कळ्या मुठभर..

Written by  on October 18, 2009

हलव्याचे दागीने

आज संक्रातीची पूर्व संध्या.  संक्रांत म्हंटलं की तीळ गुळाची पोळी, वर तुपाचा घट़्ट गोळा  .. आणि हलवा तर नक्कीच आठवतो .या दोन्ही गोष्टींशी काही नाजूक आठवणी निगडित आहेत. आज जर कुणाला विचारलं की हलवा कसा तयार करतात, तर माझी खात्री आहे की ९० ट्क्के  १५ ते २५ वर्ष या वयोगटातील लोकांना माहिती नसेल. कारण आजकाल  हलवा सरळ दुकानातून विकत आणला जातो, पण पुर्वी मात्र हलवा घरीच केला जायचा, आणि तयार करायचं  काम जवळपास डिसेंबरपासूनच सुरु व्हायचं.  हलवा जमणं म्हणजे सु्ग्रणपणाचं लक्षण !

मराठी कुटूंबात संक्रांत म्हणजे एक मोठा सण. लग्नानंतरची संक्रांत म्हणजे प्रत्येक मुलीच्या जीवनात फक्त एकदा येणारा दिवस. या दिवसा साठी जर घरी माहेरवाशीण येणार असेल तर मग बहुतेक आयांच्या तर अगदी अंगात आल्या प्रमाणेच व्हायचं. कारण संक्रांतीला घरी आलेल्या मुलीला हलव्याचे दागिने घालुन तिचे फोटॊ काढणे, किंवा घरातल्या बाळाचे दागीने घालुन लुट करणे – हे एक मोठं काम असायचं.मग त्यासाठी लागणारा निरनिराळ्या आकाराचा हलवा बनवला  जायचा. मोठ्या आकाराचा हलवा हवा असेल तर मग तो बहुतेक साबुदाण्याचा बनवला जायचा ( लवकर मोठा व्हावा म्हणून)

मी लहान असतांना आमची जॉइंट फॅमीली होती. आई , वडील, आजी आणि काका लोकं .. आम्ही सगळे एकत्रच रहायचॊ. संक्रात आली की आईची तयारी सुरु व्हायची . सगळ्य़ाची जेवणं झाली की मग दुपारी दोन च्या सुमारास, सगळं आवरून  हलवा करायला बसायची. मला खरंच तिच्या उत्साहाचं खरंच कौतुक वाटतं आज. इतकी सगळी कामं करुन नंतर पुन्हा हे करायला उत्साह टीकून रहायचा तिचा!!

एका शेगडीत दोन तिन निखारे घेउन त्यावर एक परात ठेवायची . त्या परातीमधे दोन एक मूठ तीळ घेउन त्यावर एक एक थेंब पाकाचा टाकायचा, अन ते हलवत रहायचं. मला तर नेहेमीच आपणही थोडं हाताने ते तीळ हलवून बघावे असे वाटायचे.  पण थोडा जवळ गेलो की आई ओरडायची.. अरे गधड्य़ा हात भाजेल नं.. की पटकन आपला हात मागे ओढून घ्यायचॊ. तिळाचा हलवा होतांना पहाणं म्हणजे गम्मत असायची. बरं हे काम एकाच दिवसात होत नव्हतं. थोडा वेळ केला की मग आई सगळं आवरून ठेवायची. बरेचदा हलवा किंचित काळसर झाला, की मग आईचा वैताग असायचा. मग पुन्हा हात स्वच्छ धुउन त्यावर एक दोन पुटं चढवायची दोन दोन थेंब टाकुन.. मला तर नेहेमी वाटत रहायचं, की मला चटका बसेल म्हणते, मग तिला का बसत नाही? बोटाने ते तीळ हलवत रहायचं अन पाकाचा एक एक थेंब तिथे टाकत त्या तीळाचा हलवा होतांना पहाणं मला खुप आवडायचं.  बरं हे निखारे जे असायचे शेगडीतले ते पण फार तर दोन किंवा तीन.. जास्त पण असले तर हाताला चटके बसणार, अन कमी असले तर हलवा जमणार नाही  अशी भिती असायची.

आईने ते आवरून ठेवलं की त्यातले ह्ळूच दोन तीन दाणे तोंडात टाकले की … बस्स !! अगदी स्वर्गीय आनंद!! हलवा पुर्ण झाला की  तो अगदी ताटामधे मोगऱ्याच्या कळ्या ठेवल्या सारखा दिसायचा..त्याला किती काटा आला?? हे के मोठं प्रश्न चिन्ह असायचं. मग एखाद्या वेळेस काटा नीट आला नाही की आई खूप वैतागायची.. एखाद्या लहान मुलाची संक्रातीला लुट असली की त्याच्या साठी पण दागिने बनवले जायचे.   हल्ली हे सगळे दागिने कुठल्याही दुकानात मिळतात. खाउवाले पाटणकर  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.khauwalepatankar.com/products_list.aspx?catg=Halvyache%20Dagine&subcatg=SUNECHE%20DAGINE)पुण्याचे प्रसिद्ध आहेत या साठी. आजही  कोणी हातावर हलवा घातला, की  आधी आईची आठवण येते.. शेगडी जवळ बसलेली.. हाताने परातीत ले तीळ हलवत बसलेली… 🙂

एका संक्रांतीला आम्ही माझ्या धाकट्या बहिणीकडे गेलो होतो – तॆंव्हा ती औरंगाबादला होती.. आमचं लग्न जवळपास एकदमच झालं फार तर चार पाच महिन्यांच्या अंतराने.. माझी सौ. आणि धाकटी बहीण मैत्रीणी – अगदी लहानपणापासूनच्या. त्यामुळे दोघींचं पण खूपच सख्य होतं- आणि आजही आहेच. वेळ प्रसंगी दोघी एकाच साईडने होऊन माझ्याशी भांडतात… 🙂

तर काय दोघींनी मि्ळून तिळगुळाच्या पोळ्या करायचा घाट घातला. दोघींची ही पहिलीच वेळ . तीळ गुळ तयार केला, कणीक पण भिजवली. पण काही केल्या पॊळी नीट जमत नव्हती. एक तर आतलं तीळ गुळाचं सा्रण नीट पसरत नव्हतं.  खूप मोठे काठ रहात होते, काठापर्यंत तीळ गुळ पोहचत नव्हता. दोघी पण जाम वैतागल्या होत्या. मी गम्मत पहात होतो. शेवटी स्वतः स्वयंपाकघरात जाउन बघितल तर लक्षात आलं की तीळ गुळ खुप घट़्ट झाला होता, अन ती कणीक त्या मानाने खूपच सॉफ्ट. म्हंटलं, तिळगुळ थोडा पातळ कर, कणकी एवढा , दोन्ही सारखेच घट़्ट असले की ते काठापर्यंत बरोबर पोहोचेल…. अन जेंव्हा दोन्ही एकसारखेच सॉफ्ट केले तेंव्हा खरंच माझ्या एक्स्पर्ट ऍड्व्हाइसने पोळ्या जमलया एकदाच्या..

अगदी खरं खरं सांगतोय. आज जवळपास ३६० कीमी ड्राइव्ह करुन आलोय . वलसाडला गेलो होतो त्यामुळे खूप झोप येतेय. हे पोस्ट इथेच तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन संपवतो…थोडं तुटक वाटत असेल पोस्ट, उद्या सकाळी व्यवस्थित करीन.. तीळ गुळ घ्या गोड गोड बोला..

ममता- मनसे फॅक्टर

Written by  on October 5, 2009

चला…. इलेक्शन आटोपलं.. गेल्या दोन महिन्यात उठलेला धुराळा आता शांत होईल . जे सगळे नेतेगण आज पर्यंत आपापल्या  रस्त्यावर आले होते, ते आज पुन्हा आपापल्या वातानुकूलित घरात , ऑफिसात परततील. जे जिंकले ते ढोल ताशाच्या गजरात घरी जातील, तर इतर हरलेले, आम्ही का हरलो? याची कारण मीमांसा करण्यासाठी बौद्धिक शिबिर घेतील.

या निवडणुकांचे निकाल काही ठिकाणी अपेक्षितच होते पण कांही ठिकाणी मात्र अगदी अनपेक्षितच होते. महाराष्ट्रा मधे भाजपा युतीचा पत्ता साफ होणार हे जगजाहीर सत्य होतेच. मनसेने खाल्लेली मराठी मतं, बरीच होती. तसेच , बाळासाहेबांच्या प्रकृती अस्वास्थ्याचा फायदा पण  झाला कॉंग्रेसला. उद्धव ठीक आहे, पण बाळासाहेबांसारखे चार्म त्याच्या मधे नाही.बाळासाहेबांच्या सारखी मॅग्नेटिक पर्सनॅलिटी उद्धव मधे नाही. म्हणूनच बाळासाहेबांच्या भाषणाच्या व्हिडीओ ला जितक्या   टाळ्या मिळाल्या तितक्या उद्धव च्या भाषणाला   मिळाल्या नाहीत.

मनसेंच कोकरू आता बाळसं धरू लागलंय.राज ठाकरेंचे नेहेमी प्र मुख मुद्द्याला बगल देऊन, केलेली भाषणं मराठी तरुणांना आवडतात. तसेच, एखाद्याने त्यांच्यावर आरोप केला तर उत्तर न देता, प्रति आरोप करुन मुद्दा गारद करण्याचा त्यांचा हातखंडा खरंच वाखाणण्याजोगं   आहे.  मराठी माणसाचा मुद्दा त्यांना कमीत कमी मुंबईत तर भरपूर मते खाण्यासाठी उपयोगी ठरला.

पक्षाचं नांव महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. पण त्यांचे मुद्दे इतके तकलादू आहेत की मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला जास्त कांही ऍक्सेप्टअन्स मिळणार   नाही. हे माहिती असल्यामुळेच इतर भागात आपली माणसं उभी केली नाहीत. कालच नागपूर हून आलो, तेंव्हा एका मित्राला भेटलो नागपुरच्या. सहज बोलता बोलता विषय निघाला , तर तो म्हणाला, राज ठाकरेंनी आजपर्यंत म्हणजे पक्ष सुरू केल्या पासून कांहीच भरीव काम केलं नाही, मुंबई किंवा उर्वरित महाराष्ट्रा करता. मुंबईत काही भैय्या लोकाना मारणं आणि काही टॅक्सी फोडणं या पुढे त्यांनी केलं तरी काय?? मी पण क्षणभर विचार केला.. म्हंटलं खरंय.. तो म्हणाला, विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, किंवा विकासाचे इतर मुद्दे.. यावर राजे एकदा पण भाष्य केले नाही. त्यामुळे इतर महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाला यश मिळणे सध्या तरी शक्य नाही. त्यांच्या उमेदवारांनी खाल्लेल्या मतांमुळेच आज आज राम नाइकांसारख्या माणसाला पराभव पत्करावा लागला. जर मनसे ने उभे केलेल्या उमेदवारांनी मतं खाल्ली नसती तर नक्कीच राम नाइक निवडून आले असते.

बाळासाहेबांच्या पर्सनॅलिटी चा जो एक चार्म आहे तो राज मधे पुरेपूर उतरलाय.   राज ची पर्सनॅलिटी निःसंशय क्राउड पुलिंग मॅग्नेटीक आहे. अगदी फालतू मुद्दा पण तो अगदी ताकदीने मांडतो की त्याला जनसमर्थन हे मिळतंच. बाळासाहेबांच्या प्रमाणेच भाषणामध्ये नकला करणे, यामुळे तो जे कांही बोलतो, ते त्याच्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचतं.

राज साठी हे लोकं कांहीही   करण्यास तयार आहेत. मनसेच्या आंदोलनात मध्यम वर्गीय मराठी  मुलं गेली आहेत जेल मधे, बरेच मुलं तडीपार झाली आहेत.कधी झाली?? आणि का झाली?? आणि त्यात मनसेचा संबंध काय?? असं म्हणता?? भैय्या लोकाना केलेल्या मारहाणीत अटक केलेल्या तरुणांमधे कनिष्ट मध्यम वर्गीय मुलं आहेत सगळी. अगदी तळागाळातील लोकांची मुलं, ज्यांनी टॅक्सी  फोडणे, राडा करणे, किंवा सिनेमा हॉल वर हल्ले करणे.. असे अनेक प्रकार केले . नंतर सेफ्टी च्या कारणाखाली ह्या सगळ्या लोकांना  तडीपार करण्यात आले! एका अशाच मुलाचा बाप ( माझ्या नेहेमीच्या संपर्कातला आहे , पण नांव देत नाही) म्हणत होता, माझ्या मुलाचं आयुष्य खराब झालंय.. आता मुलाला कोंकणात पाठवलय . पोटाला चिमटा घेउन शिकवत होतो मुलाला, तर या मुलाने हे असे नसते उद्योग करुन ठेवलेत, आणि आता तडीपार झालाय. साहेब तुम्हीच सांगा माझा मुलगा गुंड आहे का असा तडीपार करायला? मी काय बोलणार?? कसंनुसं हसून वेळ मारुन नेली..

मनसे ला हे माहिती नव्हतं का- की आपण उभे केलेले कॅंडीडेट्स निवडून येणार नाहीत म्हणून?? हो अर्थात होतं.. मग का उभे केलेत हे कॅंडीडॆट्स? अगदी साधं उत्तर आहे.. भारतीय राजकारणात आपली न्युसेन्स व्हॅल्यु दाखवल्या शिवाय तुम्हाला कोणीच विचारत नाही. आता या निवडणुकीत एक सिद्ध झालंय.मनसे भरपूर मतं खाऊशकते म्हणजे पुढल्या वेळेस मनसेशी युती करण्यास राष्ट्रीय पक्ष तयार होतील.. आपली सेक्युलर प्रतिमा बाजुला ठेऊन. आणि एक गोष्ट प्रुव्ह होते ,   यु आयदर हेट ऑर लव्ह .. यु कान्ट इग्नोर मनसे इन मुंबई!!  आणि राज ठाकरेंना हेच हवं होतं.. ही हॅज वन द इलेक्शन.. ९ लाख मतं म्हणजे काही गम्मत नाही.कुठल्याही इलेक्शनचं भवितव्य ठरवू शकतात ही मतं.

निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष कोट्यवधीचा रुपये खर्च करतात. मनसे हा आत्ताच फॉर्म झालेला पक्ष.. मग त्यांच्याकडे इतक्या जागा लढवण्यासाठी पैसा आला तरी कुठुन??  असो..

ममता बॅनर्जी .. जेंव्हा तिथुन म्हणजे सिंगुरहुन हो.. टाटा नॅनो चा प्लांट गुजराथ मधे गेला, तेंव्हा खरं तर ममताला चांगलाच सेट बॅक मिळाला होता. तिला असं कधीही वाटलं नसेल की टाटा इथे कुठे जातील. ( यावरचा आधिचा लेख इथे वाचा) ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/03/31/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/) पण टाटांनी प्लांट जेंव्हा गुजरात मधे शिफ्ट केला तेंव्हा ममता तोंड लपवून बसली होती बरेच दिवस.. मला असं वाटतं होतं की ममता कम्युनिस्टांचे काम करते आहे, आणि कम्युनिस्ट सोशालिस्ट लोकांचं.. 🙂  जोक अपार्ट, ममताने वेळेवर घेतलेला कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे अगदी अर्जुनाने केलेल्या मत्सभेदा प्रमाणेच अचूक ठरला. जर ममता एकटी निवडणुक लढली असती, तर  ती काही निवडून आली नसती. कॉँग्रेसच्या पुण्याई च्या जोरावर तिचा झालेला हा विजय आहे चक्क २० जागाचं आंदण तिच्या पदरात घातलंय बंगाली जनतेने. म्हणजे नॅनो चा जो प्लांट गेला, त्याचं खापर कम्युनिस्टांच्या डोक्यावर फोडलं मतदारांनी आणि जागा ६० वरून निम्म्याच्या खाली आणून ठेवल्या मतदारांनी.

मला असं वाटत होतं की बंगालची जनता ममताला कधीच माफ करणार नाही.. सिंगुर बद्दल.. पण बंगाली बाबु लोकं अगदी ४ महिन्यात विसरले सगळं.. आणि ममता ला निवडुन आणलं..

जाउ द्या, कोळसा उगाळावा, तितका काळाच!

दहावी परिक्षा आवश्यक की अनावश्यक??

Written by  on October 4, 2009

बारावी च्या वर्गात या पुढे तुम्हाला अशिक्षित लोकं दिसले तर आश्चर्य वाटू देउ नका. आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक असतो. म्हणजे बघा, सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना  इतकं अभ्यासाचं लोड आहे, की जर ९५ टक्क्यांच्या पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर चांगल्या कॉलेज मधे ऍडमिशन मिळणं अवघड आहे. पालकांच्या पण आपल्या मुलांकडुन इतक्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की, जरी मुलाला ८५ टक्के मार्क मिळाले तरीही आई बाबांच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरतं.

आता या नवीन सिस्टीम मुळे एकदम परीक्षा नाही.. म्हणजे अजिबात टेन्शन नाही.. अभ्यासाचं पण, आणि शिक्षणाचं पण.  मग काय नुसती धमाल..इतका अतिरेकी निर्णय घेतांना पण सरकारने विचारच करावा. अजुन असा निर्णय आहेच की दहावी पर्यंत मुलांना नापास करू नका म्हणून.. पुढे काय.. १२ वी पर्यंत नापास करु नका म्हणतील . दिवस फार दुर नाहीत, की आपणही अमेरिकन्स प्रमाणे हायस्कुल ची फायनल परीक्षा ग्रॅज्युएशन म्हणून सिलेब्रेट करु. या निर्णयाने आपलं एज्युकेशन स्टॅंडर्ड आपण अमेरिकन्सच्या लेव्हलला आणून ठेवतोय याचे वाईट वाटते.

अर्थात, अमेरिकन पद्धत चांगली की भारतीय चांगली हा कदाचित वादाचा मुद्दा असेल, पण माझ्या मते तरी भारतीय पद्धत आजच्या घटकेला जगात एक चांगली पध्दत म्हणुन समजली जाते. केवळ इथल्या बेसिक एज्युकेशन मुळेच आपली मुलं बाहेरच्या जगात तग धरु शकतात. आजही मुलं जरी इंग्रजी शाळात जात असली तरीपण आपण मुला कडुन ३० पर्यंतचे पाढे पाठ करून घेतोच नां? ट्वेंटिसिक्स  सेव्हन्ज आर किती ते सांगायला कॅलक्युलेटर लागत नाही आपल्या मुलांना.. ! अजुन काय लिहावं?

पण एक आहे, की मुलांवर इतकं प्रेशर आणलं जातंय की, या सगळ्यांचं आउटकम म्हणजे दर वर्षी परीक्षेचा निकाल लागला की दुसऱ्या दिवशीच्या पेपरमधल्या बातमी.. की आज अमक्याने आत्महत्या केली.. तम्क्याने स्वतःला फाशी लावून घेतली ,कोणी घर सोडून पळून गेलं.. किंवा तशाच काहीतरी बातम्या वाचल्या की मन सुन्नं होतं. वाटतं , की मुलांवर खरोखरंच इतकं प्रेशर आवश्यक आहे का? खरंच दहावी ची परीक्षा इतकी महत्वाची करुन ठेवायचं काही कारण आहे का? बरेच विद्यार्थी दहावी नापास झाले की मग शिक्षण सोडून देतात या सगळ्या प्रेशरला नाकारून.

परीक्षा असावी की नसावी?? ज्वलंत प्रश्न आहे. मला वाटतं याला दोन्ही बाजू आहेत. जर नसावी म्हंटलं तर मुलं नुसती हुंदडतिल आणि पुढच्या उच्च अभ्यासक्रमाचा बेस तयार होणार नाही. असंही ऐकलं आहे की आता भारतामधे रेग्युलर ग्रेडेशन सिस्टीम सुरु करणार आहे. म्हणजे शाळे मधेच प्रत्येक स्टूडंट चं एक फोल्डर उघडलं जाईल; वेळोवेळी दिलेल्या असाइनमेंट्सच्या ग्रेडस  तिथे मेंटेन केल्या जातील. १२ वी झाली की मग अमेरिकेतल्या प्रमाणेच हे सगळे ग्रेड्सचे पेपर्स कॉलेज कडे फॉर्वर्ड केले जातील. आता यात एकच महत्वाचा प्रश्न आहे, की भारतामधे पर्सनल इन्प्ल्युअन्सेस वापरण्याचं प्रमाण फार जास्त आहे, त्यामुळे पैसे वाल्यांचे कींवा इतर मोठ्या वेल नोन पर्सनॅलिटीजच्या मुलांची चंगळ होईल,कारण फारसं काही न करता चांगल्या ग्रेड्स नक्कीच मिळतील, आणि मध्यमवर्गीय मुलांची पुन्हा वाट लागेल.

मी मुलींच्या शाळेत पाहिलंय, टिचर्स डे ला बरेच मुलं टिचरला काहितरी गिफ्ट आणून देतात. माझ्या मुलीने ती सहावीत असतांना टीचर साठी गिफ्ट घेउन मागितलं होतं, मग आम्ही जेंव्हा मार्केटला गेलो तेंव्हा सुंदरशी दोन गुलाबाची फुलं आणि एक ग्रिटींग कार्ड घेउन दिलं, पण मुलगी नाराज झाली, म्हणे सगळी मुलं खरोखरंच गिफ्ट आणतात.. खरोखरचं गिफ्ट??? का??? कशाला द्यायचं ?? इतक्या लहानवयापासूनच शिक्षकांना अशा प्रकारे लाच द्यायची  हे काही मला तरी पटलं नाही.आणि पालकांनी पण मुलांना अशा प्रकारे टिचरला लाच द्यायची सवय कां लावावी? मला काही गोष्टी ज्या पटत नाही, त्या मी करित नाही. त्यातलीच ही एक.. !

दहावीची परीक्षा म्हणजे जीवनातला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा टप्पा. याच टप्प्यावर मुलं आपल्या खऱ्या कॉंपिटीटीव्ह जगात प्रवेश करतात. त्यांना हे पण रिअलाइझ होतं की आता आभ्यास केला तर बरंय.. नाही तर पुढचं आयुष्य अवघड आहे. दहावी मधे मुलं अभ्यास करून पुढच्या अभ्यासासाठी बेस तयार करतात. त्यांना अभ्यास कसा करावा हे समजते आणि लक्षात कसं ठेवायचं हे पण कळतं. पाठांतराचीही पण सवय लागते ( ही चांगली की वाईट ते नंतर डिस्कस करु ) . पुढच्या इंजिनिअरिंग, मेडिकल, सिए, किंवा इतर कमर्शिअल अभ्यासक्रमाचा बेस तयार होतो.माझी दहावितली मुलगी पण म्हणते, की परिक्षा नसेल तर शाळेत जायला काय मजा येईल?? काहीच नाही.. परीक्षा हवीच…

बरं या सगळ्या गोष्टींवर उपाय काय ? माझ्या मते संपुर्ण भारतामधे दहावीचा सिलॅबस आणि बोर्ड एकच करावे. म्हणजे सगळीकडे सिमिलॅरिटी राहील. आज आय सी एस सी, किंवा सि बि एस मधे जवळपास प्रत्येकच मुलगा  ९० टक्क्यांच्या वर मार्क मिळवतो. हे कसं शक्य आहे? स्टेट बोर्ड फारच कडक पेपर तपासत,, त्यामुळे बरीच मुलं नापास पण होतात, किंवा कमी मार्क मिळवून पास होतात.सगळ्यांचा सिलॅबस, आणि एक्झाम सिस्टीम सारखी असली, की मग अर्धे प्रॉब्लेम्स नाहिसे होतिल.

एकदा सिलॅबस सारखा झाला, की मग ऍपल टु ऍपल कम्पॅरिझन करुन कॉलेजेसच्या ऍडमिशन्स करता येतिल . आजच कोर्टाने ९० -१० कोटा स्क्रॅप केल्याचं वाचलं . म्हणजे स्टेट बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दुर्देवाचे फेरे अजुन संपलेले दिसत नाहीत. अजूनही पहाण्यात येतंय, की बऱ्याच शाळा स्टेट बोर्ड बंद करून त्या जागी आय सी एस सी ला स्कुल अटॅच करताहेत. म्हणजे जर स्टॆट बोर्डाने चांगले मार्क्स दिले नाहीत तर लवकर मराठीची सुट्टी होणार हे नक्की…. !!पण त्याचा काय फायदा??

ठाकरे मंडळी सध्या या विषयावर ( स्टेट बोर्डाच्या शाळा आय सी एस सी मधे कन्व्हर्ट होण्य़ा बद्दल, किंवा ११ वीच्या स्टेट बोर्डाच्या मुलांच्या ऍडमिशन बद्दल ) काहीच बोलत नाहीत. अहो ठाकरे साहेब…. हे सगळे शिवसैनिकांचीच, आणि मनसेच्या सैनिकांचीच मुलं आहेत, मराठीच्या प्रेमाखातर स्टेट बोर्डात घातलेली, की मुलाला किमान मात्रूभाषातरी यावी म्हणून, पण जर वेळीच काही ऍक्शन घेतली नाही तर पुढे काय होईल ते सांगता येत नाही. हे सगळे नेते लोकं नंतर कधी तरी जागे होतील, जसे आता शिवाजीच्या धड्यातून त्यांच्या गुरु चे नाव काढल्यानंतर डरकाळी फॊडण्याच्या आविर्भावा “म्यांउं” केलं ना तसेच काहीतरी!!!!!!

हे पण पहाण्यात येतं, की मुलांना एका स्पेसिफिक कॉलेज मधे ऍडमिशन हवी असते. ते बंद करून घराजवळच्या कॉलेज मधे ऍडमिशन घेणे कम्पलसरी करावे.असे केले तर प्रवासाचा वेळ वाचून अभ्यासाला जास्त वेळ मिळेल.

माफ करा, थोडा मोठा झालाय लेख.. थांबवतो आता इथेच..