२० वर्षांपुर्वी आणि आज…!(१)

Written by  on November 19, 2011

जग किती फास्ट बदलतं नाही? एव्हलिन टॉफलरचं पुस्तंक फ्युचर शॉक हे फारच फेमस होतं८५ च्या सुमारास. जर कुठे हे पुस्तक मिळालं तर जरूर वाचा. एक चांगली फोरसाईट असलेल्या लेखकाची कल्पनाशक्ती किती  उंच उडान भरु शकते ते हे पुस्तक वाचल्यावर  समजेल.

कांही दिवसांपुर्वी एक लहानसं स्फुट वाचनात आलं होतं कुठेतरी.. आता एक्झॅक्टली आठवत नाही पण फारच सुंदर होतं म्हणुन तोच बेस धरुन हे आर्टीकल लिहितोय.त्या काळी लोकं टिव्ही घ्यायला गेले की तुम्हाला रिमोटवाला हवा की विदाउट रिमोट हा प्रश्न विचारला जायचा. एकच चॅनल होतं त्यामुळे रिमोटचा उपयोग फक्त व्हॉल्युम कमी जास्त करायलाच व्हायचा. आमच्या घरचा टिव्ही हा विदाउट रिमोट होता. 🙂 ( काय करायचा रिमोट ? उगिच खर्च जास्तिचा..आणि उपयोग तर कांहीच नाही.. इती  सौ.)

टिव्ही वरचे कार्यक्रम पहाणं..  म्हणजे काय?? तर हमलोग पहाणं.. किंवा चित्रहार पहाणं  . एक साप्ताहिकी नावाचा कार्यक्रम होता ज्या मधे पुढिल आठवड्यात होणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांची रुपरेषा दिलेली  असायची. तुम्हाला कदाचित गम्मत वाटेल पण लोकं  तेंव्हा साप्ताहिकी पण अतिशय आवडीने बघायचे. शनिवार चा मराठी चित्रपट आणि रविवारचा हिंदी चित्रपट कुठला हे समजावे हा उद्देश असायचा.

रविवारचा सिनेमा फुकटचा सिनेमा म्हणुन तो बघितला पाहिजे असा एक दंडक होता.   त्या काळी एक होस्ट होता टिव्ही वर डोळ्यांना काजळ आणी ऒठांना लिपस्टीक लाउन तो कम्पेरिंग करायचा, दिपक नाव होतं त्याचं. त्याला पाहिलं की अगदी टाळकं सटकायचं.. तशीच नागपुर दुरदर्शन च्या कार्यक्रमात  एक बाई होती निलाटकर म्हणुन, सारखी तिच ती दिसायची टिव्ही वर. तिला बघितलं की पण खुपच संताप यायचा. चांगल्या बायका मिळत नाही का दुरदर्शनला असं वाटायचं..

कृषी दर्शन, किंवा आमची माती आमची माणसं हा कार्यक्रम शहरातले लोकं पण बघायचे.एकच चॅनल असल्यामुळे चॅनल बदलणे म्हणजे काय? कारण.. एकच चॅनल होतं आपलं बिलव्हड दुरदर्शन..

दुरदर्शन वर तेंव्हा एक माशी खुप त्रास द्यायची , आम्ही मुलं, ती बातम्या वाचणारी बाई किती वेळा माशी हाकलते ते मोजायचो. या माशीवर तर कित्येक कार्टुन्स आले होत तेंव्हा.

क्रिकेट ची रेकॉर्डेड मॅच पहाणं म्हणजे तर एक पर्वणी असायची . एखाद्याच्याच घरी टीव्ही असायचा, मग सगळे जवळपास रहाणारे मित्र त्याच्या घरी जमायचे टीव्ही पहायला. घरचा मालक मग घरी येणाऱ्या या न बोलावलेल्या पाहुण्यांसाठी खाली सतरंजी टाकुन ठेवायचा बसायला. घर मालक सोफ्यावर बसुन बघणार टीव्ही!!!ज्याच्या घरी टीव्ही असेल  तो मात्र पार वैतागुन जायचा, अहो प्रायव्हसी म्हणजे काय ती शिल्लकच रहात नव्हती ना..

टिव्हिवरचा व्यत्यय.. ! तो का असायचा हेच सांगता येत नाही.  तुम्ही एखादी इंटरेस्टींग सिरियल पहाताय अगदी खुप छान सिन सुरु आहे.. आणि एकदम समोर ती बहुचर्चीत व्यत्यय ची पाटी दाखवली जायची. टिव्ही वरचे सगळेच कार्यक्रम हे नेहेमीच अगदी फॅमिली व्हिविंगला योग्य असायचे . आता तसं म्हणता येणार नाही..

नंतरच्या काळात एक रामायण , देख भाइ देख, महाभारत, विक्रम और वेताल, अशा सिरियल्स सुरु झाल्या की रस्ते ओस पडायचे. रविवारी सकाळी तर सगळे लोकं रामाय़ण पहायला आंघोळी करुन टीव्ही समोर बरोब्बर साडेनऊ वाजता बसायचे . याच पिरियड मधे एक सिनेमा आला होता जय संतोषी मां म्हणुन. हा पिक्चर अगदी बॉक्स ऑफिस सुपर हिट झाला होता. बरेच लोकं त्या सिनेमात दाखवल्या प्रमाणे संतोषीमातेचे व्रत पण करित असंत.

क्रिकेट मॅचेस म्हणजे एक पर्वणी असायची . पण लाइव्ह मॅचेस ह्या दाखवल्या जात नसत. एखाद्या सिनेमाच्या आधी एक दहा मिनिटांची चित्रफित क्रिकेटची दाखवली जायची. ती एक चित्र फित (गावस्करचे ते दोन तिन शॉटस बघायला) पहायला पण आम्ही अगदी जीव टाकायचॊ  . कधी तरी सिनेमा चालेनासा झाला, की जाहिराती केल्या जायच्या, की आजपासुन नविन मॅच चे क्लिपिंग्ज दाखवण्यात येणार आहेत, मग केवळ ते क्लिपिंग्ज बघायला पण लोकं पुन्हा सिनेमा बघायचे.

सिनेमाचे तिकिट पण थर्ड क्लास ७५ पैसे, सेकंड क्लास १रु.०५ पैसे, फर्स्ट क्लास १रु.६५ पैसे आणि बाल्कनी २रु. २० पैसे असायचे. पण तेवढे पैसे पण खर्च करणं जिवावर यायचं . इंटरव्हल मधे बाहेर जायचं असेल तर गेट पास दिला जायचा. काही मुलं घरी न सांगता सिनेमा पहायला आलेली असायची ,ती गेट पास विकुन अर्धा सिनेमा पाहुन घरी जायची.. आणि उरलेला अर्धा मग नंतर कधी तरी बघितला जायचा. मी पण हा प्रकार बरेचदा केलाय .. अहो घरी न सांगता सिनेमाला गेलो की आइला बरोबर कळायचं… कसं ते माहीती नाही.. पण नंतर एकदा आई म्हणाली की सिगारेटचा वास येतो तुझ्या कपड्यांना सिनेमा पाहुन आलास की.. शक्य आहे.. कारण तेंव्हा सिनेमा हॉल मधे स्मोकिंग करणं बॅन नव्हतं.

नंतर लवकरच व्हिसीपी नावाच एक प्रकार आला. फुनाइ नावाचा एक कोरियन कंपनीचा व्हिसीपी खुप पॉप्युलर झालेला होता. किंमत फक्त ५ हजार रुपये होती. कॅसेट्स भाड्याने मिळायच्या. ज्याच्या घरी व्हिसिआर नसेल त्याला तो भाड्याने पण मिळायचा. मग लोकं शनिवारी २४ तासासाठी व्हिसिआर भाड्याने आणुन कंटीन्युअस २४ तास सिनेमे पहायचे. ४-५ कॅसेट्स आणुन. कदाचित तुम्हाला हे खोटं वाटेल पण माझ्या वयाचे जे लोकं असतिल त्यांना अजुनही आठवत असेल.

सुटी मधे वरोड्याला आजोळी गेलो की तिथे कधीतरी आलेल्या टेंट मधे पण सिनेमा पाहिल्याचं आठवतं. ती एक वेगळी गम्मत . कोल्ड ड्रिंक्स म्हणजे आपल्या जॉर्जीने ( फर्नांडीस) कोक वर बॅन आणला होता ना, म्हणुन फक्त गोल्ड स्पॉट किंवा थम्स अप, किंवा कॅम्पा कोला वगैरे अव्हेलेबल होते. पेप्सी किंवा कोक फक्त सिनेमातंच दिसायचे फिरोझखानच्या.म माझ्या लहान पणी जेंव्हा फॅंटा  मिळायचं तेंव्हा त्याची किंमत फक्त ७० पैसे होती. आणि पेट्रोल होतं १रु. ३० पैसे लिटर. आता तुमच्या लक्षात येइल की पेट्रोल चे भाव किती जास्त प्रमाणात वाढलेले आहेत कोल्डड्रिंक्स पेक्षा.

पेट्रोल च्या ऐवजी कोल्डड्रींक्स वर कार चालली तर काय मजा येइल नाही कां? खुप पैसे वाचतिल..  🙂

बराच मोठा होणार दिसतोय हा लेख, उरलेला उद्या पोस्ट करिन.