इंडीयन्स ऍंड डॉग्ज नॉट अलाउड..??

Written by  on September 28, 2011

पूर्वी जेंव्हा भारतामधे इंग्रज राज्य करित होते तेंव्हा अशा पाट्य़ा सर्रास पहायला मिळायच्या. आणि भारतियांना पण त्याचं काहीच वाटत नसायचं… अर्थात काही भारतीय वगळता………! कालापासून जो गदारोळ सुरु आहे रश लिंबॉग च्या नावाने. त्याने केलेल्या कॉमेंट्स वरुन भारतीयांमध्ये खूपच उथलपुथल माजली आहे.हे पोस्ट म्हणजे एक स्वैर भाषांतर आहे रेडिफ च्या साईटवर आलेल्या पोस्ट  मधल्या काही पोस्टचे .

१० एप्रिल २००९… तो दिवस , रेडीओ वर प्रोग्राम सुरु होता.विषय होता.. अमेरिकन जॉब्ज चे आउटसोअर्सिंग! बरेच जॉब्ज जे आहेत ( कॉल सेंटर , सॉफ्ट वेअर , इत्यादी)  भारतामधे आउट सोअर्स करण्यात आले आहेत. कारण .. बरेचदा डिस्कस झालंय.. हा लिंबॉग आता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा उगाळुन अमेरिकन लोकांच्या भावनांना हात घालतोय.

हा माणुस स्वतःला रिपब्लिकन पार्टीचा स्पोक्सपर्सन समजतो.ह्याची आफ्रिकन अमेरिकन्स ( निगर म्हणायचं नाही त्यांना) बद्दलची मतं, होमोसेक्सुअल्स , आणि विकलांग लोकांच्यावर केलेले रिमार्कस  पण प्रसीध्द आहेत.नेहेमीच काहीतरी वादग्रस्त विधाने करण्याची याची सवय आहे.

तर १० एप्रिल ला काय झालं? ह्या माणसाने रेडीओ वर कॉमेंट पास केली की.. जॉब्ज आउटसोअर्स करण्यात आले आहेत एकॉनॉमिक रिझन साठी.. आणि ते आता परत येणार नाहित अमेरिकेत.तो एका कॉलरशी बोलतांना म्हणतो, तुम्ही जर बसून रहाणार असाल की जॉब्ज जे आता स्लमडॉग्ज भारतामधे करताहेत ते येतील आता परत आपल्याकडे असे वाटत असेल की ते जॉब्ज कॅन्सल होऊन येतील , स्लम डॉग्ज ला नोकरीवरुन काढून तुम्हाला कामावर ठेवतिल — इट इज नॉट गोइंग टू हॅपन. एकॉनॉमी अशा प्रकारे चालत नसते..त्याच्या ह्या स्टेटमेंट मधे स्लमडॉग हा शब्द वगळला तर चुकिचे काहिच नाही.

यावर पुढे काही लिहिण्यापूर्वी … एका सोशल साईटवर काही लोकं आयटी वाले म्हणताहेत की ही कॉमेंट दुर्लक्षित करावी. बरोबर आहे.. स्वाभिमान विकून खाल्ल्यावर दुसरं काय करता येणार आहे? काही लोकं म्हणताहेत की ही कॉमेंट आय टी च्या लोकांवर नाही…म्हणून आनंदी होताहेत… पण …?? ही कॉमेंट भारतावर आहे हे विसरुन जातात.भारतावर कॉमेंट आहे नां?? मग ठिक आहे.. आमच्यावर म्हणजे आय़ टी मधे काम करणाऱ्यांवर  नाही नां? मग झालं तर! काहींचं असंही म्हणणं आहे की आपल्याला माहिती आहे नां की आपण स्लम डॉग नाही म्हणुन , मग कशाला लक्ष द्यायचं लिंबॉग कडे?

हीच मंडळी अमेरिकेत राहुन कांही दिवसापुर्वी राज ठाकरेंना ह्याच सोशल साइटवर सपोर्ट करित होती. अरे.. भारतामधे केवळ दुसऱ्या स्टेटचा आहे म्हणुन त्याचे शिरकाण करण्याची भाषा बोलणारे लोकं आ्णि तिथे लिंबॉग सारखे लोकं ह्यात काहीच फरक नाही.. सगळे शेवटी एकाच माळेचे मणी.

ऑन साईट कामं संपलीत आणि परत या म्हणून सांगितलं तर काही मंडळी तिथेच राहण्यासाठी अगदी काहीही करण्यास तयार आहेत.अगदी गॅस स्टेशनवर गॅस भरण्यासाठी , किंवा वेटर म्हणून काम करायची ही त्यांची तयारी असते.. ह्या प्रवृत्तीवर पण बऱ्याच पोस्ट आहेत…

कोणी एक म्हणतोय की कालचे स्लमडॉग्ज उद्या मिलियोनिअर होतिल आणि आजचे मिलिओनिअर अमेरिकन हे ह्या रेसेशनच्या शेवटी स्लम डॉग्ज होतिल.

एक म्हणते की अमेरिकेत आज कामवाली बाई पण १००० डॉलर घेते. तेंव्हा तिने ४ घरी कामं केलीत तरी तिला आय्टी इंजिनिअर इतका पगार मिळु शकतो. जे काम भारतीय केवळ ३ ते ४ हजारात करतात तेच काम करायला अमेरिकन्स १२ ते १४ हजार घेतात. पर कॅपिटा इनकम यु एस मधलं १५०० डॉलर पर मन्थ आहे. पेप्सी भारतामधे १० रुपये आहे तीच यु एस मधे २ डॉलर आहे.

काही लोकं असंही लिहितात की अमेरिकेत भारतीय लोकं स्लमडॉग्ज प्रमाणेच रहातात. एकाच रुम मधे ४ लोकं रहातात आणि कर्ड राइस खाउन जगतात.. आणि ही कॉमेंट करणारा एक भारतीयच बरं कां! एक माणुस भारतीय असंही म्हणतो, की आम्हाला काहीही म्हंटलं तरीही काही हरकत नाही. आम्ही इथेच रहाणार.

एका माणसाचं असंही मत आहे की मला स्लम डॉग म्हंटल्यावर काही फरक पडात नाही. इट्स जस्ट फ्रेंडली ऍड्रेस.हा भिकारचोट असंही  म्हणतो की ह्याच्या फेलो अमेरिकन कामगार मित्राने खांद्यावर थोपटून ह्याला कॉंग्रॅच्युलेट पण केलं इतकी सुंदर फिल्म बनवल्याबद्दल.अर्था हा एक मल्लू दिसतो.. नावावरून तरी. सुंदरराज नांव याचं.

पण एका गोष्टीचं बरं वाटलं की भारताला डिफेंड करणारे पण बरेच लोकं आहेत रेडिफ वर…

रेडिफ मधे जवळपास ७०० च्या वर कॉमेंट्स आहेत या पोस्टवर. मी जवळपास  २०० वाचल्या.. आणि मग आता मात्र कंटाळा आलाय.. सो इथेच थांबतो..

जर आउटसोअर्सिंग थांबवलं तर अमेरिकन एकॉनॉमीचं काय होइल ते इथे डिस्कस केलंय..हे एक जुनं पोस्ट आहे रेसेशन चा अमेरिकेवर इम्पॅक्ट  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/03/04/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%89%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87/)जरुर वाचा..
फक्त एकाच गोष्टीची काळजी वाटते की आता पुन्हा भारतियांचे विरुध्द हेट क्राइम सुरु होऊ नयेत हीच इच्छा.

“श्वास” हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.

Written by  on September 20, 2011

श्वास हा एक अतिशय वाईट्ट सिनेमा आहे.
आज पर्यंत जितक्या वेळेस पाहिला असेल तितक्या वेळेस डोळ्यातून पाणी काढलंय त्या सिनेमाने.  इतकं असूनही तो सिनेमा पुन्हा पुन्हा पहाण्याची इच्छा का बरं होते? बरेचदा तर मुद्दाम खूप उदास व्हायचं  म्हणूनही हा सिनेमा लावला जातो. जसे बरेचदा रात्री उशिरा ’ तलत ’ ऐकावासा वाटतो, तसेच  ह्या सिनेमाचे होते माझ्या बाबतीत.

ती सिडी लावली की एक  प्रकारे  स्वतःची मानसिक तयारी केलेली असते, की सिनेमा पहातांना कसंही करून डोळ्यात पाण्याचा टीपूसही येऊ द्यायचा नाही. पण थोड्याच वेळात त्या सिनेमामधे इतका गुंतून जातो की आपण कधी आवंढे गिळणे  आणि डोळ्यात येणार पाणी थोपवणं सुरु करतो ते माझं मलाच   लक्षात येत नाही. डोळे भरून यायला लागले की मग  मुद्दाम  श्वास रोखून धरणं सुरु होतं, डोळ्याच्या कडेवर पोहोचलेले पाणी अगदी निग्रहाने परतवायची कसरत सुरु होते. पापणी लवली, तर कदाचित ते  खालच्या पापणी मधे अडकून राहिलेले ( की ठेवलेले) ते दोन चार थेंब बाहेर येतील, म्हणून पापणी पण लवू द्यायची नाही.

शेजारी बसलेली बायको डोळे पुसत असते,   तेंव्हा हळूच  उठून जायचं – किंवा  मग आजूबाजूला कोणाचे लक्ष नाही असे पाहून थोडं टेन्शन रिलीज करण्यासाठी किचन मधे दौरा करून थोडं पाणी पिऊन, चेहेऱ्यावर पाणी मारून आणि काही तरी खायला डिश मधे काढून बाहेरच्या खोलीत यायचं, आणि जणू काही झालंच नाही अशा तर्हेने सिनेमा पहाणं सुरु ठेवायचं.

आपल्या समाजात, पुरुषांनी बहूतेक भावनाशुन्य राहिलं पाहिजे अशी अपेक्षा असते. मग स्वतःच आप्तेष्ट जरी वारले, तरी तो हुंदक्यांचा कढ मनातल्या मनात ठेवून आवंढे गिळत उभं रहायचं- बस्स!! पुरुषांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले की तो कमकुवत मनाचा  असे   समजले जाते.

पुरुषांना मन नसते – की भावना नसतात? दोन्ही असतं , तरी पण परीक्षेच्या प्रसंगी  डोळ्यातून पाण्याचा थेंब ही बाहेर पडू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते.  ती एक जाहिरात आहे नां.. ” माय डॅडी स्ट्रॉंगेस्ट” अशी.. तसंच काहीसं.. मग तशीच प्रतिमा (नसलेली ) मेंटेन करायची जबाबदारी त्या गरीब बिचाऱ्या ( स्ट्रॉंगेस्ट) डॅडी वर पडते. आणि तो आपला निकराने डोळ्याच्या कडांपर्यंत पोहोचणारे अश्रू परत पाठवण्यासाठी स्वतःच्याच मनाशी जीवघेणी लढाई लढत असतो.ज्या प्रसंगाला स्त्रियांना मोकळेपणाने रडण्याची मुभा दिलेली आहे आपल्या समाजाने, त्याच प्रसंगात पुरुषाने मात्र खंबीर रहावे अशी अपेक्षा असते.

डोळ्यात  पाणी येणं म्हणजे मनाच्या कमकुवतपणाचे लक्षण आहे का? छे! मला तरी तसे वाटत नाही. तो एक सुसंस्कृत मनाचा, भावनांची  अभिव्यक्ती  करण्याचा एक मार्ग आहे. आपण  सेन्सेटिव्ह असतो, म्हणून   डॊळ्यात अश्रू येतात, नाही तर आपल्या मधे आणि दगडामधे काय फरक राहिला असता??

इथे डोळ्यातून पाणी काढणं हा अगदी कृड शब्द वापरलाय, त्याला अश्रू शिवाय दुसरा शब्दच नाही. कुठलाही प्रसंग असो धीरोदात्त पणे त्याला तोंड दिले पाहिजे, असे म्हणतात , अर्थात त्या साठी कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण एकदा मनातला कढ  अश्रूंच्या रुपाने बाहेर पडल्यावर जो मनाला मोकळेपणा येतो त्याला कशाची उपमा कुठल्याच गोष्टीला देता येत  नाही. काही गोष्टी शब्दातीत असतात, त्यातलीच ही एक. कदाचित म्हणूनच बरेचदा असं वाटतं की मनसोक्त रडावं.. आणि मन हलकं करावं. ही प्रत्येक सेन्सिटिव्ह माणसाची रिक्वायरमेंट असतेच. कोणी पूर्ण करतो , तर कॊणी………असो..

जितक्यांदा  श्वास पहातो तितक्या वेळेस सिडी लावण्यापूर्वी मनाला बजावून ठेवतो, की बास झालं, आज पर्यंत बरेचदा पाहिलाय  हा सिनेमा, जास्त भावना प्रधान व्हायचं नाही, प्रत्येक फ्रेम च्या पुढे काय होणार आहे हे माहिती आहे, उगाच जास्त टेन्शन येऊ द्यायचं नाही, पण तसं होत नाही.

कदा सिनेमा सुरु झाला की नलावडेंचा अभिनय आणी त्या मुलाचा अभिनय  पाहिला की  डोळ्याच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाही. म्हणूनच मी म्हणतो  ” श्वास एक अतिशय वाईट़्ट सिनेमा आहे”

मनातलं…

Written by  on September 15, 2011

थोड्याच दिवसा पूर्वीची गोष्ट आहे. वय जवळपास ९० च्या आसपास असावे, स्वतः डॉक्टर – म्हणजे रिटायरमेंट पुर्वी सिव्हिल सर्जन असलेले, आपल्या ५२-५३ वर्षाच्या मुलाला म्हणत होते की  डायबिटीस मूळे माझी  किडनी खराब झालेली आहे असे वाटते, तू मला तुझी किडनी देशील का? ही गोष्ट जेंव्हा मला त्याने सांगितली, तेंव्हा मी विचारातच पडलो. पुरेपूर आयुष्य  जगणं झाल्यावर पण आयुष्याचा मोह काही सुटत नाही मानवाचा. अर्थात ९० व्या वर्षी डायबिटीस असलेल्या माणसाला किडनी  ट्रान्सप्लांट केली  किती सक्सेसफुल होई किंवा होईल की नाही याची खात्री नाही, ही गोष्ट  आयुष्यभर लोकांवर उपचार केलेल्या त्यांना समजत नसेल असे नाही. पण  आयुष्याचा मोह काही सुटत नव्हता.

आयुष्याचा मोह हा कुणालाच टळलेला नाही. प्रत्येकालाच अनंत वर्ष जगायची इच्छा असते. मी जेंव्हा लहान होतो, तेंव्हाची गोष्टं. घरासमोरून बरेचदा प्रेतयात्रा जायची.  प्रेतयात्रा आणि ते मागे राम नाम सत्य है.. म्हणत जाणारे लोकं पाहिले की मग मात्र भीती वाटायची. समजायचं नाही काय आहे ते, पण मागे रडत जाणारे लोकं , समोर हातामधे मडकं घेऊन चालणारा तो माणूस   पाहिला की विचित्र फिलिंग यायचं.

माझं वय तेंव्हा असेल ५-६ वर्ष. ती प्रेतयात्रा  घरासमोरून जायला लागली की मी आईच्या कुशीत शिरायचं, आणि मग प्रश्न विचारून भंडावून सोडायचं.मग वारले म्हणजे काय? देवाघरी गेले ते ठीक आहे, पण ते देवाघरी का बरं गेले? देवाने त्यांना का बरं बोलावून नेले? बरं तू पण अशीच देवाघरी जाणार का? मला पण देवाघरी जावंच लागेल का? — नाही नां.. मला नाही जायचं देवाकडे…तू पण जाऊ नकोस नां…. देवाघरी गेल्यावर काय होतं? असे असंख्य प्रश्न असायचे.

इतक्या लहानपणीच्या गोष्टी लक्षात रहात नाही असे म्हणतात, पण ही गोष्ट मात्र अगदी पक्की लक्षात आहे माझ्या. थोडं मोठं झाल्यावर जेंव्हा मृत्यु म्हणजे काय हे समजलं, तेंव्हा तर अजूनच भीती वाटायला लागली. माझी स्वतःची आजी जेंव्हा वारली, तेंव्हा खरी जाणीव झाली होती मृत्युच्या  दाहकतेची- या अशाश्वत जीवनाची. स्मशानात जेंव्हा लाकडांची चिता रचलेली पाहिली, आणि त्या चितेवर आजीला झोपवले ले पाहिले, नंतर मग  नीट जळावं ते शरीर म्हणून त्यावर रॉकेल  शिंपडतांना , आणि मोठ्या बांबूने   चिता सारखी करतांना पाहिलं….तेंव्हा जे काही वाटत होतं, त्या भावना शब्दात व्यक्त करूच शकत नाही. माणसाचं या जगात सगळ्यात   जास्त प्रेम असतं ते  आपल्या शरीरावर, आणि त्या पार्श्वभूमीवर शरीराचे दहन पहाणं  , आणि ते पण तुमच्या प्रीय व्यक्तीचे म्हणजे  पनिशमेंट!..

मी स्वतः आयुष्यात  बरेचदा   मरता मरता वाचलो आहे. एकदा  लहान असतांना ( वय वर्ष ६-७ ) रस्त्यावरच्या ट्रकच्या चार चाकांच्या मधून अंगावरून ट्रक गेल्यावर पण वाचलो. निपचित पडून होतो, अंगावरून  ट्रक निघून गेला आणि मला खरचटलं पण नव्हतं.  दुसरी वेळ म्हणजे वर्धा नदीतून ( पाणी फार नसेल, फार तर ४ फुट असेल आणि माझी उंची पण तेवढीच) मामाचा हात धरून क्रॉस करत असतांना त्याच्या हाताला हिसका देऊन हात सोडवला आणि मग गटांगळ्या खात राहिलो . मामाने पुन्हा जबरदस्तीने हात धरून बाहेर काढले होते ( त्या नदीतून  पलीकडे गेल्यावर एक देवीचे मंदीर होते तिकडे जायचं होतं आम्हाला.तिसरी वेळ  म्हणजे यवतमाळला महादेव मंदीराच्या समोर एक २०-२५ फुटाचा नाला आहे. तो फक्त पावसाळ्यात दुथडी नदी सारखा वहायचा. त्या नाल्यात खेळतांना पडलो होतो आणि जवळपास १०० एक फुट वहात गेलो होतो. पुढे एका वडाच्या झाडाच्या मुळाला धरून बाहेर निघालो . हे सगळं पाहिल्यावर तर माझं आयुष्य हे बोनस आहे असे पण वाटते बरेचदा.

माझे वडील नेहेमी म्हणतात की तुझ्या पत्रिकेत शनी मंगळ प्रतियोग आहे, फक्त मंगळ लग्नेश आणि पराक्रमात आहे म्हणून चांगला, ( या पराक्रमातल्या मंगळाच्या पराक्रमाने मी अनेकदा अडचणीत पण सापडलेलो आहे- नको तितका स्पष्टवक्तेपणा  जो लोकांना उर्मट पणा  वाटतो मला नेहेमीच अडचणीत आणतो) आणि शनीच्या सम सप्तमात असल्याने असे होत असते. पण स्वगृहीचा भाग्येश गुरु आहे म्हणून तू अशा जिवघेण्या प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडतोस. पत्रिकेचं निघालं म्हणून सांगतो, मंगळ हा पराक्रमात  मिथुनेला , आणि अष्टमेश  . अष्टमेश अष्ट्माच्या अष्टमस्थानात असणे हा म्हणजे पण एक योग आहे, त्याबद्दल विसरलो आता पुन्हा विचारावे लागेल. असो…विषयांतर होतंय..

या अशा धकाधकीच्या जीवनात वयाची पन्नास वर्ष पुर्ण करणं म्हणजे काही फार नाही. आजकाल तर जीवन मर्यादा ही पण बरीच वाढलेली आहे. जो पर्यंत पेनिसिलीन हा वंडर ड्रग निघाला नव्हता , तो पर्यंत तर पन्नाशी पर्यंत बरेच लोकं पोहोचत पण नव्हते. या वयाला पोहोचण्या पुर्वीच कुठल्यातरी इन्फेक्शनने त्यांना परलोकाची वाट धरावी लागायची- पण आज तसे नाही. मेडिकल सपोर्टच्या बाबतीत आपण खरंच खूप नशिबवान आहोत .

या जीवन मृत्युच्या चक्रामधून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करायचे पुर्वीचे लोकं.  मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना  करायची पद्धत गेलेली आहे. जे काही आहे ते याच जन्मात मिळू दे अशी प्रार्थना केली जाते. ऐहिक गोष्टींच्या फार जास्त मागे लागतो आपण असेही वाटते. साधी गोष्ट – माझ्या कडे आधी याशिका फिक्स्ड फोकस कॅमेरा होता, तेंव्हा मला एस एल आर हवा होता.  नंतर पैसे साठवून   एसएलआर घेतला. नंतर नवीन डीजिटल  कॅमेरा निघाल्यावर तो हवा हवासा वाटायला लागला, म्हणुन एक डिजिटल    कॅमेरा घेतला- आणि अजूनही पुन्हा डीजिटल एस एल आर घेण्याची इच्छा होतेच आहे. आपल्याकडे असलेल्या गोष्टींमधे आनंद घेता येणं कधी शिकणार आहे मी??- असं बरेचदा वाटतं. जे आहे त्याचा उपभोग घेण्या ऐवजी जे नाही, त्याचाच जास्त विचार का करतो मी?

– काय वाटतंय आज ते पण नीटसं शब्दबद्ध करू शकलेलो नाही.अजून बरेच विचार मनात आहेत पण नंतर कधी तरी पोस्ट करीन. वाटतंय की हे पोस्ट थोडं विस्कळीत झालंय तरी पण पोस्ट करतोय-

दिग्ली पोर्ट

Written by  on September 6, 2011

पोर्ट ब्लेअर ! नाव ऐकलं की काय आठवतं?? काळं पाणी?? स्वा. वीर सावरकरांची जन्मठेप??

या शिवाय पण बरंच काही आहे पोर्ट ब्लेअरला.पण जे कोणी जातात ते फक्त या काही ठराविक गोष्टी पाहून परत येतात. स्नेक आयलंड वगैरे किंवा कोरल आयलंड.. पण  ह्या पोस्ट मधे दिग्लीपुर पोर्ट जे फारच कमी लोकांनी पाहिलेलं आहे त्याबद्दल थोडं लिहितोय.. खरं तर लिहावं की नाही हा विचार करित होतो बरेच दिवस- , पण शेवटी बऱ्याच गोष्टी  फिल्टर करुन लिहायचं ठरवलंय.

पोर्ट ब्लेअर पासून साधारण ३०० किमी अंतरावर हे दिग्ली पोर्ट आहे. हिच ती जागा  आहे जिथे आम्हाला काम असतं. पोर्ट ब्लेअर हुन  दिग्लीपोर्ट ला जायला जहाजाने किंवा बसने पण प्रवास करावा लागतो.. जर जहाजाने गेलात तर केवळ ८ तास लागतात, आणि बस ने गेलात तर १२ तास.. जहाजाने जरी लवकर पोहोचलो, तरी पण एक मस्त पैकी अनुभव तुम्ही मिस करता, म्हणून बसने प्रवास करणे कधीही चांगलं, परतीचा प्रवास जहाजाने केलात तरी हरकत नाही..

 

 

आदिवासी लोकांना बस मधुन खायला देतांना.

 

आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून ६०च्या वर वर्षं झाले आहेत. पण आजही पोर्ट ब्लेअर पासुन केवळ ४० किमी वर एक असा एरिया आहे की जिथे रहाणारे आदिवासी आजही अंगावर एकही कपडा न घालता रहातात. खोटं वाटेल कदाचित , पण दुर्दैवाने हीच खरी परिस्थिती आहे. अंदाजे ४० किमी अंतरावर   जरावा रिझर्व फॉरेस्ट ची हद्द सुरु होते. इथुन जर तुम्हाला क्रॉस करायचे असेल तर खाजगी वाहनाने प्रवास करण्याची परवानगी नाही… सकाळी ४ वाजता पोर्ट ब्लेअरहुन बस निघते ती संध्याकाळी ४ वाजता दिग्लीपोर्ट ला पोहोचते.

इथून, म्हणजे या पोलीस चेक पोस्ट वर सगळी वाहनं येउन थांबतात.  सकाली ६-३०  वाजता चेक पोस्टवर  जमा झालेली सगळी वाहनं ही   एक्सॉर्ट्स वाहनांच्या मधे ड्राइव्ह करत  हे रिझर्व फॉरेस्ट पार करतात.जंगलातून जातांना ते आदिवासी पण तुम्हाला दिसू शकतात.सरकारी वाहनाने पण प्रवास केला जाऊ शकतो.

हे आदिवासी लोकं आजही धनुष्य बाण घेउन शिकार करतात. अंगावर एकही कपडा नसतो यांच्या.या काळातही केवळ धनुष्य बाण वापरुन शिकार करुन पोट भरतात हे लोकं.  माझ्या कडे काही व्हिडीऒ पण आहेत, पण ते इथे पोस्ट करणे योग्य होणार नाही, आणि यु ट्युब वर टाकले तर कोणीतरी अती उत्साही त्यांना फ्लॅग करेल म्हणुन पोस्ट करित नाही. या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ काढणे लिगली अलाउड नाही. तशा सूचना स्पष्ट स्वरुपात दिलेल्या आहेत. इथे रहाणाऱ्या आदिवासी लोकांना  जवरा ट्राइब  म्हणतात. इथे बऱ्याच सूचना जागोजागी लावलेल्या आहेत. जसे.. या आदिवासी लोकांना काहीच देउ नका, त्यांना खुणा करुन त्रास देउ नका, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु नका वगैरे वगैरे… जर तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते तुम्हाला धन्युष्य बाणाने मारु पण शकतात.

पोर्ट ब्लेअर हुन निघाल्यावर  या चेक पोस्ट ला येउन थांबावं लागतं. वर सांगितल्या प्रमाणे ६-३०ला इथुन तुम्ही निघालात की मग बाराटांग ला पोहोचता. इथुन पुढे समुद्र आहे. त्या समुद्रातुन क्रॉस करण्यासाठी राज्य परिवहन ची बस लहानशा ट्रॉलर मधे लोड करुन क्रॉस केली जाते. नंतर पुढे असलेले  इथुन पुढे मग  बाराटांग रंगत वगैरे गावं आहेत. अजुन पुढे गेल्यावर मग ह्या आयलंडच्या शेवटी पोहोचल्यावर  कदमतला आयलंड पर्यंत पुन्हा बसला बोटीवर चढवलं जातं आणि बस दिग्लीपुरच्या रस्त्याला लागते. जर उन्हाळा असेल तर सुंदर निसर्ग, आणि दमट हवामान, अंगातुन घामाच्या धारा.. हे सगळं  अगदी गृहित धरुन चला- पण अगदी व्हर्जिन निसर्ग आहे इथे. तसं पोर्ट ब्लेअरला कुठेही गेलात तरीही सुंदर निळं पाणी असलेला समुद्र, तर तुमच्या सोबत असतोच..

्ट्रॉलर मधुन बस एका अयलंड वरुन दुसऱया आयलंड वर नेली जाते.

शेवटी एकदाचं दिग्ली पुरला पोहोचलात की हा अविस्मरणिय प्रवास संपतो. पण इथे पोहोचे पर्यंत तुम्हाला जो निसर्गाचा आनंद घेता येतो तो अवर्णनिय आहे. इथे पोहोचल्यावर मग पुढे काहीच नाही करमणूकी करता. फक्त ताजे मासे, जाड तांदुळाचा भात आणि सुंदर निसर्ग. इथे  आम्हा लोकांना जायचं काम पडतं ते काही कामासाठीच, नाहीतर इतका द्रविडी प्राणायाम प्रवास करुन जाणं शक्यच नाही. पण कामासाठी जावं लागलं की मग असा थोडा निसर्ग सौंदर्याचा आनंद पण घेता येतो. इथे दोन दिवस अगदी मस्त जातात, पण नंतर मात्र कधी जातो परत असं होतं.

 

सेल्युलर जेल स्वा. वीर सावरकरांना ठेवले ती कोठडी.

 

पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेल बद्दल तर बरंच काही लिहुन झालंय ( म्हणजे इतर लोकांनी बरंच काही लिहिलंय)त्यामुळे फार काही लिहित नाही . ज्या कोठडीत स्वा. वीर सावरकरांना ठेवलं होतं ती कोठडी पाहिली की नतमस्तक होतं.इथे जी फाशीची जागा आहे त्या जागेवर एखाद्याला फाशी दिल्यावर खालची पोकळ जागा सरळ समुद्राशी कनेक्टेड आहे. मृत देह हा सरळ समुद्रात पोहोचतो ..

ब्रिटीशांनी हे जेल फारच सुंदर कन्स्ट्रक्ट केलंय. कमित कमी माणसं ह्या इतक्या मोठ्या जेल वर नजर ठेउ शकतात. अगदी एकच माणुस पण पुरेसा आहे वॉच ठेवण्यासाठी.  पुर्वीच्या काळी या जेलच्या सात विंग्ज होत्या ( ऑक्टॊपस प्रमाणे पसरलेल्या) . प्रत्येक कोठ्डीच्या समोर दुसऱ्या विंगचा व्हेंटीलेटर यायचा. त्यामुळे एका कैदी दिसत नसे. आणि संपुर्ण एकांत वासात दिवस कंठावे लागायचे. सातही विंग्ज या मध्यभागी जुळलेल्या होत्या. तिथे एक वॉच टॉवर होतं. आणि त्या वॉच टॉवर वरून केवळ एक माणुस संपुर्ण जेल वर लक्षं ठेउ शकत असे. सध्या एक विंग ही म्युझियम मधे आणि एक विंग हॉस्पिटल मधे कन्व्हर्ट केलेली आहे.

 

 

११०१००० आभार..

Written by  on September 2, 2011

११०००००, 1100000, eleven lakhs, visitors, eleven lakh visitors, blog, marathi, mahendra kulkarniकाल ब्लॉग चा हिट्स चा आकडा अकरा लाखावर जाऊन पोहोचला. पोस्टची सुरुवात सगळ्या वाचकांचे आभार मानून करायची, की पोस्ट पूर्ण केल्यावर आभार मानायचे हेच ठरत नव्हते. शेवटी काय वाटेल ते पद्धतीने  जसे जसे मनात विचार येतील तसे तसे लिहायचे हे नक्की केले. वाचकांच्या हिट्स ची संख्या पाहिल्यावर निश्चितच आनंद झाला.

अगदी सुरुवातीलाच सांगतो, की कुठलाही ब्लॉग सुरु रहाण्यासाठी, किंवा त्या ब्लॉगरचा उत्साह टिकून रहाण्यासाठी वाचकांची  खूप गरज आहे. वाचकांच्या प्रतिक्रिया तर ब्लॉगर्स साठी एक प्रकारचे टॉनिक असते.  मला एक मित्र परवा विचारत होता, की मी ब्लॉग वर लिहीणे कधी बंद करणार? माझे उत्तर होते, की लोकांच्या प्रतिक्रिया  येणे बंद झाले की – माझा ब्लॉग बंद होणार !  🙂  इतकी वर्ष उत्साह टिकून रहायला या वाचकांच्या प्रतिक्रिया कारणीभूत आहेत.

चार वर्षापूर्वी १७ जानेवारी २००९ तारखेला पहिले पोस्ट लिहितांना  खरंच आपण इतके वर्ष लिहीणे सुरु ठेऊ असे कधीच वाटले नव्हते.  मी स्वतः आरंभशूर !   कुठल्याही गोष्टीचा फार लवकर कंटाळा येतो मला. मग ते ~फेसबुक असो ,किंवा इतर कुठलीही सोशल साईट असो. माझ्या सारख्या  लिखाणाशी कुठलाही संबंध नसलेल्या, मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या जीवनातल्या घटना, सामाजिक जीवनावरचे त्याचे भाष्य , कोणाला वाचायला आवडतील असे पण कधीच वाटले नव्हते. पण एकदा ब्लॉग वर लिहीणे सुरू केले, आणि लोकांच्या  प्रतिक्रिया  पण यायला लागल्या,  आणि मग  कॉन्फिडन्स वाढला, एक लक्षात आलं, की आपणही लिहू शकतो..म्हणजे अगदीच  काही अगदीच वाईट लिहत नाही  आपण! 🙂

जेंव्हा ब्लॉग सुरु केला, तेंव्हा दोन गोष्टी  ठरवल्या होत्या, त्या म्हणजे जे काही लिहायचे ते स्वतःशी प्रामाणिक राहून,  आपण जसे आहोत तसेच ब्लॉग वर लिहायचे, उगीच भोंदूपणा करायचा नाही. नसलेले गुण स्वतःला चिकटवून घ्यायचे नाहीत. मी जेंव्हा ब्लॉग लिहीणे सुरु केले होते, तेंव्हा प्रस्थापित असलेले मराठी  ब्लॉगर साहित्यिक स्वरुपात काही तरी उच्च दर्जाचे लिखाण करण्याचा वाटेने प्रयत्न करतांना दिसायचे, आणि त्या मुळे लिखाणात ही बरेचदा कृत्रिम पणा जाणवायची  वाचतांना!  ती पुस्तकातल्या सारखी छापील खिळे असलेली भाषा , वाचतांना मला खूप  अवघडल्यासारखे वाटायचे, तेंव्हा वाटले, की इतर  लोकांना पण असंच वाटत असेल का?  आणि मी स्वतः अगदी सहज सोप्या भाषेत लिहीण्याचे ठरवले. थोडी सोपी भाषा वापरली, तर? आणि काय वाटेल ते चा जन्म झाला. आपण  मनापासून लिहिले, की ते दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहचते – हा माझा अनुभव आहे- त्या साठी फार कठीण  भाषा हवी असे नाही, तर  मला असे वाटते की बरेचदा कठीण भाषा दुरावा पण निर्माण करते- वाचक आणि लेखकामध्ये. लेखक जर  वाचकांशी   कनेक्ट होऊ शकत नसेल तर त्या लिखाणाला काही फारसा अर्थ उरत नाही .

दुसरी गोष्ट  जी मला एक वर्षानंतर लक्षात आली,  ती म्हणजे  कधीही आपले पोस्ट प्रेडिक्टेबल किंवा टाइपकास्ट होऊ द्यायचे नाही. एक पोस्ट झाले, की दुसरे  पोस्ट त्याच प्रकारचे न लिहिता, एकदम वेगळ्याच विषयावरचे लिहायचे . एकाच विषयाला वाहिलेले ब्लॉग काही दिवसानंतर कंटाळवाणे होतात असा माझा अनुभव आहे. एक खूप छान विनोदी ब्लॉग  होता, पण केवळ तीच ती पात्रं, आणि एकाच पठडीतले विनोद घेऊन लिहित राहिल्याने हल्ली फार  कंटाळवाणा झालाय. अहो जेवणात नुसती भाजी पोळी  किंवा आमटी भात असून चालत नाही, सोबत चटणी, कोशिंबीर, लोणचं, आणि पापड वगैरे पण हवाच, आणि शेवटी स्विट डीश असेल तर  अजूनच उत्तम! ब्लॉगिंगचं पण तसेच आहे-वाचकांची उत्सुकता टिकवून ठेवण्यासाठी   विषयांचे व्हेरिएशन्स आवश्यक आहे.

ह्या ब्लॉगिंग ने बरेच कुठलाही स्वार्थ नसलेल्या नवीन मित्र मैत्रिणी दिल्या आहेत. भारतात आल्यावर आवर्जून फोन करणारे आणि प्रत्यक्षात भेटणारे बरेच परदेशी रहाणारे ब्लॉगर्स आहेत, इथे भारतातच असणारे काही मराठी ब्लॉगर्स तर नेहेमीच भेटत असतात . ब्लॉगर्स मिट च्या निमित्याने बऱ्याच  ( १२० लोकं आले होते पहिल्या ब्लॉगर्स मिटला) ब्लॉगर्सशी प्रत्यक्ष भेट पण झालेली आहे.  काही कटू प्रसंगही ओढवले या चार वर्षात  (कुठले ते लिहत नाही ), पण ते केवळ बोटावर मोजण्य़ा इतकेच!

मला आता  चार वर्षानंतर ब्लॉगिंग कडून काय हवंय़? काहीच नको.. मला फक्त माझं मन मोकळं करायचं आहे. मला या ब्लॉगिंग कडून काही फारशा अपेक्षा नाहीत, जाहिराती , उत्पन्न, वगैरे काही नकोय या मधून. मला फक्त मन मोकळं करण्यासाठी एक स्थान हवंय, आपलं हक्काचं!

आजपर्यंत ६४० पोस्ट्स लिहून झाल्या आहेत. अर्थात केवळ ६४० पोस्ट्स  मधे माझे आयुष्य समावले आहे असे नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण त्या काही वर्षानंतर लिहीन म्हणतोय. नोकरी संपल्यावर कार्पोरेट वर्ल्ड वर एखादे पुस्तक लिहायची इच्छा आहे. गेल्या ३० एक वर्षात कार्पोरेट वर्ल्ड चे बदलते रंग मी अनुभवले आहेत.स्वार्थ, बॅकस्टॅबिंग, मैत्री, करप्शन, आणि या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचे बदलते स्वभाव, बदलती समीकरणे , आणि त्यावर अवलंबून असलेली  कार्पोरेट कल्चरची पोकळ मैत्री – अशा असंख्य गोष्टींवर लिहायचे आहे. पण ते सगळे नोकरी संपल्यावर. मी जे काही अनुभवले आहे ते अगदी जसेच्या तसे जरी लिहिले तरी एक ६०० पानांची कादंबरी सहज होऊ शकेल. पण ते  काम सगळं   रिटायरमेंट नंतर.

सरते शेवटी पुन्हा एकदा सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार मानून हे पोस्ट संपवतो.