वर्कोहोलिक …

Written by  on December 16, 2009

लहान मुलांच्या जवळ खूप वेळ असतो, एनर्जी असते  पण पैसा नसतो..
तरुणांच्या जवळ पैसा असतो, एनर्जी असते पण वेळ नसते…
म्हाताऱ्यां जवळ खूप वेळ आणि पैसा असतो, नसते ती फक्त एनर्जी….

आता असलेले सगळे रिसोअर्सेस व्यवस्थित वापरुन आपलं आयुष्य जगलं तर सगळे प्रॉब्लेम्स  सुटतात. नाहीतर ……………??

दोन तिन दिवसांच्या पुर्वी एक बातमी वाचली होती. त्यात हों की एसएपी चे भारतातले मॅनेजिंग डायरेक्टर श्री रंजन दास यांचा अनपेक्षित पणे वयाच्या ४२ व्या वर्षी झालेला मृत्यु काय दर्शवतो?? काळ हा नेहेमीच पाठलाग करित असतो.. तुम्हाला सगळी कामं ठरावीक वेळात संपवायची आहेत, काळ पाठलाग करतोय , तरुण वय आहे, वेळ कमी पडतोय….. काय करणार??

रंजन दास ह्यांच्याबद्दल हे पण वाचण्यात आलं, की ह्यांचा स्वतःच्या खाण्यापिण्यावर पण खूपच कंट्रोल होता. कधीच वाजवी पेक्षा जास्त खाणं, किंवा हाय कॅलरी इनटेक न घेणं. दररोजचा व्यायाम, फिरायला जाणे , जिम या मधे कधिच खंड पडु दिला नाही त्यांनी. आणि इतकं असतांना सुध्दा त्यांचा असा आकस्मित मृत्यु व्हावा??

दिवसातले २० तास हा माणुस जागा असायचा. म्हणजे झोप फक्त ४ तास.. आणि प्रत्येक पार्टीमधे, किंवा मित्रांच्या मधे आपल्या कमी झोपेबद्दल गर्वाने सांगायचा. तुम्ही कितीही काम करा , पण शरीराची झिज भरुन येण्यासाठी कमित कमी ६ तास झोप आवश्यक आहे. तेवढी पण झोप तुम्ही घेतली नाही, तर  मग इतर गोष्टीत तुम्ही कितीही रेग्युलराइझ राहिलात तरीही शरीर साथ देणं थांबवु शकतं.

मला वाटतं की  कमा मधे अती जास्त गुंतलेल्यांच्या साठी, आणि प्रकृतीची हेळसांड करणाऱ्या  ( वर्कोहोलिक ) लोकांसाठी श्री रंजन दास यांचा मृत्यु हे उदाहरण आय ओपनर ठरावं..

इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..

Written by  on December 8, 2009

आजकाल  लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही.

आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित  नागडं  पोर असतं ते. जास्त  केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन फिरणारी बाई पण अगदी अगतिक दिसणारी, अंगावरचे कपडे फाटलेले .. अशी….. !! .कधीही पहाल तर ते कडेवरचे मुल नेहेमी कुठल्यातरी गुंगीतच असते , किंवा झोपलेलं असते.कितीही थंडी असो, किंवा पाउस असो, ते कडेवरच मुल नेहेमीच नंगु असतं.

लोकलच्या ब्रिजवर पण नेहेमी दिसणारं दृष्य….एक लहानशी मुलगी ५-७ वर्षांची, अंगावर फाटका फ्रॉक घालुन ,  समोर एक अगदी लहानसं बाळ घेउन बसलेली असते. ते बाळ अगदी तास अन तास शांत झोपलेलं असतं. समोर थोडी चिल्लर पडलेली असते. बरेचदा ही मुलगी सतत रडत असते-की रडण्याची ऍक्टींग करित असते. .

तुम्ही सकाळ, दुपार संध्याकाळ ,केंव्हाही पहा,  ही बाळं नेहेमी झोपलेलीच आढळतील . का??   मी आजपर्यंत कुठलंही नॉर्मल असं बाळ तासन तास शांत झोपलेलं पाहिलेलं नाही. माझं असं स्पष्ट मत आहे की , बहुतेक  या लहान तान्ह्या मुलांना अफु किंवा कुठलंतरी औषध देऊन झोपवलेल असावं. लहानपणापासून अशी नशेची सवय झालेली ती बाळं मोठी झाल्यावर काय करतील?? विचार करुनच मेंदुचा भुगा होतोय.  असंही वाचण्यात आलं आहे की अशी लहान मुलं भाड्याने पण दिली जातात. मुंबईला काय भाड्याने मिळेल ते सांगता येत नाही. एकदा मुल भाड्याने घेतलं की मग त्या मुलाशी कसं वागायचं हे ते भाड्याने घेणारेच ठरवतात.

माझं ऑफिस पुर्वी फोर्ट ला होतं . तेंव्हा रस्त्यावर (द्वारका हॉटेलच्या शेजारी – काळ घोड्याच्या बाजुच्या गल्लीत) एक बाई आपली गाय घेउन उभी असायची . तिच्या शेजारी गवताचा भारा ठेवलेला असायचा. शेजारीच स्टॉक मार्केट!! त्यामुळे मार्केटमधे जाणारे दलाल लोकं इथे थांबून त्या गाईला नमस्कार करुन , त्या बाईकडून गवत विकत घेउन खाउ घालायचे. हे रोजचं दृष्य बघून मला मोठी गम्मत वाटायची.कारण- गाय पण त्याच बाईची , गवत पण तिचंच.. आणि त्या गाईला खाउ घालण्याचे पैसे मात्र तुमचे…… 🙂 असो.. विषयांतर होतंय..

परवाच रात्री टिव्ही वर मुलींनी एक सिरियल लावलं होतं. सारखा लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकु येत होता. मी होतो आतल्या खोलीत, आणि त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाजाने  अगदी न रहावल्यामुळे  बाहेर आलो.   “पती पत्नी और वो” नावाचं एक नवीन सिरियल सुरु झालंय, द ग्रेट राखी सावंत शो- हे सिरियल टिव्ही वर सुरु होतं.. या सिरियल मधे दोन लोकांनी पती पत्नी म्हणून एकत्र रहायचं, आणि एक मुल सांभाळायचं असा कन्सेप्ट आहे.

या शो मधे पण अशी पाच सहा कपल्स आहेत. त्या पैकी काही रिअल लाइफ कपल्स तर कांही  ऍक्टिंग कपल्स आहेत. प्रत्येकाला एक एक मुल देण्यात आलेलं आहे. मी जेंव्हा पाहिलं तेंव्हा, त्या एपिसोड मधे राखी सावंत ही त्या मुलाला दुध पाजायचा प्रयत्न करित होती. ते मुल नुसतं किचाळत होतं. त्या मुलाचं रडणं ऐकुन मलाच कसं तरी होत होतं. वाटत होतं की त्या मुलाला कसंही करुन शांत करा रे बाबांनो. त्या मुलाची खरी आई मॉनिटरवर पहात होती. तिची अवस्था तर अगदी पहावत नव्हती. शेवटी ती त्या घरात गेली आणि तिने राखीला मुलाला कसं दुध पाजायचं ते शिकवलं..

त्या रस्त्यावरच्या भिकारणीला मुल भाड्याने देणारी ती फुटपाथ वरची बाई, आणि इथे राखी ला   आपलं मुल देणारी ही बाई , या दोघींच्या मानसिक ते मधे मला कुठलाही फरक दिसत नाही. सगळं सारखंच आहे. बदललं आहे तर फक्त, इथे त्या भिकारीण ऐवजी टिव्ही ऍक्ट्रेसेस.मुल भाड्याने देण्याचं कारण पैसा.. बस्स .. सगळा पैशाचा खेळ आहे. मला रहावलं नाही, मी मुलीला म्हंटलं की बदल चॅनल, तर ती तयार नव्हती.. म्हणे पहायचाय शो. अशिच या शो ची टीआरपी वाढते आणि असेच विकृत मनोवृत्तीचे शोज अधिकाधिक दाखवले जातात टिव्ही वर.

एखाद्या मुलाला आपल्या आई पासून दोन तिन महिने दुर ठेवायचं. मला तर त्या आई वडिलांचा पण राग येतोय, की केवळ कांही पैशांसाठी त्यांनी आपली तान्ही बाळं   भाड्याने दिलीत म्हणुन.   त्या लहान बाळाच्या   मानसिकतेचा कोणी विचार केला आहे कां? जे मुल जन्मल्यापासुन आपल्या आईवर पुर्णपणे अवलंबुन असतं , त्याला एक दिवस  तिच्यापासून  तोडुन वेगळं करायचं , आणि अननोन कपलच्या ( ज्या कपलला त्या बाळाबद्दल अजिबात आत्मियता नाही अशा कपल सोबत)  ताब्यात द्यायचं–कितपत योग्य आहे?…… मला तर त्या मुलांच्या खऱ्या पालकांची पण कमाल वाटते.. काय बोलणार??

जग बदलतंय,व्हॅल्युज बदलताहेत.. स्वतःच्या पोटचा गोळा असा पैशासाठी भाड्याने द्यायला नक्कीच दगडाचं काळीज लागत असणार.

स्त्री जन्मा..

Written by  on December 4, 2009

नेट वरूननवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय.  कारण दामिनी!   दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते.  टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. काही सो कॉल्ड एक्स्पर्ट तर टिव्ही वर म्हणत होता की स्त्रियांनी पर्स मधे मिरचीची पूड आणि चाकू ठेवावा म्हणजे कोणी हल्ला केल्यास प्रतिकार करता येईल. हे असे मूर्खासारखे विचार मांडणारे वैचारिक षंढ  कसे काय टिव्ही वर येतात कोण जाणे! त्यांची बडबड ऐकून तर   अजूनच संताप येत होता.

माझ्या मनात विचार आला, समजा एखाद्या मुलीने चाकू पर्स मधे ठेवला, आणि जर गुंडाने   तोच चाकू हिसकावून   प्रहार केला  तर? आणि मिरचीची पूड पण त्या मुलीच्या हातून हिसकावून तिच्यावरच वापर केला तर? अगदी सहज शक्य आहे की नाही?उगीच टिव्ही वर आलो म्हणून काही पण बडबड करायची?

गुंडांच्या हातून वाचायचे असेल तर रिव्हॉल्वर हेच एक साधन उपयोगी पडु शकते. आणि आपल्याकडे तर लायसन्स मिळणे दुरापास्त आहे.आणि जरी समजा लायसन्स मिळाले तरी पण रिव्हाल्वर वापरण्याची हिंम्मत तरी व्हायला हवी ना? असो..

खरंच काय करता येऊ शकेल? एक उपाय सुचतोय, जितके व्हिव्हिआयपी आहेत,त्या  नेत्यांच्या मुला, मुलीं सकट घरच्या सगळ्याच लोकांना ! अगदी  यांच्या घरात  जितके लोकं आहेत, त्या सगळ्यांना झेड सिक्युरिटी दिल्या गेलेली असते. तसेच सिनेमाचे हिरो हिरोईन्स- त्यांना   ला पण फुकट मधे झेड सिक्युरिटी देण्यात येते- म्हणे त्यांच्या जिवाला धोका आहे म्हणून! या सगळ्यांची सिक्युरिटी काढून घेतली तरी    लाखो सिक्युरिटी चे लोकं मोकळे होतील, की ज्यांना सामान्य जनतेसाठी वापरली जाऊ शकते. हे सगळे धनदांडगे नेते आणि सिनेमाची धेंडं स्वतःच्या पैशाने सिक्युरिटी विकत घेऊ शकतात हे अगदी कोणीही मान्य करेल- पण लोकशाही मधे  …………….   असो, दुसरी गोष्ट म्हणजे  बलात्काराला शिक्षा ही कडक द्यायला हवी, सध्या कायद्याने या गुन्ह्यासाठी फारच कमी शिक्षा दिल्या जाते. खाली दिलेला लेख वाचा-लिंक खाली दिलेली आहे .

आज सकाळी साधारण एक वर्षापूर्वी लिहिलेला हा लेख पुन्हा वाचला. एका बलात्काराविषयीचा हा लेख ११ डिसेंबर 20११ रोजी लिहिला होता.  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2011/12/01/%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B/)

स्त्रियांचे शोषण तर युगानुयुगे चालत आलेले आहे, कधी प्रेमाने, तर कधी धाकाने. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजही स्त्री पुरुष संबंध ( ऑफिस, घर, बाहेर, कुठेही) जेंव्हा रेफर केले जातात, तेंव्हा ते केवळ सेक्स्युअल रेफरन्स मधे असतात.  ऑफिस मधे जेंव्हा बरोबरच्या  स्त्री कलिग बद्दल  तिच्या अपरोक्ष बोलले जाते तेंव्हा अशा लूज कॉमेंट्स नक्कीच पास केल्या जातात. जेंव्हा पुरुष स्त्री ला म्हणतो ,की माझे तुझ्यावर प्रेम आहे – याचा गर्भितार्थ म्हणजे  “आय वॉंट टू स्लिप विथ यु” हा असतो , पण जेंव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला आय लव्ह यु म्हणते, तेंव्हा  तिचा उद्देश हा भावनिक गुंतवणूक  हा असतो. कदाचित पुरुष ही गोष्ट सहज मान्य करणार नाहीत, पण हीच खरी गोष्ट आहे. एक युगानुयुगे चालत आलेले सत्य हे पण आहे, जर कधी   भांडण झालेच तर  ते संपवायला, स्त्री ला प्रेमाचा मार्ग दोन पायातून शोधावा लागतो.   असो.. मन विषण्ण झाले आहे.  जास्त लिहत नाही. इथेच संपवतो.