रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज

Written by  on December 24, 2013
raniki vav, patan, step well

वाव चा आतून काढलेला फोटो. आम्हाला आत जाऊ दिले गेले नाही , म्हणून बिग बी ब्लॉग वरून घेतलाय हा फोटो.

नजरेसमोर ते दृष्य़ उभे रहात होते. साधारण पणे  इस. ११२२ ते ११६० चा काळ. सरस्वती नदी शेजारी असलेले एक पाटण नावाचे गांव- गुजराथची मुख्य व्यापारी पेठ. पावसाचे थैमान –  सगळीकडे नुसतं पाणी पाणी झाल्याने प्रत्येक माणूस स्वतःचे  आणि आपल्या कुटुंबियांचे प्राण वाचवण्यासाठी हाती लागेल ते सामान घेऊन त्या जागेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असेल….. हे सगळं होत असतांना ती रानीकी वाव मात्र नदीच्या गाळाने भरल्या जात होती. ४० वर्षा्चे कष्ट हे एका क्षणात मातीमोल  झाले होते.

पण जरी या सगळ्या लोकांच्या दृष्टीने हा सरस्वती नदीला आलेला पूर आपत्ती असला, तरीही आर्किओलॉजीस्टच्या दृष्टीने   महत्त्वाचा ठरला आहे हा पूर. इतकी विपत्ती आली, घरं वाहून गेले असतील.. प्राण गेले असतील, पण या पुरामुळे एकच चांगली गोष्ट झाली, ती म्हणजे ’रानी की वाव’ नदीच्या गाळाने पूर्णपणे भरून गेली.

नंतर कदाचित पूर ओसरल्यावर तिथे रहाणारे लोकं परत येऊन त्यांनी आपलं पुनःप्रस्थापन केले असेल, पण गाळाने भरलेली ही विहीर मात्र त्यांनी स्वच्छ केली नाही. कदाचित १०० फुट गाळ काढायचा कंटाळा केला गेला असेल , किंवा या वाव च्या जवळपास रहाणाऱ्यांचे स्थलांतर झाले असेल – आणि ही वाव मात्र काळाच्या उदरात गडप झाली असावी.

पूर्ण वळसा घालून आल्यावर पायऱ्या उतरण्यासाठी पहिल्या पायरीवर उभा राहून घेतलेला फोटो

पुढे अनेक शतकं या ’वाव’ चं अस्तित्व पण लोकांच्या लक्षात राहिलं  नाही. या काळात त्या वाव मधल्या सगळ्या कोरीव काम केलेल्या मुर्त्या  वाव मधे भरलेल्या गाळाखाली -जमिनीखाली दफन राहिल्या मुळे सुरक्षित राहिल्या. मग मोगलांचे आक्रमण, मुस्लीम राजांचे हिंदूंच्या देवतांचे विटंबन करणे ह्या सगळ्या प्रकारातून या मुर्त्या आपोआपच बचावलेल्या गेल्या , आणि ही ११ व्या शतकातली एक सुंदर सांस्कृतिक  (धरोहर ) – वारसा आपल्या पर्यंत  एकदम सुस्थितीत पोहोचला. इष्टापत्ती किंवा ’ब्लेसिंग इन डिसगाइज”, म्हणजे हेच का ते?

या विहिरीचे उत्खननाचे काम पुन्हा स्वातंत्र्योत्तर काळात म्हणजे १९५८ साली सुरु केले, आणि मग जेंव्हा एका पाठोपाठ सुंदर कलाकृती बाहेर निघू लागल्या तेंव्हा या  ’वाव’ ला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून घोषित केले गेले.युनेस्कोने मात्र याला वर्ल्ड हेरिटेज चा दर्जा हा १९९८ साली दिला.

राणी उदयमतीने आपल्या पतीच्या  -राजा भीम देव च्या ,स्मरणार्थ  या “वावचे” निर्माण कार्य १०२२ मधे   १०६० पर्यंतच्या काळात केले, म्हणून याला रानीका वाव म्हणून ओळखले जाते. साधारण पणे ४० वर्ष  या विहिरीचे बांधकाम चालले.    पूर्वीच्या काळी दिवंगत पती किंवा पत्नीच्या स्मृती प्रीत्यर्थ समाजोपयोगी  किंवा धार्मिक वास्तू बनवण्याची  परंपरा असावी, म्हणूनच या अशा ’वाव’चे निर्माण कार्य हाती घेतले असावे. पांथस्थांना  पाणी मिळावे आणि आरामही करता यावा हा उद्देश होता या मागचा.गुजरातचा हा भाग म्हणजे तसाही पाण्याची कमतरताच. वॉटर टेबल पण बराच खाली असल्याने अगदी भर उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवू नये ,  हा एक उद्देश असावा. ’वाव’ च्या भिंतीवर वेगवेगळ्या पुराणकाळातल्या मुर्त्यांचे कोरीव काम करून  सजवण्याचे कारण  धार्मिक उद्देश असावा .

तुम्ही ’वाव’ च्या प्रांगणात पोहोचलात की बऱ्याच अंतरापर्यंत  मस्त पैकी हिरवेगार लॉन दिसते. लॉन मधून चालत जाण्यासाठी एक टाइल्स लावून रस्ता बनवलेला आहे. त्या रस्त्यावरून थोडं चालत गेल्यावर तुम्ही त्या ’वाव’ च्या जवळ पोहोचता, आणि ती वाव दिसल्यावर इतकं सुंदर बांधकाम पाहून   साहजिकच तोंडातून ” वॉव” निघाल्याशिवाय रहात नाही.

तुम्ही वाव जवळ पोहोचताच तिचा २२० फुट लांब, आणि ६८ फुट रुंद असलेला आकार पाहिल्याबरोबर तिच्या भव्यतेची कल्पना येते, ही विहीर १०० फुट  खोल आहे. आणि त्या काळात केवळ मॅन्युअल लेबर ने  हे काम करायला ४० वर्ष लागले यात काहीच आश्चर्य नाही.

जमिनीच्या लेव्हल पासून सुरु होणाऱ्या पायऱ्या तुम्हाला खाली वाव मधे खालच्या लेव्हल पर्यंत म्हणजे थेट पाण्यापर्यंत  घेऊन जातात. या पायऱ्यांवरून उतरतांना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे एका रांगेत सरळ पायऱ्या नाहीत, तर सूर्य मंदिराच्या कुंडातल्या पायऱ्यां प्रमाणे दोन तीन सरळ पायऱ्या , आणि मग आडव्या पायऱ्या अशी रचना आहे. म्हणजे पायऱ्या उतरताना तुमचे तोंड एकदा खालच्या दिशेने असते, तर दोन पायऱ्या उतरल्यावर आडव्या पायऱ्या असल्याने तुम्ही वाव च्या भिंती कडे पहाता.

पायऱ्या  अशा करण्याचे कारण पूर्वीच्या  सूर्य मंदिराच्या पोस्ट मधे लिहायचे राहून गेले, ते आता इथे लिहितोय. हे केवळ दिसायला चांगलं दिसतं म्हणून नाही, तर लोकांच्या सुरक्षिततेचा विचार यात केलेला आहे. जर उतरतांना एखाद्याचा पाय वगैरे घसरला तर एकदम विहिरीच्या तळाशी जाऊन पोहोचू नये हे कारण असावे.

पूर्वी अडाळजची वाव  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/02/13/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%82-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2/)पाहिलेली असल्याने मनातल्या मनात त्या वाव शी तुलना केली जात होती. पण खरं सांगायचं, तर ते योग्य ठरणार नाही. दोन्ही वाव ची शिल्पकारीता पूर्णपणे वेगवेगळी आहे, या वाव मधे दशावताराचे पूण चित्रण केलेले आहे. ८०० च्या वर कोरीव कलाकृती , मुर्त्या वापरून ही वाव आतून सजवलेली आहे, तर अडाळज च्या वाव मधे मात्र कोरीव कामावर जास्त भर दिलेला आहे.

रानीका वाव मधे  द्शावताराचे पुर्ण चित्रण केलेले आहे. यातले वराहावतार आणि वामनावताराचे शिल्प अतिशय सुबक आणि रेखीव आहे. त्याच सोबत नाग कन्या, देवकन्या, श्रृंगार करणाऱी स्त्री, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी नाराय़ण, ब्रह्मा, विष्णू, गणेश अशा अनेक नितांत सुंदर प्रतीमा कोरलेल्या आहेत.

काय वाटेल ते, स्टेप वेल, रानी की वाव,

ट्रॅडिशनल गुजराथी डीझाइन.. आजही गुजरात मधे साड्य़ांवर हेच डिझाइन थोडा फार बदल करून वापरले जाते.

स्त्री वाचकांना, गुजराती साड्य़ांच्या डिझाइनचा एक खास पॅटर्न माहिती असेलच. तोच पॅटर्न इथे दगडांमधील कोरलेला दिसतो. म्हणजे आजही जे डिझाईन ट्रॅडीशनल गुजराती साड्यांमधे वापरले जाते ते दहा शतकं जुने आहे. इथे त्याचे फोटो देतोय.

या विषयावर काही जास्त लिहिण्यासारखं नाहीच, जे काही आहे, ते पहाण्यासारखं आहे ! तरीही हा एक लहानसा प्रयत्न!