अरे सेन्सॉर सेन्सॉर…

Written by  on May 29, 2013

सेन्सॉरशिप चा खरा अर्थ मला २५ जुन १९७५ ला समजला.  माझं वय साधारण १५ असेल तेंव्हा. सकाळी नेहेमीच्या सवयीप्रमाणे पेपरकडे झेप घेतली. आमच्या घरी तेंव्हा तरूण भारत यायचा- ( नागपूरला अजूनही तरूण भारतच घेतात माझे वडील) . पेपर उघडला आणि पहिल्या पानावर बऱ्याच ठिकाणी कोरे दिसले. माझ्या उण्यापुऱ्या १५ वर्षाच्या काळात कोरे असलेले फ्रंट पेज मी या पूर्वी कधीच पाहिले  नव्हते, पण असा कोरा पेपर दिसल्यावर बहुतेक प्रेस खराब असेल म्हणून असं  को पान आलं असावं असाही संशय आला. पहिल्याच पानावर एक मोठ्या अक्षरात बातमी होती ’आज पासून पंतप्रधान इंदीरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली म्हणून.

आता ही आणीबाणी आणि मिडीया सेन्सॉरशिप एकदमच लागू करण्यात आली. कुठलाही मजकूर छापण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले होते.तरूण भारताच्या बऱ्याच बातम्या सेन्सॉर ने काढून टाकल्या ,त्यामुळे राहिलेली कोऱ्या  जागा ही आणीबाणीचा निषेध म्हणून   कोऱ्याच ठेवल्या होत्या. ही खरी पहिली वेळ सेन्सॉरशिप म्हणजे नेमकं  काय हे समजायची.

सिनेमा सुरु होण्यापूर्वी एक भारतीय न्युज रील दाखवण्याची पद्धत होती पुर्वी.  ती दाखवून झाली की मग   सिनेमाच्या आधी एक सर्टीफिकेट दाखवायचे सेन्सॉरबोर्डाने इश्यू केलेले. त्यावर सिनेमाचे नाव आणि लांबी म्हणजे किती रिल्स आहेत ते लिहिलेले असायचे. ती पहिली स्लाईड दाखवली की सगळे लोकं किती रिल आहे ते म्हणजे १६, किंवा १७ जे काही लिहीले असेल ते मोठ्याने कोरस मधे सोळा ……..असे म्हणायचे. अगदी ठरलेल्या रिच्युअल्स प्रमाणे हे सगळं चालायचं- आणि याच दिवसात पहिल्यांदा सेन्सॉर म्हणजे काहीतरी असते असे समजले होते. पण खरंच या सेन्सॉर बोर्डाच्या सर्टीफिकेट चा अर्थ काय असतो ते मात्र माहीत नव्हते.

नंतर बरेच दिवस  सेन्सॉर बोर्ड असूनही  त्याचे अस्तित्व जाणवेनासे झाले. सेक्स आणि व्हायोलन्स या वर नियंत्रण  ठेवण्याचे काम सेन्सॉर बोर्डाचे- पण ते केले जात नव्हते. शोले मधल्या व्हायोलन्स बद्दल पण बराच उहापोह झाला होता.   सिनेमा तयार करण्याचे काम प्रोड्य़ुसरचे, डायरेक्टर आणि  नट नट्या फक्त कामं करणार, नंतर हे सेन्सॉर बोर्ड त्यांना वाटेल ते कट्स सुचवणार, आणि मग सिनेमाच्या प्रदर्शनाला परवानगी देईल अशी व्यवस्था केलेली आहे.एखादं बोर्ड स्थापन होतं, पण त्या बोर्डाने कुठल्या  विशिष्ट  नियमांचे पालन करावे असे अपेक्षित असते ते  लिखित स्वरूपात नाही- कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. फक्त त्या बोर्डावर असलेल्यांच्या सद्सदविवेकबुद्धीला   स्मरून ते सिनेमामधे कट्स सुचवतात –  सिनेमात काय दाखवावे आणि काय नाही हे अजूनही कायद्याप्रमाणे ठरवले गेलेले नाही .

पूर्वीच्या काळी चुंबनाचे सिन्स पण कट केले जायचे, आणि फक्त दोन फुलं एकमेकांच्या जवळ आलेले दाखवून आर्टीस्टिकली काय होतंय ते उद्युक्त केले जायचे. पहिला न्युड सिन बहूतेक मेरा नाम जोकर मधे सिमी गरेवालचा होता. नंतर स्क्रिप्टची गरज म्हणून चुंबनाचे सिन्स  सेन्सॉर बोर्डाकडून सर्रास पास केले  जाऊ लागले.  समाजाच्या बदलत्या आवडीचे लक्षण आहे हे? की थोपलेल्या बदलामुळे तीच आवड निर्माण झालेली आहे??

मी पूर्वी झारसुगडा नावाच्या एका ओरीसामधल्या लहानशा गावात कामासाठी गेलो होतो. दुपारी  उन्ह खूप जास्त असते, म्हणून दुपारी कोणीच नसायचे   साईटवर. सिनेमा हॉल मधे एअर कुलर होता म्हणून दुपारी    दुपारी वेळ काढायला म्हणून सिनेमा पहायला जाऊन बसलो. सिनेमाचे नाव  आठवत नाही.  सिनेमा सुरु झाल्यावर लक्षात आलं की हा तर  डब सिनेमा आहे, पण तरीही ठिक आहे म्हणून पहाणे सुरु ठेवले.मस्त पैकी एक झोप काढावी म्हणून छान सेट झालो खुर्ची वर, थोडा डॊळा लागला असेल  तोच   पाच दहा मिनिटात लोकांनी ओरडा सुरु केला आणि  हॉल मधे चक्क हा नेहेमीचा सिनेमा बंद करून ब्लू फिल्म दाखवणे सुरु केले गेले होते. मी फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होतो..

काही गोष्टी सगळ्यांमध्ये बसून करायच्या नसतात- तर एकट्याने बसून करायच्या असतात- जसे ब्लु फिल्म्स पहाणे वगैरे..  पण इथे मात्र शेकडॊ लोकं एकत्र बसून असा चित्रपट पहात होते – मला एकदम किळस आली, आणि उठून सरळ बाहेर निघून गेलो. परवाच टाइम्स ऑफ इंडीयामधे वाचले की ,  नुकत्याच  झालेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आलेले आहे की जवळपास ९७ टक्के पुरुषांनी कधी न कधी ब्लु फिल्म पाहिलेली असते, किंवा पहातात!  म्हणून पहाणे किंवा न पहाणे हा प्रश्न नाही , तर सिनेमा हॉल मधे ब्लु फिल्म दाखवली जात होती म्हणजे  आणि सेन्सॉर बोर्डाच्या सर्टीफीकेटचे महत्व काय राहिले?  जर  ब्लु फिल्म्स एखाद्या सिनेमा हॉल मधे उघडपणे दाखवले जातात, तर याचा अर्थ हा पण होतो, की लहान गावात  चित्रपटात सेन्सॉर बोर्डाने सुचवलेले सिन कट न करता पण  सिनेमा दाखवला जात असावा, किंवा जाऊ शकतो .   हे सगळं पाहिल्यावर मनात प्रश्न उठतो तो म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या  सर्टीफिकेटला खरंच काही अर्थ उरतो का?

बिग बॉस आणि राखी का इन्साफ मधे दाखवले जाणारे सिन आणि भाषा या बद्दल न बोललेलेच बरे. नुकतीच त्या दोन्ही कार्यक्रमांची वेळ प्राइम स्लॉट वरून  काढून रात्री ११ नंतर करण्यात यावी असा निर्णय दिलाय न्यायालयाने. टिव्ही वर दाखवले जाणाऱ्या कार्यक्रमावर तर अजिबात काही अंकुश नसतो. त्या प्रोड्युसर्सची  इच्छा असेल ते दाखवले जाते. बिग बॉस मधे उघडपणे पुरुषांनी स्त्रियांच्या अंगचटीला जाणे, किंवा उचलणे, शिवीगाळ वगैरे अगदी सामन्य जिवनाचा भाग म्हणून दाखवले जातात. हनीमुनच्या रात्रीचे डायरेक्ट प्रक्षेपण केल्याने तर लोकांना जास्तच जाणवली नग्नता, आणि कोणीतरी कोर्टात केस दाखल केली …राखीका इन्साफ या शो मधे आलेल्या एका माणसाने राखीने केलेल्या अपमानामुळे आत्महत्या केली . या कारणामुळे हा शो लेट नाईट दाखवावा म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे, पण अजूनही प्राइम टाइम मध्येच हा शो दाखवला जातोय.

पूर्वी शिवसेनेने एकदा या शो वर बंदी आणावी म्हणून वॉर्निंग दिली होती, आणि काही दिवसांसाठी शो बंद पण झाला होता, पण नंतर म्हणजे दोन तिन दिवसांनी   बहूतेक मांड्वली झाली असावी आणि हा शो पुन्हा सुरु राहू देण्यास शिवसेनेने परवानगी दिली . ज्या कारणासाठी ही बंदी घातली होती (पाकिस्तानी कलाकारांचा समावेश) ते कारण   पुन्हा  परवानगी देतांना बाजूला ठेवल्या गेले , ती पाकीस्तानी  नटी अजूनही त्या शोमध्ये आहेच-अर्थात याचे कारण काय असावे ते आपण सगळे जाणतोच!

असाच एक कार्यक्रम अ‍ॅक्स युवर एक्स” मधे पण आपल्या ’एक्स बॉय किंवा गर्ल फ्रेंडचा’   बदला घ्यायला एक चॅनल मदत करते. आणि तो प्रकार टिव्ही वर दाखवला जातो. एखाद्या स्त्रीच्या पर्सनल आयुष्याचे धिंडवडे काढायचा अधिकार त्या चॅनल ला कोणी दिला?या कार्यक्रमाला कोणीतरी  स्पॉन्सर केलेले आहे. शो च्या शेवटी जेंव्हा ती मुलगी रडते -भेकते तेंव्हा तिला सांगितलं जातं की तिच्या बॉय फ्रेंडने हा बनाव रचला आहे म्हणून- आणि तेंव्हा तो  अ‍ॅंकर हसत होता ते पहातांना खूप संताप येतो. प्रोग्रामच्या अ‍ॅंकरच्या अथवा प्रोड्य़ुसरच्या  बायकोच्या किंवा बहिणीच्या बाबतीत तो असे शो करेल का- हा प्रश्न मनात येतोच.

तसेच  आपल्या बॉय फ्रेंडची किंवा गर्लफ्रेंडची   किंवा पती पत्नीची लॉयलटी टेस्ट करण्यासाठी पण एक कार्यक्रम दाखवला जातो. त्या मधे त्या मुलीला किंवा मुलाला तिच्या सध्या असलेल्या फ्रेंड पेक्षा जास्त सुंदर आणि श्रीमंत फ्रेंड भेटतो आणि मग तिला/ त्याला प्रपोझ करतो. जर त्याने नाही म्हंटले, तर लॉयलटी टेस्ट पास.. नाही तर फेल.. आणि जर तो/ती टेस्ट फेल झाले तर मग टिव्ही वर लाइव्ह मारामारी शिवीगाळ दाखवली जाते.. हा शो  पण एक चॅनल स्पॉन्सर करतं. या शो मधे लपवलेल्या कॅमेऱ्याने सगळा शो रेकॉर्ड केला जातो. हा  कार्यक्रम असो किंवा सच का सामना  असो- रिअ‍ॅलिटी शो च्या नावाखाली अगदी काहीही दाखवायची पद्धत सुरु झालेली आहे. या व्यतिरिक्त पण बरेच शो आहेत ज्यांची इथे  उदाहरणं देता येतील. पण कोळसा उगाळावा तितका काळाच- किती वेळ उगाळायचा??

आपले टिव्ही चॅनल्स फक्त दोन प्रकारचे कार्यक्रम देतात- एक म्हणजे वर दिलेले किंवा दुसरे म्हणजे सास बहू सिरियल्स… म्हणजे सोप्स! करमणुकीच्या नावाखाली आपण काय दाखवतोय किंवा कितपत न्युडीटी असावी , कितपत सेक्स दाखवावा यावर  काहीतरी नियंत्रण असावे असे  वाटू लागले आहे. मध्यंतरी काही मोठे विचारवंत टिव्ही वर येऊन याच विषयावर चर्चा करीत होते, की ही बिग बॉस वरची बंदी योग्य आहे की नाही म्हणून? त्यावर एक महाभाग म्हणाले, की तुमच्या हातावर चॅनल बदलायचा रिमोट असतो.  त्यांच्या म्हणण्याचा अर्थ हा की तुम्ही टिव्ही पहातांना मुलांच्या सोबत बसा, त्यांना एकट्याला टिव्ही पाहू देऊ नका असा घ्यायचा का? आणि हे गाढव लोकं असे शो दाखवणार आणि वर आपल्यालाच ज्ञान शिकवणार?? यांची लायकी आहे का तेवढी ??म्हणत होते आम्ही हवे ते दाखवू तुम्ही चाइल्ड लॉक करा . घरामधे १५-१६ वर्षाच्या मुलांना चाइल्ड लॉक उघडता येते हे ते विसरले!

टीव्ही वरच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉरशिप असावी की नाही ? हा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून म्हणजे दोन वर्षापुर्वी झालेल्या २६/११ पासून ऐरणीवर आहे. तेंव्हा दाखवल्ल्या गेलेल्या  लाइव्ह न्युज मुळे त्या टेररिस्ट लोकांना फायदा झाला होता हे उघड सत्य आहे- आणि त्यांच्या सॅटलाइट फोन वरून ते सिध्द पण झालंय. त्या मुद्द्यावर   अजूनही काहीच निर्णय झालेला नाही.टिव्ही वर काय दाखवावे आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार हा आज सर्वस्वी त्या चॅनलच्या प्रॉडक्शन हाऊस कडे असतो -आणि माझ्या मते ते त्याचा ते पुर्ण गैरफायदा घेतात. टिव्ही वरच्या कार्यक्रमासाठी सेन्सॉरशिप असणे अतिशय आवश्यक झाले आहे, नाही तर थोड्याच दिवसात तुमच्या दिवाणखान्यात टिव्हीवर मुलांसोबत टीव्ही पहातांना तुम्हाला एक हात रिमोटवर आणि दुसरा मुलांच्या डोळ्यावर ठेवायची वेळ येईल.

अर्थात, सध्या तरी आपल्या हातात फक्त रिमोट आहे, बाकी काही नाही….

कार्पोरेट वर्ल्ड..

Written by  on May 25, 2013

corporateहल्ली बरेचदा कार्पोरेट ट्रेनिंग अटेंड करावे लागते, आणि मग त्या ट्रेनिंगच्या दरम्यान   ऐकलेल्या काही   गोष्टी अगदी मनात घर करून बसतात, तर काही अगदी त्याच दिवशी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या जातात.

तर अशीच ही एक गोष्ट, मला आवडलेली आणि लक्षात राहिलेली , तशी ही गोष्ट सांगितल्या गेली होती वेगळ्याच संदर्भात, पण मला मात्र लक्षात राहिली ती वेगळ्याच संदर्भात .जपान मधे सुशी नावाचा एक पदार्थ खूप प्रसिद्ध आहे असे.  हा पदार्थ बनवण्यासाठी एकदम ताजे फडफडीत मासे वापरले जातात.  कच्चे  मासे  असल्याने, ते अगदी ताजे असणे महत्त्वाचे असते. प्रत्येक बोटीवर पकडलेले मासे ठेवण्यासाठी एक जागा असते. मासेमारी साठी जातांना त्या रिकाम्या जागेत बर्फ भरून नेला  जातो आणि त्या बर्फात ठेऊन मासे आणले तर तर मासे डिकंपोझ होत नाहीत, म्हणून बर्फात ठेऊन आणण्याची  पद्धत आहे.

तर एका जपानी कोळ्य़ाने आपला सेल वाढवण्यासाठी एक युक्ती केली. समुद्रावर जातांना इतर कोळी बर्फाच्या लाद्या  भरून न्यायचे  त्याने तीच जागा मॉडीफाय करून त्या जागी  पाणी भरून त्या पाण्यामध्ये पकडलेले मासे ठेऊन आणणे सुरु केले. माशांना पुरेशी हवा मिळावी म्हणून  ती पण सोय केली.  समुद्र किनाऱ्यावर पोहोचे पर्यंत ते सगळे मासे अगदी संथ पणे पडून रहायचे पाण्यात पण  जिवंत रहायचे. जिवंत माशांना नक्कीच जास्त पैसे मिळायचे .

पण….. एका पंचतारांकित हॉटेल मधल्या  शेफ ने कम्प्लेंट केली या माशांची चव काही फार चांगली लागत नाही. मासे जरी जिवंत असले तरीही ते मेल्यातच जमा आहेत. अजिबात काही अ‍ॅक्टिव्हिटी नाही , काही नाही त्या मुळे त्यांच्या जिवंत पणाला पण काही अर्थ नाही. सुशी मधे काही खास चांगली चव लागत नाही या माशांची! त्या कोळ्य़ाच्या मनात विचार आला की  आता काय करावं?

त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली, मासे पकडल्यावर त्याने त्या माशांच्या टाकी मधे एक  बेबी शार्क पण टाकला.   त्या शार्क ने आपल्या सवयी प्रमाणे त्या टाकी मधे पण  इकडून तिकडे पोहोणे आणि  मासे खाणे सुरु केले, आणि त्या बरोबर टाकी मधल्या माशां मधे हालचाल सुरु झाली, ते इकडून तिकडे पोहायला लागले, आणि खूप अ‍ॅक्टिव्ह झाले. बेबी शार्क ने काही मासे जरी खाल्ले तरी पण   समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर जे मासे होते बोटी मधे शिल्लक होते ते एकदम अ‍ॅक्टीव्ह , अगदी ’फुल ऑफ लाइफ” होते, आणि ते अगदी त्या पंचतारांकित हॉटेल ला  हव्या असलेल्या क्वॉलिटी चे होते. कोळ्याला पण खूप चांगला भाव मिळाल्या त्याच्या माशांना.

झालं संपली गोष्ट!

मॉरल ऑफ द स्टॊरी :- एक शार्क  त्या पाण्याच्या टाकीत सोडल्याबरोबर  सगळे मासे अ‍ॅक्टिव्ह झाले 🙂

आजकालच्या कार्पोरेट लाइफ मधे पण असंच सुरु असतं नाही का? . कुठलीही कंपनी घ्या, शार्क च्या जागी “एच आर”, आणि माशांच्या जागी इतर एम्प्लॉइ कन्सिडर करा- आणि हो, तो शेफ  म्हणजे मॅनेजमेंट बरं का.  आणि पुन्हा एकदा वर लिहिलेली कथा  वाचून काढा

बेल आउट पॅकेज आणि भारतिय

Written by  on May 21, 2013

जग म्हणजे एक ग्लोबल व्हिलेज झालेलं आहे. कुठेही थोडं खुट्टं झालं की त्याचे दूरगामी परिणाम आपल्यावर होतात. जसे जेंव्हा ओबामाने बेल आउट पॅकेज डिक्लिअर केलं, तेंव्हाच  त्याचा मतितार्थ लक्षात आला की ते  आउट आऊटसोर्सिंग रिलेटेड आहे, त्याचा  सरळ परिणाम  हा भारतातल्या  जॉब मार्केट वर होणार हे निश्चित झाले.

जे एंप्लॉइज ऑन साइट होते, त्यांच्या नोकरीचे तसेही प्रॉब्लेम्स झालेले आहेतच.त्यांच्या पैकी बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, आणि इतरांच्या जाण्याच्या मार्गावर आहेत.

फिकी चे सेक्रेटरी मित्रा आणि ’स्वामिनॉमिक्स’ वाले ( रविवारच्या टाइम्स मधे लिहितात ते) स्वामिनाथन यांनी कालच्या एका टीव्ही वरच्या कार्यक्रमात   सांगितले की अमेरिकेतून जवळपास २००००आय टी प्रोफेशनल्सना  नोकरी वरून काढून भारतामध्ये परत पाठवण्यात आले आहे , आणि अजुन कमीत कमी त्याच्या चौपट परत पाठवले जाण्याची शक्यता पण  आहे .भारतामधे पण बऱ्याच आय टी  कंपनि  एम्प्लॉईज ना कमी करताहेत.कालच विप्रो ची पण बातमी ऐकली, ७०० लोकं कमी केलेत म्हणून..

ज्यांच्या कडे ग्रिन कार्ड आहे ते लोकं कसंही करून वेळप्रसंगी (कुठलंही )काम करून आपले दिवस काढतील , पण एच १ बी वाल्यांना मात्र परत  येण्याच्या शिवाय दुसरा तरणोपाय नाही..

ओबामांचे स्टेटमेंट की  जर कुठल्याही कंपनीला बेल आउट पॅकेज चा फायदा घ्यायचा असेल तर त्यांना तर त्या कंपनीला नोकऱ्या आउट सोअर्स करता येणार नाहीत. मित्रा यांच्या माहिती नुसार अमेरीकेतील जवळपास ९० ट्क्के कंपन्यांना ह्या बेल आउट पॅकेज ( ७००-  बिलियन डॉलर चा ) चा फायदा पोहोचणार आहे.केवळ ह्याच कारणा साठी    अजुन  बऱ्याच भारतीय आयटी प्रोफेशनल्स’ना नोकरी वरून कमी करण्यात येइल, फक्त “कधी?” हेच पहायचं.

ह्या बेल आउट पॅकेज ची कॉस्ट ही प्रत्येक टॅक्स भरणारया अमेरिकन ला ६५०० डॉलर्स पडणार आहे. ओबामाचे स्टेटमेंट अमेरिकेला आर्थिक डबघाई मधून बाहेर काढण्यास नक्कीच मदत करेल असं म्हणतात…..

भारताचे कॉमर्स सेक्रेटरी यांचे म्हणणे तर असे आहे की , जर ह्या बेल आउट  च्या परीणामामुळे फक्त एच  १ बी व्हिसा कमी होणार, आणि भारतीयांच्या नोकऱ्या जाणार  एवढाच  असेल .

सध्या बऱ्याच अमेरिकन्स नॅशनल्स ला जॉब्ज नाहित. त्यामुळे भारतिय लोकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा जसा आपल्या इथे मुंबई ला भैय्या लोकांच्या कडे पहाण्याचा आपला असतो तसा आहे.( थॅंक्स टु स्लम डॉग , न्युज चॅनल्स, बिबीसी.. इत्यादी ज्यांनी भारताची प्रतीमा अशी करण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत) लोकल लोकांना हे सगळे परदेशी एच १ बी वाले लोकं नको आहेत. जर यावर वेळीच अमेरिकन सरकार ने काही ऍक्शन घेतली गेली नाही, तर हेट क्राइम्स मधे नक्कीच वाढ होइल. लोकल लोकांना नोकरिवर घेतल्यावर सहाजीकच होम फ्रंटवर ओबामाला श्वास घ्यायला वेळ मिळेल.

सगळ्यात मोठा परिणाम होणार आहे तो बिपिओ वर . भारतामधे तर बिपीओ कंपनिज चे पेव फुटले आहे. दर नाक्यावर बिपिओ कंपन्या दिसतात. लहान लहान शहरात सुद्धा आय़ टी पार्कला सुरु करण्यात आलेले आहेत. सध्या म्हणजे बेसिक  कुठल्याही स्ट्रिम मधे ग्रॅजुएशन केल्यावर एक लहानसं ट्रेनिंग पुर्ण केलं की  बिपिओ मधे नोकऱ्या लागायच्या मुलांना. कमीत कमी १५ ते २५ हजार च्या दरम्यान पगार होता या सेक्टरमधे.ह्या इतक्या वाढलेल्या व्यवसायाचे मार्केट एकदम संपले, तर मात्र भारता मधेपण बेकारी वाढेल.आउट सोअर्सिंग बंद झाले की लाखॊ तरुण जे बिपीओ मधे काम करतात, ते रस्त्यावर येणार. हा सगळा इम्पॅक्ट अगदी एक्स्पेक्टेड आहे.

नुकताच ग्रॅज्युएट झालेला मुलाला किंवा मुलीला जर इतका पैसा हातात आला तर त्याचे तो जशी वाट लावता येइल तशी लावताना दिसतो. माइंड  स्पेस  हा मालाड वेस्टचा भाग. इथे बऱ्याच आयटी कंपन्या आणि बिपिओ ची ऑफिसेस आहेत.  लंच टाइम मधे तुम्हाला अगदी मुली सुद्धा नाक्यावरच्या भैय्या कडे सिगारेटी ओढतांना दिसतील.संध्याकाळी आपल्या मित्रा सोबत किंवा मैत्रिणीसोबत बार मधे किंवा पब मधे.. अशी असंख्य जोडपी दिसतील.जिन्स च्या पॅंट्स कमरे खाली, आतली अंतरवस्त्रं दिसणारी….  तुम्हाला लाज वाटत असेल तर तुम्हीच दुसरी कडे पहा….

पुर्वी मॅन पॉवर शॉर्टॆज मुळे आयटी प्रोफेशनल्स चे पगार अव्वाच्या सव्वा वाढवुन कंपन्यांनी लोकांना कामावर ठेवले होते. ईव्हन बेंचर्स ला सुध्दा साधारणपणे ३ लाखा पर्यंत पॅकेजेस देण्यात येत होते. पण आता टेक्निकल स्टाफ चा सप्लाय वाढेल ( वाढला आहेच) तेंव्हा आता आय टी क्षेत्रातले पगार कमी होतिल असेही मत त्यांनी व्यक्त केले.पूर्वी जे जॉब्ज हॉपिंग सुरु होते, त्याला आता काही काळ खिळ बसेल. हॉपिंग बंद झाले की मग मात्र थोडीफार स्टॅग्नन्सी येइल पगारामधे. दोन वर्षापूर्वी आयटी कंपनिज मधे पगारतील वाढ ही काही “सो कॉल्ड डीझार्विंग कॅंडीडॆटस” साठी ५०% च्या वर देण्यात आलेली होती. आता, अशी लक्झुरी विसरावी लागेल.

नेमकी हिच परिस्थिती आम्ही पाहिली आहे दुबई ,शारजाह,कुवेत मधे. तिथे पुर्वी चांगला पगार दिला जायचा इंजिनिअर्स ला. नंतर तिथे मल्लू लोकांनी जाउन कमी पैशामधे कामं करण्याची तयारी दाखवली आणि त्याचा सरळ इंपॅक्ट हा जॉब मार्केट वर झाला.(दिवसभर काम केल्यावर काही एक्स्ट्रॉ पैशा साठी हे लोकं अरबी लोकांच्या टॉयलेट्स साफ करायचे काम पण करायचे.) एकंदर भारतियांचे नोकरीच्या बाबतीत गल्फ मधे जे डीग्रेडेशन झाले आहे ,त्या साठी हे मल्लू लोक जबाबदार आहेत असे मला तरी वाटते.

मला एक सामान्य माणुस म्हणून काही प्रश्न आहेत. मागल्या वर्षी आय आय एम मधल्या काही मुलांना एक कोटी रुपयांचे पॅकेजेस ऑफर करण्यात आले होते. हे ऑफर करणाऱ्या कंपन्या या मेनली अमेरिकन कंपनिज होत्या. फक्त आय आय एम मधुन एम बी ए केलं की इतकं ज्ञान वाढतं कां की एकदम १ कोटी रुपये पगार ऑफर करावा? इतका पगार देणं म्हणजे लायकी पेक्षा जास्त पैसा देणं नाही कां?

तुम्ही केवळ आय आय एम मधुन पास आउट झालात म्हणजे काय तुम्ही इतके हूषार झालात का , की तुम्हाला एखाद्या मीड्ल स्केल कंपनीच्या एम्डी इतका पगार द्यावा? खरंच माझी तर बुद्धिच काम करित नाही

हा प्रश्न मला कित्येक दिवस छळत होता. दुसरे म्हणजे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज मधे नॉर्मल सॅलरी पॅकेज हे साधारणतः २ लाखापर्यंत देण्यात येते ट्रेनिंग पिरीयडमधे..तीच सॅलरी इन्फोसिस मधे २७००० रुपये ट्रेनिंग पिरियड ला होती.दुसरी गोष्ट म्हणजे, या आय टी कंपन्यांना बरे दिवस होते तेंव्हा या कंपन्यांनी आपले खर्च इतके वाढवून ठेवले आहेत( एम्प्लॉई वेल्फेअर साठी, इम्पोर्टेड कॉफि व्हेंडींग मशिन्स, फ्रि कुपन्स इत्यादी.. आता हा खर्च परवडण्या सारखा नाही.इंजिनिअरींग इंडस्ट्री मधे एक बिई मेक झालेला किंवा बिई ईलेक्ट झालेला मुलगा जेंव्हा जॉइन करतो , तेंव्हा त्याला मिळणारा पगार, फॅसिलिटीज  आणि बिई आय्टी, इत्यादी पास करून नोकरीवर लागणारा मुलगा ह्याला मिळणारा पगार ह्या मधे जमीन अस्मान चे अंतर आहे–की होते म्हणु?? कारण आता लवकरच हे अंतर कमी होण्याची चिन्हे दिसताहेत.

असो.. ह्या विषयावर जितकं लिहावं तितकं थोडंच आहे.

नविन वर्ष २०११ रिसोल्युशन्स

Written by  on May 2, 2013

नवीन वर्षाचा ठराव.. काय करावं बरं या वर्षी? काय धरावं आणि काय सोडावं ? असे हजारो प्रश्न मनात येतात.   जसे नवीन वर्ष जवळ येते तसे मागल्या वर्षीच्या ठरावाचे काय झाले हे आठवून आलेला गिल्टी कॉन्शस दूर ढकलून  या वर्षी तरी नक्कीच काहीतरी करायचं   एवढं  तरी आपण नक्की ठरवतो  .  खरं म्हंटलं तर  तुम्ही   काहीही ठरवले तर तसा  काहीच फारसा फरक पडत नाही, कारण     ठरवलेली गोष्ट    काही तीन चार दिवसापेक्षा  किंवा फार तर एखाद्या  महीन्या पेक्षा जास्त दिवस पाळली  जात नाही.

दर वर्षी नवीन रिसोल्युशन्स काय असावे म्हणून  उगीच कशाला डोकेफोड करायची, म्हणून मी इथे संभाव्य रेसोल्युशन्स लिहून  ’ऍज अ रेडी रेकनर’ म्हणून पोस्ट करतोय . तुम्हाला या पैकी ज्या योग्य वाटतील त्या गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता आणि जर काही सुटल्या असतील तर त्या कॉमेंट्स मधे नक्कीच ऍड करू शकता.  माझ्याबद्दल विचाराल, तर मी स्वतः सिरियल नंबर  ५६ पाळण्याचे ठरवले आहे.

१) नॉन व्हेज बंद करणे.

२) सकाळी उठून बेड टी बंद करणे, सदगुणी नवऱ्या प्रमाणे बायको जे कित्येक वर्ष ( २२ झाले की हो आता)  डोके फोड करून सांगते , की आधी दात घास मग चहा घे… ते मान्य करून तसे वागण्याचा प्रयत्न करणे.

३) सकाळी उठल्यावर पांघरूणाच्या घड्या करून ठेवणे.

४)चहा घेतल्यावर चहाचा कप सोफ्याखाली किंवा टिपॉय वर न ठेवता  सिंक वर नेऊन ठेवणे.

५) जेवायला बसायची वेळ झाली की पानं घेणे.

६)जेवण झाल्यावर टेबल आवरायला बायकोला मदत करणे. (डायनिंग टेबवल वरची भांडी किचन मधे नेऊन ठेवायला वगैरे.).

७)घरी आल्यावर आपली ऑफिस बॅग सोफ्यावर न फेकता आपल्या जागेवर ठेवणे.

८) पायातले बुट काढले की ते सो्फ्याखाली न सरकवता जागेवर नेऊन ठेवणे.

९) कुठलंही टिव्ही सिरियल बायको किंवा मुलींनी लावले की ते कुरकुर न करता, आणि त्यातल्या कुठल्याही घटनेवर, पात्रावर टीका न करता पहाणे. ( अगदी ससुराल गेंदा फूल सारखे बिनडोक सिरियल सुद्धा!, किंवा ते गोपी बहू वाले सिरियल सुद्धा !!)

१०) कधी बायको मुलांचे कपडे विकत घ्यायला गेलो की आणि त्यांनी विचारलं- ’हे चांगलं दिसते नाही कां? ” की सरळ हो म्हणणे आणि किंवा जर त्यांनी खालच्या पद्धतीचे वाक्य म्हंटले तर.. ’हे तसं बरं आहे, पण हे डिझाईन त्या रंगात हवे होते, किंवा ते डिझाईन या कपड्यात हवे होते तेंव्हा आपण सरळ म्हणायचं…. की हे काही तितकंसं बरं दिसत नाही ! अर्थात ही गोष्ट तितकीशी सोपी नाही- पण..

११) बायकोच्या किंवा मुलींच्या मैत्रिणीवर कॉमेंट करायच्या नाहीत, आणि तिच्या बाल मैत्रिणीवर तर अज्जीबात नाही…

१२) चहाचा कप विसळून ठेवावा की नाही? याचा विचार अजून पक्का झालेला नाही.

१३) मुन्नी बदनाम हुयी किंवा शीलाकी जवानी  गुणगुणलं की बायको करवादते, म्हणून ती गाणी अजिबात गु्णगुणायची नाहीत. मुन्नी काय नाचली आहे त्या गाण्यात…. असं सुद्धा म्हणायचं नाही. ( मुन्नीचा डान्स न आवडलेला पुरुष विरळाच 🙂 )

१४) बायकोने अहो तुमचं वय किती, इतक्या मोठ्या मुली झाल्या आ्हेत, आता तरी थोडं सिरियस रहाणं सुरु करा, असं म्हंटलं की खरंच तसं रहायचा प्रयत्न करायचा.. सिरियस रहाणे म्हणजे नेमकं काय हे समजलं नाही  अजून तरी मला , पण  तरीही बहूतेक फालतू जोक्स/पीजे  मारणे बंद करणे वगैरे काहीतरी असावं असा माझा अंदाज आहे !!?? ( जर कोणाला माहीती असेल तर मला कृपया सांगा)

१५) करण जोहर चे हाव भाव (कॉफी विथ करण मधले) पाहून त्याच्याबद्दल उगीच फालतू शंका घ्यायच्या नाहीत. ( हे खरंच शक्य होइल?)

१६) कुठल्याही फॅशन मधलं आपल्याला काहीच समजत नाही हे मान्य करणे आणि खरेदी करतांना मुलींचा/बायकोच्या सिलेक्शन वर कमेंट करणे टाळणे.

१७) कार ड्रायव्हिंग करत असतांना एखादा माणूस कट  मारून पुढे गेला , विचित्रपणे ओव्हरटेक करून गेला, किंवा अजिबात गर्दी नसतांना पण उगीच उजव्या  लेन मधे हळू हळू गाडी ड्राइव्ह करून ट्राफिकची वाट लावत असला -तरी  त्याच्या सात पिढ्यांचा उद्धार  ( गाडीत मुली /आणि बायको असतांना )करायचा नाही.

१८)  वाहतूकीचे  नियम शक्यतो मोडायचे नाहीत जसे…  पोलीस नाही, आणि  सिग्नल लाल असतांना सिग्नल मोडून गाडी पुढे काढणे, रॉंग साईडने ओव्हरटेक करणे वगैरे वगैरे…..करायचे नाही

१९) भाजीवाल्याशी  पाच रुपयेका कोथिंबर इतनाच आता क्या? म्हणून जर सौ. वाद विवाद घालत असेल तर आपण आपला तोल ढळू द्यायचा नाही.

२०) बायकोने नवीन साडी वगैरे नेसली , किंवा नवीन ड्रेस घातला की आवर्जून  तू कित्ती छान दिसतेस म्हणून कौतूक करायचे . (हल्ली ज्या कडे फारसं लक्ष दिलं जात नाही ती  ही एक गोष्ट!)

२१) न आवडणारी भाजी असली, तरीही न कुरकुर करता संपवायची.

२२) रवीवारी बायकोला आराम द्यायचा. म्हणजे काय की पोळ्य़ा करायला मावशी येतात, भाजी करणे आणि कुकर लावणे ही दोन्ही कामं करायची.

२३) रवीवारी बाथरूम/ टॉयलेट स्वच्छ करणे हे काम कोणी आठवण करून देण्यापूर्वीच करून टाकायचे. हे काम टाळायला म्हणून मुद्दाम सकाळी लवकर आंघोळ करून- मग.. सॉरी  हं.. अरे माझी आंघोळ झाली, आता विसरलो बघ.. असं बायकोला म्हणायचं  नाही.

२४) रवीवारी सकाळी ( रिपीट सकाळी )११ च्या आत बायकोला राग येण्याची वाट न  पहाता, आंघोळ करायची. उगीच दुपारी तीन चार पर्यंत टाइमपास करत बसणार नाही..

२५) लोकल मधे प्रवास करतांना  लॅपटॉप ची  बॅग मागे पाठीवर न लावता हातात घेऊन मगच चढेन, आणि  गाडीत असे पर्य्ंत बॅग पाठीवर लावणार नाही.

२६) लोकल मधे लोकांच्या पायावर पाय देऊन त्यांना बाजूला व्हा म्हणून सांगणार नाही.

२७)रविवारचे पेपर वाचल्यानंतर सकाळची पानं मटा मधे, मटाची पानं लोकसत्ता मधे घालून ठेवणार नाही. पेपर आले की आधी स्टेपलर घेऊन सगळ्या पेपरला स्टेपल करून ठेवीन.

२८) शिव्या देतांना ’भ’ कार युकत शब्दांचा वापर किंवा ’फ’ कार युक्त शब्दांचा वापर टाळायचा. अगदी फारच राग वगैरे आला तर, वेंधळा, मुर्ख, नालायक , अगदीच गेला बाजार भेंडी वगैरे शब्द्व वापरले तर चालतील.

२९)पार्किंग करतांना शक्यतो इतरांना त्रास होणार नाही अशा तर्हेने गाडी पार्क करणार

३०)कपाटात ठेवलेल्या इस्त्रीच्या कपड्यांच्या गठ़ठयात नेमका तुम्हाला सगळ्यात खालचाच शर्ट घालायची इच्छा होते ( ते का म्हणून ? ते मला पण माहीत नाही) तो शर्ट ओढून बाहेर काढतांना वरच्या कपड्यांची इस्त्री  खराब होते, म्हणून आधी वरचे शर्ट्स व्यवस्थित बाहेर काढून , हवा तो  खालचा शर्ट घेतल्यावर, वरचे कपडे व्यवस्थित लावून  कपाट व्यवस्थित लावून ठेवणे.

३१) रोज  सकाळी उठून व्यायाम करणे, फिरायला जाणे वगैरे वगैरे…

३२) सिगरेट तंबाखू सोडणे.. हे  बहुतेक सगळेस स्मोकर्स ठरवू शकतात. तसंही  म्हणतातच नां, की सिगरेट सोडणं फार सोपं आहे, मी हजारो वेळा सोडलेली आहे… 🙂

३३) शाळेतले कमीत कमी पाच  जुने मित्र शोधून काढीन .. जय गुगल बाबा..

३४) बायकोला  सुटीच्या दिवशी जास्तित जास्त वेळ देणे. घरी येऊन  उगीच ऑफिसच्या कामाच्या नावाखाली  उगीच लॅप्टॉप घेऊन  फेस बुक वगैरे साईट्स वर टाइम पास करत न बसणे.

३५) लोकांकडुन वाचायला म्हणून आणलेली पुस्तकं परत करणे .

३६) ब्रेकफास्ट मधे मुसली, किंवा ओट्स सारखे निरुपद्रवी पदार्थ पण कुरकुर न करता खाईन.

३७)  वजन कमी करणे.

३८) कम्पल्सिव्ह  शॉपिंग  टाळेन.गरज नसतांना शॉपिंग मॉल मधे गेल्यावर उगीच काहीतरी वस्तू विकत आणणे टाळेन.

३९) पि्झा, पावभाजी, बर्गर वगैरे  हाय कॅलरी जंक फुड, तसेच गोड पदार्थ  खाणार नाही.

४०) कमीत कमी ८ तास तरी रोज  झोपणे. रात्री  बेरात्री जागून नेट वर टीपी करणार नाही.

४१) एलिव्हेटर न वापरता पायऱ्यांनी वर चढेन  ( सात मजले… बापरे…. ! )

४२) कमीत कमी दोन तरी फॅमीली व्हेकेशन्स ??

४३) स्वतःचे सामान व्यवस्थित ठेवणे. बाहेर  निघतांना.. ” अगं, माझं पाकीट कुठे? कारची किल्ली कुठे आहे? सॉक्स ची पेअर बरोबर नाही, दोन्ही सॉक्स वेगवेगळे आहेत , सेल फोन कुठे आहे? , ” असे होऊ देणार नाही. स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवेन

४४) गेलेल्या वर्षात काय गमावले, याची काळजी करत  बसणार नाही. तर पुढल्या वर्षात काय  होईल याची काळजी करण्यात वेळ घालवीन.

४५) सुटी साठी अर्ज करतांना प्रत्येक वेळी तेच ते कारण देणार ्नाही. काहीतरी इनोव्हेटीव्ह कारण शोधून का्ढेन.

४६) एकाच वेळेस एकाच माणसाशी इंटरनेट चॅट, इ मेल, फोन वगैरे गोष्टींवर गप्पा मारणार नाही.

४७) प्रत्येक पार्टी मधे तेच ते जोक्स सांगुन लोकांना बोअर करणार नाही. लोकांना तेच ते जोक्स ऐकुन कंटाळा येतो याची मला जाणीव आहे.

४८) दिवसभरात फार तर फार एक तास इंटरनेट वर सोशल साईट्स वर घालवीन.

४९) टिव्ही वरचे काही खास प्रोग्राम्स  रेगुलरली फॉलो करीन. काही जुन्या प्रोग्राम्सचे ( जसे लिप्स डोन्ट लाय, फ्रेंड्स , कॅसल वगैरेचे)  जुने सिझन्स डाउनलोड करून पाहीन.

५०) एकाच गर्ल फ्रेंड / बॉय फ्रेंडला मी जास्त दिवस बोअर करणार नाही. शक्यतो सहा महीन्यात त्याला/ तिला डंप करून दूसरा फ्रेंड शोधेन.

५१) तुमची आई भेटली की  म्हणते नां, की “तू कित्ती बारीक झाला आहेस?? ” तर मग काही किलो वजन वाढवायला काय हरकत आहे? दररोज  कमीत कमी एक  आइस्क्रिम, आणि चार चॉकलेट  खाणे, सुरु करेन.

५२) सस्पेन्स सिनेमा आणि कादंबरीचा शेवट कोणालाच सांगणार नाही. अगदी सगळ्यात मोठ्या शत्रूला सुद्धा!  बरेचदा एखाद्याचा बदला घ्यायचा म्हणून शेवट सांगून टाकणे हा माझा छंद होता

५३) जेंव्हा  मला नाही म्हणायचे असेल तेंव्हा समोरच्याला काय वाटेल याचा विचार न करता सरळ नाही म्हणायला शिकणार.

५४)अंगातले काढलेले कपडे नीट हॅंगरवर लावून ठेवीन.

५५) नवीन टूकार सो कॉल्ड विनोदी – फार्सीकल नाटकं, सिनेमे पहाणार नाही.

५६) माझे नवीन वर्ष माझ्या वाढदिवशी सुरु होते, एक जानेवारीला नाही- म्हणून मला आता या क्षणी काहीच ठरवायची गरज नाही. 🙂 😉