फॅशन

Written by  on September 30, 2009

अ‍ॅंड्रेज .. फोटो इंटरनेट वरून साभार.

इथे हा फोटो बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल- की हा ’असा’ फोटो ब्लॉग वर का लावला म्हणून.  दोन तीन दिवसापूर्वी ह्या व्यक्तींचा  फोटॊ पेपरमधे दिसला , आणि म्हणून हे पोस्ट! ह्या फोटो ची एक मोठी कहाणी आहे,  ती सांगण्यापूर्वी थोडं इतर काही….

दुकानात गेल्यावर सौ. ने सिलेक्ट केलेला एखादा ड्रेस बघून  जेंव्हा , हा काही फारसा चांगला दिसत नाही असं म्हंटलं, की फॅशन मधलं तुम्हाला काही समजत नाही हो.. आणि जे  समजत नाही त्यावर तुम्ही उगीच कॉमेंट्स पास करू  नका.. हे वाक्य नेहेमीच ऐकावे लागते. एक बाकी आहे , की  तसंही माझं आणि फॅशनचं कधीच सख्य नव्हतं, आणि अजूनही नाही. कुठलाही शर्ट कुठल्याही रंगाच्या पॅंट बरोबर ’मॅच’ किंवा ’क्रॉस मॅच’ होतो हे माझे स्पष्ट मत आहे. आता साधारण पणे सगळ्या पॅंट्स या माझ्या काळ्या किंवा डार्क ग्रे रंगाच्या असल्यामुळे कुठल्याही रंगाचा शर्ट चालून जातो .  निळ्या जिन्स वर हिरवा शर्ट असला तरी पण चालतो मला- आणि  बिलिव्ह मी, कॉलेजला असताना, मी खरंच पोपटी हिरवा शर्ट वापरायचो जिन्स वर. :). माझ्याकडे असलेले बहुतेक शर्ट्स हे लाईट कलर चे आहेत.  ( दोन तीन शर्ट्स मुलींनी वाढदिवसाला घेऊन दिलेले लाल, निळ्या रंगाचे सोडून.)

फॅशन म्हणजे नेमकं काय? हे मला कधीच समजलेलं नाही. समजा एखादी   मराठमोळी स्त्री छान तयार होऊन – म्हणजे नऊ वारी काठाच,  टोपदार पदराचं पातळ नेसून, गळ्यात गोल सोन्याच्या मण्यांची बोरमाळ, मंगळसूत्र, नथ आणि कानात छान मोत्याच्या कुड्या घालून आणि कपाळावर चंद्रकोर लावून निघाली , तर तिला फॅशनेबल  म्हणता येईल का?

बरं किंवा एखादी पाच वार शिफॉनची साडी (करण जोहरच्या सिनेमातल्या नटी सारखी) नेसून स्लिव्हलेस ब्लाऊज घालून, लिप्स्टीक वगैरे पुर्ण मेकप करून जर एखादी स्त्री बाहेर निघाली तर तिला फॅशनेबल म्हणता येईल का??

की सुंदरसा पाच हजार रुपयांचा पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी फॅशनेबल समजली जाईल? की साधा जिन्स टी शर्ट घातलेली गर्ल नेक्स्ट डॊअर फॅशनेबल आहे असे म्हणता येईल??

—नाही लक्षात येत ना? माझं पण तसंच होतं.

फॅशन ही टर्म तशी व्यक्ती सापेक्ष आहे. जी गोष्ट एखाद्याला खूप जास्त फॅशनेबल वाटते तीच गोष्ट एखाद्याला अगदी सर्वमान्य वाटू शकते. अगदी गावातल्या मुलीला शहरातल्या मुलीचे रोजचे कपडे म्हणजे टीशर्ट -जिन्स पण फॅशनेबल वाटतील- म्हणूनच फॅशन ची व्याख्या करणे म्हणूनच मला तरी अवघड जाते. स्वतःला जे काही योग्य वाटते ती फॅशन असे माझे स्पष्ट मत आहे. शेवटी काय, अगदी सहा वर्षाच्या चिनू  पण आईचे मेकप चे सामान घेऊन, स्वतःचा मेकप करत बसते, किंवा   ७० वर्षाच्या आजी पण अंबाड्यात एक लहानसं फूल खोचल्या शिवाय बाहेर पडत नाहीत. प्रत्येकच जण आपापल्या परीने  नीटनेटके रहायचा प्रयत्न करत असतो – सॉरी फॅशनेबल रहाण्याचा.

काळानुरूप  समाजाची बदलत जाणारी आवड म्हणजे फॅशन अशी फॅशनची व्याख्या केली जाऊ शकेल कदाचित. पुर्वी कधी  डोक्यावरून न घसरणारा पदर   कधी हळू हळू खाली सरकत  घसरून खांद्यावर स्थिरावला  ते लक्षातही आले नाही- आणि हे समाजातही रुळले .   नुडल्स प्रमाणे पट्ट्या असलेले ब्लाऊज घालणारी मंदीरा बेदी जेंव्हा तसे कपडे घालून दिसायची तेंव्हा साहजिकच टीआरपी वाढायचा त्या कार्यक्रमाचा- पण ती फॅशन समाजात फारशी रुळली नाही. माझ्या लहानपणी  आमच्या खेड्य़ा कडे एखादी स्त्री डोक्यावरून पदर घेत नसेल तरी पण ते फॅशन या सदरात मोडायचं- लिप्स्टीक वगैरे तर दूरच राहिलं. केस कापलेली मुलगी पण फॅशनेबल म्हणून गणल्या जायची. आता अर्थात ते दिवस गेलेत – पण ही परिस्थिती होती काही वर्षांपूर्वी. आजकाल प्रत्येकच घरातलं कोणीतरी शहराकडे गेल्यावर हे सगळं कॉमन झालंय गावाकडे सुद्धा!

काही दिवसापूर्वी तो अक्षय कुमारच्या बायकोने  फॅशन शो मधे  त्याच्या जिन्सचे बटन उघडले होते. बातम्या मधे हीच क्लिप सारखी सारखी घोळवून दाखवली जात होती  -जसे काही ही एक अतिशय प्रेक्षणीय गोष्ट आहे अशा स्वरुपात.  एखाद्या सिनेमा नटाला पण प्रत्येक फॅशन शो मधे ’शो स्टॉपर” ( म्हणजे काय हो??) म्हणून घेण्याची पद्धत आहेच.तो अशा प्रकारे जर शो स्टॉप करत असेल तर कठिणच आहे. कुठल्या तरी प्लास्टीकच्या कपड्यांपासून बनवलेले ड्रेसेस जे कधी कोणी घालू शकणार नाही असे घातलेल्या  त्या मॉडेल्स स्टेज वर रॅम्प वॉक करतांना दिसल्या. बरेचदा तर हे फॅशन शो पहातांना मला तर कपडे हॅंगर वर अडकवल्यासारखं दिसणाऱ्या मॉडेल्स ची शरीर यष्टी पाहिली की त्यांची दया येते .

मला एक नेहेमी पडणारा प्रश्न आहे , की त्या फॅशन शो मधे  भारतात  मॉडेल्स  ला  जे कपडे घातलेले दाखवतात, तसे कपडे सर्वसामान्य माणसं घातलेले कधी दिसत नाही. मग हे फॅशन शो कशासाठी केले जात असावेत? वर खांद्यावर पट्ट्या नसलेल्या गाऊन्स वगैरे घातलेल्या स्त्रिया मी कधी कुठे पाहिलेल्या नाहीत आजपर्यंत माझ्या आयुष्यात. कदाचित मी फॅशनच्या दुनियेत  फार ’निम्न वर्गीय”किंवा ’बुर्झ्वा”अभिरुची असलेला असेल म्हणून माझ्या सामाजिक जीवनात अशा कपड्यांना अजूनही स्थान नाही.

अतिशय लो वेस्ट जिन्स आणि ते घातल्यावर वर घातले जाणारे तोकडे टॉप्स! थोडं वाकलं खाली, की अंतरवस्त्रं दिसायला हवे अशी ती फॅशन असो , किंवा प्लास्टीकच्या पट्ट्या वर दिसतील अशा तर्हेने टी शर्ट्स च्या आतून  घातलेले अंतरवस्त्रं असो – हे सगळे  योग्य की नाही हा प्रश्न महत्त्वाचा नाही. जे झाकून ठेवायचं, ते लोकांना दाखवायचं ,आणि जे दाखवायचं ते झाकून ठेवायचं असं काही केलं की त्याला मग  फॅशन म्हणायचं असं असतं का?

चांगली  फॅशन  आणि वाईट  फॅशन असे काही नसते. माझ्या मते जे कपडे घालून मुलीला बापाबरोबर बाहेर फिरतांना, आईला मुला सोबत, नवऱ्याला बायकोसोबत फिरतांना  अनकम्फर्टेबल वाटत नाही  ती  ,  किंवा जी  आपल्या घरच्या लोकांनी केलेली आपल्याला आवडेल ती फॅशन योग्य!

ह्या पेक्षा पण जास्त प्रोव्होकेटिव्ह पोझ दिलेले फोटो आहेत या माणसाचे.. 🙂

बरं वर जो फोटो लावलेला आहे तो  जर एका मुलाचा आहे असे तुम्हाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही ना?  पण तो खरंच  एका मुलाचा फोटो आहे. पॅरिस फॅशन मार्केट मधली ’लेटेस्ट फाईंड’. हा मुलगा मुळचा ऑस्ट्रेलिया मधला आहे वय १९, उंची ६ फुट दोन इंच! एकदा याचे लांब केस आणि सुंदर चेहेरा  जेंव्हा एका फॅशन डिझायनरने पाहिला तेंव्हा याला घेऊन तो   पॅरिसला आला, आणि ह्याला सरळ मुलीचे कपडे घालून रॅंप वर उभे केले-सगळे स्त्रियांचे कपडे घालून मॉडेलिंग करण्यासाठी!

याला सगळ्यात जास्त पैसे मिळतात. मोस्ट हॉट मॉडेल समजले जाते या अ‍ॅंड्र्युज पेजिक ला.    काहीतरी जगावेगळं केलं  की लोकांना ते हवं असतं ………….. जाऊ द्या संपवतो आता इथेच!

भुत..

Written by  on September 29, 2009

१ जानेवारी २०१२.. नवीन वर्ष सुरु झालं होतं. वेळ रात्रीची दिड वाजताची. राजाभाऊ आपल्या मित्रांबरोबर ( बायकोच्या शब्दात सांगायचं, तर टॊळभैरवांबरोबर )पार्टी आटपून घरी निघाले होते.त्या भल्यामोठ्या पिंपळाच्या झाडाखालून जातांना एकाएकी एक भूत समोर येऊन उभं राहिलं. राजा भाऊंकडे बघून त्याने भितीदायक चेहेरा केला, पण राजा भाऊंनी मात्र पुर्ण दुर्लक्ष केलं.

भूत आता मात्र चिडलं होतं,त्याने अजून अक्राळविक्राळ चेहेरा केला, बोटाची नखं पाजळली, आणि राजा भाउंचा गळा पकडायला धावला,पण राजा भाऊंच्या वर मात्र काही परिणाम झाला नाही, त्यांनी शांतपणे त्याचे हात झटकले आणि चालायला लागले . आपल्या कुठल्याही पद्धतीचा काही परिणाम होत नाही, हे पाहिल्यावर शेवटी अगदी अजिजीच्या स्वरात त्या भुताने राजा भाऊंना म्हंटले, की “अहो मला घाबरा हो तुम्ही. हल्ली मला कोणीच घाबरत नाही, अगदी शाळेत जाणार . आणि जो पर्यंत माझा एक लाख लोकांना घाबरवण्याचा कॊटा मी पूर्ण करत नाही, तो पर्यंत मला मुक्ती मिळणार नाही- आणि ढसा ढसा रडणे सुरु केले त्या भुताने”

या भारत देशा मधे ज्या कोणाला पहातो तो आधीपासूनच त्रस्त असतो. आता तर असं झालंय की सामान्य माणूस मला घाबरत नाही, पण त्या माणसाचा समस्यांनी ग्रासलेला चेहेरा बघितला की मलाच घाबरायला होतं. राजाभाऊ अरे खोटं खोटंच घाबर मला .. माझं काम आहे ते लोकांना घाबरवण्याचं..

राजाभाऊ म्हणाले, ” . पण त्यावर म्हणतो “अरे तुला कशाला घाबरायचं? तु करणार तरी काय? तुझ्या पेक्षा तो भ्रष्टाचार जास्त भितीदायक आहे.तू जे विनाकारण काही उद्दीष्ट समोर नसतांना अत्याचार करतोस ते म्हणजे तुझ्या वेळाची आणि शक्तीची पूर्ण बरबादी आहे. तू जे विचित्र भितीदायक चेहेरे करतोस, त्या पेक्षा जास्त भितीदायक चेहेरा आहे तो आतंकवादाचा- आणि तो तर आम्ही नेहेमीच पहातो, तूच सांगा त्या आतंकवादाला पाहिल्यावर तुझी कशी काय भीती वाटेल मला? अरे असे अनेक आहेत, की ज्यांची भिती वाटावी.. पण त्यात तू नाहीस.

मेलेल्या मढ्याच्या टाळू वरचे लोणी खाणारे सरकारी डॉक्टर्स आहेत आमच्याकडे.लाखो रुपयांची फी घेऊन पेशंट मेल्यावर केवळ काही पैसे देणे शिल्लक आहे म्हणून डेडबॉडी ताब्यात न देणारे सो कॉल्ड उच्चभ्रू डॉक्टर्स – त्यांच्या निर्लज्जपणाची बरोबरी तू कशी काय करू शकणार आहेस?

तुझं चारित्र्य कितीही वाईट असलं तरी आमच्या पोलिसाशी  तू कधीच बरोबरी करू शकणार नाहीस. तुझी बहीण डायन, चुडेल कधी काळी थोडा फार त्रास देऊ शकेल, पण बेकारी, गरीबी, महागाई यांच्यापुढे ती आपलं ग्लॅमर कसं काय टिकवेल?त्यांचं अस्तित्व केवळ बायकांना एकमेकींना भांडतांना च्या शिव्यांसाठीच राहिलेले आहे. वाईट परिस्थिती मधे रहाणारे झोपडपट्टीत दररोज जिवंतपणी मरण यातना भोगणारे लोकं तर न मरता पण मरत असतात.तुझी भीती कशी काय वाटेल आम्हाला?

आमचे नेते आमचेच पैसे खाऊन आमच्यावरच कुरघोडी करतात, त्यांची बरोबरी तू करू शकतोस? अरे उगाच कशाला तोंडाची वाफ दवडतोस? जा आपला पिंपळावर जाऊन लटक.. तुझी लायकी तेवढीच..अरे आम्ही आमचे करोडॊ रुपये खाऊन अगदी ढेकर ही न देणारे आमचे राजकीय नेते पाहिलेले आहेत. त्यांच्यापुढे तुझी काय औकात आहे? ते तर काहीही करू शकतात.

शेतकी मंत्री शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याचे भाव कमी करायचे म्हणून पाकिस्तानातून कांदा इम्पोर्ट करुन -इथल्या शेतकऱ्यांचा माल २५ पैसे किलो ने विकत घेउन सडवू शकतात.

दररोज विदर्भात शेतकरी आत्महत्या करत असतांना चौथ्या पानावर पण बातमी न देणारे आपले पत्रकार बंधू?- पैशाकरता स्वत्व विकलेले संपादक, तसेच आपल्याला हवे त्या ठिकाणी कॉलेजेस सुरु करून आपल्या पुढ्ल्या पिढ्यांच्या पोटापाण्याची सोय करून ठेवणारे शिक्षण मंत्री- . अरे भुता, मुलगा/मुलगी १२वी मधे गेली की भिती वाटते रे. मेडिकल शिक्षणाची पाच लाख रुपये वर्षाची फी , इंजिनिअरिंगची एक लाख .कशी भरायची याची .

भारतातल्या कुठल्याही गल्लीबोळात गेलास तरी तुला हे असंच चित्र आहे. सगळीकडे असेच त्रासिक लोकं आहेत. तुझ्या पेक्षा जास्त भितीदायक परिस्थितीला तोंड देत उभे आहेत- परिस्थितीने गांजलेले. तुला कोणी घाबरणार नाही भारता मधे.

भूताचं लक्ष एका खिडकी मधून दिसणाऱ्या टिव्ही कडे गेलं. एक पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एक सुंदर दिसणारा युवक एका गरीब माणसाच्या घरी पिठलं भाकरी खात होता. तो सामान्य एकेकाळचा अस्पृष्य म्हणून गणल्या जाणारा माणूस प्रसन्न चेहेऱ्याने टिव्ही कडे पहात होता. दुसऱ्या एका सिन मधे तोच सुंदर युवक पाठीवर प्लास्टीकच्ं घमेलं घेऊन मजुरांबरोबरच काम करतांना दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पण अजिबात मावळलेलं दिसत नव्हतं. इतकं काम करूनही अजिबात थकवा, चिडचिड, राग काही दिसत नव्हतं. भुताने विचारले, राजाभाऊ, अहो तो बघ एक आनंदी माणूस दिसतोय टिव्हीवर- तो तरी घाबरेल का मला???

राजाभाऊ म्हणालो, कुठे आहे.. त्यांना दिसला तो गोजिरवाणा गोंडस चेहेरा , तेवढ्यात एक ब्रेकिंग न्युज ची पट्टी दिसू लागली, आणि ’कॊणाच्या’ तरी थोबाडीत ’कोणी तरी’ मारतांना दिसले. राजा भाऊंनी टिव्ही कडे पाहिले, आणि एकदम घाबरून पळत सुटले…..

रागदारी..

Written by  on September 28, 2009

भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा अधिकारवाणीने लिहायचा विषय नाही. मला गाणं पण  म्हणता पण येत नाही.   लहानपणी जवळपास ३-४ वर्ष   हार्मोनियम शिकायला जायचो- तेवढाच काय तो संगीताशी  आलेला संबंध.  तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच होऊ शकलो !

शास्त्रीय संगीतामधे  प्रत्येक रागाची ऐकण्याची वेळ ठरलेली असते. बरेचदा सकाळी ऐकायचा राग जर तुम्ही दुपारी ऐकाल तर  तो ऐकतांना काहीतरी बिघडलंय  याची जाणीव करून देतो, उगीच काहीतरी चुकल्या सारखं वाटतं. या उलट जर त्या – त्या वेळेसचा राग त्या त्या वेळी ऐकला तर तो सगळ्य़ा जाणीवांना स्पर्शून जातो. मी स्वतः याचा बरेचदा अनुभव घेतला आह . एवढ्यातलीच   गोष्ट आहे, अश्विनी भिडे देशपांडे यांच्या एका पहाट मैफिलीला गेलो होतो. सकाळचा गारवा.. हेमंत ऋतू असल्याने मंद वारे सुरु होते. अश्विनी भिडे यांचा “कवन बदरीया गयो माई, कौन गली गयो शाम”   रे मनवा सुमर हरी नाम.. सुरु केले आणि साधारण २० एक मिनिटांच्या नंतर आपोआपच डोळ्यात पाणी आलं. इतका आर्त स्वर लागला होता की  तो अनुभव शब्दात सांगता येणार नाही.  योग्य वेळी योग्य राग आणि उत्कृष्ट वातावरण निर्मिती यामुळे हे शक्य होऊ शकते! संगीता मधे जी शक्ती आहे ती फक्त अनुभवाने च समजते.

संगीत ऐकणारे दोन प्रकारचे लोकं असतात , एक म्हणजे तबल्याच्या ठेक्यावर ताल देणारे, आणि दुसरे म्हणजे ’समे’ वर आलो की मान डोलावणारे. गाणं म्हणणारा गायक हा त्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांसाठीच गाणं गात असतो. समोर समे वर आल्यावर एक जरी मान डॊलली की तो भरून पावतो. गाणं म्हणण्याचा रियाज तर हवाच पण गाणं ऐकण्याचा ही रियाज हवा, नाही तर शास्त्रीय संगीतात काहीच रस वाटणार नाही.

एकदा एका  कार्यक्रमाच्या वेळी आरती अंकलीकर म्हणाल्या होत्या, ”  पट्टीच्या गवयाला कुठलाही नाद चालतो, मग तो पंख्याचा लयबद्ध नाद जरी असला, तरीही त्या नादावर गाणं आपोआप गुणगुणले जातं.” हीच गोष्ट पुढे नेत भाऊ मराठे यांनी सूत्र संचालन करतांना   पंडित भॊमसेन जोशींचा एक  बडॊद्याचा    अनुभव सांगितला .रात्रीची वेळ,  भीमसेन जोशी टांग्यात बसून जात होते. टांग्याच्या घोड्यांच्या टापांचा, चाकांचा- लयबद्ध आवाज, आणि निःशब्द शांतता. पंडितजींनी स्वतःच्या नकळत  पूरियाधनाश्री  गुणगुणणे सुरु केले. रात्रीची निवांत वेळ, टांग्याच्या घोड्य़ांच्या टापाचा लयबद्ध आवाज, आणि पंडीतजींचा सूर.. तेवढ्यात काहीतरी झालं  आणि टांगा थांबला.   लय थांबली, आणि त्या बरोबरच पंडीतजींचा आवाजही थांबला. टांगेवाला म्हणतो, ”  पूरियाधनाश्री क्युं बंद किया? शुरु रखिये नां”.. आता एक टांगेवाल्याने  कुठला राग आहे हे ओळखलेले ऐकून पंडितजींना खूप आश्चर्य वाटले, त्यांनी विचारले,” आपको , कैसे मालूम की  ये धनश्री पुरीया है” त्यावर टांगेवाल म्हणतो, ” बाबूजी, हम फैय्याज खां साहब के पडॊसमे रहते, है, और हमेशा उनका रियाज सुनते हुए बडे हुए  है, इतना तो मालूम रहेगाही नां…”

वरचा अनुभव म्हणजे  त्या टांगेवाल्याच्या कानावर ऐकण्याचे संस्कार झाले होते. हा प्रसंग ऐकण्याचे संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे दाखवणारा आहे. गाणं म्हणणं जितकं महत्त्वाचं, तितकंच ते ऐकता येणं हे ही महत्त्वाचं.  त्या टांगेवाल्याच्या कानावर   गाणं ऐकण्याचे  संस्कार झाले होते.गाणं कसं ऐकावं यातलं मर्म त्याला समजलं होतं.  म्हणूनच तो पंडितजींना दाद देऊ शकला.

योग्य वेळी जर योग्य राग ऐकला, तर त्याचा परिणाम जास्त होतो. बरेचदा चुकीच्या वेळेस ऐकलेले राग उगाच नकोसे वाटतात. तेंव्हा, रागाची वेळ सगळ्यात जास्त महत्त्वाची. मी शास्त्रीय संगीताचा ’मास्टर’ नाही किंवा त्यावर माझे काही एक्सपर्टाइझ पण नाही, आणि म्हणूनच, माझी त्यावर काही लिहीण्याची पात्रताही नाही , हे माहिती असतांनाही एक लहानसे पोस्ट की ज्या मधे कुठला राग केंव्हा ऐकायचा याची माहिती देत आहे.

कुठला राग केंव्हा ऐकायचा ?? हा प्रश्न पडत असेल तर हा तक्ता उपयोगी पडू शकेल. या मधे काही मह्त्त्वाचे राग वेळेनुसार दिलेले आहेत.

सकाळी    २ ते ४  :- सोहिनी, पारज

सकाळी    ४ ते ६  :- ललित, भटीयार,भनकर

सकाळी  ६ ते ८  :- जोगीया, रामकली, भैरव, कलींगा,  विभास,गुनकली

सकाळी    ८ ते १० :- तोडी, कोमल रिषभ आसावरी, बिलासखानी तोडी, अहिरभैरव, नटभैरव, हिंदोल

दुपारी    १० ते १२:- जौनपुरी, अलाहिया बिलावल, देसकर, भैरव, देसी,असावरी,

दुपारी    १२ ते २ :- गौड सारंग, शुद्ध सारंग, वृंदावनी ,सारंग

दुपारी     २ ते ४  :- भिमपलासी ,मुलतानी

दुपारी     ४ ते ६  :- पटदीप, श्री, पूर्वी, धानी,्बरवा

सायंकाळी ६ ते ८  :- हमीर, शुद्ध कल्याण, यमन, पुरीया, मेघ, गौ्री, हंसध्वनी,परीय़ाधनाश्री, लक्ष्मी कल्याण,  हमीर, यमन कल्याण, कलावती

रात्री     ८ ते १० :-  देश , दुर्गा, केदार, जयजयवंती, मीयामल्हार, सुरदासी मल्हार, काफी, रामदासी मल्हार, बहार, जोग, दुर्गा, हेमकल्याण, नटभैरव, भूपाली, गारा , कामोद, तिलंग, शाम कल्याण, नंद, जोग, केदार, चांदनी केदार , देश, गौड मल्हार, तिलक कामोद,खमाज, कलावती

रात्री    १० ते १२ :- चंद्रकंस, शंकरा, बागेश्री, बिहाग, अभोगी, नायकी कन्नडा ,कौ्शिक अवनी, बिहागडा, सरस्वती,

रात्री     १२ ते २  :-अदना, शहाणा, दरबारी कानडा, आणि मालकंस

जर वर लिहिण्या मधे  काही चुका असतील तर अवश्य सांगा म्हणजे दुरुस्त करता येतील.

कुंकवाची पेटी

Written by  on September 21, 2009
कुंकवाची पेटी

कुंकवाची पेटी

लहानपणापासून कांही गोष्टींना मोठी माणसं हात लाउ देत नाहीत मग त्या गोष्टींबद्दल खूप आकर्षण वाटत रहातं. जसं, मुलांच्या बाबतीत बाबांची शेव्हींग किट, किंवा मुलींच्या बाबतीत आईचा पावडर कुंकवाचा डबा. अशा तर अगदी खूप गोष्टी असतात ज्यांना हात लावणं वर्ज्य असतं.चुकून जरी तुम्ही त्याच्या जवळ गेलात तर ओरडा ऐकायला लागतो.
पण त्यापैकी  लक्षात राहिलेली एक गोष्ट म्हणजे माझ्या आजी ची  कुंकवाची पेटी.

शिसवी काळ्या लाकडाची ही पेटी म्हणजे आमच्या दृष्टीने अलिबाबाची गुहा होती.नेहेमी च्या पेटी बद्दल एक आकर्षण वाटत रहायचं, त्या पेटीला आजी कधीच हात लाऊ देत नसे. कारण काय ते माहिती नाही पण आजी त्या कुंकवाची  पेटी बद्दल  खूपच सेन्सिटीव्ह होती.

माझी आज्जी खूप सुंदर होती दिसायला, आणि आजोबा तेवढेच भितीदायक. सहाफुट उंची, पांढरी दाढी – गळ्यापर्यंत लांब, चेहेऱ्यावरचे मुजोर भाव, कोणीही पाहिलं तर भितीच वाटावी असे व्यक्तिमत्व होतं आजोबांचं. ते जेंव्हा घरच्या गड्याला रागवायचे तेंव्हा तो अगदी चळा चळा कापायचा. एखाद्या वेळेस जर उलट्या हाताची पडली की मग झालं.

आज्जी मात्र अगदी ५ फुट  २ इंच वगैरे उंच असावी, आजोबांच्या समोर ती खुपच कृश वाटायची. स्वच्छ गोरा रंग, नितळ कांती, डोक्यावर बांधलेला अंबाडा, त्याला खोचलेले आकडे. पुर्वी सोन्याचं फुल लावायची, पण नंतर सोडुन दिलं तिने.

उन्हाळ्याची सुटी सुरु होती. आम्ही सगळे जण एकत्र जमायचो सुटी च्या दिवसात. चार मामा आणि तिन मावश्या, प्रत्येकी दोन मुलं, काही मामा मावशांना तिन मुलं पण होती. त्यातली कच्चे लिंबु टिंबु वगळले की आम्ही १३-१४ जण साधारण एकाच वयाचे असायचो. उन्हाळ्याच्या सुटीची तर वाट पहात रहायचॊ आम्ही. कधी एकदा एकत्र जमतो आणि मज्जा करतो असं होऊन जायचं.

vintage-shaving-box-3_45575_3आजोबा मालगुजार होते, त्यामुळे बराच   जमीनजुमला होता. मोठं जुनाट घर, पण  भलंमोठ्ठं.. दोन मजली घर होतं.घराच्या मागे एक दिड एकराचा रिकामा प्लॉट , तिथे गाई, म्हशींचा गोठा, एक विहीर. काही झाडं, मुद्दाम लावलेली, संत्रं, आंबा, पेरू, डाळींबं इत्यादी..  दुर परसदाराकडे संडास- घरापासून दुर..

रिकाम्या जागेत पऱ्हाटी, ज्वारीचे धांडे, कापसाची सुकलेली झाडं,रचुन ठेवलेली-त्याला पऱ्हाटी म्हणायचे, अगदी पेट्रोल प्रमाणे पेट घेते पऱ्हाटी म्हणुन चुल पेटवायला वापरली जायची. मागच्या अंगणातल्या चुली वर आंघोळीचं पाणी तापवलं जायचं. त्या चुलीमधे भाजुन खाल्लेल्या कांद्य बटाट्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते..  जवळच लाकडं पडलेली. एक लहानशी खोली, त्यामधे कुऱ्हाड टांगुन ठेवलेली. मागच्या अंगणातल्या चुलीमधे लाकडं पेटवायला त्या तुरीच्या काड्या, किंवा कापसाची वाळलेली झाडं वापरली जायची. ज्वारीचे धांडे जनावरांना खायला घालायचे. घरी गडी माणसं भरपूर.. जेवण झाल्यावर हातावर पाणी घालायला पण माणुस असायचा.

आजोळ अगदी गर्भश्रीमंत, पण आम्ही मात्र इतके श्रीमंत नव्हतो. तेंव्हा माझे वडील शिक्षक होते अमरावतीला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं अप्रुप वाटायचं. सगळे गडी माणसं , छोटे मालक म्हणुन हाक मारायचे, आणि ते खूप आवडायचं. उगीच आपण खूप मोठं झालो असं वाटायचं.

एक दिवस सकाळी दहाच्या सुमारास एक आदिवासी माणुस हातामधे एका मडक्यामधे मधाचं पोळं घेउन आला. त्या पोळ्या भोवती अजूनही माशा घोंगावत होत्या.  कंबरेला धोतर, अंगात बंडी ( म्हणजे बनियन प्रमाणे शिवलेला एक अर्ध्या बाह्यांचा अंगरखा) , पायात वहाणा नाही, काळे कभिन्न पाय त्या पिंगट झालेल्या धोतरातून बाहेर डोकावत होते. मधेच हाताने शिवलेला तो अंगरखा , धाव दोरा स्पष्ट दिसत होता. आम्ही मुलं खेळत होतो. म्हणाला, मालकीण बाई आहेत कां?

आज्जी बाहेर आली आवाज ऐकुन आणि त्याच्याकडून मध घेतलं विकत. आम्ही गम्मत पहात होतो. त्याने मध देण्यापूर्वी त्या पोळ्याच्या वरचा मेणाचा थर काळजी पूर्वक काढला आणि आज्जीने आणलेल्या लहानशा वाटीत तो काढून दिला. मध तर ठीक आहे, पण ह्या मेणाचा उपयोग??

imagesआज्जीने आपली कुंकवाची पेटी काढली आणि त्यामधल्या चांदीच्या डबीमधे ते मेण भरुन ठेवलं.. अच्छा… म्हणजे ते हे मेण होतं होय?? आज्जी फिक्कट रंगाचं नऊवार पातळ नेसायची. सकाळी अंघोळ करुन आली आणि तिने कुंकवाची पेटी उघडली की आम्ही तिच्या  अवती भवती बसून ती काय करते ते पहायचॊ .  याच पेटी मधे आरसा होता बेल्जियमचा. तो आरसा उघडला की पेटीमधे काय आहे ते सगळं दिसायचं . एक हस्तिदंती फणी, कुंकाचा करंडा, मेणाची डबी आकडे ,काचेच्या बांगड्या, व्यवस्थित एकत्र बांधुन ठेवलेल्या + कांही कानातल्या कुड्या वगैरे त्यात असायचं

.सोबतंच १०-१० रुपयांच्या कांही नोटा. त्या कशाला असायच्या ते माहिती नाही. पण मी लहान असतांना त्यातली एक नोट चोरली होती. अरे खरंच सांगतोय, तेंव्हा फॅंटा नवीनच आलं होतं. ७० पैशाला मिळायचं, ते फॅंटा प्यायला म्हणून एकदा पैसे काढून घेतले होते. पण पकडल्या गेलो.. 🙂

आज्जी नेहेमीच हस्तिदंती फणी वापरायची. कंगवा वगैरे वापरताना कधीच पाहिलं नाही तिला.1Paisa  त्या मधे एक ढब्बू पैसा होता. ढब्बु पैसा म्हणजे ज्यामधे एक लहानसं भोकं असतं . तो पैसा कपाळावर ठेवून मधल्या रिकाम्या भागात आज्जी ते मेण लावायची. आणि नंतर त्या मेणावर कोरडं कुंकू लावायची. नुसतं कोरडं कुंकू कपाळावर टिकत नाही म्हणुन ते मेणावर लावायची आज्जी. तसं कुंकवाची बाटली पण मिळायची, पण ते कुंकू कधीच वापरले नाही आज्जीने. हेच ते रहस्य होतं कपाळावरच्या वाट़्टॊळ्या कुंकवाचे. नंतर भरपूर तेल लावून केसांचा अंबाडा घालायची-अंबाडा घातल्या नंतर मग त्या केसांच्यामधे आकडे लावून तो पक्का करणं, आणि नंतर मग सोन्याचं फुल वर लावणं.. हे रोजचंच काम होतं . आम्ही अगदी इमाने इतबारे तिच्यासमोर ब़सून रहायचो तिची तयारी पुर्ण होई पर्यंत. दातामधे आकडा धरलेला असायचा, तेंव्हा… अजूनही डोळ्यापुढे चित्र उभं रहातं….

आज्जी गेली ,बरीच वर्षं झाली त्याला,पण तिची आठवण का आली तेच कळंत नाही. पण आठवण आली म्हणूनच हे पोस्ट.

एक पोस्ट वाचलं सईचं , म्हणून आठवलं असेल कदाचित..पुरुषांनी इतके सेंटी पोस्ट्स लिहू नयेत. .. ते फक्त मुलींनीच लिहावेत.. असो…पण माझा काय वाटेल ते लिहिण्याचा स्वभाव आहे, आणि आज असं वाटतंय , म्हणून हे पोस्ट.

इन्फोसिस च्या पिंक स्लिप्स-२१०० लोकांना

Written by  on September 15, 2009

infy
१९८१ साली केवळ २५० डॉलर्स च्या इनव्हेस्टमेंटवर सात लोकांनी सुरु केलेली ही कंपनी   आज १४ बिलियन्स डॉलर्स चं कॅपिटल जमा करुन बसली आहे.भारतामधे ई सॉप्स च्या ऑप्शन्स खाली एम्प्लॉइज ला शेअर्स ऑफर करणारी ही भारतातिल पहिली कंपनी. तसे, पैसा फंड कंपनी आहे म्हणा , पण ती फार जुनी सक्सेस स्टॊरी आहे.इतकी एम्प्लॉईज फ्रेंडली कंपनी जेंव्हा परमनंट एम्प्लॉइज ला पिंक स्लिप इशु करते तेंव्हा खरंच आश्चर्य वाटते.पगार खुप वाढवुन दिल्या मुळे वॉटम लाइन वर ( म्हणजे प्रॉफिटॅब्लिटीवर ) पडणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय  असावा हा.

इन्फोसिस ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.infosys.com/) ने काल २१०० लोकांना पिंक स्लिप्स दिल्या आहेत. बरं पिंक स्लिप्स ज्यांना मिळाल्या आहेत ते सगळे परमनंट एम्प्लॉइज होते. कंपनिने ट्रेनिज न काढता  परमनंट एम्प्लॉइज काढण्याचे कारण काय असावे- हा विचार केला तर  मला असं वाटतं परमनंट एम्प्लॉइज चा पगार हा मध्यंतरी खुपच जास्त वाढवुन दिलेला होता. ही जुनी माणसं जे आणि जितकं काम करायची, तेवढंच आणि त्याच क्वॉलिटीचं काम ही नविन मंडळी पण कमी पैशामधे करु शकतात ही गोष्ट लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेतलेला दिसतो.

ह्या कंपनिने अगदी अबाधित राज्य केलंय स्टॉक मार्केट वर. माझ्या कडे ह्या कंपनिचे काही शेअर्स होते, आणि दर एक वर्षाआड बोनस शेअर्स डिक्लिअर केले होते. आम्ही पण वाहत्या गंगेमधे हात धुवुन घ्यायचे म्हणुन, शेअर एक्स बोनस असला की विकुन टाकायचो आणि कम बोनस झाला की परत घ्यायचो. हा शेअर मी एके काळी २९५० रु ला विकला आहे. 🙂 ह्या शेअरने चांगला पैसा मिळवुन दिलेला आहे मला एके काळी, त्यामुळे या कंपनिवर जरा जास्तंच प्रेम.

पण आता हा शेअर मात्र १२०० -१३०० च्या रेंज मधे खेळतोय.रोजचं शेअर मार्केट फॉलो करण्याचे दिवस संपले आहेत. आपला पोर्ट फोलियो लाल झालेला पाहुन आणि दहा चे दोन झालेले पाहुन उगिच हार्ट अटॅक यायची भिती वाटते, त्या मुळे डीमॅट अकाउंटला लॉग इनच करत नाही.. ह्या शेअरचं ऍनॅलिसिस करतांना नेहेमी शेअर मार्केटचे पंडीत लोक हेच सांगायचे की हा शेअर कुठल्याही प्राइसला विकत घ्यायला हरकत नाही. पण मध्यंतरीच्या काळात जेंव्हा डॉलर विक झाला होता तेंव्हा मात्र प्रॉफिटॅब्लिटी कमी होऊन शेअर चे भाव २००० पर्यंत उतरले होते. तेंव्हा पण मला असंच वाटलं होतं की हा शेअर लवकरच पिक अप करेल पण तसे होणे नव्हते, आणि आमचे पैसे अडकले..

पण…. आता मात्र चित्र बदललंय , डॉलर टू रुपी कन्व्हर्शन रेट हा  पुन्हा वाढतोय.ह्या कंपनिज ला पैसा मिळतोय डॉलर मधे आणि खर्च रुपयांत करायचा.  म्हणजे तसं म्हंट्लं तर आय टी कंपनिज चं प्रॉफिट वाढायला हवं नाही कां? तरी पण आय टी कंपनिज का ओरडा करताहेत हेच मला कळत नाही. जरी नविन काही ऑर्डर्स आल्या असतिल किंवा न्सतैलही,  तरी पण आजुन तरी जुन्या असलेल्या ऑर्डर वर अजुन दोन वर्ष कंपन्या  चालतिल असे मार्केटचे पंडित सांगायचे. प्रत्येक आय टी कंपनीचा शेअर अगदी कवडी मोलाने विकत मिळतोय. कंपन्यांचे प्रॉफिट वाढायला हवे.पण तसं काही दिसत नाही. हे असं कां???? ह्या प्रश्नाचे उत्तर मला कधिच कळलेले नाही.

ओबामांच्या लेटेस्ट घोषणेमुळे आउट सोअर्सिंग वर परिणाम झालाय.तसेच , सत्यम मुळे भारतिय कंपन्यांच्या रेप्युटेशन ला नाही म्हंट्लं तरी धक्का बसलाच आहे. या कंपन्यांच्या मुळे भारतिय कंपन्यांची एक साख होती ती आता गेलेली आहे. सत्यम, इन्फी, पटनी इत्यादी कंपन्याचे शेअर्स नॅसडॅक वर पण लिस्टेड आहेतच. ग्लोबल मेल्ट डाउन मधे जेंव्हा अमेरिकन शेअर बाजार कोसळला, तेंव्हा  ह्याच कंपन्यांच्या स्टॉकला पहिला धक्का बसला होता..

अमेरिकेत हायर ऍंड फायर पॉलिसी खुपच कॉमन आहे. पण भारतामधे आपण ह्या गोष्टी साठी अजुन सरावलेलॊ नाही. लोकांनी पगाराच्या बेसिस वर मोठ्ठी कर्ज काढुन फ्लॅट्स, कार्स घेतल्या होत्या. कार घेतांना पण मोठ्ठ्य़ा कार्स घेण्याकडे कल जास्त होता. ह्या सगळ्य़ा गोष्टींचा परिणाम म्हणजे आता  त्यांचे इन्स्टॉलमेंट्स भरणे इत्यादी गोष्टी जड जाइल.हाच प्रॉब्लेम पुर्वी विप्रो च्या लोकांनी पण फेस केलाय.

गेल्या काही वर्षात, आयटी च्या वाढलेल्या पगारांमुळे इंडस्ट्रियल ग्रोथला पण हातभार लागला होताच.ह्या लोकांचा पगार खुपच जास्त असल्यामुळे परचेसिंग पॉवर वाढलेली होती. हे लोकं कितिही पैसे देउन स्पेसिफिक एरियामधे घरं विकत घेत होती. डिमांड जास्त.. अव्हेलेबीलिटी कमी…. भाव वाढतंच होते. कन्स्ट्रक्शन कंपनिज नी अव्वाच्या सव्वा प्रॉफिट्स बुक केले होते. जो फ्लॅट १००० रु स्क्वेअर फुट च्या भावाने मिळायचा तोच आता ४००० च्या वर पोहोचला होता. बिल्डर्स कडे पैशांचा ओघ वाढल्यामुळे त्यांची पण इन्व्हेस्टमेंट पॉवर वाढुन, नविन मशिनरई खरेदी करणे त्यांनी सुरु केले होते. जनरेटर्स, पंपस हे पण लागतातच प्रत्येक बिल्डींगमधे.. त्यामुळे ईंजिनिअरींग इंडस्ट्रिजला पण हात भार लागायचा या आय टी कंपन्यांमुळे.

नॉन आय टी च्या लोकांना कायम आयटी मधे काम करणाऱ्या लोकांच्या नावाने शिमगा करण्याची सवय असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, की आय टी मधिल बुम मुळेच इन्डायरेक्टली ,इंजिनिअरिंग, ऑटोमोबाइल्स, आणि ह्यांच्या ऍन्सिलरी युनिट्सचे पण टर्न ओव्हर आणि मार्जिन्स वाढल्या. तसेच स्टिल, सिमेंट, अल्युमिनियम इत्यादी इंडस्ट्रिज ची पण ग्रोथ झाली.

एकाचे दुःख म्हणजे दुसऱ्याचे सुख.. आता नविन बुकिंग्ज जवळपास बंदच झालेले आहे. मुंबई आणी पुण्यामधे जागांचे भाव खाली येत आहेत. बिल्डर्स सर्वसामान्यांना परवडणार असे फ्लॅट्स बांधायला घेताहेत. म्हणजे आता बिल्डर्सकडे काहिही किमती ला फ्लॅट्स विकत घेणारे  नवश्रीमंत संपले हाच अर्थ निघतो.

इन्फोसिस च्या टॉप ब्रास चे ब्लॉग्ज इथे बघा. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.infosys.com/beyond-business/davos-2009/default.asp).

(आय टी मधलं जॉब रेसेशन हा पुर्वी लिहिलेला लेख इथे आहे.) ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.wordpress.com/2009/03/27/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AC-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8/)

आयटी कंपन्यांच्यामधे एक भेड चाल आहे. एका कंपनिने कॉस्ट कटिंग करण्यासाठी एखादा निर्णय घेतला, की इतर कंपन्या पण तोच निर्णय घेतातच. लेट्स सी..काय काय पहावं लागेल अजुन तें…

मालक पण इथेच जेवतात…

Written by  on September 14, 2009

IMG-20130423-00255 हॉटेल मधे शिरल्या बरोबर मालकाच्या टेबलच्या मागे असलेला एक बोर्ड ” मालक पण इथेच जेवतात ”  लक्ष वेधून घेतो.  या हॉटेलच्या क्वॉलिटी बद्दलची खात्री देण्यासाठी फार पूर्वी बनवला गेला असावा, ( हॉटेल पण ७२ वर्ष जूने आहे )पण तो अजूनही तसाच ठेवलेला आहे. पूर्वी हॉटेल मधे जेंव्हा मालक स्वतःच जेवतात म्हंटल्यावर जेवण चांगले असेलच यावर गिऱ्हाइकाचा विश्वास बसायला मदत व्हायची. मी हे लिहितोय ते हॉटेल माटुंग्याच्या रामा नायक यांचे उडपी श्रीकृष्ण बोर्डिंग बद्दल.

काही वर्षापूर्वी हॉटेल मधे खाणं हे कमी पणाचं समजलं जायचं. घरच्या लोकांनी बाहेर हॉटेल मधे जाऊन खाणं हा गृहिणीलाही अपमान वाटायचा स्वतःचा, पण हल्ली हे बदललेले आहे. गृहिणी सकट सगळे जण जेवायला बाहेर जातात, आणि त्यात काही कमीपणाचे मानले जात नाही. हॉटेल मधलं अन्न म्हणजे कमी प्रतीचे, त्या मधे स्वच्छतेचा अभाव, आणि इतर बऱ्याच काही गोष्टींचा समज होता.  चांगल्या हॉटेल्स ची कमतरता तर होतीच, आणि म्हणून नेमक्या ह्याच काळात म्हणजे साधारण १९४० च्या सुमारास कर्नाटकातून आलेले. केळीच्या पानावर साधे सरळ अगदी घरगुती चवीचे दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण त्यांनी देणे सुरु केले –  या गॅरंटी सकट की जेवण स्वच्छ बनवलेले आहे, आणि मालक पण इथेच जेवतात, म्हणजे चांगल्या प्रतीचे आहे !

ह्या हॉटेल ची माहिती मला राजाभाऊं कडून समजली.  राजा भाऊंनी एकदा फेसबुक वर पोस्ट टाकली होती, की इथे  जेवायला जातोय म्हणून, आणि नेमका दोन दिवसानंतर माझा पुण्याचा मित्र आला होता, तो शुद्ध शाकाहारी असल्याने त्याला घेऊन इथे जेवायला गेलो, आणि त्या नंतर तर ह्या हॉटेल चा अगदी डाय हार्ड फॅन झालोय मी.  आता या कर्नाटकी शेट़्टीच्या हॉटेल मधे वेगळे असे काय आहे की याचे खास वेगळेपण आजही टिकून आहे? तर तुम्हाला ते समजून घेण्यासाठी इथे एकदा यायलाच हवे.

IMG-20130423-00254स्वच्छ ते बद्दल तुमच्या मनात काही शंका आहेत?? जर उत्तर होय असेल, तर शेजारीच अजून एक पाटी आहे, तुम्ही आमच्या स्वयंपाक घरात जाऊन पाहू शकता. स्वयंपाक घरात सहज नजर टाकली तरी पण स्वच्छ पांढऱ्या ऍप्रनमधले लोकं काम करतांना दिसतात.मी आत जाऊन पाहिले नाही, पण जे काही समोर दिसतं त्या बद्दल अजिबात काही कम्प्लेंट करायला चान्स नाही.

सेंट्रल वरच्या मा्टुगा स्टेशनच्या बाहेर पडल्याबरोबर डाव्या हाताला पहिल्या मजल्यावर असलेले हे रामा नायक यांचे , “ऊडपी श्रीकृष्ण भोजनालय”‘१९४२ साली सुरु केलेले हॉटेल आजही ७१ वर्षानंतर त्याच दिमाखात उभे आहे. आपली परंपरा जपत .रामा नायक ह्यांच्या पुढल्या पिढीने  बऱ्याच गोष्टी अगदी पूर्वी ज्या प्रमाणे होत्या त्या तशाच ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसतो – अगदी चवी सकट! इथे जेंव्हा पहिल्यांदा जेवायला गेलो होतो तेंव्हाच ह्या   हॉटेलच्या  अगदी प्रेमात पडलो होतो.

IMG-20130423-00253दाक्षिणात्य पद्धतीचे म्हणजे चार प्रकारचे जेवण असते. एक म्हणजे तामिळ, दुसरे आंध्रा, तिसरे केरळी आणि चौथे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जिभेवर ज्याची चव आपला जम बसवलेली आहे ती म्हणजे कर्नाटकी उडपी. ह्या तिनही प्रकारात एक वेगळी चव असते. नुसता सांबार जरी म्हंटलं, तरी, त्याच्या चवीमधे फरक असतोच. कर्नाटकी किचीत गोडसर चव असलेला सांबार असो काय किंवा आंध्रा मधला आंबटसर चवी कडे झुकणारे सांबार असो, दोन्ही मला अगदी सारखेच प्रिय आहेत. अर्थात केरळी, तामिळ सांबार – जे साधारण सारख्याच चविचे असतात, त्याची पण एक वेगळीच मजा असते.

कांदा, लसूण न घालता केलेले कर्नाटकी पद्धतीचे रस्सम म्हणजे रामा नायक कडला माझा विक पॉइंट! इथे रस्सम  आमसूलाचे, चिंचेचे, किंवा कधी टोमॅटोचे पण असते. रस्सम वाढायला तो वेटर आला, की त्याल समोर उभा ठेवून चार पाच वाट्या रीचवल्या शिवाय मी जेवणाची सुरुवात करित नाही.त्यातले आमसुलाचे रस्सम माझे फेवरेट. केरळी, मद्रासी रस्सम मधे कांदा, लसूण असतो, पण इथे तसे काही नाही. तिखट नाही, पण चवदार असे रस्सम इथे असते. ह्या हॉटॆल मधे अनलिमिटेड जेवण हे केळीच्या पानावर वाढले जाते.  ऑथेंटीक  कोस्टल कर्नाटका स्टाइलचे जेवण असल्याने  सगळ्याच भाजांमधे नारळाचा अगदी सढळ हाताने केलेला वापर  हा ओघाओघाने आलाच.

परवा जेंव्हा इथे जेवायला गेलो होतो, तेंव्हा काटेकोहोळ्याची भाजी होती,(काटेकोहोळे म्हणजे ज्या पासून आग्ऱ्याला पेठा बनवला जातो तो एक भोपळ्याचा प्रकार) आणि  सुरण ची कडधान्याच्या उसळी मधे केलेली भाजी होती.काटेकोहळ्याची भाजी होऊ शकते, आणि ती चवदार असते यावर विश्वास ठेवायला भाग पाडले  या रामा नायक यांच्या हॉटेल ने! ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. भरपूर नारळाचा चव घातल्याने आणि वेगळे कर्नाटकी मसाले ( म्हणजे नेमके कुठले असतील बरं?) घातल्याने  एका वेगळ्याच चवीची ओळख झाली होती. पानकोबीची भाजी पण कधी नव्हे ती चवीने खाल्ली. 🙂

सुरुवातीला ताज्या कैरीचे लोणचे, दोन भाज्या, दही आणि दोन तवा चपाती ( इथे फुलके मिळत नाहीत) वाढल्या जाते. हे संपवल्यावर  भाताचा डॊंगर समोरच्या केळीच्या पानावर वाढून तो वेटर निघून गेला. हा डॊंगर संपेल?? हा प्रश्न मनात पडतो, पण सुरुवातीला, काटेकोहोळ्याची भाजी आणि भात, नंतर ती उसळ सदृष भाजी आणि भात, संपवण्यातच सगळा डोंगर संपला.

वेटरचे लक्ष होतेच, त्याने समोर पुन्हा एक लहानशी टेकडी एवढा भात वाढला. सांबर भात, रस्सम भात, आणि शेवटी दही भात -लोणचं, आणि सोबत ७-८ आप्पलम घेऊन जेवण संपवले. स्विट डिश मधे अर्थात आमरस घेतला. काचेच्या उभ्या ग्लास मधे असलेला हा आमरस म्हणजे शेवटच्या तृप्तीच्या कळसा वरचा चमकणारा हिरा!

बाहेर निघालो, तर बरीच मोठी रांग होती, म्हणून इथे जेवायला जायचे असेल तर लंच टाइम म्हणजे एक ते दोन च्या दरम्यान जाणे टाळा, रांगेत उभे रहाणे टळू शकेल. जायचं कसं? एकदम सोप्पं आहे. माटुंग्याला उतरा, पूर्वेला बाहेर पडल्यावर ,कोणालाही विचारा. 🙂 रामा नायक … मुंबई मधली एक शाकाहारी जेवणाची खास जागा. चुकवू नये अशी एक जागा 🙂

जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप

Written by  on September 12, 2009

गॅरिडॊ नावाचा एक सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं फक्त ११ ला,साउथ लेक येथुन  किडनॅप करतो.हा माणुस अगदी १०० टक्के मानसिक रोगी आहे. ह्याचं म्हणणं असं आहे की-ह्या माणसाशी म्हणे देव बोलतो..

तिच्या घरापासून केवळ दोन ब्लॉक्स दुर , तिला एका कारमधून दोन व्यक्तिंनी किडनॅप केले होते. ही घटना तिच्या वडिलांनी पण पाहिली , आणि त्या कारचा सायकलने पाठलाग केला, परंतु कार स्पिड अप करुन निघून गेली. या प्रकरणाला मिडियामधे खूप प्रसिद्धी मिळाली होती, तरीही या मुलीचा शोध लागू शकला नव्हता.

त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी अगदी जंग जंग पछाडलं तरीही त्या मुलीचा पत्ता लागला  नाही.. थोडे थोडके नव्हे तर पुर्ण १८ वर्षं. बरं पळवून नेणाऱ्याने त्या  मुलीला आपल्या घराच्या मागच्या अंगणात    मधे मेक शिफ्ट टेंट्स मधे  ठेवले होते किडनॅपरने त्या मुलीचं पण तसंच झालं असावं..ती स्वतः आणि तिची दोन्ही मुलं याच भागात खेळत मोठी झाली.. आणि ते कोणाच्याच कसं लक्षात आलं नाही??खाली जो व्हिडीऒ दिलेला आहे तो टिव्हीवाल्याने शेजारच्या घरातून काढलेला आहे. म्हणजे त्या घरातून सगळं काही दिसतं…!!!!

आज जेंव्हा त्या मुलीला सोडवण्यात आले तेंव्हा तिचे वय २९ वर्ष. तिला या महाभागापासून दोन मुलं पण झालीत. मोठं अपत्य १५ वर्षाचं आहे. म्हणजे तिला पहिलं मुल वयाच्या १४व्या वर्षी झालं.. हॉरिफिक…

मला एक समजत नाही, या माणसाला पहिल्यांदा जेंव्हा याच गुन्ह्या बद्दल १९७१ साली शिक्षा झाली असतांना  याची मानसिक स्थिती चांगली नाही हे लक्षात आलं नाही का? दुसरी गोष्ट अगदी भर वस्तीमधे या माणसाने त्या मुलीला ठेवले ही गोष्ट शेजाऱ्यांच्या पण लक्षात कशी काय आली नाही? की मला काय करायचं?? असं म्हणून लोकांनी दुर्लक्ष केलं??जे काही असेल ते असो, पण अमेरीके सारख्या प्रगत देशात एका मुलीला किडनॅप केल्या गेल्यानंतर १८ वर्षं शोधू शकत नाहीत ही घटनाच हादरवून टाकणारी आहे..

या माणसाला पकडण्यात आले ते सुध्दा याच्या जुन्या केस मधल्या पॅरोल ऑफिसर मुळे.या माणसाला पुर्वी १९७१ मधे किडनॅपिंग आणि रेप साठी शिक्षा झाली होती, तेंव्हा चा पॅरोल ऑफिसर होता हा. या माणसाला जेंव्हा बाहेर सोडण्यात आलं होतं पॅरोल वर तेंव्हा अशी अट घालण्यात आलेली होती की याने कधीच कुठल्याही लहान मुलांच्या बरोबर रहायचं नाही. हा सापडला त्याचं कारण पण लहान मुलीच.. दोन्ही मुलींच्या बरोबर याला जेंव्हा पॅरोल ऑफिसरने पाहिले, तेंव्हाच त्याला संशय आला…    याची चौकशी केली, तेंव्हा याने १८वर्षापुर्वीचं किडनॅपिंग मान्य केलं, आणि हे पण कबूल  केलं की ह्या दोन्ही मुली त्या कीडनॅप केलेल्या मुलिच्याच आहेत.जर ह्या पॅरोल ऑफिसरने त्याला ओळखले नसते तर कदाचित हा माणुस कधीच पोलिसांना सापडला नसता.म्हणजे ही केस सो्डवण्यात   पोलिसांचे कॉंट्रिब्युशन अगदी शून्य!!

इथे एक व्हिडीऒ पोस्ट केलाय ज्या मधे त्या किडनॅप्ड मुलीला कुठे आणि कसं ठेवलं होतं ते दाखवलंय.. त्यात तुम्ही बघाल तर सहज लक्षात येइल की ही जागा काही फार सिक्रेट जागा नाही. अगदी सरळ सरळ मागच्या अंगणात बांधलेले टेंटस आहेत. तेंव्हा अशा ठिकाणी ठेउन सुध्दा कोणालाच कसा काही संशय आला नाही?कमीत कमी शेजारी पाजारी, त्यांच्या घरातून सगळं दिसतच नां.. त्यांनी पण १८ वर्षात काहीच संशयास्पद पाहिलं नाही?? कठिण आहे परिस्थिती..

या किडनॅपरची बायकॊ पण त्याची साथीदार आहे या क्राइम मधे. अशी अनेक मुलं किडनॅप झालेली आहेत की ज्यांचा पत्ता अजुनही लागलेला नाही. निठारी ला जे काही झालं ते आणि हे क्राइम्स यांची तुलना करता येणार नाही. अर्थात दोन्ही क्राइम्स मधे  मानसिक दृष्ट्या रोगी असलेले लोकंच आरोपी आहेत. अशा लोकांवर काहितरी वचक हा हवाच. .अजुनही काही मुलं किडनॅप झालेली आहेत त्यांचा एक व्हिडीओ पहाण्यात आला, जी कित्येक वर्षांपासून सापडलेली नाहीत.. या व्हिडीओ वरुन अशा प्रकारच्या क्राइमची सिव्हिअरिटी लक्षात येइल. या व्हिडीओला यु ट्य़ुब मधे ओपन करुन खालच्या कॉमेंट्स पण वाचा..

तसंही स्त्रिया आणि मुली म्हणजे क्राइम साठी सॉफ्ट टार्गेट असतं. आणि त्यातल्या त्याल अल्पवयीन मुलं म्हणजे तर अजूनच सॉफ्ट.. एक शंका येते, की त्या मुलीने स्वतःच्या सुटकेचा प्रयत्न का केला नाही? कारण त्या कोर्टयार्ड मधे जरी ती नुसतं किंचाळली जरी असती तरीही तिला सोडवलं गेलं असतं.. कदाचित….!मला वाटतं, ह्याचं कारण, म्हणजे– फ्रेडरिक फोर्सिथ च्या निगोशिएटरमधे दिलेलं आहे. तुम्ही काही दिवसांनी आपल्या किडनॅपरवरंच प्रेम करू लागता.. मला वाटतं तेच कारण असावं.

माझ्या घरी एक पोपट होता.अगदी लहान पणापासुन – म्हणजे अगदी त्याला पिसं नसतांना पा्सून.. जरी पिंजऱ्याच दार उघडं ठेवलं तरीही तो  कधीच बाहेर यायचा नाही. त्याला पिंजऱ्यातच सेफ वाटायचं….  .

काही दिवसांपूर्वी एक केस वाचलेली होती . ऑस्ट्रियन बापाने-(जोसेफ फ्रिटझेल ) मुलिला बंद करुन तिचे २४ वर्ष यौन शोषण केले. त्या मुलीची सुटका झाली तेंव्हा तिचे वय होते ४२ वर्षं!! तेंव्हा पण ही बातमी वाचुन विचित्रच वाटलं होतं. एका बापाने असं करावं??१९८४ सालापासून ती १८ वर्षाची असतांना पा्सून तिला इम्प्रिझिन्ड केलं होतं तिच्या बापाने! ह्या अशा मानसिक रोग्यावर केस वगैरे करण्यापेक्षा सरळ भर चौकात फाशी देण्यात आलं पाहिजे.अशाच मनोवृत्तीचे करोडॊ लोकं या जगात आहेत.  हा व्हिडीओ यु ट्य़ुब मधे उघडून त्याच्या खालच्या कॉमेंट्स वाचा , म्हणजे तुम्हाला या जगातल्या अशा विकृत मनोवत्तीच्या लोकांची कल्पना येईल.मला तर वाचूनच किळस आली.

कालच आणखीन एक बातमी वाचली पाकिस्तानच्या पेपरमधे. एका स्त्रीने दोन पुरुषांवर बलात्काराची केस केली होती. पण ती पुराव्यानिशी बलात्कार झाला हे सिद्ध करु शकली नाही, म्हणून त्या स्त्री ला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झालेली आहे. तसेच तिने दोन्ही पुरुषांना, ज्यांच्यावर तिने केस केली होती त्यांना प्रत्येकी ५० हजार पाकिस्तानी रुपये द्यायचे आहेत.. धन्य आहे तो कायदा. मला तर यावर काय लिहावं तेच कळत नाही.

आपण रहातोय ते अशा जगात. कसं होणार..??