ओठातलं.. मनातलं…

Written by  on September 30, 2008

तुझं माझं जमेना, तुझ्या वाचुन करमेना…

 

ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नवीन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नवीन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे   पुरुषांचा  नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा  वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट अर्थ सगळ्या पुरुषांना समजेल, आणि गैरसमज ,तसेच नवीन दांपत्यांच्यामधली भांडणं दुर होतील   असे तज्ञांचे मत आहे.

यावर काही लोकांचं म्हणणं असंही होतं की काही एक फरक पडत नाही..समजलं काय किंवा न समजलं काय.. शेवटी पुरुषांना करावं तर स्त्रियांच्या   मना सारखच  ना?? तरी पण ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वतीने सगळ्यांना जर काही असे शब्द माहीती असतील, की ज्यांचा पुरुषाने वापरल्यास  ’लौकिक अर्थ’ असतो, पण स्त्रियांनी वापरल्यावर ’गर्भीत अर्थ’ असतो.. असे शब्द कृपया कॉमेंट्समधे लिहावेत, म्हणजे  ऑक्सफोर्डला फॉर्वर्ड करता येतील- गर्भित अर्थाच्या डिक्शनरी साठी. एक इ मेल आला होता, त्यावरुन सुचलं हे पोस्ट.

नीटसं कळलं नाही कां?? काय म्हणणं आहे माझं ते?  इथे एक लहानसा अनुभव लिहितो, म्हणजे लक्षात येईल. आम्ही ( मी , सौ. मुली) डिमार्टला किराणा सामान (म्हणजे आपली ग्रोसरी हो)  घ्यायला संध्याकाळी गेलॊ होतो. आता सगळं महिन्याभराच सामान घेउन , नंतर रांगेत उभं राहुन पैसे भरायला रात्रीचे ८-३० झाले म्हंटल, आपण आता हॉटेलमधेच जेवायला जायचं कां?? तर यावर उत्तर  होतं.. नको.. मी घरी गेल्यावर छान (?) गरम खिचडी लावते …आता जर तुम्हाला  खिचडी आवडत नाही हे माहिती आहे , म्हणजे याचा गर्भितार्थ  हो असा घ्यायचा आणी सरळ हॉटेलसमोर गाडी पार्क करायची. डिक्शनरीतर्ला पहिला शब्द:- नको = हो  आणि हो म्हणजे नाही

दुकानात गेल्यावर, अहो आपल्याला नवीन चादरी  घ्यायच्या आहेत  ना?? आता चादरी, नवीन काय , किंवा जुन्या काय, तुम्हाला काय फरक पडतो? पण  ‘आपल्याला’  हा शब्द पहा किती चपखल पणे वापरलेला आहे.. याचा अर्थ घ्यायचा असा… (आपल्याला = तिला ) म्हणजे तिला नवीन चादरी घ्यायच्या आहेत, आणि बेटर यु से येस.. ..हो ’ आपल्याला’ घ्यायच्याय  ..  🙂

एखाद्या विषयावर तुम्ही सगळ्या नातेवाईकां समोर/ किंवा मित्र मैत्रीणींमधे जर  काही  तरी बोललात,  की जे बोलायला नको होतं, आणि …. ’आपण एकदा यावर व्यवस्थित बोललं पाहिजे’.. असं तिने कधी म्हट्ल तर याचा अर्थ होतो की थोडा थांब, पाहुणे गेले की तू आहेस आणि मी आहे….माझ्या मनात बरंच काही खदखदतय.. आणि तु ज्वालामुखी फुटणार आहे याच्या तयारीत रहा..  खूप कम्प्लेंट्स आहेत माझ्या- य़ू बेटर बी प्रिपेअर्ड…  🙂

कधी भांडण झालं नेमकं, तुमचं बरोबर आहे, म्हणून तुम्ही अगदी तावातावाने भांडताय, आणि नंतर हत्यार टाकल्या प्रमाणे पण आवाजात जरब आणून जेंव्हा ती  “बरं…. मी सॉरी… आता सॉरी म्हंटलं नां… बस्स.. विषय संपला….. असं म्हणते तेंव्हा याचा अर्थ ’ बच्चमजी मला कोंडीत पकडतोस काय? यु विल बी सॉरी फॉर   धीस, आय विल सी दॅट यु विल रिपेंट धीस….   असा घ्यायचा असतो..

एखाद्या वेळेस दुकानात गेल्यावर तिने पसंत केलेली ती मातकट रंगाची साडी नाकारून तुम्ही दुसरी  एखादी सुंदर ( तुमच्या मते )  साडी ( कधी नव्हे ते.. ) पसंत करता.. आणि तुला ही छान दिसेल गं, घेउन टाकू या आपण ही.. असं मोठ्या प्रेमाने म्हणता, पण तेवढ्यात तिच्या चेहेऱ्यावरचे निर्विकार भाव पाहुन तुम्ही दुसरं काही म्हणण्यापूर्वी..  ’छान आहे..तुमची आवड ’ असं  म्हंटलं की मग समजायचं की तिला ही साडी बाईसाहेबांना आवडलेली नाही.. 🙂 आणि मुकाट्याने खाली टाकुन द्यायची…

बरेचदा तुम्ही तिच्या बॉडी लॅंग्वेज कडे दुर्लक्ष करुन,किंवा लक्षात न आल्यामुळे   ’साडी पॅक करो’ म्हणुन दुकानदाराला सांगता, तेंव्हा जर तीच पुटपुटणं ऐकू आलं की  हो….. ’घेउन टाका तुम्हाला आवडली असेल तर” ….. की सरळ दुकानदाराला रुको भैय्या, ये नई मंगताय… म्हणून सांगायचं.. कारण या घेउन टाका ्ना= चा अर्थ होतो की मला ही साडी नकोय.. आणि तुम्ही घेतली तरी मी  कधीच नेसणार नाही..  थोडक्यात गो अहेड , घेउन टाक/ करुन टाक = माझी इच्छा नाही तू हे करावंस अशी

दिवसभर काम करुन आल्यावर रात्री आंघोळ करायचा कंटाळा आला, आणि तिने रात्री पलंगावर पडल्या पडल्या कॉमेंट टाकली.. की तु कित्ती मॅनली आहेस रे.. म्हणजे याचा अर्थ.. असा की तुझ्या घामाचा खुप वास येतोय.. उठ, जा , आणि आंघोळ करुन ये. जमलंच तर दाढी पण करुन ये…   🙂

कधी कधी रात्री लाइट ऑफ कर रे.. बी रोमॅंटीक.. असं म्हंटलं, की समजायचं, की अरे मी कित्ती लठठ झाली आहे ना, मला अनिझी वाटतंय लाईट सुरु असला की .. .. म्हणून लाईट ऑफ कर..

जनरल घराबद्दल तर बरेचदा निरुपद्रवी वाटणाऱ्या कॉमेंट्स या खूप महत्वाच्या असतात.  जसे ह्या फ्लॅटला बाल्कनी हवी होती बेडरुमला, किंवा किचन थोडं कम्फर्टेबल वाटत नाही, किंवा हा फ्लॅट चांगला आहेच रे…. पण इथे कपडे वाळत घालायला जागा नाही व्यवस्थित… या सगळ्यांचा अर्थ  म्हणजे मला ह्या घराचा कंटाळा आलाय, आणि आता नवीन घर बघणं सुरु कर..घर बदलू या आपण आता.

रात्री तुम्ही मस्तपैकी गाढ झोपलेले आहात. मस्त पैकी घोरणं सुरु आहे. तेवढ्यात.. ” अहो.. मला कसला तरी आवाज ऐकू येतोय … जरा बघा नां दार उघडून … ” याचा अर्थ, मला अजिबात झोप येत नाही, आणि तु झोपला आहेस??  चल उठ आणि मग आपण गप्पा मारु या.. आणि हवं तर…………..

बरेचदा तुम्ही नुसते सहज बसलेले असता, तेवढ्यात ’तु खरंच सांग , तुला मी आवडते ना? किंवा तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?? असं वाक्य कानावर पडलं, की आपलं पैशाचं पाकीट तपासून पहा.. किती आहेत शिल्लक ते.. आणि बॅंक बॅलन्स आठवण्याचा प्रयत्न करा. कारण याचा अर्थ होतो की मी तुला  खर्चात पाडण्याचा प्लॅन केलेला आहे, किंवा काहीतरी खूप महागाच विकत घेउन मागणार आहे.

प्रेमा बद्दल तर नेहेमीच बोलणं सुरु असतं.. मग एखाद्या वेळेस.. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे??  ( वरच्या पॅरा मधे तुझं  माझ्यावर प्रेम आहे कां? हे वाक्य होतं- फरक लक्षात घ्या) असं क्वांटीटीव्ह वाक्य ऐकु आलं की समजावं तिने नक्कीच तुम्हाला न आवडणारी कुठली तरी गोष्ट केलेली आहे… 🙂 मानसिक तयारीत रहा, की आता ती काय बॉम्ब फोडते ते. ….  म्हणजे सासुरवाडीचे लोकं सह कुटूंब सह परिवार आणि इष्ट मित्रांसह तुमच्या एल टी सी च्या पिरियड मधे बोला्वून ठेवले आहेत,  आणि पुर्ण एल टी सी त्यांच्या बरोबर घालवायची आहे… असे काही तरी पण असू शकते.. 😛

तुम्ही एखाद्या गोष्टीवर डिस्कस करताय तिचा मुद्दा तुम्हाला अजिबात पटलेला नाही, म्हणून तुम्ही आपला मुद्दा पुन्हा जोर लावून मांडताय, तुम्हाला समजतंय की तुम्ही जिंकताय वाद विवादामधे… तेवढ्यात तिने जर तुम्ही नीट कम्युनिकेट करा हो, तुम्हाला काय म्हणायचंय ते.. असं म्हंटलं  म्हणजे  याचा अर्थ ” मी काय म्हणते ते नीट ऐका आणि सरळ सरळ वाद विवाद न करता मान्य करा:.. असा घ्यायचा असतो.

संध्याकाळची वेळ.. तुम्ही तयार होऊन सोफ्यावर तिच्या तयार होण्याची वाट पहाताय. तेवढ्यात… माझं एकाच मिनिटात होतंय बरं कां.. असं म्हणाली की समजा.. बहुत देर है और… लॅप टॉप सुरु करा आणि टायपा एखादं पोस्ट .. ब्लॉग साठी.. हा हा हा.. 🙂
चला, झाली ती तयार.. मी येतो आता… 🙂

(हे फक्त एक विनोदी पोस्ट म्हणून लिहिलंय , कोणाला दुखवण्याचा उद्देश नाही)

स्वातंत्र्य ..

Written by  on September 27, 2008

सर्वप्रथम आज  स्वातंत्र्य  दिनाच्या शुभेच्छा देतो.

-या माणसाची  बाकी कमाल आहे. नेहेमीच काही ना काहीतरी करत असतो. रिकामा कधी बसुच शकत नाही.  कधी एखाद्या ’इ’ विशेषांकाचे प्रकाशन तर कधी एखाद्या एखाद्या श्राव्य अंकाचे.आजच्या ह्या स्वातंत्र्य दिवसाचे निमित्याने   “आज ब्लॉग वरच्या साहित्याला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केलाय या माणसाने”.

ब्लॉग वर आजकाल बरंच मराठी लेख  लिहिले जातात  . बरेच  लोकं  ब्लॉग वाचत नाहीत त्यामुळे  हे लेख   त्या  लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही.  जर यातले काही निवडक लेख त्या लेखका कडूनच (शक्यतो) वाचून घेतले आणि मग सगळ्या ऑडीओ फाइल्स एकाच ठिकाणी  प्रसिद्ध केल्या तर?? हा विचार मनात आला आणि  –  या संकल्पनेतून  हा  पहिला एक ऑडीओ  अंक प्रत्यक्षात उतरला .

मी कोणाबद्दल बोलतोय ते  जर तुम्ही मराठी इंटरनेट वर अ‍ॅक्टीव्ह असाल, तर आत्तापर्यंत नक्कीच ओळखले असणार. बऱ्याचशा संकेतस्थळांवर अत्यानंद नावाने प्रसिद्ध असलेले प्रमोद देव !

सगळ्यांच्या मागे लागून ध्वनी मुद्रण मागवणे हे के मोठे काम होते .सारखी आठवण करून दिली जात होती देवांच्या कट्ट्यावर . चार दिवसांवर प्रकाशन आलं तरीही फक्त ५-६ ध्वनी मुद्रण आली होती, पण शेवटाच्या दोन दिवसात चित्र बदललं, आणि अगदी शेवटाच्या क्षणापर्यंत ब्लॉगर्स कडून  ध्वनी मुद्रणांचा ओघ सुरु होता  . सगळ्या ब्लॉगर्सनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे  आज स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून  हा ऑडीओ अंक प्रसिद्ध करता आला. या अंकाची पूर्तता श्रेया  रत्नपारखी शिवाय झालीच नसती असंही ते आवर्जून लिहितात.

या अंकात असलेल्या कथांची टोरंट वर अप्लोड करुन लवकर लिंक प्रसिद्ध करावी  अशी विनंती मी प्रमोदजींना करतोय, म्हणजे हे लेख डाउनलोड करून तुम्हाला  कार मधे, मोबाइल वर, किंवा इतरत्र  कॉंप्युटर शिवाय पण ऐकता येतील आणि हे लेख खरे खुरे स्वतंत्र होतील कॉम्प्युटर पासून. एकदा मोबाइल  वर पोहोचले की मग यांचा ब्लु टुथ वरून प्रसार   होऊन हे लेख बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतात.

हा अंक तुम्हाला इथे पहाता  येईल ^(http://rangmarathiche.com/goto/http://jaalavaani.blogspot.com/search?updated-max=2010-08-14T14%3A53%3A00%2B05%3A30&max-results=6) . तर करा क्लिक ^(http://rangmarathiche.com/goto/http://jaalavaani.blogspot.com/search?updated-max=2010-08-14T14%3A53%3A00%2B05%3A30&max-results=6) आणि स्वतंत्रता दिवसाचा आनंद लुटा.

जर तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्हाला ह्यातल्या काही कथा डाउनलोड करायच्या असतिल तर त्या प्लेअर च्या बाजूला DivShare  असे लिहिलेले  आढळेल. त्यावर क्लिक केल्यावर डाउनलोडचा ऑप्शन उघडेल आणि डाउन लोड करता येईल.

नो कमबॅक्स……१

Written by  on September 23, 2008

असं का व्हावं? माझ्याच बाबतीत असं का व्हावं? आज पर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणारा मी, कुठलेही पाऊल उचलतांना शक्याशक्यतेचा विचार करूनच प्रत्येक गोष्ट करणारा, मग या इतक्या महत्त्वाच्या गोष्टीचा सर्वोपांगी विचार का केला नव्हता? आज पर्यंत कमावलेले करोडो रुपये, समाजातलं स्थान, या सगळ्या गोष्टींचा काय उपयोग?

काय झालं? माफ करा,स्वतःची ओळख करुन द्यायला विसरलो मी. मी कॅप्टन राज. वय वर्षे ४२. मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हंटलं तरीही चालेल. माझ्या बद्दल तुम्ही मागच्या कथे मधे वाचले आहेच.  नसल्यास , आधीची  कथा इथे वाचा ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2010/12/03/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9C/).  सध्या माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असे वाटतंय. अहो दररोज दिवसभर काहीतरी करत वेळ काढायचा आणि रात्री बॉम्बे जिमखाना क्लब मधे   जायचं. रात्री उशीरा पर्यंत  घरी आलं की मग दुपारी उशीरा उठायचं, आणि पुन्हा तेच आयुष्य मागील पानावरून पुढे सुरु.

इतका पैसा गाठीशी असतांना आता या पुढे नेमकं काय करावं हेच समजत नव्हतं. करोडो रुपये कमावलेले, कितीही दोन्ही हातांनी जरी उधळले तरीही कधी संपणार नाही इतकी संपत्ती.लग्न केलेले नसल्याने पुन्हा कुठलेही बंधन नाही. हा सगळा दिनक्रम व्यवस्थित सुरु होता, असलेल्या पैशाकडे पाहून आजपर्यंत बऱ्याच मुली जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या, पण मी मात्र कटाक्षाने असे संबंध केवळ वन नाईट स्टॅंड पुरतेच मर्यादित ठेवले होते. कुठेच मानसिक गुंतवणूक होऊ दिली नव्हती. लाइफ  वॉज गुड- पण जो पर्यंत ती आयुष्यात आली नव्हती तो पर्यंत!

सोशल  पार्टी मधे  ती नेहेमी दिसायची. कुठल्यातरी एका कोपऱ्यात हातात ब्लडी मेरीचा ग्लास घेऊन पहिलाच ग्लास शेवटपर्यंत पुरवत बसायची. कोणाशी कधी फारसं बोलणं नाही, की कोणा मधे फारसं मिक्स अप होणं नाही. तिचा नवरा नेहेमीच सोबत असायचा. सुजीत मेहेरा.   पण तो अशा पार्टी आपले बिझिनेस संबंध  दुरुस्त करण्यासाठी वापरायचा. अशा प्रसंगी बायको बरोबर असली की समोरचा माणूस थोडा सॉफ्ट होतो -आपोआप!  एक्स्पोर्ट इम्पोर्टचा मोठा धंदा असलेला हा सुजीत पार्टी मधे केवळ धंदा वाढवण्यासाठी म्हणूनच यायचा. या अशा पार्टीज चा उपयोग धंदा वाढवण्यासाठी कसा करून घ्यावा ते यांच्याकडून शिकावे.

स्वतःवर प्रचंड विश्वास असलेला माणूस. स्वतः बरोबर बॉडीगार्ड लवाजमा घेऊन फिरणे याला आवडायचे नाही. पार्टीला येतांना पण स्वतःच आपली बी एम डब्लु ड्राइव्ह करत यायचा. शेजारी बायको बसलेली, मागच्या सीटवर ड्रायव्हर.  कस्टम बिल्ट कार होती ती.  पूर्णपणे बुलेट प्रुफ. अगदी चाकं, टायर्स सुद्धा. जवळपास एखादा बॉम्ब ब्लास्ट जरी झाला तरी त्या कारला काही होणार नाही. असंही म्हणतात की त्याच्या कार मधे सिक्रेट वेपन्स पण बसवलेले आहेत. जेम्स बॉंड च्या कार सारखे. हेच कारण असेल, त्याला बॉडी गार्डची गरज पडत नसावी. पण पार्टी संपली की मग मात्र हा मागच्या सिटवर शांतपणे झोपी जायचा.

जगणं म्हणजे दारू पिणं बस्स .. इतकच त्याचं आयुष्य होतं बहुतेक. सारखं दारू पिण्यामुळे आणि खाण्यामुळॆ अवाढव्य शरीर झाले होते.  पार्टी मधे पण याचे लक्ष बायकोकडे कधीच नसायचे. कोणाशी तरी कोपऱ्यात बसून बिझीनेस बद्दल बोलत बसणे हाच याचा नेहेमीचा उद्योग. पेज थ्री पार्टी मधे असेल त्या दिवशी त्या पार्टीला , आणि ज्या दिवशी पार्टी नसेल त्या दिवशी हा बॉम्बे जिमखाना क्लब मधे नक्की असणार. या क्लबची मेंबरशीप मिळणे फार कठीण.  एक्स्ल्युजीव क्लब फॉर इलाईट्स अशी टॅग लाइन आहे या क्लबची..

या सुजीत शी ओळख तर झाली होतीच. दररोज  पार्टी मधे किंवा क्लब मधे भेट व्हायचीच.थोडं फार बोलणं पण व्हायचं . एक गोष्ट बाकी आहे, माझा पूर्वेतिहास माहिती असल्याने कदाचित असेल, तो माझ्याशी नेहेमी सांभाळूनच रहायचा. कॅप्टन लेट्स ड्रिंक.. म्हणून बार कडे घेऊन जायचा, आणि हातात स्कॉच ऑन द रॉक्स चा ग्लास घेतला की एका बाजूला निघून जायचा.

साधारण महिनाभरापूर्वी गोष्ट असेल. बॉम्बे क्लब चा बार. समोर टेबल वर काही लोकं  पूल खेळत बसले होते, आणि एका बाजूला एका टेबल वर सहा लोकं पत्ते खेळत बसले होते. त्या मधे एक सुजीत पण होता. चार पेग झाले होते त्याचे. तांबारलेले डोळे आणि समोर पत्ते- बहुतेक सारखा जिंकत होता, म्हणून त्याचा मुड पण चांगला दिसत होता.

एका कोपऱ्यात सुजीत मेहेरा ची बायको रश्मी मेहेरा बसली होती. समोर नेहेमीप्रमाणे ब्लडी मेरी चा ग्लास ठेवलेला होता. पूर्णपणे कंटाळलेली दिसत होती ती. तिला एकटीला रहायची वेळ फार कमी यायची. तिच्या सौंदर्यामुळे तिच्या मागे पुढे सारखं कोणी ना कोणी तरी असायचंच. आता पण ती एका तरूणी बरोबर गप्पा मारत बसली होती.    चेहेऱ्यावरचा कंटाळा दिसत होता तिच्या ..मला एक समजत नव्हते, की जर तिला आवडत नाही पार्टी मधे किंवा क्लब मधे तर ती इथे येते तरी कशाला?

गेले कित्येक दिवसा पासून मी  तिच्या मधे कळत नकळत गुंतत चाललो होतो.  पार्टी मधे, क्लब मधे दुरूनच एकमेकांकडे पहाणं सुरु होतं. पण नजर मिळाली, की नजर चुकवायची हा खेळ सुरु होता. नजर का चुकवतोय आपण? साधं सरळ स्मित हास्य का देऊ शकत नाही? बरं , आपल्या प्रमाणे ती पण कधीच चुकून नजर मिळाली, तर हासत नाही. पण पहात असते हे नक्की.

आज मात्र तिच्या कडे पाहिलं, आणि तिने पण नजरेत कुठलेही भाव न येऊ देता नजरेला नजर मिळवली. खूप जुन्या दिवसांची ओळख असल्या प्रमाणे , नजरेनेच बोलणं झालं.   तिच्या समोरच्या दोन्ही लोकांना टाळून ती बार कडे वळली. तिचा ब्लडी मेरीचा न संपलेला ग्लास टेबलवरच सोडून. मी पण हातातला स्कॉच चा ग्लास खाली ठेऊन तिच्या दिशेने बार कडे वळलो. तिथे जाऊन व्हिस्की  ऑन द रॉक्स ची ऑर्डर दिली. तिच्याकडे बघून हसलो, आणि हात समोर केला. तिने हातात हात घेऊन  नांव सांगितले. म्हणाली, बरेच दिवसापासून बोलायचं होतं.. पण तेवढ्यात वाजवीपेक्षा जास्त वेळ हात हातात आहे ही गोष्ट लक्षात आल्याने, तिने हात काढून घेतला, आणि म्हणाली, उद्या रात्री याच ठिकाणी, आणि काही न बोलता आपला ब्लडी मेरी चा नवीन ग्लास घेऊन तिथून निघून गेली. माझ्या तर अजिबात काही लक्षात आले नाही, पण स्वतःच्याच नशिबावर जाम खूष झालो आज.

किती तरी दिवसांपासून मी ह्याच दिवसाची वाट पहात होतो. उद्या काय बरं असावं? मी मेहेरा खेळत असलेल्या टेबलकडे वळलो . नेमका त्याच टेबलवर न बसता मेहेराच्या टेबलच्या मागच्या टेबलवर बसलो. तिथून मला मेहेराचे बोलणे चांगले स्पष्ट ऐकू येत होते. अर्धा तास झाला तरीही काहीच झाले नाही. केवळ खेळणे सुरु होते सुजीत मेहेराचे. तेवढ्यात मेहेराचा सेल फोन वाजला, कोण होतं ते माहिती नाही, पण मेहेराचे एक वाक्य कानी पडलं, ” हां, भाई, मै आ रहा हूं कल दुबई, टिकिट भी बुक कर  लिया है” आणि आकस्मित पणे कसलं तरी अनामिक दडपण आल्याप्रमाणे टेबल वरून हातातले पत्ते फेकून तो उठून गेला. रश्मी मेहेरा कडे इशारा करून निघाला सुध्दा तो परत. रश्मीने माझ्याकडे पाहिले, आणि ओळखीचे स्मित हास्य दिले आणि सुजीत मेहेताच्या मागे चालायला लागली. नेहेमी रात्री दोन वाजेपर्यंत पार्टी मधे मश्गूल रहाणारा सुजीत मेहेरा आज मात्र अकरा वाजताच परत जात होता. काही तरी बिनसलं होतं हे नक्की.

**********

लग्नावरची पोस्ट

Written by  on September 16, 2008

लग्न म्हंटलं की लग्नाच्या आधीचे सुंदर दिवस आठवतात – पहा.. मला वाटलंच की तुमचा गैरसमज होणार, म्हणजे लग्नानंतरचे दिवस तर चांगले गेलेच ,पण आधीचे दिवस थोडे जास्तच चांगले होते.. थोडं फार लपून फिरणे, सगळ्या बागा, तलावाचे काठ, आणि गर्दी नसलेली रेस्टॉरंट्स   पालथी घातली होती. असं कुठलंही नागपुरातलं उद्यान नाही की जिथून आम्हाला   हाकललेले नाही.. 🙂 खरंच लिहितोय. मग कधी तरी घरी पण बातमी पोहोचायची तिच्या पण.. कुठल्यातरी  ( म्हणजे मी) मुलासोबत दिसली म्हणून….जाउ द्या..स्वतःबद्दल लिहायचं नाही आज..

हा लेख स्वतःच्या लग्नाबद्दल नाही. पण इतर लग्नाच्या गमती सांगायचंय आज.  दर्यापुर नावाचे एक गांव आहे अमरावती जवळ. तिथे लहानपणी आत्याकडे जाणं व्हायचं उन्हाळ्यात.घरामागच्या मंदिरात जवळपास रोजच लग्न लागायची.  मुख्यत्वे  शेतकरी, किंवा शेतावर काम करणारे मजुर वगैरे ह्या क्लासची लग्न तिथे व्हायची.

आम्ही अंगणात झोपलेलं असायचॊ. सकाळी ५ वाजता मोठ्या आवाजात रुप तेरा मस्ताना  लाउडस्पिकर वर सुरु व्हायचं-,वेक अप कॉल ला ! तेंव्हा असा काही नियम नव्हता की लाउडस्पिकर केंव्हा आणि किती वेळ सुरु ठेवायचा, त्यामुळे अगदी जेंव्हा केंव्हा मनात येइल तेंव्हा गाणी सुरु व्हायची.त्यातल्या त्यात जर ती  रेकॉर्ड घासलेली असेल आणि जर अडकत असेल तर मग नुसतं प्यार मेरा.. प्यार मेरा.. प्यार मेरा.. असं सुरु रहायचं . मग तेवढ्यात तो  रेकॉर्डवाला पिंक टाकुन यायचा  आणि गाणं पुढे सरकवायचा.

आम्ही बाहेरच्या अंगणात( रात्री अंगणातच झोपायचो)  तो आवाज नोगोशिएट करायला अजुन डोक्यावरून पांघरूण ओढून झोपायचा प्रयत्न करित असू.पण इतका कर्कश्य आवाज असायचा की ऊठावच लागायचं! लाऊड स्पिकरवर अधूनमधून इतर घोषणा पण  सुरु असायच्या.

अरे हो, एक राहिलंच.. नवरदेवाचा मारुतीच्या मंदिराला जाण्याचा प्रसंग. सनई, चोघडा आणि त्या मागे बऱ्याच स्त्रियांनी वेढलेला नवरदेव ! हळ्दीने पिवळा झालेला त्याचा पांढरा पायजमा आणि नेहरु शर्ट किंवा साधा बुशशर्ट.. हाता मधे एक चाकु, त्यावर खोचलेलं  लिंबु, डॊक्यावर टोपी , त्यावर  बांधलेल्या मुंडावळ्या, कपाळावर लाल भडक कुंकू.. विदर्भातल्या उन्हाळ्यामुळे सुटलेल्या घामाने त्या कुंकवाचे ओघळ सरळ कपाळावरून गळ्यापर्यंत पोहोचलेले. अशा वेशात तो जायचा. त्या व्हिजिट पेक्षा , त्या नवरदेवाला पहायलाच आवडायचं.

लग्नाच्या मंगलाष्टकाची वेळ झाली की मग मात्र कधी तरी माइक बंद न केल्यामुळे भांडणं पण ऐकु यायची. ओ पावनं, तुम्ही रेडिओ देल्ला नाय अजुन.. किंवा पोराची भैन रुसली मने पैरपट्टी पायजेल म्हनून ( पैरपट्टी म्हणजे पैंजण बरं कां). कोणीतरी समजावतोय, आता दुकानं उघडले नाहीत, नंतर उघडलेकी आणून देईन म्हणून. आणि मग नवरदेवाची रुसलेली बहिण (करवली) मागे उभी रहायला तयार व्हायची.

मंगलाष्टकं संपली की ’सुलग्न’ लावणं सुरु व्हायचं. आणि तेंव्हा सगळ्यात गमतीशिर प्रकार सुरु व्हायचा. लाउडस्पिकरवरुन घोषणा सुरु व्हायच्या.. तडेगांवच्या ( तळेगांवच्या) रामराव सखाराम रावताकडुन १ रुपया बक्षिस ( कांही लोकं चोळी बांगडी साठी १रुपया असेही म्हणायचे). किंवा शहापुर बुद्रुकच्या लक्षमनरावा कडुन झंपरचा (ब्लाउझ) कपडा.. आमची अगदी हसूनहसून पुरेवाट व्हायची.मग कधी तरी अगदी सखारामा कडुन आठ आणे अशी  अनाउन्समेंट व्हायची. कधी सोपानरावा कडुन पितळेचा गडवा ( तांब्या), अशा गमतीशीर अनाउन्समेंट ऐकतांना मजा यायची.

मग जेंव्हा घरी आम्ही पण हाच खेळत असू. म्हणजे जेवायला बसलॊ, की अनंताले आत्याकडून दोन पोळ्या अन भाजी … किंवा श्रीकांतले एक पापड…….अशा अनाउन्समेंटस…… नुसती धमाल असायची.

लग्नघरी जेवणाची वेळ झाली की  मस्त सुगंध सुटायचा. मोस्टली जिलबी, आणि वांग्या बटाट्याची भाजी असायची. मला कसं माहिती म्हणता? अहो चक्क बाहेरच सगळा स्वयंपाक सुरु असायचा . तो आचारी, त्याच्या मोठ्या कढया …. आणि तळणं सुरु असायचं. लहान गांव असल्यामुळे जवळपास सगळ्यांशीच ओळखी असायच्या त्यामुळे जवळपास प्रत्येक लग्नालाच बोलावणं असायचं आत्याच्या घरी. आम्ही पण मग कांही लग्न अटेंड केली होती. पण  अगदी मनांपासून इच्छा असुनही तिथे कधी जेउ दिलं  नाही, ही एक खंत आहेच मनात.एका ठरावीक जमातीचे लग्न असलं की अनाउन्समेंट व्हायची प्रत्येकाने ’पत्तल’ वर बसावे. पत्तल म्हणजे पत्रावळ. जेवण झाल्यावर हात धुवायला नेलेला ग्लास परत ठेवने.. आनी घरी नेउ नये.. अशीही घॊषणा कधी तरी ऐकू यायची.

बरं इतकं झालं, की मग स्त्रियांची धावपळ सुरु व्हायची. नांव घ्या , नांव घ्या म्हणून गदारोळ व्हायचा आणी मग माइक समोर पाहिला की स्त्रिया अगदी हिरिरीने नांवं घ्यायच्या. आता आठवत नाहीत काय नांव घ्यायच्या ते.. संध्याकाळी वरात निघतांना, कधी , बैलगाडी, कधी पायी तर कधी सायकल रिक्षा पण असायची. अशा तर्हे़ने हा सोहोळा पार पडायचा.

लहान सहान गोष्टींमधे पण आनंद शोधायचा मानवी स्वभाव इथे पण दिसून यायचा. नंतर एकदा एका मुस्लिम मित्राचे लग्न अटॆंड केलं होतं , मी आसनसोल ला असताना. तो इंजिनिअर होता अर्थ मुव्हिंग इक्विप्मेंट्स हॅंडल करायचा बंगालमधे. तिथेच ओळख झाली होती एका साइटवर. त्याच्या लग्नामधे सगळे मुस्लिम लोकंच होते, केवळ एक मी आणि टी जॉन म्हणून एक  मित्र होता बस्स! आम्ही त्याच्या जवळ बसून गप्पा मारत होतो. अधूनमधून  इतर लोकंही येउन भेटून जायचे त्याला.  थोडा वेळ झाला, आणि तो म्हणाला, आप खाना खा लिजिये, आपको धनबाद से आसनसोल जानेके लिये ४ घंटा तो लगेगाही. म्हंटल, अरे अन्सार लेकिन तेरी शादी तो हो जाने दे.. फिर खा लेंगे. तर म्हणतो, शादी तो हो गई.. मिय़ां.. आणि हसायला लागला.मी आपला आ वासुन त्याच्याकडे पहात राहिलो, नंतर त्यानी सांगितलं की त्यांच्यात लग्न कसं होतं ते.

एका के्रळी मित्राच्या मुलाचं लग्नं होतं. पंचतारांकित हॉटेल मधे लग्न झालं. इथं लग्नापेक्षा वऱ्हाड्यांना इतरच गोष्टीत इंटरेस्ट दिसत होता. आम्ही तर फक्त रिसेप्शन ला गेलो होतो, पण इथे फक्त सगळी कडे नुसता पैशाचा पाउस पडलेला दिसत होता. पदोपदी जाणवत होतं की किती खर्च केलाय  ते  लग्नाला.

इतर बरीच लग्न अटेंड केलीत पण त्या पहिल्या दर्यापुरच्या  लग्नातला लाइव्हली नेस कधिच कुठे पहायला मिळाला नाही. 🙂

इंडीया शाइनिंग

Written by  on September 1, 2008

कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो.  भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था  कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना    जोपर्यंत अनपेक्षित पणे  एखादी साईट समोर एखादी अनपेक्षित पणे येत नाही,   तो पर्यंत  येत नाही.

कालच ,सर्फिंग करतांना   एक साईट दिसली. स्वतःचा बिझिनेस प्रमोट करण्यासाठी असलेली ही साईट बघून खूप कौतुक वाटलं. आणि अगदी तळागाळातल्या वर्गाला पण इंटरनेटचं महत्व समजतं हे बघून आश्चर्य वाटलं.  कुठली साईट?? सांगतो पुढे ..

आजच्या दिवसात इंटर्नेट जे अगदी तुमच्या खिशात जाउन बसलंय त्याची मुहुर्त मेढ   भारतामधे राजीव गांधी  यांनी रोवली. टेलिफोन्स चं जाळं सगळ्या भारतात पसरवल . टेलिफोन्स मधुन जितका प्रॉफिट मिळायचा , तो सगळा रिइन्व्हेस्ट करुन भारताच्या अगदी कानाकोपऱ्या पर्यंत टेलिफोन पसरवला. १५०० उंबऱ्याचं गांव जरी असलं तरी तिथे आज टेलिफोनची सोय आहेच. जागोजागी एस टी डी बुथ उभे राहिले. कुठल्याही गावाला फोन करायचा तर केवळ एसटीडी कोड प्रिफिक्स करुन नंबर फिरवला की झालं . ट्रंक कॉल्स इतिहास जमा झाले. अगदी थोड्याच दिवसात सेल फोन आले.. आणि इंटरनेट  पण अगदी कॉमन झालं आणि   तुमच्या खिशात मोबाइल सोबत  जाउन बसले ते पण समजलंच नाही.

तर काय सांगतोय, ह्या टेलिफोनच्या क्रांती मुळे इंटरनेटची  उपलब्धता खूप सोपी झालेली  आहे सध्या.  सर्फिंग करतांना मला ३न निरनिराळ्या साईट्स सापडल्या नेट वर त्याबद्दल अगदी थोडक्यात लिहितोय इथे.

रिक्षावाल्याची वेब साईट..

पहिली म्हणजे एक चेन्नईचा रिक्षावाला.. त्याने स्वतःची वेब साईट ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.tuktastic.com/index.htm) तयार केलेली आहे. अगदीच क्रुड असलेली वेब साईट आहे, पण एक रिक्षावाला पण आपल्या बिझिनेस साठी इतका कॉशस अन नेट सॅव्ही बघून गम्मत वाटली. स्वतःचा ब्लॉग बनवून जाहिरात करावी असं त्याला वाटणं यातच सगळं आलं. आणि भारत २१व्या शतकाच्या वेगाशी सिंक्रोनाइझ होतोय  याची खात्री पटली. वेब साईट खास करुन परदेशी लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे.

हा रिक्शावाला म्हणतो, मी तुम्हाला दिवसभर टुकटुक मधे बसवुन चेन्नाईला फिरवुन आणिन. जेवायला, क्लबींग, हे तर आहेच,  जर तुम्हाला एका पेक्षा जास्त रिक्षा हव्या असतील तर त्या पण तो अरेंज करुन देउ शकतो. त्याने आपला इ मेल ऍड्रेस, फोन नंबर सगळं काही दिलेलं आहे.  त्याच्याच वेब साईटवर तो रिक्षावर जाहिरात करायची असेल तर कॉंटॅक्ट करा असंही लिहितोय.. बघा!!! आहे की नाही ग्रेट??

मुंबई डबावाल्यांची साईट

दुसरी वेब साईट ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.mydabbawala.com/index.htm) ही मुंबईचे डबे वाले यांची. यांना आपलं मार्केटींग व्यवस्थित करता येतं वेब साईट पण अगदी व्यवस्थित डेव्हलप केलेली आहे. मला मजा वाट्ली, ते ’ अ डे विथ डबेवाला’ ही कन्सेप्ट चालु केली आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबर दिवस भर रहाता येइल. खास परदेशी टुरिस्ट लोकांसाठी ही योजना दिसते राबवलेली.

डबेवाल्यांच्या सिक्स सिग्मा सिस्टीम्स च्या थोबाडीत मारणारी सिस्टीम  मुळे त्यांना बोलावले जाते लेक्चर्स साठी. त्या वेब साईटवर पण अशा लेक्चर्स साठी कॉंटॅक्ट करा असं अवाहन करण्यात आलंय. त्यामधे मोठ मोठ्या कंपन्यांची नावं बघून आश्चर्य वाटून घेउ नका. माझ्या माहिती प्रमाणे ऑक्सफर्डला पण यांचं लेक्चर झालंय.

मुंबईच्या डबेवाल्यांना ग्लोबल रेकग्निशन आहे. कदाचित म्हणूनच  वेब साईट खूपच चांगली डेव्हलप केलेली आहे.

मेड सर्व्हिस पोर्टल

आणि तिसरी वेब साईट आहे डॉ, मंजु  ^(http://rangmarathiche.com/goto/http://maidservices.in/)यांची . थोडक्यात त्याला मोलकरणींचं एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज पण म्हणता येइल. यांच्यावर एक लेख लोकसत्ता मधे पण बरेच वर्षापूर्वी आला होता आणि त्याची माहिती पण वेब साईट वर दिलेली आहे. मोठ्या शहरात हाउस मेड वगैरे मिळणं कठीण झालंय.खात्रीची मेड मिळण्यासाठी एक साईट पहाण्यात आली. तिची लिंक देतोय इथे.मेड्स चं पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे केलेलं असलं की थोडं जास्त सेफ वाटतं.बाहेर गावाहुन मुंबईला आलेल्यांना तर मेड्स वगैरे विश्वासू मिळणं हा एक प्रॉब्लेमच वाटतो म्हणून त्यांना ही साईट उपयोगी ठरु शकते.

ह्या सगळ्या साईट्स तर ठीकच आहेत, पण मुंबईच्या मुच्छड पानवाल्याची वेब साईट  ^(http://rangmarathiche.com/goto/http://www.mucchadpanwale.com/index.html)जी आहे तिचा उल्लेख केल्याशिवाय तर हा लेख पुर्ण होऊच शकत नाही. पान म्हणजे काय? पानाचे प्रकार किती? त्यात काय घालतात? असे अनेक प्रश्न परदेशी लोकांना पडतात, त्यांची उत्तरं दिलेली आहेत या साईटवर. अतिशय व्यवस्थित असलेली ही वेब साईट म्हणजे भारतातली पहिली पान वाल्याची साईट असल्याचा तोरा मीरवते.

या  सगळ्या वेब साईट्सच्या क्वॉलिटी बाबत मी काही फारसं बोलणार नाही. फक्त एकच गोष्ट आहे,तुम्हाला आवडो वा ना आवडो,  इंटरनेट हळू हळू आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग होतंय..