत असेल तर सोडू नका.. अशी मानसिकता तयार केली जाते.

असंही सांगितलं जातं की ह्या गोष्टी साठी इंटर्नॅशनल मार्केट मधे करोडॊ रुपये मोजण्यासाठी लोकं तयार आहेत.कित्येक लोकं या ठग लोकांच्या नादी लागुन आपले पैसे आणि मनःस्वास्थ घालवुन बसलेले आहेत.

तुमच्या आता लक्षात आलं असेलच की हा एक मोठ्ठा कॉन गेम आहे. तुम्हाला अगदी हातोहात फसवले जाते, आणि तुम्हाला अगदी कळणार पण नाही कसं ते..!इतक्या प्रलोभनाच वलय तुमच्या भोवती निर्माण केलं जातं , की तुम्ही त्यात एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात किड्याने सापडावे तसे सापडता..तुम्हाला असं भासवल जातं की तुम्ही जो नागमणी विकत घेताय तो खरा आहे  आणि त्याची किंमत कमीत कमी १०० करोड रुपये आहे. आता १०० करोड कमवायला जर तुम्हाला३- ५ लाख रुपये इन्व्हेस्ट करावे लागत असतील तर त्यात काय हरकत आहे? तुम्ही हा मणी घेतला की लगेच इंटरनॅशनल बायर्स आहेत हा विकत घ्यायला. मुंबईला पण वसईचा एक व्यापारी यात फसला असे पेपरला आले होते.

या लोकांचा कारभार चालतो कसा? अगदी हाय टेक आहे. म्हणजे तुम्हाला सगळी माहिती नेट वर आहे..  खरेदी विक्री करणारे नेटवर संपर्क साधतात आपल्या सावजा बरोबर . आणि नेट वर माहिती आहे म्हणजे ती खरी आहेच असंही लोकांना वाटतं.

नाग मणी हा स्वयंप्रकाशी असतो, आणि त्याच्या टेस्ट कशा करायच्या ते पण दिलेल्या आहेत इंटरनेट वर. या टेस्ट देणारे पण एक्सपर्ट्स म्हणजे याचेच लोकं. वसईच्या एका सोनाराच्या नागमण्याने प्रकाश देणे बंद केले तेंव्हा लक्षात आली कॉन गेम, आणि त्याने पोलिस कम्प्लेंट केली.साइट पुढे दिलेली आहे.

२० नखांच्या कासवाची पण खूप डिमांड आहे, अशा कासवाची तुम्ही पुजा केली की मग सगळ्या पंचक्रोशितल धन तुमच्या घरात येतं. ( हसु नका) लोकं आहेत यावर विश्वास ठेवणारे..

इसवीसन १६१६चं  एक रुपयाचं कॉइन.. ह्यामधे राइस पुलिंग प्रॉपर्टिज आहेत असं म्हणतात. तसेच एक गॉगल जो घातला की  कपड्याच्या आतलं पण दिसतं .. त्याची पण चर्चा आहे, आणि त्या टीव्ही वर सांगितलंय की कित्येक लोकांना फसवलय त्या साठी.

सीडी देशमुखांची सही असलेली ५ रुपयांची नोट जिच्यावर मागे ५ हरणांचे चित्र आहे तिला पण खूप मागणी आहे. मी माझ्या कझिनला विचारले तर तो म्हणाला की भारत सरकारने ५ हरणांचे चित्र असलेली   नोट छापलीच नाही आज पर्यंत.केवळ चार हरिण असलेली नोटच छापलेली आहे.. आणि ती पण फार पुर्वी…

बरं इतकं सगळं झालं, पण राईस पुलर?? ही काय भानगड आहे? काही तांब्याच्या वस्तुच्या मधे एक प्रकारची पॉवर असते की ज्या मुळे त्या वस्तु कडे तांदुळ ओढला जातो मॅग्नेट प्रमाणे. इमारतीच्या वरच्या लाइटनिंग अरेस्टर मधे ही पॉवर असते असं म्हणतात. तसेच राइस रिपेलर.. हा फिनॉमिना पण असतो.बरं, जरी आपण मान्य केलं की अशी पॉवर असते, तरी पण या राइस पुलिंग पॉवर किंवा रिपेलंट पॉवरचा काय उपयोग आहे? अगदी काहीच  नाही…. पण तरीही या ( नसलेल्या) प्रॉपर्टीला खूप अनन्यसाधारण महत्व दिलं जातं.

आणि तुम्हाला जाळ्यात ओढलं जातं, हे सांगितलं जातं की ईंटरनॅशनल बायर्स आहेत ह्या आयटम साठी. आणि तुम्हाला वेब साईट चा पत्ता पण दिला जातो, जिथे काही बायर्स नी राइस पुलर्स विकत घेण्यासाठी केलेल्या ऍडव्हर्टाइझ असतात.तुम्ही ह्या बायर्सना कॉंटॅक्ट केले,की तुम्हाला ते सांगतात की तुमच्या कडे असलेले राइस पुलर किंवा इतर एखादा आयटम विकत घेण्यास ते तयार आहेत .. काही कोटी रुपयांना..अशा प्रकारे लोकांची मानसिकता तयार केली जाते. मोठी गॅंग आहे या  लोकांची.

ह्या तर केवळ दोन तिन वस्तुंच्या बद्दल लिहिलंय मी.. अशा कित्येक वस्तु आहेत ज्यासाठी लोकं कितीही पैसे मोजायला तयार आहेत .. आणि इझी मनी म्हणुन.. मध्यमवर्गीय लोकं इंटरेस्टॆड आहेत. इथे त्या लोकांची वेब साइट दिलेली आहे .. चेक करा.. ^(http://rangmarathiche.com/goto/http://rice-puller.com/)

या अशा गोष्टींसाठी लोकं लाखो रुपये देतात.. आणि स्वतःला फसवून घेतात. एक मोठा कॉन गेम आहे हा. अगदी शिकले सवरलेले लोकं पण यात अडकून वहावत गेले आहेत, आणि स्वतःचे लाखो रुपये गमाउन बसले आहेत.

टीव्ही वरच्या कार्यक्रमामधे अशाच लोकांना एक्स्पोझ केलेलं होतं . तामिळांचे नरेंद्र दाभोळकर असावेत ते. बरं सगळ्यात शेवटी  पुन्हा एकदा हेच सांगायचंय की हे जे काही वर लिहिलंय ते खोटं आहे, माझ्या मते नागमणी, राइस पुलर वगैरे काही नसतं.. जस्ट करमणूक म्हणून वाचा आणि सोडून द्या..

पुरुष जन्मा तुझी कहाणी….

Written by  on July 19, 2014

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/couple_4.jpg)शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा.

सीमाला वाटायचं की    दररोज सकाळी ऑफिसला जातांना आपली किती घाई होते?? राजाभाऊंनी थोडी मदत करावी किचनमधे सकाळी- पण राजाभाऊ मात्र दोन तीन कप चहा सोबत टाइम्स ऑफ इंडीयाचं पारायण केल्याशिवाय जागेवरून हलत नाहीत.

सीमाला वाटायचं, मेलं कधी विचारत पण नाहीत , की का गं? थोडी मदत करू का? भाजी चिरून देऊ का? किंवा कमीत कमी ऍक्वा गार्ड सुरु करुन बाटल्या भरुन फ्रिझ मधे ठेऊ कां? मेलं कश्शा कश्श्याची मदत करत नाहीत.

सीमाच्या नाकाचा शेंडा लाल झालेला दिसत होता. तिचं एक चांगलं लक्षात आलंय राजाभाउंच्या की ही चिडली की हिचे नाक लाल होतं, आणि मग थोड्या वेळात गाल पण लाल होतात, राजाभाउ नवीन लग्न झालं होतं तेंव्हा तिला मुद्दाम चिडवायचे. आणि मग तिची समजूत काढायच्या निमित्याने… … 🙂

पण आज मात्र राजाभाउंचा मूड थोडा बिघडलेलाच होता. आज  मुद्दामच त्यांना सीमाला चिडवायची लहर आली होती.तसं तर आजचा शनिवार, दोघांनाही सुटी.. आता भांडण झालं की दोन दिवस वाईट जाणार- म्हणून शक्यतो शनिवारी भांडणं टाळतात राजाभाऊ –  तरी पण त्यांच्या डोक्यात काल रात्री सीमाने  थोडे (!) दुर्लक्षच केल्यामुळे ्मूड ऊखडलेलाच होता.

संध्याकाळी घरी आल्यावर जेवायला बसल्यावर पानात शेपूची भाजी पाहून चिडले राजाभाऊ.  राजाभाऊंना  शेपू आवडत नाही फारसा – आणि सीमा ला खूप खूप आवडते शेपूची भाजी. काल दुपारी पण ऑफिसात त्यांनी डबा उघडला, तर त्या मधे चक्क दुधीची भाजी!!!मस्त पैकी बटाट्याची मसालेदार भाजी द्यायची आधी डब्यात , हल्ली हे नवीन सुरु केले होते. मटकी, मुग , उसळ वगैरे आणि अशा निरुपद्रवी रामदेव रेकमंडेड भाजा!

ती भाजी पाहिली की राजाभाऊंच्या तोंडातून त्वेषपूर्ण शिव्या बाहेर पडतात  त्या टिव्हीवरच्या रामदेव बाबाच्या नावे. च्यायला, अरे तुला खायचं तर खा ना दुधी,शेपू खा, पालक मेथी.. काय वाटेल तो पाला पाचोळा खा,  पण लोकांना कशाला खायला सांगतोस? काल त्या रामदेवबाबाने  टिव्ही वरच्या एका कार्यक्रमामधे सुदर्शन चक्राप्रमाणे हातावर स्वतःभोवती गोल गोल फिरून  (कोलांटी उडी मारून ) दाखवलं. सीमा ने ते पाहिलं, अन लगेच  दाखवलं आणि बोटाने – तर्जनीने राजाभाऊंच्या पोटावर हलकेच दाब दिला.. आणि   राजाभाऊंच्या वाढलेल्या पोटाकडे पहात म्हणाली अरे थोडं कमी कर रे…

राजाभाऊंच्या लगेच सीमाला म्हणाले, त्या बाबाला म्हणावं की , आधी सकाळी उठुन ८-३५च्या लोकलमधे   आत तरी शिरून दाखव म्हणाव.. आणि दिवसभर ऑफिसमधे किंवा साईटवर काम केल्यावर मग रात्री ८ -९ च्या दरम्यान लोकलमधे लटकत घरी आल्यावर मग अशी आसनं करुन दाखवले तर मानलं तुला. च्यायला, आमचं काय तुझ्या सारखं आहे का? आमच्या सारखी कामं करुन दाखव आणि मग ते पोट आतबाहेर करुन दाखवलं – (खपाटीला गेल्यासारखं )  एक वर्षानंतर तर तू म्हणशील  ते मी करायला तयार आहे .

तरी बरं, राजाभाऊंनी नुकतीच एक एल आय सी ची पॉलिसी  घेतली २५ लाखाची, त्यामधे त्यांचे पुर्ण मेडिकल चेकप झालं होतं. सगळं काही ठीक निघालं, कोलेस्ट्रॉल, बिपी, शुगर… काही नाही निघालं! तरी पण खाण्यावर बंधनं… च्यायला काय आयुष्य आहे आपलं??राजाभाऊ वैतागलेलेच होते.

लग्न झाल्यावर  सुरुवातीचे मंतरलेले दिवस असतात असे दिवस की  त्या दिवसात दोघांच्या शिवाय तिसरं  कोणीच नको असतं घरामधे. पण लवकरच  रुसवे फुगवे सुरु होतात. नॉर्मली सुरुवातीची

भांडणं किस ऍंड मेक अप  अशा प्रकारची असतात – दिवसा झालेली भांडणं सुर्यास्ता पर्यंत किंवा फार तर गादीवर पडे पर्यंत संपुन जातात.

पण आता लग्नाला इतकी वर्ष झाली , आता जरी भांडण  मिटले तरीही सीमाला मात्र आपण काहीतरी मिस करतोय असं वाटत असतं, राजाभाऊ  आपलं ऐकत नाहीत, ते असं कसं काय वागू शकतात  माझ्याशी? छेः.. लग्नापूर्वी असा नव्हता हा, प्रत्येक वाक्य हे ब्रम्हाज्ञा समजून वागायचा. काहीही म्हट्ल तरी वाक्य पुर्ण व्हायच्या आत सगळं कामं करुन टाकायचा, रंगात आला की सगळे पुस्तकी डायलॉग पण बोलून दाखवायचा, चंद्र आणून देईन,तारे तोडीन वगैरे वगैरे… पण आजकाल ?? हं……..लांबलचक सुस्कारा सोडला सीमाने.गेले ते  दिवस!!

सीमा आणि राजाभाूंचं लव्ह मॅरेज. दोघांचंही जितकं वय असेल तितकीच वर्ष त्यांची ओळख! सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. पण हल्ली एकदम राजाभाऊंचं वागणं बदललंय असं सीमाला वाटत होतं. आता हेच पहा नां, पुर्वी लग्न झालं की राजाभाऊ अगदी न कुरकुर करता ऑफिसातून आल्यावर तिच्या मैत्रीणीकडे जायचे तिला घेउन. कधी सीमाच्या माहेरी पण- तिच्या भावाशी पटत नसलं फारसं तरीही..

सीमाच्या भावांना तसाही राजाभाऊंच्या बद्दल रागंच होता मनात, आपली सुस्वरुप बहिण ह्या सर्वसाधारण दिसणाऱ्याने गटवली म्हणून. भावांचीही अजिबात इच्छा नव्हती सीमाने राजाभाउंसोबत लग्न करावं म्हणून. पण इश्वरेच्छा बलियसी.. सीमाच्या बरोबर राजाभाऊ अगदी रडूबाई टीव्ही सिरियल्स पण आवडीने बघायचे, तसेच नाटकं वगैरे बघायला पण जायचे. राजाभाऊंना गाणं ऐकायची आवड  आहे, पण केवळ सिडीवर – लाइव्ह प्रोग्राम नाही, तरीपण राजाभाऊ सीमासोबत नाटकं, गाण्याचे प्रोग्राम्स पहायला जायचे.अशा हज्जारो गोष्टी होत्या , की ज्या राजाभाऊ अगदी न कुरकुर करता करायचे सीमा बरोबर. हल्ली एकदम सगळं बदललंय ! वरची एकही गोष्ट करायला तयार नसतात.

“अहो… चला नां , जरा दादा कडे जाउन येऊ का आपण?”  म्हंटलं तर लगेच नाकपुड्या फेंदारून नाकावरचा चष्मा खाली करुन असे पहातात , की त्यांना कुठून विचारलं असं होतं सीमाला. त्यांना काहीही म्हंटलं तरी अगदी अश्शीच रिऍक्शन देतात हल्ली.

“अहो.. सकाळी उठून फिरायला जा, थोडं चक्कर मारुन या एक तास भर, तेवढीच शरीराची हालचाल होते.. “पण राजाभाऊ मात्र कायम कंटाळाच करतात. तेच पुर्वी लग्न झालं होतं,तेंव्हा कसे रोज सकाळी सीमाबरोबर ते बाहेर चक्कर टाकायला जायचे- हे सगळं आठवलं आणि सीमाचे डॊळे भरून आले. काय चुकतं आपलं? परातीमधे कणीक घेतली सिमाने भिजवायला. हात कणकीने भरलेले होते, म्हणून गाउनच्या बाहिला डोळे पुसले आणि नुसती उदासपणे कणीक भिजवू लागली.

सीमाच्या मनात विचारचक्र सुरु होतं, मी त्यांना दुधी, शेपु का देते खायला? फॅट फ्री बटर  वगैरे का घ्या म्हणते? अहो , तुमचं वजन जास्त आहे, जरी कुठलाच आजार नसला, तरीही वजन कमी करायलाच हवं – नाही का? तर म्हणतात मी फॅट फ्री का खाउ? माझं कोलेस्ट्रॉल म्हणे १५८ आहे फक्त!! आता कोलेस्ट्रॉल कमी आहे म्हणून काय उगाच बटर खायचं?? ऐकतंच नाहीत हल्ली, अगदी लहान मुलासारखं करतात! आणि स्मित हास्य उमटलं सीमाच्या चेहेऱ्यावर.

राजाभाऊ आणि सीमाचा तसा प्रेम विवाह , राजाभाऊंच्या लग्नाच्या पत्रीका पण त्यांना स्वतःलाच वाटायला लागल्या होत्या. अशी परिस्थिती होती. असो, राजाभाऊंची सीमा बद्दल अजिबात काही तक्रार नव्हती. दोघांचंही  एकमेकांवर खूप खूप प्रेम होतं. तुझं माझं जमेना, आणि तुझ्या विना करमेना अशी स्थिती झालीय आता- सीमाला जाणवलं.

तसंही राजाभाऊ कामानिमित्त कायम बाहेर जातच असतात. त्यामूळे असेल कदाचित, अजूनही लग्नातलं नाविण्य टिकून होतं इतक्या वर्षानंतर पण.. सीमाला एक वाटलं, की सगळं काही चांगलं आहे, फक्त ह्या काही गोष्टी जर राजाभाऊंनी आपल्या मनासारख्या केल्या तर कित्ती मज्जा येईल नाही??

लग्नानंतरचे पहिल्या दोन तिन वर्षातले दिवस पुन्हा उपभोगता येतील! सीमाला ती जाणीवच खूप सुखावून गेली. त्याच आनंदाच्या भरात सीमाने राजाभाऊंसाठी चहाचा कप तयार केला आणि त्यांच्या समोर आणून ठेवला- काहीच न बोलता! राजाभाऊंनी निर्विकारपणे कप घेतला आणि चहाचे घोट घेत ते कुठला तरी ब्लॉग वाचू लागले.

************************************
दुपारची वेळ होती. राजाभाऊ जेवण वगैरे आटोपून शांतपणे झोपले होते. आज जरा मूड बरा होता.  राजाभाऊंच्या आवडीची मसाल्याची वांगी, भाकरी, लसूण ठेचा, मुद्दाम विरजवलेले दही , फॅट फ्री बटर, ताक आणि मसाले भात असा मेनु होता आज. त्यांच्या घोरण्याचा संथ लयबद्ध आवाज येत होता. श्वासागणीक पोट खालीवर होत होतं.. तिकडे दुर्लक्ष केलं आणि सीमाच्या मनात त्यांच्याबद्दलचा सगळा राग जाउन एकदम प्रेम दाटून आलं. पुन्हा डोळे पाणावले सीमाचे. कसा छान दिसतो हा झोपलेला असला की?? 🙂

सीमा समोरच्या खोलीत जाउन बसली. जेवण झालं होतं. आता टिव्हीवर एखादी सासु सुनेची मालिका लावून बसणार, तेवढ्यात लिओ  म्हणजे त्यांचा पाळलेला अल्सेशिअन कुत्रा  समोरून   निघून जायला लागला.त्याला बोलावले तर निरीच्छेनेच तो आला जवळ- मेला अजिबात जवळ येत नाही. सरळ पळून जातो  मुलींच्या खोलीत  खेळायला.

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2010/05/dog.jpg)निरीच्छेनेच का होईना पण तो जवळ आला म्हंटल्यावर  नकळत त्याच्या डोक्यावरून हात फिरवणे सुरु केले.. आणि तो एकदम शांतपणे खाली बसला सीमाच्या जवळ. सीमाला आश्चर्य वाटले , आता याला पळायचं होतं, पण कसा बसलाय पहा आता अगदी आज्ञाधारकपणे.. सीमाने त्याच्या आयाळीवरून, गळ्याभोवती हात फिरवणे सुरु केले, तर तो एकदम पालथाच पडला आणि त्याने पोट वर केले. त्याला पोटावरून हात फिरवलेला खूप आवडतो हे सीमाला चांगलेच माहिती होते. हळू हळू त्याच्या पोटावरून, मानेवरून -हात फिरवणे सुरु केले. जवळपास तास झाला तरीही लिओ जवळच बसलेला होता. सीमाला आश्चर्य वाटलं, नेहेमी फारतर दोन तिन  मिनिटे जवळ बसणारा आज इतका वेळ बसला होता?? ते ही खरंच म्हणा, तिच्या लक्षात आलं की आपणही काही फारसं लक्ष देत नाही किंवा   खेळत बसत नाही लिऒशी!

सीमाला आठवलं, की संध्याकाळी कधी सोबत फिरायला गेला की त्याची चेन हातात धरल्यावर तो नेहेमी समोर चालतो- जणू काही तोच आपल्याला फिरायला नेतो आहे अशी ऐट असते त्याची. आपण त्याच्याच इच्छे प्रमाणे वागतोय असे दाखवून त्याला आपल्याला जायचंय त्या दिशेला बरोबर नेतो – पण त्याला वाटत असतं की आपण त्याच्याच इच्छे प्रमाणे चालतोय ..

बस्स!!!! सीमाची ट्य़ुब पेटली.. आणि तिला एकदम सुखी संसाराचा मंत्र सापडला! बस्स!! अस्संच करायचं आता! सीमाने ठरवले.बघु या काय होतं ते. जसं आपण लिओला वागवतो ना, फिरायला नेतांना – तसंच राजाभाउंना पण ट्रिट करायचं- प्रत्येक गोष्ट त्यांच्या इच्छे प्रमाणे करतोय असं दाखवायचं आणि करायचं आपल्या मनाचंच. बस्स!! ठरलं तर!!

**********************************
संध्याकाळ झाली होती. राजाभाऊंची चुळबुळ सुरु झाली होती. झोप झाली होती, तरीपण राजाभाऊ उगाच लोळत पडले होते पलंगावर. सीमाने चहाचा कप समोर केला. सोबतच त्यांना आवडणारी  चॉकलेट क्रिम बिस्किट्स बॉर्न बॉर्न  आणि मोनॅको पण ठेवली होती प्लेट मधे. राजाभाउंनी आश्चर्याने पाहिले, च्यायला, मारीच्या सोबत ही चॉकलेट बिस्किट्स कशी  आज म्हणून?? सीमाने स्वतः पण आपली कॉफी घेतली होती. कप होता हातात, आणि सीमाने पण एक मारी उचलले, राजाभाउंनी पण एक मारी अन दोन मोनॅको बिस्किट्स संपवले. समोरच्या चॉकलेट क्रिम बिस्किटला हात पण लावला नाही.

छेः..राजाभाउंच्या मनात विचार आला,  आता सीमाने आपणहून आणून दिल्यावर खाण्यात कसली मजा आहे? ती नाही म्हणेल, वैतागेल, तर मग खायला मजा येते. तसंही आपल्याला ती क्रिम बिस्किट्स आवडत नाहीत, फक्त देत नाही म्हणून मुद्दाम करतो आपण!!सीमा मात्र मनातल्या मनात हसत होती.

संध्याकाळी सीमाला कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. आज पोळ्याबाई येणार नव्हत्या, सीमाला पुर्ण खात्री होती की जर राजाभाऊंना जेवायला जाऊ या बाहेर म्ह्ट्ल तर ते म्हणतील की  नको- घरीच जेउ.. काय करायच??

सीमाने त्यांच्याकडे बघितले, मुली कुठे आहेत घरामधे याचा कानोसा घेतला, आणि राजाभाउंच्या केसातून हात फिरवू लागली. राजाभाऊंचं लॅपटॉप वरचं लक्षं उडालं होतं आता पर्यंत. तरी पण ते बळेच काहीतरी वाचायचा प्रयत्न करीत होते. शेवटी सीमाचा हात केसातुन फिरणारा, मानेवर , मग कानाच्या पाळ्यांशी हलकेच चाळॆ करणारा.. दुर्लक्ष करणं सोपं नव्हतं. विश्वामित्राची पण वाट लागली होते मेनके मुळे.राजाभाऊ म्हणजे  काय साधा मानव प्राणी.

सीमा हळूच म्हणाली, अहो.. आपण आज संध्याकाळी बाहेर जाउ या का जेवायला?? आणि राजाभाऊंची प्रतिक्रिया येण्यापूर्वीच म्हणाली, ’ नको, जाउ द्या, घरीच करते काहीतरी , गेले चार दिवस तुम्ही पण ट्रुरलाच होता ना, मी काय मुलींची इच्छा होती काल  बाहेर जायची म्हणून म्हंटलं” ! हात सावकाश पणे मानेवरून खाली पाठीवरून फिरत होते..

सीमाने असे बोलल्यावर राजाभाऊ   लगेच म्हणाले, ’नाही गं.. असू दे  कशाला करतेस घरी, आपण जाऊ या नां बाहेर कुठेतरी!!तू थकली असशील ना.. सकाळपासून तुला काम करतांना बघतोय मी!’ आपण बाहेरच जाऊ मुलींची पण इच्छा आहेच ना जायची, चल तर मग लवकर तयार हो.. आणि तुझ्या आवडत्या हॉटेल मधे. सीमा खूष झाली.. युक्ती कामी आली म्हणून.

एकदा ही युक्ती लक्षात आल्यावर मग सीमाचं काय सगळंच काम एकदम सोपं झालं होतं. राजाभाऊंच्या कडून कुठलंही काम करुन घ्यायचं असेल तरीही ते कसं करुन घ्यायचं या मधे ती निष्णात झाली.

जसे , एखाद्या दिवशी माहेरी जायची वेळ आली, आणि सीमा म्हणा्ली, “अहो, आपण जायचं का आज दादा कडे ?” (हा प्रश्न विचारला की जुन्या राजाभाउंनी सरळ नको.. त्यापेक्षा तुला सोडतो तिकडे आणि मी मित्राकडे जाउन येतो.. असं म्हंटलं असतं )

पण आज नवीन स्ट्रॅटेजी प्रमाणे -आणि राजाभाऊ काही बोलण्यापूर्वी सीमा म्हणाली “नको, जाउ दे, तुम्हाला तिकडे बोअर होतं- त्यापेक्षा आपण मार्केटलाच फिरून येऊ, मग येतांना तुम्ही मला तिकडे सोडून या – येतांना मी परत येईन रिक्षाने!!”

राजाभाऊ शेवटी पुरुष , बायकोने माघार घेतली की त्यांचा भांडणातला रस संपून जायचा एकदम. जो पर्यंत बायको भांडतना उलट उत्तरं देते तो पर्यंत अहम अहमीकेने भांडायला मजा येते – नाहीतर अजिबात नाही!!

सीमाला पण सुखी संसाराचा मंत्र सापडला, तिच्यातला हा बदल सुखावह होताच, आणि राजाभाउंना पण ही गोष्ट समजली नाही असं नाही, पण राजाभाऊंनी पण त्याकडे दुर्लक्ष करुन आपले लाड कौतुक करुन घेणं- एंजॉय करणं सुरु ठेवलं- आता मस्त पैकी सीमा वेळ बघुन राजाभाउंच्या केसातून हात फिरवत बसते, पाठीवर पावडर लाऊन देते, कंटाळा न येऊ देता  भरपूर वेळ पाठीवरून  मस्त नायसिल लाउन हात फिरवत रहाते, आणि आपल्याला गोंजारून घेणे वगैरे अगदी व्यवस्थित चाललंय राजाभाऊंचे, आणि सीमा्ला पण आपल्याला राजाभाऊंकडुन जसं हवं तसं करवून घेणं मस्त जमलय.. दोघांचं ही सहजीवन मस्त चाललंय..

जशी सीमाला राजाभाूंना हाताळण्याची युक्ती सापडली, तशीच तुम्हाला पण लवकरच सापडो हीच सदिच्छा व्यक्त करुन ही साठा उत्तरीची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण!!

दोन तिन भागात न प्रसिध्द करता एकाच पोस्ट मधे सगळी कथा पोस्ट करतोय.