इनोसन्स

Written by  on June 20, 2013

मला खरंच कौतुक वाटतं भारतीय लोकांचे. पुर्वी नव्हते पण जेंव्हापासुन फेसबुक , व्हॉट्स अप सारखे सोशल प्लॅटफॉर्मस आले, तेंव्हापासुन भारतीय लोकं किती इनोसंट आहेत ह्याची खात्री पटली. आता, भारतीय लोकं इनोसंट आहेत ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही, लगेच भारतीय लोकं इनोसंट नाहीत, तर हुशार कसे आहेत हे पुरावे ( जसे विमानाचा शोध आम्हीच लावला,  वगैरे वगैरे )लगेच माझ्या इनबॉक्स मधे येऊन पडतील ह्याची मला पुर्ण खात्री आहे.
असं म्हणतात, की भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे, जे मला अजिबात मान्य नाही. अहो , जेंव्हा आपल्या देशात इतके भोळे लोकं रहातात, तेंव्हाअसहिष्णुता कशी काय वाढु शकेल?

इतकं असुनही माझा भारतीयांच्या इनोसन्स वर विश्वास कायम रहाण्यास मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना ही पोस्ट सादर अर्पण. ते इनोसंट लोकं कुठे भेटले मला ? तर इथेच.. खाली लिहीलंय बघा.

१) आपला मेसेज न वाचला जाताच डिलिट केला जाणार हे अगदी पुर्णपणे माहिती असुनही दररोज  माझ्या व्हॉट्स अप वर किंवा इन बॉक्स मधे गुगली करून फेकणारे लोकं .
२)हे असे सदसदविवेक बुद्धी जागृत असलेले लोकंच, आमच्यासारख्या वाईट मनोवॄत्तीच्या( भावना समजुन घ्या हो) लोकांना  लोकांना दररोज न चुकता सुविचार /  हजारदा वाचलेले विनोद जेंव्हा नया है मार्केट मे म्हणून पाठवतात तेंव्हा !

फेसबुकचा प्लॅटफॉर्म दिलाय तो दोन घटका करमणुकी साठी, मी पण फेसबुक वर न चुकता सकाळ , दुपार , संध्याकाळ चक्कर टाकतोच केवळ चार घटका करमणूक व्हावी म्हणून.  पण इथे  पण काही व्हॉटस ऍप सारखी परिस्थिती आहे. आपला इनोसन्स सिद्ध करायला लोकं कसे कंबरेचा काटा ढिला होई पर्यंत प्रयत्न करतांना दिसतात. कसे?? वाचा पुढे…

३) एखादी बातमी आली, की त्यावर आपले मत व्यक्त केले नाही, तर आपण बुर्झ्वा ठरू म्हणुन    आधी गुगल करून मग फेस बुक वर काहीतरी लिहीणारे लोकं.
४) स्वतःला काही समजो की ना समजो, दररोजच्या राजकीय परिस्थितीवर  आपल्या मताची पिचकारी मारणारे.
५) एका विशिष्ठ विचार धारेला वाहून घेतलेले लोकं, आणि ते का हे मी लिहीत नाही, वाचक सुज्ञ आहेतच. 🙂
६) नेत्यांना “ओपन लेटर” फेसबुक वर लिहीणारे लोकं. ह्या लोकांना असे वाटत असते की नेते मंडळी पण फेसबुक वर ह्यांच्यासारखेच पडीक असतात, आणि ह्यांची पत्र वाचतात.
७) अमुक  देवाचा मेसेज   फॉर्वर्ड करा असा मेसेज आला की  ” कशाला उगाच विषाची परिक्षा घ्या? ” म्हणून तो मेसेजेस १० लोकांना फॉर्वर्ड करणारे आणि काही तरी आता चांगलं होईल म्हणून वाट पहाणारे लोकं, किंवा शुभ सोमवार, शुभ मंगळावार सारखे लोकं .
८)फेसबुक वर पाच हजार मित्र (?) गोळा करून दररोज काहीतरी  पोस्ट लिहीणारे लाइक्स च्या संख्येच्या हिशोबात स्वतःची पॉप्युलरटी मोजणारे .
९) आपण फार सुंदर दिसतो म्हणून आपण आपला डिपी आठवड्यात दोन तीन वेळा बदलणारे लोक्स. ( बिपिन कुलकर्णीचा शब्द चोरलाय बरं कां!)
१०) कुठल्या तरी फालतु  सी ग्रेड टीव्ही / सिनेमा कलाकारासोबतचे काढलेले फोटो पोस्ट करून आपली आणि त्याची किती जवळीक आहे हे दाखवणारी पोस्ट टाकणारे.
११) गावठी फोटोशॉप एक्स्पर्ट्स. इनका तो क्या कहने! कधी कतरीनाच्या मांडीवर , कधी करीनाच्या कुशीत, तर कधी  ह्यांच्या मोटरसायकलच्या मागच्या सीट वर  आलीया भट !
१२) मुंबई मिरर मधे सेक्सपर्ट्स ला प्रश्न विचारणारे लोकं. (एकदा मुंबई मिरर नाही वाचला तरीही चालेल, पण हा कॉलम नक्की वाचत जा )
१३) व्हॉट्स ऍप वर येणारा प्रत्येक फॉर्वर्ड किंवा मेसेज खरा समजणारे लोकं.
१४) देवभोळे पणा सोशल मिडीया वर दाखवला  म्हणजे आपल्याला लोकं खूप चांगले समजतात हा समज असणारे आणि दररोज न चुकता रतीब घातल्याप्रमाणे देवांचे फोटो पोस्ट करणारे.
१५) सरकारने एखादा निर्णय घेतला, की फेसबुक वर सरकारने दम असेल तर असे करून दाखवावे, तसे करून दाखवावे म्हणून आव्हान देणारे.
१६) आपल्या आवडीच्या नेत्याने कुठलाही निर्णय घेतला, ( अगदी न पटणारा असला तरीही ) असे काही लॉजिक शोधायचे, की जे त्या निर्णय घेणाऱ्याच्या मनातही नसेल.
१७) दोन अगदी १८० अंशात विरोधी असणाऱ्या पोस्ट ला लाइक करून त्या दोन्ही पोस्टला सपोर्टींग कॉमेंट्स करणारे  बिनबुडाचे पेंदे लोक, सगळ्यात जास्त भोळे.
१८)  सोशल मिडीया वर शिव्या घातल्याने एखाद्याचा अपमान होतो असे समजणारे लोक्स.
१९) फेसबुक लाइक्स म्हणजे पॉप्युलरॅटी समजणारे .
२०) सेक्युलर, पुरोगामी वगैरे शब्द शिवी समजणारे.
२१) आवडीच्या पक्षाचे सरकार आल्याने आपलं जिवनमान सुधारणार, करप्शन बंद होणार, सगळीकडे राम राज्य होणार समजणारे.
२२) फेसबुक वर एकमेकांना शुभेच्छा देणारे, नवरा बायको, आई मुलगा/मुलगी वगैरे..

आता हे इतक्या प्रकारचे  इनोसंट लोकं पाहिल्यावर भारतात इनोसन्स नाही असे कोण म्हणू शकेल?

स्वामी निगमानंद

Written by  on June 12, 2013

बाबा रामदेव, किंवा अण्णा हजारे यांच्यामधलं साम्य कुठलं आहे हे विचारलं तर पहिली गोष्ट जी मनात येते ती म्हणजे त्यांच्या मागचा मोठा  असलेले फॅन फॉलोअर्सचा जमावडा . त्यांनी काहीही जरी केलं तरी ती बातमी असते.म्हणजे  त्यांनी अगदी शिंक जरी दिली तरी, ” बाबा रामदेव को छिंक आई- किसका है इसके पिछे हाथ? क्या कॉंग्रेस सरकार की ये राजनीती है?  ” म्हणून तशी ब्रेकिंग न्युज पण पहायला मिळू शकेल एखाद्या दिवशी.

अण्णा हजारेंचं पण तसंच असतं की काही बोलले की मिडियाचे प्रवक्ते त्यांच्या मागे पुढे माईक धरून उभे असतात, ते काय बोलतात ते ऐकायला आणि मग त्याची चीर फाड करून लोकांपर्यंत पोहोचवायला.. या गोष्टीसाठी मिडियाला नाही, तर त्या दोघांनाही शंभर मार्क्स! मिडियाला मागे कसे फिरवायचे हे  दोघांनाही चांगलं जमतं.    आता हेच बघा नां, अण्णा हजारेंचं जे ’  किंवा रामदेव बाबांचे ’प्राणांतिक ’ उपोषण जे होतं ते फार तर चार पाच दिवस चालेल असा अंदाज होता माझा. आणि  नेमकं तसंच झालं.

या दोघांच्याही प्राणांतिक उपोषणामधे दोघांनाही काही होणार नाही, कोणीतरी समोर जाऊन लिंबू पाणी देईल आणि उपोषण सोडतील हे दोघंही ह्याची  पण सगळयांनाच कल्पना होती.तरी पण आपण सगळे हा खेळ कसा होतो हे मोठ्या उत्सुकतेने बघत बसलो होतो.

बरेच लोकं आमरण उपोषण करतात, एकदा नाही तर अनेकदा!! 🙂  आमरण उपोषणाचा हा असा फार्स मी  गेली कित्येक  वर्ष पहातो आहे! सरकारला प्रेशराईज करायला हे प्राणांतिक उपोषणाचे हत्यार वापरले जाते. आज पर्यंत उपोषणा मुळे कोणी मेल्याचे ऐकिवात नव्हते , आत्ता आत्ता पर्यंत तरी – म्हणजे जो पर्यंत स्वामी निगमानंदांचं नांव ऐकलं नव्हतं तो पर्यंत!

गंगा नदीचे पावित्र्य जो पर्यंत तुम्ही  हरिद्वारची ’गंगाजीकी आरती’ पहाणार नाही, तो पर्यंत समजणार  नाही.  गंगा नदीला आपण इतकं पवित्र मानतो की शेवटच्या क्षणी पण दोन चमचे गंगाजल आणि तुळशीचे पान तोंडात घातले, की सदगती लाभते असं आपण पूर्वापार मानत आलो आहोत. गंगेच्या पात्रातले पाणी  स्वच्छ रहावे असे सगळ्यांनाच वाटते. पण आपण काही करू शकत नाही.सध्या ,कधी गंगेवर गेल्यावर त्यातले दोन थेंब पाणी जिभेवर ठेवायची इच्छा  होणार नाही,  इतकं प्रदुषित झाले आहे ते. गंगेचं पावित्र्य का राखलं जाऊ नये?

स्वामी निगमानंद,! दरभंगा जिल्ह्यातला हा एक  स्वामी!  जेंव्हा बाबा रामदेव यांचे उ्पोषण सुरु होते त्याच  काळात ह्यांचे पण  ’आमरण उपोषणावर’ होते! तब्बल ११५ दिवस! ही गोष्ट किती लोकांना माहीत आहे? माझ्या मते अजूनही बऱ्याच लोकांना या   बद्दल काहीच  माहीत नाही.   मिडियाला पण त्याच्या ह्या उपोषणाची दखल घ्यावी असे वाटले नाही.  तो बिचारा १४ वर्ष एकटाच झगडत होता. राजकीय व्यवस्था, पोखरलेली नोकरशाही- सगळे त्याच्या विरोधात असतांना पण त्याचा  लढा सुरु  होता.

बाबा रामदेवांचे स्विस बॅंकेतला पैसा परत आणा म्हणून सुरु केलेले आमरण (!)  उपोषण किंवा लोकपाल विधेयक लागु करा म्हणून अण्णा हजारेंनी केलेल्या प्राणांतिक   (!) उपोषणासमोर ह्या स्वामी निगमानंदांच्या उपोषणाचे कारण ” गंगाजी स्वच्छ ठेवा” हे  कारण फारस ग्लॅमरस वाटत नाही  लोकांना..    इतका महत्त्वाचा मुद्दा,   पण दुर्दैवाने  हा एक हिंदूंचा ’धार्मिक मुद्दा’  झाला असावा, आणि सेक्युलर प्रेस आणि टिव्ही ला  हा मुद्दा  कव्हर करणे म्हणजे हिंदुत्वाला कव्हर करणे असे वाटले असावे.

राजीव गांधी यांनी जेंव्हा गंगा स्वच्छ करावी असे म्हटले होते, तेंव्हा बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.  पण माझ्या मते राजीव गांधींचे त्यावेळेस काहीच चुकले नव्हते. गंगे मधे अर्धवट जाळलेली प्रेतं वाहून जाताना दिसतात बरेचदा. निरनिराळ्या उद्योगांचे सांडपाणी पण प्रक्रिया न करता सोडलं जातं.तसं आपलं पोल्युशन कंट्रोल बोर्ड,  आहे, पण ते कसं काम करतं यावर मी काही टीप्पणी करत नाही.

निगमानंद!! बिहार मधल्या दरभंगा जिल्ह्यात यांचा जन्म झाला. दहावीची परिक्षा १९९५ मधे  ८० टक्के गुण मिळवून उत्तिर्ण झाल्यावर मोठ्या भावाप्रमाणेच आय आय टी मधे जाऊन शिकावे असे वडीलांचे स्वप्न होते. पण एक दिवस मात्र घरी ” मी सत्याच्या शोधात जात आहे ” असे सांगुन घर सोडले आणि मातृसदन या आश्रमात जाऊन राहिले.

उत्तराखंडा मधे नैसर्गीक संपत्ती म्हटले तर फक्त रेती, गिट़्टी  इतकेच आहे. आता इतकी सरकारी संपत्ती म्हटल्यावर बऱ्याच  माइनिंग माफियाच्या आणि   राजकीय नेत्यांच्या तोंडाला पाणी सुटणारच. सरकारचं जे काही आहे, ते आपलंच! ही गोष्ट अगदी पक्की ध्यानात ठेवली आहे राजनेत्यांनी  आणि त्यांच्याशी लागे बांधे असलेल्या लोकांनी. त्यामुळे ही संपत्ती लुटण्यासाठी सगळे सत्ताधारी  आणि विरोधी पक्ष एकत्र झाले आणि या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले गेले.

गंगानदीच्या पात्राच्या शेजारी असलेले दगड खणून बाहेर काढण्यास कायद्याने प्रायव्हेट कंपन्यांना मनाई आहे.इथले दगड काढल्याने , किंवा रेतीचा उपसा केल्याने पात्र खोल होते, आणि वॉटर टेबल खाली जातो- आणि जवळपासच्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. माइनिंग करण्याची परवानगी फक्त सरकारला आहे. कायद्याने जास्तित जास्त सहा फुटा पर्यंत एक्स्कॅव्हेशन केले जाऊ शकते. असे असतांना सुद्धा इथे  लोडर्स, एक्स्कॅव्हेटर्स सारख्या मोठमोठ्या मशिन्स वापरून इथे नदीकिनारी इल्लिगल माइनिंग करुन दगड काढले जातात. नुकताच एका क्रशरवर छापा घातला असता  ४५ हजार टन अवैध रित्या काढलेले दगड सापडले.

ह्या दगडाला  क्रशर मधे घालून क्रश करणे आणि गिट़्टी वगैरे मार्केटला विकणे हा एक खूप मोठा व्यवसाय आहे . दगड क्रशर मधे बारिक केल्यावर उडणारा धुराळा हा शेजारच्या शेतीच्या जमीनिवर जाऊन बसतो आणि जमीन नापिक होते. जवळपास रहाणाऱ्या लोकांना छातीचे विकार, श्वासाचे विकार, टिबी वगैरे होणे तर नेहेमीचेच झालेले आहे. हा धुराळा एकदा जमिनिवर बसला की जमिन नापिक होते, आणि मग हीच जमीन क्रशर माफियाला कवडीमोलाने विकणे इथल्या लोकांना भाग पडते.

दगड काढतांना होणारे गंगेचे प्रदुषण हा पण  महत्वाचा मुद्दा आहेच. या लढ्याला केवळ धार्मिक  लढा  किंवा भावनीक मुद्दा म्हणून पहाणे बरोबर होणार नाही. हा एक सामाजिक लढा आहे, करोडो रुपयांच्या राष्ट्रीय खनिज संपत्तीचा केल्या जाणाऱ्या गैर वापरा विरुद्ध.

साधारण पणे १९९८ साली हा संघर्ष सुरु झाला.  महाकुंभ मेळा असलेल्या भागात नदी मधे दगड , रेती काढण्यावर बंदी घातलेली असतांना पण त्या ठिकाणी हरीद्वारला मोठ्या प्रमाणात मायनिंग सुरु होते. याविरोधात स्वामी निगमानंदांनी सर्वप्रथम आवाज उठवला  आणि कोर्टातून स्टे आणला. इथूनच खरी त्यांच्या  गंगा शुद्धीकरण लढ्याची सुरुवात झाली.

कोर्ट कचेऱ्या आणि बरंच काही झालं या चौदा वर्षात. कित्येकदा उपोषणं केली गेली, मोर्चे काढल्या गेले, पण म्हणावे तसे ह्या लढ्याला वृत्तपत्रीय, टिव्ही वर प्रसिद्धी वगैरे मिळू शकली नाही, आणि यश पण मिळाले नाही. त्या भागात असलेल्या हजारो अधिकृत आणि अनधिकृत क्रशर कंपन्या, आणि त्यांचे सरकारी नेत्यांशी असलेले लागे बांधे, या मुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास ज्युडीशिअरीवर दबाव आणणे अवघड जात  होते.एका क्रशरवर सापडलेला ४५ हजार टन माल योग्य पावती नसल्याने जप्त केला जातो, नंतर तोच माल कुठली तरी पावती दाखऊन वर्षा-सहा महिन्यानंतर सोडवून घेतला जातो.असे प्रसंगही त्यांच्या समोर आले, पण त्यांनी लढा सुरु ठेवला.

मागे फॉलोअर्स फारसे नाहीत, काही न्युसेन्स व्हॅल्यु पण नाही, त्यामुळे सरकारला त्यांच्याकडे  लक्ष द्यायची गरज वाटत नव्हती. सरकारचं लक्ष वेधून घ्यायचा एकच मार्ग दिसत होतो- तो म्हणजे प्राणांतिक उपोषण! पण ते करूनही त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही.

ज्या   हिमालयन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल  मधे बाबा रामदेव यांना ऍडमिट केले होते, आणि चोविस तास मिडिया त्यांचे उपोषण कव्हर करत होता, त्याच दवाखान्यात स्वामी निगमानंदांना पण भरती केले होते. बाबा रामदेव यांनी जुस घेऊन उपवास सोडला, आणि टिव्ही वर ब्रेकिंग न्युज झळकत होती,  तेंव्हा स्वामी निगमानंद त्याच दवाखान्यात मृत्युशी लढा देत  होते,पण कुठल्याच  न्युज चॅनललवर किंवा वृत्तपत्रात  याबद्दल काही बातमी आली नव्हती. स्वामीजींनी उपवास सोडावा म्हणून एकाही नेत्याने प्रयत्न केले नाहीत, कींवा त्यांना भेटायलाही कोणी गेले नाही.   त्याची दखल ना तर मिडीया घेतली , ना नोकर शाही, ना सरकार ने!.

ह्या एकांड्या शिलेदाराच्या मृत्युनंतर पण फक्त एक लहानशी चौकट दिसली पेपरमधे, “गंगा शुद्धीकरण अभियानाचे पुरस्कर्ते, स्वामी निगमानंद यांचा उपोषणामुळे मृत्यु झाला आहे  इतकंच!! बस्स

हा लेख इथेच संपवतो, तुम्हाला विचार करायला एक मुद्दा देऊन, मिडीयाचे हे असे वागणे का असावे?? का म्हणून स्वामी निगमानंदाकडे दुर्लक्ष केले गेले असावे? हा करोडो रुपयांच्या घोटाळ्याचा मुद्दा आणि गंगा प्रदुषण हा मुद्दा खरंच इतका दुर्लक्ष करण्यासारखा आहे का?

” मिडिया कॅन  कॅन मेक ऑर ब्रेक ”  हेच खरं!

रिऍलिटी शो

Written by  on June 7, 2013

रिऍलिटी शोज चं हल्ली खूपच पीक आलंय. प्रत्येक चॅनल आपला एक नवीन शो आणतोय. या मधे पण दोन प्रकारचे शोज आहेत. जे म्हणजे एखाद्या कले ला प्रमोट करण्यासाठी असतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे मानवी स्वभावाचे पैलु – जे साधारण परिस्थितीत सुप्तावस्थेत असतात त्यांना जागृत करुन तुमच्या पुढे दाखवायचे.

कलेला प्रमोट करण्यासाठी बरेच  एखाद्या कलेमधला दर्दी किंवा एक्स्पर्ट  किंवा त्त्या क्षेत्रातले मान्यवर  आहेत. ते अशा शो मधे आपली हजेरी लावतात.भाग घेणाऱ्याला  ज्या मान्यवर व्यक्तीला कधी पहायला पण मिळालं नसतं , त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतं हा एक प्लस पॉइंट! सारेगमप हा गाण्यांचा शो तर गेली १० -१२ वर्षांपाशून सुरूआहे. आधी हा शो हिंदी भाषेत होता, पण नंतर मग जेंव्हा मराठीत आला तेंव्हा पासून तर याची महाराष्ट्रातली पॉप्युलरॅटी खुपच वाढली. लिल चॅम्प्स ने या  कार्यक्रमाला तर अगदी यशाच्या अत्युच्च शिखरावर नेऊन पोहोचवलं.तसेच बुगी बुगी हा डान्स रिऍलिटी शो गेली १५ वर्षांपासून ( चुक भुल द्यावी घ्यावी) सुरू आहे.

दुसऱ्या प्रकारच्या शो मधे बिग बॉस चं नांव घेता येइल.काही अगदी निरुपद्रवी शोज,बिग बॉस सारखे, ज्या मधे एका घरामधे दहा लोकांना एकत्र ठेवायचं आणि त्यांच्यातली  आणि त्यांच्यातले हेवे दावे, इत्यादी सगळे बाहेर काढून लोकांना दाखवायचे. तो कार्यक्रम पण पहायला लोकांना आवडायचा. तसेच रो्डीज हा पण एक चांगला शो होता पण एम टीव्ही वर असल्यामुळे त्याचा प्रेक्षक वर्ग अगदी लिमिटेड होता.

पण जेंव्हा , खतरोंके खिलाडी हा एक शो आला  कलर टिव्ही वर,त्याच्या लोकप्रियते्ने  सगळी समीकरणच बदलून टाकली. लोकांना हा शो आवडला. दुसऱ्या देशातल्या बिभत्स शोज वर बेतलेला हा एक रिऍलिटी शो होता. भारतीय टिव्ही वर असे सापाच्या काचेच्या पेटीत रहाणे, किंवा झुरळाच्या डब्यात हात घालणे वगैरे गोष्टी नविन होत्या. ज्या गोष्टींची सर्वसामान्य माणसांना किळस वाटेल, त्या गोष्टीच इथे “डेअर” मधे करायला लावायचे शो वर. कॉंटेस्टंट्स पण ह्या गोष्टी करण्यासाठी तयार असायचे, लोकांना पण हा प्रकार तसा नवीनच होता , त्यामुळे खूपच पॉप्युलर झाला हा शो. आता काय नेहेमीचे सास बहु चे सिरियल्स पाहून प्रेक्षक वर्ग कंटाळला होता , त्यांना काही तरी चेंज हवा होता तो त्यांना   या  शो मधे मिळाला .

सध्या सुरु असलेल्या एका रिऍलिटी शो चा ” ईस जंगलसे मुझे बचाओ” चा एक एपिसोड चुकून पाहिला. त्या मधे इतक्या किळसवाण्या टास्क्स दाखवल्या होत्या.. जसे किडे खाणं. वगैरे.. की पहातांना पण अनईझी वाटत होतं. किडे , मुंग्या खाणं , किंवा साप असलेल्या काचेच्या पेटीत तोंड घालुन त्यातले स्टार्स काढणे असा खेळ होता तो.. एकदा तर डासांनी भरलेल्या एका काचेच्या पेटीतुन स्टार काढणे हा खेळ पण पाहिला. दुसऱ्या दिवशी जेंव्हा ऑफिसमधे मित्राशी बोलतांना त्याला सहज म्हंटलं तेंव्हा, तो म्हणाला, की हे तर काहीच नाही, पुर्वी एकदा तर अळ्याचं शेक करुन प्यायला लावलं होतं. हे असे खेळ (??? ) पहायला आवडणारे महाभाग पण आहेत.

टीआरपी वाढवायची असेल तर प्रेक्षकांना  काही तरी नवीन दाखवायला हवं.. ते काय असावं? आता लोकांना हे असे अळ्या खाणं , साप वगैरे पहायची सवय झालेली असते. त्यामधे पण तोच तो पणा वाटायला लागतो.टीआरपी  मेंटेन करायला आता अजुन जास्त रोमांचक काहीतरी द्यायचं- तर काय करणार?

डायरेक्टर्सनी आता या पुढची स्टेप म्हणजे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावणे सुरू केले .या शो मधे जीवावर बेतणारे स्टंट्स करायला लावायचे पार्टीसिपंट्सला. आता भारतात जरी अजुन पर्यंत हे लोण आलेलं नसलं तरीही इतर देशात अशा प्रकारचे जीवावर बेतणारे स्टंट्स असलेले शो खूप लोकप्रिय आहेत.

जगातले टॉप १० रिऍलिटी शोज.. इथे आहेत. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.film.com/tv/the-osbournes/story/top-10-reality-shows-wed/21678457)

हा लेख टिव्ही च्या शो बद्दल माहिती लिहिण्यासाठी नाही. कालच एक बातमी वाचली की एक पाकिस्तानी पार्टीसिपंट एका रिऍलिटी शो च्या शूटिंगच्या वेळेस मारल्या गेला. साद खान नावाचा हा ३२ वर्षाचा माणुस- शुटींगच्या दरम्यान ह्याने हाताला आणि पायाला वजनं बांधून पोहण्याचे चॅलेंज मान्य केलं होतं आणि ते पुर्ण करतांना तो पाण्यात बुडून मृत्यु पावला.

reality showरिऍलिटी शोज मधे  अशा प्रकारचे स्टंट्स करतांना सेफ्टी करता काहीतरी प्रिकॉशन्स घेणं आवश्यक आहे. पण नेमकं त्याच गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं.जे कोणी पार्टीसिपंट्स आहेत ते थोड्याशा पब्लिसिटी करता असे खेळ खेळण्याचे मान्य करतात. टीव्ही वर दिसणे हाच एक मुख्य उद्देश असतो. केवळ, भारत पाकिस्तानात नाही तर संपुर्ण जगातच अशा प्रकारचे अपघात झालेले आहेत.

या शो ला डीझाइन करतांना एक्सपर्ट्स कडून टास्क्स डिझाइन करुन घ्यायला हवेत, ते अगदी अननुभवी माणसाच्या कडून करुन घेतले जातात. जर भाग घेणारा  काही कारणाने टास्क पुर्ण करु शकला नाही तर त्याला वाचवण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नसते.साद खान जेंव्हा बुडत होता तेंव्हा त्याला वाचवण्यासाठी काय केलं गेलं?? जर काहीच नाही, तर मात्र सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्या शो च्या डायरेक्टरला शिक्षा व्हायला हवी.

रिऍलिटी शो चं फॅड  पाश्चात्य जगात सुरु झालंय साधारण १३ वर्षा पुर्वी. तेंव्हा पासुन आत्ता पर्यंत जवळपास ८ लोकांचा मृत्यु झालेला आहे. या पैकी सगळेच काही ऍक्सिडेंटल डेथ्स नाहीत  , तर त्या पैकी बरेचसे तर आत्महत्या आहेत.आधिच्या मृत्युंची डीटेल्स इथे आहेत ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.mirror.co.uk/celebs/news/2008/05/07/reality-tv-tragedies-seven-deaths-in-13-years-115875-20409140/).ऍक्सिडेंटल डेथ ची ही पहिलीच घटना आहे.

अशा गेम्स मधे सायकॉलॉजिकल डीसऑर्डर होणं हे सहज शक्य आहे, आणि नेमकं त्याकडे पण दुर्लक्ष केलं जातं. या आत्महत्यांच्या साठी कोणाला जबाबदार धरायचं? ’शो’ ला? की त्या पार्टीसिपंटला? . अशा शो मधे मानसिक दष्ट्या कितीही स्टेबल असलेला माणुस आपलं बॅलन्स बिघडवून घेउ शकतो..!!! या गेम्सच्या डायरेक्टरचा उद्देशच हा असतो की लोकांच्या आतला माणुस बाहेर काढायचा. पण ते करतांना तो ’आतला’ आवाज इतका प्रॉमिनंट होतो की बाह्य जगातल्या अस्तित्वाला पण टेक ओव्हर करतो, ज्या मूळॆ आत्महत्या, खून या सारख्या घटना घडतात.

हे असे शो जर बंद करणे शक्य होत नसेल, तर कमीत कमी सायकॉलॉजिस्ट सोबतच्या सिटींग तरी ऑर्गनाइझ कराव्या. लहान मुलांचे शो जर छॊटे मिया, किंवा सारेगमप वगैरे पण आवडिने पाहिले जातात. अशा शो मधे पण भाग घेणारे हे दहा वर्षाच्या आतली मुलं कींवा फारतर १५ वर्षापर्यंत ची मुलं असतात. ती मुलं इथे स्वप्नांची आणि वास्तवाची सांगड घालण्यासाठी येतात. त्या पैकी आठवड्यातून एकाला व्होट आऊट केलं जाते… त्याच्या मानसिक स्थिती ची जाणिव आपण जे शो पहातो त्यांना येऊ शकत नाही. संपूर्णपणे आतून तुटून जातात ही मुलं…, जरी वरुन दाखवत नसले तरीही रिजेक्शन ची भावना घर करुन बसतेच मनामधे!

सायकॉलॉजी हा काही माझा विषय नाही पण मला जे काही या संदर्भात वाटलं ते इथे पोस्ट करतोय..