कट्टा..

Written by  on January 26, 2012

मित्र म्हणजे कोण? अगदी सोपा आणि साधा प्रश्न! पण उत्तर??  नाही इतकं सोपं नाही ते.  आजचा मित्र कदाचित उद्या एक मोठा शत्रू म्हणूनही समोर उभा राहू शकतो. कोण कुणाला कधी मित्र म्हणून हवासा वाटेल  किंवा नकोसा वाटेल हे सांगता येत नाही. पूर्वी  एक लेख लिहिला होता सखी  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/12/04/%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%80/)नावाने, पण तो केवळ पत्नी या विषयावर होता.

शाळेतले मित्र वेगळे असायचे. एकदा शाळेतून घरी आलो, की आपलं दप्तर ( स्कुल बॅग नाही) कोपऱ्यात फेकले, आणि आईने जे काही खायला दिलं ते खाऊन सरळ बाहेर खेळायला पळायचो. खेळणं झाल्यावर शाखेत जाऊन पुन्हा खेळणं! सगळं करून साधारण सव्वा सात पर्यंत घरी परत यायचो.  आज सहज विचार केला की त्या पैकी  किती मित्रांची नावं  आठवतात? – तर उत्तर फारच डिप्रेसिंग आहे. 😦

कॉलेजच्या दिवसातली मैत्री ही केवळ मनातलं कोणाला तरी सांगता यावं म्हणून असायची असे नेहेमी वाटते. कारण तेव्हाची मैत्री ही शाळेतल्या मैत्री प्रमाणे निर्वाज्य नव्हती. त्या मधे माझं गुपित तू सांभाळ तुझं मी.. अशी काहीतरी भावना असायची. एखादाच मित्र असा असायचा की ज्याच्याकडे मनातलं सगळं बोललं जायचं, ( कोण मुलगी आवडते, तिच्याशी कधी  कुठे काय बोललो, काय काय केलं?किंवा कठल्या मुलीकडे फिल्डींग लावली आहे .. वगैरे वगैरे..   )  या शिवाय पण  तोंडी लावायला म्हणून  सबमिशन्स, टेस्ट्स, जीटी वगैरे वगैरे विषय असायचे.  तसेच जगातल्या सगळ्या सुंदर मुली इतर कॉलेज मधेच -आणि अगदी गाळ आपल्या कॉलेज मधे का?  बरं , त्या गाळातली पण एकही मुलगी आपल्याला भाव का देत नाही? अशा पैकी कुठलाही  विषय कधीही चालायचा.

कॉलेजच्या दिवसातल्या कट़्ट्याची एक  वेगळी मजा असायची, तेंव्हा खिशामधे   फारसे पैसे नसायचे, त्यामुळे एक कटींग चहा आणि चौघांमधे पेटवलेली एक सिगरेट, इतकं जरी असलं तरीही दिड तास सहज पार व्हायचा. एकच सिगरेट आळीपाळीने ओढण्यातली मजा वेगळीच! मग एखादा मित्र फिल्टर ओलं करतो म्हणून सगळ्यात शेवटी लहानसं थोटूक उरेपर्यंत त्याला द्यायची नाही.  ते दिवस वेगळेच होते.

होता होता कॉलेज संपतं, आणि नोकरी लागली आणि ऑफिस सुरु झालं,  आणि मित्रांचा संच आपोआपच बदलला जातो. मित्रांमधे नोकरी करणारे, आणि इतर ( पिजी करणारे वगैरे  ऍकॅडमीक किडे म्हणतात त्यांना..)  असे सरळ सरळ गट पडायचे. अभ्यासु गृप हा फार वेळ बसत नसे कट़्ट्यावर. अभ्यासामुळे त्यांना तास अन तास कट्ट्यावर बसणे शक्य व्हायचे नाही, आणि त्यामुळे हळू हळू त्यांचे येणे पण कमी व्हायचे. इतर नोकरी करणारे मात्र नियमीत कट्ट्यावर पडीक असायचे !

२५ एक वर्षापूर्वी म्हणजे  लग्नापूर्वी मित्रांसोबत  संध्याकाळी शंकर नगरच्या कट्ट्यावर  आम्ही लोकं पडीक असायचो.कटींग चहा आणि सिगरेट्स चा धूर काढत आणि नसलेल्या मुद्यांवर चर्चा करत  कसा वेळ जायचा ते समजायच  पण नाही . संध्याकाळी ऑफिस संपलं की घरी न जाता कट़्ट्यावर दिड तास तरी पक्का जायचा!तेव्हाची जी मैत्री होती, ती जरा वेगळी होती. सगळे जण नोकरी करणारे, त्यामूळे अभ्यासाचं टेन्शन नाही, की पैशाची कमतरता नाही -त्या मुळे तिथे कितीही वेळ बसता यायचं.

दर शनिवारी रात्री मात्र  मोहनसेठच्या प्रितम  हॉटेलवर न चुकता  हा ओल्ड मंकचा कट़्टा रमायचा. रात्री दहा साडे दहा वाजले तरीही घरी जाण्याची कोणालाच घाई नसायची.  सगळेच बॅचलर्स, त्यामूळे विचारणारे कोणीच नाही! काही जणांच्या तर घरी पण माहिती होतं, की शनीवारी रात्री घरी जेवणार नाही हा म्हणून! मी तर एकटाच होतो, त्यामुळे नो प्रॉब्लेम! धमाल असायची .  कट़्ट्यावरचे मैत्री काही वेगळीच!मग एखाद्या दिवशी एखादा मित्र बॉम्ब गोळा टाकायचा _ की शहीद झालो बॉस!!! आणि सगळ्यांना ओल्ड मॉंक ची पार्टी द्यायचा.

होता होता आमच्या कट़्ट्या वरचा एक एक मेंबर शहीद व्हायला लागला. एखाद्याचं लग्नं ठरलं की तो दर  शनिवारी होणाऱ्या बायको सोबत फिरायला जाणे जास्त प्रिफर करु लागला.. पण अगदीच मित्रांनी  बाईल वेडा म्हणून चिडवू  नये म्हणून कट़्ट्यावर पण  कधी तरी हजेरी पण लावायचा. नेहेमी चार पेग खेचणारा एकदम फ्रेश लाईम सोडावर यायचा . होणाऱ्या बायकोला’ वास ’आवडत नाही म्हणून पित नाही हे न सांगता , ऍसिडीटीचा त्रास सुरु झालाय असे कारण द्यायचा.

फक्त सोडा आणि चकन्या बरोबर टाइमपास करतांना त्याला पाहिलं की तो खरंच शहिद झाला म्हणून दुःख व्यक्त करावेसे वाटून त्याच्या नावे एक बॉटम्स अप – वन फॉर द रोड घेऊन त्याला श्रध्दांजली देण्याची प्रथा होती .एकदाचं लग्न झालं, की मग तर तो मित्र अगदी पूर्णपणे येणे बंद करायचा .

एखाद्याचं लग्न ठरलं किंवा झाली  की    काही दिवसात  एक मेंबर गळला आपल्या कट़्ट्यावरचा हे जाणवायचं. तो मित्र मग मॅरीड गृप मधे जायचा. त्या मधे आमच्यातलेच ज्यांचं लग्न झालं होतं, ते सहकुटुंब बाहेर भेटायचे – पाव भाजी वगैरे पार्टी (!) साठी.

ही सगळी  लग्न झालेली मंडळी चक्क सिनेमाला  किंवा बगिचात वगैरे पण जायची एकत्र. चार पाच मित्र आणि त्यांच्या बायका. आम्हा इतर लग्न न झालेल्या मित्रांच्या मते,  सगळा चार्मच गेला असायचा बॉस ’त्या लग्न झालेल्या मित्रांच्या आयुष्यातला . अरे काय हे लाईफ आहे असे वाटायचे त्यांना आणि आपोआपच  असा एक नवीन ’कट़्टा..लग्न झालेल्यांचा’ सुरु व्हायचा.हे सगळं आपोआप होत असतं. कुठलीही मैत्री ही अशीच आपोआप होत असते. सगळी मैत्री ही बहूतेक आवडीवर अवलंबुन असते. आवडी जुळल्या की मैत्री ही सह्ज होते.

लग्न होण्यापूर्वी फक्त टाइमपास हा एकच मुद्दा असायचा, पण नंतर मात्र केवळ टाइमपास नाही, तर बायकोची जबाबदारी आणि तिला पण बोअर होऊ नये  हा एक मुद्दा असल्यानेच कट्टा सुटायचा मित्रांचा .  मंगळागौरीच्या रात्री बायको माहेरी गेली की मग हे सगळे मित्र पुन्हा एकदा आमच्या बॅचलर कट़्टयावर यायचे 🙂 .किंवा- आणि त्याचं पुन्हा दर्शन व्हायचं  ते बायकोला पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठवल्यावर !! 🙂

ऑफिस मधे सकाळी दहाची वेळ, ऑफिस मधे चहा पिऊन झाला की  ऑफिस मधले काही लोकं  एकमेकांना खुणा करतात, आणि एक शब्दही न बोलता सगळे बाहेर पडतात- सिगरेट ओढायला.  हल्ली जवळपास सगळीच ऑफिसेस नो स्मोकिंग झालेली आहेत, त्यामुळे सिगरेट साठी  बाहेर जाणे आलेच. चहा झाला, की ह्या स्मोकर्स बरोबर फक्त इतर स्मोकर्सच बाहेर जातात. मी स्वतः सिगरेट ओढत नाही, त्यामूळे मी त्यांच्यात कधीच नसतो.एखाद्याने ड्रिंक्स सोडले किंवा नॉनव्हेज सोडले की मग मात्र त्याचे कट़्ट्यावर येणे कमी होते हे नक्की. अहो फक्त चखणा आणि सोडा पित कोण वेळ घालवेल??

मैत्री फक्त समव्यसनी लोकांशीच जास्त चांगली होते  .सिगरेट, पबिंग, ट्रेकिंग, ब्लॉगिंग अशा अनेक व्यसनांमुळे लोकं एकत्र येतात.होय! ब्लॉगिंग हे पण एक असंच व्यसन आहे .एकदा जडलं की मग सुटणे सहज शक्य नाही . स्वानुभवाचे बोल आहेत हे. एका ब्लॉगरची  दुसऱ्या ब्लॉगर बरोबर मैत्री फार लवकर होते. मग तो जगाच्या दुसऱ्या कोपर्यात असला तरी सुद्धा. मग ब्लॉगर्सचे, ट्रेकर्स चे, खादाडी प्रेमींचे  पण असेच कट़्टे भरतात,  व्हर्च्युअल भेटी मधून सुरु झालेले असे कट़्टे , नंतर कधी  खरोखरच्या भेटी मधे परीवर्तित होतात ते समजतच नाही.

शेवटी एक झालंय. हल्ली हे सगळं कट़्टा कल्चर बरंच कमी झालेले आहे. खरोखरचा नाही , तरी व्हर्च्युअल कट़्टा हा नेहेमीच सुरु असतो. मग तो फेसबुक वर असो की बझ वर असो. आपण शेवटी सोशल आहोतच. आपल्याला एकटेपणा नकोसा होतो. अगदी जुनी  सेकंडहॅंड फियाट जरी  विकत घेतली आणि त्याचं कौतुक करायला मित्र मैत्रिणी, आई वडील असले की कसं भरून पावतो आपण नाही का? वडील गाडीत बसल्यावर, ही माझ्या मुलाची कार म्हणून अभिमानाने दाखवतात तेंव्हा त्यांच्यापेक्षा आपल्यालाच जास्त आनंद होत असतो.

कट्टेकऱ्यांची आणि कट्ट्याची  खरच आवश्यकता असतेच आपल्या आयुष्यात .कौतुक करायला, चिडवायला, तर कधी रागवायला सुद्धा!   कट़्ट्याला काही पर्याय नाही!

…. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!

Written by  on January 24, 2012

ओल्डमंक

एक दिवस रात्री फेसबुक वर स्टेटस अपडेट केले, ” प्रेइंग विथ ओल्डमंक “….  आणि त्यावर बऱ्याच कॉमेंट्स आल्या.. लक्षात आलं , की ओल्डमंक बरोबर लॉयल असणारे आपल्या सारखे बरेच लोकं आहेत, की जे ओल्डमंक चे नाव जरी वाचले  तरी नॉस्टेल्जिक होतात.

आता नवीन वर्ष आलंय जवळ. सगळ्यांचेच काही ना काहीतरी प्रोग्राम्स असतीलच. आमचे पण असायचे. बहुतेक आम्ही सगळे मित्र एकत्र भेटून  ओल्डमंक   बरोबर एंजॉय करायचो. इतकी वर्ष झाली तरीही  ओल्ड मंक आजही माझा आवडता ब्रॅंड आहे. एखाद्या पार्टी मधे   स्कॉच आणि ओल्डमंक असली   तर  मी ओल्डमंक प्रिफर करतो. माझ्या मते या  जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक म्हणजे  ओल्डमंक पिणारे आणि दुसरे म्हणजे ओल्डमंक  न पिणारे! दोन ओल्डमंक पिणारे एकदम घनिष्ट मित्र होऊ शकतात हा माझा अनुभव आहे. कारण कधी पण बार मधे गेले, की काय मागवायचं या बद्दल विचार करायची वेळच पडत नाही-न मेन्यु कार्ड न पहाता, ओल्डमंक विथ सोडा अ‍ॅंड आइस  ही ऑर्डर दिली जाते.

ओल्डमंक ची ओळख तशी लहानपणीच  झाली. काकाच्या कपाटात   ओल्डमंक ची बाटली असायची, आणि त्याबद्दल एक वेगळंच कुतूहल असायचं. काय  असेल बरं त्या मधे? शेवटी एक दिवस  मी आणि विनयने त्यातली थोडी झाकणात घेऊन  चाखून पाहिलीच आणि   चव तर खूपच आवडली  . नंतर हळू हळू झाकणाचा पेग झाला, आणि जेवढी लेव्हल कमी गेली असेल, तेवढे पाणी……………असो..

जेंव्हा नवीन नवीन नोकरी लागली होती, तेंव्हा बहुतेक दर बुधवारी रात्री  मित्रांसोबत  बैठक व्हायची. जास्त पैसे नसायचे, आणि कमी पैशात मिळणारी व्हिस्की घेतली, की दुसऱ्या दिवशी डोकं चढणे हे नक्कीच ! व्हिस्की उगीच सोफिस्टिकेटेड ड्रिंक वाटायची मला. जेंव्हा व्हिस्की मधला फोलपणा लक्षात आला, तेंव्हा अगदी कॉलेजच्या दिवसापासून साथ देणारी ओल्डमंक पुन्हा आठवली, आणि तिची साथ काही सुटली नाही. सुरुवातीला नोकरी लागल्यावर व्हिस्की , जिन, व्होडका   ह्या फॅन्सी  ड्रिंक्स  चा प्रयत्न नक्कीच केला होता, पण  फारशी कधी पचनी पडली नाही. स्कॉच परवडायची नाही, आणि मॅक डॉवेल, ओसी, एसीने, हॅंगओव्हर यायचा, तेंव्हा  लक्षात आले की ओल्डमंक ला पर्याय नाही- ओल्डमंक इज द बेस्ट!

कॉलेज मधे असतांना आउट ऑफ कम्प्ल्शन ओल्डमॉंक सुरु केली , कारण थोडी जास्त जरी झाली, तरीही दुसऱ्या दिवशी डोकं दुखणे किंवा हॅंग ओव्हर हा प्रकार कधीच होत नसे. इतक्या वर्षानंतरही  केवळ हेच कारण आहे, की आजही माझी फेवरेट रम ओल्डमंक आहे, बरोबरचे मित्र जरी बकार्डी व्हाईट /रेड  घेत असले, तरी पण मी अजूनही ओल्डमंक शी प्रामाणिक आहे.  ओल्डमंक सोड्या बरोबर घेतांना मला जी किंचित व्हॅनिला एसेन्स ची चव,आणि थोडीशी  गोड चव  असते, ती  खूप आवडते.  इतर कुठल्याही रम मध्ये  हा फ्लेवर नाही.  मॅक डी  कधी तरी ओल्ड मंक नव्हती म्हणून कॉम्प्रोमाईज म्हणून ट्राय करतो, पण चव अजिबात आवडत नाही मला.

माझे  काही सोफिस्टिकेटेड ( व्हिस्की घेणारे) मित्र ओल्डमंक ला “घोड्य़ांना पाजायचे  ड्रिंक” म्हणतात, पण त्याने  आम्हाला काही फरक पडत नाही 🙂

ओल्डमंक मधे कोला वगैरे टाकणे म्हणजे ओल्डमंक च्या ओरिजिनल चवी बरोबर प्रतारणा करणे आहे हे माझे मत , पण माझे मित्र मात्र कोल्या शिवाय ओल्डमंकचा विचारही करू शकत नव्हते. ओल्ड मंक मला  किंचित लिंबू पिळून ’ऑन द रॉक्स’ किंवा विथ फूल सोडा  आवडते.  कोला घालून रम घेतली की तिची ‘किक’ लवकर लागते, याचे कारण कोला मधे असलेली साखर. साखरे मुळे अल्कोहोल रक्तामध्ये लवकर भिनते ( म्हणजे चढते), असे रम+कोला घेणाऱ्या मित्रांचे मत आहे.

कॉलेजच्या दिवसात काही जरी झालं, तरी सब मर्ज की एक दवा, ओल्डमंक हे ब्रिद वाक्य होते. सर्दी , स्टफ नोज,  खोकला, किंचित ताप वाटणे, पोट खराब असणे,  तर ओल्डमंक मधे दोन चमचे मध, गरम पाणी , किंचित लिंबू घेतले की हमखास बरे वाटते अशी माझी खात्री होती. मग बहुतेक वेळा मध नसल्याने, फक्त गरम पाणी आणि ओल्डमंक ला दुसरा पर्याय नव्हता. डॉक्टरच्या “फी ” च्या पैशात ओल्डमंक ची ’चपटी’ मिळायची तेंव्हा ! खरं सांगतो,लग्न होई पर्यंत  मी कधीच डॉक्टर कडे गेलो नाही सर्दी , खोकला ताप या साठी.

असो, तर मंडळी ही ओल्डमंक बहुतेक सगळ्याच इंजिनीअर्सची आवडती.  मला वाटतं की   इंजिनीअर्स परदेशात गेल्यावर ओल्डमंक मिस करतात. माझा एक मावसभाऊ सिंगापूरला होता तो   नेहेमी,  भारतातून  कोणी येतंय ते पहातच असयचा. इथे आल्यावर सांगायचा की ओल्डमंक च्या चवीशी साधर्म्य असणारी रम शोधणे हाच त्याचा छंद झाला होता.  इथून कोणी जाणार असला की त्याच्यासोबत  ओल्ड मंक आणि पार्लेजी पाठव म्हणायचा!  चहात बुडवून खायला पार्ले जी ,ओल्ड मंक , आणि चितळ्यांची बाकरवडी ह्या गोष्टींना अजिबात काहीच पर्याय नाही हे त्याचे स्पष्ट मत होते, आणि त्याच्याशी मी पण सहमत आहेच.

ओल्डमंक ची एक ओल्डमंक च्या आकाराची बाटली पण मध्यंतरी मिळायची . ती रिकामी बाटली पण बऱ्याच लोकांच्या घरात दिसायची शोकेस मधे, पण आम्ही मात्र कायम ’चपटी’ च घ्यायचो विकत.आणि तसेच एक  ओल्डमंक रिझर्व नावाची १२ वर्ष मॅच्युअर केलेली प्रीमियम रम   पण मार्केट मधे लॉंच केली होती, पण आमच्यासारखे लोकं मूळ ब्रॅंड सोबतच प्रामाणिक राहिले .  आमच्या लहानपणी सगळ्यांच्याच घरात मनी प्लांट लावण्याची फॅशन आली होती. बहुसंख्य घरात ओल्डमंक रमच्या बाटली मधेच हे मनीप्लांट लावलेले दिसायचे. या प्लांट साठी तरी या बाटलीला खूप मागणी असायची. आता गेले ते दिवस! हल्ली मनीप्लांट लावण्यात  लोकांचा इंटरेस्ट संपलाय आणि आमच्यासारखे काही खास दर्दी लोकंच ओल्डमंक शी प्रामाणिक आहेत. आजही एक मित्र आणि मी  ओल्डमंक बरोबर प्रेअर करत बसलोय भोपाळ मधे.

 

मित्र म्हणतो, अरे ओल्डमंक ला  बहुतेक कोणी वाली रहाणार नाही, त्यावर माझं उत्तर होतं, ” जो पर्यंत इंजिनिअरींग कॉलेजेस आहेत तो पर्यंत ओल्डमंकला मरण नाही.. काळजी करू नकोस..

अ(न)र्थसंकल्प

Written by  on January 8, 2012

नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , साला बादा प्रमाणे यंदाही अर्थमंत्र्यांनी नववर्षासाठी  अर्थसंकल्प  संसदे मधे मांडला . या  अर्थसंकल्पाला   अर्थसंकल्पा ऐवजी अनर्थसंकल्पच म्हणायला हवे.  या संकल्पामधे कुठलाही अर्थ नसतो.सगळे भाव वर्षभर वेळोवेळी वाढवलेले असतात, पुन्हा एकदा वर्षातून एकदा सगळे भाव सरसकट वाढवण्याचा कार्यक्रम म्हणजे अर्थसंकल्प!

या अर्थ संकल्पावर वर उद्या सगळ्याच वृत्तपत्रांमधे प्रतिक्रियांचा पाऊस पडणार आहे.  अर्थ संकल्पाची पन्नास हजाराच्या वर असलेली पानं  वाचायची म्हंटलं तरीही कमीतकमी एक महिना तरी लागेल. पण इकडे मंत्र्यानी आपली ब्रिफकेस उघडून वाचणे सुरु केले, की लगेच लोकांच्या, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुरु होतात.  रात्री घरी गेल्यावर टिव्हीचे  बातमीदार  हातात माईक धरून लोकांच्या मागे धावतांना दिसणार आहेत. एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीने बऱ्याच मान्यवरांचे  इंटरव्ह्यु घेतले आणि त्यांची या अर्थसंकल्पा बद्दलची मतं विचारली, त्यातले काही इंटरव्ह्यु     उद्या कुठल्याही वृत्तपत्रांमधे प्रसिद्ध होण्यापूर्वी इथे काय वाटेल ते वर प्रसिद्ध करीत आहोत. साधारण याच टाइपच्या  प्रतिक्रिया उद्याच्या पेपर मधे  वाचायला मिळतील.

बहुतेक सगळे वृत्तपत्र  संपादक या पन्नास हजार पानांना न वाचता त्यावर एक्स्पर्ट टिप्पणी अग्रलेख लिहितील.

मनमोहन:- अतिशय क्रांतिकारी विचारसरणीचा , पुरोगामी , देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प  आहे हा.

विरोधी  नेते   :-  ” गोरगरीबांना अधिक गरीब करणारा, आणि श्रीमंतांना अधिक श्रीमंत करणारा हा अर्थसंकल्प आहे.

दिदी:- श्रीमंत उद्योगपतींना डोक्यावर घेऊन नाचणारा   व सामान्य माणसाला वेठीला धरणारा तसेच जगणे कठीण करून सोडणारा हा अर्थ संकल्प आहे. सगळं काही महाग केले आहे. हा असा अर्थसंकल्प सादर केला म्हणून अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे.मी सांगते सोनियाला.

लोकल पार्ट्या  :- महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा हा संकल्प आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या गरजांकडे अजिबात लक्ष दिल्या गेलेले नाही या अर्थसंकल्पात.  देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई पार दुर्लक्षित केल्या गेली आहे. पुढच्यावेळी नक्की मराठी अर्थमंत्री हवा अशी आम्ही हायकमांडला मागणी करणार आहोत.

कम्युनिस्ट :- श्रीमंतांचे लाड करणारा हा अर्थसंकल्प आहे -त्यांच्या गरजेच्या सगळ्या वस्तूंवर   कर कमी केल्या गेले आहेत आणि गरीबांच्या वस्तू महाग केल्या आहेत. सगळ्या कॉम्रेडस ना एकत्र करून आता देशातल्या सगळ्या उद्योग धंद्याचे राष्ट्रीयीकरण करणे आवश्यक आहे .

समाजवादी :-  अल्पसंख्यांकांच्या, मागासवर्गीयांच्या  गरजांकडे दुर्लक्ष करणारा हा अर्थसंकल्प आहे.  अतिशय अन्यायकारक असा हा अर्थसंकल्प  मागासवर्गीयांचे कंबरडे मोडणारा ठरणार आहे.  ….!

कॉलेज विद्यार्थी :- अजिबात काही धड नाही हा अर्थसंकल्प, मुलांना दिलेल्या ’पॉकेटमनी ” वर  इनकम टॅक्स मधे सुट द्यायला हवी होती-म्हणजे बाबा लोकांनी मुलांचे पॉकेटमनी वाढवले असते .तरूणांच्या विरोधात असलेला हा अर्थसंकल्प आहे.

नोकरी करणाऱ्या स्त्रिया :- चिडलेल्या चेहेऱ्याने, केस विस्कटलेले, ( लोकलचा प्रवास करून जस्ट गाडीतून उतरलेली )अहो, आता कसं जगायचं हेच समजत नाही आम्हाला. इतकी महागाई वाढली आहे, आणि हा असा जेंडरबायस्ड अर्थसंकल्प. सगळी प्रसाधनं – लिप्स्टिक्स, कम्पॅक्ट्स वगैरे महागली आहेत.. स्त्रियांच्या विरोधात असलेला अर्थसंकल्प आहे हा.

मध्यमवर्गीय :- इनकम टॅक्सची लिमिट वाढली नाही. सामान्य नोकरदार वर्गासाठी एक वाईट अर्थसंकल्प. पेट्रोलचे भाव दुप्पट वाढले, मग इनकमटॅक्स रिबेट दुप्पट का नाही वाढवला? सगळा मूर्खांचा बाजार आहे झालं ( शेवटलं वाक्य सेन्सॉर )

सामान्य स्त्री  :-  सामान्य माणसाचे कम्बरडे मोडणारा अर्थसंकल्प आहे हा. सगळ्या महागाच्या वस्तूंवर कर सवलती दिल्या आहेत , पण सामान्य गरजेच्या वस्तू महाग केल्या आहेत.  या कर वाढीच्या ओझ्याखाली गरिबांचे कंबरडे मोडणार हे नक्की. अहो मी सांगते, सगळे कर खप वाढवले आहेत- आता हे उद्या परवा सगळीकडे बोंबाबोंब झाली, की हे सगळे वाढ्वलेले कर अर्धे करतील. हे नेहेमीचेच आहे, आधी दहा टक्के वाढवायचे, आणि नंतर लोकांनी ओरडा केला त्यात तिन चार टक्के सुट द्यायची.

विरोधी नेते (लोकल ) :- हा असा अर्थसंकल्प सादर करायला तुम्हाला अर्थमंत्री कशाला हवा? त्या साठी एखादा मंत्रालयातला क्लर्क पण चालला असता.

सोनिया:-(स्वगत:- ) चला सचिनची सेंच्युरी झाली शंभरावी, आता कोण लक्ष देतं या अर्थसंकल्पाकडे??  उद्या पहिल्या पानावर सचीन असेल.. धन्यवाद रे सचीन.. वाचवलंस देवा तू या संकटातून………