भविष्य..

Written by  on October 29, 2012
मोडी लिपी मधे पंतांनी दिलेल्या शुभेच्छा

धोंडोपंतांनी दिलेला शुभेच्छा.. मराठी मधे :- श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.येत्या निवडणूकीत नरेंद्रजींना उत्तम यश मिळून ते देशाचे पंतप्रधान होवोत अशी श्री रामरायाच्या चरणी प्रार्थना.

मी  नास्तिक आहे, देवावर माझा विश्वास नाही, तशी एक अज्ञात शक्ती वगैरे असेल, पण देव नाही हे माझे मत पक्के आहे,  माझा भविष्यावर विश्वास नाही. फल जोतिष्य हे थोतांड आहे,   ही अशी वाक्य आपण नेहेमीच ऐकत असतो. माझे  बरेचसे मित्र याच विचाराचे आहेत. मी शक्यतो कुठल्याही गोष्टीवर वितंडवाद करणे टाळतो. तुमचा विश्वास नसेल तर ,ठीक, पण  मी विश्वास ठेऊ नये असा दबाव तुम्ही माझ्यावर का बरं आणता?

एक कन्फेशन म्हणजे , मी पण पूर्वी तसाच होतो. देव वगैरे काही नसतं, असं मानणारा. तसं म्हटलं, तर अगदी बाळबोध घरात जन्म घेतलेला मी. घरचे संस्कार म्हणाल तर दररोज सकाळी रामरक्षा, अथर्वशीर्ष आणि संध्या केल्याशिवाय दुधाचा कप हातात पडायचा नाही. पण एकदा मोठं झालो, आणि घराबाहेर  नोकरी निमित्त पडल्यावर मात्र  एक एक गोष्ट हळू हळू बंद होत गेली. तर काय होतं, की  जो पर्यंत आपण तरुण असतो, लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी आपली धारणा असते, तो पर्यंत तर हे देव वगैरे सगळं काही थोतांड वाटतं. विचारांची जडणघडण पक्की व्हायला, अमिताभ बच्चन चा तो सिनेमात देवळासमोर बसलेला पण देवळात न जाणारा आदर्श डोळ्यापुढे असतोच.

अशा परिस्थितीत सगळं काही व्यवस्थित सुरु असतं, नोकरी , दर महिन्याला बॅंकेत जमा होणारा पगार, त्यातून बुक केलेला फ्लॅट, त्याचे हप्ते भरणे , लग्नं, मुल वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी त्या कविते प्रमाणे म्हणजे बॉर्न ऑन मनडे, बाप्तिस्ड ऑन ट्युसडे ……… आणि डाईड ऑन सनडे, प्रमाणे होत असतात. या सगळ्यात देव, धर्म , वगैरे गोष्टींचा विचार करायला वेळ असतोच कुठे?

भविष्य म्हणाल, तर अरे मी करीन ते होईल! भविष्य माझ्या स्वतःच्या हातात आहे , जर मी प्रयत्न केला तर एखादी गोष्ट का होणार नाही बरं? माझे भविष्य मी स्वतःच घडवणार आहे. असे विचार अगदी मनात पक्के बसलेले असतात.माझेही विचार तसेच होते.

माझा पण देवावर किंवा भविष्यावर विश्वास नव्हता. चक्क थोतांड वाटायचं ते.. वडील पत्रिका पहायचे, त्यामुळे बरेच लोकं घरी यायचे, त्या लोकांकडे पाहिले की त्यांच्या मानसिकतेची कीव यायची. पण नंतर जसे जसे आयुष्य पुढे सरकत गेले, वय वाढत गेले, तसे हळू हळू विचार परिवर्तन होत गेले ,आणि काही तरी शक्ती आहे , तिला देव म्हणा किंवा इतर काही या विचारापर्यंत पोहोचलो.

आयुष्यात चांगले काय किंवा वाईट दिवस काय , हे नेहेमी साठी नसतात . कधी तरी चांगले दिवस अचानक ब्रेक लागल्याप्रमाणे थांबतात, आणि एकामागोमाग एक संकटांची मालिका सुरु होते. काय करावे तेच समजत नाही.  स्वतःच्या हिमतीवर आपण त्या  अडचणींना सामोरा जाण्याचा प्रयत्न करत असतोच, पण कधी तरी केलेले प्रयत्न कमी पडू लागतात आणि प्रत्येक गोष्ट मनाविरुद्धच व्हायला लागते.

कुठे तरी मनात शंकेची पाल चुकचुकते. वाटायला लागतं, की अरे मी देवाची अमुक अमुक गोष्ट केली नाही म्हणून तर माझ्यावर हे संकट आलेले नाही ना? आणि नकळत  आपला विश्वास जरी नसला, तरीही देवापुढे   नतमस्तक होऊन  माझी काळजी घे रे बाबा आता…. म्हणून  क्षमा मागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात ( म्हणजे ९९ टक्के लोकं म्हणतोय मी, एक टक्का अपवाद ) असा प्रसंग हमखास आलेला असतो, ९९ टक्के लोकं मान्य करतात, आणि उरलेले १ टक्का  मान्य करीत नाहीत एवढेच!

आपल्यावर संकटं आली, आणि  आपण त्यांना फेस करण्याचे केलेले सगळे प्रयत्न संपले की मग   देव आठवतो. देवापुढे बसून केलेला जप, किंवा  लहानपणी शिकलेले रामरक्षा, अथर्वशीर्ष , विष्णू सहस्त्रनाम ,आणि दोन चार सुक्तं वगैरे जेवढं काही आठवत असतं ते सगळं म्हणून झाले की तासा दिडतासानंतर थोडं फार का होईना, पण मनःशांती लाभते.

अशा प्रसंगात देवा नंतर, आई वडिलांच्या नंतर   आठवणारे दुसरी व्यक्ति  म्हणजे धोंडोपंत आपटे. आजपर्यंतचा माझा स्वतःच्या वडिलांनी सांगितलेल्या  भविष्या नंतर इतर कोणी सांगितलेल्या भविष्यावर विश्वास असेल तर  तो म्हणजे केवळ धोंडोपंतांवर. (माझे वडील  गेले   ६० एक वर्ष तरी पत्रिका पहातात, पण हल्ली वयोमानामुळे ( ८६ वर्ष ) बंद केलेले आहे, आणि त्यांना या वयात  पत्रिका पहायला सांगणे म्हणजे…….)   तेंव्हा कुठलाही प्रसंग ओढवला, किंवा एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की धोंडॊपंत आठवतात, आणि वेळी अवेळी त्यांना फोन करून मी त्रास देत असतो. अगदी केंव्हाही जरी फोन केला तरी, पंत तेवढ्याच आत्मियतेने फोन उचलतात आणि बोलतात.

ज्योतिष्याकडे आपण जातो, ते केवळ आपण स्वतः येणाऱ्या प्रसंगाला तोंड देतांना  जेंव्हा काही मार्ग सुचत नाही तेंव्हा.काही चुकले तर नाही ना हे कन्फर्म करण्यासाठी! अशा परिस्थितीत जर मग ज्योतिष सांगणारे सगळे काही निगेटिव्ह सांगणे सुरु केले तर मात्र अजूनच मनःस्ताप वाढणार हे नक्कीच.

भविष्य सांगणं ही पण एक कला आहे.  पत्रिका पहातांना   कितीही वाईट गोष्ट लक्षात आली, तरी पण ती कशा पद्धतीने त्याला न दुखवता सांगायची ही गोष्ट प्रत्येकालाच समजते असे नाही – तो समज मात्र पंतांच्याकडे आहे.  परंतु  पंतांचे भविष्य सांगणे पण रोख ठोक आणि दुसऱ्याला ना उमेद न होऊ देणारे. आजपर्यंत पंतांनी जे काही सांगितले आहे ते माझ्या बाबतीत तरी १०० टक्के खरे ठरले आहे, आणि  कदाचित म्हणूनच पंतांचे हजारो जातक जगभर विखुरलेले आहेत.  त्यांचा ज्योतिषविषयक ब्लॉग ^(http://rangmarathiche.com/goto/http://dhondopant.blogspot.in/) पण  आहे. ब्लॉग ची वाचक संख्या पाहिली की ह्या विषयावर इंटरेस्ट असणारे लोकं इतके लोकं आहेत हे पाहून खरंच आश्चर्य वाटते, आणि एक गोष्ट लक्षात येते, की भविष्यावर विश्वास ठेवणारा बहुसंख्य वर्ग आहे, फक्त तो लपून छपून.. उघडपणे नाही.

आमचे पंत म्हणजे पण एक भन्नाट व्यक्तिमत्त्व आहे. जर आज पुलंच्या संपर्कात आले  असते, तर व्यक्ती आणि वल्ली मध्ये पंतांचा नक्कीच समावेश केला गेला असता. तुम्ही कधी  मराठी वृत्तांवर विकिपिडीयावर केले गेलेले लिखाण वाचले आहे का? तिथे  लिहिणारे पण आमचे पंतच बरं का! ज्योतिष हा व्यवसाय असला, तरीही   वृत्तबद्ध कविता,  गझल, लिहिणे म्हणजे पंतांचा विरंगुळा.  कविता लिहितांना मात्र अगस्ती ह्या  टोपण नावाने लिहितात, अर्थात त्यांच्या संपर्कात असणाऱ्यांना अगस्ती म्हणजे कोण हे माहिती आहेच. मोडी ही एक जूनी लिपी. हल्ली फार कमी लोकांना ती लिपी येते,  तिचे संवर्धन व्हावे म्हणून पण पंत बरेच काम करतात.

इरसाल कोंकणी पणा भरलाय पंतांच्या मधे. विनोद बुद्धी , एकदम अप्रतिम. राजकारणावरचे भाष्य तर नेहेमीच मर्मभेदक असते. फेसबुक वरच्या पंतांच्या पोस्ट्स म्हणजे निर्भेळ करमणूक. जर तुम्हाला काही खास कोंकणी शिव्यांची ऍलर्जी असेल तर पंतांना फॉलो करण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर पंतांना फेसबुक वर अवश्य फॉलो करा ^(http://rangmarathiche.com/goto/https://www.facebook.com/dhondopant.apte)..
तर मंडळी, तुम्हा सगळ्यांना श्री रामनवमी च्या शुभेच्छा देऊन हा लेख संपवतो.  श्री राम!

दुःख…

Written by  on October 23, 2012
दुःख

दुःख

काही महिन्यापूर्वी सुख म्हणजे काय हा एक लेख लिहिला होता ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2012/01/18/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/). आज   दुःख म्हणजे काय – हा विषय घेतोय लिहायला. मला जिवंत लोकांपेक्षा मेलेल्या लोकांविषयी जास्त आदर वाटतो, किंवा जे जन्मले नाहीत त्यांचा तर हेवा वाटतो, कारण या जगात  येऊन चालणारी दुष्कृत्य, विश्वासघात, प्रेम भंग, वगैरे  पहायची वेळ येत नाही .

आपले संत महात्मे , अगदी कुठल्याही धर्मातले घ्या,  सगळ्यांनी आयुष्यात खूप दुःख भोगलेले आहे. जिझस, कृष्ण, राम, गौतम बुद्ध, पैगम्बर सगळ्यांचे आयुष्य खूप  कष्टात गेले. कदाचित  हेच एक कारण असेल की आपण स्वतः कायम दुःखाला खूप प्राधान्य देत आलो आहोत.  दुःखी रहाणे म्हणजे काही तरी चांगले असाही काही लोकांचा समज होत असतो . आपल्या देवाप्रमाणेच आपणही अशीच काही दुःख भोगावी म्हणून तशीच दुःख अनुभवणारी काही धर्म संस्था आहेत.  Da vinci Code  आठवतो का?

समजा तुमच्या आवडीच्या टी-सेट मधला एक  कप  फ़ुटला तर? कप फुटला म्हणून “वाईट वाटेल”, दुःख होणार नाही. दुःख होणं आणि वाईट वाटणं या मधे आपली नेहेमीच गल्लत होते. सायकल चालवणे  शिकतांना पडणे, शाळेत कमी मार्क मिळणे , वगैरे लहानसहान गोष्टी या वाईट वाटण्यासाठी कारणीभूत ठरतात. पण मग   दुःख होतं म्हणजे मग नेमकं काय होतं ?

एखाद्या घटनेमुळे जेंव्हा” वाईट “वाटते तेंव्हा  त्या मुळे वाईट वाटते ते पण     तेवढ्यापुरतेच असते.कदाचित  काही तासात, किंवा एखाद्या दिवसात तुम्ही ती घटना विसरून पुन्हा आपलं आयुष्य नेहेमीप्रमाणे  हसतमुखाने जगणे सुरु करता.  पण दुःख म्हणजे   ज्या गोष्टी मुळे आपल्याला खूप दिवस वाईट वाटत रहातं.  इतकं  की   त्या शॉक मधून कित्येक दिवस बाहेर पडू शकत नाही ते दुःख.  पटतं का? म्हणजे तुमच्या घरातल्या एखाद्या जेष्ठ व्यक्तीचा, आई- वडील, भाऊ वगैरे कोणाचा तरी मृत्यु. किंवा तुमच्या कारचा ऍक्सिडेंट होऊन तुमचे फ्रॅक्चर होऊन अंथरूणाला खिळून रहाणे , उदर उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होणे वगैरे घटनांच्या नंतर जे वाईट वाटत रहाते त्याची तीव्रता आणि काळ खूप जास्त असतो, अशा घटनांमध्ये जे वाईट वाटत रहाणे असते, त्याला   दुःख हा शब्द वापरणे योग्य ठरेल .

एखादी दुःखद घटना घडली की मग पहिले तर ती घटना नाकारण्या कडे आपला कल असतो. असं माझ्या बाबतीत होऊच शकत नाही . काहीतरी नक्कीच गफलत झालेली आहे,  जे झालंय ते चुकीचे आहे, आणि लवकरच काही तरी होईल वगैरे विचार मनात येत रहातात. घडलेली घटना ही घडलेली नाहीच ही मनाची धारणा होऊन बसते. ह्या स्टेज मधून बाहेर यायला बरेच दिवस लागू शकतात.

पण  काही दिवसानंतर मग मात्र घडलेली घटना   मान्य केली जाते.एकदा ही वाईट घटना मान्य केली की मग एकटे रहाणे सुरु होते. कोणाशीच बोलायची इच्छा होत नाही.  आपल्या दृष्टीने त्या घटनेशी संबंधित असलेल्या किंवा कारणीभूत असलेल्या सगळ्या लोकांबद्दल संताप होणे सुरु होते.  ह्या राग येण्याची सुरुवात जरी इतरांचा राग येण्याने झाली तरीही शेवट स्वतःचाच राग येण्यात होतो.

ह्या रागाचा भर ओसरला की मग स्वतः आपण ” असं केलं असतं तर बरं झालं असतं” . जर कोणाचा मॄत्यु झाला असेल तर दुसऱ्या डॉक्टरचे ओपिनिअन घ्यायला हवे होते.नोकरी मधला प्रॉब्लेम असेल तर , बॉस ची थोडी चाटूगिरी करायला हवी होती, असे अनेक विचार मनात येतात. एकदा वेळ निघून गेल्यावर या विचारांचाही काही फायदा  नसतो, पण बरेच स्वप्न रंजन करण्यात आपण वेळ घालवतो.जेंव्हा ह्याची जाणीव होते की आत ह्या सगळ्या विचारांचा काही फायदा नाही, तेंव्हा मात्र डिप्रेशन ची स्टेज सुरु होते.

डिप्रेशन होण्याचे मुख्य   कारण  म्हणजे ,आपण काहीच करू शकत नाही याची जाणीव होणे. या पिरियड मधे स्वतःबरोबर जास्त वेळ घालवण्याची प्रवृत्ती वाढते . मन खूप नाजूक होऊन जातं.   एकटे बसून रहाण्याची इच्छा होते. अशा वेळेस मात्र देव आणि दैवाची साथ हवी हवीशी वाटू लागते. आयुष्यभर निरीश्वरवादी वादी असलेले लोकं पण देव आणि दैवाच्या मागे लागतात. नामस्मरण करण्याचा काळात तुमचे मन इतर विचारांपासून मुक्त होते, आणि ” बरं वाटणे” ही प्रक्रिया सुरु होते. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत केवळ देव – दैव साथ देते असे नाही, इतरही बऱ्याच गोष्टी जसे दुसऱ्या कुठल्यातरी कामात गुंतून जाणे, किंवा काही काळ निघून जाणे हे पण कारण असू शकते. हाच काळ वाईट सवयी लागण्याचा (दारू पिणे वगैरे ) असतो.

डिप्रेशन संपलं की मग जे काही झालेलं आहे, ते तुमचे मन मान्य करते, आणि एकदा एखादी गोष्ट मान्य केली की मग मात्र त्यातून दुःखावर मात करणे अगदी सहज शक्य असते. प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी तरी असे प्रसंग येतात, पण मला तरी नामस्मरण आणि देव आणि दैवाची जास्त मदत होते हे नक्की!

हे संपलं की खरी सिल्वर लाइनिंग दिसणे सुरु होते. आपण त्या दुःखा  मधून  बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे सुरु करतो. सगळं विसरून नवीन काही तरी सुरु केल्याशिवाय काही गत्यंतर नाही हे लक्षात आल्यावर  पुन्हा आपल्याच नेहेमीच्या आयुष्यात रिएंट्री करण्यासाठी प्रयत्न सुरु केले जातात.  बऱ्याच आशा असतात, अपेक्षा असतात. अपेक्षांच्या हिंदोळ्यावर  कुठे तरी ऍक्सेप्ट केलं जाईल  ह्या आशेवर जीवन जगणं सुरु रहातं.. हे सगळं प्रत्येकालाच   कधी ना कधी तरी अनुभवावे लागते, फरक इतकाच , की काही लोकं डिप्रेशन मधून लवकर बाहेर पडतात, तर काही लोकांना खूप वेळ लागतो. शेवटी आयुष्य आहे ते जगायचं असतंच ना प्रत्येकाला!