स्वभाव..

Written by  on September 25, 2012

शरीराच्या असंख्य अवयवा बरोबरच आपला इतर कोणाला कधीच  न दिसणारा  एक अवयव पण असतो- आणि तो पण सगळ्यात जास्त महत्त्वाचा .  पती- पत्नीच्या नात्यांमधे   पण त्याची ओळख पटायला कित्येक वर्ष जावी लागतात-  तो म्हणजे स्वभाव. या स्वभावाच्या पण गमती आहेत, म्हणतात  ना ,की एखाद्याचा स्वभाव खूप छान – किंवा वाईट आहे- म्हणजे नेमकं काय असतं?  हा स्वभाव   कधी बदलत नाही असे म्हणतात- ते खरं आहे का?.

चांगला किंवा वाईट स्वभाव म्हणजे कसा ते मला कधीच समजलेले नाही.जर एखादा घरातला माणुस खूप समाज सेवा किंवा काहीतरी सोशल काम करत असेल तर त्याला बाहेरचे लोकं नक्कीच खूप छान स्वभावाचा आहे म्हणत असतील, पण त्याचे घरचे लोकं मात्र , आता पुरे झालं  “घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजणं “-असं म्हणत असतीलच !

खऱ्या स्वभावाचे दर्शन कधी कसे होईल ते सांगता येत नाही. एखाद्या मुलीचे लग्न झाल्यावर जर या मुलीचा नवरा तिच्या म्हणजे मुलीच्या आई वडिलाकडे जास्त ओढला गेला, तर तिच्या आईवडीलांच्या   दृष्टीने तो चांगल्या स्वभावाचा- पण त्याच्या स्वतःच्या आईवडीलांच्या दृष्टीने?? त्यांना तर वाटतच असेल की “आमच्या बाब्याचा स्वभाव असा कधीच  नव्हता,  कित्ती कित्ती प्रेम करायचा आपल्या आईवर? पण लग्न झालं आणि तेंव्हापासून मात्र पुर्ण बदलला”,  अगदी ’त्यांच्या ’ ( म्हणजे त्याच्या सासुरवाडीच्या) कह्यात गेलाय .  इथे “स्वभावाकडे ” पहाण्याची ’नजर’ बदलली की स्वभाव वेगळा दिसू लागतो.

स्वभावाबद्दल  जेंव्हा बोलतो तेंव्हा गणित हे खूप महत्वाचे. स्वभावाच्या जडणघडणीत या गणिताचा खूप मोठा भाग असतो. हे गणित   मुलाच्या आणि आईवडीलांच्या  नाते संबंध मधे पण बरेचदा वरचढ ठरतं .मुलाने काही केलं नाही, किंवा एखादी गोष्ट मना विरुद्ध केली ( जसे लग्नासाठी घरी न सांगता मुलगी पसंत करणे , वेगळे रहायला जाणे, घरच्यांची म्हणजे आई वडिलांची परवानगी न घेता   बायकोला तिच्या माहेरी  पाठवणे  वगैरे वगैरे काहीही कारण जरी असले तरी ) की  लगेच त्याच्या आई वडिलांचे  त्या मुलाच्या लहानपणा पासून तर आज पर्यंत चे मनातले हिशोब लगेच  समोर येतात ,  अरे तू जेंव्हा आजारी होतास तेंव्हा तुझ्या आईने २१ चतुर्थ्या केल्या मिठाच्या मोदकाच्या- तुला चांगल्या कॉलेजात घालायचं, त्याची फी भरता यावी  म्हणून मी चार वर्ष तेच ते जुने बूट शिवून वापरले, आणि तू आज आम्हाला असं वाळीत टाकलंस ? इतका  मोठा झालास की सगळे निर्णय आपले आपणच घेतलेस?

ही अशी वाक्य वडील मुलांच्या भांडणात आली की मग त्या नाते संबंधातला “हिशोब”  दिसायला लागतो, आणि प्रश्न मनात येतो की इतक्या नाजूक नात्या मधे पण हा असा “गणिताचा” टोकदार कंगोरा  असू शकतो? आई वडिलांनाही मुलाचा स्वभाव बिघडल्याचं जाणवतं , आणि मुलाला पण तसंच वाटत असतं. हे असे हिशोब  लक्षात ठेवले जातात आणि मग त्यानुसार स्वभावात बदल होत असतो.

स्वभावा कडें  पहाण्याचा पण एक गणितीय दृष्टी कोन असतो. जेंव्हा एखाद्याच्या   स्वभावाचे मूल्यमापन केले जाते, तेंव्हा त्या मागे ’पूर्वानुभव”, किंवा एक    कॅल्क्युलेशन्स असतात. कशा ते सांगतो . मागच्याच आठवड्यातील गोष्ट आहे.कामानिमित्त नागपुरला गेलो असतांना, बाजारात गेलो असता आकस्मित पणे एक खूप जुना मित्र भेटला.

माझ्याकडे पाहिल्या  बरोबर कुचेष्टेने हसून म्हणाला- ’ तुम्ही काय आता मोठी माणसं झालात, आमच्या सारख्या लहान माणसांकडे तुमचे लक्ष कसे राहील आता?” मला एक क्षणभर हा असे काय बोलतोय ते समजलेच नाही.विचारले , “की काय झाले रे बाबा”? तर म्हणतो,परवाचीच गोष्ट, ” मी तुला चार वेळा फोन केला होता, पण तू तर माझा  फोन  पण उचलला नाहीस .बरं आणि नंतर  मला फोन सुद्धा  केला नाहीस- ते वेगळंच.

माझा मोबाइल हरवल्या मुळे सगळे नंबर्स गेले हे जरी त्याला सांगितलं, तरी त्याला ते खरं वाटत नव्हतं. फोन न उचलण्याच्या मागचं कारण म्हणजे,  एखाद्या मिटींग मधे असलो, की फोन सायलेंट वर असतो, आणि मी तेंव्हा फोन उचलत नाही.   मिटींग नंतर    माहिती असलेल्या ’मिस्ड” कॉल्स ला   कॉल बॅक करतो. पण याचा नंबर मात्र सेव्ह केलेला नसल्याने नाव आले नव्हते,  म्हणून मी फोन केला नव्हता.

इथे त्याच्या मनात कुठेतरी हे गणित पक्कं बसलं होतं, की त्याने चारदा फोन करूनही मी फोन केला नाही.  जर त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी मला फोन केला असता, तर मला पण तो फोन घेतल्यावर तो नंबर त्याचा  आहे असे लक्षात आले असते आणि मी तो सेव्ह केला असता. पण………..दुसऱ्या दिवशी  पुन्हा फोन करण्या ऐवजी, त्याने  गणित केले – आणि माझ्याबद्दल एक मत तयार केले स्वतःचे आणि  मनात आकस धरला. म्हणून म्हणतो की ’स्वभाव” हा  केलेल्या कॅलक्युलेशन्स वर आधारित  असतो- गणितावर आधारित असतो.  भावना बाजूला ठेवून भावनेपेक्षाही वरचढ  असलेली कॅलक्युलेशन्स तुमचा स्वभाव नियंत्रित करतात !

वरची गोष्ट ऍनॅलाइझ केली तर लक्षात येईल, की त्या मित्राच्या मते त्याने मला फोन केला तेंव्हा,माझा स्वभाव खूप चांगला होता म्हणूनच त्याला माझ्याशी बोलावेसे वाटत होते, पण मी फोन न उचलल्यामुळे त्याला माझा स्वभाव एकदम  गर्विष्ठ वाटायला लागला, इतका वाईट, की माझ्याशी बोलतांना पण त्याच्या आवाजातला तुसडे पणा मला जाणवत होता. एका क्षणात चांगल्या स्वभावाचा वाईट किंवा वाईटाचा चांगला होऊ शकतो 🙂

माझी मुलगी लहान असताना तिला एका मैत्रिणीच्या वाढदिवसाला जायचं होतं, तिच्यासाठी गिफ्ट आणायला म्हणून दुकानात गेलो. तिथे गेल्यावर माझ्या मुलीची पहिली कॉमेंट होती, ” बाबा, फारसं महाग नको, तिने मला फक्त कलर  क्रेऑन्स दिले होते , आपणही काहीतरी तसंच घेऊ “. मैत्रिणीला पण गिफ्ट देतांना तिने काय दिले होते याचा हिशोब मनातल्या मनात करायला   १२ वर्षाच्या मुलीला कोणी शिकवलं ?? मला एकदम आश्चर्य वाटलं- आणि जाणवलं की, प्रत्येकामध्ये हा गुण अवगुण जो काही असेल तो, अगदी जन्मजातच असतो- बाय डिफॉल्ट!. मुद्दाम शिकवावं लागत नाही.

लग्नामध्ये दिले जाणारे प्रेझेट्स हा पण एक या गणित प्रेमी  लोकांचा एक आवडीचा विषय. माझ्या लहानपणी लग्नामध्ये  नवऱ्या मुला मुलीच्या मागे स्टेज वर    वही पेन घेऊन मागे दोन तिन माणसं बसायची ( एक लिहायला, दुसरा सामान रचून ठेवायला,  आणि तिसरा  -तो  पहिल्या दोघांनी  कॅशची आलेली पाकिटं खिशात घालू नये म्हणून लक्ष ठेवणारा असेल का ?? 🙂 ).  त्या वही  मधे जे काही प्रेझेंट मिळेल ते देणाऱ्याच्या नावा पुढे   त्याने  काय प्रेझेंट दिले ते लिहून ठेवण्याची पद्धत होती. नंतर पुढे मागे  त्या प्रेझेंट देणाऱ्या कडे  काही कार्य असले, की ती वही उघडून त्याने आपल्या घरच्या कार्यात काय प्रेझेंट  दिले होते ते पाहूनच मग किती किमतीचे  प्रेझेंट द्यायचे हे ठरवले जायचे. काही घरी ही पद्धत तर अजूनही अस्तित्वात आहे .

अगदी छातीवर हात ठेवून  विचार करा आणि स्वतःलाच  खरं काय ते सांगा, तुम्हाला एखादं प्रेझेंट मिळालं की तुम्ही काय करता? मस्त पैकी एखादा गिफ्ट रॅप केलेलं प्रेझेंट असतं, ते कव्हर उघडून आधी त्या वस्तूवर काही किमतीचे लेबल लावले आहे का ते पहाता ! 🙂

१)किंमत आहे का? की ती खोडलेली आहे?

२)जर खोडलेली असेल तर  खूप स्वस्त असेल का हे प्रेझेंट??

३)आणि जर जास्त  किमतीचे लेबल तसेच असेल तर , देतांना लेबल काढून  का दिले नाही? म्हणजे   नक्कीच भरपूर डीस्काउंट मिळाला असेल का?

४)महागाच गिफ्ट दिलंय असं वाटावं म्हणून लेबल काढलेलं नसावं- असं तर नाही नां?

हे असे   संशय मनात येणार.   प्रेझेंट घेतल्यावर त्या मागची भावना न पहाता, त्याची किंमत काय असेल ह्याचं कॅलक्युलेशन्स सुरु होतात- हा मानवी स्वभावच आहे. म्हणूनच म्हणतात, की माणसाचं मन हे” आधीच मर्कट त्यात मद्य प्यायलेला, आणि त्यावर पुन्हा विंचू चावलेला” असं असतं!  मिळालेलं गिफ्ट हे ग्रेसफुली आणि  रिस्पेक्टफुली  देणाऱ्याच्या भावनांचा आदर ठेवून स्विकारताना    लागणारा मनाचा मोठेपणा   स्वभावात आणणे कधी शिकणार आहोत आपण?

जर तुम्हाला तुमचे गणित कसे आहे हे मी विचारले तर  ??  आपल्या सामाजिक जीवनात  एकमेकांशी   जे संबंध आहेत ते केवळ गणितावर अवलंबून आहेत असं म्हटलं तर?? अहो हे गणित मला कायम वेडं करतं.माझी एकच इच्छा आहे. मला या अशा गणिता मधे नापास व्हायचंय.. खूप   कच्चे रहायचंय, सगळे हिशोब विसरायचे आहेत. नेहेमीसाठी……….

विजय मल्ल्या जेम्स ओटिस अन गांधिजी,

Written by  on September 8, 2012

जेम्स ओटीस .. आता म्हणतोय की त्याला गांधींच्या  वस्तू द्यायच्या नाही . न्युयॉर्क ऑक्शन हाउस कडे मागणं केलंय की केल्या गेलेले ऑक्शन रद्द ठरवण्यात यावे.

अंगावर पांढरी चामडी आहे म्हणून सगळ्या जगालाच अक्कल शिकवायचा परवाना मिळालाय असे वाटते का ह्या माणसाला??  आधी म्हणाला होता, की भारताने संरक्षणावर चा खर्च कमी करावा, मग मी हे सामान भारताला फुकट देईन..भारताने संरक्षणावर किती खर्च करावा, किंवा गरिबांसाठी काय करावे सांगणारा हा टीकोजीराव कोण?? ह्याला कोणि दिला हा अधिकार? की ही असली स्टेटमेंट्स चिप पब्लिसिटी मिळवण्याचा एक मार्ग?? अर्थात सरकारने ह्याच्या कडे लक्ष न दिल्यामुळे त्याने हे सामान हॅमर खाली ठेवले.

आता सगळं सामान विकल्या गेल्यावर आणि विजय मल्ल्या यांनी खरेदी केल्या मुळे ,त्याला म्हणे साक्षात्कार झाला की महात्मा गांधींचे सामान भारतामधे पोलिटीकल गेन साठी वापर्ले जात आहे , की जे महात्मा गांधिंना अजिबात आवडले नसते.सध्या भारतामधे निवडणूका आहेत आणि ह्या सामानामुळे भारताचे विभाजन होण्याची शक्यता आहे(??????) ..आता असा साक्षात्कार झाला म्हणुन ह्याने झालेले ऑक्शन रद्द ठरवण्यासाठी  अंटिकोरियम ऑक्शनर्स ला अर्ज दिलेला आहे..  .मला तर अजिबात वाटत नाही की हे खरं कारण असेल म्हणून.. माझ्या मते ह्या माणसाचे तोंड थोडं जास्तच मोठे आहे, त्यामुळे एखादा जास्त तुकडा पदरी पडला, तर बरंच आहे, म्हणून ह्याने हा स्टॅंड घेतल् असेल असे वाटते..

मला असं विचारावसं वाटतं, जेम्स, तु जे हे सगळे सामान हॅमर खाली ठेवले ते तरी महात्मा गांधींना आवडले असेल काय? जर इतकीच  नितीमुल्यांची चाड असेल तर मग ते सामान सरळ गांधी आश्रमाला ( अहमदाबाद अथवा वर्धा येथील) फुकट का देऊन टाकले नाहीस?   प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय असलेली   फिरंग्यांची जमात , त्याच्या कडून अजुन काय अपेक्षा ठेवायच्या?

असंही वाचण्यात आलंय की जेंव्हा हे ऑक्शन सुरु होणार होते, तेंव्हाच जेम्स चा वकील समोर आला आणि त्याने ऑक्शन थांबवण्याचा प्रयत्न केला.

जर हेच आयटम्स एखाद्या ब्रिट किंवा इतर फिरंग्याने विकत घेतले असते तरी पण ह्या जेम्स ने असेच म्हंटले असते? अर्थात नाही. ब्राउन स्किन ही अमेरिकेत आणि युरोप मधे काळ्या स्किनच्या पण खालच्या दर्जाची मानली जाते.. आणि एका ब्राउन स्किन असलेल्या माणसाने एखादी गोष्ट   मिळवावी, ही कल्पनाच त्या फिरंग्यांना सहन होणार नाही..आणि ह्या केस मधे तर थोबाडावर १.८बिलियन डॉलर्स मारुन हे सामान विकत घेतलंय..

माझ्या मते जेम्स ला असं वाटलं असेल की   भारत या ऑक्शन मधे भाग घेईल आणि मग त्याला रग्गड पैसा मिळेल. पण भारताने ऑक्शन मधे भाग न घेतल्यामुळे जी गोची झाली,आणि इतक्या आंतर्राष्ट्रिय महत्वाच्या गोष्टीचे केवळ १.८  बिलियन्स आले तेंव्हाच त्याचा भ्रम निरास झाला असावा.

” बरं कुठल्या सगळ्या गोष्टी होत्या ज्या साठी ही मारामारी सुरु आहे??
झेनिथ कंपनिचे पॉकेट वॉच
गांधीजींचा चष्मा.. तोच राउंड फ्रेम वाला
लेदर चप्पल
जेवणाची थाळी आणि वाटी”

वर नमूद वस्तूंच्या व्यतिरिक्त जेम्स कडे खालील वस्तू आहेत.

जेम्स कडे अजुन मार्टिन लुथर किंग चे सपोर्ट साठी गांधींना लिहिलेले पत्र , आणि आणि हिरव्या क्रेयॉन ने लिहिलेले पत्र, ज्यावर बापु अशी सही आहे ते, महात्मा गांधींचा पॅथोलॉजिकल ब्लड रिपोर्ट ( शेवटचा आणि डॉ बी एल तनेजा यांनी सही केलेला.महात्मा गांधींच्या हस्ताक्षरातील टेलिग्रामला दिलेले उत्तर, .. इत्यादी.,…
या गोष्टी भारताला देण्यासाठी त्याची अट काय आहे ते अजुन नीटसं क्लिअर नाही पण

विजय मल्ल्यांनी वेळेवर घेतलेल्या निर्णया मुळे तरी हे सामान भारतामधे परत आले. आता लेट्स थॅंक मल्ल्या फॉर धिस… जय हिंद!