दिल है छोटासा- छोटीसी आशा…

Written by  on February 17, 2013

त्यांचा काय दोष?? वय फक्त ३ ते १८ . जगण्याची प्रचंड लालसा. कोणाला मोठं होऊन डॉक्टर व्हायचंय, कोणाला पोलिस इन्स्पेक्टर बनून गुन्हेगारांना हातकड्या घालायच्या आहेत. कोणी म्हणतंय की मला तर पायलट व्हायचंय आणि विमान उंच उंच आकाशात उडवायचय. हे इथे का लिहतोय? प्रत्येकच मुलाचं स्वप्न असतं – असंच काहीतरी करायचं.
म्हणतात नां, मॅन प्रपोझेस , गॉड डिस्पोजेस!!  असंच काहीतरी होतं, आणि होता होता हातातोंडाशी आलेला घास खाली पडतो. एखाद्याला कॅन्सर, थॅलेस्मिया ( बहुतेक बरोबर लिहिलं असावं) किंवा तसाच एखादा जीवघेणा आजार होतो. तळ हातावरची आयुष्य रेषा एवढी तोकडी का? असं उगाच वाटायला लागतं.

ख्रिस्तोफर- पहिली मेक अ विश ची केस

ई.स. १९८० , अरिझोना- ७ वर्ष वयाचा एक लहान मुलगा- क्रिस्टोफर… ब्लड कॅन्सरने आजारी.अगदी थोड्याच दिवसांचा सोबती. सगळ्यांनाच कल्पना होती, की हा आता फारतर महिना – दोन महिने सोबत रहाणार. ऍरिझोनाच्या डिपार्टमेंट ऑफ पब्लिक सेफ्टी ने एक जगावेगळं पाउल उचललं. त्या मुलाच्या मापाचा कस्टममेड युनिफॉर्म तयार करण्यात आला,  हेल्मेट, बॅज वगैरे सगळं काही. त्याच सोबत एक हेलिकॉप्टर राईड सुध्दा. एक दिवस त्या मुलाला पोलीस इन्स्पेक्टर म्हणून काम करु देण्यात आलं. त्या मुलाची आयुष्यातली सगळ्यात मोठी इच्छा पुर्ण केली गेली!!

त्या मुलाची इच्छा पुर्ण केल्यानंतर त्याच्या चेहेऱ्यावरच ह्सू, आनंद बघून एका सोशल गृपला इन्स्पायरेशन मिळालं, की आपण असा एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन सुरु करू शकतो, की जी अशा अगदी (टर्मिनली इल) मृत्युच्या छायेतल्या पेशंटसच्या इच्छा पुर्ण करेल. पण…प्रत्येकच गोष्टी मधे एक पण असतोच. जरी सगळे लोकं एकाच विचाराचे असले तरीही अशी ही मेक अ विश फाउंडेशन ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.worldwish.org/)चे पहिले चॅप्टर  तीन वर्षा नंतर म्हणजे अमेरिकेत १९८३  मधे सुरु होऊ शकले.

कुठलाही मुलगा, किंवा मुलगी ज्यांना फिजिकल किंव इतर कुठलाही आजार आहे, आणि त्यांची वयाच्या १८ वर्षाच्या पेक्षा जास्त जगण्याची शक्यता नाही,  त्यांच्या इच्छा जाणून घेउन पुर्ण करण्याचे काम ही ऑर्गनायझेशन करेल असे ठरले.

मधुलिका लतादिदींना भेटतांना

त्या नंतर थोड्याच दिवसात या ऑर्गनायझेशन ने आज पर्यंत जगातल्या १लक्ष एकोणनव्वद हजार मुलांच्या इच्छा पुर्ण केल्या आहेत. या इच्छा कुठल्या प्रकारच्या होत्या?? तर मला लोकल ट्रेन चालवायची आहे, विमान उडवायचं आहे, एखाद्या मोठ्या आयडॉलला भेटायचंय, कोणाला लॅप टॉप हवाय, कोणाला न्वीन पडदे हवे आहेत रुमला, स्नो बोर्डिंग, सफारी , वगैरे विश तर आहेतच , पण सोबतच  अगदी लहान विश पासुन तर कुठलीही मोठी विश पुर्ण करण्याइतका पैसा आणि इच्छा शक्ती त्यांच्याकडे आहे.आज अशी परिस्थिती आहे की हे लोकं सध्या दर ४० मिनिटाला एक विश पुर्ण करताहेत – अशा मुलांची!!

नवनित

एका  नवनीत नावाच्या मुलाला कॅसीओ हवा होता. आणि तो पण मिलिंद सोमण कडुन.. तसेच मधुलिका नावाच्या एका मुलीला लता दिदींना भेटायचं होतं, लतादीदींनी ताबडतोब होकार दिला. मधुलिकाची परिस्थिती इतकी वाईट होती, की दुसऱ्याच दिवशी लतादीदी ची अपॉईंटमेंट घेउन तिची भेट घालुन दिली गेली. तिच्या चेहेऱ्यावर  लता दिदी भेटल्यावरचं सफलतेचं हसू बघा.जेंव्हा लता दिदी भेटल्या, तेंव्हा तर मधुलीका  आधी अगदी रडायलाच लागली होती.

काजोलची भेट .. स्मृती दालमियास्मृती दालमिया. हिला काजोलला भेटायचं होतं. तब्येत इतकी वाईट की ती प्रवास करु शकत नव्हती, तेंव्हा काजोल स्वतः तिला दवाखान्यात जाउन भेटली.भेट जवळपास पंधरा मिनिटे चालली. नंतर अगदी थोड्याच दिवसात………..!!!!

पुनित.. वय वर्ष दहा. याची इच्छा होती झाकीर हुसेन कडून तबला शिकायची. पंडीतजींनी त्याला भेटून खास तबला शिकवला. ह्या घटनेमुळे ते इतके हेलाउन गेले की ते या संस्थेशी संलग्न झालेले आहेत.

पुनित पंडीत झकीर हुसेन कडुन तबला शिकतांना

’मेक अ विश’ या एनजीओ ने भारतामधे आजपर्यंत २८०० च्या वर इच्छा पुर्ण केल्या आहेत. बरेच सिलेब्रिटिज पण ह्या संस्थेशी जुळले आहेत. अजय देवगण हा पण त्या पैकीच एक. असं ऐकण्यात आलंय की जेंव्हा एका मुलाने माधुरी दिक्षितला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, ( तिचं करिअर तेंव्हा अगदी अत्युच्च पातळीवर होतं) तेंव्हा तिने भेटण्यास तयारी दर्शवली नव्हती. असो.

हे सगळं  म्हणजे वर दिलेल्या घटनां प्रमाणे घटना, आपण नेहेमी वाचतो. काही दिवसांपूर्वी मुंबई मिररला एक बातमी होती. एका लहान मुलाला लोकल ट्रेन चालवायची इच्छा होती ती पुर्ण केली या लोकांनी. तेंव्हापासून कुतुहल होतं, की यांचं काम चालतं तरी कसं?? हे समजून घ्यायची.

या लोकांना समजतं कसं? की कोणाची काय विश आहे ते? कुठलाही मुलगा किंवा मुलगी ज्यांनी इतर कोणाकडुन आपली विश पुर्ण करुन घेतली नसेल अशाच लोकांना अप्लाय करता येतो.  या साठी मुलाचे आई वडिल, नातेवाईक, वेल विशर्स वगैरे या एनजीओ कडे अप्ला करु शकतात. या साठी डॉक्टरांचं मत पण विचारात घेतलं जातं. त्या मुलाला किंवा मुलीला लाइफ थ्रेटनिंग आजार झाला असेल तर त्या मुलाच्या विशचा विचार केला जातो.

मुलाची कुठली विश असु शकते?? अगदी सिंपल रुल आहे,

१) माझी इच्छा …. अमुक ठिकाणी जाण्याची आहे.

२) माझी इच्छा .. मला ही गोष्ट हवी आहे .

३)माझी इच्छा … अमुक माणसाला – (सिनेमा हिरो,नेता,खेळाडु वगैरे कोणीही) भेटायची आहे.

४)माझी इच्छा…  .. ( ट्रेन ड्रायव्हर, पायलट वगैरे काहीही … असु शकते हे ) हे व्हायची आहे..

मुलाची खरी विश काय आहे?? हे कसं समजतं? अगदी सोपं आहे, या एनजीओ चे वॉलेंटीअर्स आहेत, ते त्या मुलाला बरेचदा भेटून गप्पा वगैरे मारतात आणि त्या मुलाच्या मनातली खरी खरी इच्छा जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. एकदा ती इच्छा माहिती झाली , की मग ती पुर्ण करण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला जातो.

ऑन लाइन ऍप्लिकेशन ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.wish.org/refer/referral_form) करण्याची पण सोय आहे. जर तुमच्या माहितीतला कोणी असेल तर त्यांना ही माहिती देउ शकता, किंवा त्यांच्या ऐवजी तुम्ही पण हा फॉर्म भरु शकता..

दिल है छोटासा- छॊटीसी आशा, चांद तारोंकॊ छुनेकी आशा……आणि या   आशा पुर्ण करणाऱ्या ह्या   ऑर्गनायझेशन्स चं कौतुक  केल्याशिवाय रहावलं नाही म्हणून हे पोस्ट..

कठिण निर्णय

Written by  on February 10, 2013

एका रेल्वेच्या ट्रॅक शेजारी काही मुलं खेळत होती. दोन ट्रॅक्स होते , त्या पैकी एक वापरात ला होता, तर दुसरा   ट्रॅक वापरात नसलेला!  काही मुलं  (१५-२० तरी असतीलच ) जी त्या वापरात असलेल्या रेल्वे ट्रॅक वर खेळत होती पण फक्त एक मुलगा त्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळत होता.

तुम्ही अशा जागी  उभे आहात की तुम्ही रेल्वे चा ट्रॅक बदलू शकता .  तुम्हाला   समोरून एक ट्रेन धडाडत येतांना दिसते. तुम्ही काय कराल??तुम्ही त्या एक मुलगा खेळत असलेल्या ट्रॅक वर ट्रेन वळवाल  की ….. तशीच त्या १५-२० मुलांच्या अंगावर ट्रेन जाऊ द्याल?

तुम्ही त्या   १  मुलगा खेळत असलेल्या वापरात नसलेल्या ट्रॅक वर गाडी वळवून त्या १५-२० मुलांचे      प्राण वाचवू  शकता , पण ह्याचा अर्थ त्या वापरात नसलेल्या ट्रॅक वरच्या  एका मुलाचा मृत्यु.

थोडा विचार करा तुमच्या मनात आलेल्या उत्तराचा!!

बहुतेक सगळेच लोकं त्या एक मुलगा खेळत असलेल्या ट्रॅक वर गाडी वळवून त्या १५-२० मुलांचे प्राण वाचवावे असा विचार करतील. मी स्वतः पण तसाच विचार केला होता सुरुवातीला- कारण एका मुलाच्या प्राणाच्या बदल्यात जर १५-२० मुलांचे प्राण वाचत असतील तर तो एक  सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन एका जबाबदार  माणसाने घेतलेला योग्य निर्णय   वाटतो. पण तसे खरंच आहे का? निर्णय जो घेतलाय तो योग्य आहे ?

थोडा विचार करा,  वर दिलेला   निर्णय घेतांना   तुम्ही त्या  दुसऱ्या मुलाचा विचार केलाय का -की ज्याने आधीच स्वतःच्या सुरक्षेचा विचार करून वापरात नसलेल्या ट्रॅक वर खेळणे पसंत केले होते? त्या  एका मुलाची काय चूक आहे? काही नाही ना?  मग  त्याची काहीही चूक नसताना त्या मुलाच्या ट्रॅक वर  ट्रेन पाठवायचा निर्णय आपल्याला घ्यावासा वाटला हे कसे काय योग्य ठरू शकते?

त्या मुलाचा बळी दिल्यावर पण इतरांच्या डॊळ्यात त्याच्याबद्दल थेंब पण आला नसता, उलट चला- ते   १५-२० मुलं वाचले म्हणून आनंदच झाला असता लोकांना.

असे निर्णय रोजच्या आयुष्यात बरेचदा घ्यावे लागतात. ऑफिस, सोशल लाइफ, राजकारण, समाजकारण या सगळ्यात असे निर्णय  घ्यावे लागतात.

बहुसंख्य लोकांच्या चुकीच्या निर्णयामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी किंवा बहुसंख्यांच्या  सुरक्षेसाठी अल्पसंख्य  ’ योग्य निर्णय’ घेणाऱ्याचा  बळी दिल्या जाण्याचे प्रकार नेहेमीच सुरु असतात. इथे बहुसंख्य आणि अल्पसंख्यांक  हे शब्द केवळ  रेफरन्स म्हणून वापरले आहेत- समाजा सा्ठी नाहीत.

बहुसंख्य लोकं कितीही मूर्खासारखे वागली तरीही अल्पसंख्याकांना बळी दिले जाते.  ही गोष्ट युगानुयुगे चालत आलेली आहे.

कोणीतरी एक मोठा तत्ववेत्ता होऊन गेला त्याची ही गोष्ट आहे- माझी नाही.  त्याला स्वतःचा निर्णय काय असेल असे विचारले असता,  त्याने दिलेले उत्तर मोठं मार्मिक आहे.

याच गोष्टीला अजून एक डायमेन्शन आहे. तो म्हणतो मी काहीही करणार नाही, त्या १५-२० मुलं असलेल्या ट्रॅक वरून ट्रेन जाउ देईन, कारण ज्या मुलांनी ट्रेन जाणार असलेल्य़ा ट्रॅक वर खेळण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुर्ण कल्पना असेल की इथे ट्रेन येणार, म्हणजे ट्रेन जवळ आली की ट्रेनच्या आवाजाने ती सगळी मुलं बाजूला होतीलच, या उलट   जो मुलगा एकटा खेळतोय वापरात नसलेल्या ट्रॅक वर , त्याला पुर्ण खात्री आहे की इथे ट्रेन  येणार नाही, त्यामुळे तो   तिथुन सरकणार नाही आणि हमखास मृत्युमुखी पडेल.

दुसरी गोष्ट म्हणजे, तो दुसरा ट्रॅक वापरात नाही, म्हणजे पुढे  ट्रॅक कसा आहे ते सांगता येत नाही. कदाचित पुढे ट्रॅक खराब असल्याने ट्रेनचा  अपघात होण्याची पण शक्यता आहे..

घाई गडबडीत घेतलेले निर्णय जरी वरवर बरोबर दिसत असले तरीही ते चुकीचे असू शकतात. एक लक्षात ठेवा, जो निर्णय लोकप्रिय असतो तो नेहेमीच बरोबर असेल असे नाही, आणि जो निर्णय बरोबर असेल तो लोकप्रिय असेल असे नाही.

नुकतीच एका ट्रेनिंग प्रोग्राम मधे ऐकलेली ही गोष्ट आहे. नुकतेच अभिजितने सांगितले की नेट वर पण उपलब्ध  आहे ही . लिओ व्हेलेस्की ज्युलीयन या तत्त्ववेत्याच्या नावे सर्च केले तर शेकडॊ ठिकाणी ही कथा लिहिलेली आढळेल.

इनोसन्स

Written by  on February 3, 2013

मला खरंच कौतुक वाटतं भारतीय लोकांचे. पुर्वी नव्हते पण जेंव्हापासुन फेसबुक , व्हॉट्स अप सारखे सोशल प्लॅटफॉर्मस आले, तेंव्हापासुन भारतीय लोकं किती इनोसंट आहेत ह्याची खात्री पटली. आता, भारतीय लोकं इनोसंट आहेत ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही, लगेच भारतीय लोकं इनोसंट नाहीत, तर हुशार कसे आहेत हे पुरावे ( जसे विमानाचा शोध आम्हीच लावला,  वगैरे वगैरे )लगेच माझ्या इनबॉक्स मधे येऊन पडतील ह्याची मला पुर्ण खात्री आहे.
असं म्हणतात, की भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे, जे मला अजिबात मान्य नाही. अहो , जेंव्हा आपल्या देशात इतके भोळे लोकं रहातात, तेंव्हाअसहिष्णुता कशी काय वाढु शकेल?

इतकं असुनही माझा भारतीयांच्या इनोसन्स वर विश्वास कायम रहाण्यास मदत करणाऱ्या सगळ्या लोकांना ही पोस्ट सादर अर्पण. ते इनोसंट लोकं कुठे भेटले मला ? तर इथेच.. खाली लिहीलंय बघा.

१) आपला मेसेज न वाचला जाताच डिलिट केला जाणार हे अगदी पुर्णपणे माहिती असुनही दररोज  माझ्या व्हॉट्स अप वर किंवा इन बॉक्स मधे गुगली करून फेकणारे लोकं .
२)हे असे सदसदविवेक बुद्धी जागृत असलेले लोकंच, आमच्यासारख्या वाईट मनोवॄत्तीच्या( भावना समजुन घ्या हो) लोकांना  लोकांना दररोज न चुकता सुविचार /  हजारदा वाचलेले विनोद जेंव्हा नया है मार्केट मे म्हणून पाठवतात तेंव्हा !

फेसबुकचा प्लॅटफॉर्म दिलाय तो दोन घटका करमणुकी साठी, मी पण फेसबुक वर न चुकता सकाळ , दुपार , संध्याकाळ चक्कर टाकतोच केवळ चार घटका करमणूक व्हावी म्हणून.  पण इथे  पण काही व्हॉटस ऍप सारखी परिस्थिती आहे. आपला इनोसन्स सिद्ध करायला लोकं कसे कंबरेचा काटा ढिला होई पर्यंत प्रयत्न करतांना दिसतात. कसे?? वाचा पुढे…

३) एखादी बातमी आली, की त्यावर आपले मत व्यक्त केले नाही, तर आपण बुर्झ्वा ठरू म्हणुन    आधी गुगल करून मग फेस बुक वर काहीतरी लिहीणारे लोकं.
४) स्वतःला काही समजो की ना समजो, दररोजच्या राजकीय परिस्थितीवर  आपल्या मताची पिचकारी मारणारे.
५) एका विशिष्ठ विचार धारेला वाहून घेतलेले लोकं, आणि ते का हे मी लिहीत नाही, वाचक सुज्ञ आहेतच. 🙂
६) नेत्यांना “ओपन लेटर” फेसबुक वर लिहीणारे लोकं. ह्या लोकांना असे वाटत असते की नेते मंडळी पण फेसबुक वर ह्यांच्यासारखेच पडीक असतात, आणि ह्यांची पत्र वाचतात.
७) अमुक  देवाचा मेसेज   फॉर्वर्ड करा असा मेसेज आला की  ” कशाला उगाच विषाची परिक्षा घ्या? ” म्हणून तो मेसेजेस १० लोकांना फॉर्वर्ड करणारे आणि काही तरी आता चांगलं होईल म्हणून वाट पहाणारे लोकं, किंवा शुभ सोमवार, शुभ मंगळावार सारखे लोकं .
८)फेसबुक वर पाच हजार मित्र (?) गोळा करून दररोज काहीतरी  पोस्ट लिहीणारे लाइक्स च्या संख्येच्या हिशोबात स्वतःची पॉप्युलरटी मोजणारे .
९) आपण फार सुंदर दिसतो म्हणून आपण आपला डिपी आठवड्यात दोन तीन वेळा बदलणारे लोक्स. ( बिपिन कुलकर्णीचा शब्द चोरलाय बरं कां!)
१०) कुठल्या तरी फालतु  सी ग्रेड टीव्ही / सिनेमा कलाकारासोबतचे काढलेले फोटो पोस्ट करून आपली आणि त्याची किती जवळीक आहे हे दाखवणारी पोस्ट टाकणारे.
११) गावठी फोटोशॉप एक्स्पर्ट्स. इनका तो क्या कहने! कधी कतरीनाच्या मांडीवर , कधी करीनाच्या कुशीत, तर कधी  ह्यांच्या मोटरसायकलच्या मागच्या सीट वर  आलीया भट !
१२) मुंबई मिरर मधे सेक्सपर्ट्स ला प्रश्न विचारणारे लोकं. (एकदा मुंबई मिरर नाही वाचला तरीही चालेल, पण हा कॉलम नक्की वाचत जा )
१३) व्हॉट्स ऍप वर येणारा प्रत्येक फॉर्वर्ड किंवा मेसेज खरा समजणारे लोकं.
१४) देवभोळे पणा सोशल मिडीया वर दाखवला  म्हणजे आपल्याला लोकं खूप चांगले समजतात हा समज असणारे आणि दररोज न चुकता रतीब घातल्याप्रमाणे देवांचे फोटो पोस्ट करणारे.
१५) सरकारने एखादा निर्णय घेतला, की फेसबुक वर सरकारने दम असेल तर असे करून दाखवावे, तसे करून दाखवावे म्हणून आव्हान देणारे.
१६) आपल्या आवडीच्या नेत्याने कुठलाही निर्णय घेतला, ( अगदी न पटणारा असला तरीही ) असे काही लॉजिक शोधायचे, की जे त्या निर्णय घेणाऱ्याच्या मनातही नसेल.
१७) दोन अगदी १८० अंशात विरोधी असणाऱ्या पोस्ट ला लाइक करून त्या दोन्ही पोस्टला सपोर्टींग कॉमेंट्स करणारे  बिनबुडाचे पेंदे लोक, सगळ्यात जास्त भोळे.
१८)  सोशल मिडीया वर शिव्या घातल्याने एखाद्याचा अपमान होतो असे समजणारे लोक्स.
१९) फेसबुक लाइक्स म्हणजे पॉप्युलरॅटी समजणारे .
२०) सेक्युलर, पुरोगामी वगैरे शब्द शिवी समजणारे.
२१) आवडीच्या पक्षाचे सरकार आल्याने आपलं जिवनमान सुधारणार, करप्शन बंद होणार, सगळीकडे राम राज्य होणार समजणारे.
२२) फेसबुक वर एकमेकांना शुभेच्छा देणारे, नवरा बायको, आई मुलगा/मुलगी वगैरे..

आता हे इतक्या प्रकारचे  इनोसंट लोकं पाहिल्यावर भारतात इनोसन्स नाही असे कोण म्हणू शकेल?