आजी

Written by  on January 25, 2010

पूर्वीच्या काळी आजी म्हणजे घरातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती. तिला ’मोठी आई’  म्हणायची पद्धत होती विदर्भात. कारण काय, तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती  असायची, त्या मधे  आपल्या आईला आई म्ह्टल्यावर    वडलांची आई म्हणजे ’मोठी आई  .

तिच्या कडे काय नसायचं? अगदी डोकं दुखतंय, थांब सुंठ उगाळून देते म्हणणारी आजी, पाय लचकला? आंबे हळद उगाळून लावून देणारी  आजी , बाजार आणायचा? थांबा म्हणून  कंबरेच्या केळातून( नऊवार लुगडं  नेसताना पोटाशी केळा प्रमाणे गॊळा होतं, त्या मधे पैसे ठेवायची आजी ) किल्ली  किल्लीने कपाट उघडून पैसे काढून  आजोबांच्या हातात देणारी – थोडक्यात म्हणजे काय तर आजी म्हणजे सबकुछ!! असं तिचं घरातलं स्थान असायचं ! पूर्वी घरामधे कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी आजीची परवानगी घेणे आवश्यक असायचे.स्वयंपाक काय करायचा या पासून तर चिंगी साठी तो साठ्यांचा मुलगा चांगला की जोशांचा?? घरातल्या प्रत्येक गोष्टीत तिचे मत म्हणजे फायनल मत असायचं.आजोबा पण, ” अहो, ऐकलंत कां, …. म्हणून शेवटचा कौल आजीचा घ्यायचे.  आजी शिवाय घरातलं पानही हलत नसे.

मुलांवर संस्कार करण्याचे काम पण  तिचेच असायचे. मग ते सकाळी उठल्यावर श्लोक वगैरे म्हणणे असो, की रात्री बे एकं बे, ते तीन दाहे तीस पर्यंत मुलांकडून पाढे, रामरक्षा वगैरे झोपण्यापूर्वी म्हंटले की नाही या कडे लक्ष देण्याचे काम   पण तिचेच ! मुलांना शिस्त लावणे हे तर महत्त्वाचे आहेच, पण त्या शिस्तीच्या बडग्याखाली त्यांचं लहानपण कोमेजून जाऊ नये म्हणून  काळजी घेण्याचं काम पण तिचंच असायचं.  एखाद्या वेळेस   आई मुलावर ( म्हणजे तिच्या नातवावर) कुठल्याही कारणाने  रागावली  किंवा मारायला लागली,  की त्याला   त्याला लगेच पदराआड घेणारी  आणि मार चुकवणारी पण   आजीच असायची.

संध्याकाळी बाहेरून खेळून आल्यावर आधी हात पाय धू मग नंतर घरात ये असं म्हणणारी आजी, देवाला नमस्कार करून रामरक्षा म्हणून झाल्यावर तिला नमस्कार करायला गेलो की ” आई बाबांना नमस्कार केलास की नाही?” या जगात त्यांच्यापेक्षा मोठं कोणीच नसतं राजा! ” असं सांगणारी आजी!  रात्री झोपण्यापूर्वी पुराणातील कथा सांगणारी आजी.. आणि त्याच बरोबर आमच्या आजीच्या उतार वयातही तिच्या शब्दाबाहेर न जाणारे वडील पाहिले की आज आमची मुलं काहीतरी मिस करताहेत असे वाटते.

एकदा आजीला म्हणालो होतो, की जर ’आई- बाबा’ या जगात सगळ्यात मोठे आहेत, तर मग आई बाबा जिवंत असतांना पण आरतीच्या शेवटी आपण “त्वमेव माता च पिता त्वमेव…………..” असं का म्हणतो? देव हा देव आहे , त्याला आई – बाबा का बनवायचं?? तूच तर नेहेमी म्हणतेस, की जगात फक्त एकदाच आई-वडील मिळतात आणि ते देवापेक्षा पण मोठे असतात – मग हे असं कां?” त्यावर आजीने दिलेले उत्तर आजही लक्षात आहे, ” अरे ते आपण देवाला तू माझ्या ’आई-वडिलांसारखा ’ माझी काळजी घे म्हणून घातलेले साकडे आहे हे.  तुझी काळजी  कोण घेतं?  तुझे आई-बाबाच घेतात ना? मग त्या देवाची  आई-बाबांशी तुलना करून आपण आईवडीलांना मोठेपणा देतोय , देवाला नाही…..” हे विसरलेले वाक्य परवा पुन्हा आठवले आणि मग आजी आठवली.. आणि हा लेख लिहायला घेतला.

पूर्वीच्या काळी लग्न फार लवकर व्हायची म्हणून आजी व्हायचा मान पण फारच लवकर मिळायचा. वयाच्या ४० च्या  दरम्यान   स्त्री आजी व्हायची, पण हल्ली तसे नाही- वयाची २५शी ओलांडल्या शिवाय काही मुली लग्न करत नाहीत. त्यामुळे वयाची पन्नाशी ओलांडल्या शिवाय  मुलींच्या आयांना आजी होण्याचा चान्स मिळत नाही. करीअर , लग्नाचं वय, सगळं काही बदललं आहे.

वयाची ५०शी आली की आजी होण्याचे वेध लागतात. कोणी आपल्याला काकी म्हंटलं की चिडचिड करणाऱ्या मध्यमवयीन स्त्रिया पण आजी होण्याची चाहूल लागली की एकदम बदलून जातात. वेगळ्याच जबाबदारीची जाणीव होते, आणि मग “आपल्या वेळेस” सासुबाईना / आजे सासुबाईंनी  किंवा आईने काय काय केले होते याची उजळणी सुरु होते.  फक्त  नऊ वारी लुगड्याची पाच वारी साडी झालेली असते, पण मन तसंच हळवं असतं!

मला शाळे मधे असतांना ’य गो जोशी’ यांची दुधावरची साय ही कथा होती. त्यातलं आजीचं एक वाक्य, ’दुधापेक्षा दुधावरच्या सायीलाच जास्त जपावं लागतं’ हे वाक्य अगदी शब्दशः खरं ठरवणारी व्यक्ती म्हणजे आजी असायची. पूर्वीच्या काळी घरं जरी लहान असली, तरी मनं मात्र मोठी होती, म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धती टिकलेली होती. आजकाल नेमकं याच्या उलट झालेलं आहे, लहान घर आहे, या सबबीवर वेगळं रहाणं  सुरु होतं. दोन मुलं असली, की आधीपासूनच दोन घरं विकत घेऊन ठेवण्याकडे वडिलांचा कल असतो, पुढे मग भांडणं कशाला हवीत मुलांमधे??  पण वेगळं रहाण्याचं खरं कारण मात्र वेगळंच काहीतरी असावं असं मला वाटतं. विभक्त कुटुंब पद्धती हा विषय नाही, फक्त लिहीण्याच्या ओघात आले म्हणून लिहीले आहे .

आजकालच्या दिवसात विभक्त कुटुंब पद्धती मुळे आजी – आजोबांचा सहवास तर खूप कमी झालेला आहे. याचं एक कारण म्हणजे आजकालचे आजी-आजोबा हे उच्च विद्याविभूषित, आणि चांगल्या मोठ्या पदावरून  निवृत्त झालेले असल्यामुळे , मुलांवर  ते अवलंबून नसतात. त्यांचं आपलं स्वतःचं एक विश्व असतं, पूर्वीच्या आजी -आजोबांप्रमाणे मुलांच्या संसारात ते स्वतःला अडकवून घेण्यासाठी  बरेचदा  तयार नसतात. दुसरं कारण म्हणजे मुलं कुठल्यातरी मोठ्या शहरात, दुसऱ्या देशात रहायला गेलेली असतात, मग सारखे तिकडे जाऊन रहाणे एक तर परवडत पण नाही, किंवा कंटाळवाणे पण होते.

एखाद्या लहान गावात पुर्ण आयुष्य गेल्यावर मग त्या गावात बरेच सोशल कॉंटॅक्ट्स तयार होतात. मग हे सगळं सेट झालेलं आयुष्य सोडून   शहरात जाऊन/ किंवा परदेशात जाऊन मुलाकडे रहायचं काम पडलं की  तिकडे कंटाळवाणं होणं हे साहाजिकच आहे.याचा अर्थ हा नाही की हल्ली आजी आजोबांचं मुलांवर , नातवांवर प्रेम नाही, तर प्रेम हे असतंच- दुधावरची साय नेहेमीच जास्त प्रिय असते दुधापेक्षा! जितका वेळ संपर्कात असतात  तितक्या वेळात नातवांच्या बरोबर घालवलेल्या वेळाच्या आठवणी   मनाच्या गाभाऱ्यात साठवून ठेवतात- एकटे असतांना  पुन्हा  अनुभवता यावं म्हणून.

माझे आजोबा कलेक्टर होते, इंग्रजांच्या काळचे आय ए एस . त्यांच्या अकाली मृत्यूमुळे आजी एकदम खचून गेली होती. तिच्या आयुष्यातला विरंगुळा म्हणजे नातवंडंच होती. सकाळी आंघोळ करुन आली की मग पिअर्स साबणाचा वास घरभर दरवळायचा.  आंघोळ झाल्यावर तो साबण आपल्या लुगड्याला पुसून ठेवायची, त्यामुळे तिच्या कपड्यांना पण एक मंद मंद सुगंध यायचा पिअर्सचा.  आजोबांचा मृत्यु माझ्या जन्मापूर्वी झाला, ती नेहेमी म्हणायची की जर तुझे आज आजोबा असते तर खूप कौतूक केलं असतं तुझं. अजूनही पिअर्स साबणाचा वास आला की आजीची आठवण येते.

आजकालची नऊवार लुगड्यातून पाच वार साडी किंवा पंजाबी ड्रेस मधे  मधे आलेली आजी पाहिली की एक लक्षात येतं,वरचे कपडे जरी बदलले असले, तरी मानसिकता तशीच आहे, आपल्या नातवंडांवरचं प्रेम तसंच आहे. पण नातवंडांचे प्रेम तितकंच आहे का?? आजकाल आजी जेंव्हा घरी येते, तेंव्हा मुलं पण एकदा नमस्कार वगैरे करून झाला की आपल्या कामाला लागतात. आजी- अजोबांचं अस्तित्त्वच त्यांच्या लेखी फारसं महत्त्वाचं नसतं. फक्त त्यांनी काही विचारलं, तर उत्तरं द्यायची बस्स.. इतकंच.. हे असे आजी- नातवंडांचे संबंध पाहिले की खरंच वाईट वाटतं, आणि त्या माऊली करता डोळे भरून येतात!

(सारीका खोतचे खास आभार, तिच्यामुळेच हा लेख लिहिला गेला )

घंटा…

Written by  on January 21, 2010

फायर ब्रिगेड ट्रक वर अशी घंटा असायची

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते  आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा  तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ  झाली, की  महादेव शिपाई  त्या  पितळेच्या गोल तुकड्यावर   अडकवून ठेवलेली हातोडी सोडवून घंटा वाजवायचा.  शाळा सुरु होतांना वाजणारी घंटा  अंगावर काटा उभा करायची, कारण जर उशीर झाला तर हेडमास्तर हातात रुळ घेऊन समोरच्या दरवाजात   उभे असायचे. उशीर झालेल्या मुलांना  हातावर फटके द्यायला!  हीच घंटा जेंव्हा   शाळा सुटल्यावर वाजायची  तेंव्हा मात्र हिचा आवाज खूप कर्ण मधुर वाटायचा.एकाच घंटेच्या आवाजाचे किती प्रकारचे अर्थ निघू शकतात नाही का? शाळेत   ८ वी मधे असतांना एक  बदली शिक्षिका आल्या  होत्या , त्यांचा पिरियड संपण्याची घंटा वाजू नये असे वाटायचे. 🙂   आणि नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा)  🙂  वाया गेला आहे.   शाळेत  असतांना उद्यापासून रोज सकाळी अभ्यासाला उठायचं म्हणून  आई  अलार्म क्लॉक ( जे मेकॅनिकल चावी चे असायचे त्याला) अलार्मची चावी फिरवून अलार्म सेट  करून ठेवायची.  सकाळी चार वाजता तो अलार्मच्या घंटीचा आवाज ऐकून  घरातले सगळे जरी खडबडून  उठले तरीही मला मात्र जाग यायची नाही, आणि मग पाठी वर चार धपाटे खाऊनच उठणे व्हायचे. समजा एखाद्या वेळेस जाग आली  तरी पण  डोक्याखालची उशी कनावर  दाबून झोपायचा प्रयत्न करायचो.. तेंव्हापासून अलार्म क्लॉक मला न आवडणारी वस्तू म्हणून जी डोक्यात बसली, ती आजपर्यंत! अजूनही सकाळची फ्लाईट असली की ह्या अलार्म क्लॉकची  आवाज ऐकू आला की नको ते गावाला जाणं असं वाटायला लागतं. हल्ली मोबाइल मधे किंवा फोन वर  अलार्मची सोय आल्या पासून अलार्म क्लॉक ही वस्तू इतिहास जमा झालेली आहे- पण माझ्या आयुष्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणून लक्षात राहील माझ्या.

लहानपणी मला नेहेमी फायरब्रिगेड चा ट्रक ड्रायव्हर व्हायची इच्छा  होती.  फायरब्रिगेड च्या ट्रक वर  पण  अगदी मागच्या भागात एक मोठी चकचकीत पितळी घंटा असायची. तिच्या लंबकाला बांधलेली  एक दोरी ड्रायव्हरच्या मागे उघड्या जागेवर उभ्या असलेल्या फायर मॅन च्या हाती असायची.  कुठे आग लागली कंडक्टर प्रमाणे  दोरी ओढून घंटा वाजवत ,तो फायर ट्रक  जायचा.  ते पाहिलं की  ही बेल वाजवायला मिळावे म्हणून   तरी आपण फायरब्रिगेड मधे मोठं झाल्यावर काम करायलाच हवं, असं वाटायचं. हल्ली ती घंटा जाऊन तिच्या जागी सायरन आलाय, पण त्या घंटेची मजा सायरन मधे नाही.

उन्हाळ्यात अमरावतीला रात्री घरासमोरून एक कुल्फीवाला जायचा. ही कुल्फी म्हणजे माझा जीव की प्राण! खूप आवडायची मला ती.  एका हातगाडीवर मटका कुल्फी चा माठ आणि वर बांधलेली एक घंटा असायची. त्या घंटेच्या  आवाजाची तर आम्ही दररोज रात्री वाट पहायचो. दोन कुल्फी वाले होते, एक भोंगा  हॉर्न वाजवायचा, आणि दुसरा हा घंटी वाला. हा  घंटीवाला माझा  फेवरेट.  हा घंटीचा आवाज ऐकला की मी पंचवीस पैसे दे म्हणून घरी मागे लागायचो, आणि एकदा पैसे हातात पडले की दुसऱ्याच क्षणी   त्या कुल्फीवाल्याकडे धाव घ्यायचॊ.

नाटक सुरु होण्यापूर्वी, मोगऱ्याच्या गजऱ्यांचा आणि पर्फ्युम्स च्या सुवासाच्या पार्श्वभूमीवर  स्टेज वरून तीन वेळा  हातात पितळी घंटा  घेऊन एक माणूस वाजवत जायचा.  तिथे त्या सुगंधी पार्श्वभूमीवर तिचा आवाज पण खूप छान वाटायचा. हल्ली मात्र त्या घंटेची जागा इलेक्ट्रीक बेल ने घेतलेली आहे. काही गोष्टी कधी बदलू नये असे मला वाटते, त्यातलीच ही एक.

पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाडी येण्यापूर्वी  सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जायची , ती घंटा ऐकली  की सगळे सरसावून नीट सामान सेट करून गाडी मधे चढण्यास तयार रहायचे, ती पण  हल्ली बंद केल्या गेली आहे, आणि त्या ऐवजी  अनाउन्समेंट केली जाते, पण घंटेची आठवण काही पुसल्या जात नाही. कदाचित पुढच्या पिढीला अशी काही पद्धत होती हे माहिती पण रहाणार नाही.

जेंव्हा मला माझी पहिली सायकल मिळाली, ( ७वी मधे ) तेंव्हा सायकल घेतांना त्याला कुठली घंटी बसवायची ह्याचंच स्वप्न रंजन मी करत होतो. त्या काळी दोन प्रकारच्या घंट्या होत्या, एक म्हणजे फक्त एकदाच टिण्ण वाजणारी, आणि दुसरी म्हणजे तिला आत स्प्रिंग असायचं आणि स्प्रिंग अनवाईंड होऊन घड्याळाच्या अलार्म सारखा आवाज यायचा ती . मला दुसरी घंटी लावायची होती सायकलला.  सायकल घेतल्यावर सायकल घेण्याच्या आनंदा पेक्षा घंटी वाजवायला मिळणार , अगदी हवी तेवढी! हा आनंद काही वेगळाच होता.

मी लहान असतांना माझ्या आजोळी  जायचो, तेंव्हा घरी असलेल्या गाई म्हशी चरायला नेण्यासाठी सकाळी गुराखी यायचा, तो जेंव्हा सगळ्या जनावरांना घेऊन जायचा तेंव्हा प्रत्येक गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज वेगवेगळा असायचा. त्या घंटे मधे लंबक जो असतो, तो लाकडी असायचा आणि म्हणूनच त्या मुळे होणारा घंटा नाद पण  अगदी वेगळाच  असायचा. शाहरुख च्या एका सिनेमात जी घंटा तो आणतो, त्याच प्रकारची घंटा असायची ती. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज हा संध्याकाळी गाई घरी आल्या की सकाळ पेक्षा नक्कीच  वेगळा वाटायचा. एकच घंटा पण आवाजात इतका फरक कसा काय वाटू शकतो?

नाशिकच्या नारोशंकर देवळात  १८ व्या शतकाच्या मध्यंतरी बसवलेली एक घंटा आहे, ती घंटा गोदावरीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर  वाढली, की आपोआप वाजेल अशी व्यवस्था केल्या गेलेली होती. धोक्याची घंटा म्हणूनच हिचा उपयोग केल्या जायचा.

घंटेचं आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे . घंटा म्हणजे केवळ धोक्याच्या वेळेस वाजवली जाते असे नाही, तर आनंदाच्या क्षणी पण तेवढ्याच उत्साहाने  वाजवली जाते. दूर कशाला, आपल्या  देवाला पण  घंटा वाजवूनच  उठवल्यावर मग   पूजा करता येते, किंबहुना घंटे शिवाय पूजा पुर्ण होतच नाही. म्हणून घंटेचं महत्त्व आयुष्यभर रहातं. कितीही विसरायचं म्हटलं, तरी विसरली न जाणारी ती घंटा..

जाता जाता, कालच एक मित्राचा फोन आला होता,  म्हणतो, संध्याकाळी भेटतो का? कुठेतरी ’बसू’ या थोडा वेळ. ” मी  त्याला विचारले की ” तुझी बायको माहेरी गेली का? तर म्हणतो, ” घंटा , जाते ती माहेरी”… मी जोरात हसलो, आणि ठरवलं की एक पोस्ट नक्की होऊ शकतं या घंटा विषयावर. त्याच्या त्या एका शब्दात सगळं जे काही मनात होतं ते बाहेर पडलं.जरी जूनी पितळी घंटा संपली विस्मृती मधे गेली , तरी ही वाक्प्रचारांसाठी  वापरली जाणारी    ” घंटा ” मात्र कधीच विसरली जाणार  नाही हे बाकी नक्की!