आठवं आश्चर्य.. स्टेप वेल..

Written by  on January 20, 2009

अहमदाबाद ला एअरफोर्स च्या ऑफिस मधली मिटिंग आटोपून पुन्हा हॉटेलवर निघालो, तर सहजच  ड्रायव्हरला विचारलं की इथून अडलज किती दुर आहे, तर तो म्हणाला की बस ८-१० किमी होगा- म्हंटलं चलो, कारण अशी संधी म्हणजे दुसऱ्या मिटींगसाठी दीड तास होता, म्हंटलं या वेळाचा सदुपयोग करुन घ्यावा. या वेळेसची गुजराथ टुर खूप इव्हेंटफुल झाली. बिझिनेस विथ प्लेझर म्हणता येइल त्याला.अहमदाबादची दोन प्रेक्षणीय स्थळं पाहिलीत- जी आजपर्यंत अहमदाबादला अनेक वेळा येउन सुध्दा , गेल्या कित्येक वर्षात बघितली गेली नव्हती. एक म्हणजे इ.स. १५०१ मधे बांधलेली विहीर, आणि दुसरी म्हणजे त्याच सुमारास तयार करुन  सिद्धि सैय्यद ची मस्जिद वर बसवलेली  दगडाचे कोरीव काम करुन बनवलेली जाळी.

ही विहीर म्हणजे अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना म्हणावा लागेल. आज पर्यंत अहमदाबादच्या लोकल लोकांना विचाराल, की यहा साईट सिइंगके लिये क्या है? तर उत्तर ठरलेलं असतं- बापू का आश्रम, अक्षरधाम और शॉपिंग मॉल्स . आता हे बा्पू का आश्रम, दांडी ब्रिज वगैरे ठीक आहे पण शॉपिंग मॉल -साईट सिइंग साठी?? ईट्स टू मच!!!बापू चा आश्रम मी अजूनही बघितलेला नाही- पुढल्या वेळेस नक्की.  पण या वाव बद्दल कोणीच काही बोलत नाही. संपुर्ण पणे दुर्लक्षित झालेली आहे ही विहीर.

अडलजच्या ह्या विहिरीला गुजराथी मधे वाव असे म्हणतात.राणी रुदाबाई हिने इ.स. १५०१ साली ही पाच मजली विहीर बांधून काढली. डायरेक्ट वॉटर टेबलवरच खोदकाम केल्यामुळे विहिरीला नेहेमीच पाणी असतं. पाण्याची लेव्हल की पावसावर अवलंबून असते. जमिनी खाली पाच मजले कोरीव काम केलेली ही वाव म्हणजे अप्रतिम वास्तुशास्त्राचा एक नमुना आहे.इथे विहिरीच्या भिंतीवर जागो जागी देवतांच्या मुर्त्या आहेत. असं म्हणतात , की पूर्वीच्या काळी इथे लोकं सकाळी पाणी भरण्यासाठी यायचे, तेंव्हा या देवतांची पुजा करायचे.

या वाव मधे सुर्यप्रकाश हा पोहोचत नाही, त्यामुळे गुजराथच्या रखरखीत उन्हाळ्यातही इथलं तापमान हे बाहेरच्या तापमाना पेक्षा ७ ते ८ डिग्री ने कमी असते. नॅचरल एअर कंडीशनींग म्हणा हवं तर!! या विषयी जास्त लिहिण्यापेक्षा सरळ व्हिडीओ अपलोड करतो म्हणजे या वाव च्या अप्रतिम आर्किटेक्चरची कल्पना येईल वरुन पाहिल्यावर लक्षात येत नाही, पण खाली उतरलं की ही विहीर अष्टकोनी असल्याचे लक्षात येते.या व्हिडिओ व्यतिरिक्त काही फोटो पण काढले आहेत ते पण इथे पोस्ट करतोय.. हे पोस्ट नुसतं फोटो पोस्ट होणार असं दिसतंय.. असो..

विहीर बघून झाल्यावर  परत रुमवर येतांना ती बहुचर्चित सिध्दी सैय्यदची मस्जिद वर बसवलेली जाळी दिसली. आजपर्यंत अनेक वेळा याच रस्त्याने गेलो असेन पण कधीच थांबून पाहिली नव्हती ही जाळी. आता या वेळेस मात्र आवर्जून थांबलो बघायला.अहमदाबादची आठवण म्हणून चांदी मधे बनवलेली ह्या जाळीची प्रतिकृती विकत मिळते. असं म्हणतात, की ही जाळी तयार केल्यानंतर बादशहाने, त्या कारागिराचे हात कापून टाकले होते- त्याने पुन्हा अशी जाळी बनवू नये म्हणून, असं म्हणतात!! इथे आहे बघा फोटो त्या जाळीचे. इतके कोरीव काम बारकाइने केले आहे की पाहून नवलच वाटतं.

सिध्दी सैय्यद ची जाळी मशिदीचा मागचा भाग

अहमदाबादला काय पहाण्यासारखं आहे म्हणुन मला विचारलं तर मी नक्कीच स्वाती रेस्टॉरंटचं नांव घेईन. पण त्यावर नंतर कधी तरी गुजराथची खाद्ययात्रा लिहायला घेइन  तेंव्हा लिहीन.  हे पोस्ट थोडं मोठं होतंय याची जाणिव आहे, पण नुकताच अंजार येथे जाउन आलो. अंजार म्हणजे जे गांव ९९ टक्के २६ जानेवारीच्या भुकंपा मधे नेस्तनाबुत झालं होतं , ते गांधीधाम जवळच गांव.

तेंव्हाच्या भुकंपामुळे अगदी प्रत्येक घर पडलं होतं . पण आता जेंव्हा तिथे गेलो होतो तेंव्हा मात्र एक नविन शहर वसवलेलं दिसलं. आणि तीच गोष्ट गांधीधाम ची. इथे आता नवीन वसवलेल्या गांधीधाम मधे चांगले १० पदरी रस्ते – आणि ते पण गावात बघुन आश्चर्य वाटते. अंजार हे प्रसिध्द आहे तिथल्या तलवारी, भाले,   अडकित्ता आणि सुरी या वस्तूंसाठी. तिथल्या एका दुकानात गेलो होतो  आणि एक सुंदर तलवार सिलेक्ट केली होती घेण्यासाठी. दुकानदार म्हणाला, फ्लाईटमे बॅगेजके साथ भी अलौड नही है. अगर ट्रेन से जानेवाले हो , तो ही खरीदो..त्या दुकानात एअर गन्स पण मिळतात- तिनशे फुट ते ८०० फुट रेंज पर्यंत. मला फ्रेडरिक फोर्सिथचं पुस्तक डे ऑफ द जॅकल आठवलं. दुकानदार म्हणाला, की या गन्सचं बॅरल बदलुन यांना रेग्युलर .३३ मधे बदलता येउ शकतं – आणि अतिशय  सोपं काम आहे हे कन्व्हर्शन.  हे काम यु पी मधे केलं जातं असं तो म्हणाला..

इथे जेंव्हा सगळं का्ही गावच नेस्तनाबुत झालं  होतं, तेंव्हा इथे टेंट मधे रहावं लागायचं.त्याच सुमारास काही एन जीओ नी लोकांना रहायला म्हणून कंटेनर्स पण दिले होते , त्याच कंटेनर्स मधे आता दुकानं सुरु केलेली आहेत. जेंव्हा भुकंप झाला होता ,  तेंव्हा पण एकदा येणं झालं होतं इथे तेव्हाची आठवण झाली.. इथे काही फोटो पोस्ट करतोय.

आयुष्य

Written by  on January 8, 2009

पण सांग ना, जर मी गेले, तर तु पुन्हा लग्न करशील?

काहीतरी वेड्यासारखी बोलू नकोस. आधी लवकर बरी हो, नंतर बोलू.

पण सांग ना .. करशिल ना पुन्हा लग्न? खरंच सांग. थर्ड स्टेज ओव्हरीज मॅलिग्नंट कॅन्सरची पेशंट,किती दिवस तग धरणार अजुन? आज ना उद्या संपणारच सगळं.

नाही गं, तु बरी होशिल लवकरच. डॉक्टरांनी सांगितलंय कालच.

तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं. अरे मला पण समजतं, मॅलिग्नंट कॅन्सर म्हणजे काय . आणि डोळे बंद करुन पडुन राहिली.

तो विचार करत बसला होता. लग्नाला उणीपुरी २० वर्ष झाली .एकच मुलगा, तो पण यंदा १२वी ला. आज पर्यंतचं सगळं आयुष्य कसं अगदी चित्रातल्या सारखं रेखीव जात होतं. सुंदर बायको, हुशार अभ्यासु मुलगा, चांगली नोकरी. सकाळी उठल्याबरोबर बेड टी पासुन तर ऑफिसला जातांना, कपडे, रुमाल , पाकिट , टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी तयार असायच्या. एकही गोष्ट कधी शोधावी लागली नाही. थोडक्यात तिच्यावर घराची सगळी जबाबदारी टाकुन तो निर्धास्त होता. अगदी मुलाची शाळेची ऍडमिशन, वेळोवेळी होणारी पिटीएम ( पॅरेंट टीचर मिटींग) नेहेमी तीच अटेंड करायची. त्याची शाळा, अभ्यास, खेळणं या कडे तिचे कायम लक्ष असायचे. आज त्याला जाणवलं, आपल्या आयुष्यात तिचं स्थान अगदी ध्रुवा सारखं अढळ.

पण एक दिवस तिचे पोट दुखतं होते, आणि ब्लिडींग थांबत नव्हते म्हणुन डॉक्टरकडे तिला नेले. आणि त्या दिवसापासुन आयुष्याला एक वेगळंच वळण लागल. निरनिराळ्या टेस्ट्स केल्यावर डॉक्टरांनी डिक्लिअर केलं की कॅन्सर आहे, आणि तो पण मॅलिग्नंट! केमो ने थोडा आराम पडेल, पण पुर्ण बरे होणार नाही. तिला काही सांगितलं नाही, पण सुशिक्षित बायको असल्याचा तोटा म्हणजे तिला सगळं समजलं होतं.

तिने पुन्हा डोळे उघडले, तो समोरच तिच्या पलंगाशेजारी एका खुर्चीवर बसला होता, विचार करत होता कसला तरी. तिने पुन्हा त्याला तोच प्रश्न विचारला- मी गेल्यावर तु लग्न करशील ?

तिला काय उत्तर द्यावे हा विचार करत होता तो. खरं तर आता ह्या प्रश्नामुळे चिड येणं सुरु झालं होतं. अरे काय ही प्रश्न विचारते? काय बोलावं?

ती म्हणाली, मला ठाऊक आहे, तुझं काही “त्या” शिवाय होत नाही, तु नक्की दुसरं लग्नं करणार.

अगं पण तसं नाही,त्याने तिचा हात हातात धरला होता, माझं “त्या” शिवाय नाही, तर तुझ्या शिवाय होत नाही. तुझ्या शिवाय तर कोणाचा विचारही करु शकत नाही मी या आयुष्यात. तिने समाधानाने डोळे मिटले.

आणि दोनच दिवसांनी तिने प्राण सोडले.

आयुष्यात एकटेपण म्हणजे काय हे आता त्याच्या लक्षात आलं होतं. अंगावर उपरणं घेऊन तो स्मशानात उभा होता. समोर पिंड ठेवले होते.कावळा अगदी पिंडाभोवती उडत होता, पण चोच काही लावत नव्हता. दोन तास झाले.

त्याने ह्या दोन तासात तिची कुठली इच्छा पुर्ण व्हायची राहीली असेल ह्याचा विचार करत होता. मी पुन्हा लग्न करणार नाही, मुलाकडे नीट लक्ष देईन. असं म्हंटल्यावर तरी कावळा शिवेल असे वाटले होते पण नाही.

शेवटी त तो म्हणाला, जन्मोजन्मी माझे तुझ्यासोबतच लग्न व्हावे अशी माझी इच्छा आहे, मग तु अगदी अशी अर्ध्यातुन संसार सोडुन गेलीस तरीही माझी हरकत नाही.

आणि तो कावळा, जो पिंडासमोर बसला होता, त्याने त्या पिंडावर चोच मारुली आणि आजुबाजुचे इतरही कावळे त्या पिंडावर तुटून पडले..