अब्रू ची किंमत किती आहे हो??

Written by  on July 31, 2009

एका स्त्री च्या   अब्रूची किंमत किती असेल हो ?  मग ती  स्त्री श्रीमंत, गरीब , भिकारी अगदी कोणीही असू शकते.किती असेल किंमत?? विचित्र  वाटतोय का प्रश्न? कदाचित असेलही, कारण लिहितांना पण मला थोडं अवघडल्यासारखं झालं होतं. इथे अब्रू म्हणजे हिंदी सिनेमात  जेंव्हा एखादी हिरोईन “मेरी इज्जत लुट ली जज साब इसी कमिनेने” म्हणते नां ती अब्रू म्हणतोय मी. आज सकाळी टाइम्स ऑफ इंडीया उघडला आणि एका बातमीने लक्ष वेधून घेतले. एका कंडक्टरला बलात्काराच्या गुन्ह्याला बद्दल फक्त ६००० रुपये शिक्षा सुनावण्यात आली .  एका मुलीवर बलात्कार केला जातो, आणि तिच्या अब्रू ची किंमत कोर्ट    फक्त सहा हजार ठरवतं.

काही दिवसापूर्वी एका केसचा निकाल पेपर मधे वाचला होता. त्या मधे कोर्टाने निकाल दिला होता की ज्या माणसाने बलात्कार केला त्या माणसावर त्याचे म्हातारे आईवडील अवलंबून आहेत, म्हणून त्याला जेल मधे न टाकता    ५०००० रुपयांचा दंड इतकी शिक्षा करण्यात येत आहे.

वर दिलेल्या दोन केसेस फक्त नमुन्यादाखल लिहील्या आहेत. वरच्या दोन्ही निकालावर काही भाष्य करणे हा कोर्टाचा अपमान होऊ शकतो, म्हणून फक्त इतकंच म्हणतो की कोर्टाच्या दृष्टीने एका स्त्री च्या अब्रु ची किंमत ही साडे सात ते पन्नास हजार रुपये !!!

हे वाचल्यावर कदाचित  थोडी असहाय्यता, थोडी चिड , थोडा संताप अशा सगळ्या संमिश्र भावना मनात येतील.  मागच्या आठवड्यात एका ७४ वर्षाच्या गृहस्थाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची चित्र फित बनवल्याचे वाचण्यात आले . ही बातमी जवळपास तीन दिवस दररोज येत होती. अशा तऱ्हेने की जणू काही हा जगातला पहिला आणि शेवटचा बलात्कार असावा . तो थेरडा तर सिरियल रेपीस्ट होता. त्याच्या कडे बऱ्याच सिडी सापडल्या. असो मुद्दा तो नाही. बलात्काराच्या केस मधे वृत्तपत्राच्या बातमीदारांच्या लेखणीला विशेष धार येते , आणि तोच तो विषय पुन्हा पुन्हा लोकांसमोर मांडला जात असतो- कारण लोकांनाही तेच वाचायला आवडतं.

बलात्कारा बद्दल पुर्वी एक लेख लिहिला होता “ बलात्काराष्ट्र”  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/04/07/%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/)म्हणून. त्यात बरेच मुद्दे आले आहेत, म्हणून आता पुन्हा तेच ते लिहित नाही.आपण भारतीय लोकं पण थोडे विचित्रंच आहोत. ज्या भक्ती भावाने  रामायनातले सुंदर कांड ऐकतॊ किंवा सितेची पूजा करतो त्याच भक्तीभावाने महाभारतातिल द्रौपदी च्या चीरहरणाचा प्रसंग पण ऐकतॊ. खरंच कसे आहोत आपण?

दुर्दैवाने असे म्हणावे लागते की स्वातंत्र्योत्तर काळात स्त्रीचे जितके अवमुल्यन झाले आहे तितके पूर्वी कधीच नव्हते . पूर्वी स्त्री च्या अंगावर चार चौघांसमोर हात घालायची कोणाची प्राज्ञा नव्हती. आजच्या काळात एका स्त्रीची नग्नावस्थेत गावभर धिंड काढल्याची बातमी आपण अगदी मेलेल्या मनाने वाचतो. फक्त हे आपल्या बाबतीत होत नाही म्हणुन आनंद मानायचा अशी मनोवृत्ती हल्ली वाढीस लागलेली आहे. वर्षभरा पूर्वी एकदा मालाडला लोकलमधे चढतांना एक माणूस स्त्रियांच्या फर्स्ट क्लास मधे सौ. च्या मागे शिरला आणि त्याने चढतांना तिच्या पर्स मधे हात घातला. हे सगळं होत असतांना डब्यातल्या सगळ्या इतर स्त्रिया पहात होत्या, सौ. च्या लक्षात आल्यावर तिने त्याला पर्सने फटकारून दूर ढकलले, पण डब्यातली एकही बाई मदतीला धाऊन आली नाही. इतक्या सगळ्या बायकांसमोर त्या एकट्या माणसाचे काही चालले नसते, पण समाजातल्या एकजूटीचा अभाव- आणि मला तर त्रास होत नाही ना? ही मनोवृत्ती वाढीस लागलेली आहे.

पूर्वी एखाद्या मुलीला छेडतांना ती आपल्या भावाला, वडीलांना सांगेल ही भिती असायची , पण हल्ली वडिलांसमोर किंवा भावासोबत असलेल्या मुलींची पण छेड काढ्ण्यास कोणी घाबरत नाही.पूर्वी शेजारच्या घरातल्या मुलीला जरी कोणी छेडलं तरीही सगळे एकत्र येऊन त्या छेडणाऱ्याच्या घरी जाऊन कम्प्लेंट करायचे. आजकाल, बाप मुलाला मोटरसायकल घेऊन दिल्यावर म्हणतो, ” एखादी मुलगी पटव मागच्या सिटवर बसवायला” !असो जग फार पुढे जातंय असं वाटतं मला तरी.

या जगात पुरुष हा ५० टक्के श्वापद  असतो असे म्हणतात पण मला आजची परिस्थिती  पहाता पुरुष हा ९० टक्के गिधाड झाला आहे असे वाटते. जेंव्हा ही ९० टक्के श्वापदं स्त्रीयांकडे एक शिकार म्हणून पहातात तेंव्हा इतर दहा टक्के लोकं कुठेतरी नजरा लपवून बसलेले असतात. अहो-  जनावरांमधे तरी मेटींग ची काळ वेळ ठरलेली असते- अगदी तिन्ही त्रिकाळ सेक्सचा विचार हे प्राणी पण करत नाहीत. त्यांची पण वेळ ठरलेली असते. कुत्रा फक्त भाद्रपद महिन्यातच कुत्रीच्या मागे मागे असतो, पक्षी पण केवळ विणीच्याच काळात एकमेकांच्या जवळ असतात, पण मानव मात्र अगदी चोविस तासात कधीही सेक्स साठी स्वतःला तयार करू शकतो.  हेच ते कारण आहे की आज स्त्री स्वतःला सुरक्षित समजू शकत नाही.

लोकलच्या ब्रिज वर असो किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मचा जिना चढताना असो, पुरुषाचे ओंगळवाणे स्पर्ष झेलल्या शिवाय स्त्रीला साधे चालता येणे पण अशक्य झालेले आहे. रस्त्यावरच्या नाक्यावर उभ्या असलेल्या वासू लोकांच्या कॉमेंट्स झेलल्या शिवाय रस्त्यावर चालणं पण मुश्किल झालेले आहे. ही परिस्थिती फक्त मुंबई मधेच आहे असे नाही, अगदी लहान शहरातही अशीच परिस्थिती आहे. आपली मानसिकता बरीच बदलली गेली आहे. पूर्वी स्त्री कडे पहाताना आई, बहीण, वहिनी वगैरे अशी नाती असायची, पण हल्ली मात्र एकच नातं उरलं आहे. ते म्हणजे नर आणि मादी.

जी गोष्ट कधीतरी घडते त्या गोष्टी बद्दल लोकांना काहीतरी अट्रॅक्शन असतं. पण जेंव्हा   विदर्भातल्या शेतकऱ्यां प्रमाणे दररोज आत्महत्या होणे सुरु झाल्यावर पहिल्या पानावरून ती बातमी तिसऱ्या पानावर, आणि आता कुठल्यातरी कोपऱ्यात दिलेली असते  आत्महत्या या जितक्या सहजपणे अजिबात मनाला लावुन न घेता वाचल्या जातात, तेवढ्याच अलिप्तपणे हे बलात्काराच्या बातम्या वाचल्या जातात, पण बलात्काराच्या बातम्यांचे पहिल्या पानावरचे स्थान दुर्दैवाने  कायम आहेच.

असं म्हणतात, की पूर्वी मुंबई सगळ्या स्त्रीयांसाठी खूप सुरक्षित होती- पण आज तशी परिस्थिती राहिलेली नाही.भर दिवसा जेंव्हा लोकल मधे एक गर्दुल्ला स्त्री ची पर्स हिसकू शकतो, हल्ला करू शकतो, सगळ्यां समोर शारिरिक अंगचटीला जाऊ शकतो, तेंव्हा सुरक्षितता कशाला म्हणायची हाच प्रश्न पडतो.

स्त्रियांनो,  आज तुमचे संरक्षण करण्यासाठी कोणी नाही.  तुम्ही घराबाहेर पडल्या की तुम्ही ह्या श्वापदांच्या पिंजऱ्या आहोत हे समजून चाला. तुम्ही कितीही पवित्र असलात तरीही  ह्या पुरुषांना जन्म देण्याचे तुम्ही पाप केलेत, आणि आता त्याच पापाची फळं तुम्हालाच  भोगावी लागत  आहेत. आचार्य अत्रे यांचं एक वाक्य आठवलं.. ” स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, ह्रदयी  अमृत नयनी पाणी”

स्पायडर मॅन-ऍलन रॉबर्ट्स

Written by  on July 27, 2009

ऍलन रॉबर्ट्स.. वय वर्षं १२.. घरी पोहोचला, आणि पहातो तर काय घरी कोणीच नाही. आठव्या मजल्यावरचं घर. आई , वडील दोघंही बाहेर गेलेले.घराला कुलूप.. आणि चावी पण नाही. या मुलाने काय केलं असेल?? बाहेर बसून राहिला पायरीवर? की रडत बसला? की खाली खेळायला गेला?? नाही.. या पैकी काहीच नाही.सरळ ग्राउंड फ्लोअरला उतरला आणि सरळ आपल्या आठव्या मजल्यावरच्या घरात बाहेरून चढुन प्रवेश केला. बाहेरुन म्हणजे पाइप, खिडक्या इत्यादींना धरुन..   आणि ही होती ह्युमन स्पायडरमॅनची पहिली चढाई.खरं तर घराजवळच्या लहान लहान टेकड्यांवर चढण्याचे तर याने बरेच आधी म्हणजे अगदी लहानपणापासून  सुरु केले होते. पण बिल्डींग वर चढायची ही वयाच्या १२ वर्षीच्या वयात पहिलीच वेळ.

इतक्या लहान वयात असं चढण्याची कल्पना पण करवत नाही… पण ह्याने मात्र पहिली चढाइ सर केली.. नंतर घरी आई बाबानी चोप दिला असेलच .. पण त्यावर काही नेटवर माहिती नाही 🙂

असं कुठल्याही बिल्डींगवर अजिबात सेफ्टी बेल्ट वगैरेचा वापर न करता चढायचं म्हणजे काही सोपं काम नाही.असे बिल्डींग वर चढतांना त्याचे दोन ऍक्सिडॆंट्स पण झाले होते वयाच्या १९ आणि २० व्या वर्षी.इतके मल्टीपल फ्रॅक्चर्स होते की  डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्या मधे ६० टक्के डिसऍबिलिटी आलेली आहे, आणि हा पुन्हा कधीच असा बिल्डींगवर चढू शकणार नाही. पण ह्याच्या इच्छाशक्ती ला मात्र दाद द्यावीच लागेल. पठ्ठा पुन्हा सहा महिन्यातच बिल्डींग वर चढू लागला.नंतर रॉक क्लाइंबिंग मधे याने मास्टरी मिळवली.या नंतर पण जवळपास त्याचे ५ ऍक्सिडेंट्स झालेत पण त्यातूनही तो बचावला आणि नंतर पुन्हा त्याने हेच काम सुरू ठेवले.

फ्रांस आणि इतर देशांमधे कुठल्याही  बिल्डींगवर चढणं हा कायद्याने गुन्हा आहे. तरी पण या माणसाने ८५ बिल्डिंग सर केल्या आहेत्त . याची स्ट्रॅटेजी खूपच साधी आहे. अगदी भल्या पहाटे ज्या बिल्डींगवर चढायचं आहे त्या बिल्डिंग जवळ जायचं आणि चढणं सुरु करायचं.आता एखादा माणुस अशा तऱ्हेने जर कुठल्याही बिल्डींगवर चढायला लागला की मग  येणारे -जाणारे लोकं थांबून पहाणारच.्खूप गर्दी जमा व्हायची. हा माणूस थोडी खडुची पावडर घेउन सरळ वर चढणं सुरु करायचा. एकदा एका ठरावीक लेव्हलला पोहोचला की मग ह्याला उतरवणे अशक्यच कारण  एका ठरावीक उंची नंतर याला उतरवायला, पोलिसांना चढणं  आवश्यक असायचं , आणि ते काही सोपं नसायचं, म्ह्णूनच सगळे पोलीस त्या बिल्डींगच्या टॉपवर याची वाट पहात उभे रहायचे.  हा माणुस वर पोहोचला की मग त्याला अटक केली जायची आणि केस पण केली जायची. अर्थात ही सगळी एक फॉर्मॅलिटीच असायची आणि त्याला सोडून दिलं जायचं. वर चढण्यासाठी त्याला अगदी लहान लहान बिल्डींगच्या खिडकीच्या बिजागऱ्या आणि काच लावण्याकरता वापरलेल्या अल्युमिनियमच्या फ्रेम्स पण पुरतात.

ह्या माणसाला मी एक जिमनॅस्ट मानण्या पेक्षा मी एक कलाकार मानतो !बिल्डींग वर चढण्याची याची कला अगदी अ्तूलनिय आहे. दुसरा कोणी स्पायडरमॅन अजुन तयार व्हायचाय. सध्या तरी हाच एक आहे बोटांना पट्ट्या बांधून बिल्डींग्ज सर करणारा…आणि आजचं पोस्ट हे ह्याचे कालची मलेशियातिल सगळ्यात उंच बिल्डींग सर केल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी केलेलं पोस्ट आहे. कालच त्याने मलेशियातिल पीटरसन ट्विन टॉवर्स वर अगदी अत्युच्च टोकावर चढून गेला.तेव्हाचे हे छाया चित्रं वर पोस्ट केलेलं आहे..

ही डॉक्युमेंट्री आहे हा पाच फुट पाच इंच उंचीचा मध्यम शरीरयष्टीचा माणुस कसा काय स्पायडरमॅन बनला ते.त्याची.. जवळपास ९ मिनिटांची डॉक्युमेंट्री आहे.. वर्थ वॉचिंग!

कमिटेड लोकांच्या बद्दल मला नेहेमीच आदर आणि कौतुक वाटत आलंय.मग ते कुठल्याही कामात असलेलं कमिटमेंट असो. यु ट्य़ुबवर याचे जवळपास ८० व्हिडीओज आहेत .. शोधा आणि पहा.. मस्त आहेत सगळे.. हा कालचा व्हिडीओ.. याच चढाईचा.

मुकेपणातली शक्ती…

Written by  on July 18, 2009

गणेश मतकरीचे  या सिनेमाचे परीक्षण वाचूनही त्यांचे  न ऐकता परवा बर्फी बघायला गेलो होतो. अर्थात सौ. ची हा सिनेमा पहाण्याची इच्छा होती, आणि मग तिच्या इच्छेविरुद्ध न वागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 🙂 सिनेमा सुरु झाला आणि अर्ध्या तासातच माझा पेशन्स संपला. थोड्या वेळाने जेंव्हा सौ. ने ” अहो, घोरताय काय? हे काय घर आहे का? ” म्हणून उठवले तेंव्हा जबरदस्तीने डॊळे ताणून आणि उरलेला चित्रपट पाहिला. हा चित्रपट तरूणांमध्ये खूप लोकप्रिय झालाय, पण प्रौढ लोकांना फारसा आवडलेला नाही कारण त्याचे तकलादू कथानक, फार तर पाऊण तासाच्या लायकीचे कथानक तीन तास खेचले तर नक्कीच तापदायक होते. एक प्रामाणिक मत म्हणजे बर्फी काही मला ऑस्कर च्या तोडीचा वाटला नाही, पण अभिनय मात्र प्रियंका, आणि रणवीर कपूर ने उत्कृष्ट केलाय यात संशय नाही.

याच थीम वर १९७२ साली संजीव कुमार आणि जया भादुरी चा एक कोशिश ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.youtube.com/watch?v=1KXpQN0f1rk&feature=related) नावाचा सिनेमा आला होता, त्या सिनेमा मधे दोघेही मुक बधीर असतात . त्या मधल्या संजीव कुमार आणि जया भादुरीचा अभिनय आजही लक्षात आहे.एक अक्षरही न बोलता केवळ अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यातून पाणी काढायचं कसब, जया- संजीव मधेच आहे. मला संजीव कुमार आणि रणबीर ची तुलना करायची नाही, पण जर करायचीच झाली, तर संजीव कुमार नक्कीच उजवा ठरेल. कदाचित आधी कोशिश पाहिलेला असल्याने बर्फी थोडा पुचाट वाटला असावा. एक शब्दही न वापरता, आपल्या मनात काय आहे हे दुसऱ्याला केवळ अभिनयाने दाखवून द्यायचे म्हणजे काही चेष्टा नाही.असो..

माझ्या लहानपणी एक कार्टून काही पेपर मधे यायचं. सकाळी पेपर आला की, आधी ते कार्टून चे पान उघडून ते कार्टून पहिल्यानंतरच पुढचा पेपर वाचला जायचा. हिंदी, मराठी पेपर मधे त्या कार्टून कॅरेक्टरचे नाव असायचे गुणाकर, तर इंग्रजी पेपर मधे हेन्री. एक गोल टक्कल असलेला दहा वर्षाचा वात्रट पण लोभस मुलगा म्हणजे हेन्री. या कार्टून ची स्पेशालिटी म्हणजे एकाही कार्टून पात्राच्या तोंडी शब्द वापरला नाही. केवळ स्क्रिप्ट मधले चित्र बघूनच विनोद समेजेल असा असायचा.  बर्फी, कोशीश, चार्ली चॅप्लिन  किंवा हेन्री या सगळ्यांतला एक दुवा म्हणजे सगळे ’मुकं’ पणे मनोरंजन करणारे.

कार्ल एंडरसन यांनी हे कार्टून १९३२ साली ” सॅटर्डे इव्हिनींग पोस्ट ” साठी काढणे सुरु केले होते .एक साधी सोपी कॉंटेंपररी थिम घेऊन सुरु केलेले हे कार्टून काढतांना जे काही सांगायचे आहे ते केवळ चित्राच्या माध्यमातून, आणि ते पण एकही शब्द ना वापरता सांगितल्या गेले पाहिजे हे पथ्य पाळल्यामुळे याचा एक वेगळाच वाचक वर्ग तयार झाला  जवळपास २००५ पर्यंत जगभरात अनेक पेपर्स मधे हा हेन्री डोकावून जायचा.

हेन्री आणि गारफिल्ड हे दोन्ही कार्टून्स माझे फेवरेट. कारण एकच, जे काही सांगायचं आहे ते सगळं काही चित्रातूनच सांगितलं जातंय. या इतर कार्टून्स बरेच आहेत, पण हेन्री आणि लिटील लू ( हे भारतात नाही आलं) आज जेंव्हा हेन्री चे १९३८ चे कार्टून पहातो ,तेंव्हा पण हलकेच हसू येते.. आणि हेच या कार्टुन चे यश.

 हा लेख म्हणजे मुक पणे केलेल्या  अभिनयातील ताकद जाणवली म्हणून लिहिलाय. काय विश्वास नाही बसत का या वाक्यावर?मनमोहनसिंग  कडे पहा  एकदा- बसेल विश्वास! 

बाय द वे, हेब्री चे १९३४ च्या पिरियड मधले  कार्टून्स पहायचे असतील  तर  ते इथे  आहेत. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.cigarettecards.co.uk/2ndlarge.html)

जया भादुरी  चा ’कोशीश” जर पाहिला नसेल, आणि पहाण्याची इच्छा असेल  तर इथे क्लिक करा, ऑन लाइन पहाण्यासाठी. ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.youtube.com/watch?v=1KXpQN0f1rk&feature=related)