सरदारजी & भिकारी

Written by  on May 29, 2010

गेले ३ दिवस एकटाच घरी होतो. सौ. गेली आहे लग्नाला. पण आज सकाळपासूनच जरा धावपळ सुरू झाली आहे. काका आणि काकू आज अमरावतीहुन आलेत. ती केसरीची युरोप टूर आहे ना .. लिल चॅम्प्स सोबत , त्या मधे त्यांनी बुक केलंय. त्या साठी ते अमरावतीहुन आजच आले. सकाळच्या ट्रेनची येण्याची नक्की वेळ माहिती नव्हती. काकांचा जेंव्हा अमरावतीहुन फोन आला होता ,म्हणाले कुठे उतरु? आता वय ७३ च्या आसपास झाल्यामुळे मुंबईला यायचं म्हट्लं की त्यांना जरा टेन्शनंच येतं. म्हणुन त्यांना सांगितलं की तुम्ही इथे दादरलाच उतरा म्हणजे मला तुम्हाला घ्यायला येता येइल.

सकाळची जुनी वेळ आठवत होती ट्रेनची. बरेच दिवसांत नागपूर हून कोणीच न आल्यामुळे नविन वेळ माहिती नव्हती. पुर्वी ही ट्रेन नागपूरहून सुटायची , पण नंतर ही ट्रेन गोंदिया ते मुंबई करण्यात आलेली आहे. बरं नेट वर चेक करु म्हंट्लं तर ,नेट पण बंद.. ब्रॉड बॅंड कर्टसी एमटीएनएल ! सकाळचा ४ वाजताचा वेक-अप कॉल लाउन झोपलॊ.

४ वाजता उठल्यावर मग लवकर लवकर आटोपून दादरला निघालो, तेवढ्यात फोन वाजला. फोन काकांचा होता. म्हणाले, ट्रेन अराउंड ७ वाजता पोहोचेल. म्हट्ल ठीक आहे आणि पुन्हा झोपलो- ते ६ चा अलार्म लावून. सकाळच्या वेळी माझं घर ते दादर अंतर पार करायला अर्धा तास पुरतो. शिवसेना भवनाचा सिग्नल बंद होता, पण लेफ्ट टर्न घ्यायचा म्हणून, सिग्नलकडे दुर्लक्ष करुन वळलो, तर समोर ट्राफिक पोलीस उभा!!

साहेब, गाडी साईटीला घ्या… मुकाट्याने गाडी साइडला लावली, त्याला म्हंटलं, काय ते लवकर आटॊप… तर म्हणे कायद्याने जेवढा वेळ लागेल, तेवढा लागेलच.. समहाऊ, कसंतरी करुन त्याला रिक्वेस्ट करुन म्हट्लं की माझे काका यायचे आहेत, तेंव्हा हवी असेल तर गाडी इथेच ठेऊन मी टॅक्सिनी जातो. गाडी नंतर घेउन जाईन.. त्याने माझ्याकडे जरा रोखून पाहिलं.. आणि त्याला माझ्या म्हणण्यात ला सिरियसनेस कळला असावा.. म्हणाला.. निघा आता…. मी हलकेच हसलो, आणि निघालो स्टेशनला..मुंबईला मराठीमधे बोललात पोलीस किंवा बस कंडक्टरशी तर तुम्हाला कमी त्रास देतात. माझ्या केस मधे त्याला लक्षात आलं असेल, की मी खरंच सिरियसली बोलतोय, म्हणून.. त्याने मला सोडला असावा.. कुच चाय पानि घेतल्याशिवाय. 🙂

पार्किंगची आजकाल जरा बोंबच असते दादरला. पुर्वी त्या स्वामीनारायण मंदिराच्या गल्लित गाडी पार्क करता यायची पण आज मात्र सगळ्या जागा अगदी फुल्ल्ल होत्या. सरळ दादर टीटी ला जाउन गाडी लावून आलो. तो पर्यंत ७ वाजायला १० मिनिटे कमी होती. स्टेशनला पोहोचलो तर काका येतांना दिसले.. कुली नेहेमी प्रमाणे हुज्जत घालत होता. १०० रुपये मागत होता, दोन सुटकेस आणि दोन टॊट बॅग्ज साठी.शेजारीच नेहेमी लोकांना त्रास देणारा टॅक्सी वाला सरदार पण उभा होता.

त्या सरदारने मला पाहिले आणि एकदम तोंड चुकवून पळून गेला. तो सरदारजी मला पाहून का पळून गेला? एक लहानसा प्रसंग आहे दोन वर्षांपूर्वीचा…. त्या सरदार टॅक्सीवाल्याने एकदा माझ्या वडिलांना दादरहुन मालाडला आणले होते. नेहेमी २२० ते २४० रु होतात. पण तो ३५० रुपये मागत होता. वडील काढून देणार तेवढ्यात मी खाली आलो. आणि मिटर बघितलं. मिटरप्रमाणे पण ३४० रुपये होत होते. सरदारला म्हंटलं, की तुम्हारा मिटर खराब है.. यहां तक २२० रु होता है.माझा कॉन्फिडन्स बघुन त्याला लक्षात आलं की मला सगळं माहिती आहे म्हणून..तो उगाच वाद घालु लागला.. सेल फोन काढून पोलिसांना फोन करणार तर तो म्हणाला, की जाने दो साब ३०० दे देना.

मी त्या सरदारला म्हणालो. मैने पुरा भारत देखा है, तुम्हारा पुरा पंजाब घुमके आया हूं, लेकीन आजतक कभीकिसी सरदार कॊ भिकारी की तरह पैसा मांगते हुए नहीं देखा था. आज तुम्हे देखा.. और मै धन्य हो गया! तुम्हारे लिये भी बडे फक्र की बात है, की तुम भारत देशके पहले सरदार भिकारी हो.. मै तुम्हारा फोटॊ निकालता हूं फिर तुम्हे ३०० रुपया दुंगा. तुम्हारा फोटॊ मै इंटर्नेट पे डाल दुंगा, ताकी सारी दुनिया देखे भिकारी सरदार कैसे होता है..

तो सरदार एकदम ओशाळला आणि दोनशे रुपये घेउन गेला होता त्या वेळेस.. पण एक बाकी आहे, मी आज पर्यंत कधी सरदार ला भिकाऱ्या प्रमाणे भीक मागताना पाहिलेलं नाही. अतिशय अंग मेहेनतीचं काम करू शकणारी जमात आहे ही. इतकं फिरलो पण कुठे भीक मागताना दिसला नाही सरदारजी.

एखाद्या सरदारने बिझिनेस सुरू केल्यावर त्याने एकच काम करायचं असते, रेग्युलरली गुरुद्वारात जायचं आणि थोडी कार सेवा करायची. एकदा इतर सरदार लोकांना कळलं की हा एक नवीन सरदार आहे, ते बरोबर त्या सरदारला धंद्यामधे मदत करतात.

आता मराठी माणुस.. आणि तो पण धंदेवाला.. मी दोन दिवसांपुर्वी आयडियल बुक डेपो ला गेलो होतो. वेळ दुपारची . दुकानाचे शटर्स खाली केलेले होते. पण एक शटर उघडं होतं एक बाई तिथे बाहेर बसून कांही तरी एंट्रीज करित होती. मला तंबी दुराईचं पुस्तकं दोन फुल एक हाफ हवं होतं. लग्नात प्रेझेंट द्यायला. ( मी बहुतेक पुस्तकंच प्रेझेंट देतो लग्नात) . डॉं ब.ना. पुरंदरेंचं शल्य कौशल्य मी कित्येक लोकांना दिलंय लग्नात प्रेझेंट म्हणून..

त्या बाीला म्हणालो, की दोन फुल.. काढुन द्या. तर ती बाईने बोट दाखवलं एका छाडमाड व्यक्तिमत्त्वाच्या एका माणसाकडे, म्हणाली त्यांना सांगा..  मी त्याच्याकडे गेलो, तर तो मी कांही बोलण्यापूर्वीच म्हणाला, ३ नंतर या, आता नाही.. अरे म्हंटलं ऐक तरी जरा. .. पण तो मराठी दुकानदार अगदी पक्का होता. म्हणाला आता लंच टाईम आहे.. आता काहीच मिळणार नाही.. शिव्या घालत तिथुन सरळ बाहेर पडलॊ आणि एक रिकामं पाकीट घेतलं हातात घालायला.. मराठी माणसा मधला उध्दटपणा… त्या आयडियल वाल्याला अगदी वहाणेने मारावे असे वाटत होते.. पण राग आवरला.. म्हंटलं .. थोडे दिवस थांब, एखादा गुज्जु इथे आला आणि नवीन दुकान उघडलं की तुझ्या दुकानात कोण येतोय….!

आमची पण अमेरिका

Written by  on May 24, 2010

सचीन ला  कॅंपस मधे  नुकतीच एका मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी लागली. इंटरव्ह्युच्या वेळेस त्याला सांगितलं म्हणे, की तुला ऑन साईट जावे लागेल, थोडी भिती वाटत होतीच, कारण सगळं शिक्षण मराठी शाळेतून झाले होते, तेंव्हा अमेरीकेत जायचे काम पडले तर कसे होणार हा प्रश्न मेंदूचा कुरतडून भुगा करत होता.

करायचं काय? इंग्रजी तसं बोलता येत होतंच, इंटरव्ह्यु मधे थोडी इंग्रजी, थोडी हिंदी वापरून वेळ मारून नेली, पण तिकडे कसं होणार? यावरचा जालिम उपाय म्हणून टोरंट वरून बऱ्याच इंग्रजी सिरियल्स आणि सिनेमे डाउनलोड करून सगळ्या सिरियल्स ची पारायणे करणॆ त्याने सुरु केले. इंटरनेट आणि टिव्ही शिवाय दुसरा चांगला गुरु कोणी असूच शकत नाही, हे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे सचीन चे पण मत होतेच. हे सगळं झाल्यावर अमेरिकेत नेमकं काय आहे ते आमचा सचीन शिकला आणि त्याने काही नोट्स पण काढल्या. आता तो नोट्स चा कागद आमच्या हाती लागला, तोच इथे शेअर करतोय.

१) अमेरिकेत  मुलं   फक्त कुठली  बॉल गेम खेळण्यासाठी जातात. एकदा कसंही करून  बॉल गेम म्हणजे अगदी फुटबॉल, बास्केट बॉल, किंवा बेस बॉल. कसंही करून एकदाची मॅच जिंकायची, आणि खेळ म्हणजेच सर्वस्व असते, हे बहुसंख्य मुलांना समजले असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करून खेळ, हशीश, मारीहूना ( स्पॅनिश मधे तसंच म्हणतात ) पॉट  या गोष्टी एंजॉय करण्यासाठीच हायस्कुल असते. ही मुलं म्हणजे पॉपुलर गॅंग , हे नेहेमीच च्युविंगगम चावत इकडे तिकडे उंडारत असतात.
२) जगातले सगळे सिरियल किलर्स फक्त अमेरिकेतच असतात.
३) डिटेक्टिव्ह, सी आय ए / एफ बी आय चे ऑफिसर्स नेहेमी आपल्या भिंती वर सगळ्या व्हिक्टीम्स चे किंवा संशयित आरोपींचे फोटॊ लावून ठेवतात. ऑफिस मधे असले आणि वेळ जात नसला, की ते ह्या फोटोंकडे पहात बसतात.
४) बरेच  गुन्हेगार पण आपल्या  घरच्या भिंतीवर अशीच चित्रं , वर्तमान पत्रातल्या बातम्या लावुन ठेवतात.
५) पोलिस गुन्हेगारांना पकडायला जातांना, आधी दारात उभे राहून मोठ्याने ” एन वाय पी डी’ ओपन द डोअर म्हणून ओरडतात, आणि मग जोरात धडक मारून दार तोडतात. आता ह्या ओरडण्याने आत असलेला आरोपी खिडकितून पळून जाण्याचा प्रयत्न नेहेमीच करतो.
६) रस्त्याने जाता मोठमोठ्याने सायरन वाजवत जातात.
७) एखादा   अभ्यासू आणि हुशार मुलगा  बेसबॉल कॅप्टन किंवा त्यासारख्या एखाद्या टोणग्याचं नेहेमीचं गिऱ्हाइक असतं, त्याला कधी डस्ट बिन मधे फेकणं, तर कधी खुंटीला टांगणे, कधी पैसे हिसकावून घेणे वगैरे प्रकाराने त्रास दिला जातो. पण शेवटी मात्र हाच नर्ड  त्या कॅप्टनच्या गर्लफ्रेंड्चे प्रेम जिंकतो.
८) मुलींना शाळेत जाण्याचे मुख्य उद्देश फक्त चिअरलिडर होऊन मुलांसमोर तोकड्या कपड्यात नाचणे  एवढाच असावा .
९) शाळांमधे प्रॉम नावाचा प्रकार जो असतो, तो सगळ्यात महत्वाचा. या प्रॉम ला चांगली सुंदर मुलगी आपली डेट असावी असे प्रत्येकच मुलाला वाटत असतं, आणि सुंदर मुलींना मात्र कोणाला हो म्हणावं आणि कोणाला नाही हाच प्रश्न असतो. कसंही करून प्रॉम मधे प्रॉम क्विन होणे  आणि शाळेतल्या सगळ्यात हॉट मुलाबरोबर डेट मिळवणे हे ह्या मुलींचे ध्येय असते. प्रॉम किंग किंवा क्विन होणे म्हणजे तर दुग्धशर्करा योग!
९)शाळेत अभ्यास करणाऱ्या मुलांना नर्ड म्हणून हिणवले जाते, अभ्यासाशिवाय इतर काहीच येत नसल्याने ही मुलं सायन्स क्ल्ब. मॅथ्स क्लब , ड्राम क्लब मधे बिझी असतात. पॉप्युलर मुलांना अभ्यास करणे मुर्खपणाचे आहे असे वाटत असल्याने ती   मुलं    अभ्यासाव्यतिरिक्त  इतर एक्स्ट्रॉ करिकुलर ऍक्टीव्हिटी , खेळ, पार्टी, डेटींग या कडेच  जास्त लक्ष देतात.
१०) शाळेत  फक्त स्पोर्ट्स वगैरे शिकवणारे शिक्षकच असतात, आणि तेच वेळ प्रसंगी एखादी मोठी मॅच जिंकून  शाळा बंद होण्यापासून  वाचवतात.
११) अमेरिकेतले आई वडील पण लैच फॉर्वर्ड, शाळेच्या प्रॉम ला मुलगी निघाली,  की रात्रभर आपल्या मित्राबरोबर रहाणार हे माहिती असूनही  सासरी जाणाऱ्या मुली प्रमाणे  दारापर्यंत जाऊन निरोप देतात.
१२) अमेरिकेतले  सगळे फोन  नंबर्स ५५५ आकड्यांपासुन सुरु होतात  .
१३) अमेरिकेत संध्याकाळी बार मधे जाऊन कुठल्याही मुलीला ” कॅन आय बाय यु अ ड्रिंक ” विचारू शकता, तिने हो म्हंटले की तिला दारू पाजुन रुम वर पण नेता येते. ( लैच मज्जा !)
१४) अमेरिकेत ८०टक्के लोकं   फक्त सी आय ए, एफ़ बी आय, एन वाय पी डी, मरीन, सी एस आय, एल ए पिडी वगैरे ठिकाणीच कामं करतात. उरलेले सगळे एक तर समाज विघातक किंवा गुंड वगैरेच असतात.
१५) सगळे एलियन्स  फ़क्त अमेरिकेवर वेळॊवेळी हल्ला करत असतात, पण नशिबाने, अमेरीकेत काही ब्लॅक ऑप्स विभाग आहेत, जे या एलियन्सचा पराभव करतात..
१६)  अमेरिकेत रहाणारे सगळे चिनी किंवा जपानी लोकं  कराटे कुंग फु मधे एक्सपर्ट असतात, आणि त्यांचा आवडीचा छंद म्हणजे ते  गोऱ्या  नर्ड मुलांना   कराटे, कुंगफु, त्वायकांडो वगैरे  शिकवुन  तरबेज करणे.
१७) व्हॅंपायर्स, वेरवुल्फ वगैरे फक्त अमेरिकेतच असतात, आणि झोंबी सुद्धा, तेंव्हा अमेरिकेत जातांना या सगळ्यांवरचा तोडगा म्हणजे हनुमान चालिसा घेऊन जायला विसरायचं नाही.
१८)अमेरिकन सायंटीस्ट नेहेमी काही ना काही तरी प्रयोग करत असतात, आणि एखादा प्रयोग फसला, की त्यातून मग सुपरहिरो ची निर्मिती होती. जसे स्पायडर चावून स्पायडर मॅन हल्क, फॅंटास्टिक फोर वगैरे. कधी तरी प्रयोगात फारच चूक झाली तर सुपर व्हिलन पण तयार होतात अमेरिकेत. ( शेवटी सुपर हिरो बरोबर फाईट करायला कोणी पाहिजे की नाही? )
२५) जगात कुठेही काहीही झाले, तरीही त्या आपत्ती मधून वाचवण्याची जबाबदारी यु एस सरकारची असते, आणि ते लगेच आपली स्पेशल टीम पाठवून जगाला वाचवतात.
२६) व्हिलनचा हातात मिनिटाला ६०० राउंड फायर करणारी मशीनगन असली तरीही नेम चुकतो, आणि हिरो केवळ ९ एम एम च्या पिस्तुलने एक गोळी झाडतो, आणि त्याला मारतो.
२१) तुम्हाला कधी पोलिसांनी अटक केली, की तुम्हाला “फक्त” एकच फोन करण्याची परवानगी असते.
२२) वकील  पर्जरीला खूप घाबरतात आणिं कोर्टात नेहेमी खरेच बोलतात.
२३) अमेरिकन  हिरो पाण्याखाली ५ मिनिटापर्यंत श्वास रोखुन ठेऊ शकतो.
२४) सकाळी उठल्याबरोबर नवरा बायको, किंवा गर्लफ्रेंड चा अगदी टंग किस घेतात. ( मायला, मला तर मळमळतं नुसतं पाहून सुद्धा)
२५) व्हिलन ने फायरींग सुरु केले की पोलिस कारच्या दरवाजामागे लपतात, आणि गोळ्य़ांपासून वाचतात.कारला दरवाजे केवळ ह्याच कारणासाठी दिले असावेत.  अगदी ५० कॅलिबरच्या मशीनगनने गोळ्या झाडल्या तरीपण कार मधे बसलेल्या हिरोला काही होत नाही. ५० एम एम ची बुलेट पण कारचा ३ एम एम चा पत्रा फाडू शकत नाही.
२६) अमेरिकेतल्या कुठल्याही कारला ( बी एम डब्लु, मर्सिडीज, फेरारी वगैरे महागड्या कारला सुद्धा) स्टेरींग लॉक नसते, त्यामुळे हिरो कधीही कुठल्याही कारला डॅशबोर्ड खालच्या दोन वायर्स शॉर्ट करून चालू करू शकतो .
२७) निग्रो लोकं केवळ गाणी, बॅंड, बास्केट बॉल मधेच इंटरेस्टेड असतात. एकतर ते खेळत तरी असतात, किंवा ड्रग चा व्यवसाय तरी करत असतात, किंवा कुठल्यातरी गॅंग चे मेंबर्स असतात.
२८) प्रत्येक गॅंग चा आपला एक सिंबॉल असतो, तो प्रत्येक मेंबर आपल्या अंगावर गोंदवून घेतो. तसेच युएस मरीन्स च्या निरनिराळ्या डिव्हिजन्स चा पण सिंबॉल ते मरीन्स आपल्या अंगावर गोंदवून घेतात.
२९) आजच्या आयटी युगात सुद्धा एफ बी आय ला एखादा फोन ट्रेस करायला ३ मिनिटं लागतात, कॉल मोबाईल वर आला असेल तरी सुद्धा!.
३०) जगातले सगळे रशीयन्स वाईट असतात. त्यांचं काम म्हणजे ड्रग डीलिंग , मनी लॉंडरींग, आणि खून करणे.
३१) अमेरिकेत एक ब्लॅक ओप्स नावाचा विभाग असतो, त्यात जे लोकं असतात, त्यांची पॉवर अगदी प्रेसिडेंट पेक्षाही जास्त असते, ते कोणालाही उचलून नेऊ शकतात, खून करू शकतात , थोडक्यात अमेरिकन जेम्स बॉंड म्हणा ना.
३२) अमेरिकेतिल हॅकर्स खूप हुशार असतात,   आणि जी हवी ती साईट हॅक करू शकतात.  प्रसंगी पेंटॅगॉन, सी आय ए, एफ बी आय, नासा साईट्स हॅक करून हवी ती माहिती मिळवू शकतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इतकं कॅलिबर असुनही अमेरिकेला भारतातुन आय टी इंजिनिअर्स आयात करावे लागतात.
३३) अमेरिकन सी आय ए किंवा एफ बी आय च्या ऑफिसमधे आयटी टीम चे लोकं   कोणाचाही इ मेल अकाउंट , रस्त्यावरचे सी सी टीव्ही कॅमेरे, लोकांच्या बिल्डींग मधले सी सी टीव्ही कॅमेरे हॅक करु शकतात.
३४) एफ बी आय, सी आय ए चे लोकं  रस्त्यावरच्या कुठल्याही वाहनाला थांबवून , आपलं शिल्ड दाखवून ते वाहन कॉन्फिस्केट करून अगदी त्याचा चुराडा होई पर्यंत पाठलागासाठी वापरतात.
३५) प्रत्येक बॉम्ब वर एक टायमर लावलेला असतो, जो बॉम्ब स्फोट किती वेळाने होणार ते काउंट डाउन  दाखवत असतो. हिरोला किती वेळाने बॉम्ब ब्लास्ट होणार हे कळावे म्हणून हे टायमर लावले असावे.
३६)डिटेक्टीव्ह   सस्पेंड  सस्पेंड झाल्यावर लगेच केस सॉल्व्ह करतो, पण सस्पेंड होई पर्यंत काही तो काम करत नाही.
३७} जर कधी बुलेट हिरॊला लागली, तर ती नेहेमी खांद्यावरच लागते, किंवा हाताचा बाजूला चाटून जाते. बहुतेक या भागात ब्लड व्हेसल्स , मसल्स वगैरे काही नसावे, कारण लगेच हिरॊ पुन्हा फायटींग साठी तयार होतो.
३८) सगळे बॉंब बनवणारे युनिव्हर्सल कलर कोडींग वापरतात, त्यामुळे लाल वायर की निळी वायर- कुठली वायर कापायची हे ऑफिस मधे बसलेले एक्पर्ट्स फोन वर सांगु शकतात. तसेही , हिरो जी वायर कट करतो, ती नेहेमीच बरोबर असते.
३३) कोणाच्याही चेहेऱ्यावर उशी दहा सेकंद दाबुन धरली की तो माणुस मरतो.
३४)हायप्रोफाईल बिझिनेस वुमन, जसे वकील, डीए, वगैरे नेहेमी मिनी मायक्रो स्कर्ट्स आणि पाच इंची सॅंडल्स घालतात.
३५) तिथले श्रीमंत लोकं पोलिसांना फाट्यावर मारतात. जर कधी एखादा पोलीस घरी चौकशी साठी गेला, तर वॉरंट घेऊन या मगच चौकशी अशी उत्तरं देतात.
३६) एखादा पकडला गेलेला गुंड पोलिसांनी प्रश्न विचारल्यास काहीही न बोलता, ठणकावुन सांगू शकतो, की मला वकील हवाय, आणि वकील येई पर्यंत मी काहीच बोलणार नाही , आणि त्याने असे बोलल्यावर पोलिस आपले हात चोळत बसतात.

(मुळ कल्पना मेल फॉर्वर्ड  त्यात फक्त ७ नोंदी होत्या )

विषण्ण….

Written by  on May 21, 2010

मी कालपासून कामानिमित्त रायपूरला आलोय. आज सकाळी बिलासपूरला टॅक्सी ने गेलो होतो, तो आता परत  रायपूरला  निघालो आहे. ब्लॅक बेरी मेसेंजर वर  दहा मिनिटांपूर्वी एक मेसेज आला  , लिहिलं होतं की जव्हेरी बझार , ऑपेरा हाऊस , दादर ला ब्लास्ट झालाय आणि शंभर एक लोकं घायाळ झाले आहेत.  वाचल्यावर एकदम छाती मधे धस्स झालं,  बायको मुलींचे चेहेरे डोळ्यासमोर आले. बायको दादरला रोज जाते, मुलगी माहीम ला… कसे असतील सगळे??

बायकोला फोन लावायचा प्रयत्न करतोय , तर तिचा फोन आउट ऑफ रीच, मुलींचा फोन पण लागत नव्हता – अजुन अनिझी फिलिंग येत होतं.घरचा लॅंड लाइन फोन पण लागत नव्हता. डोक्यात भयानक विचार थैमान घालत होते.

मी इथे टॅक्सी मधे बिलासपूर ते रायपूरच्या मधे प्रवास करतोय. कसे असतील घरचे सगळे लोकं? बायको आणि मुलींशिवाय कुठलाच विचार मनात येत नव्हता.

आजच्या  बातमी कडे तिऱ्हाईताच्या दृष्टीने पाहू शकत नव्हतॊ मी. ज्या तिऱ्हाईतपणे काल, परवाच्या रेल्वे ऍक्सिडेंटच्या बातम्या वाचून , फोटो बघून हळहळ व्यक्त केली,  आणि विसरून गेलो काही वेळा नंतर…

सध्या टॅक्सी मधे बसलोय, फेसबुकवरच्या  स्टॆटस मधे आलेले  मेसेज पेस्ट केला, ताबतडतोब काही मित्रांनी ही बातमी खरी असल्याची पुष्टी केली.   घरचा फोन अजूनही लागलेला नव्हता.

बायको घरी पोहोचली असेल नां? मुलगी कुठे आहे? घरी पोहोचली असेल का? घरचा फोन सारखा डायल करतोय, मुलींचे सेल फोन्स अजूनही लागत नव्हते.  एकदाचा घरचा नंबर लागला, आणि बायकोचा आवाज ऐकला, विचारलं की मुली घरी आल्या? तिचं उत्तर ऐकलं की सगळे घरी पोहोचले , आणि जीव भांड्यात पडला. तिला माहीत पण नव्हतं या ब्लास्ट बद्दल!

टॅक्सी मधेच बसल्या बसल्या लॅपटॉप सुरु केलाय आणि बातम्या शोधतोय. सगळीकडे हीच बातमी थोड्याफार प्रमाणात. दहशत!! मनात आलं, की मुली आणि बायको सुखरूप आहे हे ऐकल्या बरोबर मन शांत झालंय- पण जे लोकं घरी पोहोचले नसतील त्यांचं काय?? मन विषण्ण झालंय. मानवी जीवन इतकं स्वस्त झालंय का, की कोणीही असे ब्लास्ट करून कोंबडी ,बकरी कापल्या सारखे माणसं मारावे?

मला इतकं शांत कसं काय वाटू शकतं? स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या पर्यंतच माझं विश्व मर्यादित झालंय का? इतकं कोडगं झालंय माझं मन ?

उद्याच्या पेपरला सगळी बातमी येईलच, बरेच इंटरव्ह्यु वगैरे येतील, मेणबत्त्या पेटतील, काळे डीझानयर कपडे घालून शोक व्यक्त केला जाईल, एक दोन  दिवसांनी सगळं विसरून पुन्हा ये रे माझ्या मागल्या प्रमाणे मुंबई आपल्या कामाला लागेल…….

कसाबला आणि अफजल   गुरुला फाशी कधी देणार?? आज वाढदिवस आहे म्हणे कसाबचा.

केंव्हा एकदा रायपूरला पोहोचतो आणि टिव्ही पहातो असे झाले आहे.

कॅम्लिन चे दिवस

Written by  on May 7, 2010

परवा कॅम्लिन ची एक जुनी जाहिरात पहाण्यात आली १९६२ सालची. ही जाहिरात जेंव्हा भारतामधे सर्वप्रथम क्रेऑन्स मिळायला लागले तेव्हाची आहे. एक लहानसा शोध किती बदल घडवून आणतो नाही कां? ह्या जाहिरातीला जाहिरात म्हणण्यापेक्षा एक लेखच म्हणावं लागेल.याचं कारण म्हणजे नवीन प्रॉडक्टची विकायचा तर लोकांना माहिती तर असायलाच हवी न.. ना्हीतर उगाच नुसते फोटो पाहून कोण विकत घेईल तुमचं प्रॉडक्ट. कुठलंही पेंटींग करायचं तर ब्रश, कलर्स आलेच.. क्रेऑन्स बद्दल तर कधी स्वप्नातही विचार केलेला नव्हता.त्यामुळे ही जाहिरात एका वेगळ्याच विश्वात घेउन गेली.

raju

त्याच प्रमाणे ही दुसरी जाहिरात, वॉटर कलर्स ची. ही पण वाचनिय आहे. इथे पोस्ट करतोय. जर राजु पेंट करु शकतो तर तुम्ही कां नाही?  अतिशय एनकरेजिंग जाहिरात आहे ही. माझ्या लहानपणी वाचल्याच आठवते.

camelwatercolour

शाळेमधे असतांना कॅम्लिनचा पेन असणं म्हणजे कांहीतरी ग्रेट होतं.कारण इतर कंपन्यांचे पेन्स अगदी टुकार क्वॉलिटीचे असायचे. तसा फाउंटन पेन चा शोध पण अगदी माझ्या जन्माच्या थोडा आधी लागल्या मुळे, तो पण अगदी प्रिमिटीव्ह अवस्थेतंच होता. माझ्या घरी टांक, आणि दौत पण होती .. खुप जुनी..  बोरू ने लिहील्याने अक्षर सुधारते असं आमची आजी नेहेमी म्हणायची पण हा बोरु म्हणजे काय हे कधीच पहायला मिळालं नाही….. इच्छा मात्र नक्कीच आहे पहायची.

फाउंटन पेनच्या दिवसांत कॅम्लिनचं एकछत्री राज्य होतं. पेन ची निब २५ पैसे आणि ५० पैशांना मिळायची. आणि पेन ची किंमत होती १रु. २५ पैसे. नंतरच्या काळात चायनिज पेन्स आले होते, पण कॅम्लिन आपल्या दर्जा मुळे टिकुन राहिले.

d_p_dandekarही कंपनी सुरू केली होती दांडेकरांनी १९३१ साली. घोडा छाप ( मला वाटतं ही फ्रेज आपण जी वापरतो, ती तेंव्हा पासूनची असावी) शाई आणि शाईच्या गोळ्या बनवणारी ही कंपनी.ब्रिटिश इंकला पर्याय म्हणजे घोडा छाप शाई. काय हसू येतंय कां- घोडा छाप लिहिलं म्हणून.. पण हे खरं आहे.. नंतर जवळपास १०-१२ वर्षानंतर दांडेकरांनी कंपनीचे नांव कॅम्लिन केलं. आणि उंट – जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण जिवंत राहु शकतो, त्याला बोध चिन्ह बनवलं.

आपल्याला सगळ्यांनाच ह्या उंटाला पाहिलं की बरं वाटतं. मी स्वतः नोटीस केलंय 🙂 . मुलगी लहान असतांना तिच्याबरोबर मी पण बरेचदा कलरींग करायचो.. 🙂 ईट्स प्लेझर!

१९६२ पर्यंत कॅम्लिन फक्त  शाइच्याच व्यापारात होती. पण नंतर मात्र डायव्हर्सिफाय करुन वॉटर कलर, कंपास बॉक्स,रबर, स्टॅंप पॅड , खडू,क्रेऑन्स, आणि पेन बाम पण ( हो पेन बाम पण होता त्यांचा, जो नंतर बंद करण्यात आला)वगैरे विकण सुरु केलं . मला आठवतं मी ५ वर्षाचा असतांना मला क्रेऑन्स आणुन दिले होते वडिलांनी. 🙂

१९७४ साली लाकडी पेन्सिल् सुरू केल्या. आणि काचेवर पेंट करण्यासाठी ग्लास कलर हे बनवणे सुरू केले १९९९ मधे!

camlinही कंपनी अगदी लहानपणापासून जीवनाचा एक अविभाज्य अंग झालेली आहे .   जेंव्हा बॉलपेन मिळणं सुरु झालं होतं , तेंव्हा मात्र ही कंपनी अगदी बंद होण्याच्या मार्गावर होती पण , वेळीच डायव्हर्सिफिकेशन मुळे तरुन गेली..

माझ्या लहानपणीच्या आठवणींमध्ये या कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. खुप सुंदर आठवणी आहेत .. म्हणूनच अजूनही मुलींचा कंपास किंवा क्रेऑन्स बघितले की मन भरुन येतं आणि चित्र रंगवाव, किंवा चार दोन रेघोट्या ओढाव्याशा वाटतात मला …