चविनं खाणार…

Written by  on October 3, 2010

240720091716कधी डीएकेसी ( धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी) ला गेले आहात? तिकडे गेल्यावर काम झालं, आणि समजा तुम्ही न जेवता बाहेर निघालात, तर जेवणाचे नुसते वांधे होतात. तुम्हाला सरळ वाशी पर्यंत ड्राइव्ह करुन जावं लागतं किंवा जर तुम्ही रबाळ्याच्या दिशेने ड्राइव्ह केलं तर फारतर एक किमी अंतरावर एक रेस्टॉरंट आहे त्याचं नांव साउथ कोस्ट. जर तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर हे हॉटेल म्हणजे अगदी ओऍसिस म्हणता येइल रबाळ्यामधलं.

कांही दिवसांपूर्वी या हॉटेलला गेलो होतो सदु साहेबां ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/02/01/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/)सोबत . (सदु साहेब म्हणजे आमचे परम मित्र… यांचं ऑफिस कम वर्कशॉप आहे रबाळ्यालाच) त्यांनीच आमची धिरुभाई अंबानी कडे व्हिजिट झाल्यावर तिथे नेले होते. या हॉटेलचं ऍम्बियन्स पण खूपच मस्त आहे.

240720091719आमचे सदु साहेब ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/02/01/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/) जरी केळकर असले, तरी मुळ कर्नाटकातले. आम्ही त्या हॉटेलला जाउन बसलो. माझी कार नव्हती, म्हणून मी बिअरला कंपनी दिली. बिअर सोबत रेशमी कबाब मागवले होते. इतके सॉफ्ट की बस्स!! अगदी तुकडा तोंडात घातला, की विरघळणार असा.. समोरची प्लेट कधी रिकामी झाली ते समजलंच नाही. चिकनचे सॉफ्ट तुकडे आणि त्याला लावलेली स्पेशल पुदिना चटणी एकदम लाजबाब टेस्ट देते. थंडगार बिअर आणि हे कबाब म्हणजे स्वतःला दिलेली एक सुंदर ट्रिट!

तो वेटर समोर येउन उभा राहिला.. मेनू पाहून ऑर्डर करणं हे कमीपणाचं लक्षण मानतात आमचे मित्र.. त्या वेटरलाच विचारलं.. क्या है अच्छा?? अर्थात नेहेमी प्रमाणे वेटरने सब कुछ अच्चा है म्हणाला, तर सदू साह्बांनी त्याच्याकडे तिक्ष्ण नजरेने पाहिले आणि त्याच्या काय ते लक्षात आलं. त्यानं समोरचा मेनू आमच्या समोर उघडून ठेवला आणि काही डिश कडे बोट दाखवलं.. ये ट्राय करो साब..

तो पर्यंत आमचा स्टॅमिना संपला होता. सदु साह्बांनी विचारलं की मंगलोरी चिकन है?? तो म्हणाला हां.. है.. तर मग एक चिकन मंगलोरी और नीर दोसा ले आओ…(चिकनच्या प्लेटच्या शेजारी असलेल्या प्लेटमधला तो पांढरा पदार्थ म्हणजे नीर दोसा. ) मनातल्या मनात सदु साह्बांची पाठ थोपटली. म्हंटलं बॉस.. क्या चॉइस है.. कारण माझी पण आवडती डिश म्हणजे नीर दोसा + चिकन मंगलोरी… अरे काय कॉंबॊ आहे बॉस.. हा नीर दोसा फारच कमी ठिकाणी मिळतो. मला माहिती असलेल्या दोन हॉटेल्स मधे म्हणजे तारा पंजाब ( चेंबुर ) आणि या हॉटेलमधला चांगला असतो.फक्त एकच आहे या नीर दोशासोबत चिकनचे पिसेस अगदी टॆंडर हवेत.. नाहितर मग काही मजा येत नाही.

आमच्या बरोबर एक व्हेज मित्र पण होता म्हणून एक मिक्स व्हेज पण मागवलं.मिक्स व्हेज ( अर्थात कोकोनट करी मधलं ) आणि हा दोसा पण मस्त कॉम्बीनेशन आहे व्हेजवाल्यांसाठी. जेवण झाल्यावर थोडा बिअरमुळे आलेला डोक्याचा जडपणा कमी करायला म्ह्णून समोरच्याच भैय्या कडे पान… !! तर नक्की ट्राय करा.

020920091772माझे टेस्ट बड्स मला इराण्य़ाकडे पण नेतात बरेचदा. हल्ली इराणी हॉटेल्स फार कमी शिल्लक आहेत मुंबईला. त्यातल्या त्यात एक अगदी थर्डक्लास अपिअरन्स असलेलं रुहानी हॉटेल आहे भेंडिबाजारला.. आता मी कशाला जातो भेंडी बाजारला ते विचारु नका. तिकडे पण आमचा एक मित्र+डिलर आहे. त्याच्या कडे गेलो की या इराण्य़ाकडे नक्की जातो.फारशी भूक नसेल तर आम्लेट पाव, किंवा ब्रुन मस्का + चहा मारल्याशिवाय त्या हॉटेलसमोरुन पाय उचलल्या जात नाही. इराण्याच्या ह्या हॉटेल मधे लक्षात येणारी एक गोष्ट म्हणजे भींतीवर लिहिलेली कुराणातली आयतं.

Chiken roti परवा काय माझ्या मित्राचे रोजे सुरु होते, म्हणून एकटाच निघालो रुहानी ला. ते  थंड संगमरवरी टॆबल, शेजारी लाकडी खुर्च्या, टेबलवरचे दोन पेले उलटे तर दोन सुलटे पडलेले. समोर पांढरी टॊपी घालुन बसलेला इराणी , त्याच्या समोरच्या बरण्यांमधे बिस्किट्स, केक वगैरे वगैरे…. !! त्या टेबलवर हात ठेवला .. थंड गार स्पर्श झाला आणि अंगावर शहारे उमटले

त्या वेटरला पण काही घाई नव्हती. मी दोन तिन मिनिटं बसलो असेल नंतर तो वेटर तिथे आला. साब क्या लाउ?? विचार न करता म्हणालो , चिकन लेग मसाला और रोटी. या इराण्यांकडची रोटी अगदी मस्त असते. त्याने रोटी टेबलवर  आणून दिल्यावर, थंड झाली तरी पण अगदी तुटतुटीत असते. शेट्टीच्या हॉटेलसारखी रबरी होत नाही. दोन रोटी + चिकन किंवा कबाब… माझा नेहेमीचा चॉइस.. मी इथे इतर कांही ट्राय करित नाही. कधी तरी ’खिमा पाव ’आणि सोबत थम्स अप.. हे पण मला आवडायचं. पण हल्ली रेड मिट बंद केलंय नां.. त्यामुळे ……  😦

आता इराण्याच्या हॉटेलवरचा लेख ब्रिटानिया हॉटेलचा उल्लेख केल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. ब्रिटानिया हॉटेल ( बेलार्ड पिअर चं) इथला चिकन  बेरी पुलाव + बॉम्बे डक आणि स्विट डिश म्हणजे कार्मेल कस्टर्ड हे तर ट्राय करायलाच हवं. इथलं बॉम्बे डक अगदी तोंडात घातलं की विरघळणार असं.. इतके सुंदर मासे यांना मिळतात तरी कुठुन?? अरे हो.. सगळ्या व्हेज लोकांसाठी .. बॉम्बे डक हा माश्याचा प्रकार आहे बरं कां. .. बदकाचा नाही…. :)असंही ऐकलंय की आता हे हॉटेल बंद होणार आहे , म्हणून सांगतो इथला चिकन बेरी पुलाव एकदा तरी नक्कीच ट्राय करा. या पुलावातली बेरी इराणमधुन इम्पोर्ट केलेली असते. 🙂  इथलं कार्मेल कस्टर्ड अगदी पंचतारांकित हॉटेलच्या पण थोबाडीत मारतं.. बिलिव्ह मी!!!

आता आपण जर सिटी साइडला गेलो आहेच  तर बडेमियां चे कबाब खाल्ल्याशिवाय परत कसं काय येउ शकतो? ताज च्या अगदी पाठिमागे, हॉटेल डिप्लोमॅटच्या गल्लित हा बडेमियांचा जॉइंट आहे. रात्र झाली की इथे मुंबईतिल प्रतिथयश व्यक्ती पण हजेरी लावतात बरं कां.. बडेमियांचे कबाब खाल्ल्या शिवाय मुंबईची ट्रिप पुर्ण होत नाही. जर तुम्ही लेट नाईटला तिथे थांबाल, तर कदाचित एखादा बॉलिवुडचा ऍक्टर पण इथे दिसु शकतो.. असं म्हणतात, की आपली माधुरी दिक्षित इथे नेहेमी यायची…  🙂

तसं व्हेज साठी रबाळे ब्रिज च्या दिशेने गेलात तर सावतामाळी सभागृहाच्या रांगेत एक हॉटेल आहे . त्याचं नांव विसरलो आता. पण तिथे ’कर्ड राइस’+मसाला पापड+ ताक = बेस्ट कॉम्बो.. अगदी खुप जास्त भुक लागलेली असेल तरीपण  हा कर्डराइस  म्हणजे अगदी अप्रतिम असतो इथला. दही पण जास्त आंबट नाही, तसेच दहिभातामधे काकडी, कोथिंबीर, आलं, मिरची, कांदा यांचा मुबलक वापर .. हा दहीभात आणि त्यासोबत फुकट मिळणारं (!) लोणचं..इतकं जरी खाल्लं तरीही पुर्ण जेवण झाल्याचं समाधान मिळतं. अतिशय चवदार डिश आहे ही.वेळ कमी असेल तर मात्र हा दही भात ट्राय करायला हरकत नाही!!

खाणं म्हणजे माझा जीव की प्राण.. म्हणून लेख जरा मोठा झालाय.. अजुन बऱ्याच जागा आहेत.. इथे एक वेगळा भाग सुरु करतोय.. माझी खादाडी म्हणून.. :)इथे मी पश्चिम भारतातल्या चांगल्या खाण्याच्या जागांबद्दल लिहायचं ठरवलंय.. बघु या कसं जमतं ते.. 🙂