कोण मोठं??

Written by  on February 17, 2011

आज बाकी प्रश्न पडलाय काय लिहावं ते. आज तसा दिवस अगदी आळसात  गेला. दिवसभर नुसता लोळत पडलो होतो. खाणं आणि लोळणं.. बस्स!

काल काकांना एअर पोर्टवर सोडायला गेलो होतो. टर्मिनल २ सी वर सगळ्यांनी एकत्र व्ह्यायच म्हणून सांगण्यात आलं होतं. वेळ दिली होती ७ ची. मी काकांना म्हंटलं की अगदी ६ वाजता जरी निघाल तरीही आपण एअर पोर्ट वर फार तर अर्ध्या तासात पोहोचू. पण त्यांना घरी खूपच अनिझी होत होतं.अगदी ४-३० पासूनच तयार होऊन बसले होते.तशातच काकूला पण ऍलर्जी चा त्रास सुरू झाला , म्हणून पायातले बुट काढून तिने पण सरळ चप्पल घातली.शेवटी आम्ही ५ वाजता घरुन निघालो.

इंटरनॅशनल एअरपोर्ट माझ्या घरापासून ७ कि.मी. लांब आहे, आणि संध्याकाळी अपोझिट डायरेक्शनला ट्रॅफिक ला असल्यामुळे २० मिनिटातच आम्ही सरांच्या कोहिनुर समोर पोहोचलो. आम्ही उजवा टर्न मारला , तेवढ्यात काकूला एक टॅक्सी दिसली सरळ जाणारी. आणि त्या टॅक्सीवर केसरी ची लाल हॅंड बॅग दिसत होती. काकू एकदम अनिझी झाली, म्हणे.. अरे सरळ चल, ती टॅक्सी बघ तिकडे गेली… मी काकुला सांगितलं की ‘२ सी’ कुठे आहे हे मला चांगलं माहिती आहे .. तु जरा शांत रहा.. आणि दोनच मिनिटात २ सी समोर कार उभी केली.

केसरी वाल्यांनी बोलावलं होतं ७ वाजता आणि आम्ही पोहोचलो ते ५-३० ला. ‘२ सी ‘जवळ एक आजी उभ्या होत्या. त्यांच्या शेजारी एक लाल बॅग केसरी ची आणि इतर सामान होतं..त्या आजी पण थोड्या नर्व्हस दिसत होत्या. आम्हाला पाहिल्यावर त्यांना पण जरा बरं वाटलं.. हाय – हॅलो झालं आणि मी सामान खाली उतरवलं.

माझ्या काकांना मराठी गाणी ऐकायचं अजिबात वेड नाही. आणि टिव्ही शी तर पक्की दुश्मनी त्यामुळे सारेगमप लिल चॅम्प्स माहिती असणं शक्यंच नाही. पण कोणी तरी चांगली गाणं म्हणणारी मुलं सोबत रहाणार हे मात्र माहिती होतं. काका म्हणजे गीता दत्त, आणि मदन मोहनचे पक्के चाहते.. ते सांगायचे, अरे म्हणे जेंव्हा भगवानचा अलबेला आला तेंव्हा तो सिनेमा आम्ही कितीदा पाहिला ते मला नक्की आठवत नाही. बाळ भोंदु म्हणजे काकांचा अगदी क्लोझ फ्रेंड.. आता नाहित ते.. पण बाळ काका तर अगदी नाचायचा सिनेमा हॉल मधे . 🙂

केसरीने ही एक खास स्पेशल टूर काढली आहे – केवळ  आजी आणि आजोबांसाठी. काकांची आधी पण टूर झालेली आहे केसरी सोबत त्यामुळे त्यांची कम्फर्ट लेव्हल अगदी मस्त आहे केसरी सोबत.ह्या टूरचे विशेष म्हणजे या टुर मधे सगळेच लिल चॅम्प्स या लोकांच्या सोबत रहाणार आहेत . काकू तर खुश आहे. पण काकांना कांहीच सोयर सुतुक किंवा अप्रुप नाही लिल चॅम्प्सचं. अहो मराठी गाणी ऐकण्याची आवड नसल्याचा हा परिणाम.. असो..
भरपूर रिकामा वेळ होता एअरपोर्ट वर. बरं सिक्युरीटी वाला पण अजुन ओरडत आला नव्हता. म्हणून मी पण शांतपणे उभा होतो त्यांच्याशी गप्पा मारत. म्हंटलं, तो सिक्युरिटी वाला आला की आपण निघू मग परत.रिकाम्या वेळात काकांनी पुन्हा एक जुनी गोष्ट सांगितली. ती म्हणजे १९४२ सालची. त्यांच्या जुन्या काळच्या गोष्टी ऐकायला मला खूप आवडतात. मस्त टाइम पास असतो. आणि गोष्ट पण कशी तर, नावासहीत.ही गोष्ट त्यांना राजाभाऊ गोखले यांनी स्वतःच सांगितलेली आहे.

दादासाहेब खापर्डे हे एक मोठ्ठं व्यक्तिमत्व अमरावतीमधलं. राजकमल चौकाकडुन त्यांची जमीन सुरु व्हायची ती थेट मालटेकडी पर्यंत. ह्याच दादासाहेब खापर्डेंचा उल्लेख शेगांवच्या संत गजानन महाराजांच्या पोथी मधे पण येतो. एवढंच नाही, तर दादासाहेब हे लोकमान्य टिळकांचे पण वकील होते.  त्यांच्या मधे एकही खोट काढणे शक्य नाही.

१९४२ सालचा पिरियड. अमरावतीचेच एक प्रतिथयश वकिल राजाभाऊ गोखले यांचा भाऊमाधव हा नागपुरला सायन्स कॉलेज मधे प्राध्यापक होते. एकदा त्यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना घेउन लाहोरला निघाले होते ट्रेनने. लाहोरचं जेल म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांना ठेवण्याचं ठिकाण. माधव गोखले आणि काही पोलीस होते सोबत. त्यांच्याच डब्यात दादासाहेब खापर्डे यांच्या तिन मुलांपैकी एक मुलगा बसलेला होता. माधव त्याला म्हणाला, की तुम्ही फक्त माझ्या आईला सांगा की मी अगदी सुखरुप आहे आणि सरकारने अटक करुन मला लाहोरला पाठवलेले आहे.

यावर त्या दादासाहेब खापर्डेंच्या मुलाचे उत्तर होते, ” आपण राजद्रोहाखाली अटकेत आहात, तेंव्हा आमच्याशी आपण बोलणे योग्य नव्हे”..तेंव्हा कृपया आमच्याशी आपण बोलू नये.” दादासाहेबांचा मुलगा असाही वागू शकतो?एखाद्या मोठ्या माणसाच्या मुला कडून पण केवळ वडील मोठे आहेत म्हणून त्याने पण तसेच वागावे अशी आपण अपेक्षा ठेवतो. हेच चुकतं. प्रत्येकाची वागणूक निराळी.. ! असो..

५ दिवसानंतर गोखल्यांच्या घराच्या दाराची कडी रात्री वाजली. दोन माणसं उभी होती. त्यांना विचारलं , की तुम्हाला काय हवंय?? तर ते म्हणाले केवळ आईसाहेबांना भेटायचं आहे. राजाभाऊ म्हणाले, अरे मला सांगा , आता आई झोपली आहे, पण त्या गृहस्थांनी ऐकलंच नाही.. म्हणून शेवटी राजाभाउंच्या आई आल्या समोर. तेंव्हा ते दोन माणसं म्हणाले, की आम्ही दोघंही पोलीस आहोत, ज्यांनी आपल्या माधवला अटक करुन लाहोरला नेउन ठेवलंय ते. आम्ही आपल्याला केवळ इतकंच सांगायला आलो आहोत, की तुमचा माधव अगदी सुखरुप आहे. रात्री येण्याचं कारण म्हणजे आम्ही इथे आलो हे कुणालाही समजू नये ही इच्छा. कारण जर कुणाला आम्ही तुम्हाला ही माहिती दिली आहे हे कळलं तर मात्र आमची नोकरी जाईल…

कोण मोठं??