सिव्हिक सेन्स

Written by  on April 30, 2013

civic senseआपल्या प्रत्येकाच्याच घरात वडिलधारे माणसं असतात. मग ते वडील  असो, आई असो, की आजी आजोबा असोत. आपल्या काही वाईट सवयीच्या मुळे त्यांना किती त्रास होतो ?? वय झालं की गुडघ्याचा त्रास हा बऱ्याच लोकांना सुरु होतो. गुडघ्याचा त्रास सुरु झाला की  मग मात्र जिने चढणं आणि उतरणं  ही एक शिक्षा होते.आधार घेतल्या शिवाय पाय टेकवला तर अगदी जीवघेण्या कळा येतात.

अरे बेटा  राजा, जरा मला घेउन चलतो का रे मंदिरात , असं आजी म्हणाली की मी लहान पणी पळ काढायचो. आज त्या गोष्टीचा खूप पश्चात्ताप होतो. वाटतं, थोडा वेळ दिला असता आजी ला तर काय झालं असतं?? अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या होऊन गेल्यावर आपल्याला खूप पश्चात्ताप होतो, आणि वाटतं.. अरे.. मी जर असं नसतं केलं.. किंवा असा नसतो वागलो तर किती बरं झालं असतं? पण आता वेळ निघून गेलेली असते आणि आपल्या हातात फक्त रहात ते पश्चात्ताप करणं!!!

समाजाचा सिव्हिक सेन्स जरा कमीच झाल्या सारखा वाटतो मला आजकाल..दुर कशाला, एक साधी गोष्ट घ्या.. पान खाऊन थुंकणे…   बरेच लोकं प्रवास करतांना कारची  खिडकी खाली करुन थुंकतात, मग ते मागच्या दुचाकी स्वाराच्या अंगावर उडल तरीही त्याची यांना काळजी नसते. दुचाकी स्वार पण काही कमी नाहीत, हेल्मेट तर मागे कॅरीयरला लावून ठेवलेलं असतं, त्यामुळे डावी कडे तोंड करुन पचकन पिचकारी मारतात, तेंव्हा पायी चालणाऱ्या लोकांच्या अंगावर वगैरे उडेल याची अजिबात त्यांना पर्वा नसते.आपली पिचकारी मारायची आणि भर्ऱकन निघून जायचं. जर एखादा माणुस मागून ओरडलाच तर इंग्रजांनी दिलेला एक शब्द आहेच ना साथीला. “सॉरी”!!

म्हाताऱ्या लोकांना जीने चढतांना किंवा उतरताना जिन्याच्या भिंतीचा आधार लागतो. माझे आई वडील जेंव्हा मुंबईला आले होते- मागच्या आठवड्यात तेंव्हा एके ठिकाणी आम्ही गेलो असतांना आईला भिंतीचा आधार घेउन उतरावा लागला होता जीना.जिथे गेलो होतो, ती एक दादरमधली खुप जुनी बिल्डींग होती. आणि त्या बिल्डिंगमधे रहाणारे पण अगदी १०० टक्के मराठी लोकंच होते. तरी पण इतका गलिच्छ पणा ?? काय फायदा आहे उगाच इतरांच्या नावे बोटं मोडण्यात?

भिंतिवर बऱ्याच ठिकाणी कोणी तरी *******ने (जितक्या  शिव्या असतीत तितक्या )भिंतीवर तंबाखू, पान, आणि बहुतेक गोवा खाऊन थूंकून   ठेवलं होतं.खुप राग आला, आणि वाईट पण वाटलं, की आपल्या देशात इतका पण सिव्हिक सेन्स असू नये?? आईला त्या घाणीने भरलेल्या भिंतीचा आधार घ्यावा लागला. वडिलांचे वय ८१ च्या वर आणि आईचे ७६ तरी असेल.त्यातल्या त्यात नशिबाची गोष्ट म्हणजे आईला दिसत ही नव्हते व्यवस्थित त्यामुळे तिला मानसिक त्रास तरी झाला नाही त्या  घाणेरड्या भिंतीवर हात टेकवल्याचा, ( बरं हात धरुन आधार दिलेला पण आवडत नाही या मोठ्या लोकांना).

आई जिना उतरत असतांना हे पाहिलं आणि हा प्रसंग कायम लक्षात रहावा म्हणून मागून फोटॊ काढला. तेंव्हाच ठरवलं होतं की यावर कधी तरी लिहायचं. पण राहुन गेलं. आज जेंव्हा जुने फोटो पहातोय तेंव्हा दिसला हा फोटो म्हणून आठवण झाली.

माझी एक कळकळीची विनंती आहे..  जर तुम्ही कोणी तंबाखू किंवा पान वगैरे खात असाल, तर या पुढे कृपया जिन्याच्या भिंतिंवर थुंकू नका. कदाचित उद्या तुमच्याच आई वडिलांना त्या भिंतीचा आधार लागेल… !!

काय सांगु आता??

Written by  on April 20, 2013

कोणाला कुठल्या गोष्टीचा आनंद होईल तेच सांगता येत नाही. माझ्या मोठ्या मुलीच्या  १८व्या वाढदिवसाला धाकटी ची कॉमेंट “अगं, म्हणजे तू आता ऍडल्ट सिनेमे पहाणार???” आणि सरळ  टाइम्स उघडला कुठला ’ए’ सर्टीफिकेट चा चित्रपट आहे ते बघायला…हसावं की तिला रागवावे हेच कळत नव्हतं.

धाकटी च्या दृष्टीने  ही एक फारच मोठी गोष्ट आहे….मोठी मुलगी आता ऑफिशियली ऍडल्ट झाली ना    , मग  तिला ‘A’ सिनेमा पहाता येईल ह्याचा आनंद  …..

कारण कुठलाही सिनेमा पहायची टूम निघाली की  लहान मुलगी पेपर घेउन बसते आणि हा ’A’ सर्ट आहे, तो ’AU’ आहे  किंवा ‘U’ आहे हे आधी पहाते. फारच ट्रान्स्परंट व्यक्तिमत्त्व आहे तिचं. म्हणूनच जरा जास्त काळजी वाटते. व्यवहारातले छक्के पंजे कळणं आवश्यक आहे. पण तिच्या मते अजुन तरी.. सगळंच  जग खूप   सुंदर आहे….तिला  तिच्या स्वप्नांच्या दुनियेतून वास्तवात आणायची इच्छा होत नाही अजुन तरी.. 🙂

आमचं चित्रपट पहायला जाणं म्हणजे पण एक मोठ्ठा कार्यक्रम असतो. आधी तर कुठला सिनेमा पहायचा हेच ठरत नाही लवकर. कुठला सिनेमा पहायचा  हे ठरवताना इन्फ्लुअन्स असतो तो मुंबई मिरर चा  किंवा बॉंबे टाइम्स चा. ह्या दोन्ही पेपर मधले रिव्ह्यूचं आणि त्याला मिळालेले स्टार्स हा एक डिसायडींग फॅक्टर असतो. आणि दुसरा म्हणजे मैत्रीण. जर तो चित्रपट एखाद्या मैत्रिणीने पाहिलेला असेल तर मग तिला विचारणं होतं. तिने सांगितले , की बराय.. तर मग आम्ही जाणार..!

मी बरेचदा समजावून सांगायचा प्रयत्न केलाय की , प्रत्येकाची आवड वेगळी असते, तेंव्हा तुम्ही स्वतः बघून चांगला की वाईट ते ठरवा .जो माणुस रिव्ह्यु लिहितो, बरेचदा तो प्रिज्युडीस माइंड ने पण लिहू शकतो.कांही दिवसांपुर्वी एक सिनेमा आला होता, अर्शद वारसीचा ’गोल’ नावाचा. टोटल  फ्लॉप गेला, पण चित्रपट मला खुप आवडला होता. एकदा टुरवर असतांना बघितला होता .

चित्रपटाच्या बाबतीत आमच्या मुलींचं  कुलदैवत म्हणजे हॅरी पॉटर.. ह्या चेटक्याची सगळी पुस्तकं अगदी पहिल्या दिवशी वाचली नाही तर अगदी आभाळ कोसळेल.प्रलय येउन जगबुडी होईल असं वागतात. सक्काळी उठून आधी इनऑर्बिट ला जायचं, तिथे त्या मॉल मधे हॅरी पॉटर च्या सगळ्या गोष्टी (चष्मा , कॅप वगैरे) विकत मिळतात पुस्तकांच्या  सोबतच. बरीच मुलं तर दुकानातच पुस्तकं उघडून पुस्तकं वाचणं सुरु करतात.

मी नेहेमी म्हणतो ना, तुम्हाला कुठलंही पुस्तक हवं असेल तर घ्या, मी पुस्तकं विकत घ्यायला कधीच नाही म्हणत नाही. कित्येक वर्ष घरी आर डी , ट्विंकल, सुरु आहेच. तसेच’ टेल मी व्हाय ’चे सगळे भाग, इन्सायक्लोपेडिया ( सिडी नाही-पुस्तक) पण आहेच. म्हणुन त्यांनी हॅरी पॉटरचं पुस्तक मागितलं तरीही नाही म्हणता येत नाही.

असो.. तर त्या हॅरी ने खरंच अगदी गारुड केलंय .  आणि तसेच हॅरी पॉटर चा सिनेमा आला की तो पण लवकरात लवकर पहाणं हा म्हणजे कुलधर्म असल्या प्रमाणे आम्ही वागतो.शक्यतो सिनेमा लागल्यावर अगदी पहिल्या येणाऱ्या सुटीच्या दिवशीच सिनेमा पहाणं अगदी कुळाचार असल्याप्रमाणे आम्ही सिनेमाची तिकिटं वेल इन ऍडव्हान्स बुक करुन ठेवणे हे काम हल्ली मुलीच करतात. सौ. ला हॅरी पॉटर   च्या गोष्टी पहाणं खुप बोअर होतं, अगदी ऍलर्जी आहे म्हणा ना! म्हणते त्या लिखाणाला साहित्यिक व्हॅल्यु नाही.. ( म्हणजे काय़ बुवा?). म्हणून हा सिनेमा दाखवण्याचं काम माझ्याकडेच असायचं. — असायचं?? हो! कारण आता माझी गरज रहाणार नाही त्यांना सिनेमा दाखवायला.. मुलं मोठी झाली, किंवा अगदी स्वावलंबी झाली तरीही एक पोकळी तयार  होते मनामधे.. ~! आई बाबांसोबत जाण्यापेक्षा मैत्रिणींसोबत जायला बरं वाटतं आता सिनेमाला वगैरे..मुलींना सिनेमाला घेउन जायचा आनंद आता मिस करणार तर!

हॅरी पॉटर थिएटर मधे तर जाउन पाहीलाच पण घरी सुद्धा कमीत कमी २५ दा तरी पाहिला असेल सीडी वर आणि चॅनल्स वर . कधीही लागला तरी पहातात त्या दोघी  हा चित्रपट!

हॅरि पॉटर ला ’चेटक्या’  हा सौ. चा शब्द आहे बरं कां! , तिच्य म्हणण्याप्रमाणे ह्या पुस्तकाला साहित्यिक व्हॅल्यु नाही. या पेक्षा आपल्या लहानपणची पुस्तकं पहा, फास्टर फेणे , किंवा गोट्य़ा वगैरे.. किंवा शामची आई वगैरे त्यांना एक साहित्यिक व्हॅल्यु होती. आजच्या मुलांना शामची आई वाच म्हंटलं तर कसली रटाळ भाषा आहे हो बाबा .. असं म्हणुन मोठ्या मुश्किलीने दोन तिन पानं वाचून ठेउन देणार..जुन्या पुस्तकातले लिखाण कुठल्या कॉंटेक्स्ट मधे आहे तेच कळत नाही मुलांना म्हणून ते वाचायचा कंटाळा करतात… तेच एखादे जॉन ग्रिश्म चं पुस्तकं आणलं तर त्यावर तुटून पडणार.. !मला वाटतं की जुनी मराठी पुस्तकं आजच्या रेफरन्स मधे पुन्हा नवीन मराठी मधे आणि इंग्रजीत लिहिली गेली तर बरं होईल ..कमीत कमी मुलं वाचतील तरी..

तर सांगत काय होतो, की सकाळी फायनल झालं की सिनेमा पहायचा आणि कुठला ते ही कळलं, की मग सुरु होतं.. क्लासेस च्या वेळा केंव्हा आहेत, दोघींचेही क्लासेस किती वाजता आहेत? आणि त्याप्रमाणे वेळ नक्की करतो. हल्ली तिकिटांचं बुकिंग फोनवर होतं , त्या मुळे  थिएटरवर बुकींगला जायची गरज नसते.बरं असतं. किती लहानशी गोष्ट पण किती कौतुक नाही कां? सिनेमाची तिकिटं घरी बसून बुक करता येणं ही एक अगदी लहानशी घटना.

या वरुन आठवलं, आम्ही लहान असतांना वाण्याच्या दुकानात तेलासाठी एक बरणी घेउन जायचो. तेल किलो च्या भावाने मिळायचे, मग तो वाणी आधी रिकाम्या बरणीचं वजन करायचा.. डाळ , किंवा गहू वापरुन . आणि नंतर मग किलोची वजन टाकून तेल मोजून द्यायचा. तेलाचा पिपा फक्त १५ किलोचाच मिळायचा. जेंव्हा १ किलो वगैरे ची पाकिटं मिळू लागली होती , तेंव्हा पण खूप आश्चर्य वाटायचं आणि आनंदपण  झाला(आता ती तेलाची बरणी घेउन जायची कट कट संपली म्हणून.. ). तेच झालं दुधाच्या बाटल्यांच्या बाबतीत, बाटल्या कधी गेल्या आणि पाकिटं कधी रुळावली गेली ते कळलंच नाही. वनस्पती तूप म्हणजे डालडा, ह्याचा एक लोखंडी डबा मिळायचा. नंतर मग प्लास्टिक ची बाटली मिळू लागली ( बोर्न्व्हिटाच्या बाटलीच्या आकाराची) ती पण नंतर बंद होऊन त्यांची जागा पण प्लास्टिक पाकीटाने घेतली. आपण कितीही म्हंटलं, तरीही प्लास्टिक हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहेच.

फार दुर कशाला, अगदी आत्ता आत्ता पर्यंत मिल्क मेड चा डबा मिळायचा. त्याची लिड ओपन करतांना खूप त्रास व्हायचा. सौ. चा केक बनवायचा  प्रोग्राम ( एग लेस ना.. मग मिल्क मेड हवंच) असला  की त्या डब्याची लिड उघडायचं काम माझं. आता आपल्या कडे , नुसतं हाताने ओढून त्याची लिड निघत नाही. तर त्याला चक्क ओपनर आणि एक हातोडी घेउन त्याच्याशी कुस्ती खेळावी लागते. ज्यांना हा अनुभव आहे ते माझ्याशी सहमत होतीलच. आणि हे मिल्क मेड पण इतकं घट्टं असतं की लवकर बाहेर पडत नाही. पण आता देवानेच आमच्या सारख्यांचे ऐकले अन मिल्क मेडवाल्यांनी पण लिड बदलेली दिसते. आता नुसता एक की रिंग सारखा गोल असतो, तो ओढला की डबा उघडतो, किती छान नाही?? तसेच प्लॅस्टिकच्या ट्युब मधे पण टुथपेस्ट प्रमाणे मिळतं मिल्क मेड. ही खास मुलांसाठी ( आणि त्यांच्या बाबांसाठी पण 🙂 ) येता जाता मिल्क मेड खायची केलेली सोय 🙂

लहान मुलगी अगदी कुठलेही नियम असो, फारच काटेकोर पणे पाळते. साधी गोष्ट आहे ,   एखाद्या वेळेस बाहेर फिरायला गेलो आणि अमुल आइस्क्रिम चे तयार कोन ( कोर्नेटॊ सारखे) घेतले, वेळ कमी, म्ह्णून चला लवकर बसा गाडीत इथे पार्किंग नाही.. असं म्हणत कारमधे बसलो, की मग त्याच्यावर रॅप केलेला कागद सुध्दा ती रस्त्यावर फेकत नाही. तो कागद हातात धरुन ठेवते, एखादी कचरा टाकायची जागा दिसे पर्यंत. बरं केवळ आपलाच नाही तर सगळ्यांचाच कचरा सांभाळायला पण तिची ना नसते.   मला वाटतं लहान मुलांचा व्हॅल्युज वर खूप विश्वास असतो. म्हणूनच इतकी कमिटमेंट असते त्यांच्यामधे.

बरेचदा काळजी वाटते, इतकं सुंदर निरागस मन, या समाजाचे टक्के टॊणपे न  खाताच निब्बर व्हायलाच हवे , पण तसं नसतं, प्रत्येक गोष्ट आपल्याच तऱ्हेने व्हायची असते..

धावते जग- बदलते विश्व…

Written by  on April 16, 2013

धाकट्या मुलीची ९ वी ची परीक्षा आटोपली अन तिला १० दिवस सुट्या आहेत , पण नेमकं त्याच वेळॆस मोठ्या मुलीचे सिईटीचे क्लासेस सुरु असल्याने कुठे जाता आले नाही.आत्ता पर्यंत दर सुटी मधे कुठे ना कुठे जाउन यायचा प्रयत्न करायचो, पण हल्ली मुली मोठ्या झाल्या झाल्यापासून ते बंदच झालंय.

बरं १० दिवस झाले की १ महिना शाळा आहे, म्हणे १० वी चा काही पोर्शन पुर्ण करायचा आहे. ज्या दिवसापासून हा १ महिना संपेल , त्याच दिवसापासून नेमकी क्लासेसची सुरुवात आहे,मला वाटतं अती होतंय हे.. थोडी तरी विश्रांती हवी की नको मुलांना??

रविवारी सकाळी धाकट्या मुलीला नाशिकला माझ्या लहान बहिणीकडे सोडून आलो. म्हंटलं ऍट्लिस्ट १० दिवस तरी थोडा चेंज होइल. तिला दोन्ही ऑप्शन्स दिले होते, म्हट्लं तुझी इच्छा असेल तर नागपुरला पण आजी कडे सोडून द्यायला तयार आहे , पण माझ्या बहिणीची मुलगी अगदी तिच्याच वयाची असल्यामुळे ’नाशिकाचा विजय झाला आणि तिला नाशिकला सोडले.

रविवारी रात्री परतणार होतो, पण मोठी भाची , जी सध्या लॉ च्या फायनल इयर ला आहे, आणि जिने टाइम्स ऑफ ईंडिया मधे लिखाण करुन स्व कष्टाने जमा केलेले पैसे उधळायचे म्हणुन थांबवुन घेतले. मला म्हणे , तुला सबवे चं खास सबवे स्पेशल सॅंड्विच खाउ घालते.. आता कोणी खाण्याच्या गोष्टी बद्दल म्हंटलं तर मग नाही कसं म्हणायचं?? म्हणून थांबलो नाशिकला! म्हट्लं , सोमवारी सकाळी निघू म्हणजे १० पर्यंत डायरेक्ट ऑफिसलाच पोहोचता येइल.

स्व-कष्टाने कमावलेलं ते चिकन टिक्का सॅंडविच आणि हॅम सॅंडविच ( भारतामधे हॅम म्हणजे चिकनचा पातळसा हॅम सारखा केलेला पिस.. अन सॉसेजेस म्हणजे पण चिकनचेच स्मोक्ड पिसेस असतात बरं का.. नाहितर उगाच गैरसमज…) ओट्स हनी ब्रेड सहित खाणं झालं. माझ्या ख्रिश्चन मित्रांकडे खाल्लेलं ऑलिव्ह ( जे ब्राइन वॉटर मधे प्रिझर्व केलं असतं ते ) अन हे पिकल्ड ऑलिव्हज मधे खुपच फरक पडतो.चवित खुपच फरक होता. मला ते साधे ऑलिव्ह अन ऑरेंज ज्युस च कॉंबिनेशन जास्त आवडतं. ही पिकल्ड व्हेजिटेबल्स मला तरी फारशी आवडत नाहित. पण चिकन टिक्क्का सॅंडविच मस्त होतं..

मला तसंही पिझा फारसा आवडत नाही . पण बर्गर मात्र( मॅक डी चं ) आवडतं . अर्थात गिव्हन अ चॉइस मी   बरगर  पेक्षा वडापाव किंवा नाशीकचा पाव वडा प्रिफर करेन. हो, सिडकोमधे जयंत कडचा पाव वडा खूप फेमस आहे असं माझी भाची नेहेमी सांगत असते…आणि तो खरंच चांगला पण असतो..

सोमवारी सक्काळी सक्काळी ५ वाजता मोबाइल केकाटला.. तसा निघायचं म्हणून उठलो होतोच, पण डिलरचा इंजिनियर होता, म्हणाला सर तुम्ही गेला नसाल तर थांबून जा.. एक मेजर फेल्युअर आहे.. वगैरे वगैरे…. म्हणून मुंबईला सकाळी जाणे कॅन्सल केले,विचार केला कामं आटोपून दुपारी निघावे. शेवटी संध्याकाळच्या पंचवटी चे रिझर्वेशन करुन टाकले नेट वर..आणि रात्री ११ वाजता पोहोचलो मुंबैला. आज बालिका बधु नव्हतं त्यामुळे काहीच टाइप केलं नाही.. घरी हा कार्यक्रम टिव्ही वर सुरु असला की दुसऱ्या खोलित बसुन मी नेक्स्ट डे चे पोस्ट टाइप करित असतो…!

आजकालचे दिवसात मुलांचे जे काही हाल होताहेत ते पाहून वाईट वाटते. पण एक गोष्ट आहे, जर आत्ताच अभ्यास केला नाही तर कधी करणार? दोन गोष्टी असतात, मी नेहेमी मुलींना सांगत असतो.. आता २-३ वर्षं मेहनत कराल , तर पुढचं पुर्ण आयुष्य सुखा समाधानात जाइल, आणि हे २-३ वर्ष आराम कराल,आणि आत्ता, मित्र मैत्रिणींबरोबर मजा कराल, अभ्यासाकडे दुर्लक्ष करुन कुठले तरी टुकार विषय घेउन ग्रॅज्युएशन कराल  तर पुढच्या आयुष्यात ’चांगल्या संधी’ कमी मिळतील…तेंव्हा हीच वेळ आहे अभ्यास करण्याची , एखाद्या चांगल्या कोर्स ला ऍडमिशन घेतली की पुढचं आयुष्य सोप्पं होतं..!

कधी कधी वाटतं की ह्या अभ्यासाच्या रगाड्यात मुलांचं बालपण कोमेजून जातं .नुसतं खेळणं , ऊंडारणं.. सगळं काही संपल्यातच जमा झालंय.. या वयात अर्थाअ मुंबई सारख्या   महानगरामध्ये मुलं करणार तरी काय म्हणा सुटी मधे? कोणी नातेवाइक आले तर वेळ बरा जातो मुलांचा, नाहितर  आई वडिल दोघंही ऑफिस मधे अन मुलं घरी…!

कोणे एके काळी, एस्सेल वर्ल्ड ही एक मोस्ट हॅपनिंग जागा होती मुंबई मधे. मुंबईकर मात्र एस्सेल वर्ल्ड सारख्या ठिकाणांना कोणी बाहेर गावचा पाहुणा आला, आणि त्याने जायचे आहे असे म्हंटले तरच फक्त भेट देतो. असे फार कमी वेळा होते की तुम्ही अगदी सहज ठरवून एस्सेल वर्ल्ड ला गेला आहात. माझ्या बाबतीत तरी मी स्वतः गेल्या १५ वर्षात फक्त एकदा ठरवुन एस्सेल वर्ल्ड ला गेलॊ होतो.

बरेच वर्ष झालीत, भायखळ्याची राणीची बाग पाहिलेली नाही. अर्थात त्या एस ब्रिज वरुन बरेचदा जाणं येणं होतं परंतु राणिच्या बागेत मात्र  जाणं झालं नाही. मी सुटीमध्ये पुर्वी लहान असताना माझ्या आत्याकडे मुंबई ला यायचॊ तेंव्हा राणिच्या बागेला व्हिजिट ही ठरलेली असायची. आत्याचे मिस्टर जे जे हॉस्पिटल ला सी एस होते, त्यामूळॆ त्यांचे घर पण जे जे च्या आवारात होते. राणिचा बाग घरापासून अगदी जवळ पडायचा.

सिध्दीविनायकाला तर बरेचदा जाणं होतं. पण महालक्ष्मी मंदिरात गेल्या ८ वर्षात गेलेलो नाही. तसेच भुलेश्वर, हॅंगिंग गार्डन , कित्येक जागा आहेत मुंबईच्या ज्यांना गेलेलॊ नाही. एकदा रविवारी सकाळी सगळ्या ठिकाणी एक धावती भेट द्यावी असा विचार गेले कित्येक दिवस करतोय.. पण बाबा, तुम्ही जाउन या, आम्हाला यायचं नाही.. असं ऐकलं की बस.. मग उत्साह संपून जातो.. अर्थात मुली आता मोठ्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांचे चॉइसेस पण बदलले आहेत हे विसरुन चालणार नाही..

मोठी मुलगी १२वी ची परीक्षा झाल्यावर मैत्रिणींच्या बरोबर दोन तिन दिवस फिरायला गेली . मला वाटलं होतं की बहुतेक सिनेमा वगैरे पहातिल परंतु सलग दोन तिन दिवस ह्या मुली ओबेरॉय आणि इतर शॉपिंग मॉल मधे फिरल्या.. आता हे शॉपिंग मॉल्स पण एक परिपूर्ण करमणुकीचे ठिकाण झालेले आहेत. सिनेमा हॉल्स –चुकलो, मल्टीप्लेक्स म्हणायचं त्यांना, खाण्या पिण्यासाठी फुड कोर्ट जिथे अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या खाण्यापिण्याची सोय असते.आणि सेंट्रली एअर कंडिशन्ड!मुंबईच्या मार्च हिट मधे ह्या पेक्षा जास्त काय हवे?? चेंजींग ट्रेंड आहे हा.. करमणुकीच्या कल्पना किती बदलताहेत नाही कालानुरूप?