कोचींग क्लासेस- राजाभाऊंचे!

Written by  on February 16, 2014

इतकी वर्ष लग्नाला झाली, पण तुला अजूनही हे इतकं लहानसं काम करता येत नाही?? अरे हे तर एखादी पाचवीतली मुलगी ( लक्ष द्या मुलगी पण .. इथे पण मुलगा म्हणत नाही बायका कधी-  अशा जेंडर डिस्क्रिएशन चा निषेध व्हायला हवा खरं तर) करू शकेल.. हे असे डायलॉग्ज सगळ्यांनाच कधी ना कधी तर ऐकावेच  लागतात.  पण हे असं किती वर्ष चालणार हो ?? आमचे बाबा बघा, किंवा दादा बघा,  हे करायचे, ते करायचे ,अस्सं करायचे , तस्सं करायचे.. अरे हो.. मान्य आहे, आणि तुझे बाबा , दादा आहेतच ग्रेट!(हे वाक्य म्हणताना मनातल्या मनात कांहीतरी पुटपुटणं होतंच)!! पण म्हणून  आपण काय आयुष्यभर हे असं काहीतरी ऐकत रहायचं का? अरे आम्हालाही काही वाटतं की नाही??

राजाभाऊ टूरवर   गेले होते, आणि  लॅपटॉप वर एक मेल वाचत बसले होते,  तेवढ्यात त्यांना  एकदम बायकोची  आठवण झाली,  आणि  ते पट्कन उठले आणि  टॉयलेट मधे जाऊन फ्लश करून आले. 🙂 ( या वाक्याचा संदर्भ पुढे येईलच)

राजाभाऊंच्या  डोक्यात एक कल्पना आली … ( अरेरे !!!! एवढी चांगली बायको असतांना , ही ’कल्पना’ कशी काय येऊ शकते ?? हे असे पाणचट विचार मनात आले असतील तर ते दूर सारा आणि पुढे वाचा) की सगळ्या    पुरुषांसाठी  म्हणून आपण क्लासेस काढायचे. त्या क्लासेस मधे हे असे नेहेमीचे   विषय असतात , त्यांना सामोरा कसे जायचे हे शिकवायचे. झालं!बसले राजाभाऊ समोर पडलेली वही घेऊन, आणि सुरु केलं खरडणं ! कर्म धर्म संयोगाने, तो कागद आमच्या हाती लागला, आणि तुम्हा सगळ्यांसाठी मी तो खाली जसाच्या तसा कॉपी करतोय.

या वर्षी एलटीसी मधे बायको माहेरी गेल्यावर काय करायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नां? मग ’राजा भाऊंचे’ क्लासेस हेच त्याला एकमेव उत्तर! सुखी संसारी जीवनासाठी- राजाभाऊ क्लासेस ला नांव नोंदवा.क्लासेस मधे पुढील गोष्टी शिकवल्या जातील, आणि १५ दिवसात तुम्हाला एकदम आयडियल नवरा  बनवून सोडू आम्ही. कोर्स हा दोन आठवड्यांचा असेल

कोर्स म्हंटलं, की  सिलॅबस आलाच,  खरं तर हा विषय इतका गहन आहे की त्यावर कमीत कमी दोन महिने  क्लासेस केले तरी कमीच पडतील, पण  तो  सगळा कोर्स एका आठवड्यासाठी कन्डेन्स्ड केलाय. थोडक्यात रुपरेषा खाली दिलेली आहे .  .

१) बर्फाचे ट्रे पाणी न सांडता कसे भरायचे, आणि एकदा भरून झाल्यावर पुन्हा बॅलन्स करत फ्रीझ मधे कसे ठेवायचे या विषयावर  साधक बाधक चर्चा.  राजाभाऊंनी तयार केलेले पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन पण दाखवण्यात येईल.   याचे प्रॅक्टीकल पण करून घेण्यात येईल.

२)  ’सु’ करतांना एका हाताने  टॉयलेट सीट उचलून धरून  इकडे तिकडे जमिनीवर ’सु’ न उडू  देता करणे शक्य आहे का? आणि असेल तर त्याचे  टेक्निक कसे काय आत्मसात कराल? या विषयावर गृप प्रॅक्टीस…. ( या विषयावर पार्टीसिपंट्स ती टॉयलेट सीट काढून का टाकायची नाही – हा मुद्दा उचलू शकतात, त्याचे समर्पक उत्तर तयार ठेवणॆ = राजाभाऊंची तळटीप)

३) धुवायला टाकायचे कपडे टाकण्याची बास्केट आणि जमिनी    मधला फरक. स्लाईड शो सह (फोटो मागवायचे अनिकेत , पंक्या कडून , स्वतःच्याच घरातला आपण बाहेरून आल्यावर कपडे काढून फेकले की बायकोने पुन्हा आवरण्या पूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करून ठेवणे- राजाभाऊंची तळटीप)

४) जेवण झाल्यावर डीशेस सिंक मधे आपोआप जातात का? यावर एक  व्हिडीओ, स्लाईड्स.. आणि मग त्यावर चर्चा.. जेवल्यावर उरलेलं अन्न  आत नेऊन फ्रिज मधे ठेवण्याकरता एक कार्य शाळा.

५) हवी असलेली वस्तू कुठे आणि कशी शोधायची .. ) ’अगं ए…….. माझी कारची चावी कुठे आहे गं”. म्हणून ओरडणे हा उपाय न करता,  ’योग्य ठिकाणी’  कसा काय शोध घ्यायचा, आणि  ते पण सगळं घर विस्कटून न टाकता -यावर  प्रेझेंटेशन.

योग्य ठिकाणी म्हणजे कुठे हा प्रश्न आहेच, तर थोडक्यात, सोफ्या खाली, पुस्तकांच्या खाली, पेपर च्या गठ्ठ्या मधे, काल काढून टाकलेल्या पॅंटच्या खिशात , ऑफिस बॅग मधे , सोफ्यावरच्या उशी च्या मागे, बेडरुम मधे पलंगावर , ड्रेसिंग टेबल वर, डायनिंग टेबलच्या खुर्ची वर, टीव्ही वर ,  अशा योग्य जागी   कशी शोधायची??   चावी टांगून ठेवायचा  बोर्ड  वर ही योग्य जागा नसते-ह्यावर एक व्हिडीओ. पार्टीसिपंट्स ला स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी उद्युक्त करणे . या विषयावर एक चर्चा सत्र.

या चर्चा सत्रा  मधे ’महेंद्र कुलकर्णीला’  बोलवण्यात येईल, एक ’स्पॉइल्ट केस’ म्हणून स्टडी साठी. त्या स्टडी मधे महेंद्र कुलकर्णीला हे काम अजूनही का जमत नाही? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.  यावर एक दोन हजार शब्दांचा निबंध लिहीणे अनिवार्य असेल.

६) हेल्थ टिप्स. प्रत्येकाला चांगली तब्येत असावी असे वाटते. त्या साठी काही सोपे उपाय- जसे,बायको साठी कधी तरी फुलं वगैरे आणल्याने काही नुकसान होत नाही, आणि आपली तब्येत पण छान रहाते. रात्रीच्या जेवणात स्विट डीश म्हणून शिरा मिळण्याचे चान्सेस वाढतात, तुम्ही तुपाची धार जरी  थोडा जास्त वेळ जरी भातावर धरली तरी बायको काही म्हणत नाही..  दहा रुपयांच्या ’गजऱ्यावर’ बायकोला कसे खूश ठेवायचे? याचे ग्राफिक्स, (भुंगा, दिपक शिंदे कडून मागवणॆ –   .  राजाभाऊंची तळटीप)

७)काही पिडीत पुरुष आपले प्रश्न विचारतील, सगळे पार्टीसिपंट्स त्यावर चर्चा करून मार्ग सुचवतील. काही सक्सेस -, ऑडीओ, व्हिडीओ फाइल्स दाखवणे,  हेल्प गृप तयार करणे , आणि या ग्रुपच्या मिटींग दर रविवारी कुठल्यातरी चांगल्या हॉटेलात ठेवणे . मिटींगच्या चेअर मधे राजाभाऊ रहातील, त्यांना हॉटेल च्या बिलात कॉंट्रीब्युट करण्यापासून सूट असेल.( हे सगळं योग्य शब्दात लिहीणे – राजाभाऊंची तळटीप)

८)राजाभाऊ टॉयलेट मधुन बाहेर आले, आणि फ्लश करायचं विसरले, म्हणून काय.. “मी तुमची आई नाही, जा पाणी टाकून या” हे असं ऐकायला लागतं. आता प्रत्येकाचीच आई लहानपणी त्याच्याकडे लक्ष देते, लंगोट बदलते, म्हणून काय असं म्हणायचं असतं की काय??? मग राजाभाऊंचा युक्ती वाद अगं मी फक्त ’सू’ च तर करून आलो.वगैरे वगैरे पुटपुटले.

“बायको आणि आई मधला फरक” –  या विषयावरच्या एक्स्पर्ट चा शोध घेणे आणि गेस्ट फॅकल्टी म्हणून बोलावणे. कोणी वाचक तयार असतील तर कृपया संपर्क साधा.

९)बायको बरोबर शॉपींग ला जातांना आपला तोल कसा ढळू द्यायचा नाही, कसे काय वागायचे, तिने पन्नास साड्या बघून एकही न घेता दुकानातून बाहेर निघाली, तर अशा वेळेस त्या दुकानदाराची नजर चुकवून बायकोच्या मागे  मागे कसे  बाहेर पडायचे , गिल्टी न वाटू देणे ,  वगैरे वगैरे… यावर एक व्हिडीओ फिल्म  (आणि काही ग्राफिक्स अर्थात भुंगा कडून मागवणे)

१०) विस्मृती चा इलाज, बायकोचा, तिच्या आईचा, बाबांचा, भावाचा, वाढदिवस  आणि लग्नाचा वाढदिवस, तसेच तिला तुम्ही पहिल्यांदा बाहेर भेटला होता तो दिवस, तिने तुम्हाला पहिल्यांदा__________________ (रिकामी जागा भरा तुम्हाला वाटेल त्या  ” महत्वाच्या ” शब्दाने) तो दिवस, आणि असे असंख्य  ’मह्त्वाचे’ दिवस कसे काय लक्षात ठेवायचे? त्या साठी मोबाइल रिमाईंडरचा वापर  आणि अजून काही इतर टेक्निक्स यावर एक प्रेझेंटेशन.

११)गॅस सुरु करणे, बंद करणे, चहा करणॆ,  हॉकिन्स कुकरचे झाकण लावणे ( लग्न झाल्यावर पुरुषांना हे काम का शिकू शकत नाहीत?_, त्यातले वरण न सांडता भांडं वाकडं न होऊ देता,चिमट्याने धरून   न सांडता बाहेर काढणे, या आणि अशा अनेक विषयांवर प्रात्यक्षिक- आणि प्रॅक्टीस सेशन

१२) निरनिराळॆ रंग आणि त्यांची नावं . चटणी कलर म्हणजे गूळ-आमसूलाची काळी चटणी ,खोबऱ्याची पांढरी चटणी की  हिरवी चटणी ?? असे मह्त्त्वाची प्रश्न आणि त्यावर चर्चा. कोकाकोला रंग , आमसूली रंग म्हणे कुठला? आमसूलाचा की त्याच्या सोलकढीचा? (प्रात्यक्षिकासाठी चटण्या वगैरे लागतील  त्या करून द्यायला वैदेहीला ( चकली ) सांगायचं का??रजाभाऊंची तळटीप)

१३)मॅचिंग या विषयावर पण एक दिवस भर चर्चा होऊ शकेल काय? आणि जर ठरलं तर काय मटेरीयल लागेल?

१४) बायकोने साडी विकत आणली की – सांगा बरं कितीची असेल ते?? असं म्हणून  तिची किम्मत ओळखणे हा खेळ सगळ्यांनाच खेळावा लागतो. कमी सांगितली तर तिची वाकडी भुवई पहावी लागते, अशी चूक होऊ नये म्हणून निरनिराळ्या साड्यांचे प्रकार आणि त्याचे फोटो पॉवर  पॉइंट प्रेझेंटेशन.

हा सगळा कोर्स पंधरा दिवसात पुर्ण केला जाईल. जर कोणी कोर्स पुर्ण केलाच तर त्याला सर्टीफिकेट पण देण्यात येईल..

तर मंडळी, हे होतं राजाभाऊंचं लिखाण. तुमच्या माहीती साठी इथे पोस्ट करतोय , जर इच्छा असेल तर अवश्य जॉइन करा क्लास. राजाभाऊना एक इ मेल  आला होता, त्यावरून सुचलंय हे.

प्रिटीन मदर्स.

Written by  on February 13, 2014

परवाच्या पेपरला एक बातमी होती. जयपूरला १२ वर्षाची मुलगी प्रसूत होऊन तिला मुलगी झाली. मला वाचल्याबरोबर धक्काच बसला. कांही दिवसांपूर्वी १३ वर्षाचा मुलगा युके मधे बाप झाल्याचे वाचनात आले होते. तिचं लग्नं पण झालेलं होतं साधारण तिच्याच वयाच्या मुलाशी. तिला बिचारीला अगदी  मुल होई पर्यंत आपण  प्रेग्नंट आहोत हे माहिती नव्हतं आणि जेंव्हा डिलिव्हरीसाठी वेळ आली तेंव्हाच लक्षात आलं. धन्य आहे तिच्या आई बापाची!!!ही बातमी वाचतांना स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता. हे कसं शक्य आहे? तिला जर मूल १२व्या वर्षी झालं , म्हणजे तिचे यौन संबंध ११ व्या वर्षीच सुरु झालेत. ज्या वयात तिने बाहुलिशी खेळायचं त्या वयात तिला मुलं झालं. राजस्थानात बाल विवाह अजुनही चालतात. तसेच युपी आणि बिहार मधे हरियाणा, आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातही आहेच!

हा प्रश्न केवळ भारतालाच नाही तर संपुर्ण जगालाच छळतो आहे. जगातल्या पुरुष प्रधान संस्कृतिने अजुन ही ह्या संबंधी कायदे होऊ दिलेले नाही तर बाल विवाहामुळे मात्र अजुन ही प्रिटीन्स किंवा टिन एज मदर्सचं प्रमाण खुप प्रमाणात आहे. अंडरडेव्हलप्ड कंट्रिज मधे बाल विवाह, आणि डेव्हलप्ड कंट्रिज मधे प्रि मॅरिशिअल सेक्स,  फार कमी वयात सुरु होणारे डेटींग, किंवा अपरिपक्व वयात पाहिलेले अश्लिल चित्रपट, इंटरनेटवरचे पोर्न साहित्य इत्यादीचे एक्स्पोझर्स मुळे मुलं फार लहान वयात सेक्स ट्रॅप्स मधे ( समवयस्क किंवा वयाने मोठ्या पार्टनर्स ) बळी पडतात. !इटरनेट वर शोध केला असता , अगदी ४०० वर्ष बिसी पासून अशा प्रकारच्या विवाहाला सामाजिक मान्यता दिल्या गेलेली दिसते.

१८७० च्या सुमारास ,८ते ९ वर्षाच्या मुलिंचे लग्न करण पुरातन समाजात सर्व मान्य होतंत्या आधिच्या काळात ७ वर्षाच्या मुलिचे लग्न करुन देण्यात यायचे.. १८६० मधे इंडीयन पिनल कोड मधे सुधारणा केली गेली आणी १० वर्षाखालिल मुली बरोबर यौन संबंध ठेवणे हे कायद्याने गुन्हा मानले गेले.ब्र्ह्मो समाज आणी आर्य समाज ( दोन्ही कलकत्याचे) यांनी पण हा कायदा व्हावा म्हणुन प्रयत्न केले होते ह्या विषयावर कांही निर्णय घेणे हे तत्कालिन ब्रिटीश सरकारला लवकर शक्य झाले नाही. हिंदु पुरातन धर्म वादी लोकांचा याला खुप विरोध होता. तेंव्हा या विषयावर निर्णय न घेउन ,  ब्रिटीश सरकारने पण वेळखाऊ  धोरण  अंगिकारले .

१८८० मधे एका ११ वर्षाच्या मुलीचा (फुलमणी नांव तिचं) तिच्या नवऱ्याने केलेल्या बलात्काराने झालेला मृत्यु, आणि त्या नंतर जवळपास ५०० च्या वर स्त्री डॉक्टर्सनी तत्कालिन व्हॉइस रॉय ला पाठवलेले पत्र, ज्यात लिहिलं होतं की भारतामधे लग्नासाठी आणि यौन संबंध ठेवण्यासाठी लिगल वय हे १४ ते १६ करावे.  पण याचा काहीच परिणाम झाला नाही. फक्त एका नविन विचाराला चालना मात्र मिळाली.

लवकरच हिंदु इन्फॅंट मॅरेज ऍक्ट च्या  विरोधात  मेरठ मधे एका हिंदु माणसाने एक पिटीशन दाखल केले. शेवटी त्याचा निकाल १९२७ मधे लागून हा ऍक्ट पास करण्यात आला.या ऍक्ट नुसार कुठल्याही मुलीचे १२ वर्षा पुर्वी केलेले लग्न हा गुन्हा ठरवण्यात आले होते. हा कायदा करुन सुध्दा चाईल्ड मॅरेजेस सुरु होतेच.स्वातंत्र्या नंतर  १८ वर्ष कमीत कमी लग्नाचे वय म्हणून कायद्याने मान्य झाले.

चाइल्ड मॅरेजेस बरोबरच इन्फॅंट विडॊज चा प्रश्न होताच , पण त्या प्रश्नाला हात घालण्याचा विचार ब्रिटीश लोकांनी केला नाही.म्हाताऱ्या माणसांनी अगदी लहान मुलींशी लग्न करणे हे हिंदु समाजात चालायचे आणि मग लवकरच त्या मुलीच्या नशिबी आलेलं वैधव्य…! अशा पण बऱ्याच इन्फॅंट विधवा होत्या.

बरं , भारतातलं जाउ द्या, अमेरिकेत कायद्या प्रमाणे एखाद्या १६ वर्षाच्या मुलीला आई वडीलांच्या कन्सेंटने लग्न करणे अलाउड आहे. तसे स्वतःच्या मनाने लग्न करायचे असेल तर १८ वर्ष  पुर्ण व्हावी लागतात. अगदी २००८ पर्यंत फंडामेंटल चर्च ऑफ क्राइस्ट ऑफ लॅटर डेट , मुलगी मुलं बेअर करण्याच्या वयाची झाली की करावे असे म्हणत होते.२००८ मधे वॉरन जेफ ह्या चर्च  लिडरला स्टॅचुटरी रेप ( १४ वर्षाची मुलगी आणि १९ वर्षाचा माणुस )यांचा विवाह अरेंज केला म्हणून कोर्टाने शिक्षा केली.

मला वाटतं केवळ म्हणुनच चर्च ने असे विवाह अरेंज करणे बंद केले असावे. टेक्सास मधल्या वाय एफ झेड रॅंच ची केस इथे लिहित नाही. पण वाचा..१७०० एकरार कम्युनिटी फार्म हाउस आहे वर दिलेल्या चर्च च्या मालकीचे.

आफ्रिका, साउथ एशिया, मुस्लिम कंट्रिज जसे सौदी अरेबिया मधे मुलींचे ऍव्हरेज लग्नाचे वय १५ वर्ष असते. बांगला देशात तर जवळपास ५० ट्क्के विवाह हे मुलगी १५ च्या आत असतांनाच होतात. कांही तर अगदी ७ वर्षांच्या मुलींचे पण लग्नं अजुन ही  होतात. आफ्रिकेत कबिल्यांमधे फार जुने रीतिरिवाज  पाळले जातात जसे कॉस्ट पे करणं वगैरे….

childmarriage_fullइतक्या लहान वयात सेक्स्युअल संबंध ठेवले तर सिर्व्हायकल कॅन्सर, एस टी डी,  होऊ शकतो.केवळ ह्याच कारणासाठी का होईना पण असे विवाह बंद करण्यात यावे असे वाटते. आज आपण २१ व्या शतकात आहोत तरीही अशा जुन्या परंपरांना कवटाळून बसलोय, हीच दुर्दैवाची गोष्ट. भारतामधे एक सिरियल सुरु आहे या विषयावर बालिका बधू .. यावर पण मी आधीच लिहिलंय ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/02/10/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A5%81/)..ह्या सिरियल मधे असेच सगळे ’सिक’ संबंध दाखवलेले आहेत. फक्त अधुन मधुन बाल विवाह हे वाईट आहे म्हणून सांगितले जाते. खरंच काय उद्देश आहे ह्या सिरियल चा हेच कळत नाही. मला तर ती मुलगी अगदी केविलवाणी (पॅथेटीक) वाटते, आणि सिरियल सुरु झाले की सरळ दुसऱ्या खोलीत जाउन बसतो…असे सिरियल्स दाखवून – म्हणायचं समाजात हे होतेच.. आणि अशा गोष्टींना ग्लोरिफाय करणं बंद झालं पाहिजे.

मी ब्लॉग सुरु केला त्याला कारण हे टीव्ही सिरियल.घरची सगळी मंडळी , म्हणजे सौ. आणि मुली ही सिरियल चवीने पहातात, तेंव्हा मला इतर काही उद्योग नसतो, म्हणुन तेंव्हा ब्लॉगवर लिहितो. अशी सिरियल्स ताबडतोब बंद करायला हवी.

बरं लहान गावातल जा्वू द्या. पण मुंबई सारख्या शहरात पण आजही १५ वर्षांच्या मुलींचं लग्न अगदी नेहेमीच होतात स्ल्म्स मधे. जवळपास ५० टक्के लग्नं या वयात केली जातात.२२००० मुलिंचा (२० ते २२ मधल्या )केला असता त्या पैकी ४५ टक्के मुलींचं लग्नं १५ वर्षांच्या आत झालेली दिसली. हे वाचुन तर मला अगदी धक्काच बसला. जर मुंबई मधे असं होऊ शकतं तर  मग लहान गावांत काय परिस्थिती असेल याचा विचार करुनच वाईट वाट्त. अगदी सुशिक्षित लोकंच फक्त लग्नासंबंधीचे कायदे पाळतात असे दिसते. म्हणजे बघा.. इंजिनिअरिंग, किंवा मेडीकल पुर्ण होई पर्यंत २२-२३ वय होतंच.. आणि नंतरच लग्नं केली जातात या क्लास मधल्या लोकांची. प्रॉब्लेम फक्त खालच्या लोकांचा आहे. त्यांच्या मधे अवेअरनेस   आणला गेला पाहिजे.

भारतात एक म्हण आहे.. “म्हातारा नवरा अन कुंकाला आधार”.. एखाद्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू असेल तर समाजाचा तिच्या कडे पहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. बऱ्याच पालकांना मुलींच्या सेफ्टीची काळजी असते. म्हणुन सुध्दा लवकर लग्नं करुन दिली जातात. मुंबईला २८ टक्के लग्नं अंडरएज मुलींची होतात .आता समाजात    सेफ्टी करता जर मुंबई सारख्या शहरात पण लग्नं होत असतील तर मात्र खरंच काळजी करण्यासारखी गोष्ट आहे.

अजुनही जगा मधे स्त्री कडे एक उपभोगाची वस्तु पहाण्याची मानसिकता दिसून येते. मुस्लिम राष्ट्रांमधे तर हा प्रकार अजुन ही लिगली जोर धरुन आहे.. किंबहुना इतर धर्मांपेक्षा  खुप च जास्तं…हा प्रॉब्लेम केवळ भारतातील स्त्रियांचा   नाही तर जगातील स्त्रियांचा आहे.आणि हा एका वेगळ्या लेव्हलला ऍड्रेस केला जायला हवा…

जंगल बुक

Written by  on February 11, 2014

एकदा एका जंगलात एका सिंहाला एक शेळी दिसली. तिचं बिचारीचं लक्षच नव्हतं सिंहाकडे. अगदी सिंह जवळ येऊन पोहोचला, तरी पण ती आपलं गवत खात होती. सिंह अगदी खूप जवळ आला, इतक्या जवळ की जर त्याने पंजा मारला  असता तर  शेळी  मरणार.

शेळी  घाबरली आणि तिने सिंहाला विचारले, ’तू मला खाणार आहेस का?’

सिंहाने मोठ्या प्रेमाने शेळीच्या डोक्यावर थोपटले आणि म्हणाला, “अगं वेडी की काय तू? मी तूला कशाला खाऊ? ते समोर बघ डोंगराच्या पायथ्याशी खूप छान हिरवं हिरवं गवत आहे बघ – ते दाखवायला थांबलोय मी इथे”

शेळी आश्चर्यचकित झाली, आणि तिने डोंगराकडे पाहिलं आणि मनातल्या  विचार करत बसली की आज  सिंहाने आपल्यावर हल्ला का नाही केला म्हणून.. थोड्या वेळाने  काहीतरी लक्षात आल्या सारखं स्वतःशीच पुटपुटली,   इलेक्शन आलेलं दिसतंय जवळ’
************************

थोडे पुढे गेल्यावर एका तळ्यामधे एक मगर होती. ती पण काठावर येऊन बसली होती, तिने त्या झाडावरच्या माकडाला खाली बोलावले  ’ अरे ए माकडा, जरा खालती येतोस? मी बघ तुझ्यासाठी तलावातल्या शिंगाड्याचा गोड शिरा करून आणलाय बघ”

त्या गोड जांभळाच्या झाडावरच्या माकडाला आश्चर्य वाटले, त्याला आठवले, की पुर्वी  हीच मगर आपलं काळीज खायला तयार झाली होती- पण आज काय झालं तिला?? च्यायला, चक्क ती रहात असलेल्या तलावतल्या शिंगाड्यांचा शिरा? फुकट मिळाले म्हणून  नुसते शिंगाडे दिले असते तर समजलं असतं, पण चक्क शिरा करुन आणला  त्या मगराने? काय झालं असेल बरं?

आयला……..  इलेक्शन आलंय.. टाळक्यात प्रकाश पडला त्या माकडाच्या.

*************************

जंगलातली एक जंगली बोक्या आला आणि समोरच्या सगळ्या उंदरांना त्याने  आपली नखे आत घेऊन पंजा दाखवला  म्हणाली, मी माझी नखं कापलेली आहेत. तुम्हाला आता घाबरायचं काही कारण नाही , तुम्हाला सगळं काही मिळेल.

तुमच्या बिळात तुम्हाला फ्री इलेक्ट्रीसिटी कनेक्शन , फ्री पाणी मिळेल. ज्या कोणा उंदराला रेशन कार्ड मिळाले नसेल त्याने माझ्या कडे या- मी तुम्हाला काढून देईन रेशन कार्ड. एकदा रेशन कार्ड मिळालं की ज्या बिळात तुम्ही रहाता त्याचे खोटे डोमेसिल सर्टीफिकेट करुन घ्या , की मग पहा हे बिळ पण तुमच्या नावावर करून देईन मी.

उंदीर हुरळून गेले आणि आता ते रहात असलेले बिळ आपल्याच मालकीचे झाल्याप्रमाणे नाचत सुटले.तेवढ्यात  एक म्हातारा उंदीर म्हणाला, हुरळून जाऊ नका, हा बोक्या पुन्हा तुम्हाला पुढली पाच वर्ष दिसणार नाही -इलेक्शन आलेले दिसतंय!!!

*******************************

ह्याच बोक्याने उंदरांना सांगितले की तुम्हाला मी  मांजरांपासून संरक्षण देईन, आणि मांजरांना सांगितलं की तुम्हाला उंदरांची कमतरता भासू देणार नाही  .हरणांना सांगितलं की मी तुमच्या साठी आरक्षण करीन, तुम्हाला  स्पेशल जागा देईन , की जिथे तुम्हाला कुठल्याच    वाघापासून किंवा लांडग्यांपासून संरक्ष ण असेल , आणि वाघ आणि लांडग्यांना सांगितले की तुम्हाला हरणाच्या मऊ मऊ मांसाची रोज मेजवानी मिळेल अशी व्यवस्था करीन. हरणांचे प्रॉडक्शन वाढवायला म्हणून एक वेगळा फार्म बनवीन.  इलेक्शनची तयारी जोरात सुरु झालेली दिसत होती.

जंगलामधे काही कुत्रे  मोठमोठ्याने  भुंकत होते, एकमेकांचे लचके तोडत होते.  एकमेकांच्या अंगावर तंगडी वर करत होते. सगळी जनावरं मजा पहात होती – पण त्यांना मात्र त्याचं काहीच सोयर  ्सुतुक नव्हत. ए्क उंदीर म्हणाला की   हे सगळे  बहुतेक असंतुष्ट नेते  आहेत , तिकिट    मिळालं नाही म्हणून ओरडताहेत, लचके तोडताहेत एकमेकांचे. इलेक्शनची तयारी जोरात सुरु झालेली  दिसत होती जंगलात.

***********************
माणसांच्या जंगलात मराठी चित्रपट दाखवला जात नाही म्हणे  मल्टिप्लेक्स मधे -म्हणून एक इशु सुरु झालाय सध्या. कोणी म्हणतो मराठी सिनेमे मल्टीप्लेक्स मधे दाखवलेच पाहिजे- आणि तो पण प्राईम टाईम मधे, तर कोणी म्हणतोय की त्याचे तिकिट दर कमी केले पाहिजे.

आता खरं सांगायचं म्हणजे मराठी सिनेमाची क्वॉलिटी पहाता ( काही सन्माननीय अपवाद वगळून) कुठलाही सिनेमा दोनशे रुपये तिकिट देऊन पहाण्याच्या लायकीचा नसतो , आणि ही गोष्ट बरेच लोकं मान्य करतील.

मी वाट पहातोय त्या  घड्याळवाल्याच्या उदघोषणेची – जो   मराठी चित्रपटांना दिल्याजाणाऱ्या  १५ लाखाच्या अनूदानासोबतच , एंटरटेनमेंट टॅक्स काढून टाका म्हणूनही साकडं घालेल अर्थमंत्र्यांना. खरं तर अर्थ मंत्री  जेंव्हा आयपीएल ला तिन वर्ष सलग करमणूक करापासून मुक्ती देतात, तशीच इथे पण देऊ शकतात-’ त्या’ दोघांच्या पेक्षा आम्ही मराठीचे तारणहार आहोत  हे दाखवायला म्हणून.

अरे एंटरटेनेमेंटच नाही, तर एंटरटेनमेंट टॅक्स कसला घेतात मराठी सिनेमावर?
*************************
’त्यांना’ कोणीतरी सांगितलं, की रिक्षावाले, टॅक्सी वाले कमी अंतरावर जाण्यासाठी तयार नसतात!!!
ते म्हणाले-अरे काय सांगता? कधी पासून?

आता सगळेच नेते जर मोठ्या गाड्यातून  फिरणार,  तेंव्हा त्यांना  रिक्षावाले कमी अंतरावर येत नाहीत ही गोष्ट माहिती असेल अशी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. पण जेंव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट गेली, आणि सामान्य लोकांना होणारा त्रास समजला,  तेंव्हा मात्र  लगेच ऍक्शन घेतली गेली.

केवळ एक आवाज केला आणि कार्यकर्त्यांनी  चार दोन रिक्षावाल्यांना मारून आपली सामाजिक बांधिलकी  दाखवून दिली. हे पण दाखवून दिलं की आम्ही सामान्य माणसा सोबतच आहोत- आणि सामान्य माणसाला झालेला त्रास आम्ही सहन करणार नाही. सामान्यांच्या बाजूनेच आम्ही उभे राहू.  हे आंदोलन फक्त पेपर मधे बातमी येण्या पुरते किंवा फक्त टीव्ही वर कव्हरेज येण्या पुरतेच सुरु होते का? असाही संशय येतोय लोकांना- कारण दोनच दिवसात हे आंदोलन इतिहास जमा झाले.

या आंदोलनामुळे काही फरक पडला ? मला तरी वाटत नाही की लोकांसाठी म्हणून काही फरक पडला असेल म्हणून. फक्त राजकीय मायलेज मात्र बरं मिळालं.

परवाच एका रिक्षावाल्याला त्याने आपल्या रीक्षावर लावलेला  एका राजकीय पक्षाचा झेंडा काढतांना पाहिलं. सत्तेच्या खेळात कुणालाच आपलं म्हणू नये..

*************************
जंगलात पुन्हा थोडी वर्दळ सुरु झालेली आहे. सगळे जण खडबडून जागे झाल्याप्रमाणे एकदम  जागे झाले आहेत.

आता व्हावंच लागेल ना.. लोकं विचारतील, तुम्हाला निवडून दिलं, तेंव्हा तुम्ही काय केलं म्हणून??

इन्फोसिस-रेसिशनचे बळी

Written by  on February 10, 2014

इंजिनिअरिंग केलं, नंतर इन्फी, विप्रो,महिंद्रा इत्यादी कंपन्या   कॅंपस मधे  आल्या आणि मुलांना सिलेक्ट केलं.मुलं  अगदी आनंदी असतात.. अगदी जमिनीपासून दोन बोटं वर  हवेत असतात,    स्वर्गच अगदी दोन बोटं वर उरलेला असतो…आता, नोकरी करायची. कसंही करुन वर्षा दोन वर्षात ऑन साईट काम मिळवायचं. नवीन घर , कार ..बुक करायचं.. अशी कित्येक स्वप्नं असतात..म्हणजे थोडं काम केलं आणि व्यवस्थित मॅनेज केलं तर ऑन साइट नक्कीच!! ( ऑन साइट आका अमेरिका किंवा इतर देशातील पोस्टींग.. आयटी मधे नसलेल्या  लोकांसाठी क्लिअर करतोय)

आता ज्या कंपनीत सिलेक्शन झालं ती कंपनी असते इन्फोसिस..  ट्रेनिंग साठी म्हैसुरला जायचं आहे म्हणून सांगितलं जातं. ट्रेनिंग पिरियड मधे रहाण्यासाठी उत्तम फ्लॅट वगैरे दिले  जाईल म्हणून सांगितलं जातं.. आणि ते खरं असतं.. मुलं अगदी खुशी मधे म्हैसुरला जातात.  ..

इथे मुलांना ट्रेनिंग पिरियड मधे रहाण्यासाठी देण्यात येणाऱ्या रुमचा व्हिडीओ आहे हा..

कॉलेज पुर्ण झालंय, आता अभ्यासापासून सुट्टी, असे मनातल्या मनात मांडे खात असतात….पण खरंच असं असतं कां? इतका सोपा असतो का आय टी कंपनीतला जॉब?

इन्फोसिस चा म्हैसुरमधला सेट अप म्हणजे एका पंचतारांकित फॅसिलिटिझ  आहेत सगळ्या..इतक्या फॅसिलिटीज दिल्या असतात पण सोबतच ट्रेनिंग मधे पण अभ्यास हा असतोच. तिथे पण सारख्या टेस्ट्स असतातच. इथे टेस्ट मधे फेल झालं तर कॉलेज प्रमाणे दुसरा चान्स नसतो. म्हणून कॉलेज पेक्षा पण जास्त टेन्शन असतं इथे..इतक्या फॅसिलिटीज आहेत, पण त्या एंजॉय करायला वेळ नसतो. इथे नापास होणॆ याचा अर्थ,  बेंच वरची जागा एका नवीन मुला साठी रिकामी करुन देणॆ !

आजच्या पेपर मधे वाचलं की पुन्हा एका २३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली.अभिजित मुखर्जी नांव त्याचं. कारण???? इन्फोसिस तर्फे ट्रेनिंग पिरियड मधे घेण्यात येणाऱ्या ५ पैकी ३ टेस्ट मधे तो फेल झाला होता. त्या मुळे त्याला  टेन्शन आले होते. त्याच्या सुसाइड नोट मधे तो असं म्हणतो की वर्क प्रेशर कोप अप न करु शकल्या मुळे मी आत्महत्या करित आहे.वर्क प्रेशर हे असतंच.. तुम्हाला जर कंपनी इतका पैसा देते, तेंव्हा तुमच्या कडून आउट पुट एक्स्पेक्ट करणं चूकीचे नाही.तेंव्हा, बॉस- यु लव्ह इट ऑर हेट इट, ईट्स द रिऍलिटी ऑफ लाइफ…

त्या मुलाची मानसिक स्थिती कशी असेल? वडिलांनी इतका पैसा खर्च करुन इंजिनिअर बनवलं पण आपण , त्यांच्या अपेक्षेला पुर्ण उतरू शकलो नाही. आता पुन्हा डीपेंडन्सी वडिलांवर. दुसरी नोकरी मिळेल की नाही ह्याची शंकाच ! अशा परिस्थिती मधे समोपदेशन आवश्यक आहे.

त्याच्या आई वडिलांना काय वाटत असेल? २३-२४ वर्षं अगदी तळहातावरच्या फोडासारखा जपलेला मुलगा , जेंव्हा एकदम असं कांही करतो, तेंव्हा त्याच्यावर पहिले तर विश्वास ठेवणेच कठिण जाते. आणि मग आपल्या अप ब्रिंगिंग मधे काय चूक झाली.. किंवा काय कमतरता राहिली ते  आठवत उरलेले दिवस कंठायचे…! आई वडिलांनी पण मुलाला, तु कांही काळजी करू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ते पुन्हा पुन्हा ठासून सांगितलं तर मात्र मुलांना मानसिक बळ लाभून ते ह्या जगाला फेस करु शकतील.

असं वाटतं की, खरं कारण म्हणजे नुकतेच पिक स्लिप्ड २१०० एम्प्लॉइज आणि त्यामुळे परफॉर्मन्स मुळे निर्माण झालेले प्रेशर असावे. जर एखादा मुलगा ३  टेस्ट मधे फेल झाला, आणि जर त्याला आपला जॉब जाईल अशी भीती वाटायला लागली, तर अशा परिस्थिती मधे पुन्हा दुसरा जॉब मिळणार की नाही ?? आणि मिळाला तरीही पुन्हा कुठल्या कंपनीत? ही सगळी टेन्शन्स फेस करणं सोपं नाही. मला वाटतं की आजकालच्या ह्या “जेट स्पिड करियर बुस्टींग” बरोबर कोप अप करतांना फेल्युअर इफ ऍट ऑल एनी शुड बी टेकन इझिली हे पहिले शिकले पाहिजे.

मला असं वाटतं आत्महत्या या सायकॉलॉजिकल डिसऑर्डर मुळेच होतात. ह्या ट्रेनिंग मधे सायको ऍनॅलिसिस पण इन्क्लुड केले तर अशा घटनांना आळा बसेल.

ही काही पहिलीच आत्महत्या नाही, जानेवारीमधे पहिली आत्महत्या केली होती एका झारखंडच्या विद्यार्थ्याने. वरच्या यू ट्युब मधे तुम्ही रुम बघितली आता हा इन्फोसिस ट्रेनिंग सेंटरचा व्हिडीओ बघा..

स्टूडंट्स ह्या रुथलेस वर्ल्ड ला फेस करण्यासाठी तयार नसतात. त्यांना सगळंच सिक्युअर्ड वातावरण वाटत असतं कॉलेज प्रमाणे. पण जेंव्हा खरं आयुष्य दिसून येते, तेंव्हा तिला Accept  करणं फारच अवघड होतं..

आजपर्यंत आयटी मधे मॅन पॉवरची कमतरता होती, त्या मुळे बहुतेक कुणालाच काढले जात नव्हते, अगदी सुमार पर्फॉर्मन्स असला तरीही कुठलं तरी काम करुन घेता येइल म्हणून ठेऊन घ्यायचे,इतकी डिमांड होती की अगदी आर्ट्स किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट्स पण घेतले होते इन्फी ने, की त्यांना ट्रेन करुन काही तरी स्पेसिफिक काम करुन घेता येइल म्हणून..आता तसं नाही.. पण आता मात्र हजारोंच्या संख्येत मुलं अव्हेलेबल आहेत. तेंव्हा परफॉर्मन्स इज द की…. आयदर पर्फॉर्म ऑर गेट पिंक स्लिप्ड!!हे सगळं पर्फॉर्मन्स चं प्रेशर अगदी ट्रेनिंग पिरियड पासून जे सुरु होतं ते नोकरी कन्फर्म झाल्यावर पण रहातं.. अगदी शेवटपर्यंत.. !!

आता ही आत्महत्या इन्फोसिस मधली आहे, पण इतर कंपन्यातही ( आय टी आणी नॉन आयटी) हा ट्रेंड वाढीला लागण्याची शक्यता वाटते. कारण आपल्या इथे भारतामधे हायर ऍंड फायर पॉलिसी अजुन ऍक्सेप्ट झालेली नाही.. लोकांना असं वाटतं की , फक्त कंपनी सोडायचा अधिकार आम्हाला आहे, आम्ही दुसरा जॉब मिळाला, थोडा जास्त सीटीसी चा की नोकरी सोडून जाउ. पण कंपनी पण काढू शकते हे विसरुन जातात मुलं….. !

ब्रिटानिया…

Written by  on February 8, 2014

बेलार्ड पिअर

पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्सी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाऊ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म , जात कधीच आडवी येत नाही. पार्सी मित्राच्या  घरी गेलो.. तर केम छो डिक्रा?? म्हणून त्याची आई किंवा आजी विचारणारच, आणि   अरे टुम किदरको गया था? बहुत दिनसे नै दिखा.. म्हणत त्याची आई पेस्ट्रीचा पिस समोर करणारच.

पार्सी लोक इथे भारतामधे पर्शिया मधून आले, आणि इथलेच होऊन गेले.इथे आल्यावर सर्वार्थाने इथल्या भाषा,संस्कृती, समाजाला आपलंसं केलं.

मुख्यत्वे करुन बिझिनेस करणारी कम्युनिटी ही- आणि  तो पण अगदी सचोटीने. जमशेटजी टाटांपासुन तर रतन टाटांच्या पर्यंत किंवा आज जे एन गोदरेज पर्यंत कुठलाही बिझिनेस हाऊस घेतले तरी त्यांच्या सचोटीची ग्वाही दिली जाऊ शकते. हेच कारण आहे, की अजूनही तूप आणायचं , किंवा चांगला पेढा हवा असेल तर पार्सी डेअरी कडेच पाय वळतात ( काही लोकं म्हणतील की   पणशीकरांकडे दादरला.. पण .. .)मी तर  कुठल्याही हॉटेलमधे गेलो आणि  कुल्फी  ऑर्डर करायची म्हंट्लं की आधी वेटरला विचारतो की कुल्फी पार्सी डेअरीची आहे की नाही ते??

रतन टाटांनी सिंगुरचा प्लांट त्यांच्या काही इंजिनिअर्सला मारहाण केल्यावर होणाऱ्या नूकसानाचा विचार न करता एका क्षणात निर्णय घेउन बंद केला .मला तरी वाटत नाही की दुसरा कुठला इंडस्ट्रिऍलिस्ट आपल्या इम्प्लॉइज ला मारहाण केली म्हणून अशी स्टेप घेईल  . हेच कारण आहे की आजही टाटा, किंवा गोदरेज किंवा इतर कुठल्याही पार्सी बिझिनेसमनचं नांव रिस्पेक्टफुली घेतलं जातं. पहिला स्टिल प्लांट सुरु करुन टाटांनी जी देशाच्या प्रगतीचा पाया घातला त्याला कोणीही विसरु शकणार नाही.

मुंबई मधे टाऊन साईडला गेलं की बऱ्याच मोठ्या जुन्या इमारतींच्या वर पंख पसरलेला पक्षी  (फिनिक्स आहे का तो?)- म्हणजे पार्सी लोकांची खूण दिसतो. त्याला काय म्हणतात ते माहिती नाही.टाऊन साईडला मला सगळ्यात जास्त आवडणारा भाग म्हणजे बेलार्ड पिअर. अतिशय सुंदर हेरिटेज बिल्डींग असलेला भाग आहे हा.मला हा भाग  आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे- अगदी बरोबर ओळखलं- आहे इथे एक माझी फेवरेट खाण्याची जागा – ती म्हणजे  इथे असलेले ब्रिटानिया हॉटेल.

परवाचीच गोष्ट , शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडीया मधली मिटींग आटोपली, दुपारचा दीड वाजून गेला होता. सोबत शब्बिर भाई होते, त्यांना  म्हट्लं की लंच साठी ब्रिटानिया लाच जाउ या. तसा ब्रिटानिया हा चॉइस , कुठलाच नॉन व्हेज खवय्या   नाका्रू शकत नाही.कार पार्क केली आणि हॉटेल मधे गेलो तर नेहेमी प्रमाणेच तिथे भरपूर क्यु होता. यु विल हॅव टु वेट.. टेम मी योर नेम, काउंटरवरचा तो बावाजी म्हणाला. नांव सांगून बाहेर गप्पा मारत उभे राहिलो आम्ही.  चांगलं १५- २० मिनिटांच्या नंतर आमचा नंबर लागला.

आत जाउन बसलो. टिपीकल इराणी लुक असलेलं हॉटेल. एज ओल्ड टिपीकल इराणी फर्निचर, हिरव्या चौकटीचा टेबल क्लॉथ!!आम्ही इथे क्रेडीट कार्ड घेत नाही ही पाटी मोठ्या दिमाखात झळकत होती  की वेडाउन दाखवत होती???

इथे पाण्याचा ग्लास आणून ठेवत नाही समोर. इथे आल्यावर इथला जिंजर सोडा प्यायलाच हवा. पण आज  मात्र पहिल्यांदा   जिंजर सोडा, आइस्क्रीम सोडा की रास्बेरी सोडा? काय मागवावं  ह्या मधे कन्फ्युजन झालं. थोडा  विचार करुन शेवटी आइस्क्रीम सोडा फायनल केलं.

ऑर्डर घ्यायला एक ८० -८५वर्ष वयाचे  बावाजी समोर उभे ( आता बावाजी म्हंटलं की एकेरी उल्लेखच केला जातो, पण त्यांचं वय इतकं होतं की एकेरी उल्लेख करायची इच्छाच होत नाही)  स्वच्छ गोरा रंग, बदामी रंगाची पॅंट, पांढरा शर्ट आणि काळा बेल्ट. हॉटेलचा मालक स्वतः ऑर्डर घ्यायला समोर उभा . मेनु कार्ड समोर ठेवलं.जास्त विचार करण्याची गरजच नव्हतीच- चिकन बेरी पुलाव आणि फिश पात्रा मागवला. म्हणाला, “फिश विल टेक टाइम..” म्हंटलं ओके. आइस्क्रिम सोड्याचे घोट घेत चिकन पुलावची वाट पहात बसलो .

चिकन बेरी पुलाव

सहज समोर लक्ष गेलं. एका चौघांच्या टेबलवर चार फिरंगी बसले होते. अगदी चवीने इंडीयन फुड एंजॉय करीत . त्यांचं बहुतेक झालं होतं. वेटरने बिल आणून ठेवलं आणि ह्या लोकांनी त्या वेटरला चक्क ३०० रुपये टिप ठेवली. म्हंटलं वेटरची दिवाळी आज!!!

तेवढ्यात आमची पण चिकन पुलावची प्लेट समोर आणून ठेवली गेली. पुलावा वार तळलेला ब्राउन रंगाचा कांदा आणि  ते लाल चुटूक रंगाची बेरी ची फळं लक्ष वेधून घेत होती. किसमिस पेक्षा पण एक चतुर्थांश आकाराचे हे फळ, चिकन पूलावला तळलेल्या कांद्या सोबत  एक अप्रतिम टेस्ट देते. (ही बेरी इराणहुन इम्पोर्ट केलेली असते बरं का.. म्हणुनच स्पेशालिटी आहे या हॉटेलची) समोरच्या प्लेटमधे पार्सी मसाल्यामधे घोळलेले चिकनचे तुकडे     बासमती तांदुळाने झाकल्या गेले होते. अजिबात रहावलं नाही आणि  चमचा खुपसला, थोडा भात बाजुला केला आणि त्या चिकनच्या   तुकड्याशी हाता तोंडाची लढाई सुरु केली- पहिला घास घेतल्याबरोबर , तोंडातून वाह!! उदगार निघाला  आणि मग पुर्ण प्लेट संपेपर्यंत आम्ही दोघंही  अजिबात एकमेकांशी बोललो नाही.

पुलाव संपत आला वेटरने त्याने बॉंबे डक ची प्लेट समोर आणून ठेवली. आता हा फिश इतका सॉफ्ट असतो की तोंडात घातल्या बरोबर विरघळतो. हा फिश बनवण्याची पार्सी पध्दत कशी असते ते माहिती नाही, पण अप्रतिम टेस्ट असते ह्या  फिश पात्राची.मला वाटतं बहुतेक बॉंबे डक वाफवलेला असावा , कुठल्यातरी पानात गुंडाळून..म्हणून पात्रा फिश!!

कार्मेल कस्टर्ड

सर्व्हिस खूपच फास्ट आहे – अर्थात असायलाच हवी कारण बाहेर वेटींग खुप जास्त  होतं. जशी चिकन ची प्लेट संपत आली वेटर येउन विचारुन गेला.और कुछ?? आता ब्रिटानियामधे आल्यावर कार्मेल कस्टर्ड न खाता परत जाणं म्हणजे सिद्धिविनायकाच्या मंदीरात जाउन दर्शन न घेता परत येणं.

कार्मेल कस्टर्डची प्लेट समोर आणून ठेवल्याबरोबर तुटून पडलो , आणि दोनच मिनिटात संपवली. अजुन एक हवी.. असं वाटत होतं, पण वाढलेलं  वजन आठवलं की ऑर्डर देण्यासाठी उघडलेलं तोंड आपोआप बंद झालं. ( नको त्या गोष्टी का बरं आठवतात??)  बिल देऊन उठलो, आणि संथ पणे जेवणाची नशा एंजॉय करीत ऑफिस कडे निघालो.  टाउन साईडला आलात की  ह्या   हॉटेलला भेट देण्यासाठी थोडा वेळ जरुर ठेवा…