शुभेच्छा

Written by  on October 28, 2008

परवाचीच गोष्ट आहे. निरजाच्या स्टेटस वर वाचलं की तिचा लग्नाचा वाढदिवस आहे. अर्थात तिने सरळ तसं लिहिलं नव्हतं, पण जे काही लिहिलं होतं, त्यावरून मी हा अर्थ काढला , आणि तिला सेल फोन वरूनच काँग्रॅच्युलेट करणारा  मेसेज टाकला. थोड्याच वेळात तिचं उत्तर आलं- कॉग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल??  बरं ही कॉमेंट वाचूनही माझ्या डोक्यात तसा काही प्रकाश पडला नाहीच. म्हंटलं,  तुझा आज लग्नाचा वाढदिवस आहे ना,  म्हणून मी अभिनंदन या शब्दाचं इंग्रजीत कॉंग्रॅच्युलेशन्स लिहीलं. सेल फोन वर मराठी टाइप करता येत नाही म्हणून इंग्रजी मधे.

त्या नंतर एक-दोन दिवसानंतर तिचा एक मेसेज आला, त्यात लिहिलं होतं “शुभेच्छा” आणि माझी एकदम ट्युब पेटली- अरेच्या.. तिचा लग्नाचा वाढदिवस, आणि मी वेड्यासारखं अभिनंदन काय करतोय?

शुभेच्छा देतांना पण आपण इतक्या मेकॅनिकल पद्धतीने देतो की आपण कुठला शब्द वापरतोय, आणि त्याचा काय अर्थ निघेल  या कडे आपले लक्षच नसते.  बरेचसे शब्द असेच नकळत वापरले जातात- नको त्या ठिकाणी.  आपण अजिबात विचार न करता त्या क्षणी आठवेल तो शब्द लिहत असतो. म्हणजे याचा  अर्थ आपण मनापासून शुभेच्छा देत नाही असा होतो का?  नाही तसे नाही वाटत मला.

ही अशी चूक बरेचदा  केल्या गेलेली दिसते.  आता हेच पहा नुकतीच एक बातमी वाचली, ” जगदीश खेबुडकर यांचे दुःखद निधन” – आता हे सांगा, की निधन हे  कोणाचेही असो, नेहेमीच दुःखदच   असते, तेंव्हा ’दुःखद’ निधन हा शब्द वापरायची गरज खरंच आहे का? आणि नंतर पुढे  दळण दळल्या सारख्या  “मृतात्म्यास शांती  देवो , त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, एक सुन आणि बारा नातवंडं असा परिवार आहे”अशाही ओळी लिहिलेल्या  असतात. कोणी  मृत्यु झाला की , कधीही भरून न येणारी  पोकळी निर्माण होते ( कुठे??? ) मला वाटतं की पेपरवाल्यांचा बातमीचा फॉर्मॅट पक्का असतो, फक्त मधली नावं बदलली की झालं ! बातमी छापायला तयार!

कोणीतरी एक जण बझ  किंवा फेसबुक वर एक पोस्ट टाकतो, आणि इतर सगळॆ जण मृतात्म्यास शांती मिळो म्हणून खाली कॉमेंट टाकतात . ब्लॉग वर पण असंच काहीतरी पोस्ट लिहीण्याची टूम निघाली आहे.  ( मी पण असे  एक दोन पोस्ट्स टाकले आहेत पूर्वी) 🙂

” मृतात्म्याला शांती देवो”  वाचलं, की  मला एक प्रश्न नेहेमी पडतो- ’आत्मा ’हा ’मृत’ कसा  काय होईल बरं?  मृत शरीर असतं आत्मा नाही. आणि जरी समजा मान्य केलं , की आत्मा मृत झाला, तर मग  त्याला शांती कशाला हवी  ?  कोणाचा मृत्यु झाला की अशी ठरावीक वाक्य बोलायची पद्धत आहे. काही शब्द उगाच   आहेत म्हणून वापरायचे असा  प्रघात पडलेला आहे.

मौंजी मधे तर बटूला शुभाशीर्वाद देण्याची पद्धत आहे. आता आशीर्वाद हा ’शुभच’ असतो नां?? मी आजपर्यंत कोणी कोणाला  ’वाईट’ आशीर्वाद दिलेला ऐकला नाही, मग ’शुभाशीर्वाद’ लिहीण्याची खरंच काही गरज आहे का ? नुसता  आशीर्वाद लिहीला तरी पुरेसा आहे.

लग्नाच्या शुभेच्छा देणाऱ्यांचे दोन गट असतात- एक म्हणजे लग्न झालेले, जे म्हणत असतात की चला बरं झालं, सारखा ट्रेकिंग काय, भटकणं काय … सुरु असायचं आता, आता लग्न झालं की हा पण आपल्यासारखाच होणार म्हणून आनंदी होणारे,  आणि दूसरे म्हणजे  लग्न न झालेले ” च्यायला, साली मजा आहे याची आता,मस्त, बायको येईल , छान छान पदार्थ करून खाऊ घालेल आणि इतर मजा तर आहेच” असं म्हणणारे  ( घी देखा लेकीन बडगा नहीं देखा या प्रकारातले )लोकं. लग्नात विश यु हॅप्पी मॅरीड लाईफ म्हणून शुभेच्छा देण्ण्याचा प्रघात आहे. आता लग्न केलं ते काय दुःखी व्हायला का??  सुखी रहायलाच लग्न केलंय की राव, मग ह्या कसल्या शुभेच्छा?

एखादी  आजी  ’नांदा सौख्य भरे” म्हणून  तोंड भरून आशीर्वाद देतात तेंव्हा त्यांच्या वैवाहिक  आयुष्यातल्या सगळ्या कडू गोड घटनांचा पाढा त्यांच्या नजरेसमोरून जात असेल  , आणि   आपण  स्वतः किती आनंदाने , सौख्यभरे  नांदु शकलो  ते  आठवत  हळूच पदराने डोळे टिपते,   यावर माझ्या बायकोच्या कवितेच्या दोन ओळी  लिहीतो..

“मग हळूच उघडला तिच्या ह्र्दयातला चोर कप्पा…..
बिलोरी वर्खाच्या त्या कप्प्यात….
होत्या खूप आठवणी
आठवली तिला गमतिची स्वतःची लग्नानंतरची पाठवणी
आयुष्यातल्या बेरजेचा न चुकता हिशेब सांगत होती….
जिवनाची वजाबाकी मात्र डोळ्यांच्या कडातुन सांडत होती”

३१ डिसेंबर पासूनच शुभेच्छा देणारे एसएमएस सुरु होतात. दुपारी तीन वाजता एसएमएस येतो, की अजून ९ तासांनी नवीन वर्ष सुरु होणार आहे, आणि मी तुला पहिला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ( हार्दिक म्हणजे काय विचारू नका राव!) देणारा पहिला असावा, म्हणून तुला हा मेसेज पाठवलाय. वाह, क्या बात है,  असा मेसेज पाहिला की मला तर एकदम भरून येतं- 🙂  बरं  ह्या व्यतिरिक्त  कमीत कमी २००-२५० लोकं तरी शुभेच्छांचे एसएमएस पाठवतात. इतके मेसेजेस आल्यावर सगळ्यांना आपल्याला पटत असो किंवा नसो, सामाजिक बांधिलकी म्हणून  प्रत्युत्तर पाठवावेच लागते . मग एकाची टॊपी दुसऱ्याला या उक्ती प्रमाणे एकाचा मेसेज दुसऱयाला, दुसऱ्याचा तिसऱयाला अशा प्रकारे आपणही या मेसेजेसच्या खेळीमधे अडकले जातो- शेवटी फायदा होतो तो सेलफोन कंपन्यांचा.

तरूणांमधे अजूनही कार्ड देण्याची क्रेझ  आहेच. आर्चीस चे कार्ड्स तर लग्न होण्यापूर्वी बरीच वर्ष आणि झाल्यावर पहिल्या वर्षी तरी  नक्कीच वापरले जातात.  😉 नंतर मग ’जाने कहां  गये वो दिन… ’  असं होतं- किंवा जर कौतुकाने बायको साठी  कार्ड  आणलं, तर आधी उलटं करून आर्चीस चं आहे का ते पहाणार, आणि मग आतला मजकूर वाचणार, आणि मग जर  समजा, ’आर्चीसचं’ असेल तर कशाला तू उगाच शंभर रुपये खर्च केलेस? त्या पेक्षा आईस्क्रिम आणलं असतं  तर……. असं म्हणणार………….! 😀 😀

नवीन वर्ष!!काही लोकं आवर्जून हा मेसेज पाठवतात, की आम्ही हिंदू  आहोत, आणि आमचे नववर्ष  गुढीपाडव्याला सुरु होते,आणि म्हणून आम्ही शुभेच्छांची देवाण घेवाण करत नाही. असा मेसेज पण बऱ्याच लोकांच्या फेसबुक स्टेटस वर दिसतो.  हे असं लिहील्याने काय साध्य होते तेच मला समजत नाही. जर तुम्हाला लोकांनी”नववर्ष सुखाचे जावो” म्हणून शुभेच्छा  दिल्याच, तर  अंगाला काय भोकं पडणार आहेत का? नाही ना? मग त्या शुभेच्छा सेव्ह करून ठेवा आणि मग गुडीपाडव्याला पुन्हा एकदा वाचा नां… किंवा फारच झालं, तर आलेल्या शुभेच्छा, तर डीलीट करून टाका. हे असे संदेश स्टेटस वर टाकून खरंच काय मिळवलं जातं ? जग जर मानत असेल तर ठीक आहे… मानू द्या नां!!मी स्वतः आर एस एस चा आहे, तरी पण हे इथे लिहतोय !मुळातच आपण उत्सवप्रिय आहोत. कुठलाही प्रसंग आपल्याला सिलेब्रेशन साठी चालतो.

बरं एक जानेवारीला नववर्ष झालं, की पुन्हा मग गुढीपाडव्याला पुन्हा शुभेच्छांची देवाण घेवाण होतेच, नंतर बलीप्रतीपदेला पुन्हा एकदा, व्यापाऱ्यांचे नवीन वर्ष म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातातच . अरे किती वेळा नववर्ष साजरे करायचे?? काही लिमीट आहे की नाही?? जर तुमचे कोणी इतर मित्र मैत्रीण असतील,तर पटेटी -पार्सी नव वर्ष,   वगैरे आहेतच.  ३१ मार्च नंतर एप्रील मधे पुन्हा नवीन फायनान्शिअल इयर सुरु झालं म्हणून शुभेच्छा देणारे इ मेल्स येतात. अरे  किती वेळेस नववर्ष साजरं करायचं हेच मला समजत नाही.

जयंती आणि पुण्यतिथीबाबतही शुभेच्छा देण्याची पण पध्दत निघाली आहे. जो माणूस जायचा तो गेला. खूप मोठा माणूस होता, त्याने सामाजिक कार्य पण केले, जिवंत असतांना त्याचा खूप लौकिक होता  , पण अजूनही  जयंतीच्या शुभेच्छा कशाला ? एखाद्याला सहज विचारून पहा जयंती म्हणजे काय ते? माहीत नसेल!

हॅपी बर्थ डे, किंवा मेनी मेनी हॅपी रीटर्न्स ऑफ द डे या घासून घासून गुळगुळीत झालेल्या शुभेच्छांच्या ओळी खरंच जर मनापासून दिल्या ना, तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. माझ्या मते वाढदिवस म्हणजे आयुष्यातले एक वर्ष संपले, कमी झाले, याची आठवण करून देणारा दिवस , किंवा आज डायटींग विसर आणि भरपूर केक खा म्हणून सांगायचा दिवस- आणि त्याच बरोबर आता तू मोठा झालास, सुज्ञ झालास, थोडं वैचारिक उत्थापन ( शब्द बरोबर असावा) होऊ दे तुझं. जरा बाष्कळ विनोद करणं बंद कर, वयाप्रमाणे वागत जा.. हे सगळं सांगणारा दिवस! या दिवशी मात्र आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येकाला आपण शुभेच्छा या द्यायलाच हव्या असे माझे प्रामाणिक मत आहे. पण नेमकं इथे पण लोकं शुभेच्छा देण्याचा कद्रुपणा करतांना दिसतात.

काही लोकांना कुणाचा हात किंवा पाय फ्रॅक्चर झाला की खूप मजा वाटते. मग त्याला भेटायला गेल्यावर त्याच्या प्लास्टर वर गेट वेल सुन, एक स्मायली, वगैरे काढतात. इतपत शुभेच्छा देणे असेल तर ठीक आहे, पण जेंव्हा कोणी आजारी पडतो , आणि त्याला दवाखान्यात ऍडमीट केल्यावर भेटायला गेले, की त्यांच्या कोणातरी जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला तरी हाच रोग झालेला असतो आणि तो जेंव्हा सांगतो की  ” आमच्या काकांचं पण असंच झालं होतं” आणि ते  आठच दिवसात गेले बरं का” तेंव्हा हा माणूस शुभेच्छा द्यायला आला, की मानसिक त्रास द्यायला असा संशय येतो..

हे सगळं वाचल्यावर आता खरंच ह्या शुभेच्छांना आवरा म्हणायची वेळ आलेली आहे असे वाटते की नाही?  जर द्यायच्या असतील तर खरंच फोन करा, मनापासून शुभेच्छा द्या.. अशा वर वरच्या नकोत..

(संदर्भ :- मित्राशी मारलेल्या गप्पा )

तयारी…

Written by  on October 12, 2008
मुंबई, पोलीस, तयारी, पावसाची, काय वाट्टॆल ते,kay vatel te, kayvattelte, marathi, mahendrakulkarni

मुंबई पोलीसांची पावसाळ्याला फेस करायची तयारी

परवाच मालाड वेस्ट ला बाटा च्या शेजारी मुंबई पोलिसांची पावसाला तोंड देण्याची   तयारी पुर्ण झालेली दिसली. खरं तर पोलीसांची तयारी म्हणजे काय असायला हवी?   रेनकोट आणि गम बुट – पण तसं नाही .मुंबई पोलीसांनी    तत्परतेने पाऊस येण्यापुर्वीच पुढे दिलेला बोर्ड बनवून ठेवलाय,  पाऊस पडला  आणि झाला सबवे बंद की हे बोर्ड सगळ्या रस्त्यांवर लावायचे झालं.:)

मालाड सबवे ला महापालीकेने लावलेला एक पंप तिथे  लावलेला दिसत होता. या पंपाकडे पाहिल्यावर हा पावसाळ्यात चालेल का? असा विचार सहजच मनात आला. महापालीकेवरच्या विश्वासाची पातळी इतकी कमी झालेली आहे हल्ली, की तिच्या कुठल्याही कामात काळंबेरं दिसत असतं मला.

मालाड सबवेचा पंप

त्या पंपाचे काम काय ? तर  तिथे साचलेले पाणी उचलून मग जवळच्याच अर्धवट बुजलेल्या नाल्यात (कारण तो स्वच्छ केलेला नाही अजूनही) सोडले जाते. नाला अर्थातच पावसाच्या पाण्याने दुथडी भरून वाहात असतो ! तेच पाणी पुन्हा  परत सबवे कडे वाहात येत असतं. काय फायदा त्या पंपाचा? असे कठीण प्रश्न विचारू नका हो..  तर ही अशी तयारी!

असे कचऱ्याचे ढीग अजूनही पडून आहेत.महापालीकेने मुंबईच्या नाल्यांची सफाई करून   त्यातला गाळ, प्लास्टीक कचरा वगैरे काढला आहे , आणि पावसाचा जय्यत सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत असे परवाच मुंबईच्या महापौर म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यावर काहीच आक्षेप नाही कारण मी स्वतः नाल्यांच्या  काठावर काढून ठेवलेला गाळ गेले महिनाभर  पहातोय. बहुसंख्य प्लास्टीक पिशव्या असलेला हा गाळ नाल्यांच्या शेजारीच पडून आहे  . परवा कचरा नेणाऱ्या ट्रकवाला दिसला, त्याला विचारलं की तू हा गाळ का नेत नाहीस, तर म्हणाला की त्याचं काम हे केवळ घरगुती कचरा नेण्याचं आहे, या साठी वेगळं डीपार्टमेंट आहे, त्यांना सांगा. काय बोलणार?

अजूनही तो कचरा तसाच पडून आहे- फक्त त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याची उंची कमी झालेली आहे- त्या ट्रकवाल्याने उचलून नेल्यामूळे नाही,तर  तो गाळ आणि कचरा पावसाच्या पाण्याने पुन्हा वाहून नाल्यात गेल्यामूळे.  आता पुन्हा महापालीका लोकांना प्लास्टीकचा  कचरा वापरणे कमी करा म्हणून सांगायला मोकळी.जय हो!

मॅन होल कव्हर्स. चक्क प्लास्टीकचे आहेत. बहुतेक सगळेच तुटलेले दिसत होते.

ऐरोलीला  काही काम होतं त्या साठी  इस्टर्नएस्कप्रेस हायवे वरुन ऐरोली पुलावरून उजवा टर्न घेतला आणि ब्रिज पार केला. एका मित्राच्या घरी जायचं होतं. लोखंडी गटारीची झाकणं चोरीला जातात, म्हणुन सिमेंटची झाकणं वापरलेली आजपर्यंत बरेचदा पाहिली होती, पण  ऐरोलीला मात्र मी  फोटोमध्ये दिलेली   प्लास्टीक ची   झाकणं दिसली. एका झाकणावर पाय पडला, तर तुटल्यामुळे ते चक्क आत शिरलं, आणि गटारात पडता पडता वाचलो. इथली ही अशी  अवस्था पाहिली आणि जाणवलं की   पावसाळ्यात जर पाणी साचलं तर  हे मॅन होल एखादा बळी नक्कीच घेईल.

या सगळ्या गोष्टी आजकाल मी सहज पणे सहन करायला शिकलो आहे. फारशी चिडचिड होऊ न देता मी शांतपणे त्या तुटक्या मॅनहोलला वळसा घालून मित्राच्या घरात शिरलो.

mumbai slum in rainy season,धारावी, झोपडपट्टी,माहिम

मुंबई झोपडपट्टी- धारावी

परवाचीच गोष्ट  आहे , हैद्राबादहून येतांना विंडॊ सिट वर होतो. विमानातून मुंबईला लॅंड करतांना सहज बाहेर पाहिलं, तर सगळी धारावी  निळी दिसत होती. बऱ्याच घरांवर  निळं प्लास्टीक टाकलेलं दिसत होतं- घरात  पाणी गळू नये म्हणून ही पण एक तयारी पुर्ण झालेली दिसत होती.

घरी आल्यावर प्रत्येकाची छत्री  दुरुस्ती मोहीम, रेनकोट वगैरे किंवा रबर बुट खरेदी करण्याची घाई सुरु  झालेली होती. पण हे सगळं आधीपासून करणं होत नाही, तर चांगला दोन तिनदा पाऊस पडून गेल्यावर  पावसात भिजल्यावरच हे काम करण्याचं  शहाणपण सुचतं.

सगळे जण आपापल्या पद्धती प्रमाणे  तयारी करतात –  एक गोष्ट बाकी नक्की,्साचलेलं पाणी,  रस्त्यावरचे खड्डे, ट्राफिक जाम, लोकल लेट, ्छत्री मधून भिजलेल्या ओल्या अंगाने केलेला प्रवास, आणि अजून बरंच काही.. . मुंबईकरांच्या सहनशीलतेची कमाल आहे यात काही संशय नाही.स

घर पहावं बांधुन

Written by  on October 6, 2008

असं म्हणतात, की घर पहावं बांधून.. मगच खरा प्रॉब्लेम काय ते कळतं. एकदा हा प्रयोग केला होता, नागपुरला असतांना. घर बांधण्याचा. त्या वेळेस सगळा अनुभव घेतला होता. म्हणून बरेच वर्षांपूर्वी मुंबईला बदली झाल्यावर पण आज पर्यंत कधी घर बांधायचा विचार डोक्यात येऊ दिला नाही. अर्थात, सध्या रहात असलेलं मोठ्ठं घरं ( अहो ११०० स्क्वेअर फुट म्हणजे मोठच मुंबईच्या हिशोबाने) अर्थात कंपनी अकोमोडेशन असल्यामुळे कधी आवश्यकता वाटलीच नाही.दुसरं म्हणजे सौ. आणि मुली इथे इतक्या छान सेट झालेल्या होत्या, की असं वाटलंच नाही की इथे घर घ्यावं विकत. दुसरं म्हणजे असंही वाटत होतं की ,इथून बदली झाली तर मग काय करणार.. ? पण आज जाणवतंय हा निव्वळ मुर्खपणा होता माझा.. आ्धीच घर घ्यायला हवं होतं इथे..!

प्रत्येक मिडलक्लास माणसाची  ( मी जरी एच आय जी मधे अप्लाय केलेला असला, तरीही मी मिडलक्लास मधेच मोडतो बरं कां!) एक इच्छा असते, की आपलंही एक घर असावं. आणि हे स्वप्न पुर्ण करायला तो मग कांहीही करायला तयार असतो. वेळप्रसंगी घरातलं सोनं, सेव्हिंग्ज, स्टॉक्स सगळं कांही पणाला लावतो. हे स्वप्न पुर्ण होणं पण इतकं सोपं नसतं. मग सुरु होतं, विरारला, किंवा बोइसरला घर घ्या.. आणि आयुष्यातला बराचसावेळ ट्रेन ट्रॅव्हल मधे घालवा. मग ठाणे जिल्ह्यात घर घ्यायचं.. हा एकंच उपाय उरतो. हल्ली तर विरार, वसई ला पण ्खूपच जास्त रेट्स झालेले आहेत. अर्थात, आता या रेसेशन मुळे ४० टक्के रेट्स कमी झालेले आहेत.पण तरीही तिकडे घर घ्यायची इच्छा होत नाही. खाईन तर तुपाशी नाहितर उपाशी अशी मेंटॅलिटी आहे माझी  .म्हणजे घर घेईन तर ठाणे पर्यंत, किंवा इकडे बोरिवली पर्यंत..असं पक्कं ठरवलंय मनाशी.

या इलेक्शन मुळे स्टॉक मार्केट अगदी पॉझिटिव्ह स्विंग घेतोय. त्यामुळे असंही वाटतं की इन्फ्रास्ट्रकचर किंवा बिल्डर सेगमेंट्स ला पण आता चांगले दिवस येतील  .म्हणजे अजुन भाव जर वाढले तर मग पुन्हा लांबणीवर टाकावे लागेल.

पण आत्ताच साधारणतः दोन  महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा मी कारने ऑफिसला जात असे. माझ्या बरोबर परत येतांना एक गुजु मित्र असायचा. तो सहज म्हणाला, कमसे कम अप्लाय तो करो.. म्हाडा का ऍड आया है… म्हणाला, कल सवेरे किसिको भेजके फॉर्म मंगा लेते है..

आणि एकदाचा फॉर्म आला.  या मित्रामुळे स्टॉक मार्केट मधे  बरेच पैसे कमावले. अगदी राइट टाइम सजेशन मुळे मार्केट क्रॅश होण्यापूर्वी  बराचसा स्टॉक विकून टाकला होता, त्या मुळे मार्केट क्रॅश चा फारसा परिणाम झाला नाही माझ्यावर.  त्यामुळे ह्या मित्राचं सजेशन मी अगदी सिरियसली घेतो.. स्पेशिअली फायनानशिअल मॅटर्स मधे.

पुर्ण फॉर्म वाचून बघितला, आणि विचार केला की कमीत कमी दोन ठिकाणी अप्लाय करु या, म्हणजे चान्सेस ड्बल होतिल सिलेक्शनचे. मी त्याला म्हंट्लं, मै तो लॉटरी मे बहुत अनलकी हूं.. पण त्याच्या इनसिस्टंन्स वर दोन फ्लॅट्स बुक केले.. सायन, आणि सहकार नगरचे!

आज म्हाडाचा रिझल्टं. सकाळपासुन बेचैन वाटतंय.अगदी दुपारपासुन इतका अनिझी आहे, की सारखा नेटवर कांही दिसतंय कां ते शोधण्यात वेळ घालवतोय. आजच नेमकी म्हाडाची वेब साइट आउट ऑफ ऑर्डर!! बोंबला… काय करणार?? इतकं बीपी वाढतंय.. काय करावं?? शेवटी  शेवटचा उपाय म्हणून माझ्या काकाला फोन केला.. त्याला पण कांहीच माहिती नव्हती, म्हणाला , रात्री चेक कर साईट..   …आता काका ला का फोन केला? ते जाऊ द्या.. असं समजा की त्याचा बराच वट आहे मुंबईत.. अरे काय हे… तो काही भाई वगैरे नाही हं……. तुमच्या मनातले विचार मी ओळखले म्हणून इथे एक्सप्लेन केलंय..

घराकरता अर्ज तर केलाय. पण पैशाची सोय केलेली नाही. म्हंटलं, जर नंबर लागला  तर पाहू  या काय करायचं ते.म्हणजे मग दुसरं टेन्शन सुरु होणार ! अर्थात आपली माय बाप एस बी आय आहेच ना लोन द्यायला….

अजूनही बसलो आहे टीव्ही पुढे, पण स्टार माझा वर सारखे दहिसरच्या साईटचे नंबर्स दाखवताहेत. असं कळलं की अजूनही लॉटरी काढणं सुरु आहे. म्हणजे आता सरळ झोपावे, म्हणजे सकाळी ऊठून पहाता येइल म्हाडाच्या साईट्वर.. काय झालं ते.. म्हणजे ’निकाल’ लागला की आपला निक्काल लागलाय सोडतीत ….

गुजगोष्टी

Written by  on October 2, 2008

गुजगोष्टी हा शब्द जरा नवीन वाटत  असेल, कारण हल्ली हा शब्द फारसा वापरात नसतो,पण पूर्वीच्या काळी मात्र हा शब्द भरपूर वापरला जायचा.    एकत्र कुटुंबात मुलगी लग्न होऊन आली, की मग  हातावरच्या मेंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच घरातल्या कामामधे गुंतून जावे लागायचे.  दळण, कांडण, वडिलधाऱ्या  आजारी लोकांची सेवा, आणि  दिवसभर घरातल्या मोठ्या बायकांच्या हाताखाली काम केल्यावर मग रात्री सगळं आवरून झोपायला गेल्यावरच नवऱ्याला भेटायला  चान्स मिळायचा.

त्या काळी दिवसभर नवरा नजरेसमोर जरी दिसला, तरीही त्याच्याबरोबर घरातल्या वडिलधाऱ्या व्यक्तीं समोर बोलणे म्हणजे वडिलधाऱ्यांचा अपमान/ उद्धटपणा  समजले जायचे, त्यामुळे नवरा समोर दिसला तरीही नजर खाली घालून हलकेच एखादा तिरपा कटाक्ष.. बस्स .. ह्यातच काय तो रोमान्स वगैरे काय ते समजा. सारखे एकमेकांशी बोलण्याची इच्छा होणे अगदी साहजिकच नाही  का? पण तशी संधी मिळणे दुरापास्त असायचे, आणि म्हणूनच मग रात्र झाली की मग   नवऱ्याच्या कानाशी गुजगोष्टी करण्याची  संधी बायको सोडत नसे.

तर या गुजगोष्टी कशा असतात?  विनोद म्हणून वाचाल तर विनोदी, नाही तर जीवनाचे सार सांगणारा हा  तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तो खाली देतोय.

भ्रतारेसी भार्या बोले गुजगोष्टी- मन ऐसी कष्टी नाही दुजी,
अखंड तुमचे धंद्यावरी मन, माझे तो हेळण करती सर्व.

जोडितसा तुम्ही, खाती येरे चौरे, माझी तर पोरे हळहळती,
तुमची व्याली माझी  डाई हो पेटली, सदा दुष्ट बोली सोसवेना,

दुष्ट वृत्ती नंदुली  सदा द्वेश करी , नांदो मी संसती कोणामुखे
भावा दीर काही, धड ना हो बोले, नांदो कुणा खाले कैसी आता

माझ्या अंगेसंगे तुम्हासी विश्रांती, मग धडगती नाही तुमची

वेगळे निघता संसार करीन, नाही तरी प्राण देते आता
तुका म्हणे जाला कामाचा अंकीत, सांगे मनोगत तैसा वर्ते

ह्या अभंगात बघा, ही स्त्री   नवऱ्याला    कशी काय  आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न करते ते , खूप  उत्कृष्ट पणे सांगितलेले आहे.  ती स्त्री पण खूप हुशार आहे, सुरुवातीला नवऱ्याचे आपल्या बोलण्याकडे लक्ष वेधले जावे म्हणून आधी त्याच्या कामाची तारीफ करते आहे. ते ऐकल्यावर मग त्याच्याकडे घरातल्या कामाची/त्रासाची जंत्री वाचून दाखवते. म्हणते, की  सासुरवास, जाऊबाई, नणंद, सासूबाई सगळे जण मला बोलतात,  नणंद तर नाक मुरडते, भावा -दीरांना तर बोलावेसे पण वाटत नाही माझ्याशी – आणि तुम्ही! तुम्हाला तर माझ्याकडे बघायला पण वेळ नाही! नंतर शेवटी हळूच आपल्या मनातला खरा विचार समोर आणते, म्हणते,   आपल्याला जर सुखाने संसार करायचा असेल तर वेगळं राहिले पाहिजे.  जेंव्हा नवरा अजिबात काही बधत नाही हे लक्षात आल्यावर मग ती मात्र आपले शेवटचे ठेवणीतले अस्त्र काढते, आणि म्हणते, ” मी जीव देईन आता, जर वेगळं झालं नाही तर!”

सुरुवाती- लाडीगोडी, नंतर – तक्रार, शेवटी – धमकी! किती हुशार आहे ती स्त्री नाही का?  इतका वेळ नवरा शांतपणे ऐकत  असतो, पण आता मात्र कामातूर झालेला तो नवरा  कसेही करून तिला खुष करण्यासाठी कोणकोणती आश्वासने देतो ते  तुकोबारायांनी    एका अभंगात  लिहून ठेवलेले आहे- तो खाली देतोय अभंग….

सकाळी उठोनी वेगळा निघेन, वाहतो तुझी आण निश्चयेसी
वेगळे निघता, घडीन दोर चुडा, तू तर माझा जोडा जन्मवरी

ताईत साखळी गळाची दुलडी, बाजूबंद जोडी हातसर
वेणीचे ते नग सर्वही करीन, नको धरू शीण मनी काही,
नेसाया साडी सेलारी चुनडी, अंगीची काचोळी जाळिया फुले

तू तर माझी जन्माची साथीदार आहेस, मी उद्या सकाळी उठलो की तुला निरनिराळे अलंकार , सोन्याची बांगडी, बाजूबंद, हात सर , वेणीचे दागीने, सेलोरी चुनरी ( कदाचित त्या काळच्या साडीचे नाव असावे)  घेऊन देईन. आता इतकी आश्वासने दिल्यावर ती पाघळली नसेल तरच नवल. म्हणूनच शेवटचे वाक्य म्हणजे तुकोबा म्हणतात,

तुका म्हणे केला रांडेने गाढव, मनासवे धाव घेतलीसे.

मला वाटतं की हे उपहासात्मक रुपक वापरले आहे इथे. संसारात गुंतलेल्या माणसाची अशीच अवस्था होत असते. “रांडेने केला गाढव, “या चरणात, विनोद, उपहास भरलेला आहे .

तर इथे गुजगोष्टी फक्त नवराबायकोच्या नसतात , तर त्या दोन स्त्रियांच्या पण असू शकतात. दोन (गडणी – मला वाटते गडी म्हणजे पुरुष म्हणून गडणी हा शब्द स्त्रियांसाठी वापरला असावा )समदुःखी स्त्रिया आपली करूण कहाणी एकमेकींना सांगून स्वतःचे दुःख हलके करू पहाताहेत. तो अभंग असा आहे..

होनवर तीजवर दोघी त्या गडणी, अखंड कहाणी संसाराची,
माझा पती बहू लहानची आहे, खेळावया जाय पोरासवे,

माझे दुःख जरी ऐकशील सई, म्हातारा तो बाई खोकतसे,
वेळे सांजवरी बाहेरी तो राहे, वाट मी वो पाहे सेजेवरी.

पूर्व पुण्याई माझी नाही बाई नीट, बहू होती कष्ट सांगो बाई
जवळ मी जाते, अंगा अंग लावू, नेदी जवळ येऊ कंटाळतो.

केवळ सहा ओळींचा हा अभंग    समाजाला अभिप्रेत असलेल्या   स्त्री पुरुषांमधील   संबंधांवर उजेड टाकतोय- कसा ते बघा.  बाल विवाह, बाल जरठ विवाह , हे त्याकाळी अगदी कॉमन होते. जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य स्त्री ला कधीच नसायचे. मग वडील म्हणतील त्या बिजवर, तिजवराला माळ घालायची आणि पुढे मग जे काही होतंय ते केवळ “पूर्वसुकृताचा ठेवा” म्हणून मान्य करतांना दोन्ही स्त्रिया दिसतात. अभंग खूपच सोपा आहे, म्हणून जास्त विश्लेषण करत नाही. असो.होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रारब्धाला दोष द्यायचा ही   मनोवृत्ती  मनाला खूप चटका लावून जाते हे मात्र नक्की.

गुजगोष्टींच्या हलक्या फुलक्या पोस्ट ला इतक्या सिरियस वळणावर  नेऊन संपवायचे नव्हते, पण, जीवनाचा तो पण एक भाग आहेच, तेंव्हा टाळता येत नाही हे नक्की.आजकालच्या दिवसात गुजगोष्टी एकत्र कुटुंबपद्धती सोबत  तशा संपल्यातच जमा झालेल्या आहेत , कारण समाजात मोकळे पणा आलाय हल्लीच्या काळात.बायकोला नवऱ्याशी बोलायला रात्र होण्याची वाट पहावी लागत नाही 🙂  तरी  पण आजही ह्या अभंगात जे काही दिलेले आहे, ते लागू पडते .  खूप दिवसांपासून ठरवले आहे की एकदा तुकारामाची गाथा वाचायची  म्हणून . बघू या कधी जमतं ते.,