सखी…

Written by  on August 28, 2013

सखी…

देवाने योजलेला  आणि दैवाने मिळालेला सखा कोण?? प्रश्न खूप कठीण वाटतोय का?? उत्तर अगदी सोपं आहे. पण बऱ्याच लोकांच्या मनात राधा- कृष्ण म्हणजे कृष्णाची सखी राधा,  किंवा त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूःश्च सखा त्वमेव… हे आठवून प्रश्नाचं उत्तर म्हणजे ’देव’ असावं का?? असंही वाटलं असे,पण तसे नाही..

ह्या प्रश्नाचं उत्तर  पुरुषांसाठी आहे ’पत्नी’ आणि स्त्री साठी आहे ’पती’. खरं म्हणजे हा प्रश्न एक यक्ष प्रश्न आहे.. यक्षाने धर्मराजाला विचारलेला.  आणि या प्रश्नाचे धर्मराजाने दिलेले उत्तर आहे ’सखी’ !!

’सखी’  किती सुंदर शब्द आहे नाही का?? सुरुवातीच्या काळात म्हणजे लग्न होई पर्यंत  या शब्दाचा एकच अर्थ माहीत असतो, तो म्हणजे ’मैत्रीण’- किंवा सखा म्हणजे मित्र!  कुठल्यातरी एका सिनेमात अमिताभ बच्चनने पण हाच शब्द वापरला होता कुठला सिनेमा ते आठवत नाही. तेंव्हा पासूनच हा शब्द मनामधे घर करून बसला होता.

वैदीक पद्धतीने लग्न करताना, लग्नाच्या वेळेस पण सप्तपदी चे सातवे पाऊल टाकताना ’सखा सप्तपदी भव’  असा मंत्र म्हटला जातो. याचा अर्थ,  वर वधूला म्हणतो की आपण सात पावलं चाललो, आता  हे सातवे पाऊल -तू माझी ’सखी’ झालीस. इथे समान हक्क दिलेले आहेत स्त्रीला पण . समान म्हणण्यापेक्षा इथे थोडे जास्तच अधिकार दिलेले आहेत. तू घरावर सत्ता गाजवणारी साम्राज्ञी हो अशा अर्थाचा मंत्र आहे वैदीक विवाह पद्धती मधे.

काल परवाच वाचण्यात आलाय एक श्लोक
’अर्ध भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्टतमः सखा
भार्या मुल त्रिवर्गस्य  भार्या मूल तरिष्यतः
यत्र नार्यस्तू पूज्यत्न्ते रमन्ते तत्र देवताः !

ज्या घरात स्त्रीला मान आहे  त्याच घरात देवांचे वास्तव्य असते. ज्या घरामधे स्त्रीचे अश्रू जमिनीवर पडतात तिथे लक्ष्मी वास करत नाही, अशा अर्थाचा एक श्लोक आलाय .म्हणजे स्त्रियांना हिंदू संस्कृती मधे जितका मान दिला गेलाय तितका दूसरी कडे दिला गेलेला नाही. ’पती पत्नीचे’ नाते हे म्हणूनच (कॉम्प्लीमेंटींग इच अदर) एकमेकांना पूरक असेच असायला हवे. भारतीय संस्कृती मधे पुर्वी पासूनच स्त्रियांचे आणि पुरुषांचे काम वाटून दिलेले आहे. घराबाहेरची कामं पुरुष करेल तर घरातली कामं आणि मुलांचं संगोपन ही स्त्री ची जबाबदारी.

आजच्या काळात जरी हे शब्दशः शक्य नसतं कारण स्त्री पण घराबाहेर पडलेली आहे आणि पुरुषाच्या बरोबरीने  नोकरी करून पैसा कमावते. हे जरी खरं असलं, तरीही पूर्वापार चालत आलेली घरची कामं पण एकट्या स्त्रीलाच करावी लागतात- घराचे घरपण टिकवून ठेवण्यासाठी. तसं म्हंटलं तर , पुरुषही हल्ली घरातल्या कामामध्ये थोडी मदत करतातच… पण…..

पण ती सगळी वरवरची कामं असतात. स्त्री घरामध्ये काय काय कामं करते हे लक्षात फक्त जेंव्हा ती आजारी पडते तेंव्हाच येते. सकाळी उठल्यावर पांघरूणाच्या घड्या करणॆ असो , किंवा समोरच्या सोफ्यावर पडलेली नवऱ्याची ऑफिसची बॅग, डायनिंग टेबलवरची मुलांची अभ्यासाची पुस्तकं, समोरच्या शू रॅक वरचे व्यवस्थित लावून ठेवलेले बुट, जास्तीच्या  दुधाचे लावलेले विरजण, उरलेलं सगळं फ्रीज मधे ठेवणे.. अशी असंख्य कामं आहेत जी तुमच्या नकळत बिनबोभाट होत असतात.  पण जेंव्हा घरची स्त्री  आजारी पडते तेंव्हा घराची रयाच पार बदलून जाते आणि घरामधे किती कामं असू शकतात याची जाणीव होते- केवळ  इतकेच नाही, तर एक वेगळं औदासीन्य पण साठून रहातं घरात. कुठल्याही परीस्थितीत तिने लवकर बरं व्हावं आणि घराकडे पुन्हा पहिल्यासारखं लक्ष द्यावे असे वाटू लागते. आणि ती जन्माची सहचारिणी ’सखी’ – तिची आपल्या आयुष्यातली खरी जागा समजते.

स्त्री लग्नानंतर जरी नवऱ्याने सप्तपदी मधे  सातव्या पावलावर तू ’सखी’ हो म्हटलं असलं, तरीही  ते काही लग्न झाल्याबरोबर ताबडतोब होत नसतं. जरी लग्नापूर्वी पासून ओळख असली तरीही ’बायकॊ’ची ’सखी’ व्हायला बरेच दिवस लागतात.सोबत राहिल्यानंतर एकमेकांच्या स्वभावातले गुण दोष जेंव्हा नीट माहीत होतात तेंव्हाच बायको नवऱ्याने न सांगता त्याच्या मनातलं ओळखू लागते, आणि तेंव्हाच ती  खऱ्या अर्थाने ’सखी’ होते. सखी म्हणजे कोण?? तर भोजनेषू माता , शयनेशू रंभा, वगैरे काहीतरी म्हणतात ना, तसे नाही, तर या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे तुमच्या आमच्या आयुष्यात!

नुसता मित्र किंवा मैत्रीण हे दोन्ही शब्द एकेकटे असतांना कसे मस्त वाटतात, पण बायकोचा मित्र किंवा नवऱ्याची मैत्रीण हे नातं आलं की कसं वाटत ना?? तरीही बरं, चाळीशी पर्यंतच  पझेसिव्ह कन्सेप्ट असतो, नंतर मग समजतं, ’ती’ त्याची’ मैत्रीण जरी कोणीही असली तरीही सखी मात्र ’ मी’च! पण चाळीशी पर्यंत?? छेः… कुठ्ल्याही प्रकारे कोणीच भागीदार नको असतो बायको मधे नवऱ्याला, आणि नवऱ्यामधे बायकोला, पण एकदा चाळीशी ओलांडली,  की तो पर्यंत परस्परांना व्यवस्थित समजून घेतलेले असते म्हणून सगळे संशय वगैरे संपलेले असतात.

(पूर्व प्रसिद्धी- मोगरा फुलला दिवाळी अंक २०१०)

कुरकुरे-कुरकुरे

Written by  on August 18, 2013

फेसबुक वरून साभार..

मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो??  यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून    म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच  लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख ज्या  कुत्सित पद्धतीने करण्यात आला, ते पाहिल्यावर निश्चितच  थोडं वाईट वाटलं .  काय मनात आलं कोणास ठाऊक, पण मला गिरीश कुबेरांना (लोकसत्ताचे संपादक) पत्र पाठवण्याची दुर्बुद्धी सुचली, आणि मी त्यांना माझ्या मनात जे काही आलं ते लिहून पाठवलं, या अपेक्षेने की , ते मला नक्कीच उत्तर देतील.  पण…….मी  पाठवलेल्या वैय्यक्तिक पत्राला त्यांनी पुढल्या सोमवारच्या लेखात वापरलेले दिसल्यावर तर मनःस्ताप अजूनच वाढला.  ^(http://rangmarathiche.com/goto/http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=216543:2012-03-18-19-14-17&catid=404:2012-01-20-09-49-09&Itemid=408)एवढे  करुन   त्यांचे समाधान न झाल्याने,  त्या लेखाखाली माझ्या विरुद्ध असलेल्या कॉमेंट्स ( बहुतेक स्वतःच समीक्षा देशमुख नावाने लिहून) केवळ प्रसिद्ध करून आपल्या मनाचा ’कोते’ पणा लोकसत्ताकारांनी अधोरेखित केला.

लोकसत्ता सारख्या पेपरने  “सायबर बुलींग” सुरु करावे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. सायबर बुलींग  चे जगात बरेच बळी पडलेले आहेत.  अशा तऱ्हेच्या सायबर बुलींग मुळे जगभरात कित्येक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत.   अर्थात मी काही तसे करणार नाही , पण पेपरमधे काहीही छापताना आणि  आपण सायबर बुलींग तर करत नाही ना? याचा विचार प्रत्येक पेपरने करणे आवश्यक आहे. सायबर बुलींग हा  ’येलो जर्नॅलिझम’ चा हा एक भाग आहे ह्याची जाणीव लोकसत्ताला  असावी अशी किमान अपेक्षा करतो-आणि जर ती जाणीव  नसेल तर वडापाव गाडी किंवा भेळ-पुरीचा पर्याय आ्हेच.

प्रतिवाद, तर्क, समर्थन किंवा संतुलन  वापरून लिहीणे  म्हणजे वृत्तपत्रीय लेखन असा माझा (गैर) समज होता, हे त्या सदराने  सिद्ध केलेले आहे. ’डोके’ वापरून ’धड’ न लिहीण्याचा पण केल्यावर आणि  पेपरचा एक कोपरा आपल्या ताब्यात आहे, काय छापलं जातय याकडे संपादकाचे काही लक्ष नाही,  तेंव्हा आपल्याला जी काही गरळ ओकायची आहे ती ओकून , आणि आपल्या  अल्प मती वर बौद्धिक सृजनशीलतेची पुटं चढवून किंवा नसलेली सर्जनशीलता अंगी बाणवून काही तरी अगम्य लिहिणे, आणि एखाद्याचा अपमान करणे हा आपला  अधिकार आहे असा समज   या लेखकाचा झालेला आहे असे दिसते.     या वाक्यातून तुम्हाला काय बोध होतो? ह्या अशा तऱ्हेने लेख लिहिला जातो लोकसत्ता मधे वाचावे नेटके सदरात.अशी वाक्य लिहायला फार अक्कल लागते असे नाही, पण नाळ तुटल्या सारखी वाटते मातृभाषेबरोबरची,  आणि कृत्रिम पणा पण येतो लिखाणात.त्याच सदरातील एका लेखात खुसखुशीत लिहीण्याच्या प्रयत्नात डोकं आणि धड यांच्यावरच्या ओढून ताणून केलेल्या कोट्या वाचल्यावर कपाळ भिंतीवर आपटून घ्यायची इच्छा  झाली होती.

विचारांची बैठक, खंबीर पणा, आणि विस्तृत वाचनामुळे “लेखनाला ” एक  योग्य वळण लागते. पण जर   वाचन विस्तृत असेल आणि ’वैचारिक बैठक’ जर पक्की नसेल तर मग ’वाचावे नेटके’ लिहिले जाते.

अशाच काही  ’स्वयंघोषित साहित्यिक पंडितांनी” काही वर्षापूर्वी पुलं, वपुं, सुहास शिरवळकर, चिंतामणी लागू वगैरे अनेक लेखकांना  साहित्यिक म्हणून अनेक वर्ष मान्यता दिलेली नव्हती. मध्यमवर्गीय संस्कृती वर लिहीतात म्हणून वपु वर पण खूप टीका करण्यात  यायची.  अर्थात त्यांच्या मान्यता न देण्याने, किंवा टीका करण्याने  काही फारसा फरक पडला असे नाही, जनतेने तर ह्या सगळ्या लेखकांवर आणि त्यांच्या लिखाणावर मनापासून प्रेम केले. याचं  कारण  एकच- ते म्हणजे त्यांच्या लिखाणात नेहेमीच साधीसोपी  आणि मनाला भिडणारी भाषा.

बाबुराव अर्नाळकरांनी  हजाराच्या वर रहस्यकथांची पुस्तकं  लिहिल्यावर सुद्धा त्यांना लेखक, साहित्यिक म्हणून आजही मान्यता  दिल्या गेलेली   नाही. अहो निरनिराळ्या विषयांवर हजारो रहस्यकथा लिहीणे म्हणजे काय चेष्टा नाही.  ही उदाहरण देण्याचा अर्थ मी स्वतःला साहित्यिक वगैरे समजतो आहे असे नाही- तर हे टीकाकार ज्या प्रकारे टीकांकडे   लोकं  लक्ष देत नाहीत हे सांगणे आहे.

मी स्वतः विचार केला की मला वाचायला काय आवडेल? रंजनात्मक, ज्ञानात्मक की माहिती पूर्ण ?? स्वतःच विचार केल्यावर “मला जे काही माहिती नाही ते मला वाचायला आवडेल” – मग रे कुठल्याही प्रकारचे ले्खन असले तरीही चालेल. हा ब्लॉग  लिहित असतांना  मी हेच तत्व पाळून मला स्वतःला जे काही आवडेल ते्च लिहत आलो आहे..

काही लोकांना प्रत्येकच गोष्टीला नावं ठेवायची सवय असते. मग तो एक प्रकारचा स्वभावच होतो . प्रत्येकच गोष्टी बाबत कुरकुर करण्याचा स्वभाव.  असं पहा , सकाळी बायकोने मस्त चहाचा कप समोर आणला, आणि नेमकी साखर कमी झाली… यावर कुरकुरे महाशय नक्कीच ” काय हे? इतकी वर्ष झाली लग्नाल, तरीही चहा करता येत नाही का तूला” म्हणून कुरकुर करत चहाचा कप समोर धरेल. बायकोने टाकलेली एक चमचा साखर अगदी चहा थंड होई पर्यंत ढवळेल, आणि मग पुन्हा चहा गार झाला म्हणून कुरकुर करत बसेल..

याच परिस्थिती मधे दुसरा एखादा म्हणजे (नॉन कुरकुरे) मात्र बायकोला समोर बोलावून, एक घोट घे गं चहाचा, म्हणजे पुरेसा गोड होईल म्हणून बायकोला सांगेल.. चहाकडे पाहून बायको हसली,किंवा तिने एक घोट घेतला  की चहाची गोडी वाढेल असं म्हंटल्यावर बायकोला पण चहात साखर कमी झालेली आहे हे समजेल, आणि  तिचा पण मुड खराब होणार नाही. जीवनातला आनंद जर टिकवून ठेवायचा असेल तर कुरकुर करणे सोडणे, आणि जगात अस्तित्वात असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे एवढे केले तरीही पुरेसे आहे.

माझा अनुभव असा आहे, की बहुतेक जगात जितके ’लुझर्स ’आहेत ते कुरकुरे   असतात. असाच एखाद्या कुरकऱ्या जेंव्हा जेंव्हा संधी मिळते  तेंव्हा त्याच्या ह्या कुरकुरीत स्वभावाचे यथार्थ दर्शन त्याच्या अगम्य आणि जडजंबाळ शब्द वापरून तसेच शब्दच्छल करून   लिहिलेल्या लेखातून घडवतो.

कुठल्याही गोष्टीला चांगलं न म्हणता येणं  हा यांचा दोष असला तरीही त्याला   आपला गुण समजतात.  एखाद्या गोष्टी मधे वाईट काही सापडले नाही तर हे लोकं अस्वस्थ होत असा्वे. स्वतःबद्दल उगाच काहीतरी भ्रामक कल्पनांचा डॊंगर डोक्यात घेऊन  हे  समाजात वावरत असतात.” बहुतेक प्रत्येक चांगल्या गोष्टी मधे वाईट काय आहे, हे शोधायचं, आणि मग त्या बद्दल  कुरकुर करत रहायचं” असा स्वभाव असतो यांचा.  पेसिमिस्ट+सॅडीस्ट अशा प्रकारच्या  (अव)गुणांचे कॉंबीनेशन म्हणजे हे कुरकुरे.

एक कविता होती, गोविंदाग्रजांची , चिंतातूर जंतू नावाची.   त्या कविते मधे गोविंदाग्रज अशा कुरकुऱ्या लोकांची मस्त उडवलेली आहे, ” सूर्याचे तेच उजाड उघड्या माळावर उगाच सांडते, ते बघवत नाही” असं म्हणणाऱ्या कुरकुऱ्याला ते म्हणतात, “मग डॊळे फोडून घेच गड्या”.

जेंव्हा तोच कुरकुऱ्या म्हणतो, झाडावर एवढी हिरवी पानं उगाच निर्माण केलीत, त्यांचं मातित पडल्यावर काय होत असेल? तर यावर गोविंदाग्रज म्हणतात, ” जा मातीत मिसळुनी पाही ”

” निंदकाचे घर असावे शेजारी”  म्हणतात,  म्हणूनच  लोकसत्ता मधल्या काय वाटेल ते च्या निंदाजन्य उल्लेखावरून  चांगलं काय ते घ्यायचं असा विचार केला तर एक गोष्ट लक्षात आ्ली,  की  आपला ब्लॉग  कसाही असला तरीही दुर्लक्ष करण्यासारखा निश्चितच नाही, “लव्ह मी ऑर हेट मी, यु कान्ट इग्नोअर मी” !.