या वाक्यांवर माझा विश्वास नाही..

Written by  on May 25, 2009
खोटारडे कुठले..

सगळी कडे खोटे पणा भरलाय नुसता..हे चित्र पहा..

इतकी खोटी कारणं देतोय…तुम्हाला कुठलं लागू होतं ते पहा..
१) एच आर नवीन जॉइन होणाऱ्या कॅन्डीडेट ला  :- आमच्या कंपनीत काम करायला तुम्हाला खूप आवडेल 🙂 इथलं वातावरण अगदी मनमिळाऊ आहे, लोकं एकमेकांशी खूप चांगले संबंध ठेऊन आहेत.बिचिंग, लेगपुलींग, पॉलीटिक्स अजिबात नाही  !
२)बायको नवऱ्याला :-  प्रसंग असा की नवरा  फिरायला निघण्यासाठी  तयार होऊन बसलेला आहे तेंव्हा आतून आवाज येतो, हो…….. हो… मी आलेच दोन मिनिटात.. !
३)  छे.. अजिबात लठ्ठ दिसत नाहीस तू.
४) मी तुम्हाला मदत करायला निवडणूक लढवतो आहे.
५) मित्र:-अरे मी दिले नाही तुला पैसे परत अ्जून?? च्यायला,  बघ विसरूनच गेलो, मला वाटलं की मी परत केले पैसे  तुला.
६)   मी तुझे पैसे पुढल्या रविवारी नक्की देईन बघ! तुला आठवण करून देण्याची वेळच येऊ देणार नाही मी.
७)  पार्टी नंतर :-  इतका कधीच टाईट झालो नव्हतो यार.. थोडी जास्तच झाली आज.  पण आजची ही पहिलीच वेळ  बरं का, आपलं असं होण्याची. 🙂
८)   या पुढे पुन्हा नाही पिणार इतकी 🙂
९)  नकॊ..तुला ते वापरायची  त्याची गरज नाही, ” पिल” घेतली आहे मी
१०)  मी फार   लठ्ठ दिसते का या ड्रेस मधे??, उत्तर :- छे, अजिबात नाही…
११) जूनी मैत्रीण भेटली की :- अगं अजिबात बदलली नाहीस बघ तू. अगदी २० वर्षाची असतांना दिसायची ना , तश्शीच दिसतेस अगदी.
१२)   माझ्या बायकोचा शिपी :- मॅडम ब्लाऊज / ड्रेस नक्की देतो बघा उद्या सोमवारी.
१३) नेता इलेक्शन पूर्वी मतांचा जोगवा मागताना:- मी वचन देतो , की मी निवडून आल्यावर….
१४) तुला काय म्हणायचे आहे ते मला अजिबात समजलेले नाही. ( बायको जेंव्हा चिडते तेंव्हा )
१५) माझ्या मैत्रिणी असल्या तरी माझ्या बायकोचा त्यावर  काही आक्षेप नसतो
१६) माझे मित्र असले तरी माझ्या नवऱ्याचा काही आक्षेप नसतो.
१७) माझ्या मित्राने/ मैत्रिणीने रात्री फोन केला तरी बायको/ नवरा गैर समज करून घेत नाही.
१८) आय एम सॉरी, मला काही बोलायचा अधिकार नाही,  पण मला असं वाटतं की….
१९)  एक नेता:-मराठी लोकांना अधिकार मिळायलाच हवा.
२०) मी हे तुझ्या भल्यासाठीच  सांगतोय/ सांगते आहे..
२१) एक जाहिरात :- व्यायाम न करता वजन कमी करा. एक महिन्यात दहा किलो पेक्षा जास्त  🙂
२२) “ओके.. मी तुला फोन करतोच एक पंधरा मिनिटानंतर”
२३) आय डिडन्ट डू इट! ( हे कशा बद्दल ते सांगायलाच हवे का?)
२४) ५० टक्के डिस्काउंट सेल*   कंडिशन्स अप्लाय (???  )
२५) तुमचा फोन होल्ड ठेवण्यात आलेला आहे, लवकरच आमचे कस्टमर केअर प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील. आणि पाच मिनिटे होल्ड केल्यानंतर.. ” सॉरी, आमचे सगळे कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्ह व्यस्त असल्याने आता तुमचा फोन घेऊ शकत नाही, क्षमस्व!”
२६) बायको चिडलेली असताना आणि    असतांना  विचारले , ” तुला काय झालंय?” उत्तर असतं काही नाही!
२७)  आता नवीन आणि सुधारित, मोठ्या पॅक मधे. ( खरी गोष्ट ,  आधी १०० ग्राम चं पॅक ८० ग्राम केलं असते, आणि फक्त पॅकिंग चं डिझाइन बदललेले असते)
२८) अरे मी सिगरेट तर कधी पण सोडू शकतो. माझा स्वतःच्या मनावर पूर्ण ताबा आहे. आताच  म्हणजे सहा महिन्यापूर्वी एक महिन्यासाठी सोडली होती. 🙂
२९) लोरिअल चं क्रिम वापरल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या जातात.
३०) हॉर्लिक्स घेणाऱ्या मुलांची वाढ बोर्नव्हिटा घेणाऱ्या मुलांपेक्षा दुप्पट होते.. ( लवकरच १२ फुटाची मुलं दिसायला लागायला हवी आता.)
३१) लग्नापूर्वी गर्लफ्रेंड ला :- मला तुझ्या बद्दल जसे वाटते, तसे कोणा बद्दल कधीच वाटले नाही.तुझं मन इतकं छान आहे, की मी तुझ्याकडे आकर्षित झालोय.
३२) माझ्या जिवनात आलेली तू पहिलीच मुलगी/मुलगा आहेस .
३३)तुझे डोळे जगात सगळ्यात सुंदर आहेत. ( प्रत्येकाने हा डायलॉग वापरलेला असतोच – काय खरं की नाही?)
३४)तू माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्याशी कधी तरी खोटं बोलेन का?
३५)  लग्नापूर्वी:-फार तर फार एक किंवा दोन बिअर घेतो मी.  तशी ड्रिंक्सची मला फारशी आवड नाही.
३६)  बायको:-  तू लग्नाचा वाढदिवस विसरलास तरी मला राग आलेला नाही.
३७)  एक्स समोर आल्यावर :-माझं लग्न तुझ्याशी व्हायला हवं होतं .
३८) साहेब मिटींग मधे आहेत, त्यांना फोन देता येऊ शकत नाही.
३९) चॅट रुम  प्रोफाईल :- ६ फुट ६ इंच उंची, अ‍ॅथलेटीक बॉडी, ८० किलॊ वजन , वय २५ आणि फोटो सलमानचा. किंवा मुलगी असेल तर, ५ फुट ९ इंच उंची, गोरा रंग, लांब केस, सुंदर चेहेरा, वय १९ -२०आणि फोटो एखाद्या नटीचा.
४०) बस्स.. काही नको, फक्त एक ग्लास पाणी चालेल.. ( मनातून तर असतं की या उन्हात मस्त सरबत वगैरे दिलं तरी चालेल)
४१) मी माहेरीच निघून जाते बघ आता.. मग बस एकटा ! (वाट पहात रहा, कधीच जाणार नाही ती 🙂 )
४२) त्या सुंदर मुलीच्या  एक्स चित्राच्या लिंक वर मी  कधीच क्लिक केले नाही.
४३) मी आज पर्यंत कधीच अ‍ॅडल्ट साईट पाहिलेली नाही.
४४) मला तिचा स्वभाव जास्त आवडला म्हणून लग्न  केलं. शारिरीक आकर्षण नाही    ( खरंच?? )
४५) मला बरं वाटत नाही,  म्हणून मला सुटी हवी आहे.
४६) मला तुझ्याशी फक्त मैत्रीच करायची आहे, फक्त मैत्री ..
४७) मी ड्राइव्ह करतोय, नंतर बोलू आपण.
४८) मी मिटींग मधे आहे , नंतर करतो फोन ( हे बरेचदा खरं पण असू शकतं),
४९) आय डोन्ट मीन इट!
५०)  आय मिस यू,आय लव्ह यू, 🙂
५१) माझं पूर्वी कधीच कोणावर प्रेम नव्हतं, अगदी एकतर्फी पण नाही . तूच पहिली/ पहिला आहेस बघ.
५२) बायकोला लग्नापूर्वी :- आय प्रॉमीस.. नक्की बदलेन  माझी “ही” ( ही म्हणजे कुठली तरी तिला न आवडणारी) सवय मी.
५३)स्त्रियांचे नेहेमीचे वाक्य :-  माझं वजन, वय,  ………… इतकं आहे.
५४) बायको नवऱ्याला :- हा ड्रेस मी सेल मधे घेतलाय, चक्क ७० टक्के डिस्काउंट होता .
५५) मला तुझा तो इ मेल मिळाला नाही, बहुतेक स्पॅम मधे गेला असेल, नाही तर मी नक्कीच रिल्पाय केला असता.
५६) पैशाचा प्रश्न नाही, प्रिन्सिपल चा आहे !
५७) सगळ्यात मोठं अ्सत्य- जेंव्हा तुम्ही एखादे सॉफ्ट्वेअर लोड करता तेंव्हा एका बॉक्स ला क्लिक करता त्यावर लिहिलं असतं ”  आय हॅव रीड अ‍ॅंड अ‍ॅग्रीड द    टर्म्स अ‍ॅंड कंडीशन्स”
५८) मला तुझ्या शिवाय इतर कुठल्याही मुली बद्दल/ मुला बद्दल तसं फिलिंग वाटलं नव्हतं
५९) ब्रेकप च्या वेळेस. तू फार चांगली आहेस, तुला माझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा मिळायला हवा. ( जेंडर प्रमाणे वाक्य बदला )
६०) मी अगदी मनापासून सिरियसली बोलतोय.. अगदी खरंच सांगतो, तुझा विश्वास का बसत नाही?
६१) मी तुला काय करायचं हे सांगायची माझी इच्छा नाही, पण ——– तू असं का करत नाहीस?
६२) ट्रस्ट मी 🙂 पोहो्चतोच मी १५ मिनिटात.. प्लिज वाट पहा थोडी.
६३) बस झाले की आता, किती लिहायचं मी एकट्यानेच? तुम्हाला अजून काही माहिती असतील तर तुम्ही लिहा की खाली कॉमेंट्स मधे.

मार्टीन्स कॉर्नर..

Written by  on May 21, 2009

सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले- हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिलं जाऊ शकतं ते म्हणजे…….. .

गोव्याला आल्यावर कितीही घाई असली तरीही एकदा तरी या रेस्टॉरंटला भेट दिल्याशिवाय  गोव्यातून माझा  पाय काही बाहेर पडत नाही. संध्याकाळी आणि  सिझन मधे गेलात तर नंबर लावून बसावे लागते. बरेचदा तर अर्धा – एक तास तरी थांबावं लागतं. इथे जवळच एक सनसेट बिच आहे बेतिम नावाचा, नंबर लावायचा आणि बिच वर एक चक्कर मारून यायची – म्हणजे वेळ पण बरा जातो. ( ही माहिती फक्त नवीन लोकांसाठी)  नंबर लागला नाही म्हणून कंटाळून परत निघून जाण्यापेक्षा हे बरं! इथे जायचं असेल तर शक्यतो दुपारच्या वेळेसच जाणे योग्य!

गोव्याचे हे एक  एकेकाळचे लहानसे रेस्टॉरंट !  कोणे एके काळी इथे गावातली मुलं कॅरम खेळायला एकत्र जमायची, मग मार्टीन ने कोल्ड ड्रिंक्स वगैरे विकता विकता लोकांना घरगुती पदार्थ देण्यासही सुरुवात केली. आणि म्हणता म्हणता हे रेस्टॉरंटच्या रुपात कन्व्हर्ट झाले.एका टिपीकल गोवनिज घरासारख्या  एका घरा मधे  सुरु करण्यात आलेले हे रेस्टॉरंट आज जगातल्या चांगल्या रेस्टॉरंट्सच्या रांगेत जाऊन बसले  आहे. कुठल्याही जातीवंत खवय्याची गोवा भेट ही इथे आल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही.  या रेस्टॉरंट्चा उल्लेख मी लिहिलेल्या जुन्या   गोव्याच्या इतर पोस्ट मधे बरेचदा आलेला आहे. पण आज मात्र वाटलं, की ह्या बद्दल एक वेगळं पोस्ट निश्चितच होऊ शकतं!

हे रेस्टॉरंट सचिन तेंडुलकरचं पण फेवरेट! इथल्या मेन्युकार्ड मधे सचिनची फेवरेट   डिश क्रॅब मसाला, त्या डिशला   सचिनचे नावाने दिलेले आहे.सचिन १९९० पासुन गोव्याला आला की या रेस्टॉरंट मधे न चुकता एकदा तरी  येतोच.क्रॅब मसाला ही त्याची फेवरेट डिश. इथले क्रॅब त्याला इतके आवडते की   मुंबईला परत जातांना तो नेहेमी   पार्सल करून नेतो असं वेटर सांगत होता 🙂 . सचिनच्या आवडीमुळे सचिन हा मार्टीन्सचा यु एस पी झालेला आहे.  बरेच लोकं तर केवळ सचिनचे आवडीचे हॉटेल पहायचे म्हणून पण इथे येतात.

मी   उतरलो होतो ते आहे केळव्याला. आणि तिथून फार तर पाच एक किमी अंतरावर  हे मार्टीन्स आहे. दुपारी जेवायला तसा थोडा वेळच झाला होता, अडीच वाजून गेले होते. मिटींग इतकी लांबली की जेवायची पण शुद्ध नव्हती. लंचला कुठे जायचं तर मार्टीन्स की अशोका?? पण उद्या सकाळी अनंताश्रमाला जायचं आहेच, मग  म्हणून लंच साठी इथे मार्टीन्स कॉर्नर नक्की केले.

मझोर्डा बिच रेसॉर्ट  च्या रस्त्यावर असलेले- बेतिम बिच जवळचं  हे मार्टीन्स कॉर्नर. समोर बऱ्यापैकी पार्किंगसाठी जागा आहे. पण संध्याकाळी गेलात तर तुम्हाला पार्किंग मिळेलच याची खात्री देता येत नाही. हॉटॆलच्या  कोपऱ्यावर एक लहानशी पाटी लागलेली आहे- मार्टीन्स रेस्टॉरंटची.समोर दोन तिन फ्रेम्स मधे बऱ्याच सिलेब्रिटीजचे फोटो लावलेले आहेत. इतके हायप्रोफाईल क्लायंटल असलेले हॉटेल मात्र एकदम साधे आहे.

हॉटेलच्या  मुख्य प्रवेश दाराजवळ- आत शिरतांना समोर मारिओच मिरांडाची चित्रं लावलेली  आहेत. रंगीबेरंगी  मारीओ मिरांडा एकदम गोव्याच्या वातावरणात आणून सोडतो. टिपिकल गोवनीज घर वाटतं हे. खरं म्हणजे हे रेस्टॉरंट फार पुर्वी मार्टीनने आणि त्याच्या बायकोने   केवळ दोन टेबल घरासमोर लावून सुरु केले होते,  आज जवळपास  ३० टेबस आहेत आणि रेस्टॉरंट त्याची   मुलं सांभाळतात. दोन पायऱ्या चढून आत शिरलं की   एका काचेच्या पेटी मधे ठेवलेले मासे आणि टायगर प्रॉन्स, लॉब्स्टर्स लक्ष वेधून घेतात.   ताजे फडफडीत मासे पाहिले की भूक चाळवली जातेच.

आत शिरल्याबरोबर आधी हे नजरेला पडते. मस्त बर्फात सजवून ठेवलेले मासे, प्रॉन्स वगैरे..

रेस्टॉरंटचं ऍम्बियन्स एकदम टिपिकल गोवनीज  खेड्यातल्या घराप्रमाणे आहे . कौलारू छत असलेले, आणि लाकडी खांब वगैरे वापरून केलेले बांधकाम एकदम पन्नास वर्ष आधीच्या काळात  नेऊन पोहोचवते.    प्रवेशद्वाराजवळ असलेल्या त्या काचेच्या पेटीतले मासे , खेकडे, किंवा लॉब्स्टर्स तुम्हाला हवे असल्यास तयार करून दिले जातात. इथली सिग्नेचर डिश ही क्रॅब मसाला ! पण मला स्वतःला क्रॅबची फारशी आवड नाही म्हणून आम्ही सरळ फिशवर सेटल झालो.

दुपारची वेळ, पाऊस पडतोय बाहेर, कसा तरी पाऊस चुकवत आत शिरलो. नाही म्हट्लं तरी थोडे कपडे ओले झालेच. पण किंचित थंडी, ओलसर कपड्यांचा दमट पणा , हॉटेल मधलं उबदार वातावरण एकदम मस्त वाटत होता. आधी बिअर  मागवली आणि सेटल झालो.ऑर्डर देण्याचे काम आमच्या गोवेकर मित्रानेच केले. वेटर सारखा म्हणत  होता की तुम्ही एक तरी क्रॅबची डीश घ्या म्हणून.

इथे प्रत्येक फिशची प्रिपरेशन ही वेगवेगळी केली जाते. थोडी पोर्तुगिज टाइपची फिश मसाला ही पण एक मस्त डीश आहे इथली. आम्ही आधी चणक रवा फ्राय आणि मोडसो मसाला फ्राय मागवली. रवा फ्राय टिपिकल गोवा स्टाईलची डिश, चांगली बनवली होती.बिअर बरोबर बेस्ट कॉम्बिनेशन!

रवा फ्राय फिसचा पहिला घास घेतला आणि मला  एकदम माहिमचं गोवा पोर्तुगिजा आठवलं. तिथे रवा फ्रायचं नांव क्रिस्पी फिश (???) ठेवले आहे आणि भरपूर लसूण आलं लावतात त्यामुळे फिशची ओरिजिनल चव शिल्लकच रहात नाही. तिथल्या शेफला इथे ट्रेनिंग साठी …………………..!!!! असो.. काही पण आठवतं मला – आणि कुठेही… असो.

एकदा मसाला फ्राय म्हंटल्यावर सावंतवाडी मसाला नजरेसमोर आला असेल तर तुमच्या. पण नाही, तसे नाही, इथे मसाला म्हणजे  मसाला वापरलेला नसतो, तर पोर्तुगिज स्टाइलचा सॉस वापरून त्यामधे फिश बनवलेली असते.  सॉस मधे सगळीकडून भिजलेले त्या मोडसो माशाचे नरम तुकडे खूपच छान लागतात. त्याची चव इथे सांगता आली असती तर…? पण नाही , ते शक्य नाही, त्या साठी मार्टीन्सलाच भेट द्यावी लागेल. 🙂

माझी ऑर्डर.. यातली कालमरी एकदम अफलातून. सगळीकडे चिल्ली स्किंट मिळते, इथे फ्राईड.. अप्रतीम

दोन्ही डिश संपायच्या आत पुन्हा वेटरला एक प्लेट सुरमई पण ऑर्डर केली. सुरमई मसाला रवा फ्राय- म्हणजे मसाला ( तेच पोर्तुगिज सॉस )लावून वर रवा लावलेली सुरमई मागवली.  सॉस ची चव त्या रव्यामुळे मारल्या गेल्यासारखी वाटत होती. पुढल्या वेळेस फक्त मसाला फश मागवायची हे मनातच ठरवलं.   इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली, की प्रत्येक माशाचे टेक्श्चर वेगवेगळे असते. आतापर्यंत फक्त सुरमई आणि पापलेट मधला फरक ओळखता यायचा आता त्या मधे नवीन भर पडलेली आहे. सुरमई ची प्रिपरेशन पण छान वाटली, पण मसाला मोडसो ची सर नव्हती त्याला. फ्राय फिश बरोबर टार्टर सॉस दिलेले होते. मस्त कॉम्बो आहे हे.

तिन प्लेट फिश आणि दोन बिअर संपवल्या होत्या तिघांमधे. बरोबर असलेला मित्र म्हणाला की आता कलमारी मागवू या.. कलमारी म्हणजे जेली फिश. जेली फिश चे तुकडे करून त्यांना कुठल्यातरी पिठात बुडवून तळलेले असतात.वेटरने समोर डिश आणून ठेवल्यावर त्या ओनियन रिंग सारख्या दिसणाऱ्या रिंग्ज पाहिल्यावर त्या कुठल्याही अंगाने फिश सारख्या दिसत नाहीत . जेलीफिश चे तुकडे करून तळल्यावर ते थोडे मसल्स सारखे होतात. जेली फिश खाण्याची ही पहिलीच वेळ. पण पहिला पिस उचला आणि मग  समोरची डीश कधी रिकामी झाली ते लक्षातंच आलं नाही.  आवडीच्या पदार्थांमधे ही डिश पण जोडल्या गेली आहे.

इतकं सगळं खाऊन होई पर्यंत जवळपास तास गेला होता आणि पोट पण भरलं होतं. आपली एक सायकॉलॉजी असते , कितीही खाणं झालं, तरी जो पर्यंत भात किंवा चपाती खात नाही तो पर्यंत काही जेवल्याचे समाधान होत नाही. म्हणून शेवटी प्रॉन्स करी राईस ची ऑर्डर केली. प्रिपरेशन अर्थातच उत्कृष्ट होती. प्रॉन्सचा आकार पण चांगला अंगठ्याइतका जाड होता. इथे टायगर प्रॉन्स छान मिळतात. ( मला ऍलर्जी आहे तरी पण दोन पिस खाल्लेच 🙂 )तुम्ही ऑर्डर केली की तुमच्या समोर तो जिवंत  असलेला टायगर प्रॉन्स, किंवा खेकडा आणून दाखवतो  आणि तुम्ही सिलेक्ट केल्यावर तयार करून तुमच्या टेबलवर ठेवतो.

जेवण तर झालं. बिबिन्का घेणार? उपेंद्रने विचारले, नाही म्हणणे जिवावर आले, आणि मग बिबिन्का आणि आइसक्रिम ची ऑर्डर दिली. इथे कार्मेल कस्टर्ड पण छान मिळतं. पण इतकं सगळं खाल्यावर पॊटात जागा नव्हती, म्हणून ते काही खाता आलं नाही. पुढ्ल्या वेळेस बिबिन्का ऐवजी कार्मेल कस्टर्ड. हे बिबिन्का म्हणजे खास गोवनिज डिश. सात लेअर्स असलेली लोकल केक सारखी डीश असते ही. एक खास लोकल डेलीकसी म्हणून अवश्य ट्राय करायला हवी.

तसं म्हंटलं, तर हे हॉटेल गोव्याच्या मानाने थोडं महाग आहे. पण मुंबई च्या कम्पॅरिझन मधे एकदम स्वस्त वाटते. आम्ही तिघं, वर दिलेल्या सगळ्या डीश आणि तिन बिअर आणि डेझर्ट्स इतकं सगळं संपवल्यावर पण बिल मात्र फक्त १८३३ रुपयेच आलं!!! तेंव्हा मंडळी गोव्याला याल, तर इकडे नक्की भेट द्या मार्टीन्स वाट पहातोय गोव्याला तुमची…

मी ऑर्डर न केलेले, दुसऱ्या एका ब्लॉग वरून घेतलाय हा फोटो..

हर्नबी रोड- एक विरासत!

Written by  on May 17, 2009

मनीष मार्केट ते फाऊंटन कधी चालत गेला आहात का? कुठली गोष्ट प्रकर्षाने जाणवली?? खरं सांगायचं तर मी सुद्धा कित्त्येक वर्षात त्या रस्त्याने चालत गेलेलो नव्हतो.  पण  मागच्या आठवड्यात मात्र चर्चगेटचं काम  आटोपून घड्याळाकडे पाहिले तर लक्षात आलं की पुढल्या मिटींग साठी चक्क एक तास आहे. वेळ कसा घालवायचा हा प्रश्न होताच म्हणून  आणि मग चर्चगेटहून  सीएसटी पर्यंत चालत निघालो .

मला वाटत चालत जाणं ही एक इष्टापत्ती झाली, कारण केवळ याच चालण्या मुळे एक वेगळी मुंबई पहायला मिळाली. मला तसाही हॉर्निमन सर्कल, बेलार्ड पिअरच्या भागात पायी फिरायला  खूप आवडतं . तिथल्या निरनिराळ्या इमारती पहात रस्त्याने चालत जाणे हा आवडीचा छंद आहे माझा. हॉर्निमन गार्डन चे कंपाउंड आणि  फाटक ,किंवा लायब्ररीच्या पायऱ्या, आय एन एस आंग्रे,  पाहिल्या की आपण कुठल्यातरी निराळ्याच विश्वात गेल्याचा भास होतो.

तुम्ही पण बरेचदा फाउंटन ते चर्चगेट   चालत गेले असाल, पण बऱ्याच गोष्टींकडे नेहेमीच्याच म्हणून दुर्लक्ष केले जाते. जीपीओ  की तार ऑफिस च्या बाजूच्या फुटपाथ वरून चालत निघालो.  भरपूर वेळ हाताशी असल्याने थोडी टंगळ मंगळ करत , इकडे तिकडे पहात पायाखाली येणारे रंगीबेरंगी पेव्हर ब्लॉक्स पाहत चाललो होतो.

जीपीओ च्या समोरच्या फुटपाथ वर   त्याच्या मेन गेट पर्येंत पोहोचलो, आणि एकदम त्या पेव्हर ब्लॉक च्या ऐवजी सुंदर रितीने  सेट केलेले दगड दिसले. छान नक्षिकाम पणे सगळे दगड त्या मुख्य दारासमोरच्या भागात फुटपाथ वर लावलेले होते.

क्षणभर तिथेच रेंगाळलो, नकळत सेल फोन हातात घेऊन फोटो क्लिक केला.  पोर्तुगीझ पद्धतीचे हे फुटपाथचे  डिझाइन   इतक्या कलात्मकरित्या लावलेले होते, की त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण झाले. फक्त गेट समोरच हे ओरीजिनल लावलेले दगड शिल्लक  आहेत, थोडं पुढे गेलं की पुन्हा पेव्हर ब्लॉक सुरु होतात! 😦

जुन्या गोष्टी , अशा पुन्हा होणे नाहीत, पण कमीत कमी जशा आहेत तशाच जर सांभाळणे तरी आपल्या हातात आहेच ना? पण दुर्दैवाने तसेही केले जात नाही.

एक सांगा, जर उद्या कोणीतरी ताजमहालाचे संगमरवर खराब झाले म्हणून त्या ठिकाणी  कोणी  स्पार्टेक टाइल्स बसवल्या तर??? मूर्ख पणा !! एकच शब्द आठवतो , आणि नेमका तोच शब्द मला पण सारखा  माझ्या मनात येत होता.

जुन्या वास्तू जशा आहेत तशा मेंटेन केल्या जाणे महत्त्वाचे असूनही , केवळ काही पैशांच्या लोभापायी इतक्या सुंदर विरासतीची विल्हेवाट लावलेली  आहे. हे पेव्हर ब्लॉक बसवण्याचा करंटे पणा करणारे कोण महाभाग आहेत याची मला अजिबात कल्पना नाही,पण जे आहेत ,ते निर्बुद्ध  आहेत हे मात्र नक्की. मुंबईच्या बऱ्याच  हेरीटॆज इमारती ह्या धोकादायक झाल्या आहेत म्हणून ( प्रत्यक्षात  धोकादायक झालेल्या नसताना देखील) त्या पाडल्या जात आहेत,  त्या करोड मोलाच्या जागेवर नवीन इमारती बांधून पैसे कमावता यावे म्हणून .

थोडं पुढे गेल्यावर जुनी पुस्तकं विकण्याची दुकान आहेत, त्या शेजारीच एक पाणपोई पण बांधलेली आहे. हुतात्मा स्मारकाकडे लक्ष गेलं, आणि क्षणभर त्या अज्ञात लोकांना मनोमन प्रणाम केला, त्यांनी ज्या महाराष्ट्रासाठी जीव दिला तो हा आज आहे असाच महाराष्ट्र होता का??

फाउंटनचं कारंजे कधीही पाहिलं तरी छानच दिसतं! पण त्यावर शेवाळलेले काही दगड मार त्याची उपेक्षा जाणवून देत होते. अतिशय सुंदर असलेले ते शिल्प , आपल्या पद्धतीचे एक आहे. त्यावर असलेली फ्लोरा देवता पण कुठेतरी दूर पहात बसली आहे असे वाटत होते. रस्ता क्रॉस न करता डीएन रोडला लागलो.

डी एन रोड म्हणजे एकेकाळचा हॉर्नबी रोड. सर हॉर्नबी हे मुंबई प्रांताचे गव्हर्नर होते १७७१ ते १७८४ साली , त्यांच्या सन्मानार्थ  त्याचे नांव या रस्त्याला देण्यात आले होते. ह्याच कालात (१८५० साली) नेमकी फोर्ट ची भिंत पण पाडण्यात आली होती, आणि  ह्या रस्त्याचे निर्माण कार्य  करण्यात आले.

क्रॉफर्ड मार्केट ते फाउंटन पर्यंतचा असलेला हा रस्ता एका दूरदृष्टी ठेवून बांधण्यात आलेला असल्याचे आजही जाणवते. त्या काळी म्हणजे साधारण १७५ वर्षा पूर्वी  दोन बिल्डींगच्या मधे सहा पदरी रस्त्याचे बांधकाम केले गेले. इतकी  दूर दृष्टी पाहून खरंच आश्चर्य वाटते. नाही तर आजकाल नुकतेच बांधलेले रस्ते पण काही दिवसातच कमी पडायला लागतात!

पादचाऱ्यांसाठी चालण्या करता कव्हर्ड फुटपाथ  असावा , म्हणजे त्यांचे उन आणि पावसापासून संरक्षण होईल -असा कायदा १८८५ ते १९१९ या काळात होता. त्या मुळे प्रत्येक इमारतीच्या दर्शनी भागात प्रत्येक बिल्डींग च्या बाहेरच्या भागात एकाच रुंदीच्या कमानी बांधण्यात आलेल्या आहेत. अजूनही या सगळ्या कमानी खूप छान  स्थितीत आहे.  पण दुर्दैवाने या कमानी खाली सगळ्या फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे. १९१९ नंतर हा फुटपाथ कव्हर्ड असावा हा  नियम का रद्द केला ते समजले नाही.

सरळ चालत सीएसटी कडे निघालो ,तर  लक्षात आले की या रस्त्यावरच्या जवळपास सगळ्याच इमारती ह्या वर्ल्ड हेरीटेज मधे मोडल्या जातात, त्यामुळे त्यांच्या दर्शनी भागात काहीही बदल करता येऊ शकत नाहीत. हेच कारण असावे, की या रस्त्याला फाउंटन ते सीएसटी पर्यंत मात्र व्यवस्थित मेंटेन केल्या गेले आहे.

एका इमारतीच्या कमानी खालच्या फुटपाथ वरून गेल्यावर दुसऱ्या इमारतीच्या कमानी खाली शिरतांना पण काही वेगळे पण जाणवत नाही. इथे सगळे ओरीजिनल दगडांचे  बांधकाम अजूनही तसेच आहेत.

एके ठिकाणी १७-१८ व्या शतकातला काही खुणा अजूनही दिसून येतात. एक पोस्टाचा डबा, आता तुटक्या फुटक्या अवस्थेत , आणि त्या शेजारचे फायर हायड्रंट  अजूनही लक्ष वेधून घेते.

ह्या रस्त्याला वर्ल्ड हेरीटेज स्टेज २ चे संरक्षण देण्यात आले आहे, आणि तशी एक पाटी पण लावलेली दिसली आणि मला आश्चर्यच वाटले. आज पर्यंत इ्तक्या वेळेस त्या रस्त्याने गेलो असेल पण  आपलं त्या पाटी कडे कधी लक्ष गेलं नाही  याचं मलाच आश्चर्य वाटले.

काही वर्षा पूर्वी या ठिकाणी सगळ्या जुन्या इमारतींच्या वर निऑन साइन्स, जाहीराती वगैरे लावल्या जात असत. संपूर्ण इमारतीचे एलीव्हेशन हे जाहीरातीनं झाकल्या गेले जायचे,  पण नंतर  या रस्त्याला ’वर्ल्ड हेरीटेज ’म्हणून ’युनेस्कोने’ मान्यता दिल्यापासून हे सगळं बंद करण्यात आलं आहे.

युनेस्कोचा कुठल्याही इमारतीचे एलीव्हेशन बदलले जाऊ नये असा नियम पण आहे.  मला वाटतं की वर्ल्ड हेरीटॆजचं स्टेटस टिकवायचं म्हणून ,इथल्या इमारतींचे एलीव्हेशन आणि फुटपाथ वर मात्र जुने दगड अजूनही तसेच जतन करून ठेवलेले आहेत.  ते आजही इतक्या चांगल्या स्थिती मधे आहेत की अजुन शंभर वर्ष तरी त्याला काही होणार नाही याची खात्री आहे. इथे केवळ फुटपाथचे दगड बदलणे इतकाच मुद्दा नाही, तर बऱ्याच ठिकाणी इमारती मधे इतरही बदल केले जातात , पाडले जातात हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो.

याच कमानी खालच्या फुटपाथ वर बरेच दुकानदार  बसलेले दिसतात. जो पर्यंत आपल्याकडली हप्ता पद्धत बंद होत नाही, तो पर्यंत कुठल्याही शासकीय जागेवर आपली दुकाने थाटून बसणाऱ्या ह्या फेरीवाल्यांना कोणीच थांबवु शकणार नाही.

मुंबईला असं  नवीन काहीतरी पहायला मिळतं, आणि मग मी  नेहेमी ठरवतो, आता  एकदा तरी हेरीटॆज वॉक ला जायचंच! पण अजुन तरी जमलेले नाही-  कधी जमेल ते कोण जाणे..

या पुढे कधी या रस्त्याने जाणे झाले, तर  ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या.. …