एक कथा- 3

Written by  on December 31, 2010

सुनिल लेले. हे चितळ्यांचे बाल मित्र आणि सध्या शेजारी! ड्युप्लेक्स घराची एक भिंत दोघंही शेअर करीत होते. दोन्ही घरांच्या मधे लावलेल्या उंच उंच झाडांनी दोन्हीकडच्या लोकांना प्रायव्हसी तर मिळालीच होती, पण त्याच बरोबर येता जाता दिसणे पण बंद झाले होते. लेले ह्यांचा स्टॉक ब्रोकींगचा बिझीनेस आहे. पैसा अगदी खोऱ्याने ओढतात ते.

गावाकडच्या घराला पण एकदम सुंदर मेंटेन करुन ठेवलं होतं. म्हातारपणी शेवटचे दिवस आपल्याच मातीत घालवायचे ही मनापासूनची इच्छा. इतक्या प्रेमाने बांधलेले ते लहानसे बंगला वजा घर, खूपच सुंदर बांधलेले होते. आता घर बांधलंय, म्हणून सुटीत जाउन रहाणं आलंच. त्यांची मुलगी शितल. इंजिनिअरींग पास केलं होतं आणि आता एमएस ची तयारी करीत होती- लेलेंच्या इच्छे विरुध्द! एकुलती एक मुलगी कायम डोळ्यासमोर रहावी असं आईवडिलांना वाटणं सहाजीकच आहे नाही का?

सध्या मार्केट क्रॅश झालेलं होतं. त्यामुळे फारसं काम नसायचं. या पेक्षा जास्त आयडीयल वेळ सुटी घेण्यासाठी असूच शकत नाही, म्हणून लेले गांवाकडे गेले होते. शितलने गावाला यायला सरळ नकार दिला होता की मला घरीच राहून तयारी करायची आहे म्हणून. बंगल्यात केअरटेकर होताच, त्यामुळे खाण्यापीण्याची सोय तर अगदी चोख होती.

गावी गेल्यावर पण इतर लोकांशी तसा फारसा संपर्क नसायचाच. फक्त भैय्यासाहेब जोशींकडे बाल मित्र म्हणून एखादी चक्कर तरी आवर्जून मारायचे. या वेळेस भैय्यासाहेबांकडे गेल्यावर त्यांनी रोहन बद्दल विचारलं तर भैय्यासाहेबांनी जेंव्हा रोहन बद्दल – नौकरी, इंटरव्ह्यु बद्दल सांगितलं तेंव्हा तर लेलेंना आश्चर्याचा धक्काच बसला!हा मुलगा चक्क मुंबईला आणि चितळ्यांकडे उतरलाय? अरे माझ्या घरी का नाही पाठवलंस त्याला? म्हणुन तक्रारवजा सुरात कैफियत मांडली.

रोहन बद्दल ऐकल्यावर एक विचार आला, की शितलला जर भारताबाहेर जाण्यापासून थांबवायचे असेल तर ह्या रोहनलाच जावई करुन घ्यावा..!! बस्स!! नेकी और पुंछ पुंछ. शितलला तर भैय्यासाहेबांनी लहानपणापासून पाहिलं होतं. त्यामुळे दाखवणे वगैरे फॉर्मलिटीजची काही फारशी गरजच नव्हती.

इतका चांगला सोन्यासारखा मुलगा अगदी कुठेच सापडणार नाही ही गोष्ट अगदी सोळा आणे सत्य आहे हे मनाला पुन्हा पुन्हा बजाउन सांगत होते लेले. दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला म्हणून निघाल्यावर, भैय्यासाहेबांच्या घरी पोहोचले. भैय्यासाहेब समोरच्या पडवित बसले होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर सहज म्हणून लेलेंनी शितल आणि रोहनच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला!! भैय्या साहेबांचा चेहेरा पण एकदम खुलला. आपल्याला एव्हढी शिकलेली , आणि लहानपणापासून पहाण्यात असलेली मुलगी, सून मिळणार ह्या कल्पनेनेच त्यांना खूप आनंद झाला.

त्यांनी रोहनच्या आईला आवाज दिला, अहो… ऐकलंत कां? हे लेले काय म्हणताहेत ते??

काय? पदराला हात पुसत  त्या बाहेरच्या खोलीत आल्या. भैय्या साहेबांनी लेलेंचं काय म्हणणं आहे ते सांगितलं . शितलला तर त्यांनी पण पाहिलं होतंच. त्यांचा चेहेरा पण एकदम आनंदाने खुलला.  अरे हो… आता रोहन मोठा झालाय की, आणि नौकरी पण लागेलच.

पण लेले …. ती तयार होईल कारे रोहन सोबत लग्न करण्यासाठी? भैय्यासाहेब पुटपुटले..
हो..होईल नां . नाहीतर मी आहे नां!! अरे कसंही करुन तिचं हे अमेरिका खूळ डोक्यातून काढुन टाकायचंय . लग्न झालं की मग ती विसरेल अमेरिका वगैरे, फार तर काय हनिमूनला जा म्हणाव महिना पंधरादिवस!!

नौकरी वगैरे करायची ती भारतामधेच राहून कर म्हणाव!! दोघांच्यापण म्युच्युअल कन्सेंट्स मुळे दोघंही मनापासून खुष झाले होते. बालमित्र आता व्याही होणार म्हणून!! लेले.. जावई मिळणार म्हणून आणि भैय्यासाहेब सुन घरात येणार म्हणून! लेले चहा घेउन घरी परत निघाले- एकच भुंगा मनामधे पोखरत होता- शितल हो म्हणेल की नाही? आणि जर शितल ने हो म्हंटलं, आणि रोहन नाही म्हणाला तर???

भैय्यासाहेब म्हणाले, की रोहनची आणि तिची म्हणजे शितलची  भेट करवून दे मुंबईला. म्हणजे त्या दोघांच्याही ्मनाचा अंदाज घेता येइल.आता ठरलं.. मुंबईला पोहोचलो, की रोहनला सरळ आपल्या घरी न्यायचं, म्हणजे त्याची शितलशी पण चांगली ओळख होईल, आणि दोघं एकमेकांना चांगले ओळखतील आणि पुढचं सगळं सोप्पं होऊन जाईल. मनातल्या मनात कल्पनेचे मांडे खात लेले परत मुंबईला यायला निघाले.
*************************

साडेतिन झाले होते. रोहनचा इंटरव्ह्यु केंव्हाच संपला होता. आत्तापर्यंत तर हे सगळे इंटरव्ह्युज नेहेमी दिल्लीलाच व्हायचे. यंदा पहिली वेळ होती की इंटरव्ह्युज हे मुंबईला अरेंज केले जात होते. आपला दिल्लीला जायचा त्रास वाचला याचाच खूप आनंद झाला होता रोहनला.

इंटरव्ह्यु झाल्यावर रीना ने फोन कर म्हणून सांगितले होते. त्याने सेल फोन काढून रीनाला फोन केला. तिचं काम पुर्ण व्हायचं होतं, पण ती म्हणाली की साधारणपणे एक तासात पोहोचेल. रोहन रिसेप्शन एरीयामधेच बसुन वेळ घालवू लागला- तिच्या कॉलची वाट पहात.

इंटरव्ह्यु झाला होता आणि आता सिलेक्शन झाल्यामुळे परिक्षेचा शेवटचा पेपर झाल्यावर जसा थकवा येतो तसा मानसिक थकवा आला होता. मस्त पैकी उंडारायला जावं, किंवा सिनेमा पहावा – किंवा सगळं काही विसरून मस्त पैकी झोपावं असं तरी वाटतंच… किंवा कोणा बरोबर तरी जे काही मनात आहे ते शेअर करावं असं वाटतं.. पण इथे मात्र रोहन एकटाच बसला होता. बातमी शेअर करायची म्हणून त्याने भैय्यासाहेबांना फोन केला.
सिलेक्शन झालंय बाबा.
भैय्यासाहेबांना उर आनंदाने भरून आला. अहो… ऐकलंत काय?? सिलेक्शन झालं बरं कां.. रोहनचं!!! रोहनची आई बाहेर आली. फोन हातात घेउन डोळ्यातले पाणी घळघळा वहात असतांनाच रोहनला म्हणाल्या..
आशिर्वाद रे.. बाळा!! कधी येतो आहेस घरी परत? लवकर ये रे खूप आठवण येते बघ तुझी!
अग, इथे अजून दोन दिवस तरी थांबावं लागेल. परवा माझी मेडीकल आहे, ती झाली की मला परत येता येईल. अगं आई, पण मला नंतर जॉइन झाल्यावर तर बाहेर जावंच लागेल नां?? मग? इतकी काय काळजी करतेस?
तुला नाही कळायचं रे आईचं मन.. पुटपुटल्या त्या.. आणि फोन ठेवला. पदर डोळ्याला लावला, आणि पाणी टीपलं डोळ्यातलं.

आता रोहनचं लग्नं पण होणार. लेले येउन गेले नां. सून येणार म्हणून एक वेगळीच हुर हुर लागुन राहिली होती त्यांना. कसं होईल? तीचं आपल्याशी जमेल की नाही?

तसंही आपल्याला मुलांकडे जाउन रहायचं नाहीच. कधीतरी थोड्या दिवसांसाठी गेलो, तर तिने व्यवस्थित करावे एवढीच इच्छा.. बस्स! भैय्यासाहेब नेहेमीच त्यांना म्हणायचे , की मुलांकडे जावं, रहावं, पण तिथुन निघतांना मुलांच्या डॊळ्यात आलेलं पाणी पाहिलं की पावलं!!! असं म्हणून परत निघावं!! जास्त राहिलं, तर आपल्या डोळ्यात पाणी येऊन तिथुन निघण्याची वेळ येउ शकते .. ती न येवो म्हणजे झालं. थोडं मन उदास झालं.. कसं होणार ??

उगिच कुठल्यातरी कामात मन रमवायचं म्हणून त्या वाळवणं बघायला परसदारी गेल्या.स्वतःशीच पुटपुटत  त्या तिथे  ठेवलेली काठी उचलुन  त्या तिकडे स्वतःशीच पुटपुटत निघाल्या- मेले कावळे,  येउन सारखे चोचा मारतात, आणि पापड, सांडगी पळवून नेतात.. मागच्या वर्षी तर आंबा  पोळी पण खराब केली सगळी त्यांनी

***************************

रीनाने रोहनचा फोन पाहिला. दोन मैत्रीणी मिळून ते प्रोजेक्ट पुर्ण करायचं होतं म्हणुन ती मैत्रिणीकडे आली होती.  आता काम पुर्ण होत आलं होतं, रोहनचा फोन आला आणि तीने आवरतं घेतलं आणि तिथुन निघाली. दुपारची वेळ, म्हणजे अशा वेळी थोडा ट्राफिक कमीच असतो. ती एकदम लवकर पोहोचली ताजच्या समोर. तिथे पोहोचल्यावर तिने रोहनला फोन करून सांगितले की ती बाहेर  उभी आहे म्हणून.

रोहन बाहेर आला. चेहेरा थोडा थकलेला होता. इंटरव्ह्यु चांगला दोन तास चालला. जेवण वगैरे काहीच झालेलं नव्हतं. तो बाहेर आला आणि कार कडे चालू लागला. समोरच्या सिट वर जाउन बसला रीनाच्या शेजारी.थोडा थकवा जरी असला तरी पण प्रसन्न चेहेरा पाहिल्यावर रीनाच्या लक्षात आलं की ह्याचा इंटरव्ह्यु चांगला झालाय म्हणून.

कार सुरु झाली. रोहन म्हणाला, कुठे जवळपास एखादं हॉटेल आहे कां? लंच करायचा राहून गेलाय. रीनाने आश्चर्याने पाहिले- काय?? जेवला नाहीस तू??  ठिक आहे, आणि कार पुल ओव्हर केली मरीना हॉटेल समोर. व्हॅले पार्किंग वाला माणुस समोर आला आणि कार घेउन गेला पार्किंगला. दोघंही हॉटेल मधे शिरले. वरच्या मजलयावर गेल्यावर समुद्रासमोरची खिडकी समोर असलेला टेबल घेतला. समोर अरबी समुद्र पसरलेला होता. रीनाच्या फेवरेट जागांपैकी ही एक जागा होती. तिचे पपा तर इथे आले की तासनतास समुद्राकडे पहात बसु शकतो मी.. असे म्हणायचे.
काय घेणार आहेस तू?
हं.. मी .. चिझ सॅंडविच आणि कॉफी.. बस्स!
अरे पण तू जेवला नाहीस नां? मग ? कसं होईल एवढ्याने तुझे?  आणि तिने कॉफी ऐवजी मॅंगो शेक मागवला. वेटरने डिश समोर आणून ठेवली. रोहनने खाणं सुरु केलं. रीना ने स्वतःसाठी कॉफी मागवली होती. तिला अजूनही रोहनशी कसं बोलावं हे समजत नव्हतं. समोरचा कॉफीचा कप थंड होत होता..

’तुला अजून काय हवंय?’
’ नाही..बस , इतकंच पुरे मला. ’ रोहन  म्हणाला.

थोडं खाऊन दोघंही तिथुन निघाले . थोडं पोटात पडल्याने आणि  नौकरी पक्की झाल्यामुळे रोहनला आता बरं वाटत होतं.   रीनाने आपल्याच विचारात मग्न होती, कदाचित म्हणूनच असेल की तिने  इंटरव्ह्यु बद्दल काहीच विचारलं नाही.  रोहन शांत बसला होता.

रीनाच्या मनात कालच्या एपिसॊड पासून एक गिल्टी कॉन्शस होता. रोहनने आपल्याला, ’तशी’ मुलगी समजू नये असे सारखे वाटत होते. काल रात्री तो जेंव्हा खोलीत आला, आणि कांही न बोलता, परत निघून गेला, तेंव्हा मात्र त्याच्या डिसेन्सीची खात्री पटली . तिच्या लक्षात आलं होतं की रोहनचा कालचा तिच्या खोलीत शिरण्याच्या उद्देश केवळ तिला रडतांना पाहून सपोर्ट करण्यासाठीच होता. नाही तर, रोहन ती शांत होऊन  बाथरुम मधे गेल्यावर परत येई पर्यंत थांबला असता.
आणि ….. कदाचित………………….!!

!! इतक्या  एकमेकाविरोधी   गोष्टींचा कल्लोळ सुरु होता डोक्यात.
एखाद्या माणसाने आपल्याला मिस़अंडरस्टॅंड करु नये असे का नेहेमी वाटत असते आपल्याला? आता रोहनने आपल्याला मिस़अंडर्स्टॅंड जरी केली तरी काय फरक पडतो आपल्याला? दोन दिवसांनी तो परत जाणारच आहे नां? पण दिमाग मान जाये लेकिन दिल ना माने.. अशी परिस्थिती झाली होती तिची.एक काम करू या.. रोहनचा इंटरव्ह्यु झालाय. म्हणजे आता  हा उद्या परत जाईल बहुतेक. मग ऍज अ गुड विल जेस्चर, त्याला मुंबई फिरवून मग घरी नेउ या आपण.. ठरलं!! रात्री  ८ वाजता पिझा हट वर भेटायचंय सगळ्या मित्रांना, तेंव्हा रोहनला पण बरोबर ठेउ या. त्याला पण जरा बरं वाटेल.पण आता तर फक्त चार वाजले आहेत, ८ पर्यंत काय करायचं?? बांद्रा बॅंड स्टॅंड…?? येस्स!! चलेगा, तिने स्वतःशीच म्हंटलं! घरी फोन लावला, सुमाताईंना.. की रात्री उशिर होईल, पण काळजी करु नकोस रोहन सोबत आहेच!

वरळी सी लिंक वरुन कार जात होती, रीनाची सवय होती, सी लिंक वरुन जातांना एसी बंद करायचा,  खिडक्यांच्या काचा खाली करायच्या, आणि समुद्राची खारीहवा चेहेऱ्यावर झेलायची.समुद्राच्या वाऱ्याने केस उडत होते. डिओ चा म्ंद सुगंध कारमधे पसरला होता.रोहन पण बाहेर पहात होता. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं, आणि एकदम जोरात ह्सू आलं  दोघांनाही..
काल रात्रीच्या प्रसंगा मुळे  निर्माण झालेली   भिंत एकदम ढासळली दोघांच्या मधली.. !!

( मला ही कथा उद्याच्या पोस्टने संपवायची होती, पण इतक्या कॅरेक्टर्सना न्याय द्यायचा  एका भागात शक्य होणार नाही म्हणून अजून एक  पोस्ट वाढेल.  माझा अंदाज आहे की ५ व्या भागात ही कथा संपेल.    )

वंश वेल

Written by  on December 25, 2010

एकदा माझ्या चुलत आजोबांनी एक कागद दाखवला होता, त्यावर समस्त कुलकर्णी वंशवृक्ष इ.स. ११०० पासून  काढलेला होता. आधी तर माझा त्यावर विश्वासच बसला नाही, की इतकी जुनी माहिती  ऑथेंटीक असू शकते म्हणून. पण आजोबा म्हणाले की ही माहिती त्यांनी स्वतः  त्र्यंबकेश्वरला गेले असतांना   लिहून आणलेली आहे.

जूनही नाशिकच्या काही भटजींकडे तुमच्या वंशाची पुर्ण माहिती लिखित स्वरूपात पिढी दर पिढी पुढे चालत आलेली आहे. फक्त एकच आहे, की  तुम्हाला फक्त तुमच्या गुरुजींचे आडनाव माहिती असायला हवे.

आजोबांनी दाखवलेल्या त्या माहिती प्रमाणे, आमचे मूळ पुरुष हे धारवाड हून वाईला आले. तेंव्हा ते थेटे हे आडनाव लावायचे, नंतर जवळपास नऊ  पिढ्या वाईला गेल्या. त्या पूर्वजांचा व्यवसाय वगैरे काय होता हे तर निश्चितच ठाऊक नाही- पण भिक्षुकी, आणि ज्योतिष्य  हाच असावा.

नंतरच्या काळात जेंव्हा शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी पद मिळाले,   तेंव्हापासून  कुलकर्णी हे उपनाम वापरण्याची प्रथा सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. आमच्या पैकी बरेच लोकं अजूनही अगस्ती किंवा थेटे आडनांव लावतात. अजूनही वडील कोणी थेटे नावाचे किंवा अगस्ती आडनावाचे भेटले की आधी तुमचे गोत्र कुठले अशी चौकशी करतात. असो. अजूनही बरंच काही आहे, पण हे पोस्ट माझ्या वंश वृक्षा बद्दल लिहिण्यासाठी सुरु केलेले नाही, हे तर जस्ट लिहिण्याच्या ओघात लिहिल्या गेले.

नाशिकचे भटजी लोकं ! त्यांना पाहिलं की गरीब बिचारा ब्राह्मण हा गोष्टीतून हद्द पार झालाय ह्याची जाणीव होते. १०८ पिंपळ असलेल्या स्मशाना जवळ केला जाणारा  नारायण नागबळी आणि   आणि कालसर्प योगाची पुजा करुन सगळेच भटजी लोकं छान पैसे वाले झालेले आहेत. लहानपणापासून ऐकत आलेला तो गोष्टीतला गरीब बिच्चार ब्राह्मण हद्दपार झालेला पाहून बरं वाटलं.

जेंव्हा पासून काका आजोबांनी तो वंशवृक्षाचा कागद दाखवला होता, तेंव्हापासून माझ्या मनात एकदा तरी नाशिकला जाउन आपल्या डोळ्यांनी स्वतः ती कागद पत्र पहाण्याची इच्छा होती. जेंव्हा माझी धाकटी बहीण नाशिकला स्थाईक झाली तेंव्हा पासून नाशिकला जाणे सुरु झाले.

एकदा त्र्यंबकला गेलो असता, आमचे पुर्वानूपार पिढी दर पिढी डेटा लिहून ठेवणारे श्री शुक्ल गुरुजी यांच्या घर शोधत त्यांच्या घरी गेलो.  अर्थात ही गोष्ट मी लिहितोय ती १२-१५वर्षापूर्वीची  . त्या गुरुजींनी आमच्याकडे थिजलेल्या लुकलुकत्या डोळ्यांनी पाहिलं. समोरच्याच खोलीत ते मांडी घालुन बसलेले होते. त्यांना नमस्कार केला . त्यांनी माझं नांव आणि गोत्र  विचारलं.

मी थोडं जोरातच (त्यांना कमी ऐकू येतं म्हणून)  अगस्ती गोत्र आणि महेंद्र भास्कर कुलकर्णी एवढं नांव  सांगितल्या बरोबर  त्यांनी ताबडतोब,    आजोबा,पणजोबा, खापर पणजोबांची आणि त्याही पूर्वीच्या पूर्वजांची  नावं धाड धाड म्हणून दाखवली. म्हणाले की हे सगळे इथे पूर्वी येऊन पुजा करून गेले आहेत.

अर्थात ,माझा  विश्वास बसला नाही , त्यांना विचारले हे जे तुम्ही सांगताय ते खरं कशावरून??  कदाचित तुम्ही स्वतःच्या  मनाने काही सांगत असाल? त्यांनी एक जुनी जीर्ण झालेली चोपडी काढली आणि त्यामधे माझ्या आजोबांची काळ्या शाईने केलेली सही  आणि तारीख, तसेच पणजोबांची पण सही आणि त्यांनी त्र्यंबकला भेट दिली होती ती तारीख आणि सही  दाखवली. ते पाहिल्यावर त्यांनी लिहून ठेवलेले ्त्यांच्या पुढल्या पिढी मधे माझ्या वडीलांचे लिहून ठेवलेले नांव दाखवले. मी म्हंटलं की हे तर ठीक आहे, हे इतक्यातलेच म्हणजे याच शतकातले  आणि फार तर मागल्या शतकातले आहेत, पण त्यापूर्वीचे काही पुरावे आहेत का?

. . म्हणाले की जुना डेटा हा नवीन वही मधे ट्रान्स्फर केला जातो . जुना कागद काही शतकांच्या नंतर खराब होतो आणि म्हणून जास्त जुने कागद ठेवता येत नाही. फार जुना झाला की कागदाचा तुकडा पडतो . त्यांचं म्हणणं पटलं .अगदी कुठल्याही प्रकारचे कॉम्प्युटराइझ्ड साधनं नसतांना अशा प्रकारे लिखित स्वरुपात डेटा गोळा करून ठेवणे म्हणजे एक प्रकारचे आश्चर्यच आहे

नंतर बराच वेळ त्यांच्याकडे बसून त्यांनी हा जुना  ठेवा कसा काय  जपून ठेवलाय ह्याबद्दल चौकशी केल्याबरोबर ते एकदम भरभरून बोलायला लागले. म्हणाले खूप अवघड आहे हे काम, पण देवाच्या दयेने सगळे निट  चाललंय आज पर्यंत .जुन्या लोकांना हा अशा प्रकारचा डेटा इथे जमा करून ठेवला जातो हे माहिती आहे, पण नवीन पिढीला मात्र याची काहीच कल्पना नाही. थोडं वैशम्य दिसलं त्यांच्या चेहेऱ्यावर.. समोर ती चोपडी केली, म्हणाले की तुमची सगळी पुढली माहिती लिहून ठेवा इथे म्हणजे तुमच्या पुढल्या पिढ्यांसाठी. मी  त्यांनी समोर केलेल्या तशाच चोपडी मधे स्वतःचे , सौ चे, मुलींची  नांवं लिहून सही केली- आणि  त्याच बरोबर आपण आज एका ऐतिहासिक कागदावर सही केल्याची जाणीव झाली की जो पुढ कमीत कमी दोन तिन शतकं तरी नक्कीच जपून ठेवला जाईल. उगीचच खूप नॉस्टेल्जिक वाटायला लागलं, आणि  आमच्या  त्या पिढीजात पुरोहितांना पैसे देऊन आणि पूजा सांगून परत  निघालो.

जाता जाता, त्यांचं एक वाक्य मात्र सारखा पाठलाग करत होतं, तुम्हाला दोन्ही मुली? मग आमच्या पुढल्या पिढ्यांचं कसं व्हायचं??