डबा..

Written by  on September 17, 2010

डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे – वेगवेगळ्या आकाराचे डबे नजरे समोर येतात..

शाळेत जातांना डबा घेउन जाणे इथून डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदीरा पासून हातात दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत  मूल जातं तेंव्हा त्याला हे माहिती नसतं की  हा डबा आता आयुष्यभर साथ देणार आहे आपली.

शाळेत पण डब्यामध्ये सरळ भाजी पोळी किंवा घट्ट वरण तेल, लोणचं   पोळी असायची. आमचे हे नको, ते आवडत नाही असे  नखरे कधीच सहन केले नाहीत आईने , आम्हाला जे हवं ते नाही, तर तिला  जे वाटेल तेच दिलं तिने  डब्यात. खूप कंटाळा यायचा रोज तेच ते डब्यातले खायला. पण खरं सांगतो- तूप साखर पोळीचा रोल आणि पुडचटणी ( उडीद, चणा डाळीची  कर्नाटकी पद्धतीची चटणी) चा रोल खूप आवडायचा.

शाळेत कॅंटीन नावाचा प्रकार नव्हता. पण मधल्या सुटीत समोर एक बाई पेरू, चिंचा, आवळे वगैरे विकायला बसायची. एक लहानशी टपरी पण होती, तिथे बटाटे वडा आणि समोसा मिळायचा. (  घरुन पैसे चोरुन खाल्लाय बरेचदा 🙂 .. आणि मग पोट भरलं की डब्याचे काय करायचं?? कारण  डबा तसाच घरी नेला तर हमखास मार  ठरलेला , म्हणून   घरी येण्यापूर्वी  डबा सरळ एखाद्या कुत्र्याला खाऊ घालायचा. अर्थात अशी वेळ महिन्याभरात एक दोनदा तरी यायची.

कॅटल क्लास?

डब्या पासून कुणीच सुटलेलं नाही.दुर कशाला, शशी थरुर सारख्याला पण अजुन ही गुरांचा   डबा आठवतोच ( कॅटल क्लास) कॉमेंट देतांना. मुकेश अंबानी चा पण जेवणाचा  डबा घरूनच येतो म्हणतात..लहानपणी शाळेत जातांना नेलेला डबा, नंतर कॉलेज मधे पण सोबतच असतो. नोकरी लागल्यावर एकटं रहावं लागलं की मग मात्र या डब्याची साथ सुटते.  सुरुवातीला तर खूप बरं वाटतं की आता डबा नाही. हॉटेलचं मस्त पैकी खायचं.. मग सुरू होतं बाहेर चरण ( त्याला खाणं म्हणणं चुकीचे वाटते मला… चरण हाच शब्द जास्त संयुक्तिक आहे माझ्या मते) लवकरच त्या रोजच्या इडली सांबार, किंवा तत्सम  दक्षिण भारतीय खाण्याचा कंटाळा येतो,   मग आपला मराठमोळा वडा पाव / मिसळ पाव जवळचा वाटू लागतो.

सुरुवातीला तर लक्षात येत नाही, पण लवकर कमरेभोवती पँट घट्ट झाली की हे तळलेले  खाणे आता कमी करायचे.. असं स्वतःशी ठरवून आपला मोर्चा सॅंडविच वाल्याकडे वळतो. सॅंडविच हा प्रकार सुरुवातीला एक दोन दिवस बरा वाटतो, पण नंतर लक्षात येतं की ही ब्रेड पोटामध्ये घट्ट बसते, आणि   नंतर मग दिवसभर पोट जड झाल्याचे विचित्र फिलिंग देत रहाते.

नंतर मग हेल्दी फुड म्हणून हॉटेलमधे जाउन चिकन फ्राय रोटी किंवा कबाब रोटी, भुर्जी पाव, खिमा पाव  खाणं सुरु केलं जायचं. त्याचा पण  फार तर एखादा आठवड्यानंतर कंटाळा येणं सुरु व्हायचं,  आणि मग मात्र पुन्हा  आईच्या हातच्या त्या भाजी  आणि नरम पोळ्यांच्या डब्याची आठवण यायची आणि आपण काय गमावलंय   याची जाणीव व्हायची.

गेला एक आठवडा इंदौर, भोपालला   टुरवर होतो. त्यामुळे सारखं कुत्तेकी रोटी ( तंदुरी रोटी) खाणं सुरू होतं. कुत्तेकी रोटी अशासाठी म्हणतो, कारण  ती नेहेमी मैद्याची असते. अन एकदा थंड झाली की अक्षरशः रबर होते.(अर्थात कॉपर  चिमणी सारखे  अपवाद वगळता – कारण तिथे कणीक वापरतात रोटी साठी) शेवटच्या दिवशी तर इतका वैतागलो, की सरळ  घटीया ( हे एका जागेचं नांव आहे , उज्जैन पासुन १०-१५ किमी असेल) ला एका लहानशा धाब्यावर चक्क तवा चपाती आणि साधं वरण ( दाल फ्राय नाही.. साधं वरण..)  जेवलॊ.आता गेली कित्येक वर्ष म्हणजे  २५ वर्षापेक्षा  पेक्षा जास्त  दिवस झालेत, कामानिमित्त  सारखं फिरती  वर जावं लागत, पण इतका होमसिक कधीच झालो नव्हतो.आज जेंव्हा  इंदौरहुन घरी आल्यावर साधं वरण भात  तप जेंव्हा लिंबु पिळून खाल्ला, तेंव्हा जरा बरं वाटलं.

चहाचा साखरेचा चमचा

डबा पुराण खुप मोठं आहे. लहानपणी तेल आणायचं तर घरुन कडी चा डबा ( बरणी ) घेउन जावी लागायची.तो वाणी आधी त्या बरणी ( की भरणी हो??) चं वजन करायचा तुरी किंवा एखादं धान्य घालुन आणि मग तेल मोजायचा. तेलाचे प्लास्टीकचे डबे मिळत नव्हते पुर्वी.

चहा साखरेचे डबे पण आवळे जावळे असायचे . शेजारी शेजारी ठेवले की त्यापैकी कुठल्या डब्यात  चहा अन कुठल्या डब्यात साखर आहे, ते केवळ आईच सांगू शकायची. नंतर मात्र आमच्या घरी एक डबा किंचित मोठा आणला, तेंव्हा तो साखरेचा हे ओळखता यायला लागले . चहाच्या डब्यातला तो किलवरच्या आकाराचा चमचा , मी अगदी लहान असतांना पासूनचा अजुनही आमच्या घरी वापरात आहे. इथे फोटो देतोय बघा.

रिकामा डबा सापडला की डबा ऐस पैस खेळायला तर आम्हाला खूप आवडायचं. घरातुन आईचा ओरडा ऐकू येई पर्यंत खेळणं सुरू रहायचं.  एकदा तर त्या पायनॅपल स्लाइसच्या डब्याची कडा जरा तुटलेली होती, तेंव्हा बंड्याच्या पायाला जखम झाली होती त्या डब्याने. काही गोष्टी कशा आपण विसरू शकत नाही, तशीच ही पण सुमारे ४० वर्ष जुनी घटना.. बंड्याच्या पायातून रक्त आलं होतं ती..आणि मग त्याच्या आईने त्यालाच मस्त धुतला होता, कशाला गेला होतास असे रानटी खेळ खेळायला म्हणून!!

शाळेत अजुन एक डबा महत्वाचा असायचा. तो म्हणजे कम्पास बॉक्स. नेहेमी हरवला जायचा. आजीचा कुंकवाचा डबा  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/10/27/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80/)तर नेहेमीच खुणावत रहायचा, त्यात काय इस्टेट आहे ती हाताळायची खूप इच्छा होती…

चक्की वर दळण आणण्याचा एक मोठा ऍल्युमिनियम चा डबा होता. तो सायकलला मागे लाउन कित्तेक वर्ष दळण आणलेलं आठवतं. दळण आणणं हे घरातल्या मोठ्या मुलाचं काम असायचं- नुसता वैताग असतो दळण आणणं म्हणजे…. शेवटी शेवटी तर तो डबा बघितला की संताप यायला लागला होता.

लहानपणी  आम्ही चप्पल  वापरायचो.  जेंव्हा पहिल्यांदा बूट घेतले, तेंव्हा त्याचा डबा कित्तेक दिवस सांभाळून ठेवला होता, त्या डब्यात मी पत्रं  (?) वगैरे  आणि  त्या खाली  मासिकं ( ???)  लपवून ठेवत असे…

सगळ्यात महत्वाचा म्हणजे पाण्याचा डबा. पंधरा लीटरचा  तेलाचा डबा मिळायचा तो रिकामा झाला की  त्याचा वरचा भाग /तोंड पुर्ण मोकळे करून मग एक लाकडी दांडा आडवा  लावून ( हॅंडल म्हणून ) पाणी भरायला वापरायचो आम्ही.मी लहान असतांना यवतमाळला पाण्याचा खूप दुष्काळ होता. घरच्या विहिरीला पाणी नेहेमीच असायचं, पण ते  रहाटाने काढून भरावे लागायचे.  पाणी भरायला एक मोठा रांजण असायचा.  हा पंधरा लिटरचा डबा एकदा रहाटाला बांधला की चार पाच चकरा मधे काम संपायचं.दोन डबे दोन हातात घेतले की सरळ ३० लीटर पाणी भरलं जायचं एकदम. मोठा ड्रम पण  होता दोनशे लीटरचा.. तो आणि रांजण भरला की झालं. तेंव्हा नळ नव्हते आणि आम्हाला पुर्णपणे अवलंबून रहावे लागायचे विहिरीवरच.

मिल्क मेडचा डबा .  त्या डब्याने तर नुसता वात आणला होता..त्यावर तर एक पोस्ट आधीच लिहिलंय पा्सष्टावी कला ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/04/14/%E0%A5%AC%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE/) म्हणून. अशा अनेक आठवणी आहेत डब्यांच्या पण आता थांबवतो हे डबा पुराण..

कन्फेशन….. (अनटोल्ड )

Written by  on September 16, 2010

’ती’च्या घरी ’ती’

बाल्कनी मधे ती बसली होती.. समोर लावल्या रंगीत दिव्यांच्या  माळेतले  दिवे एका पाठोपाठ धावत होते. ती बसली होती एका रॉकिंग चेअर मधे… ती चेअर हलकेच हलके हलके मागे पुढे होत होती. समोर लांब  दोऱ्याला लटकला आकाश कंदिल  माग  पुढे हेलकावे खात होता… त्याची सावली मागे पुढे होत होती.. तिचं लक्षं गेलं समोर भिंतीवर लावून ठेवलेल्या ट्रॉफिज कडे.

त्यातली ती लाइफ टाइम अचिव्हमेंट ऍवॉर्ड वाली ट्रॉफी तिच्या नजरेला खुपत होती. ही ट्रॉफी स्वीकारणं म्हणजे आपलं करिअर संपलं, आपण आपल्या करिअरच्या अत्युच्च पातळीवर पोहोचलो. म्हणजे…………….? म्हातारी झाली की काय मी?????? चेहेरा बघा माझा, एखाद्या सोळा वर्षाची मुलगी पण लाजेल मला बघून. माझी फिगर बघा .. इतकी मेंटेन केलेली आहे, योगा करण्यात कधीच खंड पडु दिला नाही.  जिममधे पण रोज जाते.

खोटं कशाला, अगदी खरं सांगते,  अजुन ही माझे पहिल्या लग्नातले  कपडे मला घट्ट करुन घालावे लागतात.. एकाही ब्लाऊजची शिवण उसवुन बाह्या किंवा अंगात मोठं करावं लागत नाही,उलट्र प्रत्येक ब्लाउझ ऑल्टर करावे लागते. मी अगदी आहे तशी आहे, माफ करा.. आहे तशी म्हणण्यापेक्षा मी होती त्यापेक्षा पण सुंदर दिसते. कांही लोकं लिहितात की हिचं शापित सौंदर्य आहे…. पण आपण कोणाचं तोंड थोडी धरु शकतो ?तसं फेस लिफ्टिंग करुन घेतलय , पण ते तर सगळेच करुन घेतात.

हा एकटेपणा खायला उठतोय. इतके पुरुष आले आयुष्यात, पण या आयुष्यातल्या सांझ वेळी मात्र मी एकटीच.. त्याने पण साथ सोडली. असं वाटलं होतं की तो तरी साथ देईल. पण शेवटी ती निघाली ना खमकी.. आणि तिनेच त्याला फितवलं.. चांगला प्रेमात पडला होता… म्हणायचा, की तुझ्या साठी मी सगळं जग सोडून देईन, पण मेल्याने आपली बायको पण नाही सोडली. तो बसलाय मस्त पैकी मुला/मुलीच्या मधे, नातवंड खेळवत… नाहीतर मी… इथे .. एकटी .. त्याने केलेली बेवफाई आठवत….

दिवाळी पेक्षा मला होळी जास्त आवडते, कारण होळी म्हंटलं की माझं त्याच्या बरोबर शुट केलेलं गाणं सगळीकडे वाजत असतं. कदाचित ते गाणं माझ्या खऱ्या आयुष्याशी साधर्म्य साधणारं असेल म्हणून आवडत असावं….

माझं आयुष्यच अशा कॉंट्रोव्हर्सी मधेच गेलंय. काय करणार? माझ्या कांही समवयस्क नट्या आता पॉलिटिक्स मधे गेल्या आहेत. हे भारतीय पॉलिटिक्स पण मोठं मजेशीर आहे. एक नटी जिने कमीतकमी ५ दा तरी आत्महत्येचा प्रयत्न केलाय ती पण निवडुन देऊ शकतात? कसं काय बुवा?? हं….सहज शक्य आहे.. आठवा.. गोविंद.. गोविंद…..!!!

मी इतकी ’खुबसुरत’ पण एकटी… आजही…….समोरचा समुद्र, खारा वारा, दुरवर दिसणारं क्षितीज.. जमीनीशी भेटणारं.. दुर कुठे तरी, मी पण वेड्यासारखी धावत होती क्षितिजाला भेटायला…………. मी माझं आयुष्य घालवलं मृगजळामागे धावणाऱ्या हरणाप्रमाणे….
—————————————————————————————————————————————–

’त्या’च्या घरची ’ती’

तो आपला विग लाउन टिव्ही समोर बसला होता. टिव्ही वर त्याचाच एक सिनेमा सुरु होता. नटी नेमकी मेली ’ती’च होती. तिला पडद्यावर जरी पाहिलं तरीही मस्तकात तिडीक उठते…

एका इंटेलेक्चुअल  सुसंस्कृत बापाचा मुलगा म्हणून जेंव्हा तो भेटला तेंव्हा त्याच्या  त्याने यशस्वी अभिनेता म्हणून नाव कमावलं  नव्हतं तरी पण   त्याच्या प्रेमात पडले. माझ्या मागे तेव्हाचे बरेचसे यशस्वी कलाकार लागले होते लग्न करायला पण या   अयशस्वी अभिनेत्त्यांच्या यादीमधे असलेल्यावर माझं मन जडलं होतं आणि म्हणूनच मी सगळ्यांना नकार दिला….तेंव्हा  मी मात्र होते एक यशस्वी हिट चित्रपट देणारी अभिनेत्री! हे लिहिण्याचं कारण एवढंच की मी त्याच्या साठी किती त्याग   केला म्हणून सांगणं नाही.. तर आमचं एकमेकांवर खरं प्रेम होतं हे सांगायला लिहिलं सगळं..

एका सुसंस्कारित आणि कवी लेखकाच्या कुटूंबातून आलेला तो ,एके काळचा आपल्या व्हॅल्युज ला पैशापेक्षा जास्त महत्त्व देणारा तो, सिनेमाच्या सेट वर झालेल्या अपघातानंतर मृत्यू- उशी झुंज देणारा तो – आणि …देश भर त्याच्या लवकर बऱ्या होण्याची प्रार्थना करणारे सर्वधर्मीय लोकं… डोळे उगिच भरुन आलेताणि तिचे …. नंतर जेंव्हा आपणच काढलेली एंटरटेनमेंट कंपनी गाळात गेली तेंव्हा नैराश्यात बुडालेला ’तो’, इलेक्षन मधे उभा राहुन निवडुन आलेला तो, नंतर थोडा प्रॉब्लेम आल्याबरोबर घाबरुन गेलेला तो, आयुष्यभराची पुंजी ला्वून सुरु केलेली कंपनी गाळात गेली तेंव्हा एखाद्या मॅनेजरने कारकुनाचे काम करावे, तसे टिव्ही वर काम करुन पैसे कमावणारा तो…..प्रत्येक वेळी त्याच्या शेजारी मी उभी होते.. खंबीर पणे..जुहू पासून सिध्दीविनायकाच्या मंदीरा पर्यंत त्याच्या वेल बिइंगची प्रार्थना करित अनवाणी चालत जाणारी… किती तरी गोष्टी आठवल्या एकदम.

सर्र्रकन डोळ्यापुढे चेस बोरड नजरेसमोरुन सरकला.हो आयुष्याचा चेस बोर्डंच.. सारीपाट जुना झालाय. माझ्या आयुष्यात आलेले प्रत्येक पात्र म्हणजे चेस बोर्डवरच्या सोंगटी सारखे होते. मी एकटी वजीर.. राजाला सांभाळणारी. कोणी राजाला चेक देउन चेक मेट करु नये म्हणून डोळ्यात तेल घालुन जपणारी.म्हणूनच म्हणते माझं आयुष्य म्हणजे चेस चा खेळच आहे. हा राजा कधीही एक घर चालतो पण कुठल्या दिशेला ते सांगता येत नाही.

त्याच्या आयुष्याच्या चेस बोर्ड वर तिला दुसरी “ती” ने पण आपलं स्थान पटकावलं होतं. कायम घोड्यासारखी अडीच घरं व्यापून चालणारी. प्रत्येक वेळेस घोडा जसं आठ घरं ब्लॉक करतो तशीच हिची पण मेंटॅलिटी. सुरुवातीला जेंव्हा तिच्याबद्दल कळलं , तेंव्हा खोटंच वाटलं. पण नंतर लक्षात आलं की ती गोष्ट अगदीच खोटी नसावी. खेळतांना झालेल्या एका चुकीमुळे राजा चेस बोर्डच्या मध्य भागी आला होता , तेंव्हाच तिने घोड्याच्या चालीने आठ घरं व्यापून चेक दिला होता.मला मात्र काय करावं हेच समजत नव्हतं. सगळीकडे तिच चर्चा होती, पेपर मधे पण तेच छापून यायचं.

मी स्वतः तर त्याच्या साठी ’अभिमान’ नको म्हणून काम करणं बंद केलं होतं. माझं आयुष्य त्याच्याच करिअरशी निगडीत करुन ठेवलं होतं. प्रत्येक ठिकाणी मीच माघार घेतली होती .पण इतकं सगळं करुन ’ती’ने कावा साधलाच.शेवटी ह्या सगळ्यातून बाहेर कसं यायचं?? मी एक प्यादं (   आमची मुलं) पुढे सरकवली.. आणि याच चालीमुळे चेक मेट वाचला आणि घोड्याला मागे फिरावं लागलं होतं.

———————————————————————————————————————————————————-

परवाच्याच फिल्म फेअर अवॉर्ड मधे दिसली होती ती. तशीच सुंदर.. आणि तिच्या कडे तिरक्या नजरेने पाहिले.. ती रंगवलेला चेहेरा घेउन खोटं हसु चेहेऱ्यावर वागवत कांजिवरम सिल्क च्या साडीच्य़ा पदराशी चाळा करित बसली होती…. स्टेजवरच्या शुन्यात नजर लाउन.. इतक्या सगळ्यांच्या मधे असूनही एकटी……..

कधी तिच्या कडे तर कधी आपल्या फिगरकडे नजर जात होती, छे:.. कसली कम्पॅरिझन होऊच शकत नाही. कुठे ती अन कुठे मी!!पण लक्षात आलं, की जरी ती माझ्यापेक्षा सुंदर असली तरीही जिंकले ’मी’, कारण माझ्या शेजारी ’तो’ होता , फक्त माझाच.. आणि अधिकाराने त्याच्या दंडात  बोटं घट्टं रुतवले..आणि त्याच्या खांद्यावर तृप्तपणे डोकं टेकवलं..

माझं बॅचलर लाइफ…(५)

Written by  on September 13, 2010

सोन्याच्या खाणी.. मॅकेनाझ गोल्ड आठवलं का? छेः.. तशी नसते गोल्ड माइन्स. आपल्या डॊक्यात कसल्या भन्नाट आयडीयाज असतात ना एखाद्या गोष्टी बद्दल?

मी दोन माईन अगदी जव्ळून पाहिल्या आहेत. एक म्हणजे चिकरगुंटा (अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स)  , आणि दुसरी म्हणजे गदग. खरं तर गदग ची माइन फार जुनी . अगदी ब्रिटीशांच्या काळापासून सुरू असलेली माईन ही त्यांनी जातांना बंद केली होती, पण एम ई सी एल ने  ही माईन परत सुरू  करण्यासाठी  सरकारला मदत केली.

एमईसीएल ही कंपनी मुख्यत्वे करुन  जमिनीतला स्टॅटा समजण्यासाठी जमिनीला ड्रिलींग करुन एक संपुर्ण कोअर सॅंपल बाहेर काढते.     नाही….या करता वापरली जाणारी मशिन ही , तुम्ही जी  पाण्याकरता बोअरिंग करण्याची  कॉम्प्रेसर ड्रिव्हन मशिन पहाता, तशी नसते ! ही कोअर ड्रीलिंग मशिन खूपच  वेगळी असते. कारणं उद्देश हा जमिनीला भोक पाडणं नसतो, तर त्यातुन जमिनीचा सॅंपल बाहेर काढणं हा असतो.

तुम्ही जेंव्हा ड्रिल करता तेंव्हा सॅंपल  कोअर काढतात. मग त्याचा सॅंपल स्टडी करुन जमिनिखाली काय असेल ते ठरवतात. एमईसिएल ही  कोअर सॅंपल काढुन , त्याचं ऍनॅलिसिस करुन देते. ड्रीलिंग करतांना कोअर तुटू नये  म्हणून मड पंप वापरला जातो. म्हणजे काय, तर  ड्रिल ला थंड करणे  आणि कोअर सेव्हिंग साठी स्पेशल मातीचं मिश्रण करुन ते ड्रीलिंग करतांना  इंजेक्ट करतात. हे मिश्रण त्या कोअरला एक प्रकारे कोटींग फॉर्म करुन प्रोटेक्ट करते. असो.. तो एक पुर्ण वेगळाच विषय आहे.

गदग गोल्ड  माइन्स ही एक फार जुनी माइन्स. अगदी ब्रिटीशांच्या काळपासुन. ब्रिटीश जेंव्हा भारत सोडून गेले, तेंव्हा ही माइन्स बंद करण्यात आली. आता पुन्हा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले शासनाने.  या माइन मधे सोनं हे अगदी कमी प्रमाणात मिळतं. दोन टन ओअर क्रश केला की फारतर .२ ग्राम सोनं निघतं. यावरून कल्पना येइल . असं म्हणतात , की पूर्वीच्या काळी सोन्याचे तुकडे सापडायचे गदग ला- खरं खोटं देव जाणे..

इथे ऍक्चुअल माइन मधे काम सुरु झालेलं होतं. सोन्याच्या माइन्स मधे अजिबात सिक्युरिटी वगैरे नव्हती. मला एक दगड खाली पडलेला दिसला. त्यावर पिवळा धमक मेटलचा कण चकाकत होता. मला वाटलं की तो सोन्याचा कण आहे म्हणून. तर माझ्या बरोबर असलेला एक अधिकारी म्हणाला, हे सोनं नाही.. याला फूल्स गोल्ड म्हणतात. हे खरं तर पायराइट्स आहेत . हे अगदी मुबलक प्रमाणात दिसतात. पण यांच्यामधे सोन्याचा अंश नसतो. तरी पण तो पिस हातातच धरुन ठेवला , म्हंटलं, सोव्हेनिअर म्हणुन नेतो बरोबर. आणि घरी नेऊन सगळ्यांना उल्लू बनवतो.

चिकरगुंटा साइटला माझा सख्खा मामेभाउ अशोक देशपांडे होता. त्याच्याच रुमवर उतरलो होतो साइटवर. त्या रुमला रुम म्हणायचं का हा खरं तर प्रश्नच होता. जिओलॉजिस्ट लोकांचं आयुष्य खरंच खूप खडतर असतं. नंतर तो हा जॉब सोडून साऊथ अमेरिकेला गेला.

ही साइट कोलार च्या अगदी लागुनच होती.  कोलार माइन्स अंडरग्राउंड आहे आणि आता माइन फार खोल गेल्यामुळे  माइनिंग करणे फार एक्सपेन्सिव्ह होतंय, आणि म्हणुन भारत गोल्ड माइन्स चे लोकं इथे  अजुन कुठे सोनं सापडतंय का ते शोधताहेत. अडरग्राउंड माइन्सला जातांना प्रोटेक्टिव्ह गिअर्स म्हणजे, हेल्मेट, माइनिंग शु, बॅटरी आणि हेल्मेटवरचा टॉर्च  हे मस्ट असतात. माझ्या कडे शुज नव्हते, म्हणून एका इंजिनिअरने त्याचे शुज काढून मला दिले. साईझ थोडा लहान होता, पण ठीक आहे.. मॅनेजेबल होता. केजिएफ च्या माइन्स मधे मी आंत जाउन आलो. खरंच खूप भितीदायक वाटते. ( बरेच लोकं मान्य करणार नाहीत, कदाचित आपला मॅचो नेस दाखवायला  म्हणून! पण खरी परिस्थिती म्हणजे जर तुम्हाला सवय नसेल तर भीती वाटतेच) तसाही, आपण जमिनीखाली आहोत, ह्या कल्पनेनेच थरकाप उडतो.. आणि इतक्या खोल??? शेवटी सिनेमांचा इम्पॅक्ट पण असतोच ना! सोन्याच्या खाणीत जाउन पण सोनं कांही दिसलं नाही.. 😦

टी गार्डन्स मधे असतांना कालिमपॉंग जवळच होतो. एका गार्डनमधे .. नांव विसरलो आता. त्या काळी सेल फोन नव्हता. त्या मुळे  जो पर्यंत मी ऑफिसमधे अथवा बॉस शी कॉंटॅक्ट करत नसे , तो पर्यंत कोणाशीही कसलाही संबंध नाही. बरं एस टी डी पण इतकं कॉमन नव्हतं. त्यामुळे फोन पण  लावणे सोपं नव्हतं.ट्रंक कॉल बुक करावा लागायचा.  ट्रंक कॉल लावल्यावर तो थ्रु होईल याची खात्री नसायची. म्हणजे असं, की फोन बुक करुन बसायचं एखादं पुस्तक वाचत. तुमचं नशिबच असेल तर थ्रु होईल तो कॉल, नाही तर बसा वाट बघत.

इथे ऑफिसमधून निघतांना कस्टमर्सची लिस्ट दिलेली असायची. आणि सिक्वेन्स पण सांगितला जायचा- जॉग्रोफिकली सोपं पडावं म्हणून. त्यामुळे कांही काम पडलं तर ऑफिसला अंदाज असायचा की कुठे असेल हा सर्व्हिस इंजिनिअर म्हणून.. तर, काही काम निघालं की मग ते टेलिग्राम पाठवायचे  . बहुतेक वेळेस पुढचं डेस्टीनेशन त्या गार्डन  मॅनेजरला माहिती असायचं. ( टेन्टेटिव्हली कुठे असेल ते अझ्युम करुन टेलिग्राम पाठवायचे ऑफिसमधून) आणि जर एखाद्या पत्त्यावर टेलिग्राम पोहोचला , आणि तुम्ही पुढच्या डेस्टीनेशनला गेलेले असाल, तर तो मॅनेजर अगदी स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून टेलिग्राम पोहोचवायचा आमच्या पर्यंत.

आकस्मितपणे एक टेलिग्राम आला की मला भुतानला एका इंडीयन मिल्ट्रीच्या अखत्यारीत असलेले एक इन्स्टॉलेशन बघायला जायचं आहे. भारत आणि चिन मधले कनेक्शन असलेले एक ईंडोभुतान मायक्रोवेव्ह प्रोजेक्ट — म्हणजे, एक मायक्रोवेव्ह टॉवर इन्स्टॉल केले होते, साधारण १७००० फुट समुद्र सपाटीच्या वर. वर जायला फक्त चॉपर्स.  टेम्परेचर सब झिरो १० ते २० कितीही असू शकायचं. तर तिथे एक  त्या क्लिफ वर एक जनसेट लावलेला होता. त्याला संपुर्णपणे रेडिओ कंट्रोल्ड सिस्टिम होती. म्हणजे तो सेट त्या क्लिफ वर न जाता खालूनच सुरू करता यायचा, किंवा बंद करता यायचा. लोड चेंज ओव्हर पण ऍटोमॅटीक होतं.  आता वाचायला खुप साध आणि सोपं वाटतंय.. पण त्या काळी हे सगळं म्हणजे अगदी स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी होती. पॅनल मधे बरीच इलेक्ट्रॉनिक कार्ड्स.. आम्हाला फक्त कार्ड बदलणं इतकंच  येत होतं. हा अनुभव अगदी लक्षात राहिला तो थंडी मुळे. 🙂

जग किती लवकर बदलतं नाही? सॅटेलाइट कनेक्टिव्हीटी, किंवा तत्सम गोष्टी वापरुन, आज भारतामधून अमेरिकेतील एखाद्या ठिकाणची मशिनरी इंटरनेट च्या थ्रु कंट्रोल करणं पण अगदी सोपं आहे. इतकं सोपं की माझ्या मित्राच्या मुलाने इंजिनिअरींग च्या फायनल इयरला यावर प्रोजेक्ट केलं होतं. 🙂

टी गार्डनचं काम झालं की मग मी कलकत्याला परत जात असे. कलकत्याचं महाराष्ट्र मंडळ, अगदी मस्त आहे . रहाण्याची आणि जेवण्याची सोय अगदी उत्क्रुष्ट आहे. तिथे पण माझ्या अगदी जवळच्या ओळखीचे कुलकर्णी रहायचे. त्यामुळे  थोडं ऍट होम फिल व्हायचं. एक दिवाळी मी तिथेच होतो. मला सुटी न मिळाल्यामुळे मला कलकत्यालाच रहावं लागलं होतं. खरं तर बॅचलर माणसाला घरी काय आणि कुठे बाहेर काय- काहीच फरक पडत नाही. पण भाउ बिजेला मात्र घरची आठवण यायची.

दिवाळीच्या दिवशी  महाराष्ट्र  मंडळात अगदी अभ्यंग स्नानासाठी उटणं , नंतर फराळासाठी चकली, चिवडा, वडी आणि इतर बरेच पदार्थ होते. नंतर जेवणातही अगदी घरच्या प्रमाणे.. आणि आग्रह करुन  वाढणारे लोकं.. खरंच .. मी त्यांनी केलेली सरबराई कधीच विसरू शकत नाही. बघा  ना.. आता २५ वर्षानंतरही आठवण आहे..  🙂

नागालॅंड साइडला फक्त एकदाच जाणं झालं . नंतर पुन्हा कधीच गेलो नाही. तिथे गेल्यावर एक गोष्ट लक्षात आली की राज्य भाषा इंग्लिश असल्यामुळे बहुतेक सगळे लोकं इंग्लिश अगदी चांगल्या तऱ्हेने बोलू शकतात. इथे नॅचरल गॅस वर चालणारे जनरेटर्स सप्लाय केले होते. या भागात प्लायवुड मॅन्युफ़ॅक्चरिंगच्या पण ्खूप इंडस्ट्रीज होत्या.  आसामला बहुतेक बिझिनेसमन्स मारवाडी असायचे. तशीही खाण्यापिण्याची खूपच आबाळ व्हायची. हॉटेलमधल्या मेनू कार्डमधे पिजन फ्राय , किंवा पिजन करी अगदी बहुतेक ठिकाणी दिसते.

बऱ्याच लोकांना निरनिराळ्या प्राण्यांचं किंवा पक्षाचं मांस खाण्याची क्रेझ असते. परवाचीच गोष्टं, अहमदाबादला गेलो असता, एका मित्राने ऑफर दिली की स्पेशल (हरणाचे) मटन आहे .. चल खायला.. पण म्हंटलं की डायटवर आहे म्हणून रेड मिट खात नाही, आणि टाळलं. बरं लोकांना, हे असं खायची आवड असतेच, पण आपली पोहोच किती आहे हे दाखवायला म्हणून खायला घालायला पण आवडतं. असो..तर काय सांगत होतो, नागालॅंडला असतांना एका हॉटेलला गेलो. अगदी लहानसं हॉटेल.. त्या प्लायवुड फॅक्टरी जवळचं. तिथे जेवायला नेलं मला मेंटेनन्स इंजिनिअरने. ताटामधे खुप मोठा भात, शेजारी कसली तरी करी.. आणि भाता खाली लपलेला मांसाचा एक तुकडा..  जेवण झालं, मग त्याला विचारलं.. ( आणि मूर्ख पणा केला.. कशाला विचारायचं एकदा खाणं झाल्यावर ? पण नाही, जास्त बोलायची आवड नां?) ये कोनसा मिट था? जरा अलगही लग रहा था.. तर म्हणे ये ’जमिन का फिश’ है. माझ्या नजरेतलं प्रश्न चिन्ह बहुतेक त्याला समजलं होतं. त्याने अजुन एक्स्प्लेन केलं, ये स्नेक है……आणि मला एकदम मळमळणं सुरु झालं.. केंव्हा एकदा सगळं खाल्लेलं बाहेर काढतो असं झालं..शेवटी उलटी केली आणि मग दिवसभर तसाच उपाशी राहिलो. नंतरचे दोन दिवस पण जेवायला बसलो, की मळमळ सुरु व्हायची.

ही गोष्टं जेंव्हा माझ्या मित्राला सांगितली, तर म्हणाला, तू तर लकी आहेस, की तुला डेलिकसी म्हणुन कुत्रा नाही खाउ घातला त्या लोकांनी.. मी बेशुध्दंच पडायचा बाकी होतो. त्याने सांगितले, की इथे एक पद्धत आहे. एखाद्या कुत्र्याला तिन दिवस उपाशी ठेवतात, ( त्याचं आतड साफ व्हावं म्हणून) नंतर एक दिवस त्याला बासमती भात खाउ घालतात. आणि नंतर काही वेळाने त्याला तो भात डायजेस्ट होण्यापूर्वी  हेड ऑफ करतात. नंतर ,  त्याच्या पोटातला भात हा नंतर कांही कुकिंग प्रोसेसेस करुन एक डेलिकसी म्हणुन खाल्ला जातो.  झालं, नंतर तर मी तिथे असे पर्यंत भात खाणं पण बंद केलं होतं. फक्त  ब्रेड आणी बिस्किट्स वर दिवस काढले होते.  तेंव्हापासून अगदी पक्कं लक्षात ठेवलं आहे, की कुठेही गेलॊ तरी आधी कुठलं मीट आहे ते विचारायचं आणि नंतरच खायचं.