पुन्हा मुंबई लोकल

Written by  on August 26, 2009

आज परत लोकल ट्रेन चा पास काढला. रोज कारने ऑफिस ला जाउन वजन वाढलंय. तसा, रोज सकाळी योगा करतो २० ते २५ मिनिटे. पण घरुन ७-३० ला निघालो की ऑफिस ला पोहोचतो ८-१५ ला. लिफ्ट ने ४थ्या मजल्यावर गेलो, की सायंकाळी ५-४५ पर्यंत खाली येणे होत नाही.

आत्ताच , एक एल आय सी ची लॅप्स झालेली पॉलिसी रिइन्स्टेट करण्या करता एल आय सी ने मेडिकल टेस्ट घेतली . त्या मधे सगळं काही चेक केलं.. अगदी ब्लड शुगर, स्पेक्ट्रम ते टीएमटी.. सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत. फक्त वजन जास्त , म्हणून त्यांनी इन्स्टॉल्मेंट वाढवून मागितला आहे.

तर, काय सौ. ने आणि मुलींनी अगदी मनावरच घेतलंय की कसंही करुन माझं वजन कमी करायचं.. तर ऍक्शन प्लॅन खालील प्रमाणे तयार करण्यात आला..
१) बाबांनी ( म्हणजे मी ) ऑफिस मधे लोकल ट्रेन ने जावे. ( माझं घर, मलाडला, आणि ऑफिस चेंबुरला. म्हणजे, आधी मालाड ते दादर वेस्टर्न लाइनने जायचे… नंतर सेंट्रल ने कुर्ल्यापर्यंत जायचं) उद्देश हा, की दोन जिने मालाड स्टेशनचे , दोन जिने दादर स्टेशन चे, आणि मोठा ब्रिज + दोन जिने कुर्ला स्टेशन चे चढणे – उतरणे होईल . आणि त्या मुळे आपोआपच वजन कमी होईल.इतका सगळा द्रविडी प्राणायाम म्हणजे माझ्या तर डोळ्यापुढे   अंधारी आली.
२) माझं तळकट खाणं बंद.. मराठी माणसाला प्रिय असा वडा पाव पण खायचा नाही 😦
३)रोज सकाळी घर ते स्टेशन शक्यतो पायी जायचं. अगदीच घाई झाली तर मात्र रिक्शा करायची.
४) कुर्ला स्टेशन ते स्वस्तिक पर्यंत शक्य झाल्यास  पायी जाणे.. ( मला माहिती आहे की हे कधीच शक्य होणार नाही, कारण कुर्ला ते चेंबुर अंतर जरी कमी असलं तरी ,ट्रॅफिक आणि पोल्युशन इतकं आहे की, त्या मधेच आय इ जी लेव्हल वाढेल.. मला डस्ट ची ऍलर्जी आहे.. 😦
५) लंच मधे आणि डिनर मधे खाण्याची मात्रा कमी करायची.

माफ करा, विषयांतर झाले.. आजचा पहिला दिवस लोकलने प्रवास करण्याचा. कित्येक वर्ष कार वापरल्यामुळे लोकलचा संबंध संपल्यातच जमा होता.आज सकाळी लोकलने जायचं म्हणजे पास काढायलाच हवा. म्हणून अगदी रामप्रहरी ७-१५ ला मालाड स्टेशनला पोहोचलो. पास साठी भली मोठी रांग होती. मी  रांगेला  वळसा घालुन एका बाजुने पुढे गेलो, आणि खिडकीशी जाउन पास मागणार, इतक्यात… भाइसाब लाइन मे आओ.. म्हणून पुकारा झाला. मी पण अरे भाइ फर्स्ट क्लास का लाइन अलग होता है. और मेरा फर्स्ट क्लासका पास लेनेका है,, लोकांनी चरफडत माझ्याकडे पाहिले. त्यांच्या मनातले विचार त्यांनी न सांगताच मी वाचू शकत होतो.

बोरिवली ते चर्चगेट, आणि व्हिटी ते ठाणे असा पास काढला. कारण आता ऑफिशिअल कामासाठी पण ट्रेननेच प्रवास करायचा! आणि कस्टमर सर्व्हिस इंचार्ज म्हणून बऱ्याच कस्टमर  ला भेटायला जाणे, हा एक जॉब प्रोफाइल चा भाग!

स्टेशनला पोहोचलो, मालाड स्टेशनला कुठल्याही बोरीवलीहुन येणाऱ्या थ्रु  लोकल मधे शिरणे म्हणजे एक मोठ्ठा  प्रॉब्लेम आहे. मी दोन नंबर प्लॅटफॉर्म वर जाउन उभा राहिलो तेंव्हा ७-५० झाले होते. आलेल्या ट्रेन मधे मला तर काही चढता आले नाही.. सोडून दिली.. असंच दोन वेळा पुन्हा झालं.. तेंव्हाच लक्षात आलं, की हे आपलं काम नाही. ४ नंबर वरुन ८-८ ची मालाड लोकल सुटेल म्हणून  अनाउन्समेंट करण्यात आली.

परत चरफडत जिना चढून वर गेलो, आणि ४ नंबरला पोहोचलो, आणि ट्रेन ची वाट पहात उभा राहिलो.तेवढ्यात आमचा भैय्या.. म्हणजे अग्रवाल चार्टर्ड अकाउंटंट आहे तो. पण फार जवळचा मित्र.. दिसला.. अबे साले कहां मर गया था? म्हणुन बोलायला लागला. आजुबाजुचे लोक आम्हा दोन केस पांढरे झालेल्या लोकांना असं बोलतांना बघुन चक्रावलेच.. पण जुना मित्र ना… आणि खुप वर्षांनी भेटलेला.. म्हंटलं , अब रोज आयेगा ट्रेन मे..

पुर्वी आमचं ऑफिस फाउंटन ला होतं , तेंव्हा मालाड फास्ट – ८-३५ ची मी रोज पकडायचो. तेंव्हा आमचा  ग्रुप फॉर्म झाला होता. खूप गप्पा झाल्या. लोकल मालाड वरूनच निघते, त्यामुळे आत चढता आलं. दादरलाच उतरायचं म्हणून गेट जवळच उभा राहिलो.. ओ अंकल.. जरा अंदर हो जाओ, म्हणुन एक २०-२५ चा तरुण मला म्हणाला. मला वाटतं मी मागे पण एकदा लिहिलंय.. मला  ग्रेसफुली  एजींग  झालेलं आवडतं, म्हणून मी केस वगैरे काळे केले नाहीत. त्यामुळे कोणीही अंकल म्हणतं :).. उगीच केस काळे करायचे आणि मग थोडे केस वाढले की मग ते पांढरे मुळा जवळचे केस एकदम ;केविलवाणे ’दिसतात. काही लोक तर मिशा पण काळ्या करतात. वय लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं मला आवडत नाही.

तसा प्रॉब्लेम फक्त बायकोबरोबर जातांना येतो, तिचे केस एकदम काळे, आणि वजन पण एकदम हवे तेवढेच… ( लग्नाच्या वेळी होतं तेवढंच!) त्यामुळे ती बरोबर असली की थोडा बुजल्या सारखा होतो. अहो  का म्हणजे काय? ती खूप तरुण दिसते आणि मी वयस्कर दिसतो म्हणून असेल..  नाही तर तसा मला काही प्रॉब्लेम नाही ह्या पांढऱ्या  केसांचा.

गाडीत चढल्यावर जाणवलं की हा डबा काही वेगळा वाटतोय, पंखे पण जरा जास्तच दिसत होते, :)भैय्या म्हणाला, ये   नया कोच है. थोडा हवा अच्छा आता है इसमे..  नेहेमी प्रमाणॆ मी त्याच्याशी मराठीत बोललो… आणि तो हिंदीमधे उत्तर देत होता.. गुड ओल्ड डेज आर बॅक…

दादरला उतरलो,दादर ते कुर्ला ट्रेन एकदम रिकामी होती ( विरुध्द  दिशेला जायचं म्हणून असेल). कुर्ल्याला पोहोचलो, आणि रिक्षाने  ऑफिस ला..

आणि पोहोचल्यावर एक फोन घरी केला.. आय हॅव  रिच्ड ऑफिस …… सो वॉज माय फर्स्ट डे इन ऑफिस….
संध्याकाळी येतांना  , एका हातामधे लॅपटॉप ची बॅग धरुन बॅलन्सिंग करित एका हाताने डब्याचा दांडा धरुन, चालु ट्रेन मधे  आत शिरलो आणि जाणवलं..  ” बंदर कभी गुलाटी मारना नहीं भुलता”
“आय कॅन!”

पुण्याचं रानमळा .

Written by  on August 23, 2009

IMG-20130405-00229जिभेवरची चव कधीच विसरली जात नाही, कारण ती तुमच्या मेंदू मधे कायम कोरलेली असते. हेच वाक्य पूर्वी पण एकदा एका लेखात वापरले होते, आज पुन्हा आठवले म्हणून लिहिले. नॉनव्हेज हे नेहेमी एखाद्या गावाशी निगडित असले पाहिजे का? बाहेर पडलो, की बरीच कोल्हापुरी, मालवणी, किंवा चुकून एखादे  नागपुरी सावजी हॉटेल दिसते.

प्रत्येक ठिकाणच्या नॉनव्हेजची चव ही त्या त्या ठिकाणाशी जवळीक दाखवणारी असते असे म्हणतात. जसे कोल्हापूरी म्हटले की पांढरा रस्सा , तांबडा रस्सा आठवतो,  मालवणी म्हटले की मांदेली, बांगडा, सुकट, मसल्स  वगैरेची चव एकदम आठवतो. कोंकणी म्हटलं की गोवनीज कच्चा मसाला वापरून केलेली फिश करी, भरपूर व्हिनेगर घालून केलेली रेषाद वगैरे आठवते.एखाद्या हॉटेल मधे शिरलो, की त्या हॉटेल मधल्या पदार्थाची चव कशी असेल हे मेंदू मधे  आधीच ठरवलेले असते , आणि आपला मेंदू त्या चवीसाठी तयार असतो.

बहुतेक शेट़्टीच्या हॉटेल मधल्या नॉनव्हेजची चव एकसारखीच असते. वेगळी चव म्हटलं तर सावजी चिकन. आमच्या नागपूरच्या सावजी चिकन मधे भरपूर काळी मिरी घातलेली असतात. या तिखटपणाचं खरं रहस्य म्हणजे ते काळी मिरी. केवळ नावाला , दहा पंधरा मिरे वापरून सावजी चिकन तयार होत नाही.सावजी चिकन हे चिकन इन ब्लॅक पेपर करी म्हणून सहज खपून जाईल.

IMG-20130405-00221लग्नापूर्वी नागपूरला असतांना, आमच्या संध्याकाळच्या पार्टी मधे एका डीश मधे सावजी रस्सा, आणि ओल्ड मॉंक  म्हणजे आमची चैन करण्याची परम सीमा होती. सावजी कडे जेवायला गेलो की आमचा मित्र दिलीप मुंडले हमखास एक जोक मारायचा. आज जेवल्यावर उजव्या हाताचा वास, घे, पण उद्या मात्र चुकूनही डावा हात नाकाजवळ नेऊ नकोस” :). लग्नानंतर सगळ्यांचीच बायको आल्याने हळू हळू तो सावजी इव्हिनिंग अड्डा बंद झाला. पण तरीही दिवाळी च्या पूर्व रात्री मात्र एक बैठक व्हायचीच आमची!

कोल्हापुरी चं नाव बदनाम करण्यात शेटटी हॉटेल चा हातभार भरपूर लागलेला आहे. लाल रंग घालून पंजाबी स्टाइल मसाल्यात शिजवलेले चिकन , आणि वर खोचलेली तळलेली लाल सुकी मिरची लावली की कोल्हापुरी झालं असे या हॉटेलवाल्यांना वाटते.

IMG-20130405-00224कोल्हापुरी म्हणजे नुसतं तिखट असतं का? छेः, मला नाही वाटत. कोल्हापुरी हे तिखट कधीच नसतं . कोल्हापुरी घरी कांडलेल्या लाल मिरच्यांची चव ही त्याची युएसपी. कोल्हापुरी आणि सावजी बद्दल लोकांचा एक गैरसमज आहे की हे दोन्ही प्रकार खूप तिखट असतात म्हणून.

सावजी म्हणजे एक चव आहे. सावजी चिकन चा फ्लेवर हा खास मुरवलेला असतो चिकन मधे.माझा एक मित्र सावजी होता, तो घरीच सावजी चिकन बनवायचा. सावजी चिकन बनवण्याची एक खास पद्धत आहे.  तेला मधे कांदा, मसाला, मिरची वगैरे व्यवस्थित भाजून घेतल्यावर  त्या मधे चिकन टाकुन ते शिजवून घ्यायचे असते – अजिबात पाण्याचा थेंबही न घालता.   एकदा तुम्ही शिजवताना पाणी घातलं की बोन्स ला चिकटलले फ्लेश सुटून मोकळे होते. खऱ्या सावजी हॉटेल मधे तुम्हाला असे कधीच सापडणार नाही. चिकन शिजवायचं तर ते तेला- मसाल्याच्या वर!

जर ही कोल्हापुरी आणि सावजी चव एकाच ठिकाणी सापडली तर? होय, तो शोध नुकताच लागला मला  .

पुण्याला गेलो होतो,  दुपारी नेहेमीप्रमाणे ठरलेल्या हॉटेल मधे निघालो. खास पुण्याचाच असलेला एक मित्र पण सोबत होता, तो  म्हणाला, की इथे एक नवीन हॉटेल सुरु झालेले “रानमळा” नावाचे आहे तिकडे जाउ या. त्या हॉटेल मधे गेल्यावर ह्या सगळ्या चवी एकत्र पणे सापडतात. सावजी चिकन + सोलकढी वगैरे असे भन्नाट कॉंबो पण ट्राय करता येतं इथे आल्यावर. हवं तर सोबतीला एखादा बांगडा/मांदेली मागवू शकता, तोंडीलावणं म्हणून.

हे रानमळा आहे तरी कुठे?? तर चिंचवड पासून अगदी जवळ आहे. वाल्हेकर वाडी रोड वर असलेले, तसं म्हटलं, तर गावाबाहेर असलेले हे  हॉटेल आहे. तिकडे दुपारी गेलो तर अगदी खरोखरीच रानमळ्यात गेल्याचा फिल आला.  खरं तर हे एक फॅमिली रेस्टॉरंट आहे. बरोबर असलेला मित्र कोथरूड ला रहातो, म्हणाला, रात्री बरेचदा बायकोला घेऊन इकडेच जेवायला येत असतो, पण आम्ही चक्क दुपारी गेल्याने तशी फारशी गर्दी नव्हती.

आत शिरल्यावर काय ऑर्डर द्यायची हे ठरवणे फार अवघड नव्हते. आत शिरतांना इतरांच्या समोर प्लेट मधे काय आहे या कडे लक्ष गेले होतेच, आणि मी सध्या डायट वर असल्याने ( नो रेड मिट ) चिकन मागवणे हे तर नक्की होतेच. मेन्यू कार्ड पाहिल्यावर लक्षात आलं, की भाव एकदम कमी आहेत.

IMG-20130405-00222जेवणाबद्दल जास्त काही लिहत नाही. कोल्हापुरी + सावजी स्टाइलचे जेवण आहे इथले. चिकन करीचा मसाला एकदम बेश्ट! करी पण काळपट सावजी करी शी साधर्म्य दाखवणारी! थोडक्यात, थोडा कोल्हापुरी/सावजी  चा टच पण आहे. आणि काळा मसाला ( मिरे) भरपूर वापरल्याने थोडा सावजी सारखा पण  फ्लेवर होता. मी चिकन मागवले तर मित्राने मटन करी भाकरी. मटन थाळी मधे सुके मटन+ खिमा पण देतात. इथे खिमा खास बोलाईचाच असतो, मुंबई च्या इराण्या प्रमाणे ” बडे” का नाही. सुरुवातीला आलेला खिमा संपवल्यावर पुन्हा एक प्लेट खिमा मागवला. खिमा एकदम अप्रतिम 🙂 नो कम्पॅरिझन! चव एकदम घरच्या सारखी. मित्राने मागवलेल्या मटन थाळी सोबत कोल्हापुरी स्टाइल चा पांढरा रस्सा, तांबडा रस्सा होताच.म्हणजे कोल्हापूरकर पण एकदम खूश होतील इथे आल्यावर.

थाळी सोबत चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी पण मिळते. मी चक्क जीरा राइस + चिकन करी वर आडवा हात मारला. पण जेंव्हा मित्राच्या पानातली बिर्याणी पाहिली , तेंव्हा मात्र चिकन थाळी घेण्यात जरा चूकच केली की काय असे क्षणभर वाटले 🙂 आपला स्वभावच आहे, खाण्याच्या बाबतीत समाधान म्हणून कधी वाटतच नाही 🙂

IMG-20130405-00219सहज आठवलं म्हणून  लिहितो. पूर्वीच्या काळी म्हणजे साधारण १९८५ च्या सुमारास सोमाटणे फाट्यावर एक हॉटेल होते. एक लहानसे धाबा स्टाइलचे हॉटेल. तुम्हाला बसायला वेळ असेल तर तुमच्या समोर चिकन तयार करून द्यायचा तो.   त्या ठिकाणी खास याच चवीचा चिकन /मटन रस्सा मिळायचा. तुम्हाला वेळ असेल तर तुमच्या साठी गेल्यावर तुमच्या समोरच एकदम फ्रेश चिकन अगदी ड्रेसिंग करण्यापासून  तयार केले जायचे.  असायचे .  दर  बुधवारी आमची कट़्टा गॅंग नेहेमी तिकडे बसायची  :). पण नंतर ते हॉटेल बंद पडून त्याच ठिकाणी एक मोठं हॉटेल झालेले दिसले, तिथे पण एकदा गेलो होतो, पण  आता मात्र एकदम बेकार झालंय ते हॉटेल.

पुणेकरांनो, एकदा तरी इकडे चक्कर मारायला अजिबात हरकत नाही. पिंपरी चिंचवड भागातल्या लोकांसाठी एक खास फॅमिली जॉइंट म्हणून याची आठवण ठेवा.

एक कथा- ४

Written by  on August 19, 2009

रोहन आपण समुद्रावर जाउ या का?
व्हाय नॉट? शुअर.. चालेल मला. दोघंही बँडस्टँडला पोहोचले. दाणे वाला भैय्या गळ्यात पाटी अडकवून तिथे फिरत होता. आजुबाजुला कुठेही नजर गेली, तरीही बँडस्टँडवर जे काही नेहेमी सुरु असतं तेच सुरु असलेलं दिसत होतं– एक वेळ तुम्हाला जर पहायची लाज वाटत असेल, तर तुम्ही डॊळॆ बंद करा, अशी प्रवृत्ती दिसुन येत होती बसलेल्यांची.ह्या भैय्या लोकांना बरोबर समजतं की कोणासमोर जाऊन उभं रहावं ते, अगदी रंगात आलेल्या जोडप्यासमोर उभं राहून ते ‘सिंग चाहिए क्या?’म्हणुन विचारतात.. आणि मग नंतर ते कपल, लवकर जा रे बाबा, म्हणुन नको असतांना पण दाणे विकत घेते.

गेले दोन दिवस रोहन घरात होता, तरीही रीना त्याच्याशी काहीच बोलली नव्हती– म्हणजे तसा वेळच मिळाला नव्हता. प्रत्येक वेळेस रोहन कडे दुर्लक्ष करुनच रीना निघून गेली होती. एका खडकावर जाउन बसण्यापेक्षा त्यांनी किनाऱ्यापासून थोडं जवळंच बसणं पसंत केलं. तेवढ्यात रीना ची मैत्रीण साशा तिच्या बॉय फ्रेंड बरोबर आली. रीना ला तिथे बसलेली बसून ती एकदम चमकलीच. पण सोबत रोहन ला बघून मात्र एकदम म्हणाली

’काय गं रीना– नेहेमी म्हणतेस ना की माझा कोणी बॉय फ्रेंड वगैरे नाही म्हणून’, मग आता हा तो कोण ?’ हॅंड्सम आहे बरं कां , एकदम मॅनली, आवडला बरं का मला पण. रीना कांही बोलण्याच्या आताच ती आपल्या बॉय फ्रेंडला म्हणाली.. ही रीना आहे नां, एक नंबरची काकू बाई आहे. नेहेमी सांगते की ती कधीच अफेअर वगैरे करणार नाही. किंवा कोणी बॉय फ्रेंड वगैरे पण नाही तिचा. तिचे मित्र मैत्रिणी आहेत बरेच. अरे गृपमधे पण असून नसल्यासारखीच असते बरं कां. ’ ओके रिना, एंजॉय युवरसेल्फ ,मी निघते गं.

रोहनला कल्चरल डिफरन्स चा शॉक तर कालच मिळाला होता. तिच्या रात्री उशिरा येण्याच्या धक्क्या पेक्षा तिच्या बद्दल साशा ने जे बोलली त्याचा धक्का खूप जास्त बसला होता रोहनला. त्याला वाटत होतं की रीना ही अतीशय फॉर्वर्ड हाय फाय टाइपची मुलगी आहे. पण साशाच्या कॉमेंटमुळे हे लक्षात आलं की रीना अगदी डाउन टु अर्थ मुलगी आहे. केवळ फॅशनेबल कपडे घालते किंवा मोठया शहरात रहाते म्हणुन रीना वाईट ठरु शकत नाही.—-आणि त्याला उगिच बरं वाटलं..

रोहन म्हणाला, अगं ती वाईट काय बोलली तुला? ती चांगलंच तर बोलली नां तुझ्या बद्दल?? पण रीनाचं रडणं काही थांबत नव्हतं. रीना चे डोळे पुसायला आपला हातरुमाल पुढे केला रोहनने. बराच वेळ गुडघ्यात मान घालून बसली होती ती.

रोहनने विषय बदलायचा म्हणून तिच्याशी गप्पा मारणं सुरु केलं. काल रात्री उशिरा घरी आल्यामुळे आई जे रागावली, आणि काल पासून मनाला बोचत असलेला तो गौरव एपीसोड बद्दल जो पर्यंत रोहनला आपण खरं काय ते सांगत नाही तो पर्यंत तिला चैन पडणार नव्हती.

रोहनला पण कालपासून हाच प्रश्न सतावत होता की ती का रडत होती?? शेवटी मनाचा हिय्या करून त्याने विचारलेच, ’ काल रात्री काय झाले होते – का रडत होतीस तू?” एवढं विचारायचीच देर, की रीना जी रडायची थांबली होती ती पुन्हा एकदा रडू लागली. रोहनला काय करावं ते कळंत नव्हतं. शेवटी त्याने हिम्मत करून तिच्या खांद्यावर हात ठेउन तिचे सांत्वन केले. तरीपण तिचे रडणे काही कमी होत नव्हते.

शेवटी बऱ्याच वेळा नंतर रीना शांत झाली आणि तिने गौरव बद्दल तिला वाटणारं अट्रॅक्शन , त्त्यानंतर च्या कालच्या बिहेविअर बद्दल सांगितलं, आणि उशिर का झाला हे पण सांगितलं. रोहन म्हणाला, ’इतकी काळजी करण्यासारखं नाही ते. असं होतंच असतं या वयात.’ एखाद्या मुलाबद्दल अट्रॅक्शन वाटणं सहाजीक आहे.त्यात एवढं वाईट वाटून घ्यायचं काहीच कारण नाही.

रोहन म्हणाला, तुला आठवतं कां? लहान असतांना पण खेळतांना भांडणं झाली की तू अशीच रडायचीस माझ्या जवळ येऊन.. रीना ने वर पाहिलं.. डोळ्यातुन निघालेल्या अश्रूंमुळे चेहेरा खूप उतरल्या सारखा दिसत होता, पण लहानपणीच्या आठवणीने हसूं आलं चेहेऱ्यावर.

भैय्यासाहेब जोशी आणि राजशेखर चितळे बाल मित्र असल्यामुळे मुलांची म्हणजे रीना आणि रोहन वगैरे ची भेट लहानपणी नेहेमीच होत होती. राजशेखर यांचे आई वडील जिवंत असतांना अगदी नित्य नेमाने ते कोंकणात जायचे. रोहन, रीना, शितल हे सगळे  अगदी लहानपणापासूनच एकत्र खेळलेले. एकमेकांशी असलेली ओळख आणि त्यामुळे असलेला संबंधातला सहजपणा होता. रीना आणि शितल शहरात रहाणाऱ्या, म्हणून त्यांच्या वागण्याबोलण्यात थोडा जास्त स्मार्टनेस होता. रोहन नेहेमीच रिसिव्हींग एंडलाच असायचा.जुन्या लहानपणीच्या गोष्टी आठवुन हसु फुटलं ्दोघांनाही..

रीना चमकली, आणि तिने रोहनच्या डोळ्यात बघीतलं. नजरेला नजर मिळाली.. आणि तिला त्याच्या नजरेतला सच्चे पणा लक्षात आला. रोहनच्या पण न बोलताच लक्षात आलं की तिला काय म्हणायचंय ते –की त्याचा गैरसमज झालाय? रीनाला अजूनही नक्की समजलं नव्हतं की काय होतंय ते.

थोड्यावेळाने तिथुन उठुन दोघेही परत निघाले घरी जायला. जाता जाता रोहनला घेऊन ती मित्रांकडे गेली होती. मित्रांच्या गृपमधे थोडावेळ थांबून परत ती दोघंही घरी पोहोचली.गृपच्या मुलांना तिने रोहन हा बालमित्र म्हणून ओळख करुन दिली , जेंव्हा सगळ्यामित्रांना तो कोंकणातून एका लहानशा गावातून आलाय हे लक्षात आल्यावर मात्र त्याच्याकडे दुर्लक्षंच करणे पसंत केले. जेंव्हा रोहनला अव्हाइड केलं जात आहे हे लक्षात आले, तेंव्हा तिने पण लवकरच काढता पाय घेतला आणि दोघंही घरी आले.

रोहनचा मुक्काम दोन दिवस वाढला होता. आता उद्याच्या दिवस घरी काढला की मग परवा मेडीकल टेस्ट.. आणि मग झालं!!!
*******************************
लेले परत मुंबईला पोहोचले होते. रात्रीचे दहा वाजले होते. रोहन शेजारी चितळेंच्या घरी आहे , हे त्यांना माहिती होतेच, त्याला उद्या घरी बोलावायचे जेवायला.. हे त्यांनी पक्के केले होते. चितळेंच्या घरी फोन केला ( शेजारी घर असून सुध्दा) आणि रोहनला दुसऱ्या दिवशीच्या जेवणाचे निमंत्रण दिले. रोहन ने नाही म्हणण्याचा बराच प्रयत्न केला, पण लेलेंनी फारच आग्रह केला म्हणून हो म्हंटले.

दुसऱ्या दिवशी दुपारचे जेवणाचे नक्की झाले. वेळ होती एक वाजताची… शितल ला पण आधिच सांगितले रोहन बद्दल- आणि त्याच्या वडिलांशी झालेल्या बोलण्याबद्दल. हे पण सांगितलं की रोहनला हे ठाउक नाही.  शितल आणि रोहनची भेट घालून द्यावी आणि मग बघावं काय होतं ते.. असा विचार केला होता लेलेंनी.

घरी शितलला आधीपासुन सांगितलं  रोहन बद्दल  त्यांनी त्यांचं झालेलं बोलणं  .तू रोहनला बघ, आणि मग नंतरच काय तो निर्णय घे. अगं रोहनसारखा मुलगा तुला शोधुन पण सापडणार नाही. तुझं एम एस वगैरे बाजुला ठेव आणि थंड डॊक्याने विचार कर की तुला काय हवंय ते!! शितलला पण वडिलांच बोलणं पटलं आणि नाही सुध्दा!! तरीपण रोहन जेंव्हा उद्या दुपारी घरी येईल तेंव्हा घरी रहायचं कबूल केलं तिने,. त्याला भेटु आणि नंतर मग काय निर्णय घ्यायचा तो घेऊ.

**********************************

सकाळी ्रोहन  उठून  तयार झाला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर जाउन बसला . रीना पण आधीपासूनच येउन बसली होती. रोहन कडे तिने पाहिले, आणि  लक्षात आलं की रोहन  आज टेन्शनफ्री बर्ड सारखा प्रफुल्लीत दिसत होता. हलकेच हसली ती त्याच्याकडे बघुन.चितळेंनी विचारले की इंटरव्ह्यु कसा झाला?

रोहन म्हणाला, की इंटरव्ह्यु छान  झालाय, आणि परवा मेडीकल आहे . त्या मुळे इथला मुक्का एक दिवस वाढ्वावा लागतोय. हे पण सांगितलं की लेलेंचा फोन आला होता , आणि त्यांनी पण आज जेवायला  बोलावलंय दुपारी.   चितळेंना आश्चर्य वाटले, पण त्यांनी ते दिसू दिले नाही चेहेऱ्यावर. पण तू रहाणार घरीच बरं कां.. आणि ही ऑर्डर समज हवं तर.. !

***********************************

रोहन दुपारी लेलेंच्या घरी गेला. शितल पण त्याला बघुन खुप खूष झाली. बा्लपणीचा मित्र भेटल्यावर आनंद होणारच.. रोहनला पण शितलचा मोकळा स्वभाव खूप आवडला. शितल चा सेन्स ऑफ ह्युमर खुपच स्ट्रॉंग होता. अगदी लहान गोष्टींवार पण ती   जोक्स क्रॅक करीत होती. रोहन मनातल्या   ,मनात रीना आणि शितलची कम्पॅरिझन करू लागला.

शितल चा मनमोकळा स्वभाव पण त्याला आवडून गेला होता, पण रीनाचा डाउनटुअर्थ टाईपचे कॅरेक्टर पण  मनाला भिडले, रीना दिसते टफ, पण आहे अगदी  मऊ.. मुलायम स्वभावाची. उगिच स्वतःला टफ दाखवायचा प्रयत्न करते , हे त्याच्या लक्षात आलं होतं. काल तर पुन्हा हा पण संशय येत होता की तिला पण आपण  आवडतो की काय? तीची कालची बॅंडस्टॅंड वरुन उठल्यानंतरची देह बोली एकदम वेगळी झालेली होती.

रोहन बरोबर  दुपारी सिनेमाला जायचं ठरवलं होतं रीना ने. ती शितल कडे गेली , रोहनला बोलवायला. शितल आणि रोहन सोफ्यावर बसून गपा मारीत होते. रीना पण समोर बसली .शितलचे मनमोकळे वागणे तिला आज आवडत नव्हते. रोहनशी बोलतांना टाळी दे म्हणून तिने साधा हात जरी रोहन समोर केला , तरीही ती अस्वस्थ होत होती. ….

शितलला पण रोहनमधे इंटरेस्ट डेव्हलप होत होता. कॅल्क्युलेटीव्ह रिस्क म्हणजे रोहनशी लग्न हे तिच्या पक्कं लक्षात आलं होतं. हो म्हणायला हरकत ना्ही…….

*************************************

या पुढचा शेवटचा भाग मी दोन दिवसांच्या नंतर लिहिन, ( मी पण अजून तो ठरवलेला नाही- ्सगळे एंड्स लुझ आहेत ) पण तुम्हाला य कथेचा शेवट कसा व्हावासा वाटतो?या कथेचा पुढचा भाग तुम्ही कॉमेंट्स मधे लिहा – एकाच कथेचे वेगवेगळे शेवट वाचायला मजा येइल. तर करा सुरु लिहिणं शेवटचा भाग!!