अबु आझमी..

Written by  on April 24, 2014

अबु आझमी.. हे   नांव पण असं आहे , की जवळपास  प्रत्येक मराठी माणसाला  अगदी एखाद्या ट्रेररिस्ट किंवा बॉंब ब्लास्ट  मधला एखादा आरोपीच नांव असाव असं वाटते. अर्थात , असं वाटणं हा पुर्ण पणे मुर्खपणा आहे असंही वाटेल.. पण…. असो… माणसाच्या मनाला काय वाटावं यावर कांहीच ताबा राहू शकत नाही. माणसाचं मन कसं असतं?? अ ड्रंकन मंकी, स्टंग विथ द स्कॉर्पिओ.. त्याच्यावर ताबा रहाणं कठीण आहे.

अबु आझमी नावाला निवडुन देणारे, किंवा मतं देणाऱ्यांमधे मराठी माणसं पण आहेत. हे जरी खरं असलं तरीही ,अबु आझमी या नांवा बद्दल प्रत्येक सामान्य मराठी माणसाच्या मनात एक चीड आहे. या मधे मराठी माणसं अशीही आहेत की  ती कुठल्या एका पक्षाची नाहीत तर ती एकत्र बांधल्या गेलेली आहेत केवळ एकाच धाग्याने.. तो म्हणजे ’मराठीपणाच्या’ धाग्याने … + मराठी बद्दलचं प्रेम. .

अगदी पहिल्या  वेळी म्हणजे १९६३ साली विदर्भवीर (?) जांबुवन्तराव धोटे यांनी स्पिकरवर पेपर वेट फे्कून मारला होता.नंतर एप्रिल २००८ मधे सहा भाजप+शिवसेना आमदारांना याच कारणासाठी निलंबित करण्यात आलं होतं. जयललिता असेम्ब्ली मधे जातांना नेहेमी पोंचू घालते.. कारण माहिती आहे ??? पूर्वी एकदा जयललिताची साडी उतरवण्याचा प्रयत्न तामिळनाडू असेम्ब्ली मधे झाला होता.असे प्रकार तर बिहार आणि युपी असेम्ब्ली मधे नेहेमीच होत असतात.

अबु आझमी मराठी समाजात ,स्वतःच्या वागणूकीने    घृणेचा पात्र झालेला आहे – कधी म्हणतो की आम्ही त्यांना काठ्या देऊ.. तर कधी छटपुजे चं राजकारण करतो. या वर्षी तर हे सिद्ध झालंय की जर छटपुजे चं राजकारण केलं नाही तर मराठी माणसांना छट पुजेचं कांहीच वावडं नाही. म्हणजे  मागल्या वर्षी छटपुजेच्या नावे लालुवा आणि अबु ह्या दोघांनी आपल्या जिभेवर ताबा ठेवला असता तर मराठी माणसांनी पण काहीच केलं नसतं.

या मारण्यामुळे काय फायदा झालाय??? मला तर कांही फारसा दिसत नाही.. केवळ सगळ्या मराठी लोकांना (मनसे + आणि इतर )  त्या अबु ला झापड मारल्याचं एक मानसिक समाधान-जी बऱ्याच लोकांची अगदी मनापासुन इच्छा होती गेल्या कित्तेक दिवसापासुन ती पुर्ण झाली. . हे पण अगदी शंभर टक्के खरं की कोणी कुठल्याही पक्षाचा असो, या मुळे  प्रत्येक मराठी माणसाला एक मानसिक समाधान  मिळालंय.

आणि नुकसान म्हणाल तर अजुन असेम्ब्ली सुरु पण व्हायची आहे तरीही मनसेचे चार आमदार निलंबित करण्यात आलेले आहेत.  आता १३ पैकी जर ४ आमदार निलंबित झाले तर उरले केवळ ९. त्यांच्या कडुन कुठली अपेक्षा करायची?? हे चार आमदार निलंबीत होणार हे दुपारीच लक्षात आलं होतं, फक्त हा निर्णय कधी बाहेर येतो हेच पहायचं होतं.

असो.. आता मूळ मुद्दा.. अबु आझमी ला आज विधानसभेमध्ये मारलं हे योग्य की अयोग्य ह्याचा कीस पाडणं सुरु होणार आहे आता. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, की आम्ही हे जे  आमदार निवडुन दिलेले आहेत ते कुस्त्यांचा आखाड्या प्रमाणे असेम्ब्ली मधे मारा माऱ्या करायला की  आमचे प्रश्न सोडवायला?

कितीही झालं..तरी अबु एक निर्वाचित आमदार ( होतकरु मंत्री) आहे, तेंव्हा त्याची अशी बेअब्रु असेम्ब्ली मधे करणे संयुक्तिक ठरत नाही. अबु ला मारलं, याचं दुःख नाही, फक्त जागा चुकली. असेम्ब्ली हॉल मधे मारण्या ऐवजी बाहेर कुठे मारलं असतं तर कदाचित सस्पेंड व्हायची वेळ आली नसती. असाही प्रश्न उभा केला जातोय की इतर आमदार, ज्यांनी इंग्रजीत शपथ घेतली त्यांना मारहाण का करण्यात आली नाही?

म्हणजे काय- सत्तारुढ पक्ष वगळता इतर पक्षाचे आमदार काय केवळ मारहाण करण्यासाठी जनतेने निवडुन दिलेले आहेत असं आहे का? अर्थातच  नाही.. तेंव्हा अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही.  कितीही झालं तरीही आमदारांनी असेम्ब्लीमधे केलेली अशी मारहाण समर्थनीय ठरु शकत नाही.

सुख कशा मधे आहे?

Written by  on April 22, 2014

आज सकाळच्या टाइम्स मधे वाचलं की म्हणे पैशाने सुख मिळते. आता    ही गोष्ट खरी असली  की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीज च्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय  फायदा?   तर म्हणून  मला वाटतं सुखाची परिभाषा टाइम्स ने अशी केली   असावी.

सुख, समाधान, आणि आनंद या तीन गोष्टीं आणि दुःख ही चौथी गोष्ट!  या गोष्टींच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. तसं म्हंटलं तर सुख , आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द एकसारख्याच अर्थाचे वाटतात – पण तसे नाही. एखाद्या गोष्टी मध्ये सुख जरी   असले तरीही त्यात समाधान असेलच असे नाही.किंवा एखादी आनंद देणारी गोष्ट सुख देईलच असे नाही. सुख आणि आनंद  हा क्षणिक असतो, पण समाधान हे तसे नसते.  असो विषयांतर होतंय..

एक गोष्ट बघा, समजा तुम्ही लोकलच्या प्लॅटफॉर्म वर उभे आहात, समोरून दोन गाड्य़ा  अगदी इतक्या गच्च भरलेल्या होत्या की तुम्हाला आत शिरायला मिळाले नाही. मग तुमच्या मनात विचार येतो, की जर आत शिरायला मिळालं , तरीही पुरेसे आहे. तुम्हाला तिसऱ्या लोकल मधे आत शिरायला मिळतं. तुम्ही दोन सिटच्या मधे जाउन उभे रहाता. पुढला मनातला विचार जर जागा मिळाली तर? अगदी चौथी सीट जरी मिळाली तरीही हरकत नाही- तुमचं नशीब आज अगदी जोरावर असतं,समोरच्या सिटवरचा माणूस उठून जातो आणि तुम्हाला  जागा मिळते  आणि तुम्ही बसता, आनंद वाटतो तेवढ्यापुरता, पण शेजारचा माणूस साला किती जाड आहे, किती गर्दी होतेय नां?? असे विचार सुरु होतात. म्हणजे इथेही तुम्ही सुखी नसता फक्त तेवढ्यापुरता आनंद असतो. तुमच्या मनात विचार असतो, की जर विंडॊ सिट मिळाली तर?? काय आश्चर्य, पुढल्याच स्टॉप वर तिथला माणूस उठून उभा रहातो, आणि ती सिट  तुम्हाला मिळते. मस्त पैकी हवा खात आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पहात,  तुम्ही प्रवास करत असता, आणि तुमचं लक्ष शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कार कडे जाते तुमच्या मनात विचार येतो, ” सालं, काय हे आयुष्य,रोज धक्के खात प्रवास करायचा- त्या पेक्षा  एखादी मस्त पैकी एसी कार असती तर?” थोडक्यात या मटेरिअलिस्टीक गोष्टी तुम्हाला क्षणभर आनंद अवश्य देतील पण सुख  आणि समाधान??

आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर, अरे यात तर काही विशेष सुख नाही, कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टाहास केला होता? हा असा अनुभव आपल्याला बरेचदा आला असेल.   शिक्षण, पैसा,सुंदर बायको/मैत्रीण,  शरीरयष्टी सलमान खान सारखी या पैकी कशामधे सुख आहे असे तुम्हाला वाटते? विचार करा- वरची कुठलीही एक गोष्ट तुम्हाला सुखी ठेऊ शकेल ?. मानवी स्वभावानुसार या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्या तरच तुम्ही  आनंदात राहू शकाल.. सुखी म्हणत नाही मी ,किंवा समाधानी पण नाही..सुख म्हणजे नेमकं काय?पैसा??

पैसा म्हणजे सुख देईलच असे  वाटत नाही. तसं म्हंटलं तर आज इतक्या मोठ्या इस्टेटीचा मालक असलेला टाटा  खरंच सुखी म्हणता येईल? त्याला पण अपत्य नाही याचं दुःख असेलच- या वयात एकटेपणाचा अभिशाप भोगण्यात कितीही  पैसा असेल तरीही काय सुख?. प्रिंयंवदा बिर्ला यांचं मृत्युपत्र आणि त्यावर झालेला घाणेरडा आरोप प्रत्यारोपाचा खेळ पाहिल्यावर पैशात सुख आहे हे काही पटत नाही.

ज्याला सगळं काही अगदी घरबसल्या आयतं मिळतं तो किती सुखी आहे असं नेहेमीच वाटत असतं आपल्याला नाही का? जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा असलेला संजय दत्त पण नंतर वैफल्याने  ग्रासल्या जाऊन ड्रग्ज  च्या आहारी जातो आणि नंतर टेररिस्ट अ‍ॅक्टीव्हीट्ज मधे ओढला जातो – हे असे का व्हावे? त्याला काय कमी होतं? सगळी मटेरिअलिस्टीक सुखं हात जोडून समोर उभी होती , पैसा, अडका, बापाचं नांव  तरीही तो अशा भानगडीत पडलाच. पैसा, वडिलोपार्जित असला तरी तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही – कारण तो पैसा मिळवण्यासाठी तुम्ही   हातभार लावलेला  नसतो/ प्रयत्न केला नसतो.

एक प्रसिद्ध म्हण आहे, पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही.पैसा मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागले नाही, तर पैसा कमावण्यातले सुख कसे काय अनुभवास येईल? जो पैसा मिळालेला असतो, त्यावर कुठलेही नियंत्रण नसते, त्या साठी काहीच कष्ट केलेले नसते, त्यामुळेच असेल की त्यात काही फारसं सुख वाटत नाही. स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली सेकंडहॅंड स्कुटर चालवतांना   वडलांच्या पैशातून घेतलेल्या नवीन कार पेक्षा नक्कीच जास्त आनंद होइल.

 

सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.  तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल . तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल असं वाटत नाही का? .

टिव्ही वर एक कार्यक्रम बायको नेहेमी पहाते. भांडा सौख्य बरे नावाचा. एकदा त्या कार्यक्रमात  एक सासू मुलाच्या लग्नात २२ वर्षापूर्वी पायघड्या घातल्या नाहीत म्हणून सुनेला बोलतांना दिसली.सगळं लग्न व्यवस्थित केलं, मान पान वगैरे सगळं केलं, फक्त पायघड्या घातल्या नाही म्हणून हे इतक्या वर्षानंतर पण ती सासू मुलाच्या लग्नातले आनंदाचे क्षण लक्षात ठेऊ शकली नाही, तर  तिच्या लक्षात राहिल्या न घातलेल्या पायघड्या! छान झालेला स्वयंपाक, इतरांनी केलेले किती सुंदर आहे हो सून म्हणून केलेले कौतुक, आलेल्या सगळ्या लोकांनी केलेलं सुंदर अरेंजमेंट्सचं कौतुक वगैरे…. सगळं काही त्या सासूबाई विसरल्या होत्या.

लग्ना नंतर पैशाची ओढाताण असल्याने तो बायकोला  तो हनिमूनला नेऊ शकला नाही, नंतर  या प्रसंगामुळे त्यालाही कायम गिल्टी वाटायचं म्हणून नंतर परिस्थिती सुधारल्यावर काही वर्षांनी अगदी नियमित   विमानाने  बायकोला फिरायला न्यायचा. चांगल्या  हॉटेल मधे नेऊन सुटी एंजॉय  अगदी नियमित  करायचा.पण- तरीही तुम्ही मला लग्नानंतर हनिमूनला नेले नव्हते ही गोष्ट मात्र ती कधी विसरू शकत  नाही, आणि येताजाता त्याला टोमणे मारत असते.  ती हे विसरते की जो हनिमून मिस झाला तो त्याचाही हनीमून होता – तिचा एकटीचाच नाही. असो. म्हणून वाटतं की सुख ही एक मानसिक अवस्था आहे.

सहज आठवलं म्हणून लिहीतो, अनील अंबानीच्या घरी काम करणारा नोकर ( स्वयंपाकी) अनील व कुटुंबीयां साठी जे अन्न शिजवतात तेच खात असतो , त्याच अंतालिया मधे रहात असतो, पण तो त्याच्या इतका सुखी असेल का? अर्थात नाही- कारण त्या आयुष्यावर त्याचे नियंत्रण नसते,   – त्याचे आयुष्य हे आश्रिताचे असते. स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचे असलेले नियंत्रण सुख देईल!

आयुष्यात आपण सगळ्यांकडून काही ना काही तरी अपेक्षा करत असतो. ही माझी बायको, तिने असे असे वागले पाहिजे, ही माझी मुलगी तिने असे असे वागले पाहिजे. असे काही ठोकताळॆ आपल्या मनात तयार असतात. आपण स्वतःला रींगमास्टरच्या भूमिकेत ठेवतो आणि सगळ्यांनी कसे वागावे ह्याचे मनातल्या मनात आराखडे बांधत असतो. आपल्या अपेक्षेपेक्षा कोणी वेगळं वागला, की आपली चिडचिड होते. अपेक्षापूर्ती हीच खरे सुख देते, मग ती अगदी लहान गोष्टीतली – जसे  सकाळी बायकोने तो न मागता सॉक्स ची पेअर हातात द्यावी ( कारण नेहेमी एक सारखे दोन सॉक्स तुम्हाला कधीच सापडत नाहीत) अशी  अपेक्षा असली तरीही!

अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की जर तुमचा रिव्ह्यु झाला, आणि तुमची अपेक्षा आहे की मला साधारण विस टक्के पगार वाढ मिळावी, तुम्हाला मिळते १८ टक्के, आणि मग दोन टक्के अपेक्षेपेक्षा कमी, की तुम्हाला सुख मिळणार नाही.

कुठलीही गोष्ट करतांना  आधी जर समस्या काय येतील याचा विचार केला, तर आधी पासूनच त्यावर काय उपाय करायचा हे ठरवता येऊ शकते, जेंव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, तेंव्हा तुम्ही तो आला तर काय करायचं याचा विचार आधीच केलेला असतो, त्यामुळे तुमची अपेक्षा आणि प्राप्ती मधलं अंतर नक्कीच कमी होऊन, नंतर होणारा मानसिक त्रास वाचतो.सेल्फ एस्टीम नावाचा एक प्रकार आहे, की जिला कधीही कोणाच्याही वागण्याने धक्का बसु शकतो. आपण जर सेल्फ एस्टीम चा बाऊ केला नाही तर त्या कारणाने दुःखी होण्याचे काहीच कारण शिल्लक राहू शकत नाही.

जर फळाची चिंता न करता नुसते कर्म करत राहिलो तर? विद्यार्थ्याने फक्त अभ्यास करत राहिला, आणि किती मार्क मिळायचे ते मिळॊत, असं म्हणून त्याने फक्त कर्म केले तर त्याला मिळणारे मार्क्स आणि त्यातून मिळणारा आनंद हा नक्कीच जास्त असेल. इथेच समजा त्याने काही ध्येय डोळ्यापुढे ठेवले आणि त्या ध्येय प्राप्तीपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर त्याला इतकं वर्षभर केलेल्या कर्माचा आनंद उपभोगता येणार नाही – खरं की नाही? म्हणूनच मला बरेचदा गीते मधला कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन हा श्लोक खूप आवडतो.

शेवटी स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवण्याची क्षमता  आपल्या मनात असते. तुमच्या मनाला सुख ओळखता आलं पाहिजे, म्हणजे लक्षात येत नाही?? समजा तुमच्या घरात चोर आला आणि त्याने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या, पण इतर बरंच सोनं जे दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं ते काही नेलं नाही, तेंव्हा गेलेल्या सोन्या बद्दल दुःख करायचे की चोरीला न गेलेल्या सोन्या बद्दल आनंद मानायचा? असे प्रसंग अनेकदा येतात, तुमची अपेक्षा असते ९७ टक्के मार्क मिळायची, पण मिळतात ९४ टक्के.. मग त्याचं सुख मानायचं की दुःख? एखाद्या काटेरी जंगलातून जाणाऱ्या पाउल वाटेने जातांना, ती वाट आहे यात सुख मानायचे की आजूबाजूला किती काटे आहेत याचे दुःख करायचे?? असे अनेक प्रश्न आहेत, की ज्यांची उत्तरं आपणच शोधायची आहेत आणि ठरवायची आहेत.

सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात  ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते नाठाळ सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल- तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे  आणि त्या साठी तुमचे मन खरं तर तुम्ही ट्रेन करायला हवे.  इंग्रजी मधे एक म्हण आहे, ऑपोर्च्युनीटी नॉक्स युवर डोअर, बट यु शूड आयडेंटीफाय अ‍ॅंड ओपन द डोअर”

शरीराचा सगळ्यात जड  आणि हलका अवयव कुठला ? असा  प्रश्न विचारला तर माझ्या मते   उत्तर एकच असू शकते, ते म्हणजे सगळ्यात जड अवयव डोकं, आणि हलका अवयव म्हणजे कान. कुठलीही गोष्ट ऐकली की त्यावर फारसा शहानिशा न करता विश्वास ठेवतो आपण. सुखी रहाण्याचा एक मुळ मंत्र या दोन्ही अवयवांचा व्यवस्थित केलेला वापर- जर हे तुम्ही करू शकलात तर आयुष्यात बऱ्याच गोष्टींमधे सुख- आनंद शोधू शकाल.हा विषय खरं तर खूप मोठा आहे , ह्याची व्याप्ती पण इतकी  मोठी आहे, की ती शब्दात मांडता येणे शक्य नाही-आणि माझी पात्रता पण नाही . पण तरीही हा लेख लिहीण्याचे धारिष्ट्य केले आहे .

रामदास स्वामींचा हा श्लोक लिहितो आणि लेख संपवतो.
” जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना तूच शोधून पाहे”

मानसिक बेड्या

Written by  on April 10, 2014
vaibhav lakshmi

वैभव लक्ष्मी

 

मी नास्तिक नाही, पण जेंव्हा पासून रामकृष्ण परमहंसांचं गॉस्पेल वाचलं तेंव्हा पासून रिच्युअल्स बद्दल चं आकर्षण कमी झालंय हे अगदी खरं. प्रत्येक धार्मिक गोष्टी कडे किंवा कृती कडे उघड्या डोळ्यांनी पहायची सवय लागलेली आहे.  श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या १०० वर्षांच्या वरच्या आयुष्यात  मुस्लिम धर्म दोन वर्षं, ख्रिश्चन धर्म एक ते दीड  वर्षं असे आणि उरलेला सगळा पिरियड  हिंदू या तिन्ही धर्माचं पालन केलं होतं.

माझा या देवा,धर्मावर अभ्यास पण नाही. पण मला जे वाटतं ते लिहिणार आहे आज यावर..कोणाचाही उपमर्द करण्यासाठी हे लिहिलेलं नाही.

आपण जेंव्हा देव म्हणतो तेंव्हा  देव प्रवृत्ती अपेक्षित असतात-माझं चांगलं चिंतणारा/ करणारा तो देव… देव म्हंटलं, की तो माझा सखा, वडील, बंधु सगळा कांही असतो, मग माझं सर्वस्व असलेला असा तो देव माझं वाईट कसं काय करू शकेल? जो चांगलं करतो तो देव आणि जो वाईट करतो तो दानव अशी सोपी व्याख्या केली जाऊ शकते यांची.

आपण सत्यनारायणाची पुजा वगैरे करतो, तेंव्हा पुजा झाल्यानंतर भटजी  बुवा एक कथा सांगतात, की एका माणसाने पुजा केली, आणि त्यामुळे त्याचं खूप भलं झालं, पण नंतर दुसऱ्या वर्षी तो पूजा करायचं  विसरला, आणि त्याचा सत्यानाश झाला.सगळे पैसे गेले, धंदा बुडला आणि तो देशोधडीला लागला, नंतर पुन्हा पुजा केल्यावर त्याचं सुख , पैसा त्याला परत मिळाला..

अशाच आशयाच्या दोन तिन कहाण्या सांगितल्या जातात. या कहाण्या केवळ पुजा करणाऱ्यांचा ब्रेन वॉश करायचा म्हणून वारंवार सांगितल्या जातात. मग होतं काय, की दुसऱ्या वर्षी जर काही वाईट घडलं, की ते आपण पुजा न केल्यामुळे घडलं असं वाट्त आणि.आणि गिल्टी कॉन्शसमुळे तो माणुस पुजा करतोच.. उगिच विषाची परीक्षा कशाला घ्यायची म्ह्णून…

देव जर माझं केवळ त्याची पुजा, किंवा ते व्रत केलं नाही, म्हणून जर मला त्रास देणार असेल/ किंवा मला आयुष्यातुन उठवणार असेल ,  तर तो  देवा कसा?  देवा  पेक्षा मला तो ्पूजेची खंडणी मागणारा “भाई”   वाटेल  . आपण म्हणतो ना.. की  जो चांगलं करतो तो देव, आणि वाईट  प्रवृत्ती असणारा तो दानव.. मग जर एखादी वाईट करणारी शक्ती  असेल  तर  तिला देव कसं काय मानायचं हा प्रश्न नेहेमीच सतावतो मला..

माझं स्पष्ट मत आहे, की ्पूर्वीच्या ब्राह्मण समाजाने, सगळ्या समाजाला घाबरवून ठेवलं होतं , कारण व्रत, वैकल्य लोकं करतील तरच यांचं पोट भरेल. म्ह्णून तुम्ही ह्या सगळ्या कहाण्या तयार केल्या गेल्या असाव्यात.  अर्थात, केवळ पुजा करणे हाच एक त्या काळी ब्राह्मणांचे  उदरनिर्वाहाचं साधन होते. जर लोकांनी पूजाच केली नाही, तर त्या काळी ब्राह्मणांचा उदरनिर्वाह कसा काय झाला असता????

पण आजच्या परिस्थितीमध्ये पण आपण त्याच त्या कथा मनोभावे हात जोडून ऐकत बसतो.. !! केवळ सत्यनारायणाच्या च नाही तर जवळपास सगळ्याच पूजांचा शेवट अशाच प्रकारे कथा सांगून केला जातो.मग घाबरुन का होईना, पण दर वर्षी एकदा तरी पुजा करतात लोकं.

माझा आक्षेप हा पुजा करण्यासाठी नाही.. तर, एखादी पुजा करायची असेल तर  मानसिक शांती करता  देवावर प्रेम आहे म्हणून प्रेमाने केली पाहिजे.. देव माझा सत्यानाश करेल/ मला त्रास देईल  म्हणुन नाही.    मला वाटतं आजच्या युगात इतकी समज आपल्या मधे असायला हरकत नाही.

आता हे का आठवलं मला म्हणताय???? तर ऐका….हल्ली ते एक लक्ष्मी व्रत करण्याचं फॅड आलंय. दर गुरुवारी बायकोला शेजारी पाजारी हळदी कुंकु साठी बोलावणं असतं, आणि नंतर  तिला एक लक्ष्मी व्रताच पुस्तक पण प्रेझेंट दिलं जातं.. आमच्या घरी अशी बरीच लक्ष्मी व्रताची बरीच पुस्तकं जमा झाली आहेत.

परवा, सहज त्या पैकी एक पुस्तक वाचलं, तर त्या मधे पण कथा अशी दिलेली आहे ,दर गुरुवारी पुजा करा, आणि संध्याकाळी सवाष्णींना बोलावून हे पुस्तक भेट द्या- म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होील, आणि “सो ऍंड सो” प्रकाशनाचे ओरीजिनल पुस्तकंच द्या, नाहीतर फळ मिळणार नाही.

इतके शिकले सवरलेले लोकं पण अशा फालतू गोष्टींना बळी पडुन कसलेही शेंडा ना बुडखा असे व्रत करतात हे पाहून मला गम्मत वाटते. व्रत करणाऱ्या बायकांमधे सगळ्या उच्च विद्याविभूषित आहेत, एक तर चक्क डॉक्टरेट झालेली पण आहे. असो….

ही पुस्तकं… इतकी रद्दी घरी जमा होते.. त्या पुस्तकांवर लक्ष्मी , गणपतीचे चित्रं असल्याने  फाडून डस्ट बीन मधे पण  फेकता येत नाहीत. .. काय करणार?? अहो किती रद्दी गोळा करायची??  शेवटी एक गठ्ठा बांधून ठेवलाय. समुद्राचं पाणी दूषित करायला…… !!

आणि हे सगळं कोणी जाणूनबुजूनच पण करित नाही.. तर परंपरेने चालत आलेलं आहे हे.. फक्त ह्या सगळ्या पुजा वगैरें अशा का असाव्या म्हणून कोणाच्या मनात कधी प्रश्न येत नाहीत.ही अशी पुस्तकं वाटून जर कोणी श्रीमंत होणार असेल, तर तो पुस्तकं छापणारा पब्लिशर, प्रकाशक!!

स्वामी श्री रामकृष्ण परमहंस म्हणायचे, या रिच्युअल्स मधे गुंतून पडाल तर भक्ती मार्ग विसराल.. आणि विनाकारण जी गोष्ट अजिबात महत्वाची नाही तिला महत्व देत बसाल..हिंदूंच्या बॆड्या आणि मुस्लिम लोकांच्या बेड्य़ांमधे एक फरक आहे, तो म्हणजे हिंदूंच्या पंडीत लोकांच्या ब्रेन वॉश मुळे कोणी कॊणाचे खून, आत्मघाती हल्ले केले जात नाहीत …या धर्माच्या बेड्यांचा उपयोग  हा पुर्वी पासून समाजाला एकत्रित करण्यासाठी करण्यात आलेला आहे. कितीही  धनदांडगा असो, की बाहुबली असो, तो धर्मासमोर वाकतोच.. आणि हीच एक गोष्ट अशी आहे की जी समाजामधे सेल्फ डिसिप्लिन आणु शकते.थोडा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी जरी असला, तरीही तो क्षम्य आहे असे मला वाटते..