भ्रष्टकारण

Written by  on February 27, 2010

एक पद्धत आहे, म्हणतात, ” आपला तो बाब्या, आणि दुसऱ्याचं ते कार्टं” म्हणूनच “तो नितीन” असं काही करेल असं कधी वाटलंच नव्हतं, असं मी म्हणणार नाही. मी स्वतः संघाचा म्हंटल्यावर निश्चितच भाजपाला मत देतो. पण कॉंग्रेसच्या लोकांनी पैसे खाल्ले की ओरड करायची, आणि आपल्या आवडीच्या पक्षाच्या लोकांनी पैसे खाल्ल्यावर त्याचे समर्थन करायचे , हे मला अजिबात पटत नाही .

तुम्ही आज कुठलाही राजकारणी घ्या, अगदी मध्यमवर्गीय घरात जन्म घेतलेले काही  राजकारणी  ( शरदराव , अजीत, सुरेश माया, इन्क्लुडेड ) आज कोट्यावधींची माया जमवून बसले आहेत. सरळ मार्गाने इतका पैसा मिळणे केवळ अशक्य आहे हे अगदी शेंबडं पोरंही जाणतं. पण तरीही, आम जनता मात्र, ” हा माझ्या गावचा, माझ्या आवडीच्या पक्षाचा, किंवा अजून काही तरी निकष लावून त्याला सपोर्ट करतात आणि भ्रष्टाचाराची पाठराखण करतात.

दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणूकांच्या वेळेस जेंव्हा नेते आपली प्रॉपर्टी चे आकडे प्रसिद्ध करतात, तेंव्हा त्यातली झालेले वाढ बघूनही कोणालाच( फॉलोअर्स ) काही संशय येत नाही का? की संशय येऊनही , “चलता है, सगळेच जण खातात, मग आपल्या नेत्याने खाल्ले तर काय हरकत आहे?- कॉंग्रेसने इतकी वर्ष खाल्लं, आता ह्यांनी थोडं खाल्लं तर काय हरकत आहे? ” असा विचार करणारे  पण दुर्दैवाने बरेच लोकं आहेत.

सगळे राजकीय नेते हे गरीबी दूर करण्याचे  हजारो आश्वासनं देतात. माझी त्यांना एकच विनंती आहे, त्यांनी गरीबी दूर करण्याची काही गरज नाही,  त्यांनी फक्त स्वतः करोडो रुपये केवळ चार पाच वर्षात कसे कमावले हे जरी लोकांना सांगितले, तरीही लोकं पण त्यांच्याच प्रमाणे करोडॊ रुपये कमावतील, आणि भारतातील गरीबी आपोआपच दुर होईल.

आपल्याकडे म्हणतात, की गुन्हा सिद्ध होई पर्य्ंत सगळेच निर्दॊष असतात, या न्यायाने,  सगळेच राजकीय नेते हे निर्दोष आहेत. म्हणूनच तर राजकीय नेत्यांचं फावतं. आपण कसेही वागलो, काहीही केले तरीही आपले पाठीराखे आपल्याला सोडणार नाहीत याची खात्री असते त्यांना. मनमोहन, सोनिया, राजा, वगैरे बरेच  नेते असाच विचार करत असतिल का? पूर्वाध्यक्ष प्रमोद ( एकेकाळी शिक्षक असलेले) यांनी पण इतके पैसे कसे कमावले असतील हे उघड गुपीत आहे, फक्त त्यांनी जे काही केलं ते उघड झाले नाही त्यामूळे ते बचावले.

या सगळ्या गोष्टी पाहून मला थोडं वाईट वाटतं, पण जनतेची स्मृती फार कमी असते, काही दिवसांनी लोकं सगळं काही विसरून जातात. तुम्हीच सांगा आयपीएल  मधे शरदरावांच्या सुप्रियाच्या  नवऱ्याच्या कंपनीला किती पैशाचे कॉंट्रॅक्ट दिले गेल? कर्नाटकात भाजपा मुख्यमंत्र्यांनी किती करोडचा जमिन घोटाळा केला? दूर कशाला जयललिता बद्दल सांगा बरं? नाही आठवत ना? हेच म्हणायचंय मला.

भाजपाला समर्थ करतांना  काही लोकं अगदी सारासार विचार बाजुला ठेउन समर्थन करतात. सुखराम ( टेलीफोन घोटाळा), जयललिता जो पर्यंत विरोधात होते तो पर्य्ंत त्यांच्या नावे खडे फोडले जायचे, पण नंतर जेंव्हा सुखराम भाजपा मधे आला, तेंव्हा लगेच गंगा अंगावर घेऊन पवित्र झाल्याप्रमाणे त्याचे पापं धुतले गेले असावे , म्हणून त्याच्या बद्दल बोलणे एकदम बंद झाले. जयललिताचे पण तसेच.. असो.. फार जुन्या गोष्टी आहेत या, बहूतेक तुम्ही सगळे विसरले असाल.

श्री गुरुजींच्या एका पुस्तकातलं वाक्य जे मी बरेचदा वापरतो,” त्यांना राजकारणात, घाण साफ करायला पाठवले, पण ते तिथेच लोळले”  .आज आपल्या देशात राजकारण नाही तर भ्रष्ट कारण चालते.हेच कारण आहे की निवडणूका आल्या की पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो.

हा लेख कुठल्या, पक्षा विषयी राजकारण्याविषयी नाही ,  तर ह्या समाजाच्या मनोवृत्ती बद्दल आहे. समाजाची ही मनोवृती पाहिल्यावर मला वाटतं की आपण खरंच लोकशाही साठी योग्य आहोत का? एकेकाळी राजे राज्य करायचे, नंतर इंग्रज आले, आणि आता राजकारणी नेते … एकंदरीत काय तर जनतेची गुलामगिरीची सवय रक्तातच भिनलेली आहे, पुर्वी राजे, नंतर इंग्रज आणि सध्या जनता नेत्यांची गुलामी करते आहे . समाजाची  मनोवृत्ती कधी बदलणार ? 

इमु..

Written by  on February 22, 2010

काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपून आपल्याला परत यायला रात्र होईल. पण काम थोडं लवकर  ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो.

हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार च्या मधल्या भागात येतं . हा भाग आदिवासी भाग म्हणूनच ओळखला जायचा. अजूनही इथे जव्हार पर्यंत सिंगल लेन रोड आहे, आणि रस्ता खराब आहे.जातांना दोन्ही बाजुला ओसाड शांतता दिसत होती. भिवंडी क्रॉस केल्यावर थोड्याच वेळात, अचानक रस्त्याच्या डाव्या बाजुला एक बोर्ड दिसला- ’ईमु फार्मींग’ चा!! या इमु फार्मिंग बद्दल बरंच ऐकलं होतं, त्यामुळे मनात एक गोष्ट रजिस्टर झाली.. की घरी परत जातांना जर अंधार झाला नाही, तर नक्कीच हे फार्म बघायचं- म्हणजे खरा इटरेस्ट त्या ’इमुला’ बघण्यात होता.

दुपारचं काम आटोपल्यावर मनसोक्त खाणं झालं, आणि आम्ही मुंबईला परत निघालो. सदु साहेब  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/02/01/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/)सोबत होतेच.. म्हणजे खादाडी अगदी मनसोक्त, आणि व्यवस्थित होणारच!!  कडकडीत उन्हातून एसी रेस्टॉरंट मधे शिरलं की  एकदम थंड पेयाची इच्छा होतेच.. काम झालं होतंच, म्हणून मग किंग फिशर +तंदुरी पापलेट आणि प्रॉन्स कोलीवाडा ऑर्डर केलं. आता ते प्रॉन्स इतके लहान होते, की त्याल झिंगे म्हणायचे की प्रॉन्स.. याचा विचार करित एक प्रॉन्स चा तुकडा जिभेवर सरकवला.. माझ्या सारख्या मत्स्याहारी खवय्याला प्रॉन्स म्हणजे पर्वणी, पण शेल फिश ची असलेली ऍलर्जी लक्षात घेता, फक्त दोन तीन पिस खाल्ले. पापलेट तर अप्रतीम होतं.. झाल्यावर पुन्हा फिश करी राइस संपवून आत्मा शांत झाला. 🙂

imu

इमु कॅमेऱ्यावर चोच मारण्याच्या तयारीत.

असो..तर परतीच्या वाटेवर , तेच रोड साईन पुन्हा दिसलं. इमू फार्मचं..त्या बोर्ड वर एक नांव अन सेल फोन नंबर होता. त्या नंबरला फोन करुन फार्म कुठे आहे? आणि आम्हाला पहाता येईल का ?? अशी चौकशी केली. फार्मच्या मालकाचाच तो नंबर होता. त्याने फार्म वर कसे जायचे ते विचारले . फार्मचा मालक म्हणाला की तो तर फार्म मधे नाही, पण तुम्ही फार्म वर जाउन पक्षी बघू शकता, फार्म वर  शंकर नावाचा एक माणुस आहे त्याला भेटा, तो सगळं दाखवेल.

मुख्य रस्त्यावरुन डावीकडे वळलॊ, आणि कच्च्या रस्त्यावर गाडी घातली. ड्रायव्हरच्या चेहेऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता, खराब रस्त्यावर गाडी न्यायला लावली म्हणुन. पुढे दोन किलोमिटर कच्चा रस्ता तुडवल्यावर समोर एक घर दिसलं. बाजुला एक मोठा गोठा, त्यात गाई, म्हशी, अन घोडे- अरे हो.. खरंच दोन घोडे पण होते. मालक शौकीन दिसत होता 🙂

imu

चार ते पाच फुट उंच असतो हा पक्षी..

आमची गाडी पार्क केली – समोरच्या दारावर कुत्र्यापासून सावधान  असा एक बोर्ड दिसला. त्या फार्मच्या समोर एक मरतुकडा कुत्रा बसलेला होता.. तेंव्हा आता कुत्र्याला घाबरायचं की अजुन कुठल्या दुसऱ्या कुत्र्याला??    सोबत सदु साहेब होते ते एकदम हसायला लागले -म्हणाले तो कुत्रा ज्याला घाबरायला सांगितलंय तो दुसरा…असेल हो.. जरा सांभाळून  चला.  एखादा मोठ्या कुत्र्याच्या  अपेक्षेने   आम्ही जरा सांभाळून समोर गेलो.  तेवढ्यात त्या मरतुकड्या कुत्र्याने आमच्या कडे एक तुच्छ दृष्टी ने पाहिले, आणि पुन्हा डोळे बंद करुन आपल्या वामकुक्षी मधे बिझी झाला.मोठा कुत्रा दिसला नाही कुठेच.

न पाहिलेल्या कुत्र्याला घाबरत आम्ही आत शिरलो.  समोर याक सारख्या उग्र वासाचे भले मोठे पक्षी होते एका कंपाउंड मधे . त्याला तारेचं कम्पाउंड घातलं होतं. आम्ही जसे तारांच्या जवळ पोहोचलो, तेवढ्यात तो शंकर आला धावत.त्याला सांगितलं की तुझ्याच साहेबाने दाखवायला सांगितलं फार्म,तर काहीच चौकशी न करता त्याने मान

इमु, imu farming

ऑलमोस्ट कॅमे्यावर चोच मारलीच होती त्याने ..

डोलावली.

आम्ही त्या तारेच्या कंपाऊंड जवळ गेलो तर बरेच पक्षी आत बागडत होते. आता करायला काहीच काम नाही तर करतील तरी काय ?? जसे आम्ही जवळ पोहोचलो तसे त्या पैकी दोन फ्रेंडली इमु आमच्या कडे आले. आणि मान उंचावून बघू लागले. इतका भारदस्त आणि सुंदर पक्षी कधीच पाहिला नव्हता. शहामृगाच्या कुळातला हा पक्षी खूपच सुंदर दिसतो . स्पेशली याचे डोळे खूप बोलके वाटले. जसा मी फोटॊ काढायचा प्रयत्न केला तसा, त्याने मान उंचाउन सेल फोनचा घास घ्यायचा प्रयत्न केला. आणि जमलं नाही म्हणून चोच मारणे सुरु केले . कॅमेरा उंच केला, तर त्याने पण आपली मान उंच केली. जवळपास ५फुट उंचीचा हा पक्षी खूप ग्रेसफुल दिसतो

imu

यांना वाटलं की आम्ही खायला आणलंय काही म्हणुन.. हे दोघं ओव्हर फ्रेंडली होते..

थॊडावेळ तिथेच त्याची चोच चुकवून फोटो काढले. शंकर म्हणाला, साहेब हे पक्षी आता अडीच वर्षाचे आहेत. अजुन सहा महिन्यात यांची वाढ पुर्ण होईल. आणि मग ते बाजारात पाठ्वले जातील. शंकर बोलत होता, मी त्या पक्षाकडे पहाण्यात व्यस्त होतो. त्याचे ते खोडकर ब्राउन डोळे सारखा माझा मागोवा घेत होते. एक लक्षात आलं की हा पक्षी खूप हुशार आहे..:) आणि याचं पण वाईट वाटलं याचं आयुष्य अजुन फक्त सहाच महिने????

शंकर सांगत होता, ह्याचं नॉर्मल लाइफ हे २५ वर्ष असतं. या पैकी काही माद्या पाळल्या जातिल अंड्य़ांसाठी. यांचं अंड हे खरबुजा इतकं मोठं असतं, पण आम्हाला पहायला मिळालं नाही. एका वर्षात मादी साधारण ३० अंडी देते.  कालच मार्केटला पाठवलीत असं म्हणाला तो माणुस. याचं अंडं दोन ते अडिच हजार रुपयाला एक या भावाने, आणि मांस ४०० ते५०० रुपये किलॊ च्या भावाने विकले जाते. केवळ खाण्यासाठी म्हणूनच याचं प्रजनन आणि संगोपन केलं जातं.

शेतकऱ्यांना कॅश पैसा मिळवून देणारा हा पक्षी पाळणं खूप सोपं आहे. आणि कदाचित अर्जुनही याचं फार्मिंग कॉमन होईल लवकरच असे वाटते.. इथे आल्यावर सुरुवातीला रोग राई ने बळी पडेल असे वाटले होते, पण लवकरच ह्याने भारतीय हवामानाशी जुळवून घेतले.

याच्या शरिराचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. पिसांपासुन तर चामडी पर्यंत. यांच्या स्किन मधुन तेल निघतं, ते पण उपयोगी असतं

कंपाउंड बरंच मोठं असल्याने चांगली जागा आहे त्यांना फिरायला.

असं म्हणतात.. भारतीय शेतकरी आपल्या ठरावीक साच्यातून बाहेर येत आहेत हे पाहून बरं वाटल्ं. फक्त जशी गोट फार्मिंगची खूप गाजावाजा करुन सुरू झालेली योजना बंद पडली, तसं याचं होऊ नये..

तिथुन निघालो, पण निघतांना तो सुंदर भारदस्त पक्षी – की उडता येत नाही म्हणून त्याला  प्राणी म्हणायचं? त्याने माझ्या मनात घर केलं.. आणि नकळतंच  त्याचे ते ब्राउन डॊळॆ आठवत स्वतःलाच प्रॉमिस केलं.. हा पक्षी  कधीच खायचा नाही..

माझं बॅचलर लाइफ…(२)

Written by  on February 20, 2010

चेन्नै वरुन परत आलो होतो.जरी तोंडी सांगितलं होत की ’यु आर ट्रान्स्फर्”, तरीही लेटर मिळालं नव्हतं. त्यामुळे  अजुन ही प्रॉडक्शन लाच काम करणं सुरू होतं.   मला असं  समजलं की प्रॉडक्शन ची लोकं मला सोडायला तयार नाहीत म्हणून. पण  आता रावणानेच सांगितलं की सर्व्हिस डिपार्टमेंटला तुझी ट्रान्सफर म्हंटल्यावर प्रॉडक्शन मॅनेजरचं काही चाललं नाही. त्याने उगाचच थोडी कां- कूं केली , “अभी फिरसे नया लडका ट्रेन करना पडेंगा”असं म्हणत  पण शेवटी नाइलाजाने रिलिझ केलं मला.

सर्व्हिस डिपार्टमेंटला  असतांना ऑफिस मधे असतांना कांही विशेष काम नसायचं. फक्त रिजन आणि ब्रॅंचेस चे टेलेक्स रिप्लाय करणं,त्या काळी अगदी फास्टेस्ट मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणजे टेलेक्स. फॅक्स तर अगदी वगैरे गोष्टी अगदी अमेरिकेत पण सुरु झाल्या नव्हत्या..  किंवा  अर्जंट पार्ट्स अरेंज करण, एवढंच काम होतं.

सर्व्हिस ला अटॅच ट्रेनिंग डिपार्टमेंट पण होतं. त्या मुळे कधी ट्रेनिंग इंजिनिअरने बुट्टी मारली की मग आमच्या पैकी कुणाला तरी क्लास घ्यावा लागायचा.  अर्थात त्यात कांही विशेष नव्हतं.. कारण कस्टमर ट्रेनिंग साठी जे कस्टमर्स यायचे त्यांनाही काही  फारसा ईटरेस्ट नसायचा.. त्यांना मुख्य ईंटरेस्ट म्हणजे पुण्याला फिरायचा.

एकदा आठवतं , कांही आर्मीचे रिकृटस आले होते. (आम्ही आर्मीला स्पेशल पर्पज आर्मी जनसेट्स सप्लाय करायचो, आणि आर्म्ड पर्सनल कॅरिअर्स, आणि टॅंक्स ला पण रशियन इंजिन्स काढून आमची लावली होती- हं.. तो रशियन टॅंक्स ची छान आठवण आहे नंतर लिहीन पुढे )हे रिकृट्स म्हणजे अगदी जस्ट अंडरग्रॅज्युएट असतांनाच आर्मी मधे जॉइन झालेले अगदी लोअर लेव्हल चे लोकं असायचे. म्हणजे अगदी ऑपरेटरच्या लेव्हल चे. ह्या लोकांना फक्त ’सांभाळा’ असं सांगितलं जायचं . त्यांच्या पैकी सगळेच कांही मठ्ठ नसायचे , तरी पण….. !

तर काय सांगत होतो, ते लोकं ट्रेनिंग करता आले होते. ऍज युजवल आमचा ट्रेनिंग मॅनेजर सुटीवर! माझा नंबर लागला ट्रेनिंग घ्यायला. त्या सगळ्यांना घेउन फॅक्टरी व्हिजिट ला निघालो. असेम्ब्ली मधे गेलो असता, ह्या मठ्ठ लोकांनी अगदी विचित्र प्रश्न विचारुन अगदी भंडावून सोडलं होतं . यांना येत तर कांहीच नव्हतं पण फक्त युनिफॉर्म्स चा रुबाब ! एकाने मला विचारलं, साब ये थ्रेड कोनसा है??  ( काय सांगणार कप्पाळ! ) त्याला म्हणालो, ये ’मोदी थ्रेड’ है! 🙂  माझ्या सोबत एक ट्रेनी पण होता तो अगदी मोठ्याने हसायला लागला मोदी थ्रेड ऐकुन.. पण त्या व्हिजिटर्स पैकी एकालाही कळलं नाही की मी त्यांना उल्लु  बनवलं म्हणून! ट्रेनिंग मधे अशाच गमती जमती व्हायच्या. नंतर हा मोदी थ्रेडचा जोक सगळ्या फॅक्टरीत फेमस झाला होता.

सर्व्हिसिंगचं बाहेर काम नेहेमीच असायचं. एक महिनाभर टुर करुन आलो, की १०-१५ दिवस पुण्याला राहता यायचं. नंतर पुन्हा टुर..! बॅचलर असल्यामुळे अजिबात त्रास व्हायचा नाही. टुर ला जायला मी कधीही तयार असायचो. तेवढाच वेगळा एक्स्पिरियन्स.

याच पिरियड ला एकदा चेन्नाइला गेलो असता एक लहानसा वॉकमन विकत घेतला होता. त्यामुळे कुठेही गेलो तरी गाणी ऐकायची सोय झाली होती. अगदी प्रिमीटिव्ह स्टेजचा तो वॉकमन सॅनयो कंपनीचा होता. ५०० रुपयांना घेतला होता विकत. त्या वॉकमनला ऍज अ वॉकमन म्हणून न वापरता, एलिमिनेटर लावून मगच ऐकायचो. कारण त्याचे सेल चे कंझम्पशन  खूपच जास्त होतं .एकदा घातलेले सेल्स फक्त ३ तास चालायचे.. 😦

आम्ही जनरेटींग सेट्स पण विकायचो. ३०० केव्हिए वगैरे चे.. माझं मेकॅनिकल मधलं ज्ञान जरी चांगलं असलं तरीही इलेक्ट्रिकल मधे बोंबच होती. एक ट्रेनिंग अटेंड केलं बंगलोरला किर्लोस्कर मधे अल्टर्नेटर वरचं. कंट्रोल पॅनल्स , साधे असले तर अगदी बिनधास्त अटेंड करायचो, पण जर ’स्पेशल पर्प” असले म्हणजे ऍटोमॅटिक स्टार्टींग , किंवा ऑटो लोड चेंज ओव्हर, किंवा ऑटॊ पॅरललींग तर थोडी बोंब व्हायची. पण नवीन काही तरी शिकायचा ’कीडा’ माझ्यामधे अगदी आधीपासूनच! आमच्या इथे एक नंदी म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअर होता. बंगाली बाबु.. होता तो. फॅक्टरी मधे असलो, की त्या नंदी बरोबर रहायचॊ आणि मग त्याच्याच मुळे रिले टायमर्स चं फंक्शन  आणि लॉजिक शिकलो.

तेंव्हा आजकाल प्रमाणे एक इलेक्ट्रॉनिक कार्ड वापरुन , बायनरी व्हॅल्युज टाकल्या की झालं.. असं नव्हतं.. आणि म्हणूनच फक्त  रिले टायमर्स बेस्ड पॅनल्स   वापरले जायचे.त्यांचं फॉल्ट फाइंडींग करायला तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग येणं , आणि लॉजिक समजणं अतिशय आवश्यक होतं . पण एकदा रिले टायमर्स ( ऑन डिले, ऑफ डीले) यांचं लॉजिक समजलं की  फॉल्ट  अटेंड करणं सोपं  होतं.

आजकाल २८६ / usb पोर्ट वरुन लॅपटॉप ला कार्ड जोडलं, की सगळ्या व्हॅल्युज  सेट करता येतात. काही कार्डस तर डायरेक्ट सेटींग चा असेस देतात.  एकदम सोपं झालंय सगळं..अजुन ही खरा प्रॉब्लेम येतो तो मॉडबस कनेक्टीव्हीटी वापरुन कस्टमरने आपला स्वतःचा प्रोग्राम वापरला तर.. असो.. उगाच फार टेक्निकॅलिटीज मधे जात नाही.

साधारणपणे त्याच काळात एक न्वीन ऍप्लिकेशन डेव्हलप झालं होतं- एक्सकॅव्हेटरचं.. पहिल्या ५ मशिन्स डिस्पॅच झाल्या होत्या. असं ठरलं, की त्या मशिन्सचं मॉनिटरिंग आपण स्वतःच करायचं. त्या साठी आम्ही आळीपाळीने साइट्स्वर जायचॊ. मी नर्मदा प्रोजेक्टची साइट अटेंड करायचो. तेंव्हा अगदी जस्ट सुरुवात होती. जेपी असोसिएट्स तिथे मुख्य कॉंट्रॅक्टर होते. त्यांनी नुकतंच गल्फ मधलं काम संपवून तिथली सगळी मशिनरी भारतामधे आणली होती.  मला त्या साइटवर ४ महिने रहावं लागलं होतं. आता तिथे करणार तरी काय? मॉनिटर करणं म्हणजे रोज सकाळी एकदा जाउन बघून यायचं इंजिन, रिडींग्स नोट करायचे आणि २५० तास झाले की मेंटेनन्स करायचं.  उरलेला वेळ काय करायचं? हा प्रश्न अगदी चुटकी सरशी सुटला.

ह्या ५ पैकी दोन मशिन्स भिलाइ स्टिल प्लॅंटला पण सप्लाय केल्या गेल्या होत्या. त्यांची ऑपरेटर्स केबिन स्पेशिअली डीझाइन्ड ३० फुट उंचिवर होती. वर चढतांना तर कांही नाही पण वायरींग चेक करतांना मात्र खूप भीती वाटायची भिलाइला पण कांही दिवस जावं लागलं होतं मॉनिटरिंग साठी .

मला भिलाइला जायला आवडायचं कारण तिथे गेलं की घरी जाउन भेटी घेता यायच्या. बॅचलर्सचया दृष्टीने घरी जाणं ही किती मोठी गोष्टं आहे ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही.

त्यांच्या वर्कशॉप मधे एक प्रभात म्हणून भैय्या होता. वय असेल साधारण ४० च्या आसपास, अगदी बाप माणुस.. अंगठा छाप, पण हायड्रॉलिक मशिनरी मधे एक्स्पर्ट.मी आणि गिरीश दोघंही डांगरी चढवुन त्याच्या बरोबर त्याच्या कामात मदत करायचॊ. त्याला पण फार बरं वाटायचं, की साहब साथमे काम करता है म्हणून. त्याच्या बरोबर राहुन मग हायड्रॉलिक सर्किट शिकलो.. एकदा त्याने सर्किट डायग्राम समजावून सांगितला डोझर चा आणि त्या वरून मग मी कुठलीही मशिन अटेंड करु लागलॊ. तुम्हाला खोटं वाटेल, पण सगळ्या मशिनरी चं हायड्रॉलिक सर्किट लॉजिक अगदी सारखं असतं.. इंजिन.. ड्राइव्ह करेल हायड्रॉलिक पंप, त्याचे दोन पाइप बाहेर निघणारे, एक बायपास दुसरा प्रायमरी व्हॉल्वला, नंतर सेकंडरी व्हॉल्व्ह, पुढे स्पुल्स व्हॉल च्या थ्रु कंट्रोल असतो. आता स्पुल व्हॉल तुम्ही कसाही कंट्रोल करु शकता, म्हणजे हाय्ड्रॉलिकली किंवा इलेक्ट्रिकली थ्रु सॉलेनॉईड्स. एनी वे…निघतांना प्रभातला आपल्या पैशानी एक एच एम टी अविनाश नावाचं घड्याळ घेउन दिलं.. तेंव्हा त्याच्या डोळ्यांतलं पाणी मी कधीच विसरू शकणार नाही. हाच माणुस होता.. की जेंव्हा ह्याला कळलं की माझा बर्थ डे आहे, स्वतःच्या पैशाने मिठाई आणून वाटली होती वर्कशॉप मधे सगळ्यांना… 🙂

केवडीया कॉलनी मधे दिवस मस्त गेले. अगदी ढोर मेहेनत केली आणि नवीन गोष्टी खुप शिकलो ज्याचा पुढे आयुष्यात खूप फायदा झाला.नर्मदा प्रोजेक्टबद्दल  तेंव्हा असं फारसं कोणालाच माहिती नव्हतं , केवाडिया कॉलनी मधे पण अजिबात कांही नव्हतं. रेडिओ ऐकणं हीच एक करमणूक. माझ्या बरोबर एक गिरीश गणपती म्हणून एक इंजिनिअर होता , तो हायड्रॉलिक मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग मधे काम करायचा. साइटला माझ्या प्रमाणेच पोस्टींग होतं त्याचं पण. दोन महिन्याने नंतर त्याला ओ एन जी सी मधे ऑफ शोअर रिग वर जॉब मिळाला. आणि तो गेला. नंतर कांही वर्षं पत्राद्वारे संपर्क होता, मग तो पण तुटला. नंतर असं ऐकलं की तो कुवेतला रिग वर जॉइन झाला म्हणून .

केवाडिया कॉलनी मधे तेंव्हा करमणुकीचे काहीच साधन नव्हते. कधी तरी एखाद्या सुटीच्या दिवशी आम्ही बडोद्याला फिरायला जायचो. मग एखादा सिनेमा, कुठे तरी शॉपिंग वगैरे असायचं.. तेंव्हा आमचा डीए ( टुर मधे मिळणारा) फक्त १२५ रुपये होता. पण तेवढ्यात ही अगदी लॅव्हिशली रहाता यायचं.  ४० रुपये रुमचे , बाकी इतर खर्च.. अगदी कधी ए सी रुम घेतली तर ६० रुपये. पण आम्ही शक्यतोवर नॉन एसी रुम मधेच रहात होतो.

इथे गुजराथ मधे दारु बंदी . अजूनतरी मी दा्रूला शिवलेला नव्हतो. तरी पण गुजराथ मधे अगदी मुबलक प्रमाणात दारु मिळायची. माझे मित्र सगळे रात्री बसायचे बाटली घेउन, पण मी फक्त कोल्ड ड्रिंक घेत असे.आम्ही जिथे रहायचॊ ते गव्हर्नमेंट ऑफ गुजराथ चं गेस्ट हाऊस होतं इरिगेशन डिपार्टमेंटच, त्यामुळे खाणं वगैरे अगदी खुपच स्वस्त होतं. समोर थोडं गेलं की  बसस्टॅड जवळच एक मारवाड्याचं दुकान होतं. तिथे जाउन आइसक्रिम चा फडशा पाडणे.. ( कारण प्रत्येक जण कमीतकमी २ चोको बार, आणि २-३ कप्स आइस्क्रिम सहज संपवत असे.)  हा एक मोठा उद्योग होता. एखाद्या दिवशी आम्ही गेलो नाही तर तो मारवाडी आइस्क्रिम घेउन गेस्टहाउस वर यायचा.. म्हणून म्हणतात ना, धंदा करावा तो मारवाड्यांनीच…!

केवडिया कॉलनी .. या साईटनी मला बरंच शिकवलं.. अगदी बऱ्याच इम्पोर्टेड मशिन्स इथे स्वतःच्या हाताने रिपेअर करता आल्या. हेवी इक्विप्मेंट्स चालवणे इथेच शिकलो. डॊझर, ग्रेडर आणि एक्सकॅव्हेटर तर होतेच, पण सगळ्यात अवघड इक्विप्मेंट म्हणजे क्रेन.. ती पण शिकलो. त्या काळी बुम ऍंगल आणि बुम लेंथ लोड च्या प्रमाणात ऍडजस्ट करणे- कुठलाही चार्ट नसतांना…. शिकलॊ. आउटरिगर्स न लावता लोड उचललं तर क्रेन टॉपल होते हे अनुभवलं.. ( किती मुर्ख पणा आहे नां? पण खरंच मी एक क्रेन चालवतांना आउटरिगर्स न लावल्यामुळे टॉपल झाली होती..)

केवडिया कॉलनीचं काम नुकतंच सुरु झाल्यामुळे डॅमची हाइट फक्त १० फुटाच्या आसपास होती. कॉंक्रीट  करतांना कॉंक्रिटचं टेम्परेचर पाहिलं जायचं पायरोमिटर वापरुन. कॉंक्रिट मिक्सिंग करता बॅचिंग प्लॅंट मधे बर्फ वापरला जायचा टेम्परेचर कमी ठेवायला. चौकशी केली, तेंव्हा असं कळलं की डॅम ची हाइट खूप जास्त होणार आहे म्हणून इतकी काळजी घेतली जाते.

ह्या साईटवरून निघतांना खरंच अगदी आपले जवळच्या मित्रांना सोडून निघतोय असं वाटलं होतं. पण नंतर १५ दिवसांनीच मला पुन्हा इथे पोस्ट करण्यात आलं.. आता एक महीन्या साठी… !

अजुन ही एकाही शिपवर किंवा बोटीवर जायला मिळालं नव्हतं. 😦

ह्याच्या आधिचा भाग इथे आहे..

स्वातंत्र्यदिन

Written by  on February 19, 2010

आज पंधरा ऑगस्ट. नेहेमी प्रमाणे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बुलेट प्रुफ काचेच्या मागे उभे राहून भाषण करतील, तिरंगा फडकवतील, जनता पण भक्ती भावाने इंडिया गेट समोर सुरु असलेली परेड पाहातील. बोफोर्स च्या तोफा, ज्यांचं नांव पण पूर्वी घेतांना राजकारणी विचार करायचे, त्याच तोफा मोठ्या दिमाखात रस्त्यावरून मिरवणुकीत सहभागी होतील.

काही नेते कुरकुर करत सकाळी उठून कुठल्या तरी संघटनेच्या , शाळांच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला जातील. तिथे लोकांना   कंटाळा येईपर्यंत मोठ   मोठी भाषणं देतील. शाळेतली मुलं मोठ्या उत्साहात इस्त्री केलेले स्वच्छ कपडे घालून ध्वजारोहण करतील. त्यांच्या  डोळ्यांमधे आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्नं असतील. 

भारतात असलेले निरनिराळे गट जसे सावरकरवादी, आंबेडकर वादी, समाजवादी, कॉंग्रेस , आणि अजून कुठला वाद सुटला असेल ते वादी, आजच्या दिवसाचं औचित्य साधून आपापल्या आयडीयल नेत्याची आठवण काढतील, त्यांचा स्वातंत्र्य संग्रामातला लढा कसा जास्त प्रखर होता हे सांगून इतर नेते कसे बोटचेप्या धोरणाचे होते हे सांगतील. काही पक्षातले नेते सध्याच्या हायकमांड मधे असलेल्या नेत्यांचे गुणगान करून फक्त आरती करण्याचेच काय ते शिल्लक ठेवतील. गल्ली बोळातले  भिकार नेते,चौका चौकात आपल्या  नेत्यांच्या फोटॊ  सोबत आपले स्वतःचे पण बॅनर लावतील.

आपल्या नेत्यांची तारीफ करतांना  स्वातंत्र्य युध्दातले जे  इतर नेते होते, ते कसे देशद्रोही होते, ह्याचा पण उहापोह केला जाईल. “काही” ( समझदार कॊ इशारा काफी है) वृत्तपत्रांमधे अशाच ब्लॉग ला प्रसिद्धी देऊन प्रस्थापित विरुद्ध “पूर्व कालीन विस्थापितांच्या” लढ्याच्या राख बसलेल्या  निखाऱ्यावर फुंकर घालून पेटवण्याचं काम इमाने इतबारे केले जाईल. वेगवेगळ्या सोशल साईट्स वर  अशाच काही कारणांसाठी खूप धुमाकुळ घातला जाईल .समाजातली दुही अजून वाढवण्याचे काम अशा साईट्स वर त्या साईटच्या मालकाच्या  नकळत  हमखास केले जाते.

कॉलजची मुलं आज सुटी म्हणून सिनेमा ,नाटकं, भटकंती प्लान करतील. आजचा दिवस केवळ एक जास्तीचा सुटीचा दिवस म्हणून तरूण तरूणी एंजॉय करतील. मला खरंच प्रश्न पडतो, ” आज म्हणजे १५ ऑ्गस्टला सुटी का दिली जाते?”

नेहेमी प्रमाणे रस्त्यावर तिरंगा झेंडे विकणाऱ्या गरीब कळकट मुलांचे झेंडे विकतांना फोटो मोबाईल ने काढून लोकं फेसबुक वगैरे सोशल साईट्स वर शेअर करतील, आणि जर भारतावर खरंच प्रेम करत असाल तर हा फोटो लाईक करा, शेअर करा म्हणून भावनिक अवाहन करतील. लोकं पण , आपण शेअर केलं नाही, किंवा लाईक केलं नाही तर देशद्रोही ठरू म्हणूनही बरेच लोकं  हे असे फोटो शेअर करतील.

रस्त्यावर विकल्या जाणारे तिरंगी झेंडे , जे आज  लोकं आपल्या  लहान मुलांच्या हातात विकत घेऊन देतील, किंवा काही स्टिकर च्या रुपात   शर्ट्स वर खिशावर लावून मिरवत  फिरतील, त्यातलेच काही उद्या तुम्हाला कचरा कुंडी मधे पडलेले दिसतील.  ध्वज म्हणजे राष्ट्राची शान आहे.जर तुम्हाला त्याचा आदर ठेवता येत नसेल, तर ते ध्वज विकत घेऊन आणि एक दिवस फडकवून  आपले बेगडी देशप्रेम दाखवू नका. तुम्ही देशप्रेमी आहात हे सिद्ध करण्यासाठी  तुम्ही तो दोन रुपयांचा ध्वज विकत घेण्याची काही आवश्यकता नाही.

ध्वज खराब झाला, फाटला, तर त्याचे  काय करायचे हे  कोणालाच माहिती नसते,  आणि मुलांचे खेळणं झाल्यावर फाटके झेंडे डस्टबिन मधे फेकले जातात. ” फाटलेला, खराब  झालेला ध्वज  एकांतात नष्ट करावा “असे ध्वजसंहीता सांगते”–   एकांतात ध्वज जाळून टाकणे हा अपराध नाही हे लक्षात ठेवा,आणि कृपया राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ देऊ नका.

गेली कित्येक वर्षं स्वातंत्र्यदिन असाच साजरा केला जातो. फक्त २००८ पासून एक फरक पडलाय, “जेल मधे कसाब , अफजल गुरु   पण वाट पहात असतील, कदाचित या ३१ डिसेंबरला पुन्हा एखादं विमान पळवून आपल्याला सोडवलं जाईल याची !”

कदाचित उद्या सकाळच्या पेपरला बातमी येईल, ” कसाब ने ’मराठी” मधे जेलच्या पहारेकऱ्याला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मेरा भारत महान.

  

माझं बॅचलर लाइफ…(३)

Written by  on February 17, 2010

आता सर्व्हिस इंजिनिअर म्हणून रुळलो होतो. कंपनीच्या कामाच्या निमित्याने सगळा भारत पाहून झाला होता. तसा मी अगदी लहान गावातून आलेलो, त्या मुळे विमान वगैरे फक्त आकाशातून उडतानाच पाहिलेलं. त्यामुळे विमान प्रवासाची ्खूपच क्रेझ होती. सर्व्हिस इंजिनिअरच्या लेव्हलला विमानाचा प्रवास अलाउड नव्हता. त्यामुळे अगदी कलकत्त्याला किंवा कोचिन ला जरी जायचं तरीही ट्रेननेच जावं लागायचं.

आम्हाला तेंव्हा फर्स्ट क्लासचं फेअर मिळायचं. त्यातूनही पैसे वाचवायला आम्ही सेकंडक्लास स्लिपरने प्रवास करित होतो. कारण फर्स्ट क्लासचं तिकिट लावणं जरुरी नव्हतं. तेंव्हा वाटायचं, ’जर ऍट द कॉस्ट ऑफ कम्फर्ट”कांही पैसे मिळत असतिल तर कांय हरकत आहे? हे जे पैसे वाचायचे त्याची पुस्तकं घेउन वाचायचो. माझ्या कडे जवळपास १०० च्या वर इंग्लिश नॉव्हेल्स जमा झाल्या होत्या, ज्या मी नंतर एका लायब्ररीला डोनेट केल्या.पुस्तकं तर अगदी मस्ट होती.. अहो ३६ तास रेल्वे चा प्रवास म्हंटल्यावर करणार तरी काय??

अजुन ही मी प्रवासामध्ये कुणाशी.. म्हणजे अनोळखी माणसाशी गप्पा मारत नाही. कारण माझ्या वडिलांच्या चुलत भावाला गुंगीच औषध देऊन लुटलं होतं, धुळ्याला, आणि त्या औषधाचा अंमल कमी न झाल्या मुळे त्याचा मृत्यु झाला होता.

प्रवासा मधे मी पुस्तक उ्घडून त्यात डोकं घातलं की मग आजूबाजूला काय सुरु आहे याकडे सरळ दुर्लक्ष करतो समोरचा माणुस किंवा फॅमिली कितीही सभ्य दिसली तरीही मी अजिबात बोलत नाही. चेहरे नेहेमीच फसवे असतात असं म्हणतात.

एकदा कोचिन चा एक कस्टमर होता. त्याने आमच्या एम डी ला पत्र पाठवलं होतं , तेंव्हा मी मुंबईला काही कामासाठी आलो होतो. तेंव्हा मला इथून सरळ कोचिनला जा म्हणून सांगण्यात आलं. अर्जन्सी मुळे विमानाचं तिकिट काढून दिलं होतं कंपनीने.. पहिलीच वेळ.. अगदी गांगरल्या सारखं झालं होतं.

त्या काळी फक्त एकच एअर लाइन्स होती , ती म्हणजे आपली इंडियन एअर लाइन्स. त्यांचा स्टाफ तेंव्हा पण खूप उद्धट होता.अगदी आज आहे ना तस्साच!दोन तासांची फ्लाईट होती कोचिनसाठी.

विमानतळावर पहिल्यांदा पोहोचलो आणि एका हातामधे तिकिट धरुन , आणि दुसऱ्या हातामधे बॅग धरुन इकडे तिकडे बावळट सारखा पहात राहिलो. तेंव्हाच विमानतळ जरी आजच्या इतकं चकाचक नसलं तरीही मी स्वतःला ऑड मॅन आउट फिल करित होतो. उगाच वाटत होतं की आपल्या शुज चं पॉलिश खराब झालंय का.. की आपण जरा चांगला शर्ट घालायला हवा होता.विमान तळावरचे सगळे लोकं माझ्या कडेच पाहताहेत असं वाटत होतं.

तेंव्हा चेक इन पण आज प्रमाणे कुठल्याही काउंटरवर होत नसे. प्रत्येक फ्लाइट साठी वेगवेगळे काउंटर्स असायचे.  लिहिलेल्या काउंटरवर जाउन उभा राहिलो बरोबर मशिनचे पार्ट्स पण होते.त्या काउंटरवरची बाई खेकसली यु हॅव नॉट स्क्रिन्ड द बॅगेज.. ह्या बायकांना इंडियन एअरलाइन्स मधे  व्यवस्थित  कसं बोलू नये ,किंवा उद्धटपणे कसं वागायचं ,ह्याचं ट्रेनिंग दिलेलं असावं.तिच्याकडे ओशाळवाण्या नजरेने बघून सॉरी म्हणत रांगे्तून बाहेर पडलो.  माझ्या मधला इन्फिरिअरिटी कॉम्प्लेक्स, आणि ते ऑड मॅन आउटच फिलिंग, त्यामुळे काहीही रिऍक्ट न करता बॅग स्क्रिनिंग करुन आणली.आणि बोर्डींग पास घेउन एकदाचा विमानात शिरलो.

खिडक्यांमधून खालची गम्मत पहातांना मजा वाटंत होती.थोडी भिती.. विमान खाली कोसळलं तर?? अहो हसता काय.. खरंच असंच वाटंत होतं.अगदी  जीव मुठित धरुन बसलो होतो मी. तरी पण सगळं मॅनेज करुन कोचिनला पोहोचलो.. त्या वेळी सिट नंबर होता.. ए २१. 🙂 काही गोष्टी अगदी पक्क्या लक्षात रहातात, त्यातलीच ही एक. तुम्हाला खोटं वाटेल , मला तेंव्हा विमानातला लंच    मेनू पण आठवतो.आज २३ वर्षानंतर सुध्दा 🙂  🙂 नंतर मात्र बरेचदा विमानाचे प्रवास झाले आणि आता तर जेट एअरवेज चा प्लॅटिनम कस्टमर आहे. म्हणजे वर्षामधे ८० फ्लाइट्स होतातच, पण पहिला प्रवास तो पहिला प्रवास. पक्का आठवणीत आहे.

या बोइंग चा प्रवास वेगळा. पण कांही ठिकाणी जाण्यासाठी ऍव्हरो विमानं होती.  ट्विन इंजिन्स ची प्रोपेलर ड्रिव्हन, त्यामधे वैमानिक समोरच दिसायचा. भर्र्र्र्र्र्र्र्रा आवाज यायचा. त्या विमानात बसलो, की एअर होस्टेस  कानात घालायला कापुस आणुन द्यायची. मुंबई ते पोरबंदर नेहेमी ऍव्हरो नेच जावे लागायचे. तिकिट होतं ४६० रुपये फक्त..  🙂

एकदा  प्रॉब्लेम फेस केला होता एका फिशिंग बोटीवर . एका कस्टमर कडे अगदी नवीन पॉवर पॅक मधे थ्रस्ट रिंग चं अनयुजवल विअर झालं होतं, ते अटेंड करायला म्हणून मला गोव्याला पाठवलं होतं. इथे पर्शियन नेट पध्दत वापरुन फिशिंग करण्यासाठी हा २०० हॉर्स पॉवरचा पॉवरपॅक लावला गेला होता.

कस्टमर टिपिकल गोवानिज ख्रिश्चन. अतिशय सोबर माणुस होता. होता असं लिहिलंय कारण तो आता वारला. त्याच्या बोटीवर गेलो आणि ही माझी पहिली व्हिजिट बोटीवर जाण्याची. सगळं चेक केलं आणि नंतर प्रॉब्लेम रिझॉल्व्ह केला.  त्याच्या बोटीवर एकदा फिशिंग करता पण जाउन आलो , डिप सी मधे.. ह्यांची फिशिंगची पद्धत थोडी वेगळी होती. बोट डिप सी मधे गेली की मग एक लहान नांव सोडली जाते समुद्रामधे , जाळ्याचं एक टॊक ह्या लहान नावेमधे बांधले जाते. आणि जाळ्याचे दुसरे टॊक घेउन मोठी बोट फुल्ल थ्रॉटलवर गोल चक्कर मारते त्या लहान नावे भोवती.  इतक्या स्पिडने फिरल्यामुळे मासे जरा जास्त प्रमाणात पकडले जातात नेट मधे.

समुद्रामधे बोट जेंव्हा फिशिंगला जाते , तेंव्हा ती जो पर्यंत पुरेसा कॅच मिळत नाही तोपर्यंत परत येत नाहीत. मग त्या करता कधी कधी ३-४ दिवस पण लागतात. समुद्रामध्ये जातांना बोटीमधे २ टनाच्या आसपास बर्फ भरुन नेलेला असतो. या फिशिंग ट्रौलर्स मधे सगळ्या सोई असतात. नसते ,ते फक्त टॉयलेट. त्या साठी दोन लांब पट्ट्या बोटीच्या मागच्या भागाला एक्स्टॆंड केलेया असतात. त्यावर बसूनच सगळे विधी डायरेक्ट समुद्रात आटपावे लागतात. नवीन माणसाला निश्चित भीती वाटते. ते बघितल्या शिवाय समजणार नाही. सध्या फोटॊ नाही त्याचा, पण नंतर जेंव्हा कधी काढेन तेंव्हा नक्कीच इथेच या पोस्ट वर इन्सर्ट करिन.

ह्याचं काम आटोपलं आणि तो घरी घेउन गेला. त्यानेच मला सांगितले की मासे एकदा पाण्याबाहेर काढले आणि मग ते ४ तासामधे कुक केले नाही तर त्यांची स्किन सुटून येते. म्हणे तुम्हाला कळत नाही, पण आम्हा कोळ्य़ांना मात्र नक्की समजतं. पांपलेट्चं तोंड दाबल्यावर लाल पाणी बघून तुम्ही लोकं ठरवता म्हणे, पांपलेट चांगलं आहे की नाही.त्यानेच सांगितलं की,स्किन सुटली की मग फिशचा वास सुरु होतो पण म्हणे तुम्हा लोकांना ते एकदम समजणार नाही. म्हंटलं , अरे बाबा, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधी फिश घ्यायला जाणार नाही.. मला काय सांगतोस हे?? पण ऐकुन घेतलं सगळं.

त्याच्याच घरी पहिल्यांना ऑलिव्हज खाल्ले होते. ऑलिव्ह  हिरवे– आणि ब्राइन वॉटरमधे प्रिझर्व केलेले, आणि मी सकाळी सकाळी म्हणजे ११ वाजता ड्रिंक्स घेत नाही म्हणुन मला ऑरेंज ज्युस..अगदी खरं सांगतो पहिला ऑलिव्ह खाल्ला, तर हे काय विचित्र? आणि हे लोकं खाऊ तरी कसे शकतात? हाच प्रश्न मनात आला पहिल्यांदा. पण त्याने इतक्या प्रेमाने आणले म्हणून टाकुन देणे पण बरं वाटत नव्हतं. म्हणून संपवले कसे तरी. नंतर मात्र म्हणजे संपायला आल्यावर ह्यांची चव आवडायला लागली होती. तसं नंतर पिकल्ड ऑलिव्ह्ज ( व्हिनेगर मधले ) पण एकदा विकत घेउन गेलो होतो घरी. त्यांची चव मात्र फारशी आवडली नव्हती. त्यांचा दाताखाली चावल्या नंतर आंबटपणा पार मेंदूला कुरतडतो..

ह्या कस्टमरनी मग घरीच माझ्यासाठी मुद्दाम बनवलेली फिश, लॉबस्टर्स, आणि इतर बरेच प्रकार खाऊ घातले. हे गोवनिज ख्रिश्चन्स स्वभावाने खरंच खुपच चांगले असता्त. आजही माझं हे मत कायम आहे.आणि अरे कारे.. तुका .. माका करुन बोलतात.. म्हणजे तुकां समजंत नांही काय रे.. असं म्हंटलं तरी वाईट वा्टून घ्यायचं नाही. अरे कारे करुन बोलणं ही इथली पद्धतींचं आहे.बोलतांना ब्लडी फक, ब्लडी मॅन.. करुन बोलतात, पण स्वभाव अगदी रॉयल असतो यांचा. एकदा मैत्री झाली की मग बस्स!! ’अगदी दिल खोल के’ तुमच्याशी वागतील.

आता इथे फिशिंगचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, कोचिनला अजूनही चायनिझ फिशिंग नेट्सचा वापर करुन फिशिंग करतात. ह्या मधे एका मोठ्या खांबाला जाळं बांधलेलं असतं ते पसरलेल्या स्वरुपात. आणि सरळ जाळं खाली समुद्रात टाकलं जातं आणि मग कांही वेळाने ते वर उचललं जातं.. समुद्र किनाऱ्यावरच पकडलेली फिश फ्राय करुन द्यायची व्यवस्था आहे तो फोटॊ आहे एकदा काढलेला इथे पोस्ट करतोय..

आमचं एक मरीन डिव्हिजन म्हणून वेगळं डिपार्टमेंट होतं. जे इम्पोर्टेड पॉवर पॅक्स विकायचे आणि सर्व्हिस आणि स्पेअर्स पण प्रोव्हाइड करायचे. त्यांच्या मदती साठी म्हणुन इंडियन नेव्ही च्या फ्रिगेट्स अटेंड केल्या होत्या तेंव्हा.  रशियन अल्टरनेटर ला ४०० सायकल, प्रिक्वेंसी आणि ११० व्होल्ट होता, त्याला कपल केलेली इंजिन्स होती , ती अटेंड केली .

तिथे गेल्यावर पहिले काम काय केलं असेल तर सगळी शीप फिरून आलो. अगदी रडार रुम पासुन तर इंजिन रुम पर्यंत सगळीकडे. तेंव्हा जिपिएस नव्हती. इंजिन रुम मधे अगदी काम करायला पण जागा नसते. पहिल्या वेळी अगदी नव्या नवरी प्रमाणे स्थिती झाली होती माझी.. काय करू? आणि काय बघू? हेच समजत नव्हतं टार्गेट लॉक कसं करतात? टॉर्पेडॊ आणि टॉर्पेडॊ लॉंच कसे होतात ते पण बघितलं.  व्हिल रुम मधे जाउन कंट्रोल रुम बघितली.. मजा आली होती. आता कांहीच वाटत नाही, पण तेंव्हा मात्र खूप अप्रुप वाटलं होतं ह्या सगळ्या गोष्टींचं. आता रिसेंटली सौ. आणि मुली विक्रांत वरचं म्युझियम बघून आल्या. मला म्हणे तुम्ही चला, पण टाळलं.. म्हंटलं, सुटीच्या दिवशी पण काम आठवेल मला, तुम्हीच जा आणि मजा करुन या परत.

गोव्याला आयर्न ओअर च्या खुप माइन्स आहेत . त्या माइन्सची मालकी सेसा गोवा, डेम्पो माइनिंग, किंवा साळगांवकरांच्या आहेत. मॅक्झिमम ओअर हा जपान आणि चायनाला एक्स्पोर्ट होतो. गोव्याच्या जवळचा समुद्र जरा कमी खोल आहे, त्या मुळे शिप्स किनाऱ्यावर येत नाहित. सगळा आयर्न ओअर बार्जेस मधुन मदर शिप पर्यंत ट्रान्सफर केला जातो. या बार्जेसची पॉवर पॅक्स कमिशनिंग करता नंतर गोव्याला बरेच दिवस रहावे लागले.

गोव्याला रहाणं सुरु झाल्या पासून रवा फ्राय फिश खायला शिकलो होतो. फिश खाताना काटे वगळून कसा फिश खायचा ते शिकलो. पापलेट पेक्षा चणक किंवा किंगफिशची स्लाइस पण जास्त आवडायला लागली.  गोव्याला असे पर्यंत रोज फिश करी आणि राईस हाच मेन कोर्स असायचा.  सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे गोव्याचा फेमस भाजी पाव आणि मिरची भजी. कधी तरी चेंज म्हणून बन्स ( हे पण होम मेड बरं का, खुप छान टेस्ट असते यांची) आणि चहा पण ट्राय करायचो. समहाउ , गोवा आवडायला लागलं होतं. सुरुवातीला कांही दिवस म्हापसा, पणजी करता करता शेवटी कोलवा बिच वरचं एक हॉटेल फायनल झालं नेहेमी रहाण्यासाठी.

या आयर्न ओअर माइन्स मधे कांही डम्पर्स , क्रेन्स वगैरे होत्या. त्या अटॆंड करायला पण मी इथे बरेचदा यायचो. दिवसभर माइन्स मधे काम केलं की मग  रात्री परत रुमवर आल्यावर अंघोळ करायचॊ. तेंव्हा नुसतं लाल पाणी निघायचं केसांतुन! हॉटेलवाला पण आम्हाला दोन टॉवेल्स द्यायचा. एक जुना… आधी जुन्या टॉवेलला डॊकं पुसा नंतर नवीन टॉवेलला.. असं म्हणायचा. :). एकंदरीत अगदी थोड्या दिवसातच मी कंटाळलो गोव्याला.

४ वर्षं झाली होती एकटं राहुन , पण ड्रिक्स ची सवय लागली नव्हती, अगदी स्कॉच जरी समोर ठेवली तरीही मला कधीही इच्छा झाली नाही .आमच्या गोवा ऑफिस चा सर्व्हिस इंजिनिअर एक ख्रिश्चन होता. त्याच्या घरी गेलं की नेहेमी म्हणायचा की  पण नंतर मात्र एखादी बिअर वगैरे घेणे सुरू केले.. ते पण केवळ कंपनी म्हणून.

माझा एक सिनिअर नेहेमी सांगायचा,  रोज तुम्ही कंपनी अकाउंटवर असणार ,तेंव्हा या सवयी साठी स्वतःचा पैसा खर्च करावा लागणार नाही. पण केवळ कंपनी देते म्हणून आपल्याला वाईट सवयी लागु देउ नका.. आणि ते वाक्य अगदी पक्कं मनात बसलं होतं.. आहे… ! अजूनही ड्रिंक्सचं फारसं वेड नाही.. पण कधी तरी बिअर प्यायला आवडते.. अगदी मनापासुन.. !पण कोटा मात्र एक बिअरच्या वर जाऊ दिलेला नाही.. 🙂

माझं लहानपण विदर्भात गेलेलं , त्यामुळे समुद्र म्हणजे खूप आवडायचा. रोज सकाळी समुद्रावर जायला आवडायचं .त्यामुळे गोव्याचं मेन आकर्षण म्हणजे समुद्र….

एखाद्या रिजन मधून रिक्वेस्ट आली की कांही काम जमत नाही , तेंव्हा आम्हाला जावं लागायचं. त्याच पिरियडला माझं पोस्टिंग धनबादला झालं होतं. धनबादला तेंव्हा ऑफिस पण होतं ते कलकत्ता रिजनल ऑफिसच्या खाली होतं..कोल माइन्स मधे  काम असायचं. धनबादला जरी बिसिसिएल चं ऑफिस जरी धनबादला होतं तरीही माइन्स मात्र आसनसोल ते चांपापुर पर्यंत पसरलेल्या होत्या.

त्यामुळे  माझं रहाणं मात्र अकबर हॉटेलमधे आसनसोल ला होतं. आसनसोलहुन रोज साइटवर जाण्यासाठी एका मित्राची मेटॅडॊर होती.( हो.. मेटॅडॊरच .. त्याच्या कंपनिने त्याला मेटॅडोर दिली होती.. जिप का नाही? ते अजुनही माझ्या लक्षात आलेलं नाही)  दोघांनाही एकाच ठिकाणी काम असल्यामुळे तिथे दोघंही रोज बरोबरंच जाणं येणं करित असुं. त्या माइन्स मधे खाण्यापिण्याचे हाल खुप व्हायचे. रस्त्याने जातांना रानिगंज म्हणुन एक धाबा होता. तिथे नाश्ता वगैरे मस्त मिळायचा. पण सोबतंच प्रॉस्टीट्युशन पण चालायचं , ही गोष्ट लक्षात आल्यावर तिथे जाणं बंद केलं आणि आसनसोलहुन निघतांनाच ब्रेकफास्ट करुन निघणं सुरु केलं.

एक झरिया म्हणून माइन्स आहे की ज्यामधे जमिनीखाली कोळसा पेटलेला आहे. ती माइन्स पण बघून झाली . या माइन्सची आग विझवायचा प्रयत्न बरेचदा केल्या गेलाय. पण अजुन तरी यश मिळालेलं नाही. इथल्या कोल माइन मधे मिथेन चं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे कोळसा स्वतःहूनच आग पकडतो ती माईन पण बघून झाली. नर्मदा प्रोजेक्ट प्रमाणेच इथले लोकंही आपापली घरं सोडून जायला तयार नाहीत.

आमचं काम तिथे +++ कंपनीत असायच. पण प्रायव्हेट कंपनी असल्यामुळे कॅंटीनची वगैरे सोय नव्हती. जेवण्यासाठी म्हणून लहानशा झोपड्यांमधली खास बिहारी हॉटेल्स असायची. समो्रून सारखी डंपर्स ची वर्दळ, त्यामुळे उडणारी धुळ त्या हॉटेलातील स्वयंपाकावर बसायची. पण काहीच उपाय नाही म्हणून आम्ही तिथेच जेवायचो. अर्थात जेवण एकदम टेस्टी असायचं.. तुम्ही म्हणाल, काय चिप टेस्ट आहे या माणसाची पण  अगदी खरं सांगतो, तिथे तुमच्या समोर तंदूर मधुन काढलेली रोटी आणि सरसुच्या तेलामधली भाजी म्हणजे आधी घशाखाली उतरत नव्हती . सरसु च्या तेलाचा वास अगदी सहन होत नव्हता. पण नंतर मग हळू हळू सवय झाली आणि आवडायला लागलं. सुरुवातिचे काही दिवस मी अगदी  साधा भात आणि साधं वरण खायचो. पण नंतर मात्र सगळं खाणं सुरू केलं..असं म्हणायचे की तिथे कसंही खाल्लं तरी पचत. जेवणामध्ये रोज वरण, भात, भुजिया म्हणजे सुकी भाजी, आणि तंदुरी रोटी असायची. कधी तरी चेंज म्हणून सत्तु की पुडी पण असायची.

बिहारात आलू का चोखा नावाचा एक प्रकार मिळायचा. उकडलेला बटाटा, त्यामधे कांदा, हिरवी मिर्ची, कोथिंबिर आणि सरसुं चं तेल घालुन एकत्र कालवलेला तो प्रकार पण मला खुप आवडायला लागला होता. कधी कधी तर फक्त आलु का चोखा आणि रोटी हेच जेवण असायचं. अजूनही घरी आम्ही सरसूंच्या तेलाची बाटली आणून ठेवतो चोखा बनवायला.

बिहारात सकाळचा नाश्ता म्हणजे एका स्वच्छ परातीमधे चिकन विंग्ज तयार करुन ठेवलेले असायचे एका हॉटेलमधे. आणि ती परात मंद आचेवर ठेवली असायची. रोज सकाळी नाश्ता म्हणजे चिकन विंग्ज (त्याला बंगाली लोकं चिकन चॉप्स म्हणायचे) आणि रोटी असायचा. रोज एकाच नाश्त्याचा कंटाळा यायचा म्हणुन एक व्हेज हॉटेल पण शोधून ठेवलं होतं. आता नांव विसरलो. पण तिथे सत्तूकी पुडी, किंवा सत्तू का पराठा आणि आलु मटर भाजी + जिलबी मिळायची. पण ब्रेकफास्ट मधे दोन पैकी एकच गोष्ट असायची हे नक्की. अगदीच चेंज म्हणून सिंघाडा+ जिलबी पण चालायचं..

किती भर भरुन लिहितोय ना मी खाण्या बद्दल? खरंच हो.. मला खाण्याची अगदी मनापासून आवड आहे. मी एक चांगला कुक आहे बरं कां. त्यामुळे खाण्याचा विषय निघाला की आम्ही खल्लास!!!!!

बाय द वे , ट्रेन ने कलकत्याला जातांना ट्रेनमधे ‘ झाल मुडी’ म्हणून एक भेळेसारखा प्रकार मिळायचा. एक घाणेरडा माणुस एक टॊपली आणि त्या टोपलिला अटॅच असलेले लहान लहान डबे ( ज्या मधे फरसाण, दाणे, खोबरं, चणे, इत्यादी गोष्टी असायच्या) तो प्रकार पण मला खूप आवडायचा. त्या मधे सरसुंचं तेल घालायचा तो माणुस . तिथुनच मला ती सवय झाली सरसूं चं तेल खाण्याची. आणि या सवयीचा मग मला पुढे बराच फायदा झाला.

याच बिहारी कस्टमर्सच्या अनुभवा मधे एक प्रसंग अगदी जीवघेणा होता. एका एक्सकॅव्हेटरचा कुलिंग फॅन तुटला होता. तो फॅन असतो इम्पोर्टेड.. तुटण्याचे कारण म्हणजे जेंव्हा मशिन सुरु केली तेंव्हा काम करतांना मशिनवर राहिलेला स्कृ ड्रायव्हर तिथे पडला आणि फॅन मधे अडकुन फॅन चे अगदी तुकडे तुकडे झाले होते. मी त्याची वॉरंटी रिफ्युज केली , तर त्या कस्टमरने साइटवरच्या ५-६ माणसांना मला धरुन ठेवायला सांगितलं. तलवार काढुन म्हणाला, अगर तुने वॉरंटी रिपोर्ट नही बनाया, तो तेरेको अभी काट दुंगा और, ये तो कन्स्ट्रक्शन साईट है, गढ्ढेमे दफना दुंगा..उपर मिट्टी डालके डॊझर चला दुंगा और कॉंम्पॅक्टर ( एक प्रकारचा रोड रोलर असतो हा) चलादुंगा तो किसिको पता भी नहीं चलेगा…चल, साइन कर , की फेल्युअर वॉरंटेबल है.. त्याच्या डॊळ्यामधले भाव पाहिले आणि खात्री पटली की हा जे म्हणतोय तेच करु पण शकतो. सरळ आणि थरथरत्या हातांनी रिपोर्ट साइन करुन दिला.आणि साईटवरुन बाहेर निघालो. रिअल लाइफ मधे आपण अमिताभ बच्चन नसतो , की लढुन त्या व्हिलनला मारायला. रिअल लाइफ हे खुप वेगळं असतं रिल लाइफ पेक्षा.

रुमवर आल्यावर आधी हेड ऑफिस मधे फोन करुन झालेली घटना सांगितली, आमचे एच ओ चे मॅनेजर म्हणाले, ठिक आहे, जे केलं ते योग्यंच केलंस.. आणि विषय संपवला. माझं पण मन थोडं हलकं झालनंतर कळलं , की बिहार मधे असे प्रकार नेहेमिच होत असतात. तेंव्हा स्वतःचा जीव जास्त महत्वाचा हे लक्षात ठेऊनच कामं करायची असतात.

बिहारमधे जवळपास बरेच लोकं तंबाखु खातात. साईट वर पण कु्णीतरी तो तंबाखू मळायचा आणि डाव्या हाताच्या कोपराला उजव्या हाताच्या बोटांनी आधार देत हात समोर करायचा.आधी एक  कण  उचलायचो, नंतर त्या कणाची चिमुट कधी झाली आणि सवय लागली तेच कळलं नाही. 😦 नंतर ही सवय सोडतांना खुप त्रास झाला.

घरटी लावा- पक्षी वाचवा…

Written by  on February 12, 2010

सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते.

पुर्वी आई  लहान बाळाला मांडीवर घेउन कविता म्हणायची, चिऊ ये, काऊ ये, दाणा खा……… त्यातली खरी खरी चिऊ दाखवायला तरी शिल्लक राहिली तर बरं, कारण

चिमणी

आजकाल हा पक्षी फारच  दिसणे तर फारच दुर्मिळ झालय . स्पेशली मुंबईला तर फक्त कावळे आणि कबुतरंच दिसतात ,  चिमणी  कधीतरी चुकुन एखाद्या वेळेस  दिसली तर नशिब म्हणायची वेळ आलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे शहरं म्हणजे   नुसतं कॉंक्रीटचं जंगल झालंय. चिमण्यांना   आपलं घरटं बांधायला झाडंच शिल्लक ठेवलेली नाहीत आपण . हीच परिस्थिती लहान शहरातुन पण दिसून येते. घरामधे पण कचरा ्होतो म्हणुन लोकं  पक्षांना घरटी बांधू देत नाहीत.

कालच्या पेपरला एक बातमी वाचली की चंद्रपुरला तापमान ४४ डिग्री झालं आणि बरेच पक्षी मरून पडले. उन्हाळ्याच्या दिवसामधे  विदर्भामधे  बरेच लोकं घराबाहेर पाण्याने भरलेले भांडे आणि थोडे धान्य पक्षांसाठी ठेवतात. ती पक्षी मेल्याची  बातमी  वाचल्याबरोबर शाम  जोशी आठवला. शाम्याच्या खोड्यांबद्दल लिहायचं तर एक मोठा प्रबंधच लिहावा लागेल, म्हणुन आजचं पोस्ट फक्त सर्पमित्र शाम जोशी  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/03/12/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/)बद्दलचं!! (सर्पोद्यान तयार करून स्वतःच्या पदरच्या पैशांनी त्यांची देखभाल करणारा हा शाम सारखाच असू शकतो.) भरपूर मेहेनत, व्यायाम आणि उरलेल्या वेळात  हे असे उद्योग म्हणजे शाम जोशी. प्रत्त्येकवेळेस काहीतरी जगावेगळं करायची हौस मग ते घरामधे कोब्रा पाळणं असो, की पक्षी संवर्धन असो.

कोब्रा फ्रेंड्स .. साप निघाला की यांना फोन करायचा, हे लोकं येउन सापाला जिवंत पकडुन रानात सोडुन देतात

मध्यंतरी नागपूरला चक्कर झाली , तेंव्हा यवतमाळला पण जाऊन आलो. अर्थातच जुन्या मित्रांना भेटायला जाउन आलोच.. त्यात पहिला नंबर होता शाम जोशी ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/03/12/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/) चा! त्याच्यावर अगदी नविन नविन ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा एक पोस्ट लिहिलं होतं. शाम कडे गेलो तर तो समोरच एक मोठा  डिस्प्ले बोर्ड दिसत होता -कोब्रा मित्र ऍडव्हेंचर क्लबचा – अगदी जुनाट बोर्ड होता तो खराब झालेला – कदाचित कुठल्यातरी प्रदर्शनासाठी  बनवला असावा, पण आता घरी आणुन ्ठेवला होता.     समोरच्या  जिन्याखालच्या लोखंडी तारांच्या जाळीने तयार केलेल्या  खोलीमधे काही मडकी होती ती पहात शाम उभा होता.

मी समोर गेलो तर तो बाहेर आला. घराच्या समोरच्या भागात  छताला त्या जाळीत असलेल्या मडक्यांप्रमाणेच काही मडकी बांधलेली दिसत होती. त्या मडक्यांना दोन छिद्र होती.  विचारलं, की हे काय आहे??  म्हणाला, ” चिमण्यांना ्घरट्यांसाठी जागा मिळत नाही, म्हणून ही अशी मडकी उंचावर थोड्या सावलीत बांधून ठेवायची, म्हणजे त्या मधे चिमण्या घरटी बांधतात .  असं मडकं अडकवून ठेवल्यावर ताबडतोब चिमण्या येत नाहीत. कधी कधी तर सहा महिने ते दिड वर्ष त्या नुसतं निरिक्षण करतात, पण एकदा सुरु झालं , आणि विणीच्या   पिरिय़ड मधे अंडी देणय़ाची वेळ आली की मग दर वर्षी नेमाने त्या ते घरटं वापरतात. मला खूप आश्चर्य वाटलं. समोरच्या घरट्यामधे चिमणीची पिल्लं दिसत होती. शाम्या म्हणाला, की एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे त्या मडक्यांना सारखं हाताळायचं नाही,किंवा सारखं त्यामधे बघायचं पण नाही की चिमण्या आल्या की नाही ते.

शाम जोशी त्याने बनवलेल्या पक्षांच्या घरट्या बरोबर..

दुसरा फोटो शाम जोशीचाच.. बर्ड नेस्ट्स सोबत..

वेगवेगळ्या आकाराची घरटी खास बनवुन घेतलेली. शाम्या वाटतो बरं कां ही घरटी..

चिमण्या आल्या बरं कां या घरट्यामधे. चांगले सहा महिने वाट पाहिली त्यानी, आणि मगच आल्यात त्या.

ही घरटी चिमण्या आणि मैना वापरतात. एकदा तिथे एक पिढी गेली, की दुसऱ्या वेळी, दुसरी चिमणी घरटं टेकओव्हर करते. कन्सेप्ट मला खूपच आवडला. शाम्या म्हणाला, की त्याने स्वतः अशी मडकी बनवून घेतलेली आहेत आणि ज्या कोणाला हवी असतील त्यांना तो ती घरासमोर लावायला वाटतो.  पक्षांच्या नामशेष होण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांना घरट्यासाठी  सुयोग्य जागा न मिळणे  हेच आहे.

या बाबतित पब्लिक अवेअरनेस  तयार करायला शामने काही हॅंडबिल्स छा्पून वितरीत केली आहेत.  पर्यावरण रक्षणात एक खारीचा वाटा… निसर्गावर एकदम दिलसे प्रेम करणारा शाम् बघितला, आणि पुन्हा आपला लहानपणीचा मित्र ( होळीच्या वेळेस झाडं तोडण्यात सगळ्यात पुढे असलेला ) तो हाच कां? याचा विचार करीत बसलो , म्हंटलं हॅट्स ऑफ टू यु शाम्या.. ग्रेट वर्क!!!

हेच ते हॅंडबिल , जे लोकांमधे जागरुकता निर्माण करायला छापलंय शाम जोशीने.