नवस…

Written by  on March 29, 2013
navashya ganapati, nashik, नाशिक, नवशा गणपती

नवशा गणपतीजवळ बांधलेल्या नवसाच्या घंट्या..

नाशिकला एक गणपती मंदीर आहे, त्याला ’नवशा गणपत” म्हणतात- हा गणपती नवसाला पावतो अशी वंदता आहे. तसं हे  मंदीर मला काही नवीन नाही, पुर्वी पण इथे बरेचदा येऊन गेलो आहे- पण या वर्षी दिवाळीला नाशिकला होतो आणि दिवाळीत कुठल्यातरी देवाच्या दर्शनाला जायचं म्हणून पुन्हा ’नवशा गणपती’ चे दर्शन घ्यायचे ठरवले! कारण   माझा फार जास्त विश्वास आहे असे नाही, तर   पार्किंगची सोय चांगली आहे या  मंदीरात म्हणून.

मंदीराच्या पायऱ्या उतरल्या बरोबर काही   लोकं सत्यनारायणाच्या पूजेचा नवस फेडण्यासाठी पूजा  करत बसलेले दिसले. गणपतीला सत्यनारायणाच्या पूजेचा नवस?  काहीही होऊ शकतं आजकाल ! काहीतरीच विचार आपल्या डोक्यात उगीच येतात म्हणून तिकडे दुर्लक्ष केले, आणि तेवढ्यात समोर एका खांबावर बांधून ठेवलेल्या निरनिराळ्या आकाराच्या घंटा  दिसल्या.  या घंटा बहूतेक नवस पुर्तीसाठी बांधल्या गेल्या असाव्यात . इथे बहूतेक लोकं मुलगा व्हावा म्हणून नवस बोलतात, आणि तो पुर्ण झाला की इथे घंटा बांधतात.सहज मनात प्रश्न आला की जर नवस बोलूनही  एखाद्याला मुलगी झाली तर……… ???

मला एक प्रश्न नेहेमी पडतो, की कुठल्याही मंदीरात गेलात तरीही देव तर एकच आहे, मग केवळ काही स्पेसीफिक मंदीरातलेच देव का बरं पावतात- किंवा नवसाला रिस्पॉंड करतात? जर सगळे देव एकच आहे, तर मग कुठल्याही मंदीरात ला किंवा घरच्या  पुजेतला देव पण नवसाला पावला पाहीजे – नाही का?? पण  तसे असले तरीही ते लोकांच्या सहज पचनी पडत नाही, आणि लोकं ठरावीक मंदिरासमोर रांगा लावून उभे असतात.

देवांचे पण आपले बरे असते, मंगळवार हा मला देवीचा वार म्हणून माहीती होता, इथे मुंबईला आल्यावर मंगळवार गणपतीचा पण असतो आणि मारूतीचा पण कधी कधी असू शकतो हे समजले. ठराविक दिवशी ठरावीक देवांची पूजा का करायची हे तर कधीच लक्षात येत नाही. एक बाकी आहे, की नवस बोलतांना मात्र आज कुठला वार आहे, याचा विचार न करता, आपल्या आराध्य देवालाच नवस बोलला जातो . देवांनी आपले वार वाटून घेतल्याने भक्तांनाही बरे पडते- सगळ्या देवांची सारख्याच भाविकतेने पूजा करता येते  आणि आपापसात काही भांडण वगैरे होत नाही.

आमच्या घरी माझी आजी एकादशी चा उपवास करायची, एकादशी म्हणजे विष्णूचा उपवास, आणि नंतर दुसऱ्या दिवशी प्रदोष म्हणजे एकादशीचा दोष घालवायला म्हणून शंकराचे भक्त उपवास करतात, तो उपवास  पण करायची. कुठलाच देव    नाराज व्हायला नको अशी काहीशी भावना असावी 🙂

शिर्डीच्या साईबाबाला कोणा एका भक्ताने काही कोटी रुपये किमतीचे सोन्याचे सिंहासन भेट दिले ,तसेच    तिरुपती बालाजीला कोणीतरी एका भक्ताने हिरेजडीत मुकुट वाहीले अशी बातमी होती.  ह्या दोन बातम्या आणि आणि त्याच बरोबर काही महिन्यापूर्वी शिर्डीच्या मंदिरात झालेल्या केल्या गेलेल्या घोटाळ्याबाबत आणि त्या मधे  ट्रस्टीपैकी काही लोकांच्या   इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल  वाचलेले आणि तिरूपतीच्या पुजाऱ्याने केलेल्या करोडॊ रुपयांच्या अपहारा बद्दल पण आठवले -आणि मनात आले की  देवाला स्वतःचेच रक्षण करता येत नाही??. असो…   – थांबतो इथेच, नाहीतर मुद्दा पुर्णपणे डायव्हर्ट व्हायचा.

नवस बोलणे हे अगदी लहान असतांना पासूनच शिकतो आपण  . परीक्षेच्या दिवसात बोललेला नवस असो की पेपर चांगला जाऊ दे म्हणून किंवा मार्क्स कमी मिळाले म्हणून आईने रागावू नये म्हणून देवाची केलेली प्रार्थना पण नवसाचाच एक भाग म्हणता येईल. नवस हा पुर्ण करण्यासाठीच असतो असे नाही. म्हणजे तुम्ही पुर्ण कराल , तरीही ठिक आहे, नाहीतरी देव काही तुम्हाला विचारायला येत नाही – की कारे बाबा, तू का बरं पूर्ण केला नाहीस बोललेला नवस – हे विचारायला  .

नवस  हा साधारणपणे विसरण्यासाठीच असतो. तो  पुर्ण करायची आठवण ही फक्त पुन्हा काही संकट आलं की मग  येते . पुन्हा काही संकट आलं की आपल्या मनात पहिले हेच येतं की , की आपण पुर्वी बोललेला नवस पुर्ण केला नाही, म्हणूनच आता हे संकट आलंय पुन्हा- आणि नंतर पहिले काम म्हणजे लोकं आधी देवाकडे पोहोचतात माफी मागायला- नवस पुर्ण करायचा विसरलो याची आणि नवीन नवस बोलायला.

मी लहान असतांना समोरच रहाणारी मुलगी , तिने माझ्याकडे पहावे आणि माझ्याशी मैत्री करावी म्हणून बोललेला नवस  (देवा्पुढे साखर ठेवीन म्हणून 🙂 ) हा अगदी वयाच्या ११व्या वर्षी घडलेला प्रसंग आणि मला आठवणीत असलेला पहीला नवस! हा नवस बोलतानाच एक ’सेकंडरी- नवस’ म्हणजे  हा पण त्या पहिल्याच   नवसाचा दुसरा भाग पण होता – तो म्हणजे त्या मुलीने माझ्याशी माझ्या मित्रांसमोर बोलू नये हा… ! विनोदाचा भाग जरी सोडला तरीही असं व्हायचं हे मात्र अगदी खरं .आजही तुम्हाला चांगले कॉलेजमधे शिकणारी मुलं   सिद्धिविनायकाच्या रांगेत आपल्याला आवडलेल्या मुलीने आपल्याला  होकार द्यावा,  म्हणून उभे राहिलेले दिसतात.

माझं लहानपण यवतमाळला गेलं. तिथे आमच्या घरा शेजारुन वाहणाऱ्या मोठ्या नाल्या शेजारी असलेले ते पिंपळाचे झाड, आणि त्याचा सळसळ करणाऱ्या पानांचा आवाज -यांची   संध्याकाळी त्या झाडाखालून येतांना खूप भिती वाटायची. मग देवाला मनातल्या मनात नवस बोलला जायचा, मला सुखरूप घरी घेऊन जा, मग तुझ्या पुढे  साखर ठेवीन. अर्थात घरी सुखरूप पोहोचलो की मग तर पुर्णपणे विसरून जायचो हा नवस.. पुन्हा नंतर दुसऱ्यांदा त्या पिंपळा खालून जातांना ,आपण ठरवल्या प्रमाणे किंवा आधी कबूल केल्याप्रमाणे देवापुढे साखर ठेवली नाही ही गोष्ट आठवायची, आणि मग काय पून्हा एकदा दुसरा नवस,  देवाची मनातल्या मनात माफी मागून. 🙂

एक बाकी आहे, कमकुवत मनाच्या  आपल्याला   एखादे संकट आले की   हा  बोललेला नवस  खूप मानसिक सामर्थ्य देतो , आपला प्रॉब्लेम आपण एखाद्या ’भाईला’  सुपारी दिल्यावर जसा तो आपला प्रॉब्लेम राहात नाही ,   त्याच प्रमाणे देवाला  नवस   बोलला   की देव निश्चितच आपल्याला  समोर असलेल्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढणार  अशी काहीशी भावना/खात्री  असते आपली. आपल्या पाठीशी तो  आहे  ही खात्रीच आपल्याला   कितीही कठीण प्रसंगाला तोंड द्यायला मानसिकरीत्या तयार करते  .म्हणूनच बरेचदा अंध विश्वास म्हणून नाही, तर विश्वास म्हणून जरी कोणी देवाला नवस वगैरे बोलत असेल तर त्याची थट्टा करणे मी टा्ळतो .

आपले नेते आपल्याला देव मानतात 🙂 मी हे काय भलतंच लिहितोय असं वाटत असेल, पण तसे नाही . तुम्हाला खोटं वाटतंय का? अहो खरंच… असं बघा की जेंव्हा कधी इलेक्शन येते, तेंव्हा त्यांना तुमची आमची आठवण येते . मग ते येऊन तुम्हाला  खूप आश्वासनं देतात , कार्पोरेशन च्या इलेक्शन मधे रस्ते दुरुस्त करू, २४ तास पाणी देऊन, डासांचा नायनाट करू वगैरे वगैरे , आणि तेच विधानसभेचे इलेक्शन आले की मग मराठीचा कळवळा, महाराष्ट्रातला ऑक्ट्रॉय कमी करू   ,लोकलच्या गाड्यांच्या फेऱ्या   वाढवायला सरकारला भाग पाडू, अशी गाजरं  दाखवून मतांचा जोगवा मागितला जातो. एकदा निवडणूक झाली की मग त्या सगळ्या नेत्यांना पुन्हा तुमची पुढल्या निवडणूकी पर्यंत आठवण येत नाही.

जसे देवाला नवस बोलून लोकं विसरतात ,तसेच ते नेते  लोकं पण देवरूपी मतदाराला दिलेला आपला वचननामा, जाहीरनामा विसरून स्वतःच्याच विश्वात रममाण होतात. नेत्यांना  पण  याची पुर्ण खात्री असते, की ह्या जाहीर नाम्यातले ९० ट्क्के काम जरी केले नाही तरी काही फरक पडणार नाही कारण पुढल्या इलेक्शन पर्यंत सगळे मतदार   देव   आपण दिलेली वचनं   विसरून जातील याची खात्री असतेच, आणि समजा नाही विसरले तर मग पुन्हा एकदा  नवीन नवस बोलल्याप्रमाणे , हाच जाहीरनामा पुन्हा नवीन नवसा प्रमाणे नवीन वेष्टणात गुंडाळून मतदार देवाला दाखवायचा -झालं!!! ………….
जाऊ द्या .. चालायचंच…

विचार करण्याची क्षमता..

Written by  on March 13, 2013

प्रत्येकामध्ये  विचार करण्याची क्षमता असते. मग ते विचार चूक असो किंवा बरोबर असो! प्रत्येक  घटनेवर प्रत्येकाची  मतं असतात,  काही ना काही तरी विचार पण  असतातच. बरेचसे लोकं आपल्या या विचारक्षमतेचा वापर करतात आणि बरेचसे नाही… का करत नाहीत? याची बरीच कारणं आहेत.

बरेचसे  लोकं आपले विचार  चूक असतील तर ? किंवा लोकं काय म्हणतील ? या भीतीने  कधीच   व्यक्त करत नाहीत आणि स्वतः पुरतेच मर्यादित ठेवतात,  आणि इतरांच्या विचारांना सरळ हो म्हणून  मोकळे होतात. स्वतःमध्ये असलेल्या या क्षमतेचा आपण  पुरेपूर  उपयोग करून घेतो का? आणि कितपत?  हा प्रश्न सगळ्यात जास्त महत्वाचा आहे

आपली मानसिक क्षमता कमी आहे म्हणून असे होते का?  आपली विचार शक्ती वापरायचा आलेला कंटाळा ? की स्वतःच्या निर्णय क्षमतेवर असलेला अविश्वास? की मिलियन डॉलर प्रश्न, की जर माझे विचार चूक असतील तर  लोकं काय म्हणतील ही  मनामधे असलेली एक मुलभूत भीती?

विनोदाचा भाग जरी सोडला तरीही  लग्न झालेल्या प्रत्येकालाच हा अनुभव  नेहेमीच  येत असतो, विशेषतः बायको मुलांसमोर बोलताना 🙂

बऱ्याचशा बाबतीत आपली मते फारच दृढ असतात.आपली  मते ज्या गृहितकावर आधारलेली असतात, ती गृहितके जरी चूक असली तरीही आपले मन  काही ते मान्य करायला तयार नसते . बरेचदा तर घेतलेले निर्णय    सोसायटी ड्रिव्हनही असतात.  म्हणजेच इतरांच्या अनुभवावरून आपले मत /निर्णय ठरवले जातात. इथे स्वतः विचार करण्याची गरज  नसते तर दुसऱ्याने  प्रदर्शित केलेले मत, किंवा आत्मसात केलेला विचार  फारसा विचार न करता मान्य करायचा  असा प्रकार असतो .   त्याने निर्णय घेतला ना, मग मी  पण तसाच घेतो म्हणजे त्याचे होईल ते माझे पण होईल . असेही असते. एका मेंढीच्या मागे जशा सगळ्या मेंढ्या जातात  (कळपाचे मानसशास्त्र)तसेच आहे हे .उदाहरणार्थ लहान गावातला शेतकरी ट्रॅक्टर  विकत  घेतांना  निर्णय कसा घेतो- तसेच! याला काय  वैचारिक किंवा मानसिक गुलामगिरी म्हणायचं का? नाही.. तसे नाही.

याची  सुरुवात कशी होते  ते पहाणे मजेशीर ठरेल!  एक कारण आहे व्यक्तीपूजे पासून.  एखाद्या नेत्याचे जर तुम्ही अनूसरण करत असाल तर त्या नेत्याने जे काही म्हंटले ते मान्य करण्याची परवानगी तुमच्या सबकॉनशस माईंड ने कॉन्शस माईंडला देऊन ठेवलेली असते. त्या मुळे तुम्हाला  नेत्याचे प्रत्येक वाक्य  ब्रह्म वाक्य आहे असे वाटते आणि ते बरोबर आहेच असे गृहीत धरुन अजिबात सारासार विचार न करता -तुमचे मन ते  सरळ मान्य करून टाकते. मग नेत्याचे विचार जरी चुकीचे असले तरीही!

आपला समाज हा अतिशय  भावना प्रधान आहे आणि    एखादी लहानशी घटना पण सामाजिक उलथापालथ घडवून आणू शकते. भावना दुखावण्यासाठी साठी  अगदी लहानसे कारणही पुरेसे ठरू शकते.

एखादी चूकीची गोष्ट समाजाला सारखी उगाळून सांगत राहिले की समाजाचा त्या घटनेकडे पहाण्याचा दृष्टीकोन तयार होतो. या मधे दूरदर्शन, वृत्तपत्रे ही माध्यमं पण खूप कारणीभूत ठरतात. कळत न कळत समाज मनावर या माध्यमांचा खूप परिणाम होतो. एखाद्याला तुम्ही सारखं कानी कपाळी ओरडून सांगितलं की तुझा अपमान होतो आहे, की मग  समाजातल्या त्या घटकाला त्याला प्रत्येकच गोष्टीत आपला अपमान होतोय असे वाटू  लागतं.

एखाद्या घटनेबद्दल स्वतःचे मत ठरवताना कुठल्याही प्रकारे पूर्वग्रहदूषित न ठेवता विचार  केला तर त्या प्रत्येक प्रॉब्लेमचे योग्य उत्तर मिळू शकेल.  जर तसा विचार केला तरच   तुमचे स्वतःचे विचार इतरांपेक्षा वेगळे असतात हे  लक्षात येईल.

बरेचदा आपले वेगळे विचार कुठे बोलून दाखवले तर   मग त्या लहानशा घटनेचा संदर्भ तुमच्या लॉयल्टीशी /देशप्रेमाशी जोडला जातो.   तुम्ही  समाज द्रोही /देश द्रोही , तसेच स्वतःच्या संस्कृती बद्दल अभिमान नसलेले म्हणून हिणवले   जाऊ शकता.    जेंव्हा  तुम्ही एका जथ्थ्याचा भाग होऊन वहावत न जाता स्वतः विचार करता – म्हणून तुमच्याकडे पहाण्याचा इतरांचा दृष्टीकोन एकदम वेगळा होतो .

नुकताच सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला जेम्स लेन वर.  सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे तेवढे एक वाक्य ( जे पण ऐकीव   गोष्टींवर अवलंबून आहे ते )  सोडले तर त्या पुस्तकामध्ये काहीही आक्षेपार्ह नाही. ते एक सर्वसामान्य इतिहासाचे पुस्तक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे आता ते वाक्य वगळून ते पुस्तक लवकरच प्रसिद्ध केले जाईल. जर कोणी सुप्रीमकोर्टाचा निकाल योग्य आहे असे म्हंटले तर त्याला मराठी द्वेष्टा, शिवरायांच्या बद्दल आदर नसलेला वगैरे असा केला जाईल. त्याचे विचार पुर्णपणे समजून न घेता.   खरे तर या विषयावर लिहायचे म्हणून  सुरु केलेले पोस्ट असे तयार झाले. लिहून झाल्यावर लक्षात आले की कालचे पोस्ट पण अशाच प्रकारचे होते.असो..

पुतळ्यांचं राजकारण

Written by  on March 10, 2013

भंडारकर संस्था पुणे! या ठिकाणी खूप जुने आणि दुर्मीळ दस्ताऐवज होते . संभाजी ब्रिगेड च्या काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या संस्थेला आग लाऊन सगळी जुनी कागदपत्र जाळून टाकली. या ठिकाणी शिवाजी , पेशवे कालीन जुन्या नोंदी हस्तलिखीताच्या स्वरुपात होत्या.

जेम्स लेन ला एक ग्रंथ लिहीण्यासाठी या संस्थेने सहकार्य केले, म्हणून त्या सगळ्या ग्रंथ संपदेला जाळून टाकण्यात आले. संभाजी ब्रिगेड ने हे काम कां केले असावे? ऑफ कोर्स स्वतःची न्युसेन्स व्हॅल्यु दाखवायला! .आणि स्वतः कसेही करून लाइम लाइट मधे रहाण्यासाठी यांनी हे केलं असावं. जेंव्हा हा एपिसोड झाला, तेंव्हा या ब्रिगेडला कोणी फारसं ओळखत नव्हतं. दादोजी कोंडदेव हे शिवाजीचे गुरु नव्हते, आणि रामदास स्वामींच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम हे नेहेमीच करतात. दादोजी कोंडदेव पुरस्काराचे नांव बदलायला पण यांनी शासनाला भाग पाडले होते.

यावर एकच वाटतं, की इतिहासातल्या  एखाद्या महापुरुषाला ,एखाद्या जातीच्या दावणीला बांधायचे आणि मग त्याचा राजकारणासाठी उपयोग करून घ्यायचा. हे लोकं श्री रामदास स्वामींना पण खूप शिव्या घालतात तेंव्हा, त्यांनी जर बाबासाहेब पुरंदऱ्यांना पण शिव्या घातल्या तर त्या मधे कांहीच आश्चर्य नाही.

आप्पा, तुम्ही गेलात, फार बरं झालं हो, नाही तर गोनिदा पण ब्राह्मण म्हणून शिवाजी महाराजांच्यावर कांहीच लिहिण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार नाही , असं ह्या  लोकांनी म्हट्लं असतं. शिवराळ  भाषा, ही या लोकांचे शस्त्र आहे. सभ्य माणसांप्रमाणे बोलणे किंवा वादविवाद यांना जमतच नाही. पण एक आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे  काही नेते लोकं मिळून यांना फार मोठं करताहेत. अर्थात काही दिवसांनंतर मात्र हे आपल्याच ’आका’लाच गोत्यात आणतील..

पश्चिम महाराष्ट्रात जसे शिवाजी चे प्रस्थ आहे, तसेच विदर्भात आंबेडकरांचे आहे. प्रत्येक शासकीय ठिकाणाला आंबेडकरांचे नांव द्यावे असा आंबेडकरी मंडळींचा आग्रह असतो. माझा सगळ्यात जवळ्चा अगदी लंगोटीया मित्र नवबौध्द आहे. अगदी लहान पणा पासून एकमेकांच्या स्वयंपाकघरापर्यंत जाणं येणं होतं. आता तो सध्या एक मोठा प्रतिथयश डॉक्टर आहे. तो नेहेमी म्हणतो, आमच्या जातीमधल्या अर्ध शिक्षित किंवा अशिक्षित लोकांना बहकवून त्यांना अशा कुठल्या तरी फालतू वादामधे अडकवून आपले स्वार्थ साधायचे , हाच आमच्या नेत्यांचा प्रयत्न असतो.

इथे दोन फोटॊ पोस्ट करतोय..

ambedakar

नागपूरचे विमान तळ हे बाबासाहेब आंबेडकर विमान तळ झाले आहे. मागच्या नागपूर भेटीत रेल्वे स्टेशन समोरुन जातांना, फ्रंट साइडला एक  फोटो दिसला. इथे पोस्ट करतोय. तसेच मुंबईला ही एक जाहिरात लावलेली दिसली. तिचा पण फोटो पोस्ट करतोय…Nagpur Railaway station

एकच विचारावंसं वाटतं , की असे पुतळे उभे केल्याने काय अचिव्ह होतं- हे मला तरी समजत नाही. मराठवाडा विद्यापिठाचे नांव बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठ करण्यात आलंय, त्याने काय दलित वर्गातल्या  लोकांचा शिक्षणाकडे ओढा वाढला क? असे प्रयत्न केले पाहिजे की सगळ्यांना शिक्षणाची महती कळेल,  आणि बाबासाहेबांना पण हेच अपेक्षित होतं.. पण नेमकं हेच विसरुन आपण मात्र आता पुतळ्यांच्या राजकारणाला सर्वस्व मानतोय..

आंबेडकर किंवा शिवाजी महाराज ऑलरेडी मोठे आहेतच. त्यांना असल्या खोट्या मोठेपणाची कांहीच गरज नाही. ह्या शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी मुळे मोठेपणा जर कोणाला मिळणार असेल तर तो आहे एखाद्या नेत्याला.  महाराजांच्या नावावर मतांचा मलिदा खायला मिळावा, म्हणून हा सगळा प्रयत्न असावा..

शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला काय किंवा केला नाही तरीही त्यांना काहीच फरक पडत नाही. फक्त राजकारणी मात्र आता या घटनेचा फायदा करून घेण्यासाठी मराठा- ब्राह्मण तेढ वाढवायला करुन घेताहेत.. असो..

या सगळ्या राजकारणात चार दोन टाळकी फुटतील,  चार-दोन मुडदे पडतील , नंतर मग  त्या शिवाजीच्या पुतळ्याशेजारीच एक लहानसं शहीद स्मारक पण उभं केलं जाइल शासना तर्फे- ज्या वर हुतात्मा झालेल्यांची नावं पण असतील. श्रध्दांजली म्हणून…. वर्षातून एकदा या स्मारकाची सफाई केली जाईल, त्याला हार फुलं वाहिली जातील.

महाराजांचा पुतळा मात्र हे सगळं बघून मनातल्या मनात ्हसेल, म्हणेल- मुर्खांनॊ, तुम्हाला   शिवाजीची शिकवण हीच  समजली का रे??

नंतर सारं सारं कसं शांत शांत होईल…