डी डे मायनस वन…

Written by  on November 30, 2012

आज २५ तारीख. उद्या  जायचंय मुंबईला . गेले कित्येक दिवस वाट पहात होतो.. याच क्षणीच… मुंबईला जायचं… स्वप्न नगरी.. माया नगरी.. शाहरुख खानचं गांव. अगदी लहानपणापासून या मायानगरीचं अट्रॅक्शन होतं, आणि आयुष्यात एकदा तरी इथे येउन अमिताभ बच्चन चं घर पहायचं होतं.. सलमान खान तर म्हणे गॅलॅक्सी अपार्टमेंट च्या बाल्कनीत येउन हात पण दाखवतो म्हणे. किती दिवसांपासूनची इच्छा आज पुर्ण होणार होती.  किती नशिबवान आहेत ना इथे रहाणारे?

आता आमची वेळ आहे. समुद्राचा खारा वारा झोंबत होता. बोटीमधे ते इतर ९ जण बसले होते. प्रत्येकच जण अगदी रिलॅक्स्ड दिसत होता. कुठलीही भिती नव्हती दिसत एकाच्याही चेहेऱ्यावर.पायाशी सॅक्स पडल्या होत्या. बंदुका , ग्रेनेड लॉंचर्स सगळं इतस्ततः पडलं होतं.. सुर्यास्त होत होता- अरबी समुद्रात सुर्य़ बुडत होता…. डुबता सुरज — लाल रंग पसरला होता सगळ्या पाण्यावर .. त्या लाल रंगाकडे बघून  या  बोटी मधे  बोटीच्या ओरिजिनल मासेमार खलाशांच्या रक्ताच्या डागांकडे लक्षं जात होतं, आणि सारखे ते  चाकुने हलाल करतांना विव्हळणारे मासेमार खलाशी सारखे डोळ्यासमोर येत होते.त्यांना कापल्यावर त्यांचं रक्त समुद्रातल्या पाण्यात मिसळलं तेंव्हा पण ते असंच लाल दिसत होतं.. त्या काफिर लोकांच्या  डोळ्यातले ते भाव अजिबात विसरल्या जाउ शकत नव्हते.

या बोटीवर आता १३ लोकं होते. १२ लोकं तर आधीच उतरले होते गुजरातमधे. सगळी उजळणी झालेली होती. गेले कित्तेक दिवस प्रत्येक जागेचा व्हिडीओ हजारो वेळा दाखवला होता. काय आणि कसं करायचं ह्याची शेकडो वेळा उजळणी झालेली होती. ते ट्रेनिंगचे दिवस आठवले . अगदी नुकत्याच जन्मलेल्या कोकराचे मुंडके तलवारीने उडवायची दिलेली ऑर्डर आणि तेंव्हा कापणारे हात… अरे काय केलाय त्या नुकत्याच जन्मलेल्या कोकराने??  काय घोडं मारलंय म्हणून त्याला मारायचं?? तेंव्हा तो मौलवी म्हणाला होता.. की त्यांनी आज , इथे, जन्म घेतला, हेच त्यांचं दुर्भाग्य…. तुमचं मन दगडाचं करा.. आणि मारा त्या कोकराला…. दहा पैकी ९ जणांनी तर सरळ उडवलं मुंडकं.. पण माझे हात मात्र थर थर कापत होते..मुल्ला म्हणाला.. तुम्हारा दिल कच्चा है, पण म्हंटलं, मै कसाब हुं.. खानदानी कसाब… आणि उडवलं मुंडकं त्या नवजात कोकराचं.. थोडं वाईट जरुर वाटलं, पण धरम के लिये कुछ भी कर सकता हू मै………..!!!

असंही वाटलं होतं, की कदाचित या ऑपरेशन मधून आपलं नाव काढलं जाईल म्हणून. पण नंतर इतर टेस्ट मधे अगदी अव्वल नंबर मिळाले म्हणून नांव राहिलं या यादी मधे. मजहब साठी कुर्बान झालेल्यांना जन्नत नसिब होते.. आणि ७४ कुमारी कन्या सेवेसाठी मिळतात.

त्या मौलवीनं सांगितलं ते काही खोटं नसेल.. कशाला खोटं बोलेल तो? इथे पण नाही का, हजारो तालिबानी शहीद होताहेत आपल्या कौ़म साठी. आपल्याला तर एक चांगला चान्स मिळालाय.. देशासाठी कुर्बान व्हायचा.. नाहितर काय, आपल्या काहिच तर येत नाही.. बकरे कापण्याशिवाय.तेवढं काम बाकी व्यवस्थित येतं.मुल्ला म्हणे, बस्स, उतनाही आना चाहिये.. तुम्हे कराटे सिखायेंगे.. बंदुक मिलेंगी.. और बम भी फोडनेकू मिलेंगे.. करना वही है.. बकरे  मारना है.. लेकीन यहां बकरे मतलब.. हिंदुस्थानी …. !!!! जेहाद!!!!!!!

त्या ट्रेनिंग कॅम्प मधे आयएस़आय चे पण काही कमांडर्स होते. त्यांनीच तर शिकवलं, की एके कशी वापरायची, डिटोनेटर्स कसे वापरायचे, आणि इतर बऱ्याच गोष्टी.. त्यांच्यामुळेच तर हे सॅटलाइट फोन्स वगैरे पहायला मिळाले. ट्रेनिंग पण खुप सख्त होतं. दरओज १०-१५ मैल हातात बंदुक घेउन आणि पाठिवर ८० किलोची सॅक लाउन धावायचं, मग स्विमिंग… नंतर कराटे, नंतर जिम, आणि अजुन किती सांगु???  वर्षभर ट्रेनिंग सुरु होतं . या ट्रेनिंग नंतर हात इतके सख्त झाले होते की जर पत्थर वर हाथ पडला तर त्याचे पण तुकडे  होतील..

इतकं सख्त ट्रेनिंग जर पाक  आर्मिला दिलं गेलं असतं तर काय बिशाद आहे हिंदुस्थानने युध्द  जिंकायची?या उलट पाकिस्तान मधेच काश्मिर ऍड झाला असता.. कदाचित आपल्या देशाचे दोन तुकडे झाले नसते. पण आपल्या सैन्याच्या जनरललाच जर सत्ता पाहिजे, आणि सगळ्यांवर अंकुश ठेवायचा असेल, तर इतकी ट्रेंड मिल्ट्री कधिही ऊठाव करु शकते.. म्हणुन तर मिल्ट्रीला पण पुरेसं ट्रेनिंग दिलं नसेल- त्यांना दुर ठेवलं या अशा एक्स्टेन्सिव्ह ट्रेनिंग पासुन? म्हणुनच तर बांगला देश हारले..  कारगिलला हरले .. अजुन किती वेळा हरणार आहेत ते कोणास ठाऊक…

आठवत होतं.. घरुन निघतांना पाहिलं की  एक हिरवी चादर घेउन काही लोकं मार्केट मधे फिरत  होते.. त्या पसरलेल्या चादरित काही रुपये पडले होते. मागे काही लोकं आझाद काश्मिर चा बोर्ड घेउन जात होते. जेहाद के लिये पैसा दो. .. अपने काश्मिरी भाईयोंके लिये पैसा दो.अशा घोषणा सुरु होत्या.लोकं आपले पाकिटं उघडुन जे काही हाताला येइल ते टाकत होते त्या चादरीवर.हा पैसा कुठे जातो हे विचारायची कोणाचीच हिम्मत नाही या देशात.. हे तर अगदी लहानपणापासुनच दिसतंय.. करोडॊ रुपये गोळाकेले असतिल काश्मिरचया नावाखाली .दर जुम्मे रातला काझी पण मस्झिद मधे अनाउन्स करतो. पैसा दो म्हणुन….देश के लिये .. इस्लाम के लिए.. इस्लाम  खतरेमे है…..जेहाद के लिये….

जेंव्हा या मिशनला निघायचं, तर  त्या उस्तादजी ( ट्रेनिंग देणारा) कडुन एकदा परमिशन घेतली होती की गावाकडे जाउन अम्मी अब्बुजान ला भेटून येतो म्हणुन.. कारण एकदा गेलं की परत यायची खात्री नव्हती. तसं आम्हाला अजुनही काय मिशन आहे ते सांगितलं नव्हतं उस्तादजींनी..

त्यांना भेटलॊ, सांगितलं जेहाद मे जा रहा हूं..पण त्यांना खोटं वाटलं.. आपल्या या अनपढ जाहिल  मुलाला  कोण नेइल जेहादला? गावात सगळ्यां लहान मुलांना पण सांगितलं की मै कौ़म के लिये काम करने जा रहा हूं,इस्लाम खतरेमे है.. मै जेहाद के लिए जा रहा हूं….. त्यांना कराटे चे खेळ पण करुन दाखवले.. म्हंट्लं.. तुम भी ऐसाही कर सकते हो, कराटे खेल सकते हो.. और.. इस्लाम के लिये काम कुर्बान कर सकते हो.. आणि आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या नजरेतले भाव पाहुन धन्य धन्य झालो होतो.

शेवटी कोण आपण? एक अनपढ गंवार कसाब, पण अल्लाहने हा चान्स दिलाय म्हणुन तर ..  नाहितर काय होतं आपल्या कडे? अब्बु सारखं बोकड कापत जगलो असतो..

उद्या मुंबईला जायचं.. आणि त्यांनी सांगितलं तसं कराचं.. काहीही झालं तरी जिवंत पकडलं जायचं नाही.आपली जान देउन टाकायची.. बस्स.. फक्त एक दिन और…… फिर मै मेरी बंदुक और वो नापाक हिंदुस्थानी……!!!

______________________________________________________________________________________

आज एक साल पुर्ण झालंय.. इथे जेल मधे सडतोय.  जेंव्हा त्या बहादुर पोलिसने आपल्या हातातल्या बंदुकची पर्वा न करता पकडायचा प्रयत्न केला होता तेंव्हा मात्र सगळ्या गोळ्या त्याच्या छाताडात उतरवल्या … तरी पण त्याने सोडली नाही बंदुकीची नाळ..

कसले जेहाद अन कसलं काय.. इकडे तो हवालदार सांगत होता.. की पाकिस्तानी सरकारने तर सरळ कानावर हात ठेवले आहेत.. म्हणतात, कसाब नाही आमचा.. याच देशासाठी प्राण हातावर ठेउन आलो.. आणि त्याच देशाने नकारावे मला??

सिएसटीची ती व्हिडीओ फिल्म  पाहिली.. तेंव्हा  ते त्या निरपराध  लोकांचं मरण पाहिलं कोर्ट रुम मधे तेंव्हा मात्र वाटलं की  त्या निरपराध लोकांची काय चुक? त्या मधे काही मुस्लिम पण होते. पर्दानशिन खवायते.. आणि बहुत कुछ..  ते बच्चे दिसले विव्हळतांना.. काय चुकलं त्यांचं?  खरं तर अजिबात काही कल्पना नव्हती की त्या बंदुकीमुळे इतका नाश होऊ शकतो म्हणून.

जर हे आधिच माहिती असतं तर काय केलं असतं आपण? ह्या जेहाद मधे भाग घेतला असता?? कदाचित नाही.. कदाचित हो.. आखिर  त्या मुल्लाने सांगितलं होतं नां इस्लम खतरेमे है.. म्हणून? पण कुठे आहे  खतरा?? कोणापासुन आहे  खतरा? आणि इथे हिंदुस्थानात काही हिंदुस्थानी लोकांना मारुन इस्लाम कसा काय वाचणार?  इथे पण तर मुस्लिम आहेत.. आणि त्यांची संख्या आहे पाकिस्तानी लो्कसंखे पेक्षा जास्त…

आता समजतंय, इथले मुस्लिम पाकिस्तानातल्या मुस्लिम पेक्षा पण खुष आहेत. कसला इस्लाम खतरेमे? जर इस्लाम खतरेमे असेल तर तो असेल  पाक मधे.. इथे नाही..!! एवढं मात्र नक्कीच समजलंय  इथल्या एक वर्षाच्या जेलमधल्या वास्तव्यानंतर..

तो  मौलवी खोटं बोलला.. कां?? असं खोटं नाटं सांगुन त्याने काय मिळवलं असेल बरं?  हे पुर्ण वर्ष जेल मधे एकट्याने काढलं.. रोज ते मारल्या गेलेले चेहेरे नजरेसमोर नाचायचे. शांत  ्झोप म्हणजे काय ते माहिती नव्हतं. जो पर्यंत तो व्हिडीओ पाहिला नव्हता कोर्टात.. तो पर्यंत  काही वाटत नव्हतं, लोकांचे चेहेरे पाहिलेले नसल्यामुळे अजिबात गिल्ट नव्हता.. पण तो व्हिडीओ पाहिल्यावर मात्र…..  पश्चाताप होतोय इतक्या लोकांना मारल्याचा…. सांगितलं जज साहब ला..आणि कोर्टामधे तर रडु पण आलं होतं ते पाहुन…. कोणालाच खरं वाटलं नसेल ते ..

रोज त्या कोर्टात जातोय.. कोणी वकील तयार नव्हता म्हणे केस घ्यायला. पण शेवटी … .. जाने दो.. अजुन किती वर्ष काढायचे आहेत या जेल मधे कोणास ठाऊक. तसा एक चान्स आहे.. जसा पुर्वी एकदा विमान पळवुन नेलं तेंव्हा काही लोकांना सोडलं होतं.. तसा आपलाही चान्स आहेच.. इथे म्हणे केस खुप वर्ष चालते. त्यांच्या लोकसभेवर हमला करणारा अजूनही अफझल गुरु जिवंत आहे म्हणे त्या जेलमधे.. ..फांशीची सजा दिलेली आहे, पण अजूनही त्याला टांगला नाही या सरकारने…

________________________________________________________________________

त्या बदतमीज कसाबला सांगितलं होतं की काहीही झालं तरीही जिंदा हाती लागायचं नाही त्या काफिर लोकांच्या म्हणून.. पण बददिमाग कसाब शेवटी जिंदा हाती लागला त्यांच्या..  जर हा मारल्या गेला असता तर कधीच कोणाला पता चालला नसता, की ह्या  हल्ल्या मागे कोण आहे ते..

इतक व्यवस्थित ट्रेंड करुन पाठवलं होतं.. पण शेवटी काहीच करु शकला नाही.. बांगला देश चा नासुर जख्म आहेच.. तसेच कारगिलच्या जख्म मधुन खून  वहातो आहे अजुन.. बदले की आग मधे हा पाक देश जळतो आहे.

बरं तो बेवकुफ पण इतका, की त्याने आधी तर सरळ गिल्टी म्हणुन प्लिड केलं होतं.. त्या दस सालच्या लडकीने त्याला ओळखलं तर हा इतका ट्रेंड कमांडो चक्क रडायला लागला.. बददिमाग.. काफिर..जेंव्हा अटॅक झाला, ताज वरचा, तेंव्हा तर बऱ्याच मोठ्या राजकिय नेत्यांनी पण शाबासकी दिली होती.. आज तेच सगळे पिठ फिरवून पळताहेत. जैसे की उनका कोई संबंधही नहीं है.. इस बात से…. तेंव्हा म्हणत होते ऐसेही ५०० कसाब तैयार करो.. और.. बस्स .. वो भारत देश     हमारा है.. हो सकता है अमेरिका भी ………………..???

ह्या कसाबच्या मुर्ख पणामुळे आका समोर हात टेकवावे लागले.साला जिंदा नहीं बचता तो……कुछ और बात होती……..   या खुदा. पता नही.. और क्या देखना

(असेच काही तरी विचार असावेत त्यांच्या मनात…)

२६/११/२००८ मधे शहिद झालेल्या सगळ्या लोकांना श्रध्दांजली.. आज एक वर्ष पुर्ण होतंय.. या सगळ्या शहिदांना कुठलाच भारतिय विसरु शकणार नाही..

आमेन!

Written by  on November 28, 2012

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगाचच स्वतःला बरं वाटावं म्हणून केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतार कार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते ह्या वयात तर खरी सुरुवात होते जीवनाची. थोडाफार सेटल झालेला असतो  माणुस आयुष्यात.. लग्न ( त्याची तर दोन झालेली होती) मुलं मोठी झालेली असतात , थोडा मोकळेपणा आलेला असतो – अर्थात हे तुम्हा आमच्या सारख्या मध्यम वर्गियांच्याबाबत लिहितोय.. मायकेल बद्दल नाही ,गैरसमज नकॊ.

म्हणूनच कदाचित असेल, की  सकाळीच पहिलं ट्विट पाहिलं आणि क्षण भर तर कळलंच नाही , काय वाटतंय ते. वाईट वाटतय़?? की का्हीच फिलिंग्ज नाहीत?? मला वाटतं थोडं वाईट वाटलं असावं.. कारण एक मूर्तिमंत सळसळत्या एनर्जी चा अस्त झालेला ऐकल्यावर अजुन काय वाटू शकतं? पण खरं तर उगाच काही फारसं वाईट वाटलं नाही.. असंही असेल.. कारण एखाद्या फारशा भावनिक जवळीक नसलेल्या माणसाच्या मृत्यु बद्दल ऐकुन जसं वाटावं तसं पण वाटत होतं..! व्हॉट अ कनफ्युजन.. काय वाटलं बरं मला तेंव्हा??

कारण नाट्य संगित आणि क्लासिकल गाणी ऐकायला आवडतात मला. इंग्रजी गाणी म्हणजे बॉनी एम , किंवा ऍबा..  कारण आमच्या वेळी तेच सगळे फेमस होते, तसे नाटकिंग कोल्स चे १९६० चे लव्ह सॉंग्ज पण ऐकायचो, आणि बिटल्स पण! पण मायकेल जॅक्सन .. छे! कधीच नाही.

कारण मायकेल जॅक्सन जेंव्हा अगदी फॉर्म मधे होता, तेंव्हा मला भिमण्णांनी  आणि तसंच वसंतराव देशपांडेंनी वेड लावलं होतं . तेंव्हा गाणी ऐकायची तर केवळ भिमण्णांची! माझ्या सेल फोन वर आजही वॉल पेपर भिमण्णांचाच आहे.

मायकेल जॅक्सन हा नेहेमी  कुठल्या ना कुठल्या वादात अडकायचा.अगदी सुरुवाती ला काळ्या चा गोरा होण्यासाठी घेतलेली ट्रिटमेंट, चेहेऱ्यावर केलेल्या अनंत प्लास्टीक सर्जरीज , यामुळे नेहेमीच लाइम लाइट मधे राहिला होता मायकल. १९९४  मधे ’त्याच’ केस मधे २२ मिलियन डॉलर्स देउन सुटका करुन घेतली होती.२००५ दुसरी केस… नंतर मुलाला बाल्कनी मधून खाली टाकल्या सारखं केल्यामुळे झालेला गोंधळ.. इस्लाम मधे कन्व्हर्शन.. !!!!!!!!

बिलियन्स डॉलर्स चं इनकम .. पण तेवढाच खर्च..  ( आणि कोर्ट सेटलमेंट) यामुळे मायकेल बॅंकरप्सी पर्यंत पोहोचला होता. बरीचशी प्रॉपर्टी  सोनी ला विकली होती. इतका मोठा गायक, पण शेवटची काही वर्ष याचा खर्च चालायचा तो स्वतःच्या गाण्यांच्या वर नव्हे तर बिटल्स्च्या गाण्यांच्या वरच्या रॉयल्टीवर..

’तसल्या’ ( चाइल्ड सेक्स अब्युझ)  केसेस मधे अडकल्या मुळे एक माणुस म्हणून त्याच्या बद्दल कधीच आदर वाटला नाही. त्याच्या जाण्याचं दुःख पण फारसं झालं असावं असंही वाटत नाही. पर्सनली जो माणुस  चाइल्ड सेक्स अब्युझ च्या केसेस मधे अडकल्या नंतर जेंव्हा   बाहेर पडण्यासाठी काहीच मार्ग नाही हे लक्षात आल्यावर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट  २२ मिलियन् डॉलर्स देऊन करतो, आणि  त्यातुन बाहेर पडतो, त्याच्या बद्दल  आदर किंवा प्रेम  -एक माणुस म्हणून   कसा वाटू शकेल?

त्याचं पर्सनल आयुष्य कसंही असो.. पण संगीत क्षेत्राला त्याने दिलेले योगदान अमुल्य आहे असे म्हणावे लागेल. एक गोष्ट मात्र आहे , मायकेल जॅक्सन हा अनभिषिक्त राजा होता .. पॉप संगिताचा!!!

!हा माणुस राजा सारखा जगला आणि राजा सारखाच गेला..

मृतात्म्यास इश्वर शांती देवो…… आमेन!

मराठीकरण..

Written by  on November 27, 2012

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी मनाला तो बोर्ड पाहिलं की एकदम धसकाच बसतो, आणि सरळ विमानतळावरून पुन्हा घरी जावं असं वाटू लागतं.

विमानतळ इतका सोपा सरळ शब्द असतांना हा असा विचित्र शब्द शासकीय कार्यालये का वापरतात हे काही लक्षात येत नाही. प्रत्येक वेळेस विमानात बसल्यावर बाहेर पाहिलं तर हमखास तो शब्द आठवतो.  त्या वाक्याचा अर्थ काहीही असला तरी मला मात्र तो “भारतीय विमान पत्तन -म्हणजे  ’भारतीय विमान पडण्याची जागा’ असाच वाटतो. त्या पेक्षा सरळ सरळ ”एअरपोर्ट ऍथॉरीटी ऑफ इंडीय़ा’  हा शब्द वापरला तर जास्त योग्य होणार नाही का?

एखाद्या शब्दाचे मराठीकरण शब्दशः केल्यास किती विचित्र अर्थ निघू शकतो हे या गोष्टीवरून लक्षात येते. माझं पण मराठीवर प्रेम आहे, पण प्रचलीत असलेले इंग्रजी शब्द डावलून त्या साठी अस्तित्वात नसलेले मराठी शब्द तयार करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याची खरच काही आवश्यकता आहे का?

असे नवीन शब्द तयार करुन   वापरल्याने भाषेची समृद्धी वाढते असेही काही लोकांचे मत आहे, पण त्या पेक्षा जुने प्रचारात असलेले मराठी शब्द, जे आज काळाच्या ओघात विस्मृतीत गेले आहेत त्यांचा आवर्जून वापर केल्याने ते शब्द पुन्हा प्रचलीत होतील आणि  मराठी भाषेची मूळातच  सुंदरता , समृद्धी  टिकवून ठेवायला मदत होईल असे वाटते.

इथे एकच शब्द दिलाय, असे अनेक विचित्र शब्द प्रचारात आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याने काय साध्य होईल हे मला तरी कळत नाही. ऑक्सफर्ड डिक्शनरी मधे सुध्दा इतर भाषांमधले (मराठी, हिंदी, अरेबिक वगैरे) प्रचलित शब्द आहेतच. त्या शब्दांना पण इंग्रजीने आपलं म्हणून मान्य केलेले आहेच.

एकांत.

Written by  on November 9, 2012

घरा मधे इनमिन तिन माणसं. राजाभाऊ, रमा आणि राहुल. वन बिएच के म्हणजे फार लहान नाही मुंबईच्या मानाने. एक हॉल  , किचन,   एक बेडरुम आणि सोबतच एक ३ बाय ५ चे लॅटबाथ हे हॉल ला लागुन, असे की हॉल मधे झोपणाऱ्याला आणि बेडरुम मधे झोपणाऱ्याला असेस करता यावे!बेडरुम मधे झोपलेल्या व्यक्तीला जर रात्री टॉयलेटला जायचं काम पडलं, तर हॉल मधुनच जावे लागायचे. तसे राहूल एकटाच हॉल मधे झोपायचा, त्यामुळे त्याला कधीच ह्या गोष्टीने आपली प्रायव्हसीएकांत जाते असे वाटले नव्हते.

तसे म्हंटले तर मुंबईच्या मानाने “चांगलाच” मोठा फ्लॅट! ह्याच फ्लॅट मधे गेली ३२ वर्ष राजाभाऊ , बायको रमा आणि मुलगा राहूल राहत होते. तिघांसाठी फ्लॅट पुरेसा वाटायचा त्यांना, त्यामुळे त्यांनी कधी मोठा फ्लॅट घ्यायचा विचारच केला नव्हता.  कशाला  घ्यायचा? खाली उतरलं की बस स्टॉप रस्ता ओलांडला की स्टेशन, भाजी, दुकानं, सगळं काही अगदी हाकेच्या अंतरावर.

बिल्डींग मधले बरेच लोकं आपली रहाती जागा विकुन मोठ्या जागेच्या लोभाने  विकुन आलेल्या पैशातुन  तिकडे डोंबिवली, विरार कडे मोठा फ्लॅट घेऊन रहायला गेले होते, पण राजाभाऊ मात्र गिरगावातच ठाण मांडून बसले होते, काहीही झालं तरी हा भाग सोडायचा नाही हे अगदी मनावर पक्के ठसले होते.

हॉल मधे एका कोपऱ्यात कपाट, त्याच कपाटात एक दार उघडले की त्याचे टेबल व्हायचे, आणि ह्याच टेबल वर बसुन राहुल ने आपले इंजिनिअरींगचा अभ्यास पुर्ण केला होता. हॉल मधे असलेला सोफा कम बेड चा बेड करुन त्यावर रात्री झोपायचं . लहानपणापासुन इथे राहिल्याने राहूलला पण ह्या जागेबद्दल एक आत्मियता होती. प्रत्येक सण गाजायचा या भागात. गणपती , शिवजयंती, दिवाळी, इद, क्रिसमस सगळे सण धुमधडाक्यात साजरे व्हायचे.  आता चांगला इंजिनिअर झाला, मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीला लागला, पण त्यालाही कधी ही जागा सोडून दुसरीकडे जायची इच्छा होत नव्हती. तसेही म्हणे ही बिल्डींग आता रिडेव्हलपमेंटला जाणार, तेंव्हा मोठा म्हणजे दोन बिएचके चा फ्लॅट देण्याचे बिल्डरने कबुल केले होते. पण काही लोकं अजुनही रिडेव्हलपमेंट्ला तयार नव्हते.

तर होता होता राहूलची नोकरी पण झाली चार पाच वर्षांची आणि आता लग्नासाठी पण मुली सांगुन येऊ लागल्या. समोरच्याच बिल्डींगमधे रहाणारी सुबक ठेंगणी मेघा त्याला आवडायची, तिलाच एक दिवस विचारले, की लग्न करतेस का ? आणि ती हो म्हणाली, अन झाले लग्न! राहूल मेघा चा संसार त्याच राजाभाऊ, – रमाच्याच वन बिएचके मधे सुरु झाला.

फरक फक्त एकच पडला, राजाभाऊ, आणि रमा ची रवानगी बेडरुम मधुन हॉल मधे झाली, आणि राहुल – मेघा  ला बेडरुम मिळाली. सोफा कम बेड वर दोघांना एकत्र झोपणे अवघडल्यासारखे व्हायचे, म्हणून भैय्यासाहेब खाली चटई वर झोपायचे.तसाही मुंबईकर हा स्वभावतःच कुठल्याही परिस्थितीशी जुळवुन घेणारा. त्यामुळे ही परिस्थिती पण फारशी कठीण वाटली नाही त्यांना जुळवुन घ्यायला. रात्री कधी तरी रोहन, मेघा ला पण टॉयलेट वापरायला बाहेरच्या खोलितुन जावे लागायचे, तिकडे राजाभाऊ,- रमा झोपलेले असायचे, पण कोणाचाच त्याला आक्षेप नव्हता.

राहुलचा फाईव्ह डेज विक- म्हणजे शनिवार रवीवार सुटीचा दिवस. ह्या दोन दिवसात मात्र थोडं अनिझी वाटायचं. दिवसा बेडरुम मधे जाणे बरे वाटायचे नाही, बरेचदा राहुल बाहेर टिव्ही पहात बसला की राजाभाऊ, बेडरुम मधे पलंगावर जाऊन पडायचे, कधी तरी गाढ झोप लागली मग सरळ चार पाच तासांची निचंती! आणि नंतर मग राहुल, मेघा रमा वगैरे हॉल मधे बसुन टिव्ही पहात बसायचे. एवढा चांगला सुटीचा दिवस असा वाया गेला की राहूल ची चिडचिड व्हायची. पण…

आज शनीवार होता. राजाभाऊ, सकाळीच कुठे तरी गेले होते, आणि दुपारी ११ वाजता घरी परत आले ते हातात दोन तिकिटॆ फडकवत. राहूल- मेघा ही घ्या दोन तिकिटे आजच्या रात्रीच्या नाटकाची. ८ ते ११ चा शो आहे आज, खूप गाजलेले नाटक आहे म्हणतात. सगळी पुण्याची मंडळी आहेत कामं करणारी. राहूल ने तिकिटे हातात घेतली, आणि मेघाचा आनंदी चेहेरा पाहिला, आणि त्याला बरं वाटलं, की बाबांना पण आपली होणारी कुचंबणा समजते आहे तर, त्यांनाही समजतंय की आपल्याला एकांत हवाय – अगदी दिवसा सुद्धा. नुसता मेघाचा हात हातात धरून बसायला, एकत्र बसुन कार्टून्स ची पुस्तकं बघायला, कविता वाचायला, आणि बरंच काही करायला. शेवटी सेक्स शिवाय इतरही गोष्टी असतातच की.

म्हणता म्हणता दिवस संपला आणि रात्रीचे ७ वाजले. राहुल – मेघा दोघेही तयार होऊन निघाले बाहेर. राजाभाऊ,टीव्ही वरच्या बातम्या पहात बसले होते. राजाभाऊंनी पण टीव्ही बंद करुन त्यांना बाय करायला बाल्कनीत उभे राहिले. रोहन – मेघाचे ते ठिपके लहान लहान होऊन दूर जाईपर्यंत त्याकडे पहात बसले होते. राहुल समोरच्या वळणावरुन वळला, आणि दिसेनासा झाल्यावर मात्र ते घरात शिरले. रमा चा किंचित थकलेला चेहेरा समोर दिसला, केस थोडे कानावर पांढरे झालेले, पण सौंदर्यात मात्र अगदी काडीचाही फरक पडला नव्हता. रमा लग्नानंतर जशी दिसायची, तशीच अजुनही दिसत होती, उलट वयोमानामुळे एक मॅच्युअरिटी आली होती तिच्या चेहेऱ्यावर. वयोमानामुळे पडलेल्या किंचित सुरकुत्या सौंदर्यात भरच घालत होत्या रमाच्या. ५४ वर्षांची झाली, पण अजुनही ४०शीत असल्यासारखी दिसते, मनातल्या मनात कौतुकाने पुटपुटले भैय्यासाहेब.

राजाभाऊंना चहा आवडतो, म्हणून रमा चहा करायला उठली आणि किचन मधे जायला निघाली. राजाभाऊनी तिला थांबवले, म्हणाले, असु दे.. आपण सुद्धा आज बाहेरच जेवायला जाऊ या, तु बस इथे शेजारी. समोर टिव्ही वर काही तरी कार्यक्रम सुरु होता दोघेही निःशब्द बसले होते, भैय्यासाहेबांच्या खांद्यावर रमाची मान टेकवलेली, डोळ्यात किंचीत अश्रू , तर बरीच साफल्याची छटा! त्यांचा हात रमाच्या खांद्यावर होता.  टिव्हीचा आवाज बंद होता. समोर चित्रं दिसत होती, आणि त्याकडे दोघांचेही लक्ष नव्हते. हलकेच रमाचे डोके बाजुला करुन राजाभाऊ, उठले, आणि सकाळी आणून फ्रिज मधे ठेवलेला सायलीचा गजरा घेऊन रमा कडे आले. पळसाच्या पानात बांधलेला गजरा रमाच्या समोर केला. रमा ने ओंजळीत तो गजरा धरला आणि मोठा श्वास घेऊन त्याचा सुगंध आपल्या छातित भरुन ठेवण्याचा असफल प्रयत्न केला. राजाभाऊनी गजरा माळून दिल्यावर पुन्हा दोघेही सोफ्यावर बसले. दोघांनाही एकही शब्द बोलत नव्हते, पण संवाद साधल्याजात होता. शब्दाविण संवाद – दोघांनाही एकमेकांच्या मनातले विचार समजत होते. हलकेच खांदा दाबला , वेळेचं भान दोघांनाही नव्हतं. राजाभाऊंचे लक्ष घड्याळाकडे गेले. ९ वाजले होते, म्हणजे राहुल आणि मेघाला घरी यायला दोन तास शिल्लक आहेत तर अजुन.. समोरचा दरवाजा फक्त टेकवुन ठेवलेला होता.

राहुल – मेघा दोघेही थिएटर वर पोहोचले होते पण अजून  पुण्याहुन येणारी नाटक मंडळीची बस   आलेली नव्हती . दोन तास लोकं वाट पहात बसले होते. शेवटी समजले की बस घाटात बंद पडल्याने कलाकार आज येऊन शकत नाहीत, आणि त्यामुळे आजचे नाटक रद्द करण्यात येत आहे. सगळ्यांचे पैसे परत देण्यात येत होते. त्यांनी पैसे परत घेतले आणि समोरच्या हॉटेल मधुन जेवण पॅक करुन घरी निघाले, विचार केला की  घरी जाऊन आता सगळे बरोबरच जेऊ.

राहुल घरी पोहोचला. दाराच्या फटीतुन राजाभाऊ, आणि रमा सोफ्यावर बसलेले दिसले, रमा राजाभाऊंच्या हाताची उशी करुन त्यांच्या छातीवर कान लावुन बसली होती. मेघाचा हात त्याने हलकेच दाबला, मेघा पण शांतपणे आत काय आहे ते पाहुन बाजुला सरकली, आणि राहुल ला घेऊन पुन्हा पायऱ्यांकडे वळली. राहुलला एकदम काय करावं हेच समजलं नाही, भैय्यासाहेब – रमाची ती भाव समाधी पाहून हलकेच दार बंद करून मागे वळला, डोळे किंचित ओलावले होते, आणि त्याच्या मनात विचार आला,

” एकांत फक्त आपणच मिस करतोय का?”