झपाटलेले…

Written by  on March 24, 2010
Capture

संपादक मंडळ, दृश्यकला खंड,:–वासुदेव कामत, वसंत सरवटे, दिपक जेवणे,दिलीप करंबळेकर, सुहास बहुळकर, साधना बहुळकर, गोपाळ नेते, रंजन जोशी, दिपक घारे, सुपर्णा कुलकर्णी

आपल्याकडे कलेबद्दल इतकी अनास्था आहे, की समजा कोणाला चित्रकारांची नावे विचारली, तर राजा रवी वर्मा , हुसेन या शिवाय तिसरे नाव कोणाला आठवणार नाही.घर बांधायला खर्च केला जाईल, पण दिवाणखान्यात  लावायला एखादे पेंटींग विकत घेतांना मात्र हजारदा विचार करतील.

तसा माझा कला क्षेत्राशी अजिबात काही संबंध नाही. गेल्या पाच  वर्षापासून सुपर्णा ( माझी सौ.) चरित्र कोशाच्या चित्रकला खंडाची सहसंपादक  म्हणून काम  करीत असल्याने , बरेचदा खंडा मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी जमा केलेली फोटो, चित्र आवर्जून दाखवायची . आता गाढवापुढे वाचली गीता, असा काहीसा तो प्रकार सुरुवातीला असायचा.

"निरंजनी" हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र,niranjani by haldankar,

“निरंजनी” हळदणकरांचे पेंटींग. माझे सगळ्यात जास्त आवडते चित्र

पण मग नंतर तिने जेंव्हा एकदा हळदणकरांचे हातात दिवा घेतलेल्या तरूणी चे “निरंजनी” नावाचे पेंटींग ,किंवा “मंदिरपथगामिनी” हा शिल्पकार गणपतराव म्हात्रे  ह्यांच्या  शिल्पाचा फोटो  किंवा नानासाहेब करमरकरांनी बनवलेल्या त्या बाळाच्या मूर्ती आणि त्यामधले बारकावे , आणि कलात्मक दृष्ट्या रसग्रहण करून दाखवल्यावर मात्र या सगळ्या प्रकारात एकदम खूप इंटरेस्ट निर्माण झाला. अर्थात या विषयावर लिहिण्याइतका माझा अभ्यास जरी नसला, तरी मूर्त, अमूर्त “चित्रकला एंजॉय करणे’ चित्रांचे प्रकार, माध्यम, पोत आणि शिल्पांचं रसग्रहण करण्या इतपत तरी प्रगती झालेली आहे. त्यामुळे कधी जहांगीर समोरून गेलो, तर पूर्वी त्याला बगल देऊन जे जायचो, त्या ऐवजी एक लहानशी चक्कर तरी नक्कीच मारतो हल्ली.

राजा रवी वर्मा सगळ्यांनाच माहिती आहे, पण सोलापूरच्या त्याच काळातील चंद्रवर्मा बद्दल कोणी काही ऐकलेले पण नाही.मला पण माहिती नव्हती 🙂 असे अनेक ज्ञात अज्ञात चित्रकार, आहेत की ज्यांची माहिती या कोशात आहे. ती कशी मिळवली हे जर लिहीतो म्हंटलं तर त्यावर पण एखादा कोश निर्माण होऊ शकेल, इतकं काम केलं गेलंय या साठी.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

मूर्तीकार म्हात्रे यांचे मंदीरपथगामीनी ..एक अप्रतीम शिल्प.

आमच्या घरी पण चक्क दृष्यकलामय वातावरण निर्मिती झाली होती. ती घरी आली , की दररोज काही तरी नवीन सांगायची . दृष्य कला खंडा बरोबरच संगीत खंडाचे पण काम सुरु होतेच. त्याही क्षेत्रातील बरीच मनोरंजक माहिती कानावर पडत होती. या पूर्वी तिने ’ साहित्य खंडाचे” कार्यकारी संपादक म्हणून काम केलेले होते, त्या खंडाचे मुख्य संपादक डॉ. सुभाष भेंडे  होते, खंड पूर्ण होई पर्यंत प्रत्येक लेखकाचे नाव, त्याच्या वडिलांचे नाव आणि आडनाव अगदी तोंडपाठ झाले होते तिचे!  इतक्या नोंदी (चित्रकला, संगीत, साहित्य) हाताखालून गेल्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही विषयावर ती लेख लिहू शकते- हा कोश निर्मितीचा फायदा!

कोश म्हंटलं की श्रीधर व्यंकटेश केतकरांचे नाव आठवते. वयाच्या उण्यापुऱ्या ५३ वर्षात त्यांनी जे काम करून ठेवलंय त्याला तोड नाही, हे मी आज अधिकार वाणीने म्हणू शकतो, याचे कारण मी स्वतः काही “झपाटलेल्या” लोकांना एकत्र येऊन शिल्पकार चरित्र कोश निर्मितीच्या दरम्यान सहा वर्ष काम करतांना पाहिले आहे. सुहास बहुळकर, दिपक घारे यांनी तर दररोजचे ८ -१० तास या कोशा साठी खर्च केलेले आहेत.वसंत सरवटे ह्यांना प्रकृती स्वास्थ्या मुळे जरी दररोज येता येत नव्हते, तरी पण शक्य होईल तेंव्हा ते येऊन जायचे.  त्यांचे योगदानही खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यांनी ५ वर्ष अक्षरशः झपाटल्यासारखे काम केलेले आहे, आणि म्हणूनच हा खंड पूर्णत्वास जाऊ शकला.

आज पर्यंत चित्रकला या विषयावर एकही कोश निर्माण झालेला नाही, त्यामुळे चित्रकारांची , मूर्तिकारांची माहिती गोळा करणे हे खूप कठीण काम होते. या पुढे चित्रकला किंवा मूर्तिकला ज्याला उपयोजित दृश्यकला म्हटले जाते त्याच्या अभ्यासासाठी हा खंड म्हणजे एक मूळ स्त्रोत ठरणार आहे. या खंडा मधे जी चित्र प्रसिद्ध करायची होती ती काही पर्सनल कलेक्शन मधली, तर काही महाराष्ट्रातील काही म्युझियम मधे होती. ही पेंटींग्ज आज पर्यंत कधीच कुठेही प्रसिद्ध झालेली नाहीत, त्यामुळे ही चित्र कुठेही उपलब्ध नाहीत.

ह्या चित्रांचे फोटो मिळवण्यासाठी अगदी गावो -गाव फिरायला जावे लागले. सोबत एक कॅमेरा, फोटोग्राफर घेऊन प्रत्येक चित्राचे किंवा मूर्तीचे चित्र काढून त्याच्या मूळ मालकाची खंडात प्रसिद्ध करण्यासाठी लागणारी परवानगी सुहास बहुळकर यांनी स्वतः गावोगाव फिरून मिळवून आणली. अर्थात हे काही सोपं काम नव्हतं, पण सुहास बहुळकर यांनी ते लीलया पूर्ण केलं. त्यांनी एकदा बोलतांना सांगितलं होतं, की बरीच दुर्लभ चित्र अगदी धूळ खात पडलेली होती, आणि त्यांच्यावरची धुळ झटकून आम्ही त्याचे फोटो काढून आणले. फोटो काढतांना जर मूळ पेंटींग फ्रेम केलेले असेल, तर मधल्या काचेचे रिफ्लेक्शन येऊ नये म्हणूनही बराच द्राविडी प्राणायाम करावा लागला.या खंडात जितके नवीन चित्रांचे फोटो टाकले आहेत, त्या प्रत्येक फोटो मिळविण्यामागे  काय करावे लागले, ह्याची पण एक कहाणी आहे.

कोश ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2013/05/e0a495e0a58be0a4b61.jpg)हा जो काही ग्रंथ तयार होणार आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातील चित्रकार, आणि त्यांची कला यांची माहिती सांगणारा पहिला कोश असल्याने ह्याचे फार मोठे महत्त्व आहे. आज पर्यंत गेल्या दोनशे वर्षात कुठल्याही कलाकाराचे किंवा त्याचे कलेचे डॉक्युमेंटेशन झालेले नसल्याने हा कोश या पुढे संदर्भग्रंथ म्हणून वापरला जाणार आहे.

शेजारी ते जे वाक्य लावले आहे ना , ते तिने अगदी पुरेपूर अनुभवलेले आहे.

.हे पोस्ट कशासाठी?  तर ४ मे २०१३ रोजी  हा कोश प्रकाशित झाला आणि ५ वर्षाच्या मेहनतीचे चीज झाल्याचे, अगदी कृत कृत्य झाल्याचे  भाव चेहेऱ्यावर घेऊन जेंव्हा सुपर्णा घरी आली, तेंव्हाच ठरवले, की बायकोचे कौतुक तर करायलाच हवे – नाही का??

बाबा जोक्स

Written by  on March 19, 2010

आणि चांगलं होत असतं, आणि ते नेहेमी साठी टिकतं, याचे  कारण अगदी सुरुवातीच्या काळात त्यांनी बरोबर घालवलेला ’क्वालिटी टाइम’.   त्या साठी खास प्रयत्न करावे लागतात ते  वडीलांना!  याचं कारण हे की मुल मोठं होत असतं, आणि वडील कामात बिझी असतात.

“कुछ कुछ होता है” पहायला आम्ही सगळे गेलो होतो, आणि माझ्या धाकट्या मुलीला  ( वय वर्ष ४-५ असेल तेंव्हा तिचे) तो शाहरुखखानचा सीन ( पॅंट न घालता बाहेर निघण्याचा) खूप आवडला होता. घ्री आल्यावर सारखी ” बाबा, एक जोक सांगू?? ती अंजली असते ना तिचे बाबा ना एकदा ऑफिसला जातांना पॅंट घालायचे विसरतात, आणि  हसायला लागायची “. दोनतीन दिवस सारखा तिचा तोच तो जोक सांगणे सुरु होते.

एक दिवस  सकाळी ऑफिसला जाताना , मी मुद्दाम पॅंट घालणे विसरलो आहे असे दाखवले  , आणि तिला बाय करायला गेलो.  मला  तसे ऑफिसला जातांना पाहून तिला खूप आनंद झाला,आणि खो खो हसून मला ” अहो बाबा, तुम्ही पण पॅंट घालायचे विसरलात की!” असं म्हणाली. अंजली सारखं बाबांना पॅंट घालायचे विसरले आहात म्हणून सांगायला मिळाल्याच्या आनंदाची चमक तिच्या डोळ्यात सरळ दिसत होती.  हा जोक आमचा खास जोक होता, आणि   पुढचे काही महिने  मी दररोजच पॅंट घालायचे विसरायचो. काही दिवस ती हा जोक एंजॉय करत होती, पण पुढे म्हणजे आठ  एक महिन्यात  मात्र ’ बाबा आता बास करा, किती बोअर करता हो तुम्ही ” असे म्हणायला लागली, तरीही त्या ’ बाबा जोक ’ मधली गम्मत काही कमी झाली नव्हती. एक वेगळा बॉंड फॉर्म झालं होता आमच्यामध्ये.

आजचा हा लेख सगळ्या ’ बाबा’ लोकांसाठी. मुलांच्या बरोबर आईचं बॉंडींग जितक्या सहजपणे होतं तितक्या सहजपणे वडिलांचे होत नाही. कारण संध्याकाळी बाबा ऑफिस मधून घरी परत आल्यावर ” बाबा आले , बाबा आले, म्हणून ओरडत घरात जाऊन आईला वर्दी देण्याचे  काम बहुतेक आमच्या पिढी बरोबर बंद झाले असावे. आमच्या काळी पण बाबांच्या बद्दल मनात भीती युक्त आदर होता, पण बॉंडींग कधीच झालं नाही.

मुलं लहान असे पर्यंत बाबांसोबत जरा गप्पा , होत असतात. , पण मुलं मोठी झाल्यावर बाबांशी गप्पा, इंटरअ‍ॅक्शन एकदम कमी होते . हा अनुभव बहुतेक सगळ्या टिनएजर्स  वडिलांनी   घेतला असावा .  आपल्याला  खूप वाटत असतं की मुलांनी जसे ते आईशी बोलतात ,तसे आपल्याशी पण बोलावं, पण तसं होत नाही. हो की  नाही? त्यावर निश्चितच उपाय आहे.

काही लोकं आपल्या टिनएजर्स मुलांना आपल्या फेसबुक फ्रेंड्स लिस्ट मधे अ‍ॅड करतात, आणि त्यांचे मित्र कोण वगैरे गोष्टींवर लक्ष देऊन त्यांच्या आयुष्यात नको तितका इंटरेस्ट घेतात.प्रत्येकाचे पर्सनल लाइफ असते, आणि दुसऱ्याने त्याचा आदर केला पाहिजे . म्हणूनच म्हणतो की मुलांना लिस्ट मधे अ‍ॅड करणे पूर्ण पणे चूक आहे. मी स्वतः माझ्या मुलींना किंवा बायकोला फ्रेंड लिस्ट मधे ( फेस बुक वर असतांना) अ‍ॅड केले नव्हते 🙂 कारण असे वागण्याने मुलांशी इंटरअ‍ॅक्शन वाढते असे नाही, तर त्यांच्यावर उगाच नको ती बंधनं येतात.

हल्ली बाबा घरी आल्यावरही एक तर मुलं आपापली पुस्तकं घेऊन बसलेली असतात, किंवा व्हिडीओ गेम, मोबाइल वरचा गेम , चॅट , किंवा फेसबुक वर, किंवा ..असू दे.. ही लिस्ट फार मोठी होऊ शकते. बाबा आल्यावर घरी जर आई आलेली नसेल  तर , त्यांच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहून, ” आईचा फोन आलाय, तिला मिटींग मुळे वेळ होणारेय” अशी वर्दी मिळते. या शिवाय काही बोलणं होत नाही.

तुम्ही विचारलं, काय कॉलेज कसं काय सुरु आहे? तर ठीक! असे उत्तर मिळून पुन्हा  डोकं मोबाईल च्या चॅट मधे शिरतं. वडिल आणि मुलांचं बॉंडींग सहजासहजी का होऊ शकत नसेल बरं? बाबा, म्हटलं की एक प्रकारचा दरारा असतो, रिस्पेक्ट असतो, जर मुलं कल्ला करत ( नागपूरी शब्द आहे हा – म्हणजे दंगा करणे)  असतील तर बाबा घरी आल्याबरोबर आवाज बंद होतो. मुलांच्या बरोबर आपलं ट्युनिंग कसं जुळवायचं? कठीण प्रश्न आहे. लहान असतांना अंजली सारखे जोक चालतात, पण मोठं झाल्यावर?   त्यांची प्रायव्हसी जपून त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता कसं काय  रिलेशन मेंटेन करायचं?    मला तर वाटतं की ’बाबा जोक्स’ किंवा ’ बाबा इंटरफरन्स’  हेच एक उत्तर आहे .

बाबा जोक्स म्हणजे  ते  आयडियली कसे असायला हवे ?  कम्पल्सरीली ते दोन प्रकारचे असायला हवेत, पहिला गोष्ट म्हणजे ते अजिबात फनी नसावे , आणि दुसरी गोष्ट म्हणजे, समजा,  जरी थोडे फार फनी असले, तरीही पुन्हा पुन्हा सांगितल्यावर  ते एकदम इरीटेट करणारे असायला हवे, आणि मुलांनी  ” बाबा, आता बास करा हो…” असं म्हणायला हवे. असं झालं की तुम्ही जिंकलात, मुलांशी संवाद साधायचा चान्स मिळतो.

मुलांना वाटत असतं की आपल्या बाबांना काही समजत नाही -ते हे विसरले असतात की बाबा पण आपल्या वयातुन गेलेले आहेत, त्यांचे पण मित्र, मैत्रिणी होत्या, पण त्यांच्या दृष्टीने तुम्ही एकदम बावळट – गेल्या जमान्यातले  असता. त्यांचं आपलं वेगळं विश्व असतं, त्या मधे ’ आई-बाबांचं’ स्थान वेगळ्या लेव्हलवर , आणि बाहेरच्या मित्रांचे स्थान वेगळ्या लेव्हलवर असतं,  दोन्ही अगदी वॉटर टाइट कम्पार्टमेंट असतात.ही गोष्ट एकदा समजून घेतली की सगळं काही सोपं होतं.

कधी तरी  बाबाजोक्स मारत राहिले, की बाबांना काही फारसं समजत नाही हे अधोरेखित होतं, आणि मुलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला समजावणे/शिकवणे  सुरु करतात, ” अहो बाबा, आता तुमच्या वेळ सारखं नसतं”  जग बदललंय हो! असे काहीसे ऐकावे  लागते, पण त्या निमित्याने का होईना पण तुमच्याशी मुलं गप्पा मारणे सुरु करतात हे ही नसे थोडके.

बाबा जोक्स/इंटरफरन्स  म्हणजे बघा, जेंव्हा एखादा टिव्ही वरचा हिंदी कार्यक्रम सुरु असतो, तेंव्हा दुसऱ्याच एखाद्या सिरियल मधल्या  पात्राबद्दल किंवा प्रसंगाबद्दल विचारून , का गं, हे तेच सिरियल आहे ना? – की ज्या मधे …………….. असे विचारले की,  ” नाही हो, ते वेगळं, आणि टीव्हीचा आवाज म्युट करून  तुम्हाला ब्रीफ केले जाते. कार्टून सिरियल्स सुरु असतांना त्या खास चिरक्या आवाजात डब केलेल्या कार्टून प्रमाणे आवाज काढणे, मुलं जी सिरियल पहात असतील त्यातल्या सारखे मान वेळावून बोलणाऱ्या हिरोला  चिमणा,  जास्त बेढब आवाज असलेल्याला बेडूक,  किडूक, त्यांच्या आवडीची  हिरोईन टिव्ही वर आली की  काय गं,  ” आपल्या घरची भांडे घासणारी पण अशीच दिसते की नाही?” अशा कॉमेंट्स केल्या की आपोआप वादविवाद  सुरु होतात. वादविवाद असो, किंवा गप्पा असो तुमचा उद्देश आहे मुलांशी इंटरअ‍ॅक्ट करण्याचा तो पूर्ण होतो.

घरात असतांना उगाच स्वतःशी काहीतरी पुटपुटणे सुरु  केले ,की  कोणी  तरी काय पुटपुटताय ? म्हणून विचारणार हे नक्की   !विचारले की काय झाले? की मग काय करणार जर कोणी बोलायला नसेल तर हीच तर एक बेस्ट कम्युनिकेशन ची पद्धत आहे.  असं म्हटलं की आपोआपच कोणीतरी गप्पा सुरु करतं. अशा अनेक गोष्टी आहेत संवाद सुरु करण्यासाठी, त्यांचा वापर केलात तर मुलांशी संवाद सुरु होईल, नाही तर कुटुंबातले सगळे जण टीव्ही पहात जेवणं उरकून आपापल्या फेसबुक अकाउंट वरच अपडेट्स करत बसतील.

आज जर तुम्ही २५ शी मधे असाल, तर बघा, तुमच्या लक्षात येईल, तुमचे आई सोबत जास्त  जवळचे संबंध आहेत वडिलांपेक्षा. वडिलांना काही सांगायचं तर आईच्या माध्यमातून सांगायची पद्धत होती की नाही तुमची?? आपल्या मुलांच्या बाबतीत असे होऊ नये याची काळजी आपणच घ्ययाला हवी.

बाबा जोक्स मधे तुम्ही एक्सपर्ट झाले  आहात का? हे कसे ओळखायचे? सोप्पं आहे, फक्त घरी म्हणायचं, एक जोक सांगतो, ऐका………. आणि हे ऐकल्याबरोबर सगळ्यांनी एकसूरात ” नाहीssssssss” म्हंटले की समजा तुम्ही बाबा जोक्स मधे एक्सपर्ट झालात.

स्त्री जन्मा..

Written by  on March 11, 2010

नेट वरूननवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय.  कारण दामिनी!   दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते.  टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. काही सो कॉल्ड एक्स्पर्ट तर टिव्ही वर म्हणत होता की स्त्रियांनी पर्स मधे मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा म्हणजे कोणी हल्ला केल्यास प्रतिकार करता येईल. हे असे मूर्खासारखे विचार मांडणारे वैचारिक षंढ  कसे काय टिव्ही वर येतात कोण जाणे! त्यांची बडबड ऐकून तर   अजूनच संताप येत होता.

माझ्या मनात विचार आला, समजा एखाद्या मुलीने चाकू पर्स मधे ठेवला, आणि जर गुंडाने   तोच चाकू हिसकावून   प्रहार केला  तर? आणि मिरचीची पूड पण त्या मुलीच्या हातून हिसकावून तिच्यावरच वापर केला तर? अगदी सहज शक्य आहे की नाही?उगीच टिव्ही वर आलो म्हणून काही पण बडबड करायची?

गुंडांच्या हातून वाचायचे असेल तर रिव्हॉल्वर हेच एक साधन उपयोगी पडु शकते. आणि आपल्याकडे तर लायसन्स मिळणे दुरापास्त आहे.आणि जरी समजा लायसन्स मिळाले तरी पण रिव्हाल्वर वापरण्याची हिंम्मत तरी व्हायला हवी ना? असो..

खरंच काय करता येऊ शकेल? एक उपाय सुचतोय, जितके व्हिव्हिआयपी आहेत,त्या  नेत्यांच्या मुला, मुलीं सकट घरच्या सगळ्याच लोकांना ! अगदी  यांच्या घरात  जितके लोकं आहेत, त्या सगळ्यांना झेड सिक्युरिटी दिल्या गेलेली असते. तसेच सिनेमाचे हिरो हिरोईन्स- त्यांना   ला पण फुकट मधे झेड सिक्युरिटी देण्यात येते- म्हणे त्यांच्या जिवाला धोका आहे म्हणून! या सगळ्यांची सिक्युरिटी काढून घेतली तरी    लाखो सिक्युरिटी चे लोकं मोकळे होतील, की ज्यांना सामान्य जनतेसाठी वापरली जाऊ शकते. हे सगळे धनदांडगे नेते आणि सिनेमाची धेंडं स्वतःच्या पैशाने सिक्युरिटी विकत घेऊ शकतात हे अगदी कोणीही मान्य करेल- पण लोकशाही मधे  …………….   असो, दुसरी गोष्ट म्हणजे  बलात्काराला शिक्षा ही कडक द्यायला हवी, सध्या कायद्याने या गुन्ह्यासाठी फारच कमी शिक्षा दिल्या जाते. खाली दिलेला लेख वाचा-लिंक खाली दिलेली आहे .

आज सकाळी साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेला हा लेख पुन्हा वाचला. एका बलात्काराविषयीचा हा लेख ११ डिसेंबर 20११ रोजी लिहिला होता.  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2011/12/01/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B/)

स्त्रियांचे शोषण तर युगानुयुगे चालत आलेले आहे, कधी प्रेमाने, तर कधी धाकाने. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही स्त्री पुरुष संबंध ( ऑफिस, घर, बाहेर, कुठेही) जेंव्हा रेफर केले जातात, तेंव्हा ते केवळ सेक्स्युअल रेफरन्स मधे असतात.  ऑफिस मधे जेंव्हा बरोबरच्या  स्त्री कलिग बद्दल  तिच्या अपरोक्ष बोलले जाते तेंव्हा अशा लूज कॉमेंट्स नक्कीच पास केल्या जातात. जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे  “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा  तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक  हा असतो. कदाचित पुरुष ही गोष्ट सहज मान्य करणार नाहीत, पण हीच खरी गोष्ट आहे. एक युगानुयुगे चालत आलेले सत्य हे पण आहे, जर कधी   भांडण झालेच तर  ते संपवायला, स्त्री ला प्रेमाचा मार्ग दोन पायातून शोधावा लागतो.   असो.. मन विषण्ण झाले आहे.  जास्त लिहत नाही. इथेच संपवतो.

एअरपोर्ट सिक्युरिटी.

Written by  on March 6, 2010

आज सकाळी मुंबईहून नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेश भाई होता. तो सकाळी वापीहून आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापीहून). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणून त्याने आपली कार आणायची आणि मग आधी मला पिकअप करुन एअर्पोर्ट ला जायचं . आम्हाला ड्रॉप केलं की त्याचा ड्रायव्हर गाडी माझ्या घरी पार्क करेल, आणि मग संध्याकाळी परत मुंबईला पोहोचल्यावर दिनेश भाई कार घेउन जाईल..

कसलं जबरी प्लानिंग केलंय ?? नाही का? अहो इतका विचार जर आपल्या कामाच्या बाबतीत केला तर टर्न ओव्हर दुप्पट वाढेल. 🙂 पण तसं होत नाही ना… हीच तर खरी शोकांतिका आहे. असो..

तर एअर्पोर्ट ला पोहोचल्यावर चेक इन बॅगेज टाकलं आणि आम्ही हात हलवत इकडे तिकडे फिरत होतो. दिनेश म्हणे.. प्रॉपर युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस असायला पाहिजे. पण तेच  जमत नाही.

जर ते जमलं तर मात्र भरपूर पैसा वाचु शकेल, एक माणुस जास्त काम करू शकेल. म्हंटलं.. अरे भाई.. जरा होश  मे आओ.. आज साला तुम्हारे पास काम नही है तो आदमी को भगा दोगे, बादमे  जब जरुरत पडेगी तो आदमी कहांसे पैदा करोगे? ईतने स्किल्ड आदमी जो तुम्हारे पास है , दस सालोसे, उनकॊ इतनी आसानिसे छोड दोगे?? अगर ऐसा करोगे, तो इट्स द मोस्ट फुलिश डिसिजन यु विल बी टेकिंग…!

म्हंटलं दिनेश भाई बेस्ट, युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस जर पहायचे असतिल तर त्या मद्राशाकडे पहा.आमच्या समोरंच एक मद्रासी उभा होता. स्वच्छ पांढरा शर्ट, काळी पॅंट, गळ्यामधे एअरपोर्ट ऍथोरिटीने दिलेला आय कार्ड… चेहेऱ्यावर एक वेगळाच उर्मटपणा..
ह्या मद्रासी लोकांचा चहा आणि कापी वर अगदी एकाधिकार आहे. हा फोटॊ बघा

1

ट्रॉली – एअरपोर्ट ऑथॉरिटी ची,(एअर पोर्ट १ बी.)ह्याचं इनव्हेस्टमेंट फक्त दोन थर्मास आणि चहाचे कप. बरं, एअरपोर्टवर आत येण्यासाठी लागणारा पास पण ह्याच्या गळ्यात लटकत आहे, म्हणजे नक्कीच ह्याने एअरपोर्ट ऑथॉरिटी च्या सिक्युरीटीच्या कडून हा एंट्रन्स पास कसा मिळवला असेल तो पण एक संशोधनाचा विषय़ ठरेल. . जो चहा बाहेर सायकलवरचा भैय्या ( मुंबईकरांना माहिती असेल, की भल्या पहाटे कांही भैये लोकं सायकलवर चहाची किटली ठेऊन चहाचा/कॉफीचा धंदा करतात) ५ रुपयात विकतो, त्याच क्वॉलिटीचा चहा हा मद्राशी भैय्या १५ रुपयात विकतो.  याला म्हणतात बेस्ट युटीलायझेशन ऑफ अव्हेलेबल रिसोअर्सेस…असं काही तरी करा !

हे सिक्युरिटी वाले आपल्या सारख्या सामान्य प्रवाशाला किती छळतात? समजा पाण्याची जरी बाटली असली तरी पाणी पिउन दाखवा म्हणतात. बरं हे तर सोडाच, ह्यांचा हलकटपणा इथेच संपत नाही, तर  लहान मुलाचं दूध असेल, तर त्याच्या आईला ते पण पिऊन दाखवायला लावतात हे सिक्युरिटी वाले—

आणि मग या मद्राशाला कसा काय तो पास मिळाला असेल? कोणी त्याला परमिशन दिली असेल? म्हणजे   त्याने  कोणाला पैसे खाऊ घातले असतील  म्हणून त्याला असा एक्स्लुझिव धंदा करण्याचा परवाना मिळाला असावा एअरपोर्ट मधे सिक्युरिटीच्या धज्जा ऊडवणारे हे असे लोकं अगदी राजरोस पणे फिरतात एअरपोर्टवर.

राजकोट एअरपोर्टवरच्या ह्या सिक्युरिटीत तर अशा तर्हेने तपासतात, जसे कांही तुम्ही स्पेस शिपमधेच बसायला चालले आहात. लॅप टॉप असेल तर त्यांच्या कडे एक मोठा ट्रे असतो, त्या ट्रे मधे तुमचा लॅपटॉप काढून त्या ट्रे मधे ठेवायचा. आणि रिकामी बॅग त्या एक्स रे मधून पास करायची. असा मुर्खपणा त्यांना कोणी आणि कां करायला सांगितला आहे ते कळत नाही. तुमची लॅपटॉप्ची बॅग ही रेक्झिन ची किंवा लेदरची असते, त्या मधून एक्स रे सरळ पास होऊ शकतात.. पण नाही.. ह्या निर्बुद्ध लोकांना ते कोण सांगणार?

बरं ह्यांचे नियम एअरपोर्ट गणिक बदलतात. म्हणजे जे काहि सिक्युरिटी च्या नावाखाली राजकोटला करतात, ते नागपुरला करतात असे नाही , किंवा अहमदाबादला जे हॅंड बॅगेज मधे चालतं ते भुजला चालेल असं नाही. प्रत्येक ठिकाणचा तो ठोंब्या सिक्युरीटीवाला आपल्याला वाटेल तसे नियम बनवतो.

परवाचीच गोष्ट आहे. मागच्या आठवड्यात मी नागपुरला आलो होतो . इथुन परत जातांना आईने मला आवडतं म्हणून कच्च्या फणसाचं आणि कैरी चं मिक्स लोणचं दिलं होतं. मी विचार केला, की जर हे चेक इन बॅगेज मधे टाकलं, तर कदाचित बाटली फुटेल. म्हणून ते हॅंड बॅगेज मधे ठेवलं. सिक्युरिटीच्या वेळी त्या माणसानी अडवलं मला, म्हणे आप नहीं ले जा सकते ये चिज? म्हंट्लं क्यो? तर म्हणे इसमे तेल है, और तेल अलाउड नही है फ्लाइटमे. मी त्याला सांगून पाहिलं की मुंबईहून येतांना मी एक मुंबईचं लोणचं इथे आणलं होतं.. तर म्हणे वहांका कानुन अलग है.. !!!

या मूर्ख  आणि अशिक्षित लोकांशी जास्त वाद घालण्यात काहीच फायदा नसतो. बरेचसे लोकं मग आपल्या हॅंडबॅगेजमधले, शेव्हिंग क्रिम्स, डिओडॊरंट्स, आणि इतर तरल पदार्थ काढून तिथे टाकुन देतात. मला तर अगदी दाट संशय आहे, की हे पॅसेंजर्स कडून काढून घेतलेले सामान नंतर हा सिक्युरिटी स्टाफ वाटून घेत असेल. नाही तर यांची लायकी आहे का फ्रेंच पर्फ्युम वापरायची? नक्कीच एखाद्या पॅसेंजरचा ढापलेला असेल  तो…..!

एखादा पॅसेंजर जर इटरनॅशनल फ्लाइटने आला असेल तर त्याच्या हॅंडबॅगेजमधंल बरंच सामान हे लोकं सिक्युरिटीच्या नियमाखाली काढून घेतात. त्यांचे खास बकरे असतात हे बाहेरुन आलेले . तो पॅसेंजर मग अगदी जीव तोडून सांगत असतो, भैय्या , मै ये अमेरिकासे हँडबॅगेज मे लाया है. इसमे कुछ नहीं है.. पण ह्यांच्या चेहेऱ्यावरची रेष पण हलेल तर शपथ! हे म्हणतात, इंडियामध्ये नही चलता है ये हॅंड बॅगेज मे.आणि मग त्याला सांगितलं जाते की आप ये चेक इन बॅगेजमे  डाल दो.. बरेच लोकं मग ते सगळं सामान चरफडत तिथेच डस्ट बिन मधे टाकतात.. भिकाऱ्यांची जशी कटोरी तशी या सिक्युरिटी वाल्यांचं भिक मागायचं मोठ्ठं भांडं म्हणजे ती मोठ्ठी डस्ट बिन.. त्याला खरंच डस्ट बिन म्हणायचं कां?? बरं कस्टम मधे काय होतं त्यावर एक वेगळा लेख होईल.

जगामधे कांही लोकं असे आहेत की ज्यांचा मी अगदी मनापासून तिरस्कार करतो, त्यापैकी हे खाकी कपडे वाले! बरं तुम्हाला आणि आम्हाला इतका त्रास देणारे हे लोकं , एखादा मंत्री आला, की त्याला सरळ सॅलुट करुन जाऊ देतात. मग तेंव्हा सिक्युरिटीचं काय होतं? बरेचदा, लहान एअरपोर्टवर त्या मंत्र्या बरोबर त्याचे चमचे अगदी आतपर्यंत येतात त्याला सोडायला.. ते कसं चालतं? आणि कुठल्या नियमात बसतं ते??

गुजराथ मधे एक अंजार नावाची जागा आहे. इथे तलवारी , चाकू इत्यादी वस्तु तयार होतात. त्याला सुंदरश्या पितळेची मूठ असते, छान लाल मॅन असतं.. मी एकदा सहज म्हणून तलवारी घेतल्या दोन विकत, म्हट्लं, की छान शो पिस आहेत. चेक इन ला टाकलं बॅगेज, तर तिथे मला म्हणतो, अलाउड नहीं है.. मला जरा रागच आला, त्याला म्हणालो, ऐसा कहां लिखा है की चेक इन बॅगेजमे तलवार अलाउड नही   है? मोठ्या मुश्किलीने सोडलं त्याने मला.

कांही वर्षांपूर्वी, अजुन एक फार्स होता इंडियन एअरलाइन्स चा. तुमचं चेक इन केलेलं बॅगेज, ते लोकं बाहेर एका रांगेत मांडून ठेवायचे नागपूर एअरपोर्ट ला, आणि मग तुम्ही सिक्युरिटी मधून पास झाल्यावर ते तुम्ही आयडॆंटीफाय करायचं, मग एक सिक्युरिटीवाला त्या टॅग वर क्रॉस करेल आणि मग ते बॅगेज विमानात चढवले जाईल. हा फार्स फक्त इंडियन एअरलाइन्सचे लोकंच करायचे, जेट ने तुम्ही जात असाल ,तर या प्रोसिजरची गरज नसायची?

तुमचे अनुभव .. एअरपोर्ट सिक्युरिटीच्या बाबतीतले तुम्ही इथे कॉमेंट्स मधे पोस्ट करु शकता..

मला नेहेमी पडणारा प्रश्न.. जेट आणि इतर एअरलाइन्सची सिक्युरिटी वेगळी कशी?? आणि का? जाउ द्या.. आलिया भोगासी असावे सादरं, चित्ती अ्सू द्यावे समाधानं!