इ मेल फॉर्वर्ड्स..

Written by  on October 8, 2011

काल सकाळीच एक इ मेल आला. त्यात दिलं होतं की जर मोबाईल पॅंटच्या खिशात ठेवला तर शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते, आणि म्हणून सेल फोन पॅंटच्या खिशात ठेवणे टाळा . बरं त्याच इ मेल मधे हे पण दिलेले होते की जर सेल फोन शर्टच्या खिशात ठेवला तरी  सुद्धा तुमच्या हार्ट वर परिणाम होऊ शकतो, आता जर मागच्या खिशात ठेवला तर  मुळव्याध होते असा इ मेल फॉर्वर्ड आला तरीही मला काही  आश्चर्य वाटणार नाही . अरे मग सेल फोन वापरणं तर टाळू शकत नाही ना, मग ठेवायचा कुठे??

बरं मोबाइलचे प्रॉब्लेम्स इतक्यावरच संपत नाहीत, तर कोणीतरी बंगलोर मधे सेल फोन चार्जिंगला लावलेला असतांना एक कॉल आला आणि तो एका माणसाने चार्जिंग बंद न करता घेतला, तर तेवढ्यात त्या सेल फोन चा स्फोट झाला आणि त्या माणसाच्या डोक्याची शकलं ऊडाली, आणि म्हणून कॉशन करायला   हाच   इ मेल माझ्या  निरनिराळ्या २२ मित्रांनी मला  पाठवला होता. कधी कधी तर चक्क वैताग येतो हो या सेल फोन च्या संदर्भातल्या इ मेल्सचा.

तुमच्या कारची किल्ली आत कार मधे राहिली तर घरची स्पेअर किल्ली वापरून कार कशी उघडायची याचा पण एक मेल बरेच दिवस फॉर्वड मधे टॉप लिस्ट वर होता. मला वाटत नाही कोणी ती आयडीय़ा ट्राय करून पाहिली असेल, पण मी पाहिली – आणि सांगायची गोष्ट ही की कारचं लॉक उघडलं नाही सेल फोन वरून घरचा रीमोट वापरून!

काही दिवसापूर्वी आपल्या इंडीय़ा टीव्ही वर पण एक बातमी आली होती, त्या मधे सांगितलं होतं की तुमच्या सेल फोन वर एक कॉल येइल त्या नंबरची अक्षरं लाल रंगाची असतील, तुम्ही तो कॉल रिसिव्ह केला तर तुमचा सेल फोन जळून जाईल.टिव्ही बरे्च मोबाइल्स पण दाखवले होते जळालेले. इंडीया टीव्ही वरच्या बातम्या अर्थात रम्य आणि सुरस कथा या पलीकडे घ्यायच्या नसतात, पण तरीही ह्याच बातमीवर आधारित इ मेल मात्र दुसऱ्याच दिवशी फॉर्वर्ड मधे आला होता.

टीव्ही मुळॆ निर्माण होणारे मॅग्नेटीक फिल्ड मुळे पण तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो ही गोष्ट तर इतक्या वेळा इ मेल मधे आलेली आहे की मला त्यातले कंटेंट पाठ झालेले आहेत. म्हणे तुम्ही आय पॉड चे स्पिकर्स कानात लावून गाणी ऐकल्याने तुम्हाला बहिरेपणा येऊ शकतो तेंव्हा आयपॉड लावून गाणी ऐकू नका ही  सावध करणारी नोट पण एका मित्राने पाठवली होती. तसेच मोबाइल वर पण गाणी ऐकू नका असाही सल्ला होता त्या मेल  मधे, कारण त्यामुळॆ पण बहिरेपणा येऊ शकतो असं म्हंटलं होतं..

एकदा म्हणे एक माणूस समुद्रावर फिरायला गेला होता, तेवढ्यात आकाशातून विज कोसळली आणि त्या माणसाच्या खिशातल्या सेल फोन कडे आकर्षित झाली. दहाच सेकंदात त्या माणसाचा जळून कोळसा झाला. ही बातमी वाचल्यावर एका मित्राने सेल फोन बॅगेत ठेवणॆ सुरु केले होते. फक्त ब्ल्यु टुथ झुरळ ( हेडसेट जो कानात घातला की एखाद्या झुरळासारखा दिसतो तो) कानाला लावून ठेवणं सुरू केलं. पूर्वीच्या काळी जेंव्हा सेल फोन नव्हते तेंव्हा पण एखाद्या झाडाखाली माणूस उभा राहिला तर त्याच्यावर विज कोसळून तो मेला ही बातमी  पण ऐकायला मिळायचीच की नाही?? म्हणून काय लोकांनी पाऊस आल्यावर झाडाखाली आसरा घेणे बंद केले का?? नाही ना? मग सेल फोन वरच बंदी का आणायची हा प्रश्न आहेच.

वॉटर थेरेपी पण बरेचदा इ मेल मधे येत असते, त्यात म्हणतात की सकाळी ऊठल्या बरोबर चार ते सहा ग्लास पाणी प्या आणि नंतरच सगळे कार्यक्रम उरका. मी हे सुरु करणारच होतो, तर दुसऱ्याच दिवशी एक दुसरा इ मेल येऊन थडकला त्यात  म्हंटलं होतं की  जास्त पाणी पिऊ नका, जर प्याल तर एक्सेसिव्ह हायड्रेशनचे बळी व्हाल. झालात की नाही तुम्ही कन्फ्युज? दोन मेल पैकी एक मेल बायकोच्या भावाने पाठवलेला, तर दूसरा मेल तुमच्या भावाने….. 🙂 कोणावर विश्वास ठेवायचा?? नंतर एका डॉक्टर मित्राला विचारलं, तर म्हणाला की भंकस आहे सगळी! दुर्लक्ष कर या अशा इमेल कडे!

मायक्रोवेव्ह मधे शिजवलेले अन्न खाऊ नका. त्याने कॅन्सर होऊ शकतो हा मेल पण बऱ्यापैकी फेमस झाला होता ( फेमस म्हणजे मला दहा पेक्षा जास्त लोकांनी पाठवला होता ) त्याच सोबत एक मेल ज्या मधे एका माणसाने  मायक्रोवेव्ह मधे तापवलेली कॉफी बाहेर काढली आणि त्यात साखर टाकून ढवळणार ,तेवढ्यात ते पाणी अंगावर उडालं आणि संपूर्णपणे भाजून निघाला तो माणूस.. ( तो माणूस कोण होता?? हे कोणीच लिहित नाही, बहूतेक वेळा तो कॅलीफोर्निया किंवा तत्सम देशातलाच असतो. पाणी सुपरहीट होऊन अंगावर उडू शकते हा शोध मात्र नवीनच लागलाय, आणि सगळ्य़ाच लोकांनी  यावर विश्वास पण ठेवलाय.आम्ही आजकाल मायक्रोवेव्ह मधे काही गरम केलं की बाहेर काढण्यापूर्वी थोडा वेळ थांबतो- बरं का. अशा एखाद्या कुठल्याही शेंडा ना बुडखा गोष्टींचा आपल्यावर किती परिणाम होतो नाही का??..

तुम्ही एकटेच कार मधे आहात, आणि रस्त्याने जात आहात, तेंव्हा जर तुम्हाला एकदम हार्ट अटॅक आला तर तुम्ही काय कराल? हा मेल पण खूपदा येऊन धडकतो. मला तर आजकाल या माहिती तंत्रज्ञानाची भीतीच वाटू लागली आहे.  हे सगळे इ मेल्स तुमच्या मित्रांकडून किंवा शुभचितकां कडून   येतात, त्यामुळे उघडून वाचले  जातातच.जरी एखाद्या चांगल्या उद्देशाने पाठवले गेले तरी पण असे मेल केवळ बॅंड्विडथ वेस्ट करण्याचे , आणि गैरसमज पसरवण्याचे काम करतात दूसरे काही नाही..

या पोस्टचा उद्देश हाच, की हे असे येणारे इ मेल्स फॉर्वर्ड करणॆ बंद करण्याचा आपण प्रण करू या या दसऱ्याच्या दिवशी. कारण कुठलाही वैज्ञानिक  आधार नसलेले असे मेल उगाच कोणीतरी टाइम पास म्हणून  तयार करतो आणि  फॉर्वर्ड करून गम्मत पहात असतो. म्हणून असे मेल्स  करण्यापूर्वी कृपया विचार करा आणि कुठल्याही गोष्टी बद्दल गैरसमज पसरवण्यास, घाबरवण्यास हातभार लावू नका  ह्याच नोट बरोबर दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन  हे पोस्ट संपवतो.