चैत्रांगण.

Written by  on October 16, 2013

गुढीआज गुढी पाडवा. आज पासुन वसंत ऋतु चे आगमन होणार.  कालनिर्णय बघुन सकाळी ९ वाजता गुढीची पूजा केली आणि गुढी उभारली. पंचांगाची पण देवासमोर ठेऊन पूजा केली. आज पासुन नवीन वर्ष सुरु झाले. तेंव्हा नवीन वर्षाचे स्वागत तर करायलाच हवे.

खरं तर आम्ही ज्या भागात रहातो तो कॉस्मोपॉलिटीयन भाग, पण बरीच मराठी लोकांची घरं पण आहेत. असे असुनही समोरच्या दोन तिन बिल्डींग मधे एकही गुढी उभारलेली दिसली नाही, पण चित्रातल्या गुढ्या मात्र ढिगाने आल्या व्हॉट्स ऍप वर -शुभेच्छांच्या स्वरुपात. फक्त हिंदुत्वाचा गप्पा मारणं आणि धर्म वगैरे चे भांडवल करून फेसबुक वर शाब्दिक मारामाऱ्या करण्याइतकेच लोकांचे धर्माबद्दल चे प्रेम असावे. आपल्या परंपरांना , रुढींना काही अर्थ नाही असे म्हणून सगळ्या परंपरा मोडीत काढण्याची हल्ली फॅशनच निघालेली आहे. नेमका हाच फरक आहे इतर धर्मात आणि हिंदू धर्म  पालन करणाऱ्या लोकांमध्ये.इतर धर्मीय लोकं आपल्या चालत आलेल्या परंपरांचे पालन करतात, कुठलेही प्रश्न न विचारता, आणि हेच कारण असावे की आज तो धर्म इतका फोफावला आहे. अगदी युरोप पासुन तर अमेरिकेपर्यंत!  प्रत्येक  कर्मा मागे  काय आहे हे माहिती नसल्याने  पुर्वापार चालत आलेली कृती मुर्खपणाची वाटू लागते. हे असेच सुरु राहिले तर   आपल्या परंपरा / रुढी  आपल्या पिढीसोबतच संपतिल.भारतात अशी परिस्थिती असतांना मात्र परदेशी असणारे भारतीय भारतातुन जातांना पोर्टेबल छोटेखानी गुढी घेऊन जातात आणि आवर्जुन गुढीपाडव्याला पूजा करतात. असो.

आजचा दिवस शुभ दिवस म्हणुनही मानला जातो. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त. कुठलेही नवीन काम सुरु करण्यासाठी उत्तम दिवस समजातात पाडव्याला.
चैत्रांगण( चित्र नेट वरून घेतलेले)
आजपासून चैत्र महिना सुरु होतो.चैत्र प्रतिपदा म्हणजे आज प्रभु श्री रामचंद्राचा वनवास संपला , आणि ते आयोध्येला परत आले. त्यांचे स्वागत करायचे,  आगमनाचा आनंदोत्सव साजरा करायचा म्हणून गुढ्या उभारल्या गेल्या. सीतामाई पण सोबतच परत आली, तिने पण १४ वर्ष वनवास भोगला होताच, तिचे पण स्वागत करायचे होतेच. पारंपारिक स्वागत म्हणजे गुढ्या तोरणे उभारणे, परिसर स्वच्छ करून , अंगण शेणाने सारवुन रांगोळ्या काढणे .

ह्याच चैत्र महिन्यात चैत्र गौरीचे  आपल्या घरी येणे होते.  माहेरवाशिणीचे स्वागत करायचेम्हणून पण  चैत्रांगण – रांगोळी काढण्य़ाची परंपरा आहे. ( हल्ली ह्या चैत्रांगणचा साचा पण मिळतो )सकाळी सुर्योदयापूर्वी शेणाच्या पाण्याने  सारवलेल्या अंगणात  त्यावर चैत्रांगणाची रांगोळी काढ्ण्याची पद्धत होती, पण हल्लीच्या फ्लॅट संस्कॄती मुळे दाराबाहेर रांगोळी काढली तरीही चालते.  ह्या रांगोळी काढण्यामागचा   नेमका अर्थ काय? हा प्रश्न नक्कीच मनात येतो.

या चैत्रांगणाच्या रांगोळी मधे ५१ शुभ चिन्हे आहेत. प्रत्येक चिन्ह काढण्यामागे काहीतरी खास कारण आहेच, जे अला पण माहिती नाही.पण सगळी शुभ चिन्हे आहेत म्हणुन काढली जातात एवढे कारण पुरेसे असावे.

सुरुवातीलाच, सगळ्या जगाचे रहाटगाडगे, ज्यांच्या उदया आणि अस्ता मुळे चालते, ते सूर्य, आणि चंद्र आहेत.
शिवपार्वती पण आराध्य , म्हणुन त्यांचेही चित्र आहे.  पार्वती माहेरी येणार, मग तिचे तर चित्र हवेच. गणपती आईला नेण्यासाठी तुमच्या घरी येणार, म्हणुन त्याचे चित्र आणि विद्येची देवता सरस्वतीची रांगोळी चित्र पण काढलेले असते.
यशाचे प्रतीक म्हणजे ध्वज. रथावर लावला जायचा, आणि ध्वज पडला की युद्ध हारले ! ध्वजाचे महत्व, त्या काळी जितके होते तितकेच आजही आहेच. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गुढी, माहेरवाशीण घरी येणार तो आनंद तर दर्शवायलाच हवा, म्हणुन गुढी! शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्य लेणी म्हणजेच हळदी कुंकवाचा करंडा, फणी, आरसा, ह्या सगळ्या गोष्टी काही लोकांच्या मते सीता येणार वनवासातुन तर तिच्या स्वागतासाठी ! सनी-चौघडा, मोरपिस, बासरी ह्यांची चित्रे म्हणजे श्रीराम विष्णू अवतार, म्हणुन काढलेली.ब्रह्मकमळ, ज्ञान कमळ, हे ब्रह्माची सॄष्टीकर्त्याचे आभार मानायला, आणि  विष्णूचा अवतार म्हणुन कासव
तुळशी वृंदावन, गाय वासरू हे कामधेनू चे प्रतीक, तर  ऐश्वर्याचे प्रतीक म्हणुन हत्ती अंबारी सहीत.शिवाचा गळा थंड ठेवणारा  नाग, आणि श्रीराम म्हणजे विष्णुअवतारच, त्याचे वाहन म्हणुन  गरुड काढले जातात. पूर्ण फळ म्हणुन आंबे,  केळी, सवाष्णीची ओटी म्हणजे खण- नारळ, शिवलिंग, पणती,कलश – ज्याच्या मुखात विष्णू कंठात रुद्र असतो तो, आणि फर्टीलिटी प्रतीक म्हणजे  पाळणा ही चित्रं रांगोळीने काढली जातात.

वर जे काही लिहिले आहे, ते माझ्या आजी ने सांगितले होते म्हणुन माहिती आहे, त्याचे पुरावे मागाल तर माझ्याकडे नाहीत. वडिलधाऱ्यांनी काही सांगितले, तर त्यावर विश्वास ठेवण्याचे वय म्हणजे लहानपण होतं ते.

इथे आज चैत्र  प्रतिपदेच्या निमित्याने चैत्रांगणाचे चित्र देतोय, जरी कॊणी काढले नाही, तरी माहिती तरी व्हावे एवढीच अपेक्षा.