अनुत्तरीत प्रश्न….

Written by  on February 26, 2012

श्री गुरुजी

आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता  लठ्ठ झालाय तो.. नुसता खातो आणि बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसून रहात नव्हतो आम्ही. पण जेंव्हा १९४८ मधे जेल मधे जावं लागलं, तेंव्हा पा्सून माझी तब्येत बिघडली. माझे वडील सांगत होते, आणि धाकटी मुलगी अगदी मन लाऊन ऐकत होती.

आता हे इतर सगळं म्हणजे खेळणं व्यायाम वगैरे ठीक आहे.. पण जेल मधे तुम्ही कशाला गेला होतात?? काय केलं होतं तुम्ही??  कित्ती कुल नां??? म्हणजे आजोबा तुम्ही प्रिझन सेल पण पाहिला?? तिथे चक्क राहिलात तुम्ही???  आता या जेल मधे जाण्यात काय कुल दिसलं तिला तीच जाणे..

खरं तर मुलींचा विश्वासच बसत नव्हता की आपल्या आजोबांनी जेल मधे जाण्यासारखं काही केलं असेल म्हणून. कारण आजोबा तर कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते.. आणि ही गोष्ट तर नक्की  माहिती होती.. आता हे जेलचं काय सांगताहेत??

हे असं नेहेमी होतं, वडील ( वय वर्ष ८३-८४) असं काहीतरी अर्धवट सांगतात मुलींना , आणि मग नंतर मला सगळं व्यवस्थित सांगावं लागतं . आता आजोबा जेल मधे का गेले होते?? ही घटनाच मुळी मुलींच्या मते  इतकी  ’कुल’ (?)  चित्त थरारक होती , की मुलींना  काय झालं होतं हे माहिती करुन घेतल्या शिवाय   रहावत नव्हतं. बरं  खरंच तेंव्हा काय झालं होतं… याची मला पण निटशी माहिती नव्हती, मग घरी असलेलं   पुस्तक   आधी वाचलं, आणि मग समजाऊन सांगितलं काय झालं होतं ते…आजोबांनी पण फक्त संघकार्यासाठी गेलो होतो एवढंच सांगितलं होतं मुलींना.. म्हणजे नेमकं काय??

इथे अगदी थोडक्यात माहिती देतो.. १९४६ सालची घटना. १६ ऑगस्ट रोजी मुस्लिम लिग ने जाहिर केलेला  डायरेक्ट ऍक्शन ( अजुन माहिती अन फोटॊ बघायला इथे क्लिक करा)  ^(http://rangmarathiche.com/goto/http://en.wikipedia.org/wiki/Direct_Action_Day#Riots_and_Massacre)कार्यक्रम, त्या  कार्यक्रमात झालेल्या बेसावध हिंदूंच्या कत्तली, अत्याचार, बलात्कार, आणि सोबतच पंजाब आणि सिंध, आणि बंगालात झालेले हिंदूंचे शिरकाण,तसेच त्यांना जबरदस्तीने निर्वासित करण्याचे झालेले प्रयत्न.. अशा अनेक घटना घडल्या होत्या. असे अनेक फोटो आहेत वर दिलेल्या लिंक वर की जे पाहिलं की संताप येतो- हे असं का व्हावं म्ह्णून??

सर्व सामान्य हिंदू पेटुन उठला होता. प्रत्येकालाच आपण काही तरी केलं पाहिजे  असं वाटत होतं, पण नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. तिकडे गांधीजींचं उपोषण सुरू होतं, मुस्लिमांवर थोडे हल्ले केल्याबरोबर. तेंव्हाच श्री गुरुजींनी  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.golwalkarguruji.org/marathi)स्वयंसेवकांना दंगल पिडीत अशा भागात जाउन निर्वासित ( हिंदू) बांधवांना मदत करण्याचे अवाहन केले. केवळ श्री गुरुजींच्या एका शब्दावर हजारो पुर्ण वेळ कार्यकर्ते आणि सोबतच इतरही कार्यकर्ते त्या भागात मदत कार्यासाठी निघाले.

१८ ऑक्टॊबर १९४७ श्री गुरुजीं ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.golwalkarguruji.org/marathi)नी  रोजी महाराज हरीसिंग यांची भेट घेउन  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.golwalkarguruji.org/marathi)काश्मीर भारतामधे विलीन करणे  हे काश्मिरी जनतेच्या आणि भारताच्या कसे हिताचे आहे ह्यावर चर्चा केली.पण लवकरच पाकिस्तानी आक्रमणामुळे या समस्येतिल गुंता वाढून ही समस्या गंभीर बनली होती.कॉंग्रेसच्या कपाळी असलेला फाळणीच्या पापाचा टीळा अन काश्मीर प्रश्न हाताळण्यात झालेल्या अक्षम्य चुकांमुळे पं. नेहरूंनी सगळा राग काढला तो संघावर!!

हिंदु समाज जागृत झाल्यामुळे संघशक्ती वाढू लागली आहे हे लक्षात येताच पं. नेहरूंनी जातीयवादी शक्तींना चिरडून टाकु अशा धमक्या देणे सुरु केले. अर्थात अशा धमक्यांचा संघावर किंवा संघ कार्यावर काहीच परिणाम   झाला नाही, आणि स्वयंसेवकांनी आपली कामं करणं सुरु ठेवलं. यावर कुठल्याही स्वयंसेवकाने किंवा श्री गुरुजीं ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.golwalkarguruji.org/marathi)नी  पं. नेहरुंच्या विरुद्ध वक्तव्य करणे टाळले.

३० जानेवारी १९४८.. महात्मा गांधींची हत्या केली गेली.श्री गुरुजींनी पं. नेहरु, सरदार पटेल, आणि देवदास गांधी ( महात्माजींचे सुपुत्र) यांना तारा पाठवून घटनेचा निषेध केला, आणि नंतर भेट सुध्दा घेतली. तेंव्हा श्री गुरुजी मद्रासला होते.

दरम्यान या हत्येसाठी संघाला जबाबदार धरण्याच्या काही राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे स्वयंसेवकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. ब्राह्मणांची घरं लुटण्यात आली, आगी लावण्यात आल्या. हिंदूंमधेच जातीय  तेढ निर्माण करण्याच्या  राजकीय रुढींना पाया निर्माण करण्यात येत होता. आज आपण केवळ  मुलायम सिंग, लालु यदव,मायावती किंवा कांशीराम यांना जा्तीय राजकारण करतात म्हणून दोष देतो, पण याची मुहुर्तमेढ कॉंग्रेसच्याच राजवटीत रोवल्या गेली हे आपण विसरुन चालणार नाही.

ते हल्ला करण्याचे लोण महाराष्ट्रात पण पोहोचले आणि श्री गुरुजींच्या घरावर पण दोनदा हल्ला करण्यात आला.बरीचशी चीज वस्तु जी काय असेल ती लुटून नेण्यात आली होती.श्री गुरुजींनी  सगळ्या स्वयंसेवकांना शांत रहा आणि कुठलाही प्रतिकार करु नका असा संदेश दिला. १ फेब्रु.१९४८ ला त्यांना अटक करण्यात आली आणि  काहीही कारण न देता जेल मधे टाकण्यात आले.

४ फेब्रु १९४८ रोजी संघावर बंदी घालण्यात आली . श्री गुरुजींनी जेल मधुनच ६ फेब्रु १९४९ ला एक वक्तव्य देउन  आपण संघाचे कार्य स्थगित केले आहे असे जाहीर केले- आणि त्याच वक्तव्यात संघावर करण्यात आलेल्या आरोपांचा पण स्पष्ट इन्कार केला.

श्री गुरुजींना जेंव्हा अटक करण्यात आली होती तेंव्हा दोन कलमं लावण्यात आली होती.. एक म्हणजे ३०२ – खुन  आणी ‘१२० म्हणजे खुनाचा प्रयत्न करणे. पण नंतर बहुतेक सरकारच्या लक्षात आलं की केस खूपच कमजोर आहे म्हणून, एका आठवड्यात त्यांच्यावरचे हे दोन्ही आरोप मागे घेउन त्यांच्यावर सुरक्षा कायद्या खाली स्थानबध्दतेचा आदेश बजावण्यात आला. यावरूनच त्या वेळेसचा शासनाचा दुटप्पी पणा दिसून येतो.

१३ ऑक्टॊबरला श्री गुरुजींची सुटका झाल्यानंतर त्यांनी सरदार पटेल यांची भेट घेतली असता, सरदार पटेल यांनी श्री गुरुजींना संघ विसर्जित करुन कॉंग्रेसमधे विलीन व्हावे अशी सूचना दिली. ही सूचना अर्थातच श्री गुरुजींना मान्य होणे शक्य नव्हते, श्री गुरुजींनी सांगितले की संघ हा राजकीय पक्ष नाही… आणि त्यामुळे  सरदार पटेलांची सूचना मान्य करता येणार नाही. सरदार पटेलांनी तेंव्हा  “श्री गुरुजींना त्यांना दिल्ली सोडून देण्यास सांगण्यात यावे” असे अधिकाऱ्यांना सांगून   मुंबईला निघून गेले. जेंव्हा पोलिस श्री गुरुजींवर आदेश बजावण्यास गेले तेंव्हा त्याच आदेशाच्या मागे ” हा आदेश नागरीक हक्काचे हनन करणारा असल्यामुळे मला मान्य नाही”, असे लिहुन दिले, आणि श्री गुरुजी दिल्लीतच राहिले.

३ ते१३ नोव्हेंबर महिन्यात त्यांनी पं नेहरूंवर संघावरील बंदीसाठी एक तर पुरावा तरी द्या किंवा संघ बंदीचा आदेश तरी उठवा अशा आशयाची पत्रं लिहीलीत.  सोबत  आपली मागणी पुर्ण होई पर्यंत आपण दिल्लीलाच रहाणार हे पण लिहिलं .

६ फेब्रु १९४८ ला  आपण दिलेला  संघ विसर्जनाचा  , तो आपण मागे घेत आहोत, ( हे झालं ११ नोव्हेंबर १९४८ला) आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्वीच्याच उत्साहाने संघ कार्य सुरु करावे  हे श्री गुरुजींनी जाहीर केल्यावर मात्र , प्ं नेहरूंनी १८१८ सालच्या बंगाल प्रिझनर्स ऍक्ट खाली ( हा ऍक्ट काय आहे ??) श्री गुरुजींना अटक करुन त्यांना नागपुरला विमानाने पाठवून दिले.

मध्यंतरी म्हणजे संघ बंदीच्या काळात शाखा भरणे बंद झाले होते. म्हणून ९ डीसेंबर रोजी “संघ शाखा प्रारंभ” हा सत्याग्रह सुरु करण्यात आला. या सत्याग्रहामधे प्रत्येक भागात संघ शाखा पुन्हा सुरु करण्यात याव्या असा सत्याग्रह होता तो.

या सत्याग्रहावर बोलतांना पंडित नेहरु – संघांच्या पोरांचा हा दुराग्रह आम्ही सहज मोडून टाकु असे म्हणत पंडीत नेहेरुंनी लाखो सत्याग्रहींना अटक करुन जेल मधे टाकले .  त्या मधे आजोबा पण जेल मधे गेले …

संघ बंदीचा हुकुम हा शेवटी १० जुलै १९४९ रोजी मागे घेण्यात आला आणि त्यानंतर आजोबांची सुटका झाली.

इतकी कॉम्प्लीकेटेड गोष्ट मुलांना सोपी करुन कशी सांगायची?? आणि सांगितल्यावर पण इतके प्रश्न असतात की त्यांची उत्तर बघायला राष्ट्र ’ऋषी श्री गुरुजी’ चे दोन्ही भाग चाळावे लागतात, आणि शेवटी प्रश्न रहातो अनुत्तरीत.. तरी आपल्या कडून होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करायचा.. असो..

हा लेख संपुर्ण पणे राष्ट्र ऋषी श्री गुरुजी या पुस्तकावरून बेतलेला आहे..

मॅक डी-पिझा हट वगैरे…

Written by  on February 9, 2012
happy meal, shrek, kayvattelte, kay vattel te, kay vatel te

हॅपी मिल खेळणं. सध्या श्रेक सुरु आहे.

इंजिनिअरींगच्या परीक्षा संपल्या, आणि दुसऱ्याच दिवशी परवा मोठी मुलगी मैत्रिणींसोबत सिनेमा पाहून आली. घरी येतांना तिच्या जवळ श्रेक मधलं गाढव होतं. माझ्या प्रश्नार्थक नजरेकडे बघून ती म्हणाली, की हॅपी मिल्स घेतलं मॅक डी मधे तिथे मिळालं हे गाढव! या हॅपी मिलचा कन्सेप्ट खरोखरच मॅक डी ला खूप फायदेशीर ठरलाय.

कित्येक मुलं फक्त त्या खेळण्यासाठी हॅपी मिल्स घेतात. हॅपी मिल मधे काय येतं? एक चिज बर्गर, फ्राइज, कोक ! सगळ्या हाय कॅलरीज असलेल्या गोष्टी ज्या मुलांच्या आरोग्याला खूप चांगल्या नाहीत. पण पालकच मुलांना अशा सवयी लावतात असे माझे मत आहे आणि  मी स्वतः पण याचे उदाहरण आहे .

मॅक डी मधे गेल्यावर सॅलड सँडविच कोणीच ऑर्डर करत नाही, तर भरपूर कॅलरीज असलेले चिकन नगेट्स, किंवा बर्गरच घेतलं जातं. यात मिळणाऱ्या कॅलरीज तर शरीराला  घातक असतातच, पण सोबत एखादं मीडियम फ्रेंच फ्राइज पण मुलांना घ्यायला आवडतं- म्हणजे जास्ती अनावश्यक  कॅलरीज.

या जंक फुडला एस्टॅब्लिश करण्यात हॅपी मिलचा खूप मोठा हात आहे हे नक्की! मुलांना तिथे नेलं की मग घरचे सोबत जाणारे आपणही काहीतरी मागवतो- म्हणजे थोडक्यात मुलं त्यांच्यासाठी कस्टमर्स नेतात.मॅक डी मधे गेल्यावर ऑर्डर दिल्यावर त्या काउंटरवरच्या माणसाने एनी थिंग टू ड्रिंक सर?म्हणून विचारल्यावर तुम्ही जेंव्हा, नो थॅंक्स म्हणता- तेंव्हा त्या अस्स्खलित इंग्रजी बोलणाऱ्या २०-२२च्या मुलाच्या चेहेऱ्यावरचे तिरस्कारयुक्त भाव त्याला मुद्दाम शिकवून ठेवले आहेत का? असा संशय नेहेमीच मला येतो.

खाणं झाल्यानंतर शेवटच्या काउंटरवर जाउन पाणी मागता, तेंव्हा १५० मिली ला एक प्लास्टीक ग्लास घेऊन त्या मधे ७५ टक्के भरुन तुम्हाला देतो- अर्थात तेवढ्या पाण्याने (१०० मिली) समाधान होत नाही म्हणून त्या काउंटरवरच्या मुलाच्या काय घाटी माणूस आहे? अशा नजरेकडे सरळ दुर्लक्ष करून  मी तर त्याच्या समोरच न लाजता   चक्क ५-६ ग्लास पाणी पितो. अरे खाणं झाल्यावर पाणी हे लागणारच- मग त्यामधे पाणी मागायची लाज कसली? पण मुलांना मात्र कोक वगैरे सोबत असल्या शिवाय होत नाही. पाणी पिणं हे पण हल्ली बिलो डिग्निटी होत चाललंय. काय बोलणार आपण तरी?

मॅक डी मधे जाणारे, तिथली स्वच्छता आणि क्वॉलिटी वगैरे बाबत बोलतांना कधीच थकत नाहीत. मॅक डी आणि लोकल शेट्टीच्या हॉटेलची तुलना ही नेहेमीच करतात ते लोकं.

माझी दुसरी मुलगी लहान असतांना कुठे जायचं बाहेर खायला म्हंटलं, की मॅक डी म्हणणार हे नक्की-   कारण तिथे गेल्यावर मग हॅपी मिल घ्यायचं की मग खेळणं मिळतं म्हणून .सुरुवातीला आम्हीच कौतूक करायचो, पण लक्षात आलं की हे असं खाणं मुलांना नेह्येमी योग्य नाही म्हणून मग तिला  विचारणे पण सोडून दिले आणि सरळ एखाद्या व्यवस्थित शेट्टी कडे जायचो.. मॅक डी मधे त्या हॅपी मिलच्या बरोबर मिळणाऱ्या खेळण्यामुळे तिथे जाणं तिला आवडायचं. अतिशय हाय कॅलरीज असलेले हे जंक फुड आजकाल खूप कुल समजलं जातंय.

नुकतीच एक गोष्ट वाचनात आली, की मॅक डी च्या हॅपी मिल वर कॅलीफोर्निया मधे  कायद्याने बंद करण्यात आले आहेत. मुलांना जंक फुड खाण्यासाठी ही खेळणी उद्युक्त करतात म्हणून ही स्टेप घेतली गेली आहे. अमेरिकेच्या इतरही भागात अशा केसेस सुरु आहेत. आपल्याकडे यावर कधीच बंदी येणार नाही, कारण उच्चभ्रू लोकं या गोष्टीला मान्यता देऊन चुकले आहेत.मध्यम वर्गीयांना पण हे असे जंक फुड खाण्यासाठी उद्युक्त करण्यासाठी २० रुपये मेन्यु पण सुरु करण्यात आलेला आहे. एकदा गिर्हाइक २० रुपयांची वस्तु घ्यायला आत शिरला की मग तिथे इतरही गोष्टी असतातच अट्रॅक्ट करणाऱ्या. मुलांचे वाढदिवस , त्याच्या पार्टी साठी एक लहानसा हॉल पण असतो – बेस्ट मार्केटींग स्ट्रॅटेजी, हॉल जरी तासाभरा साठी फुकट दिला तरी होणारं बिल हे खूप जास्त असतं.

बरं दुसरी गोष्ट जी आहे ती किमती बद्दल! परवाच मी हैद्राबादला असतांना पिझा हट मधे गेलो होतो. तिथे गेल्यावर एक लार्ज पिझा व्हेज आणि एक पास्ता मागवला.एका पिझाची किम्मत किती असावी?मैदा साधारण १०० ग्राम = २ रुपये, कांदा, शिमला मिर्ची, टोमॅटो वगैरे- २ रुपये, चिझ= ५ रुपये. सगळे मिळून होतात जवळपास ९ रुपये- या मधे एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट आणि प्रॉफिट जरी मिळवलं, तरीही किम्मत ही ५० ते  ७५ रुपयांच्या दरम्यान असायला हवी पण प्रत्यक्षात  मात्र बिल मात्र सोबत जोडलंय तसं आलं.

२०  रुपयांची मटेरिअल कॉस्ट असलेला एक पि्झा किम्मत ३७० रुपये आणि टॅक्स जवळपास १०० रुपये!

वर दिलेल्या बिलात   मला प्रत्येकच गोष्ट ही आक्षेपार्ह वाटली. जर तुमचे रेट्स असे अव्वाच्या सव्वा असतील तर मग वर पुन्हा सर्व्हिस  चार्जेस कशाला? आणि अशी कुठली सर्व्हिस देता तुम्ही ? तुम्ही तयार केलेला पिझ्झा एका डिश मधे ठेऊन टेबलवर देणे बस्स! त्यासाठी इतके पैसे म्हणजे दहा टक्के लागतात का?

बिलावरून एक गोष्ट लक्षात येईल की मुळ किमतीच्या वर टॅक्स, सर्व्हिस चार्जेसच्या स्वरूपात २५ टक्के रक्कम तुमच्या कडून घेतली जाते.मला तरी ४६८ रू वर १२१ रू टॅक्स म्हणजे वेल प्लान्ड लूट वाटते आहे कस्टमर्सची.वाईट या गोष्टीचं वाटतं की इतकं असूनही गिऱ्हाइके मात्र स्वतःची फसवणूक करून घ्यायला तयार असतात.

खरं तर मेन्यु कार्डमधे दिले जाणारे भाव हे एम आर पी असावेत. म्हणजे इनक्लुझिव ऑफ ऑल टॅक्सेस.  तुम्ही  कस्टमर्स ला मेनु कार्ड  दिल्यावर त्याने रेट्स कॅल्क्युलेट करुन ऑर्डर द्यावी अशी  अपेक्षा असते का?

एकच आहे सरळ जर अशा आऊटलेट्स वर बहिष्कार घातला तर नक्कीच हे असे लोकांना लुबाडण्याचे प्रकार कमी होतील.

तिच्या मनातलं…

Written by  on February 7, 2012

indexकपाटातले सामान तिने बाहेर काढले होते. पॅकिंग सुरु होऊन दोन दिवस उलटले  होते. गेली १६ वर्ष ह्या घरात काढली. नागपूरहून मुंबईला बदली झाली, आणि तेंव्हापासून कंपनीच्या ह्या घरात रहायला आलो तेंव्हा  मोठी मुलगी सेकंड स्टॅंडर्ड आणि धाकटी नर्सरी मधे होती.  दोघीही ह्याच घरात लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांनाही हे घर म्हणजे स्वतःचेच आहे असे वाटायचे.  कधी आपल्याला हे घर सोडून जावे लागेल असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते.

इतकी वर्ष म्हणजे जवळपास १७ वर्ष आपण मुंबई रहातोय, पण इथे कधी घर घ्यावे असे का वाटले नाही आपल्याला?? पहिली गोष्ट म्हणजे जेंव्हा इथे मुंबईला रहायला आलो, तेंव्हा असे वाटायचे की आपण फार तर इथे तीन चार वर्ष राहू, नंतर मग परत नागपूरला निघून जाऊ. ही इथली गर्दी, वगैरे नको रे बाबा… इथे आहोत तो पर्यंत हे कंपनीचे घर आहेच!  कधी तरी मित्र म्हणाले म्हणून म्हाडा च्या स्किम मधे अर्ज केले होते, पण नंबर मात्र लागला नव्हता. म्हणतात ना, नशिबात काय लिहिले आहे ते  कधीच समजू शकत नाही.

माळ्यावरून मुलींची लहानपणची  खेळणी, स्पेल बाऊंड चा गेम,   जेंव्हा माळ्यावरून बाहेर निघाले, तेंव्हा मात्र किंचित ओल्या झालेल्या डोळ्य़ाच्या कडा ओलावल्या होत्या… मुली  इतक्या मोठ्या झाल्या यावर विश्वासच बसत नव्हता. मोठी मुलगी इंजिनिअर झाली सुद्धा, आणि नोकरी पण करायला लागली.  धाकटीची बि. टेक.  ची दोन वर्ष पुर्ण झाली आणि आता शेवटचे दोन वर्ष  शिल्लक आहेत, म्हणजे दोनच वर्षात तिचे पण शिक्षण संपेल, ती पण  नोकरी ला लागेलच कुठे तरी . दिवस कसे कापरा सारखे उडून गेले.लक्षातही आले नाही , २०-२२ वर्षाची मुलं जी आपल्याला दिदी आणि नवऱ्याला भैय्या म्हणायची, ती कधी काकू काका म्हणायला लागली आणि आपल्या ते अंगवळणी पडले हे लक्षातही आले नाही

घरातले गेल्या सोळा वर्षात जमा झालेले सामान पाहून मात्र तिला मात्र भरून येत होते. प्रत्येक वस्तू बरोबर जोडल्या गेलेली आठवण, उगीच मन उदास होत होते. किती वेळ आपण नवऱ्याला म्हणालो, की आपलं इथे एखादे लहानसे का होईना पण स्वतःचे घर घेऊ या म्हणून? पण प्रत्येक वेळेस  त्याने दुर्लक्ष करून उडवून लावले होते,म्हणायचा, आपल्याला थोडी इथेच रहायचे आहे? कधी न कधी तरी परत जायचं आहेच आपल्या मूळगावी.

भाड्याचे घर शोधणे सुरु केले आणि समजले की ज्या बिल्डींग मधे रहातोय, त्याच बिल्डींग मधे, सिंग म्हणून एका गृहस्थाला एक फ्लॅट भाड्याने द्यायचाय आहे.  ताबडतोब त्याला भेटायला गेलो, माणूस बरा वाटला, म्हणाला, की हा फ्लॅट त्याला लहान पडतोय म्हणून तो मोठ्या फ्लॅट मधे भाड्याने रहाण्यासाठी जातोय. बोलणी झाली आणि,    दोन दिवसात घर शिफ्ट झाले.

होता होता  दोन महिने झाले आणि  आणि असे वाटले की आपण आता ह्या घरात ऍडजस्ट होतोय, तर एक दिवस पुन्हा  सींगचा (घरमालकाचा ) फोन आला, की  नवीन घरात रहायला गेल्यावर त्याची आई वारली-  आणि म्हणून त्याला असे वाटते की  त्याचे ते भाड्याचे  घर  त्याच्यासाठी अनलकी आहे. थोडक्यात म्हणजे काय तर  त्याला  आम्ही घर  रिकामे करून द्यावे हे सांगायला फोन केला होता. क्षणभर तर काय करावे हेच सुचत नव्हते. म्हणजे पुन्हा आत घर शोधणे, शिफ्टींग वगैरे आलेच! घर पण त्याच कॉलनीत मिळणे महत्वाचे.  आता काय करावं बरं??   विचार मनात आला, की आपले स्वतःचे घर असते तर अशी वेळ आली असती का आपल्यावर?  म्हणतात ना घर फिरले की वासे पण फिरतात.

सिंगच्या बायकोने, तर तुम्ही आता स्वतःचेच घर घेऊन टाका म्हणून आम्हाला सल्ला पण दिला. असे नको असलेले सल्ले बरेच लोकं देत होते,  आणि त्यामुळे मनस्ताप  खूप होत होता. आज पर्यंत तुम्ही घर का घेतलं नाही म्हणून वेड्यात काढणारे लोकंही होते,  त्यांचा त्रास वेगळाच! पण इतके असूनही तिच्या   नवऱ्याच्या मनात काही घर घेण्याचे पक्के होते नव्हते. इतका त्रास झाल्यावरही तो मात्र स्थितप्रज्ञा सारखा वागत होता. आणि  त्याने पुन्हा भाड्याचे घर पहाणे सुरु केले.

तेवढ्यातच एका मराठी माणसाचे घर पण भाड्याने द्यायचे आहे असे समजले, म्हणून त्याला भेटल्यावर, पैशाचं सगळं फायनल झालं, त्याने ऍग्रीमेंट ची कॉपी मेल केली, ती वाचल्यावर मात्र खरंच आपण घर भाड्याने घेतोय की ह्या माणसाचा उर्मटपणा सहन करतोय हेच समजत नव्हते. त्याच्या ऍग्रिमेंट मधे ” माझा पत्ता तुम्ही कुठल्याही सरकारी कामा साठी म्हणजे पासपोर्ट, आधार कार्ड , बॅंक वगैरे साठी  वापरायचा नाही ,अशा मूर्खासारख्या अटी  घातल्या होत्या.  या शिवाय काही टर्म्स तर इतक्या अपमान कारक होत्या की ,जसे तुमचे सामान बाहेर फेकुन तुम्हाला शारीरिक जबरदस्तीने घरातून काढण्याचा अधिकार त्या घरमालकाला असेल  वगैरे वगैरे……, की त्या वाचून घर घेण्याची इच्छाच मेली  . दुसरे घर काही दृष्टिपथात नव्हते, म्हणून त्याच्या अटी मान्य कराव्या लागणार की काय अशी परिस्थीती निर्माण झाली होती. पण अजून दोन दिवस हातात होते .

पुन्हा पुर्ण जोमाने घर पहाणे सुरु केले आणि दुसरे एक घर शेवटी भाड्याने मिळाले. घरमालक सज्जन होता. त्याने अजिबात काही त्रास न देता सर्वसाधारण असते तसे ऍग्रीमेंट केले आणि आम्ही इकडे शिफ्ट झालो. खरं तर  दोनच महिन्यानंतर पॅकिंगची वेळ येईल असे वाटले नव्हते, पण आली वेळ! सगळं सामान पॅक केले, आणि नवीन घरी रहायला गेलो. सगळं सामान लावून झाले.

घर बहुतेक गेले सहा महिने रिकामेच होते, त्यामुळे घराची अवस्था काही फारशी बरी नव्हती. नाही म्हणायला घरमालकाने पेंटींग केले होते, पण बाथरूम वगैरे तर विचारायची सोय नाही. आमच्या पूर्वी इथे काही बॅचलर्स रहायचे  . त्यामुळे टॉयलेट्स वगैरे खूपच घाण झालेल्या होत्या.

तिने अंगावरच्या पंजाबी ड्रेसच्या ओढणीची झाशीच्या राणी प्रमाणे गाठ मारली आणि अंगात आल्यासारखी टॉयलेट्स ची सफाई सुरु केली.  टॉयलेट अगदी लखलखीत  मनाप्रमाणे स्वच्छ झाल्यावर तिने साबणाने हात पाय धुतले आणि  तिने ओढणीची गाठ सोडून  डोळ्यांच्या कडांवर जमा झालेले  पाणी  टिपले. तेवढ्यात तो  काही सामान घेऊन माळ्यावर टाकायला बाथरूम मधे आला, आणि त्याने तिच्या रडवेल्या चेहेऱ्याकडे लक्ष गेले. तिच्या डोळ्यात जिथे त्याचे संपूर्ण विश्व समावलेले असायचे तिथे आज मात्र दुखावल्याची भावना दिसत होती. त्याने तिला जवळ घेतले, आणि विचारले काय झाले?? ती म्हणाली, उगीच रडू आलं, “अजून किती दिवस लोकांच्या टॉयलेट्स घासायच्या आपण??”   खरंय नाही का?? भाड्याच्या घरात आपण भाडे जरी भरले तरी ते घर आपलं नसतंच…..

हाच तो क्षण होता की अंतर्बाह्य हादरला होता तो…. आणि पुढल्या दोनच महिन्यात तिला
अढळपद मिळालं, ध्रुवा सारखं  🙂

त्याला वाटलं , की तिच्या मनातलं समजायला आपल्याला इतका वेळ का बरं लागला??

इथे  ” तिचा” लेख…… ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.loksatta.com/vasturang-news/memories-of-home-635518/)