आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?

Written by  on March 30, 2011

आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाण्याच्या बाजूच्या  ब्रिजवरून निघालो होतो . एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती ( हार्बर प्लॅटफॉर्म वर)  आणि तेवढ्यात एका मध्यमवयीन माणसाने ट्रेन समोर उडी मारली. क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. ट्रेन धडाडत प्लॅट्फॉर्म वर पोहोचली आणि ३ शिट्या वाजवू लागली..

. ट्रेनच्या शेवटच्या डब्याच्या मागे तो माणुस शिरच्छेद झालेल्या अवस्थेत पडलेला होता. धड एकिकडे आणि शीर दुसरीकडे. सगळं इतक्या लवकर झालं की रक्ताचा एकही थेंब दिसत नव्हता कुठे..हे सगळं अगदी नकळंत पाहिलं गेलं. अगदी अनपेक्षितरीत्या अशा तर्हेने कोणी तुमच्या डॊळ्यादेखत आत्महत्या केली तर ?? माझं डोकं सुन्नं झालं. त्या ब्रिजच्या कठड्यावरून मी पण डोकाउ लागलो.

माझ्या सोबतच शेजारी एक रेल्वे पोलीस निर्विकार पणे उभा होता. म्हणाला, आजका दिन तो शुरु हो गया… बस्स!! इतकीच प्रतिक्रिया. बहुतेक रोज ऍक्सिडॆंट बघुन बहुतेक त्याची नजर मेली असावी. पण मला मात्र अगदी ’सिक’ फिलिंग येत होतं. बरेच लोकं ती डेड्बॉडी ( क्षणभरापुर्वी जिवंत असालेला माणुस) पहायला तिथे निघाले. पण मी दुरुनच बघुन मला कसं तरी होत होतं. म्हणुन दोन स्नॅप्स ब्रिजवरुनच क्लिक केले आणि ऑफिसला पोहोचलो.

म्हणतात मानवी जीवन एकदाच मिळतं. पण ते इतक्या सहजपणे संपवणे कितपत योग्य? जास्त काही लिहायची इच्छा नाही. ते फोटॊ इथे पोस्ट करतोय.. जर तुम्ही ते सेव्ह करुन झुम करुन बघाल तर ती बॉडी दिसेल.ट्रेनच्या मागे ती डेड बॉडी पडलेली दिसेल तुम्हाला रुळाच्या मधे शीर आणि शेजारी धड..

फोटोग्राफ्स काढले आहेत या पोस्ट वरुन. जर पहायचे असतील तर पिकासा वर ठेवले आहेत. इथे  पाहु शकता ^(http://rangmarathiche.com/goto/http://picasaweb.google.co.in/kbmahendra/Desktop). ^(http://rangmarathiche.com/goto/http://picasaweb.google.co.in/kbmahendra/Desktop)

पद्मश्री’ ची खिरापत..

Written by  on March 29, 2011

सालाबादा प्रमाणे यंदा पण प्रजासत्ताक दिन म्हणजे २६ जानेवारी २००९.
नेमेची येतो पावसाळा प्रमाणे आजही :-

१० पद्म विभुषण
३० पद्म भुषण
९३ पद्मश्री

पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे जे सगळे पुरस्कार वितरित केले जातात त्याला परिमाण काय? की सरकारला वाटेल त्याला ,किंवा व्यत्कीला  ओब्लाईज करण्यासाठी हे पुरस्कार वितरित केले जातात कां हेच मला कळत नाही.

हे पुरस्कार, पुर्वीच्या काळी एक प्रकारे’ राष्ट्राने तुमचा केलेला गौरव ’ किंवा तुमच्या राष्ट्रकार्याची पावती समजले जायचे. पण हल्ली, ह्या पुरस्कारांचं काहीच समजेनासं झालंय .

ह्या पुरस्कारात दिल्या गेलेल्या पद्मविभुषण या पुरस्कारासाठी सिलेक्षन झालेले लोक- अनिल काकोडकर, माधव नायर आणि सुंदरलाल बहुगुणा ह्यांच्या निवडी बद्दल काहीच दुमत नाही.

जी ३० नावे पद्म भुषण साठी प्रसिध्द झाली आहेत, ती मात्र संशयातीत आहेत. आता शमशाद बेगम ला  पद्मभूषण जाहिर करण्यात आला आहे…(?????)

ह्यातली किती नावे ओळखीची आहेत किंवा त्यांचे काही योगदान तुम्हाला माहिती आहे?? खाली ३० पदमभुषण दिल्या जाणाऱ्या लोकांची लिस्ट आहे..

कलाः जी. शिवराम कृष्णमूर्ती उर्फ कृष्णा, प्रा. रमणलाल मेहता, शमशाद बेगम, व्ही. पी. धनंजयन आणि शांता धनंजयन, डॉ. वैद्यनानथन स्थापती.
नागरी सेवाः एस. के. मिश्रा
पत्रकारिताः शेखर गुप्ता
साहित्य आणि शिक्षणः प्रा. अलापात मेनन, सी. के. प्रल्हाद, डी. जयकांथन, डॉ. इशर अहलुवालिया, कुंवर नरेन, प्रा. मिनोरू हारा, रामचंद्र गुहा.
औषधेः डॉ. ब्रिजेंद्र कुमार राव, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, डॉ. खलीद हमीद.
राष्ट्रीय संरक्षणः निवृत्त लेफ्टनंट जनरल सतीश नंबियार
नागरी व्यवहारः डॉ. इंद्रजित कौर बारठाकूर, डॉ. कीर्ति पारीख
विज्ञान-तंत्रज्ञानः डॉ. भक्ता रथ, काँजीवरम शेषाद्री, डॉ. गुरदीप रंधवा, सॅम पित्रोदा, प्रा. डॉ.सर्वग्या कटियार, प्रा. थमस कैलाथ
समाजसेवाः डॉ. नागनाथ नायकवाडी, डॉ. सरोजिनी वरदप्पन.
खेळः अभिनव बिंद्रा
उद्योग आणि व्यापारः व्यापार आणि उद्योग
^(http://rangmarathiche.com/goto/http://http//loksatta.com/daily/20090126/mp01.htm)

तसेच…. जे ९३ पद्मश्री दिले जात आहेत त्याबद्दल न बोललेलेच बरे. केवळ राजेश खन्नाचा जावई म्हणुन अक्षय खन्ना, अमिताभ बच्चन ची सुन  म्हणुन ऐश्वर्या राय, पिनाज मसानी,हेलन,आणि धोनी, मनिंदर.. वगैरे लोकांना पुरस्कार दिले गेले आहेत.

या लोकांपेक्षा , प्रायोगिक रंगभुमीवर काम करणारे लोकां, आदिवासी भागात संपुर्ण तन मन धनाने सेवा करणारे प्रकाश आमटे, किंवा बाबा आमटेंना सर्वांगाने साथ देणाऱ्या साधना त्ताई, मेधा ताई अशी अनेक नावं आठवतात…  ,त्यांना हे पुरस्कार दिले असते तर त्याच चीज झाले असते.

हे पुरस्कार देउन गौरव कुणाचा करायचा?? हे पण बहुतेक सरकारला समजेनासे झाले आहे असे वाटते.९३ पद्मश्री  (कित्येक नावे तर परिचयाची पण नाहित..)म्हणजे , निव्वळ खिरापत वाटल्याप्रमाणे पद्मश्री दिल्या गेली आहे.

असो, ह्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला कधी तरी जाग येईल, आणि डिझर्वींग कॅंडिडेटस ला ऍप्रिशिएट केले जाईल, अशी आपण अपेक्षा करु या..

गणतंत्र दिवसाच्या शुभेच्छा!!

वाचन संस्कार..

Written by  on March 12, 2011

धावत धावत कुर्ला स्टेशनला पोहोचलो. इंडीकेटर कडे नजर टाकली, गाडी यायला एक मिनिट होता. बाजूच्या भैय्याचा  ’सुक्का भेल”  चा स्टॉल खुणावत होता. ट्रेन अगदी प्लॅटफॉर्म वर येत असेल तरी पण ती थांबायच्या आत अगदी ३०-४० सेकंदात भेळ बनवून तुमच्या हाती पुडा देण्याचे त्याचे कसब खरंच वाखाणण्यासारखे आहे. गाडीत बसे पर्यंत अर्ध्याहून जास्त भेळ संपली होती. गाडीत  बसलो, आणि   हातातला भेळेचा कागद उघडून वाचणे सुरु केले. काही जन्मजात सवयी असतात, त्या कधीच जात नाहीत , त्यातलीच ही एक!

माझ्या लहानपणी किराणा सामान हे नाक्यावरच्या एका गुजराथ्या  कडून आणले जायचे. दुकानात तुम्हाला हव्या असलेल्या सामानाची यादी दिली, की वर्तमान पत्राच्या कागदात त्याच्या पुड्या बांधून तो द्यायचा.’ प्रि पॅक्ड ग्रोसरी” चा जमाना तेंव्हा आलेला नव्हता. घरी सामान आणल्यावर डब्यात भरून ठेवल्यावर , रद्दी पेपर वरच्या तुटक बातम्या वाचायची मला सवय होती. बरेचदा तर  कागद फाटलेला असल्याने, अर्धवट बातमी वाचल्यावर , पुढे काय असेल ? ही रुखरुख पण लागायची, तरीही सवय काही मोडली नाही.

माझा वाचनाचा पिंड जोपासला गेलाय तो केवळ रद्दी मुळे. रद्दी माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी बरेच मार्ग वापरते. जसे गाडीवर वडापाव , खारे दाण्याची पुडी,तिकिटं,  वगैरे वगैरे तर आहेतच पण लोकल मधे भिंतीवर चिकटवलेली रद्दी म्हणजे कुठल्यातरी बाबाच्या , जादू टोणा, मुठ-करणी, वशीकरण वगैरे जाहिराती पण मला वाचायला चालतात. या जाहिराती म्हणजे पण रद्दीचा  प्रकार आहे, फक्त भिंतीवर चिकटवलेला…. कुठल्याही मार्गाने ’रद्दी” कागद हाती लागल्यावर तो वाचल्या शिवाय मला अजिबात फेकवत नाही. लहानपणापासून रद्दीच्या दुकानात उभे राहून तिथे कोणीतरी रद्दी मधे विकलेली कॉमिक्स चाळत उभे रहाण्याची सवय होती मला. सुदैवाने, त्या दुकानदाराने ही कधी  हरकत  न घेतल्याने हा वाचनाचा छंद जास्त जोपासला गेला. माझ्या वाचनाच्या आवडीचे श्रेय त्या रद्दीवाल्याला मी नक्की देईन.केवळ या रद्दीच्या दुकान मुळेच वेगवेगळ्या विषयावरच्या पुस्तकांना हात लागला, नाही तर  कदाचित वाचनाची आवड निर्माण झालीच नसती.

कधी थोडे पैसे असले, की त्याच रद्दीच्या दुकानातून गुरुनाथ नाईक, बाबूराव अर्नाळकरांच्या कादंबऱ्या घेऊन वाचायचो. एकदा पुस्तक वाचून झाले की दुकानदार दहा पैसे दर दिवसाचे लावायचा. थोडक्यात ’रद्दी लायब्ररी”म्हणा ना ! घरच्या लायब्ररी मधून डिटेक्टिव्ह पुस्तकं आणून वाचण्याची परवानगी नव्हती, त्यामुळे   ही पुस्तकं अशीच  लपून वाचावी लागायची. कधी तरी त्या वयाप्रमाणे ’तशी’  पुस्तकंही वाचली जायची.

एकदा किराणा दुकानातून सामान आल्यावर लहान पुड्या पुलंच्या ’अपुर्वाई’च्या एका फाडलेल्या पानात बांधलेल्या सापडल्या. जो पर्यंत पुस्तक शेल्फ मधे असते, तो पर्यंत त्याची किंमत – नाही तर रद्दी! अपुर्वाई पण रद्दी मधे असू शकते ही कल्पनाच तेंव्हा विचित्र वाटली होती. अजूनही घरच्या पेपरची रद्दी मी दारावर विकत नाही, तर स्वतः  त्या दुकानात घेऊन जातो. नुकताच रद्दीच्या दुकानात गेलो असता मोरोपंतांची ’केकावल” हे पुस्तक सापडले, रद्दी वाल्याने त्या  ६० पानांच्या दुर्मीळ पुस्तकाची  किंमत केवळ दहा रुपये लावली. बरं ते पुस्तक उघडले, तर त्यावर चक्क लोकसत्ताचे पूर्व संपादक  विद्याधर गोखले यांची  स्वाक्षरी दिसली.एखादे पुस्तक ,  मग ते कितीही ’वजनदार’  व्यक्तीने लिहिलेले असले तरी फक्त  रद्दी च्या दुकानात किलोच्या भावानेच विकले जाते हे कटू सत्य फार लवकर समजले होते .

असेच एकदा एक जुने पुस्तक ( रवी किरण मंडळाने प्रकाशित केलेले) ’श्री मनोरमा’ नावाचे  १९२६ साली प्रकाशित झालेले पुस्तक  त्यांच्या कवितांचे पुस्तक पण ह्याच दुकानात विकत घेतले- २० रुपयांना 🙂  जवळपास १०० च्या वर ’वृत्तबद्ध”कवितांचा दुर्मीळ  संग्रह आहे हा, आणि ह्या पुस्तकावर पण   स्वतः श्री रानडे यांची  शुभेच्छांसह अशी स्वाक्षरी  आहे. असा अनमोल ठेवा हाती लागला की खूप आनंद होतो, म्हणूनच रद्दीच्या दुकानात जायला मी कधी पण तयार असतो.

माझ्या मुलींना पण  माझ्याबरोबर लहानपणापासून रद्दीच्या दुकानात   जाऊन पुस्तकं घेतांना पाहिल्यामुळे  त्यांनी पण पुस्तकं विकत घेणे सुरु केले..  त्यांचा सुरुवातीला ओल्ड क्लासिक्स, हार्डी बॉइज, नॅन्सी ड्रू वगैरे पासून सुरु झालेला प्रवास शेक्सपिअर , खलिल जिब्रान किंवा रविन्द्रनाथ टागोरांपर्यंत जेंव्हा पोहोचलेला दिसला, तेंव्हा रद्दी वाल्याने आपल्या मुलांवर वाचनाची आवड जोपासण्यासाठी  किती उपकार केले आहेत याची जाणीव झाली. अगदी लहानपणापासून रद्दीच्या दुकानातून गोष्टीची पुस्तकं विकत घेतल्याने त्यात काही वावगे आहे असे त्यांना कधीच वाटले नाही.

पुस्तक हे  कधीच रद्दी नसते, तर जो त्याला किलोच्या भावाने विकतो  त्याला त्याची किंमत समजलेली नसते, म्हणून रद्दी मधे विकले जाते. श्रीकृष्णाची  रुक्मिणी, आणि सत्यभामेने सुवर्ण तुला केली , आणि स्गळे सोने एका पारड्यात टाकले तरीही   श्रीकृष्णाचे पारडे  खाली राहिले, पण जेंव्हा राधेने त्यावर तुळशीचे पान ठेवले, तेंव्हा मात्र कृष्णाचे   पारडे वर उचलले गेले , तसेच या रद्दीचे पण आहे, खरी किंमत अजूनही समजलेली नाह……….. आणि इथे फक्त ते तुळशीचे पान अजूनही सापडलेले नाही.