एम एफ हुसेन ची गुफा.

हुसेन ची गुफा
हुसेन च्या पेंटींग बद्दल मी आधी पण लिहिलेले आहेच-आणि आताही पुन्हा एकदा लिहीणार आहे, पण हे पोस्ट हुसेनचे पेंटींग चांगले की वाईट ह्या विषयी चे नसून हुसेनच्या भारतात असलेल्या एकुलत्या एक आर्ट गॅलरी बद्दल आहे .
हुसेन हा जगविख्यात पेंटर- ह्याच्या पेंटींग बद्दल, आणि ह्याने ज्या प्रकारची हिंदू धर्मियांना दुखावणारी चित्रं काढल्यामुळे त्याच्या बद्दल माझ्या मनात एक वेगळाच आकस आहे ,आणि हे मी उघडपणे मान्य पण करतो. कदाचित हेच एक कारण असेल की कित्येक वर्ष अहमदाबादला जाऊन आल्यावर पण कधी मला हुसेनची गॅलरी पहायची इच्छा झाली नव्हती .पण या वेळेस मात्र जेंव्हा सहकुटुंब अहमदाबादला गेलो होतो, तेंव्हा मात्र इथे जाऊन आलो. जाण्याचे कारण अर्थातच सौ. ! कारण सौ. सध्या दृष्य कला खंडाचे (चरित्र कोशाचे) संपादन करते आहे,त्यामुळे तिचा संबंध सध्या या चित्रकला जगातील दिग्गज लोकांशी सारखा येतो आहे. कदाचित सारखं संपादनाचं काम करून चित्रं समजू पण लागली असावी. निरनिराळ्या चित्रकारांचा आणि त्यांच्या शैलीचा अभ्यास केल्यामुळे पण तिचा या विषयातला इंटरेस्ट हल्ली थोडा जास्तच वाढल्यासारखा दिसतोय . मध्यंतरी “चिन्ह” च्या पुस्तकाचं पण एक परीक्षण केलं होतं तिने. असो.. कदाचित हेच कारण असेल की ज्यामुळे तिच्या अजेंडा वर ही गॅलरी पहाणे हे काम एकदम वरच्या क्रमांकावर होते.
अहमदाबादला ही हुसेनची गफा म्हणजेच गॅलरी कुठे आहे हे माहिती नव्हतं. त्यामुळे अगदी अगदी लोकेशन कुठे आहे? इथपासून सगळी सुरुवात होती. ह्या गॅलरी बद्दल माझी अपेक्षा म्हणजे एखादी सिमेंट कॉंक्रिटची बिल्डींग , जिथे हुसेनची पेंटींग फ्रेम करून लावली गेली असतील, अशी होती, पण प्रत्यक्षात खरंच तसं होतं का?
आता मकबुल फिदा हुसेन पंढरपूरचा, कर्म नगरी म्हणाल तर मुंबई! अख्खं आयुष्य मुंबई मधे काढले, मग असे असतांना पण त्याची ही गॅलरी अहमदाबाद मधे का सुरु केली असावी हा प्रश्न मला सारखा सतावत होता. थोडी चौकशी केल्यावर असं समजलं, की अहमदाबादला एक ( बाळकृष्ण )बी व्ही दोशी. नावाचे जगविख्यात आर्किटेक्ट आहेत. दोशी आणि हुसेनचे मित्रत्वाचे संबंध. हुसेन अहमदाबादला गेल्यावर आर्किटेक्ट बिव्ही दोशींच्या कडे नेहेमी जायचे .
असं म्हंटलं जातं की एकदा बी व्ही दोशी यांनी हुसेनला चॅलेंज दिलं, की मी इथे इतकी सुंदर ( अर्किटेक्चरल मार्व्हल )गॅलरी बनवेन ,की त्या ठिकाणी पेंट करण्यासाठी तुला म्हणजे हुसेनला आपल्या कलेची पण पातळी वाढवावी लागेल. आणि हुसेन ने हे चॅलेंज मान्य केले. शेवटी दोशींनी एक गॅलरी बनवली, आणि हुसेनला पेंट करण्यासाठी बोलावले. ह्याच गॅलरीला हुसेनची गुफा किंवा अहमादावादी गुफा म्हणून ओळखले जाते.
ह्या गॅलरी चा प्लान तसा एकदम जगावेगळा आहे. जगातली एकुलती एक अशी ही इमारत आहे. या बिल्डींगचे डिझाइन कॉंप्युटर एडेड सॉ्फ्टवेअर वापरून बनवलेले आहे.हेच कारण आहे, की पर्फेक्ट स्ट्रेस रिझोल्युशन मुळे इमारतीचे घुमट आणि इतर भाग स्वतःलाच “से्ल्फ सपोर्ट” करतात.
ही इमारत अर्धी जमिनीखाली, तर अर्धी जमिनीच्या वर आहे ,थोडं विचित्र वाटणारं डिझाइन अहमदाबादच्या गरम तापमान मधे उन्हाळ्यातही ह्या बिल्डींग मधे थंडावा रहावा म्हणून मुद्दाम तयार करण्यात आलं आहे. कन्स्ट्रक्शन साठी फेरोसिमेंट चा वापर करण्यात आल्याने डॊम चे वजन कमी होण्यास मदत झाली आहे. आतल्या सगळ्या भिंती या नेहेमीप्रमाणे अगदी प्लेन नसल्याने फेरॊसिमेंटचा वापर उपयोगी पडला असावा.
आम्ही त्या गॅलरी जवळ पोहोचलो, आणि समोर असलेली इमारत पाहून आपण एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमाच्या सेट वर आलो की काय असे वाटले. समोर जमिनीवर बरीच घुमट दिसत होती. जमिनीवर हेल्मेट्स चा ढीग रचून ठेवावा , किंवा बरीच कासवं एकमेकांच्या अंगावर चढून मस्ती करताहेत अशी काहीशी रचना वाटत होती. . सगळ्या घुमटांना मोझॅक ने कव्हर केलेले आहे. एका मोठ्या सापाचे पसरल्या सारखं डिझाइन काळ्य़ा टाइल्स चे मोझॅक वापरून बनवले होते. असे म्हणतात, की मुद्दाम काळ्य़ा पोर्सलिनच्या डिश बनवून त्या फोडून त्याचे तुकडे करून हे डिझाइन बनवले गेले.
जेंव्हा आपण पायऱ्यांवरून खाली उतरतो, तेंव्हा एखाद्या गुफे मधे आपण शिरतोय असा फिल येतो. गुफेच्या आत शिरल्यावर एक गोष्ट लक्षात आली की या गॅलरी मधली प्रत्येक भिंत ही ओबडधोबड आहे, एकही भिंत सरळ नाही- हुसेन चे पेंटींग लावायचे तर कमीत कमी सरळ भिंत तर हवीच ना? पण नाही तसे नाही. दोशी यांनी खरंच हुसेन साठी चॅलेंज म्हणून या बिल्डींगचे बांधकाम केलेले आहे ही गोष्ट आठवली आणि हसू आलं. वर दिलेल्या डोम वर जे ओपनिंग आहेत, त्यातून प्रकाश आत शिरत होता. डॊम ला सपोर्ट करण्यासाठी चित्रविचित्र आकाराचे सपोर्ट्स ( कॉलम्स) दिलेले आहेत.
ही गॅलरी बनवल्या नंतर इथे हुसेनला बोलावून ही जागा दाखवल्यावर, हुसेनच्या लक्षात आलं, की आपल्याकडे असलेले एकही पेंटींग इथे लावले जाऊ शकत नाही, आणि मग हुसेनने गुफेच्या आतला भाग त्याच्या खास शैली मधे पेंट केला. या मधे त्याचे फेमस घोडे, माणसांच्या आकृत्या, जनावरं , बरंच काही पेंट केलेले आहे. अॅब्स्ट्रॅक्ट पेंटींग चा प्रकार इथे पहायला मिळतो. समीक्षक असे असं म्हणतात की गुफेचे डिझाइन आणि हुसेनचे पेंटींग एकमेकाला कॉम्प्लिमेंट करतात. “आर्किटेक्ट्स गुफेची तारीफ करतात, तर पेंटर्स हुसेनच्या कलेची.”
मला स्वतःला पेंटींग मधले काही समजत नाही, पण ही गॅलरी मात्र आवडली हे नक्की. १९९३ मधे केवळ १८ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या गुफेची आजची किंमत ( अर्थात हुसेनच्या पेंटींग सोबतची, कारण ते वेगळे केलेच जाऊ शकत नाही ) कोट्यावधी रुपये होईल. तेंव्हा जर पुढल्या वेळेस कधी गेलात तर इथे नक्की भेट द्या. एक दिड तास चांगला घालवण्याचे एक ठिकाण आहे हे अहमदाबाद मधले. इथलेच काही फोटॊ इथे पोस्ट करतोय. काही फोटो मी काढलेले तर काही नेट वरून घेतले आहेत.

मोझॅक वर्क.

हुसेन ने केलेले पेंटींग. या मधे कॅनव्हास म्हणजे चक्क आतला भिंतीचा आणि छताचा वापर केलेला आहे.

आतला भाग.

बिल्डींगचा बाहेरचा भाग.या डोमच्या छता खाली ती गुफा आहे.

आत शिरण्याचा रस्ता.

रंगांची उधळण..

हुसेन

हुसेन ने केलेले पेंटींग. या मधे कॅनव्हास म्हणजे चक्क आतला भिंतीचा आणि छताचा वापर केलेला आहे.

हुसेन दोशी गुफा