फिअर इज द मोटीव्हेटर..१

Written by  on March 23, 2009

^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.files.wordpress.com/2011/09/dexter03.jpg)वय वर्षे फक्त २९! हातातला तो कागदाचा लिफाफा घेऊन कुठल्यातरी विचारात गुंतलेला रोहन देसाई चालत जात होता. चालतांना सारखा त्याच्या मनात विचार येत होता की हे पाकीट फेकून द्यावं.. कसं शक्य आहे असं होणं आपल्याच बाबतीत? असं काय वाईट केलं होतं की आज हा दिवस पहावा लागतोय आपल्याला?

सिगरेट खरं तर त्याने सोडली होती, चार वर्षापूर्वीच. पण आज मात्र पुन्हा सिगरेट ओढायची इच्छा झाली. कशाला उगाच सोडायची सिगरेट??शेजारच्या सिगरेटच्या टपरीकडे नजर गेली, आणि त्याने एक पॅकेट  ’विल्स नेव्ही कट’ घेतली. सिगरेटचं पाकिटं पण काही उघडत नव्हतं, पानवाल्या भैय्याकडे पाकीट दिलं, आणि  त्या भैय्याने पण अंतर्ज्ञानाने जाणल्या प्रमाणे कात्रीने पाकिटावरचे पॅकिंग कापून दिले. एक सिगरेट शिलगावली, आणि दिर्घ कश घेत पुढे निघाला तो.चार वर्षानंतर पुन्हा सिगरेटचा धूर फुप्फुसात भरून घेतला, आणि रक्तात सामावून घेण्यासाठी श्वास रोखून धरला, पण किती वेळ? एक मोठा निःश्वास टाकत श्वास सोडला आणि  गिरगाव चौपाटीच्या वाळू मधे बसला.

तेवढ्यात एक माणूस हातामधे लहानशी पाउच सारखी बॅग घेऊन धावत जात होता. मागे असलेले पोलीस पण आपली सुटलेली पोट सावरत, धापा टाकत त्याचा पाठलाग करत होते.रोहन बसलेला होता ती जागा थोडी अंधारी होती. कदाचित आज असलेल्या अमावस्येमुळे आणि अजिबात प्रकाश नसल्याने अजिबात दिसत नव्हता. त्या माणसाने हातातली पाऊच रोहनच्या दिशेने भिरकावली, आणि अंधारात कशाला तरी अडखळून पडला.तो उठून उभा होई पर्यंत मागे असलेले पोलीस पण पोहोचले आणि त्याला हातकड्या घालून घेऊन गेले. तो मागे अंधाऱ्या कोपऱ्याकडे पहात पोलीसांबरोबर गेला. काय असेल बरं त्या पाऊच मधे?

रोहन देसाई. एका मोठ्या मल्टीनॅशनल फर्म मधे मार्केटींग मॅनेजर . गेल्या चार वर्षात मिळालेल्या तीन प्रमोशन्स मुळे रोहन आज त्याच्या बरोबर नोकरीवर रुजू झालेल्या  ट्रेनी इंजिनिअर्सचा बॉस झाला होता.सगळं कसं अगदी व्यवस्थित सुरु होतं. अहो, अजून काय हवं एखाद्याला? चांगली नोकरी ९ लाखाची , थोडीशी बावळट , पण  सुंदरशी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करणारी  गर्लफ्रेंड. लग्न करायचं पण ठरवलं होतं दोघांनी.पण तेवढ्यात हे आजचं हातात असलेलं पाकीट , त्याने अख्खं आयुष्यच बदलून टाकलं होतं.

सहा महिन्यापूर्वीची गोष्ट , हातातल्या पत्राकडे नजर गेली, आणि त्याच्या नजरेसमोरून आयुष्यातले गेले सहा महिने आठवले. एक दिवस ऑफिस मधे अचानक पोट दुखायला लागलं,ईतकं असह्य दुखणं होतं की त्याला, ऍंब्युलन्स बोलावून दवाखान्यात ऍडमिट करावे लागले. डॉक्टरांनी तपासण्या केल्यावर सांगितले, की ऍपेंडीक्स आहे साधा, एक लहानसे ऑपरेशन केले की झाले. काही फारशी काळजी करण्यासारखे काही नाही. ऑपरेशन झाले, काही कॉम्प्लिकेशन्स नव्हते, फक्त काही बाटल्या सलाईन, ऍंटीबायोटीक्स आणि एक बाटली रक्त, इतकच लागलं होतं त्याला. दहा दिवसानंतर पुन्हा ऑफिस मधे जॉइन झाला रोहन.  किती सोपं आहे नाही? आपल्या ऍपेंडीक्सच्या जखमेचा व्रण  फक्त शिल्लक राहीला त्या घटनेची आठवण म्हणून.

सहा महिने अजिबात काही घडले नाही असेच गेले, पण नंतर मात्र सर्दी खोकला, आणि इतर फ्लु ह्या सगळ्या आजाराने अगदी त्रस्त झाला होता रोहन.डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतली, की तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, पण बरं काही वाटत नव्हतं. शेवटी सगळ्या प्रकारच्या पॅथॅलॉजीकल टेस्ट्स पण केल्या. काहीच सापडत नव्हतं. शेवटी डॉक्टर म्हणाले, आता ही शेवटची टेस्ट करू या आपण. त्याने तो कागद हातात घेतला, त्यावर लिहिले होते ’ एलीसा ’!  तो कागद उचलला आणि त्याला एकदम धक्का बसला. एलीसा  म्हणजे एड्स चेक करायला सांगतोय हा ? घाबरला, पण पॅथॅलॉजीस्ट कडे निघाला , रक्त द्यायला!

आजचे हातातले जे पाकिट होते ते याच टेस्टचे होते. त्यात दिलेला रिपोर्ट पाहिला , त्यात लिहिले होते ’एच आय व्ही’ +! सगळं जग स्वतःभोवती फिरतंय असे वाटले त्याला. कसं शक्य आहे हे? आज पर्यंत कधी आपण तसं काही केलं नाही, मग हे असं कसं झालं असावं आपल्याला??काही तरी चूक झालेली असेल बहूतेक. स्वतःचीच समजूत काढणे सुरु केले, आणि असा विमनस्क होऊन रेतीमधे बसला होता तो, पण डॉक्टरांचे शब्द, ” औषधं घ्या, बरं वाटेल” – काही खास गोळ्या आहेत एच आय व्ही च्या , त्या घेत रहा.  एच आय  व्ही झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. डॉक्टरांचे नुसते शब्द कानावर पडत होते, अर्थ काही लागत नव्हता, आणि आता तो तेच पाकीट घेऊन गिरगावच्या ह्या चौपाटीवरच्या रेती मधे बसलेला होता.

त्या माणसाने अंधारात फेकलेली ती पाऊच तिथे शेजारीच पडली होती. काय असेल बरं त्या पाऊच मधे? ड्रग्ज? पैसे? हिरे? की बॉम्ब- की जो पाउच उघडल्यावर ब्लास्ट होईल असा? कशाला घाबरायचं आता? असा विचार करुन ती पाऊच उचलली. चांगलीच जड पाऊच होती ती. दिड एक किलॊ तरी असेल सहज , मनात विचार केला आणि ती पाऊच आपल्या लॅपटॉपच्या बॅग मधे टाकून रेती तुडवत पुढे निघाला रोहन.

समोरच्या मरीन लाइन्स वरून येणाऱ्या ट्राफिकची वर्दळ सुरु होती. काही चेहेरा रंगवलेल्या वेश्या पण खास आविर्भावात आपली गिऱ्हाइके गटवण्यासाठी उत्तान पणे वागत होत्या. १५-२० कॉलेजची मुलं ” मी अण्णा हजारे” च्या टॊप्या घालून लोकपाल विधेयक झालेच पाहिजे म्हणून  घोषणा देत ओरडत जात होते. करमणूक, मौज, की समाज बदलण्याची इच्छा – जे काही असेल त्यांच्या मनात , पण दिसत मात्र असं होतं, की ती मुलं हा सगळा प्रकार एंजॉय करत होते. तिथे बसला असतांना त्याच्या मनात विचार आला की हे असे टोप्या घालून काय होणार आहे?  काहीतरी भरीव करायला हवं. तो झपाझप चालत निघाला, त्या माणसाने आपल्याकडे फेकलेल्या त्या बॅग मधे काय असेल बरं?

घरी पोहोचल्यावर कपाटातली टिचर्स ५० ची बाटली काढली- ’इट्स टाइम टु सिलेब्रेट बॉस’ चिअर्स फॉर द रिमेनिंग डेज ऑफ लाईफ’ स्वतःशीच बोलून त्याने एक चांगला मोठा पेग घशाखाली ओतला. नेहेमी पिण्याची सवय तर नव्हती रोहनला, पण आजचा दिवस वेगळा होता. अहो २८ व्या वर्षी जर तुम्हाला एक दुर्धर रोग झालाय, आणि तुम्ही आता थोड्याच दिवसाचे सोबती आहात हे समजल्यावर काय अवस्था होईल मनाची? दोन पेग घेतल्यावर पिझाहट वाल्याने आणलेल्या पिझाचा एक तुकडा उचलला आणि लॅपटॉपच्या बॅगमधली ती पाऊच काढली.

पाऊच उघडली, आणि त्यातून एक पिस्तूल, एक लांबशी नळी आणि काडतूसांचा एक बॉक्स बाहेर पडला.थरथरत्या हाताने त्याने ते पिस्तूल उचलले, आज पर्यन्त केवळ सिनेमात पाहिलेले ते पिस्तूल आज प्रत्यक्षात बघून काहीतरी वेगळं च फिलिंग येत होतं. सोबत असलेली ती नळी म्हणजे सायलेन्सर असावे, त्याने ते उचलले, आणि पिस्तुलाच्या समोरच्या नाळेवर बसवले. कुठली तरी जर्मन मेकचं होतं ते पिस्तूल.  त्याने समोर नेम धरून त्याचा ट्रिगर नकळतपणे दाबला. खट आवाज झाला पण बुलेट बाहेर निघाली नाही. म्हणजे काय? बुलेट्स नाहीत आत??

त्याने काडतूस डबा उघडला, त्यातले एक काडतूस हातात घेऊन कुठून भरायचे ते बघू लागला. पण हिंदी सिनेमात नेहेमीच रिव्हॉल्वर दाखवतात, हे पिस्तुल वेगळंच होतं. काडतूस कशी भरायची?? त्याने लॅपटॉप समोर ओढला आणि गुगल मधे टाइप केलं.लोडींग माउझर पिस्तूल.. आणि सर्च.. समोर उघडलेल्या वेब पेज वर बघून काही व्हिडीओज बघितल्यावर  त्या पिस्तुलाची रचना आणि बुलेट्स लोड कशा करायच्या ते  वाचले. हल्ली यु ट्युब वर बरेच व्हिडीओ असतात, त्यात बघून तर सगळं काही करता येतं. रोहनने   १० बुलेट्स लोड केल्या आणि पिस्तूल हातात  धरून वरचा स्लायडर सरकवून पिस्तुल लोड केले.

हातात पिस्तूल घेतल्यावर मात्र एकदम स्वतःमधे काहीतरी अमुलाग्र बदल झाल्याचे जाणवले.बाजूला पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले, आणि पिस्तुलाची नळी  नकळत स्वतःच्या डोक्यावर लावली , एक बोट ट्रिगर वर. मनात सारखे विचार येत होते, ” आता काय करायचं जगून? असं आजारी माणसासारखं जगण्यापेक्षा मेलेलं काय वाईट” .  तेवढ्यात फोनची रिंग वाजली, त्याने फोन उचलला, आई होती फोन वर. आई बरोबर बोलणं झालं, आणि तो थोडा शांत झाला आणि सोफ्यावरच झोपी गेला.

*********
सकाळची वेळ. डोकं जड पडलं होतं. सोफ्यावर झोपल्यामुळे मान पण अवघडली होती.आळस देत बाथरूम मधे पळाला, सवयीप्रमाणे तयार होत असतांनाच त्याच्या मनात विचार आला, की आता ही कशासाठी मरमर करायची? आपण जगणार तरी किती आहोत असे? अजून समजा आपलं आयुष्य ५ वर्ष जरी समजलं, तरीही आपण जवळ असलेल्या पैशांवर सहज काढू शकतो. मग कशासाठी काम करायचं? लॅपटॉप उघडून रेसिग्नेशन टाईप करणे सुरु केले……. “येस!! इट्स ओव्हर!!! नाऊ ईट्स माय ओन लाईफ, नो वन कॅन बी अ  बॉस , बट मी”.

जिन्स, टी शर्ट, स्पोर्ट्स शू आणि पाठीवर हॅवरसॅक. सॅक मधे समोर असलेले पिस्तूल आणि बुलेट्स पण टाकल्या, आणि तो घराबाहेर निघाला. स्वतःचं आयुष्य पण ’द्स विधानीया’ मधल्या पाठक सारखं झालंय असं वाटत होतं रोहनला. पण काय करणार? तसच करावं का आपणही? व्हाय नॉट?? पण नको.. मनातले विचार पक्के होत नव्हते. समोर आलेल्या  टॅक्सी वाल्याला हात दाखवला. टॅक्सी थांबली आणि रोहन पटकन मागे बसला. पाठीवरची बॅग काढून त्याने सीट वर बाजूला ठेवली, आणि ड्रायव्हरला म्हणाला, की चलो माटुंगा चलना है. टॅक्सी वाल्याने रागाने पाहिले, म्हणाला, ” उतरो भैय्या, नही  जाने का है ” . दादरहून माटूंगा जाण्यासाठी टॅक्सी  मिळायला नेहेमीच त्रास होतो, कधीच टॅक्सी वाला येत नाही. उगाच रोहनने, त्याची मनधरणी केली, “अरे ले के चलो भैय्या, दवाखाना जाना है, नहीं चलोगे तो पुलीस बुलाउंगा”, पण त्या टॅक्सी वाल्यावर काही फरक पडला नाही. तितक्याच उद्दाम पण त्याने पुन्हा एकदा ओरडून सांगितले, ” अरे भाइ, नहीं जानेका बोला नां, नहीं जाएगा,  जा जाके पुलिस को बोल दे” . रोहन ला एकदम हतबल झाल्यासारखं वाटत होतं. त्याने सॅक उचलली, आणि चेन उघडून त्यातले पिस्तूल बाहेर काढले. ते पाहिल्यावर मात्र तो  ड्रायव्हर एकदम घाबरला, आणि साहब माफ करना, म्हणून टॅक्सी सुरु केली.

रोहन च्या लक्षात आलं की ह्या ड्रायव्हर मधे पडलेला फरक हा पिस्तूल मुळे होता. टॅक्सी सुरु झाली, बाजूने ” मी अण्णा हजारे” च्या गांधी टॊप्या घातलेले  लोकं जात होते. हे एक नविनच फॅड निघालंय. रोहनच्या मनात आलं , की जर  सुखदेव, भगतसींग,नेताजीं सारखे क्रांतिकारी नसते तर? रॅंंड ला जो पर्यंत उडवला नव्हता, तो पर्यंत फिरंगी कुठे कोणाला घाबरत होते? पिस्तुलाच्या मुठी वरची पकड किंचित घट़्ट झाली, नकळत चेहेऱ्यावरचे स्नायू आक्रसले गेले, डोळ्यात रक्त उतरले. तेवढ्यात टॅक्सीवाल्याने टॅक्सी थांबवली म्हणाला,”साहब, माटूंगा आ गया”रोहन म्हणाला, “एक काम करो, अभी लोअर परेल चलो, सिताराम मिल कम्पाऊंड चलना है”. टॅक्सी वाल्याने काय येडा माणूस आहे अशा दृष्टीने पाहिले, आणि यु टर्न मारून निघाल.

सिताराम मिल कम्पाऊंड . या मिल मधे पूर्वी कधी तरी कपडे उत्पादन चालायचं, पण हल्ली गेले कित्त्येक वर्ष गिरणी कामगारांच्या संपापासून मिल बंद पडली होती. रिकाम्या जगांमधे, बरेच जुने विभाग गोडाऊन म्हणून भाड्याने दिलेले होते.  काही भागात तर ऑफिसेस पण  उघडले आहेत. काही वाहिन्यांची ऑफिसेस पण होती. कित्येक  एकराचा परीसर, एकदा आत गेल्यावर कोण कुठे आहे ते सापडणं कठीण.

टॅक्सीवाल्याला एका बंद पडलेल्या गोडाऊन पुढे निर्मनुष्य भागात थांबवले. सॅक मधले पिस्तूल काढून त्याच्या छातीवर टेकवून त्याला म्हणाला, ” पहेली बार जब माटूंगा चलने बोला था, अगर उसी वक्त हां बोलता तो आज नहीं मरता” आणि थंड्पणे ट्रिगरवरचे बोट आवळले. एका क्षणात फट़्ट असा आवाज आला आणि तो ड्रायव्हर शांत झाला. रोहनने बॅग मधली पोस्ट ईट ची स्लिप काढली, आणि त्यावर लिहिले, ” जर याने माझ्याबरोबर यायला नकार दिला नसता, तर अजून जगला असता” आणि आपली बॅग पाठीवर लावून कम्पाउंडच्या बाहेर दुसऱ्या दरवाजाकडे वळला.

बाहेर पडल्यावर त्याला  खूप हलके वाटत होते. चालत चालत बाहेर पडला व्हिटी च्या दिशेने.तेवढ्यात एक बस आली, बस मधे बसून निघाला तो. नकळत त्याला तो सिनेमा आठवला, डोंबीवली फास्ट!! च्या मारी तर, आपण तेच करू या की.फक्त थोडं जास्त सिस्टीमॅटीक.  फिअर इज द की.. एकदा समाजात भिती बसली, की सगळे कसे सुतासारखे सरळ होतील. पहिले टॅक्सी , रिक्षावाल्यां मधे एक भिती निर्माण व्हायला हवी, की त्यांनी कधीच कोणाला येणार नाही , असे म्हणण्याची हिम्मत करता कामा नये. दुसरी टॅक्सी,तिसरी टॅक्सी, चार रिक्षा वाले- पुन्हा प्रत्येकी  एक बुलेट, एक पोस्ट ईट.. तेच वाक्य!!

पुढचा भाग.. ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2011/09/11/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%9C-%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A5%A8/)

उल्लेखनीय…

Written by  on March 14, 2009

थोडी पाय टेकवायला जागा आणि हात धरायला बार असेल तर … बरं वाटतं.

सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणे अगदी कॉमन झालेलं आहे. मुल १६ चं झालं, की लगेच बाइक किंवा स्कुटीची किल्ली हातात दिली जाते. क्लासेस, कॉलेज वगैरे जर ५-६ किमी अंतरावर असेल तर सायकल ने सहज जाता येऊ शकते. असो..

मला वाट्त की हेच कारण असावं की आजकालची मुलं थोडी जास्त हेल्दी दिसतात- ओव्हर वेट म्हंटलं तर वाईट वाटेल म्हणून हेल्दी शब्द वापरलाय. थोड्या प्रमाणात याला पालक पण जबाबदार आहेत. आपल्या मुलांनी सायकल चालवली तर ते त्यांना कमीपणाचं वाटते, तसेच कॉलेजमधली इतर मुलं जर बाइक आणत असतील तर मग आपण सायकल कशी चालवायची? जर आपण सायकल नेली तर आपण ऑड मॅन आउट होऊ अशी भिती पण असते मुलांना.

सायकल साठी स्पेशल लेन

सायकल्स …अगदी कुल सायकल्स  चांगल्या ७-८ हजाराच्या अव्हेलेबल आहेत भारतामधे. अनिकेतच्या ब्लॉग  ^(http://rangmarathiche.com/goto/http://manatale.wordpress.com/)वर बघा बरीच माहिती मिळेल. सायकलींग चे फायदे लिहिण्यासाठी हे पोस्ट नाही. असंच वाचतांना एक लेख वाचण्यात आला , त्यात त्याने काही युरोपियन देशात आणि अमेरिकेतील काही राज्यात सायकल स्वारांसाठी वेगळॆ लेन सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती दिलेली होती. सायकल चालकांना मुख्य भिती असते ती कारची आणि जड वाहनांची .सेपरेट लेन मुळे  रस्त्यावरून अपघाताची भिती न बाळगता सायकल चालवता येऊ शकते. सायकल चालवण्यासाठी दिलेले प्रोत्साहन हे नक्कीच वाखाणण्यासारखे आहे.

जेंव्हा एखाद्या सिग्नलला उभं रहाण्याची वेळ येते तेंव्हा थोडं त्रासदायकच होतं. वाकडं होऊन एका पायावर जोर देऊन उभं रहावं लागतं. याच कारणासाठी डेन्मार्क मधे खास सायकल स्वारांना थॊडी विश्रांती मिळावी म्हणून रस्त्याच्या बाजुला स्टॅंड्स उभे केले आहेत. त्यावर पाय ठेऊन सायकल स्वार कम्फर्टेबली उभा राहू शकतो. त्याच सोबत धरुन उभं रहायला एक बार पण दिलेला आहे- एक लहानशी पाटी पण लक्ष वेधून घेते.. तुम्ही सायकल चालवल्या बद्दल तुमचे आभार.. खूप छान वाटलं वाचल्यावर म्हणून इथे शेअर करायला पोस्ट करतोय… जेंव्हा आपण पर्यावरणाची काळजी करतो  तेंव्हा केवळ विज, पाणी आणि प्लास्टीकचाच विचार न करता इतरही गोष्टींचा विचार करायला हवा 🙂 त्यातलीच एक म्हणजे पेट्रोल बचत…

चवीनं खाणार गुजरातला…

Written by  on March 9, 2009

आता पर्यंत उगिच वाटायचं की आपण खादाडीवरच जास्त लिहितो की काय ते.. पण तसं नाही. वर्षभरात फक्त ८ लेख म्हणजे काही फार नाहीत हो. माझ्या शरीराचा आकार बघुन उगिच लोकांना वाटतं की मी फक्त खादाडीचेच लेख लिहित असेल म्हणून. बरेच दिवस झालेत गुजरातच्य खादाडीवर लिहायचं म्हणुन विचार सुरु होता, पण खादाडीवर लिखाण  अती होतंय असं वाटायचं म्हणुन लिहिलं नव्हतं. आज सहज जुने फोटो पहात बसलो होतो, तर हे गुजरातचे फोटो समोर आले, आणि विचार केला- येस्स्स!!!!!!!.

गुजरात म्हणजे उत्कृष्ट व्हेज जेवण मिळण्याची जागा. तुम्ही गुजरातला गेलात, की तुमचे मित्र /नातेवाईक तुम्हाला आवर्जुन गुजराती थाळी साठी म्हणुन  विशाला  नावाच्या   रेस्टॉरंट मधे किंवा कुठल्याही ’जी’कारान्त  (सासूजी, नानीजी,वगैरे वगैरे )रेस्टॉरंट मधे  घेउन जातील. दिड ते दोन  फुट व्यासाच्या थाळी मधे ठेवलेल्या १२-१५ वाट्या आणि इतर  फरसाण  गोष्टींनी भरलेलं ते ताट , यावर लिहीणार नाही ,कारण ते तर अगदी कॉमन आहे. तर अहमदाबाद मधली एक हटके जागा आहे तिच्याबद्दल लिहिणार आहे आज.

अहमदाबादला असलो की ऑफिस पासुन जवळच असलेले माझे एक फेवरेट रेस्टॉरंट आहे – त्याचं नांव स्वाती. दोन मजली असलेलं हे रेस्टॉरंट म्हणजे तुमच्या सगळ्या व्हेज खाण्याच्या फॅंटॅसीज पुर्ण करण्याचे स्थान आहे. इथे प्रत्येकच गोष्ट थोडी हटके आहे. कुठेही सहसा न मिळणारे पदार्थ इथल्या मेनु कार्ड मधे हजेरी लाउन असतात. मी श्रीनिवास, आणि सौरभ – आम्ही तिघंही दुपारी जेवायला ( छे — जेवायला नाही,  स्पेशल स्नॅक्स साठी )  गेलो होतो. रेस्टॉरंट मधे प्रवेश केला, तर दस मिनिट लगेगा म्हणुन बाहेर उभं केलं. इकडे तिकडे पहात वेळ घालवत उभे होतो. पण पोटात कावळे कोकलत होते. तेवढ्यात पुकारा झाला आमच्या नावाचा, आणि आम्हीआत शिरलो . अहमदाबादला पण लोकांचं बाहेर खाण्याचं प्रमाण फार जास्त आहे 🙂

या रेस्टॉरंट मधे मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी हटके   मिळतात. बऱ्याच गोष्टी तर केवळ याच हॉटेल मधे मी मेनू कार्ड वर बघितल्या. इथे आलं आणि तुम्ही चार पाच लोकं असाल तर निरनिराळ्या डीशेश मागवून शेअर केल्यास जास्त प्रकारांची चव घेता येईल. उन्हामुळे घसा नुसता कोरडा पडला होता. वेटरने मेनू कार्ड समोर आणून ठेवले आणि आम्ही सर्वप्रथम  फ्रेश लेमन ची ऑर्डर दिली. नेहेमीचा अनूभव म्हणून मी इथे ऑर्डरची सूत्र हाती घेतली.

दालबाटी..

वेटरने आधी दालबाटी आणुन ठेवली समोर. शुध्द तूपामधे बुडलेली ती बाटी मला वेडावून दाखवत होती, एकदा त्या दालबाटी कडे आणि एकदा आपल्या पोटाकडे पाहिलं, विजय झाला दालबाटीचा, पण  मी    एखाद्या लढवय्याप्रमाणे सरळ तुटून पडलो. इथली दालबाटी एकदम ऑथेंटीक राजस्थानी. दालबाटी सोबत लसूण चटणी आणि एका प्लेटमधे गोड  चुरमा पण होता.

सातपडी रोटी अन गट्टेका साग

हे संपवतोय तो पर्यंत सातपडी रोटी अन गट़्टेका साग होता. सोबत हिरवी चटणी. सातपडी रोटी म्हणजे रोटी लाटायची, मग तेल लाउन पुन्हा घडी घालायची, पुन्हा लाटायची असं सात वेळा करायचं. पहिल्यांदा जेंव्हा लाटता, तेंव्हा कुठलासा मसाला पण त्या रोटीमधे भरलेला असतो. इतकं तेल लागल्यामूळॆ एकदम खुसखुशित होते ही  रोटी. पानात पडल्यावर कधी संपेल तेच समजत नाही. इथे थालीपिठ पिठलं पण मेनू कार्ड मधे आहे पण ते मागवलं नाही.इथली बेक्ड मसाला खिचडी एकदम अप्रतिम असते. मायक्रोवेव्ह मधे चिज घालून केलेली ही खिचडी म्हणजे डायटिंगची वाट लावणारी 🙂 पण अप्रतिम चव असते . एकदा अवश्य ट्राय करा.

खीचू..

खीचू नावाचा एक पदार्थ मिळतो. बाजरी खीचू  किंवा मकई खीचू दोन्ही प्रकार इथे मिळतात. खीचू म्हणजे पापड करायचं  शिजलेलं पीठ. आता ह्या पिठाचे पापड करून वाळवतात असं सौरभ म्हणाला. ( तो एकटाच गुज्जू भाई, म्हणजे तो जे म्हणेल त्यावर विश्वास ठेवावाच लागला) जे काय असेल ते असो, पण हे खीचू मात्र खुपच टेस्टी होतं. या खीचुवर त्या वेटरने भरपूर शेंगदाण्याचं तेल टाकून आणलं होतं. बरोबर एक चटणी होतीच. एक प्लेट संपलं खीचू मग पुन्हा एक प्लेट मागव म्हणाला श्रीनिवस, म्हणून एक प्लेट मकईका खीचू पुन्हा ऑर्डर केलं. खातांना त्यावर घातलेलं इतकं मोठं तेल मात्र सारखं नजरेला येत होतं, तिकडे दुर्लक्ष केलं, आणि खादाडी सुरु ठेवली.

हांडवो

इतकं खाणं झाल्यावर पोट तर भरतच आलं होतं. पण तेवढ्यात त्या वेटरने समोर हांडवो म्हणून एक डीश असते ती आणुन ठेवली. साधारण ढोकळ्यासारखी दिसणारी ही डीश अतिशय टेस्टी असते. ढोकळ्याच्या  आणि हांडवो च्या चविमधे अजिबात समानता नाही. पोट भरलं असतांनापण एक डिश संपवली . इतकं खाणं झालं, तरीही मनामधे एक खंत राहूनच गेली – ती म्हणजे धनसाक भात खायची. अजिबात जागा नव्हती पोटात म्हणून ऑर्डर कॅन्सल केली , आणि आइस्क्रिमच्या काउंटर कडे वळलो ( पोटात जागा नसतांना आइस्क्रिमच्या काउंटरकडे कसे गेलात ते विचारू नका , त्या साठी कधिही जागा असतेच.अहमदाबादला येऊन आइस्क्रिम न खाणं ?? म्हणजे इंदौरला जाउन सराफा न पहाणं आहे. वन बाय टू करून आइस्क्रिम मागवलं, फ्रेश चिकूचं.

इतकं जेवण झाल्यावर रात्री काहीच खायचं नाही असं ठरऊन टाकलं होतं. कामं संपल्यावर रात्री अकराची ट्रेन होती गांधीधामला. कांडला पोर्ट ट्रस्ट मधे काम होतं दुसऱ्या दिवशी. तिथलं काम आटोपून आम्ही जामनगरला गेलो. गुजरात मधे गेल्यावर जर कच्छी जेवण नसलं, तर काय मजा? एकदा तरी कच्छी जेवण जेवावं असं वाटत असेल तर जामनगर बायपास वरच्या आशिर्वाद रेस्टॉरंट मधे अवश्य जायला हवं.तसं म्हंटलं तर गावाबाहेर असलेले हे रेस्टॉरंट , इथे टिपिकल कच्छी जेवण मिळतं. कच्छी म्हंटलं की लोकांना सेवटमाटरनू साग आणि लसणिया बटाका आठवतो. पण त्यापलिकडेही बरेच  कच्छी पदार्थ आहेत.

बाजरीची भाकरी , लोणी आणि गूळ

दुपारचे दिड वाजला होता. हॉटेलची चीरपरीचित इमारत समोर दिसली. बऱ्याच कार्स समोर पार्क करुन ठेवल्या होत्या.  इथे गेल्यावर काय ऑर्डर करायचं ते पण ठरलेलंच होतं. भरेला करेला, रिंगणा मसाला, अने बाजरानू रोटलो , मख्खन अने गुड साथे अशी ऑर्डर दिली. इथे बाजरीची भाकरी खातांना अजिबात कद्रू पणा करायचा नाही. भाकरी कुस्करून आणि त्यावर मोठा लोण्याचा गोळा , गुळ मिक्स करुन लसून चटणी बरोबर एकदम  भन्नाट लागतं. व्हेज वाले मित्र नक्कीच ट्राय करतील. काही ठिकाणी बाजरीच्या भाकरीमधे करतांनाच थोडे तिळ घालतात, त्याची पण चव मस्त येते.

बाजरेका रोटला अन इतर डीश

समोर असलेल्या प्लेटमधल्या भाजा वगैरे तर उगिच मागवल्या असं वाटलं, पण नंतर भरेला करेलाची पुर्ण डीश संपवली मी. ताक मागवले आणि दोन घोट घेउन समोर ठेवले, तर ग्लासात एक माशी बसलेली दिसली. ग्लास परत दिला, आणि दुसरा मागवला. कच्छी जेवणामधे तेल भरपूर वापरले असतेच, तसेच तिखट वगैरे पण मु्बलक प्रमाणात वापरले जाते. जेवण एकदम टेस्टी असतं, जेवण झाल्यावर खिचडी अन कढी मागवायलाच हवी. पण आज  लोणी भाकरी इतकी आवडली, की तिच डीश रिपिट करू असं श्रीनिवास म्हणाला.

चॉकलेट पानवाला. इतकं सगळं झाल्यावर मग पान हे हवंच. म्हणुन मग चॉकलेटच्या लिक्विड मधे बुडवुन तयार केलेलं चॉकलेट पान हवंच..

गुजरात मधल्या खादाडीवर लिहितोय, तर मग चो्टीला च्या चौकडीवर असलेल्या त्या अ्नलिमिटेड सॅलड्स – ते पण वेगवेगळया प्रकारचे फ्री देणाऱ्या हॉटेल बद्दल तर लिहावे लागेलच, पण ते पुढल्या पोस्ट मधे कधी तरी. म्हणजे चविने खाणार गुजरातला भाग दोन मधे..

मुंबईचा पाउस

Written by  on March 8, 2009

काल  मुंबईला पहिला पाउस पडला. तसा नाही म्हणायला थोडे फार शिंतोडे उडवून जातोय दोन दिवसापासुन, पण “पाउस पडला” असं जे म्हणतो तसा आजच पडला. पाउस  पण काय लिहायचा विषय आहे कां? छे.. आधीच इतक्या कविता, लेख  लिहिल्या गेले आहेत ( अगदी पुर्वी पासून) की  आता त्यावर नवीन काही लिहायला उरलंच नाही.

गरिबाची झोपडी, किंवा, घरात पाणी शिरणं..हे सगळं नेहेमीप्रमाणेच सुरु आहे. आज सकाळी मालाड स्टेशन ला पोहोचलो. थोडा उशीराच निघालो आज सौ. पण सोबत होतीच. ( कधी तरी आमची दोघांची जायची वेळ एक होते) . आधी नेहेमी प्रमाणे रिक्षाच्या रांगेची वाट लागलेली होती. आम्ही पण संगीत खुर्ची च्या तालावर रिक्षा पकडायचा प्रयत्न करु लागलो. पावसाने पाठीवरची लॅप्टॉप ची बॅग ओली झालेली. म्हट्ल बंद पडतो का आता….! शेवटी स्टेशनला पोहोचलो तर इस्ट साइडला जवळपास १ फुट पाण्याचा ओहोळ वाहात होता. कसा तरी चुकवायचा प्रयत्न केला पण पाणी शिरलच बुटामधे. चरफडत प्लॅटफॉर्म ला पोहोचलो. ओले बुट, छत्री असुनही ओली झालेली पॅंट, डोकं आणि शर्टच्या बाह्या मुळे अजुन अनिझी होत होतं. ओले मोजे तर खूपच त्रास देत होते.

रेल्वेचे मोठमोठे दावे की यावर्षी गाड्यांवर पावसाचा काहीच परिणाम होणार नाही..  किती फोल आहे हे एकाच पावसाने दाखवून दिले. सगळ्या स्लो ट्रेन्स अनाउन्स होऊन कॅन्सल होत होत्या. दोन नंबरला १२ डबा स्लो लागेल म्हणून अनाउन्स केलं म्हणून मी आणि सौ. दोघंही मागे जाउन उभे राहिलो. अगदी ट्रेन येण्याच्या वेळी आज १२ डबा के बदले मे ९ डबा ट्रेन आएंगी अशी अनाउन्समेंट झाली. च्यायला… काय वैताग आहे !! सौ. म्हणाली मी जाते पुढ्च्या डब्यात आणि गाडी प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यापूर्वीच दुसऱ्या फर्स्टच्या डब्याजवळ गेली, मला आला होता कंटाळा, मी म्हंटलं दुसऱ्या टेनेनी मी येतो, तू निघ!

नंतरची ट्रेन आली. ओला गच्च प्लॅटफॉर्म, पॉलिशवाली पोरं उगाचच इकडे तिकडे हुंदडत होती.एक भिका्रीण ( बहुतेक भाड्याचं असावं) एका मुलाला खाकोटीला मारुन भीक मागत होती. या सगळ्या गोंधळात गाडी आली आणि आम्ही सगळे मर्द मावळे अगदी कसंही करुन सिंहगड जिंकायचा… दोर कापलेले आहेत.. अशा आविर्भावात त्या मोगल सैन्यावर ( गाडीवर) तुटून पडलो. कसा तरी गाडीत शिरलो , लोकांच्या ओल्या छत्र्या, किंवा अंगात घातलेले ओले रेनकोट अजुन कपडे भिजवत होते. ट्रेन सुरु का होत नाही?? जवळपास दोन मिनिटं झाली, तशी लोकं अनिझी होऊ लागले. दोन मिनिटं ही लोकलच्या दृष्टीने खूप होतात. जर तुम्ही नेहेमी प्रवास करित असाल तर तुमच्या लक्षात येईल – खूप मोठा वेळ असतो तो. नॉर्मली तुम्ही आत शिरता ना शिरता तोच ट्रेन सुरु होते.. आज काय झाल?? अशा अनिश्चिततेच्या परिस्थिती मधे लोकांची भांडणं पण सुरु होती.

नेमका आज हाफ शर्ट घातला होता. शेजारच्या माणसाच्या उघड्या दंडाचा स्पर्श माझ्या स्किनला होत होता. अगदी किळसवाणं फिलिंग होतं.  थोडा स्पर्श झाला तर त्यात काय -असं म्हणू नका.. दुसऱ्या माणसाच्या स्किनचा स्पर्श किती इरीटेटींग असु शकतो याची कल्पना येत नाही, स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय.

दादरला उतरलो . बोरिवली साईडचा पहिला ब्रिज सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वर जात  नाही म्हणून दुसरा ब्रिज घेतला, आणि कुर्ल्याला पोहोचलो. गाड्या अतिशय मंद गतिने सुरु होत्या. प्रशासनाचे दावे की पाणी तुंबणार नाही, ट्रेन्स वेळेवर चालतील हे किती खोटे होते ते लक्षात आलं.. आणि मानसिक तयारी पण झाली पुढे काय वाढून ठेवलंय त्याची…

इतक्या सगळ्या द्रविडी प्राणायम करुन कुर्ल्याला पोहोचलो तर डिलरचा फोन आला. साब जरा भिंडी बजार आ सकते है क्या? म्हंटलं दो बजे के बाद आयेंगा मै..आणि ऑफिसला पोहोचलो. तेंव्हा दुपारचे ११-३० झाले होते.

160620091535थोडी फार कामं आटोपून ३ वाजता मोहम्मद अली रोडला गेलो तर  फ्लाय ओव्हरचया खाली पार्क केलेल्या कारच्या शेजारी कोरड्या जागेत हा माणुस झोपलेला दिसला. इकडे धो धो पाउस पडत असतांना पण इतक्या शांतपणे झोपणाऱ्या त्या माणसाचे कौतुक वाटले. डिलरच्या ऑफिसच्या जुन्या बिल्डींग मधे शिरतांना एक कबुतर समोरच्या भिंतींवरच्या कोनाड्यात अंग चोरुन बसलेलं दिसलं त्याचा पण एक फोटो काढला.

पावसामुळे उडालेली मुलींची तारांबळ, त्यांच्या ओले त्या अंगांकडे आशाळभूतपणे पहाणारे आंबटशौकीन.. आणि त्यांच्या त्या वखवखलेल्या नजरा..अंगाला चिकटलेला कपडा दुर करण्याची त्या मुलिंची धडपड.. …  पावसाळा!!!!!!  –  हे सगळं पाहुन जरा विचित्र वाटलं. पुरुषांची त्या ओलेत्या मुलींच्या कडे पहाण्याची विखारी वासनेने बरबटलेली  नजर  माझ्या सारख्या पुरुषाच्या पण लक्षात आली. आणि मुलींची त्या नजरेपासून सुटण्याची केविलवाणी धडपड पण.. मला खरंच लाज वाटली.. समाजाची….!!  काय दिवस आले आहेत नाही??

रिवाईंडींग द मेमरीज ऑफ २६/११

Written by  on March 1, 2009

आज हा लेख का लिहितोय? कालच एक बातमी वाचली अफगाणी स्थान मधे इंडिया स्टाइल अल कायदा चा टेररिस्ट अटॅक……कित्येक लोक मारले गेले. पण ह्या अटॅकबद्दल फारशी माहिती कुठे प्रसिद्ध झाली नाही. अफगाणिस्तानातला व्हायोलंस हा त्या देशाचा अविभाज्य अंग आहे, आणि तिथे तसं काही होणं ही  बातमी  नसतेच.. उलट अफगाणिस्तानात एकही माणुस १० दिवसात टेररिस्ट अटॅक मधे मारला गेला नाही– ही बातमी होऊ शकते.

२६ नोव्हेंबर …

त्याच दिवशी मी टुर वर गोव्याला होतो. दिवस भर मार्गोवा पोर्ट ट्रस्ट मधे काम होतं. नेव्हीचं जहाज आलेलं होतं , त्या जहाजाच्या समुद्रातल्या ट्रायल  होती दिवसभर. त्यामुळे एकदम संध्याकाळी च पोर्ट ला परत आलो.  पोर्ट मधून बाहेर पडलो तर टॅक्सी वाल्याने सांगितलं की मुंबई ला टेररिस्ट अटॅक झाला आहे. मला खोटंच वाटलं.. मी त्याच्यावरच चिडलो, म्हंटलं तुम लोग ही ऐसा रुमर्स फैलाते हो, तरीपण मनामधे एक शंकेची पाल चुकचुकत होतीच.

हॉटेल ला परत आल्यावर टिव्ही ऑन केला आणि ………..कळेना काय करावं ते… २६ नोव्हे. तो काळा दिवस ज्या दिवशी टेररिस्ट अटॅक ने मुंबई पुर्ण हादरली होती..तो दिवस ज्या दिवशी घड्याळाचे काटे थांबले आहेत असं वाटत होतं.टिव्ही वरच्या बातम्यांच्या मधे काहीही बदल होत नव्हता, असं वाटायचं की सगळ्याच चॅनल वर एकच कार्यक्रम सुरु आहे..सगळे लोक कसे सुन्न झाले होते.

डोळ्यापुढे बायकोचा आणि मुलींचा चेहेरा आला. अंधेरी सेफ… म्हणजे मोठी मुलगी जी भवन्स ला जाते ती नक्कीच घरी आली असेल. दुसरी ची शाळा गोरेगांवला. न्युज मधे तिथला पण काहीच उल्लेख नव्हता.

एकदम आठवलं बायकॊ, ज.द.जोगळेकरांना( परिवारातल्या लोकांना हे कोण ते चांगलं माहिती असेल पण इतरांसाठी जयवंत जोगळेकर वय ८८ हे परिवारातील थोर विचारवंत , आणि यांची सावरकारांच्या वर लिहिलेली   आणि इतर अशी ३९ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत) भेटायला मलबार हिल्स ला जाणार होती. तिचा सेल ट्राय केला.. ऑपरेटरचं इस मार्ग की सभी लाइने व्यस्त है…….ऐकु आलं.

चरफडत  घरचा फोन लावला, पण दहा मिनिटे डायल केल्यावर लागला.  मुलिंशी बोलणं झालं . आधी तर मी संतापलो, अगं कोणाशी बोलत होतिस इतका वेळ? ती मोठी झाल्या पासुन तिचे बरेच फोन येतात मित्र मैत्रिणींचे.. . मुलीने नेहेमी  प्रमाणे टाळले आणि म्हणाली आई ट्रेन मधे आहे आणि सध्या अंधेरिला पोहोचली आहे. जीव एकदम भांड्यात पडला..:)

परत बातम्या पहाणं सुरू ठेवलं. ती बरखा दत्त टिव्हीवरुन बातम्या देत होती. मला कोणी विचारलं की तु सगळ्यात जास्त कोणाचा तिरस्कार करतो ? तर बरखा दत्त हे पहिलं नांव माझ्या तोंडून बाहेर निघेल.या बरखा दत्त ला पद्मश्री देण्यासाठी ज्या कोणी हिचे नाव प्रपोज केले असेल त्याला एकदा भेटायची  इच्छा आहे ,  पण आता हेलन ,ऐश्वर्या इत्यादी लोकांना पण पद्मश्री दिल्यावर  मात्र कळलं, की पद्मश्री कोणाला मिळु शकते ते…

दुसऱ्या दिवशी कोस्ट गार्ड च्या एका जहाजावर सकाळी जायचं होतं कारवारला, त्याकरता सकाळी निघायचं होतं ७ वाजता. गोवा ते कारवार २ तासांचं अंतर! म्हणून लवकर झोपायचं ठरवलं पण टीव्ही आणि बातम्या पहातांना डॊळ्याची पापणी पण हलत नव्हती , तेंव्हा झोपणे आउट ऑफ क्वेश्चन… रात्रभर टिव्ही पाहीला, वाटलं, आपले जवान २-४ तासात  सिच्युएशन कंट्रोल मधे आणतील पण तसे होणे नव्हते..
सहज म्हणून ऑर्कुट आणि फेस बुक ला लॉग इन केलं .बरेच लोक ह्या विषयावर आपापल्या बाजूने अफवा पसरवणे  सुरु ठेवत होते .

काही लोक मात्र या बाबतीत पुर्णपणे दुर्लक्ष करुन होते.. स्पेशिअली सोशल साईट्स ऑर्कुट च्या कवितांसारख्या साइटस .. आणि बऱ्याच अशा साईट्स वर प्रेमाच्या कविता , तु माझी, मी तुझा वगैरे पोस्ट करणं सुरु होतं. त्याच प्रमाणे , त्या त्या कम्युनिटि मधले मित्र मैत्रीणी मात्र एक मेकांच्या प्रेम कवितांची तारिफ करित बसले होते.काही कम्युनिटिज वर तर साधा निषेधही  रजिस्टर करण्यात आला नव्हता, किंवा जे लोक मेले त्यांना श्रध्दांजली पण देण्याचे सौजन्य दाखवले नव्हते..अर्थात सगळ्याच कम्युनिटिज वर असं नव्हतं पण …………… असो…. इकडे लोक मरत असतांना तुम्हाला कविता तरी कसल्या सुचतात??
मला ते वाक्य आठवलं..रोम जळत होतं.आणि  किंग फिडल वाजवल बसला होता………….

ते ३ दिवस मी अक्षरशः सुन्न अवस्थेत   काढले.आपला समाज इतका कोडगा झालाय का? विशेषतः तरुण वर्ग ज्या वर्गाने देशावरच्या आक्रमणाच्या वेळी जे संतापून उठायला पाहिजे तोच तरुण वर्ग ’प्रेम कवितांमधे” मग्न ??मला खरंच वाईट वाटलं.

राष्ट्र भावना, राष्ट्र प्रेम वगैरे गोष्टींनी हल्ली बॅक सिट घेतली आहे.त्याच वेळी आरएसेस कम्युनिटीवर महाराष्ट्रियन व्हर्सेस इतर ही भांडणं सुरू होती. उत्तर भारतीय लोक, तुम्हारा राज ठाकरे कहां छुप गया अब? म्हणुन  हेटाळणी करित होते. वेळ कुठली आणि काय सुरु होतं? मन अजुन उदास झालं. मी स्वतः राज ठाकरेंचा फॉलोअर नाही ,पण त्याच्यावर केलेली टीका पण मला आवडली नाही त्या वेळी.

इकडे हे असं सुरु होतं, आणि उत्तर भारतीय लोकांनी एसएमएस पाठवणे सुरु केले होते.. ” कहां है राज और उसके सैनीक?” वगैरे .. आणि जितने भी कमांडॊज मुंबई को बचाने आये है सब के सब उत्तर या दक्षीण भारतीय है. उसमे एक भी मराठी मानुस नही है… असे हेट मेसेजेस सेल फोन्स वर पाठवले जात होते. सगळे नॉर्थ इंडीयन्स आपल्या मराठी मित्रांना हे मेसेजेस आवर्जून पाठवत होते. माझ्या सेल वर हा मेसेज १७ वेळा आला…

हे आक्रमण जे होतं ते देशावरचं होतं.. तेंव्हा समाजाचं जे स्वरुप पहायला मिळालं ते मन विष्ण करणारं होतं.जेंव्हा देशावर आक्रमण झालंय, – अशी अपेक्षा असते की तुम्ही देशासाठी   काही तरी करावं – आणि जर काही करता येत नसेल तर कमी आपल्याला वाईट वाटतंय हे तरी दाखवायला हवं- कृतीने… तेंव्हा तुम्ही आपापसातच लाथाळ्या कराल तर ह्या देशाचं भवितव्य  काय?

सहज जाता जाता एक गोष्ट आठवली.. आज , बरेच मराठी लोक अमेरिकेत किंवा ब्रिटन मधे सेटल झाले आहेत. बऱ्याच लोकांनी नॅशनलिटी पण घेतली आहे.

त्यांची दुसरी पिढी , नक्कीच पुर्णपणे अमेरिकन विचार आणि चाली रिती प्रमाणे वाढते आहे. यातले जर काही ईन्डॊ अमेरिकन्स – US एअर फोर्स  मधे दाखल झाले , आणि जर कधी भारतावर अमेरिकेने अटॅक केला तर हे भारतीयांवर बॉंब टाकतील – की- तेंव्हा ह्यांचे  हात थरथरतील ?

बस्स ह्या प्रश्नावर हा लेख इथे संपवतो!