ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स

Written by  on March 15, 2014

पुर्वी बरं होतं, एकदाचं बारावीला चांगले मार्क्स मिळवले की इंजिनिअरिंगची ऍडमिशन पक्की.. पण आता तसं राहिलेलं नाही. आधी एआयट्रिपलई किंवा सिईटी ची कटकट मागे असतेच. या परीक्षांमध्ये चांगले मार्क्स मिळणे जास्त महत्वाचे, १२वी ला अगदी ५० टक्क्यांच्या आसपास असले तरीही पुरे! १२ वी चांगल्या मार्काने पास होऊन पण काही मुलांना विशेष समाधान नसतंच. १२वीत ८९ परसेंट मार्क्स मिळाले तरी पण.. ” अहो बाबा, सिईटी चे मार्क्स जास्त महत्वाचे” हे ऐकावं लागतं. मग या १२ वी ची परीक्षेचे महत्त्वच काय राहिले?

निकाल लागला, की मग पेढे वगैरे वाटण्यात मुलांना अजिबात इंट्रेस्ट नसतो.या सिईटीचं महत्व इतकं वाढलेलं आहे की , “थांबा  हो बाबा, जरा सिईटीचा निकाल लागु द्या, मग पेढे वगैरे वाटा”- मुलांचं म्हणणं असतं.म्हणजे १२वीत मिळवलेल्या चांगल्या मार्कांचा आनंद पण मुलं उपभोगू शकत नाहीत या पॅटर्न मुळे..

होता होता सिईटीच्या निकालाचे वेध पण संपतात, आणि एकदाचा निकाल समजतो. पण अरेच्या.. हे कसं झालं?? मला तर जास्त मार्क्स अपेक्षित होते? इतके कमी कसे? या वर्षी फिजिक्स चा पेपर कठिण होता म्हणून ओव्हरऑल परसेंटेज खाली आलंय असंही ऐकिवात आहे. उगाच काळजी करायचं कारण नाही, म्हणून ऍज अ पॅरंट मुलांना समजावणे सुरु होतं.  …

आकस्मित पणे एक दिवस क्लासेसचा फोन येतो की फ्री कौन्सिलिंग सुरु केलंय म्हणून.. तुम्ही या.. कन्सल्टींग  म्हणजे सिईटीचा  फॉर्म कसा भरायचा, कसे ऑप्शन्स द्यायचे , वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी काही क्लासवाले फुकट मार्गदर्शन क्लासेस घेतात. त्यामधे एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या फॅकल्टीला बोलावले जाते , मार्गदर्शनासाठी ( की त्याच्या क्लासच्या जाहिरातीसाठी?) जे काही असेल ते असेल, पण या लोकांच्या लेक्चर्स चा मुलांवर खूप परिणाम होतो.

आणि मग फॉर्म भरताना, बाबा, नाही हो… त्या सरांनी सांगितलंय.. की असा फॉर्म भरायचा .. सुरु होतं.. या वयात मुलांना आपल्या वडिलांना काही फारसं कळत नाही ह्याची पुरेपुर खात्री असते! त्यामुळे मग, ठीक आहे.. तुला वाटेल तसे ऑप्शन  भर म्हंटलं जातं. मग मुलांच्या इच्छेप्रमाणे ( त्या सरांनी सांगितल्या प्रमाणे) ऑप्शन्स भरल्यावर जेंव्हा पहिल्या लिस्ट मधे नांव लागत नाही तेंव्हा मात्र मुलांना घाम फुटतो आणि मग “बाबा कसं करायचं” ? !

सिईटी च्या साईटवर जाउन फॉर्म भरावा लागतो. त्यात तुम्हाला २० ऑप्शन्स द्यायचे असतात, त्यापैकी जर  तुम्ही दिलेल्या पहिल्या ९ ऑप्शन्स पैकी एखाद्या  कॉलेजमधे तुमचे नांव लागले, तर तुम्हाला तिथे ऍडमिशन ही घ्याविच लागते.१० च्य पुढे तुमचे नांव लागले तर तुम्ही थांबू शकता.. आणि नेक्स्ट कॅप राउंड मधे चान्स घेऊ  शकता.

काही लोकं असंही म्हणतात, की पहिल्या ९ मधे तुम्हाला न मिळणारे कॉलेजेस टाका, ( का?? ते कोणी सांगत नाही, पण हा एक फंडा आहे हल्ली). मग बरेच मुलं गेल्या वर्षीचे कटऑफ मार्क्स बघून न मिळणारे कॉलेजेस शोधून तिथे पहिले नऊ ऑप्शन्स देतात.माझ्या मते ही पहिली मोठी घोड चूक सगळेच जण करतात. .

कारण?????  पहिल्या राउंडच्या शेवटी जेंव्हा शिल्लक जागांची लिस्ट लागते तेंव्हा समजते की अरे.. इतर कॉलेजेस मधे- जिथे आपल्या मार्कांवर आपल्याला हवी ती ब्रॅंच मिळाली असती, त्या कॉलेजेस मधल्या जागा भरल्या आहेत, आणि आपण तिथे तर अप्लायंच केलं नाही! आता मात्र कपाळावर हात मारुन घ्यायची वेळ येते.

आमच्या घरी पण थोड्याफार फरकाने असंच झालं.. मुलीच्या इंजिनिअरिंग च्या ऍडमिशनच्या पहिल्या कॅप राउंड च्या बाबतीत हिच घोडचूक केली. ओव्हर कॉन्फिडन्स मुळे बरेच ऑप्शन्स दिलेच नव्हते.. त्यामुळे जिथे मिळण्यासारखी होती ऍडमिशन, तिथे आम्ही अप्लाइड केलं नव्हतं.. फक्त न मिळणारे कॉलेजेस मधे अप्लाय केलं होते, त्या सरांच्या सांगण्याप्रमाणे.. ( काय लॉजिक आहे काय माहिती या मागचं)

त्यामुळे फर्स्ट कॅप राउंड मधे नंबर न लागल्यामुळे मात्र थोडा भ्रम निरास झाला होता मुलींचा. म्हणून दुसऱ्या कॅप राउंडच्या वेळेस मात्र  व्हेटो वापरुन ऑप्शन फॉर्म मी स्वतः भरला, अगदी माझ्या सद सद विवेक बुद्धीला स्मरून. अजिबात लक्ष दिलं नाही , माझ्या स्वतःच्या ऑप्शन्स नुसार.. त्या सरांनी दिलेल्या गाइडलाइन्स बाजुला ठेउन  🙂  आणि सेकंड लिस्ट मधे घरापासून जवळ -म्हणजे वेस्टर्न  ट्रॅकवर असलेल्या इंजिनिअरिंग  कॉलेजमधे (इनफर्मेशन टेक्नॉलॉजीला) ऍडमिशन मिळाली आणि गंगेत घोडं न्हायलं!!!!!

पहिली कमाई..

Written by  on March 4, 2014

 रोहनचं नुकतंच लग्न झालं होतं. तसं म्हटलं तर नेहा आणि रोहन काही अपरिचित नव्हते, चांगली आधीपासून म्हणजे  लहानपणापासूनच  ओळख होती दोघांची. एकत्र कुटुंबात रोहनचे आई बाबा, आणि नेहा बस्स इतकेच लोकं! त्यामुळे घरात काही फारसं काम पण नसायचं.

लग्नानंतर नेहा घरीच असायची, नोकरी करायचा विचारही कधी डोक्यात येत नव्हता तिच्या. २१वर्ष वय असतांना आणि लग्न झालेलं असतांना नोकरी बद्दल विचार डोक्यात येतील तरी कसे? .”एकदाची मुलगी उजवली की आपली जबाबदारी संपली” या भावनेतून मुलींची लग्नं लवकर करायची पद्धत तर आहेच आपल्याकडे.कॉलेजचं  शिक्षण पूर्ण  झाल्या झाल्याच नेहा साठी मुलं पहाणं सुरु केलं तिच्या वडलांनी.

रोहनची नोकरी मार्केटींग मधली, त्यामुळे  त्याला कामानिमित्त नेहेमीच टूरवर जावं लागायचं. ठरावीक भाग असल्याने फार तर ४-५ दिवसांचा टूर असायचा त्याचा. एकदा रोहन टूरला गेला की नेहाला पण मग काहीतरी करायची खुमखुमी यायची, पोस्ट ग्रॅज्युएशन करावं का? की नोकरी करावी? की एखादा बिझीनेस करावा?? नक्की काय ते कधी समजायचंच नाही. मग जाऊ दे, काही दिवस गेले की नंतर पाहू रोहन काय म्हणतो ते! घेऊ या एमएससी ला  किंवा बिएड ला ऍडमिशन. अशा विचार चक्रातच नेहाचे दिवस निघून जायचे.

शेजारच्या फ्लॅट मधल्या प्रधान काकूंचे कोणीतरी कलकत्त्याला होते, त्यांच्याकडून साड्या मागवून प्रधान काकू कलकत्ता हॅंडलूमच्या साड्या विकायच्या- फक्त संबधातल्या लोकांनाच!कधी कधी वाटायचं की आपणही तसंच काही तरी केलं तर? एकदा रोहन ऑफिसला गेला की मग घरात काय करायचं हा प्रश्न नेहेमीच पडायचा.पण शेवटी एखादं पुस्तक उघडून बसायचं वाचत आणि वेळ काढायचा असे दिवस जात होते.

रोहन टूरला निघाला की तिचे डोळे अगदी पाण्याने भरून यायचे- रोहनचा पाय पण घराबाहेर लवकर पडत नसे. पण काही न  टाळता येण्यासारख्या गोष्टी म्हणजे नोकरी! रोहन घराबाहेर तर पडायचा पण बाहेर पडल्यावर पण नेहाचे तो पाण्याने डबडबलेले डोळे  सारखे त्याच्या नजरेसमोर यायचे. मोबाईल फोन पण नव्हते त्या काळात त्यामुळे  सारखं बोलता यायचं नाही. दिवसातून एकदा कधी तरी फोन वर बोलणे व्हायचे त्यांचे.

लग्नानंतरचा पहिलाच रोहनचा टूर! सारखी बायकोची आठवण तर यायचीच, संध्याकाळी काम झाल्यावर तिथल्या मित्रांसोबत एखाद्या हॉटेल मधे बसून टाइम पास करायचा, हा नेहेमीचा कार्यक्रम पण या वेळी नकोसा वाटत होता.  रोहन बाजारात चक्कर टाकुन येऊ म्हणून बाहेर फिरायला निघाल.

एका दुकानाच्या शोकेस मधे एक सुंदर मुलीचा पुतळा ठेवला होता- मस्त पैकी आकाशी रंगाचा ड्रेस घातलेला. रोहनचे पाय आपोआपच थांबले आणि त्याने ड्रेसचे निरीक्षण केले. क्षणभर विचार करून सरळ दुकानात शिरला आणि ९५० रुपयांचा तो ड्रेस विकत घेतला नेहासाठी. किती मस्त दिसेल नाही नेहा या ड्रेस मधे? टुरवर असूनही हसू आलं रोहनला. घरी पोहोचल्यावर तर त्याला आपण आणलेला ड्रेस कधी तिच्या हातात देतो असे झाले होते.

लग्नानंतरची पहिली वहिली खरेदी! काय वाटत होतं ते शब्दात सांगता येणच अशक्य ! घरी पोहोचल्यावर दारावरची बेल वाजवल्यावर  क्षणातच दार उघडलं गेलं. समोरच्या सोफ्यावर बाबा बसले होते, नेहा कडे पाहिलं आणि बाबांच्या नकळत  तिला इशारा केला की ’ आत  चल’ !त्याच्या हातातली प्रवासी बॅग घेतली आणि रोहन पायातले बुट काढायाल सोफ्यवर बसला. बाबांच्या हातात नेहेमीप्रमाणे ज्ञानेश्वरी गुढार्थ दिपिका हा ग्रंथ होता. त्यांनी पण रोहन कडे पाहिलं, हसले, आणि पुन्हा वाचनात रंगून गेले.

रोहन बेडरुम मधे गेल्यावर त्याने आधी तो ड्रेस बाहेर काढला आणि नेहाच्या हातात दिला. तिने हातात घेतला आणि “खूप खूप मस्त आहे रे.. म्हणून घडी उघडून अंगावर घेऊन पाहिला. मस्त आहे रे.. पण जर याला मस्त पैकी रेशमी काठ असते, आणि तू आणलेला आकाशी  रंग जर थोडा जास्त डार्क असता तरी चाललं असतं!” 😀

रोहन  ने ठरवलं की या पुढे  लक्षात ठेवायचं,  की तिला काठ-पदराचे ड्रेसेस आवडतात ते. आणि ग हो.. अरे  तिच्या सगळ्याच साड्यांना पण तर काठ आणि पदर असतोच की.. अरे हो.. कसं लक्षात आलं नाही आपल्या ? तिची आवड आतापर्यंत समजायला हवी होती ना? मनात खूण बांधली की पुढल्या वेळेस नक्की काठ- पदर असलेली साडी आणायची.

तशी वेळ लवकरच आली. रोहनला कोरब्याला जायचं काम पडलं. कोरबा प्रसिद्ध आहे ते कोळशाच्या खाणींसाठी आणि तिथे तयार होणाऱ्या कोशाच्या साड्यांसाठी. जवळच असलेल्या छूर्री गावात कोशाचं उत्पादन होतं, आणि तुम्ही मागावरची साडी पण पसंत करू शकता. रोहनने कामं आटोपल्यावर एक कोशाची छानसा पर्पल कलर – किंचित गुलाबी आणि पर्पल मिक्स असा असलेली आणि  काठ पदर असलेली साडी पसंत केली.

घरी आल्यावर जेंव्हा नेहाच्या हातात साडी ठेवली तेंव्हा तिचे डोळे चकाकलेले दिसले, आणि रोहनला खूप आनंद झाला. चला, एक तरी बरोबर काम केलं आपण! असं मनात आलं तेवढ्यात नेहाचं लक्षं त्या किमतीच्या लेबलकडे गेलं. अरे काय ???????? ही साडी तू १२००ला घेतलीस? अरे इथे मृगनयनी मधे चक्क १०००ची आहे. मी कालच पाहिली होती, पण आहे बाकी छान बरं कां!! एकीकडे छान आहे म्हणायचं, आणि महाग पडली असंही म्हणायचं! रोहनला काही समजलंच नाही , यावर आपण काय बोलावं ते. 🙂  राग पण आला, अरे आम्ही इतक्या प्रेमाने काहीतरी विकत आणावं आणि त्याची इतकी चीरफाड?? किमतीचं लेबल आपण आधीच का बरं काढून टाकलं नाही?  मनात विचार आला रोहनच्या. अनुभवातूनच शिकतो आपण.

एखादी गोष्ट जर चुकीचीच व्हायची असेल तर तिला कोणीच रोखू शकत नाही. संध्याकाळी ती दोघं  फिरायला निघाले तेंव्हा नेहाने साडी घेतली बरोबर, मॅचिंग ब्लाउज पिस  घ्यायला.  रोहनचं बॅड लक, की  एकाही दुकानात मॅचिंग ब्लाउज पिस मिळत नव्हते त्या रंगाचे. इतका वेगळा रंग होता तो  की त्या रंगाचे काहीच मिळत नव्हते. सहा निरनिराळी दुकानं फिरून झाल्यावरही ब्लाऊज पिस काही  मिळाला नाही.  दुकानदार म्हणत होता की काठाच्या रंगाचे बाउज पिस मिळेल- पण नेहाला ते नको होते. जाऊ दे गं, पुढल्या वेळेसे गेलो कोरब्याला की आणून देईन ..असं म्हणून किंचित हिरमुसलेल्या नेहाला घेऊन त्याने बाईक तिच्या आईच्या घराकडे वळवली- तिचा मुड  तरी बरा होईल म्हणून.

दुसऱ्या दिवशी ऑफिस मधे गेल्यावर रोहनला पुन्हा कोरब्याचंच काम निघालं. दोनच दिवसापूर्वी कोरब्याहून परत आला होता, पण आता टेंडर ची टेक्निकल इव्हॅल्युएशन मिटींग ठरली होती म्हणजे जाणं भाग होतंच. रोहनला या वेळेस कधी नाही तो खूप आनंद झाला टूरवर जावं लागण्याचा- आणि तो पण कोरब्याला. कोरब्याला पोह्चल्यावर रोहनने एकदाचे ज्या दुकानातून साडी घेतली होती, त्याच दुकानात जाऊन  एकदाचं त्याच रंगाचं  ब्लाउज पिस घेतले विकत!

इतकं झाल्यावर सरळ बाहेर पडायचं, पण त्याची नजर एका सुंदर साडीकडे गेली. ही मात्र मस्त पैकी काळ्या रंगाची , बॉर्डर असलेली साडी बघितली आणि त्याने किंमत विचारली. १२०० रुपये फक्त . रोहनला किमतीची काही माहिती नव्हती, पण साडी तर आवडली होतीच , मग ती त्याने काही फारसा विचार न करता घेऊन टाकली. या वेळेस मात्र रोहनने एक शहाणपणा केला, लेबल काढून टाकले, आणि साडी घेतली पॅक करून.

घरी पोहोचल्यावर जेंव्हा नेहाने साडी बघितली, तेंव्हा तिच्या तोंडून काय मस्त आणलीस रे… शब्द निघाले. रोहनला अगदी धन्य धन्य झाल्यासारखे वाटले. अहो आपण आणलेली साडी बायकोला आवडली, आणि तिने काहीच नावं न ठेवता घेतली यातलं सुख तुम्हाला कळणार नाही. कितीला पडली?? तेवढ्यात नेहाचा प्रश्न ऐकु आला. पटकन उत्तर दिलं रोहनने- ८०० रुपये. तिच्या चेहेऱ्यावर अविश्वासाचा भाव दिसला, पण क्षणभरच!  🙂

दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिस मधून घरी परत आला तर नेहा तयार होऊनच बसली होती. रोहनच्या काही लक्षात येत नव्हतं की नक्की कुठे जायचंय का आज ते. नेहा म्हणाली,” चल लवकर तयार हो,  आज मी तुला माझ्या  पहिल्या कमाईची पार्टी देते. ”

पहिली कमाई? कसली कमाई?? रोहन विचार करत बसला होता. तेवढ्यात नेहाने केलेला चहाचा कप हाता घेऊन तो सोफ्यावर बसला. नेहा म्हणाली, ” अरे आज दुपारी शेजारच्या प्रधान काकू आल्या होत्या, त्यांना मी तू आणलेली ती ८०० रुपयेवाली साडी दाखवली, त्यांनी किंमत विचारली तर मी चक्क ११०० सांगितली, आणि त्यावर त्या म्हणाल्या की ती साडी त्यांनाच हवी आहे, त्यांच्या मुलीच्या संक्रांतीसाठी. ” मी विचार केला, तू काय नेहेमीच जात असतोस कोरब्याला, मग देऊन टाकली साडी ११०० मधे . झाला की नाही ३०० रुपयांचा फायदा?  पुन्हा गेलास ना  कोरब्याला की अशा दहा साड्या आणून दे, त्या प्रधान काकूंची ऑर्डर आहे बघ”

रोहन ला काय बोलावं हेच समजत नव्हत. रोहन ने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिले, पण तिच्या चेहेऱ्यावरच्या त्या पहिल्या वहिल्या कमाईचा आनंद मात्र हिरावून घेणे त्याला काही जमले नाही. म्हणाला बरं केलंस.. अभिनंदन.. तुझ्या पहिल्या कमाई बद्दल, चल बाहेरच जाऊ या जेवायला… 🙂 आजची पार्टी तुझ्या कडून!