जर तुम्हाला तुमचं वय माहीत नसेल, तर तुम्ही किती वर्षाचे असाल??

Written by  on September 3, 2013


हे इतकं मोठं आगगाडीच्या सारखं लांबच लांब शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं असेल नाही -किती साधा प्रश्न?  पण उत्तर   इतकं साधं सोपं आहे का?? आपलं नेहेमीचं वागणं हे आपल्या वयाला धरून असतं का? याचं उत्तर मिळालं की ह्या प्रश्नाचं उत्तर पण मिळेल. परवाच सलील  ^(http://rangmarathiche.com/goto/http://netbhet.com/)ने  एक मेसेज पाठवला, त्या मधे हे वाक्य होतं, खूप आवडलं म्हणून त्यावर हे पोस्ट!

लग्नानंतर आजही जेंव्हा एखादी आजी लग्नातला शालू (५०- ५५ वर्षापूर्वीचा) काढून बसते, आणि त्यावरून हात फिरवते, तेंव्हा तिच्या डोळ्य़ातले भाव पाहिले की जाणवते, ते ७५ च्या स्त्रीच्या डोळ्यातले नाही तर  एखाद्या विशीतल्या मुली सारखे दिसतात. खरं की नाही?   म्हणजेच वयाच्या ७५ व्या वर्षी पण ती आजी  जेंव्हा त्या शालू वरून पुन्हा एकदा हात फिरवते तेंव्हा ते  “विशीतल्या” त्या काही “स्वप्नील  क्षणांना”   पुन्हा  एकदा जगायचा प्रयत्न करत असते.

एखादी मुलगी १४-१५ वर्षाची झाली की बाहूलीशी खेळणं  स्वतःला खेळणं आवडत असले तरीही लोकं काय म्हणतील म्हणून सोडून देते. पण   आपल्या सगळ्या बाहूल्या, खेळ भांडी, आणि इतर वस्तू  सांभाळून ठेवते. नंतर एखाद्या दिवशी वयाच्या तिशीला पोहोचल्यावर जेंव्हा ती खेळणी आपल्या ३-४ वर्षाच्या मुलीसाठी   काढते  ,तेंव्हा ती मुलीच्या स्वरूपात स्वतःचं लहानपण    पुन्हा एकदा जगायचा प्रयत्न करते . लहानपणी ती स्वतः त्या खेळण्याशी जशी खेळायची तशी खेळायला शिकवते मुलीला.

मला हे तर अजूनही न सुटलेलं कोडं आहे, की प्रत्येक आईला  किंवा वडीलांना आपल्या लहानपणीच्या खेळण्यांशी आपल्या मुलांनी खेळावं असं का वाटत असतं?? मानवी स्वभाव, बहुतेक   आपल्या खेळण्यांशी खेळताना बघून पुन्हा एकदा आपलं लहानपण एंजॉय करत असेल ती!

मी पण स्वतः जेंव्हा रस्त्यावरच्या पाणीपुरीवाल्या समोर उभा राहुन आपल्याला कोणी पहात नाही याची खात्री करून घेऊन पाणी पुरी खातो, तेंव्हा मी पण १५-१६ वर्षाचा  असतो. फरक इतकाच, की लहान असतांना ’पैसे कुठून आणले ?’म्हणून कोणी ओळखणार भेटलं तर विचारेल ही काळजी असायची, आज कोणी ’असा कसा कुठेही खातोस?’ म्हणून विचारेल ही काळजी असते. स्वच्छता वगैरे सगळ्या गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून पाणीपुरी खातो तेंव्हा मी नक्कीच १४-१५ चा असतो.

उन्हाळा आलाय, बायको कैरी च्या फोडी करून ठेवते, आणि लोणचं घालायची तयारी करते, तेंव्हा हळूच एक कैरीची फोड उचलून दाताखाली चावयची इच्छा होते,  आणि ती फोड जेंव्हा मी खातो , तेंव्हा ७-८ वर्षाचा असतो, पण दातांना कळ लागली की ताबडतोब खऱ्या शारिरीक वयाची जाणीव होते. 🙂

कधी नागपूरला गेलो की आई कडे अजूनही गव्हाच्या कुर्डया जेंव्हा वाळत घालायला ठेवल्या असतात तेंव्हा ती किंचित ओलसर कुर्डइ नुसती खातो तेंव्हा , किंवा पापडाची लाटी नुसतीच खातो तेंव्हा मात्र मी पुन्हा १०-१२ वर्षाचा होऊन आपल्या लहानपणात रमलेला असतो. आई जेंव्हा, ” अरे आता दोन पोरींचा बाप  झालास, आता तरी  हात धुऊन खा, म्हणते, तेंव्हा एकदम आजच्या वयाच्या ब्रॅकेट मधे पोहोचतो.

कधी तुम्ही  फिरायला निघाला आहात, एखादी खूप सुंदर मुलगी दिसते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा पहावस वाटतं, तेंव्हा तुम्ही  वयाच्या विशी -पंचविशीतले  असता. पण त्या मुलीच्या ठिकाणी आपल्या मुलीचा चेहेरा दिसू लागला की लगेच आपलं   वय आठवतं.

याच्या विशी – पंचविशीत  असतांना एखादी सुंदर मुलगी दिसली तर तिच्याकडे पहावं वाटणं साहजिक असतं, काही गोष्टी ठरावीक वयातच शोभून दिसतात याची जाणीव आपल्या सबकॉन्शस माईंडला पण असते. आणि तीच गोष्ट  जर प्रौढ वयात केलं तर ती एक विकृती समजली जाईल याची एक पुर्ण जाणीव असते मनाला,आणि म्हणूनच तुमचं मन तुम्हाला  योग्य वेळी तुमच्या योग्य त्या वयाच्या ब्रॅकेट मधे बसवतं.

जर तुम्हाला तुमचं वय किती आहे हे माहीत नसेल , तर तुम्हाला  स्वतःलाच जाणीव होईल की आपण किती वेगवेगळ्या ’वयाच्या ब्रॅकेट्स ’ मधून दररोज जात असतो. एखादा मुलगा विटी दांडू खेळतांना दिसला , की त्याच्या हातून एक टोला मारायला दांडू घेतो, किंवा एखादा मुलगा गच्चीवर पतंग उडवत असेल तर त्याला जेंव्हा अरे डाव्या बाजूला कन्नी बांध म्हणून सांगतो तेंव्हा नकळतच ’त्याच्या वयाच्या’ आसपासच्या वयात आपण जाऊन पोहोचतो.

बायको स्वयंपाक करत असतांना, तिचं लक्ष नाही असं पाहून एखादं भजं  जेवायला बसण्यापूर्वी (तिच्या , अरे असं करू नकोस, पुन्हा जेवायला बसला की व्यवस्थित जेवणार नाहीस, आणि मग पुन्हा दुपारी काहीतरी कर म्हणून मागे लागशील ह्या अशा किंवा तसंच काही तरी बोलण्याकडे दुर्लक्ष करून  हळूच खातो, तेंव्हा एक व्रात्य मुलगा माझ्यातला जागा झालेला असतो, आणि तेंव्हा मी १३-१७वर्षाचा असतो.   माझ्यातल्या त्या व्रात्य मुलाला  खूप आनंद होतो असं काही करायला.

दुकाना मधे गेल्यावर गरज नसतांना बऱ्याच गोष्टी विकत घेतो तेंव्हा पण पुन्हा मी ’लहानच’ झालेला असतो. चिक्की, चिवडा, चकली, बाकरवडी   अशा अनेक वस्तू मी   घेतो ,  नंतर बायको काउंटर वर गेल्यावर बिल बनवतांना त्यातल्या अर्ध्या( खास नजरेने माझ्याकडे बघत )  वस्तू कमी करते, तेंव्हा मी पुन्हा ’मोठा’ होतो!

डायटींग सुरु आहे, म्हणून बायकोने गोड खाऊ नको म्हंटल्यावर पुन्हा तिच्या नकळत गोड खातांना मी पुन्हा लहान झालेला असतो. दिवाळीच्या वेळेस घरी  आकाशकंदील बनवतांना, एखाद्या तलावा शेजारी उभा असताना समोर हातातला दगड पाण्यावर ३-४टप्पे घेऊन जाईल असे   नेहेमीच  फेकतांना,  मी पुन्हा वयाच्या १५-१७ या वयात असतो. मला वाटतं , की मोठं झाल्यावर  वयाचा हा पिरियड खूप जास्त लक्षात रहातो आपल्या.

समुद्रावर फिरायला गेलो, आणि एखादा लहान मुलगा किल्ला वगैरे बनवतांना दिसला, की त्याच्याबरोबर बसून जेंव्हा मी पण किल्ला बनवतो, तेंव्हा किंवा  शेजाऱ्याची दीड वर्षाची लहान मुलगी बायको  घरी घेऊन येते, आणि तिला कडेवर घेऊन फिरतांना  तिच्या जावळांचा, जॉन्सन बेबी पावडर चा सम्मिश्र वास जेंव्हा येतो तेंव्हा  मी पुन्हा आपल्या तिशी मधे पोहोचतो. 🙂 आणि   आपल्या मुलींचं  हरवलेलं लहानपण पुन्हा आठवत असतो.

बायकोने आजपर्यंत हज्जार वेळा सांगून झालंय, की बाहेर गेल्यावर तरी कमीत कमी हाताने भात खाऊ नकोस म्हणून. पण मी मात्र चमच्याने भात खाणं कधीच एंजॉय करू शकत नाही. उन उन वरण भात कालवताना  हात किंचित पोळले की मला खूप आवडतं, आणि  मी पुन्हा लहानपणात पोहोचतो,   पण बरेचदा  हॉटेल मधे वगैरे गेल्यावर सभोवतालच्या लोकांची जाणीव  होत नाही, आणि नकळत हातानेच भात खाणं सुरु करतो. पण नंतर लक्षात आलं, की पुन्हा सरळ चमचा उचलून खाण सुरु करतो .:(

आपलं आयुष्य हे असंच असतं. जितकं आयुष्य आपण जगलो आहोत, त्याच्या आठवणी   मनात कुठेतरी सुप्त स्वरूपात द्डलेल्या असतात, आणि आपण आपल्या रोजच्या जीवनात “त्याच आठवणी ” पुन्हा पुन्हा जगण्याचा प्रयत्न करतो. हे करत असतांनाच  “आजच्या दिवसाची” पण ’एक नवीन आठ्वण’ तयार होतंच असते, पुन्हा काही वर्षानंतर जगायला..

खरं वय योग्य त्या वेळी आठवलं नाही तर काय होईल आपल्या आयुष्याचं ह्याची कल्पनाच करवत नाही. आजचं  आयुष्य आपण जगतो  केवळ काही आठवणी तयार करायला, ते उद्या कधी तरी पुन्हा जगायला म्हणून. आजचं आयुष्य आजचं म्हणून न जगणं   हा म्हणजे मानवी स्वभाव!