अशा लोकांच काय करावं?
लोकलने दादरहून परत येत असताना दाराच्या जवळ उभा होतो. शेजारी उभा असलेला माणूस कुठलं तरी गाणं गुणगुणत होता – गुणगुणणं पण कसं, तर शब्द नाहीत फक्त हुम्म्म असं हमिंग करत होता. दोनच मिनिटात मला इरीटेट होणं सुरु झालं, पण तो मात्र आपल्याच नादात व्यस्त होता, त्याला ह्याची जाणीव पण नव्हती की त्याच्या अशा हमींग मुळे इतरांना त्रास पण होऊ शकतो. बाजूला बसलेला एक गृप कुठले तरी स्तोत्र ( बहूतेक ) मोठमोठ्याने आळवत होते.
एखादा माणूस सेल फोन वर बराच वेळ बोलत राहिला की त्याचे एका बाजूचे बोलणे ऐकणे म्हणजे एक मनःस्ताप असतो. एकीकडचे पुर्ण बोलणे ऐकु येत असते, पण दुसरीकडून काय रिस्पॉन्स आहे ते काही समजत नाही, उगीच किरकिरी होते . काल नेमक्या दोन्ही तिन्ही गोष्टी एकावेळेस झाल्याने खूप चिडचिड होत होती.
पार्कींग करतांना आपण गाडी लावल्यामुळे इतरांचा रस्ता तर अड्वल्या जात नाही ना? ह्या गोष्टीचा पण विचार करतांना लोकं दिसत नाही. तुमची गाडी मागे अडकली की मग वेळेपरी वेळ जातो आणि मनःस्ताप वेगळाच. आपण समाजात रहातो, आणि त्यामुळे समाजाची आपल्यामूले कोणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण घ्यायलाच हवी- पण नेमका हा विचार करतांना कोणी दिसत नाही.
एकदा लोकल मधे कॉलेजच्या गृप मधला एक मुलगा कोणाशी तरी बोलत होता, आणि” तर तू आवाजावरून गे वाटतोस.. कधी भेटणार ते सांग?” म्हणून गळ घालत होता. इतर सगळी मुलं ख्या ख्या करून हसत होती. नंतर समजलं की तो टेलीमार्केटींग वाला होता कोणीतरी! अशाच प्रकारे एखाद्या टेलीमार्केटींग वाल्या मुलीला पण छळलं जाऊ शकतं. शेवटी त्ये टेलीमार्केटींग वाले पण काय आपलं कामंच करत असतात! त्यांना तरी उगाच त्रास कशाला द्यायचा?
एका शासकीय ऑफिस मधे गेलो असताना एका अधिकाऱ्याला भेटायला गेलो. लंच टाइम नुकताच झालेला होता. त्याच्या केबीन मधे सिगारेटचा घमघमाट सुटला होता , तोंडात पानाचा तोबरा, आणि तो करंगळीच्या नखाने दात कोरत बसला होता. बराच वेळ बसलो, बोलणं वगैरे झालं आणि मी निघतांना त्याने हात मिळवायला म्हणून हात समोर केला – मला तो हात हातात धरतांना अक्षरशः किळस आली.नंतर आधी वॉश रुम मधे जाऊन हात धुतले साबणाने.
लोकं असे मुद्दाम दुसऱ्याला इरीटेट होईल असेका वागतात ? की मला तसा उगीच संशय येतो? काही लोकं असे वागताना अगदी सहजपणे करतोय असे दाखवतात, मुद्दाम करतोय असा संशय येऊ नये याची काळजी घेतात असे मला वाटते. एखाद्याला किती प्रकारे इरीटेट केले जाऊ शकते ?सहज मनात आलं की अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्यामुळे मी इरीटेट होत असतो? बऱ्याच आहेत, पण त्यातलेच काही खाली देतोय !
१) सिनेमा पहातांना मोठा पॉपकॉर्नचा टब किंवा वेफर्सचे मोठे पाकीट घेऊन बसणारे लोकं. एक एक पॉप कॉर्न/वेफर्स तोंडात घातल्यावर तोंड उघडे ठेउन दाताखाली कचा कचा चावतात, त्यामूळे होणारा आवाज जरी लहान असला तरीही सतत होणारा तोंडाचा आवाज शेजारी बसलेल्याला मला इरीटेट करतो.
२)सिनेमामधले हिरोने म्हंटलेले एखादे वाक्य उगीच तसे रिपीट करणारे लोकं. मै तुझे जानसे मार डालुंगा. असे हिरोने म्हंटले की त्याच्यापाठोपाठ जानसे मारडालूंगा असे मोठ्याने म्हणतात बरेच लोकं! .
३) एखादे इंग्रजी वाक्य आले की त्याचा अर्थ हिंदी मधे किंवा मराठी मधे उगीच मोठ्याने म्हणणार रनिंग कॉमेंट्री करणारे, प्रत्येक सिन शेजारच्याला समजावून सांगणारे.
४)शेजारच्या खुर्चिच्या आणि तुमच्या मधल्या हॅंडल वर आपला अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करणारे. असे बसतात की शेजारच्या माणसाला मधल्या हॅंडलवर हात ठेवता येऊ नये. विमानात चुकुन मधली सिट मिळाल्यावर पण बरेच लोकं असेच वागतात.
५) एखादा माणूस भेटायला आल्यावर समोरच्या टेबलवर पेन ने उगीच ठक ठक आवाज करणारे लोकं.
६)चिकन करी मधले बोन पीस तोंडाने चोखून पुन्हा डीश मधे ठेवणारे.मला हमखास इरीटॆट करतात. चिकन खातांना चिकन जॉइंट्स दाताने तोडून खातांना उगाच अचकट विचकट आवाज करणारे लोकं.
७) व्हेज खाणारे शेवग्याची शेंग पण अशीच चोखून पुन्हा सांबार मधे टाकली की मला कसंसंच होतं.
८) कुत्र्याचे नांवा ’कुत्रा’ ठेवणारे. आणि बगीचामधे त्याला फिरायला नेल्यावर ” अरे ए कुत्र्या” , म्हणून मोठ्याने बोलवणारे !
९)एखादा मित्र तुम्ही काही सांगायचा प्रयत्न केला की की ” एक्जॅक्टली, द सेम.. अरे मला पण तेच म्हणायचय ” किंवा मी पण तेच म्हणतोय, असे म्हणतो तव्हा!
१०) लायब्ररी मधुन सस्पेन्स असलेले पुस्तक आणल्यावर, त्यातला शेवट काय आहे ते अगदी पहिल्या विस एक पानांच्या नंतर लिहून ठेवणारे. जसे होली ग्रेल कोण आहे हे दा विन्सी कोड मधे दहाव्या पानावर लिहून ठेवणारे 😦
११) होस्टेल मधे रहात असतांना रुममधे कपड्याच्या कपाटात खाण्याच्या वस्तू लपवून ठेवणारा मित्र . अशा वस्तू मधे चिझ वगरे काही असेल, आणि जर तो विसरला तर खूप घाण वास सुटतो काही दिवसानंतर.
१२) सगळ्यांसोबत टिव्ही पहात बसले असतांना शेवटली पाच सात मिनिटे असतांना कोणी चॅनल बदलला की.
१३)एखादा प्रश्न विचारला असता, तो समोरच्याने जसाच्या तसा रिपिट केला? – फक्त वेगळ्या म्हणजे उत्तराच्या अपेक्षेच्या टोन मधे म्हणजे..
१४)एखादा मित्र गप्पा मारताना, ” तुला माहीती आहे का?? ” म्हणतो. मी काय म्हणून विचारतो की… जाऊ दे.. आता झाली ती गोष्ट. त्याचं काय आता? असं म्हणून दुर्लक्ष करतो . आणि नेहेमीच असे वागतो तो मित्र!
१५)लोकल मधे प्रवास करतांना शेजाऱ्याच्या पेपरमधे डोकावून उगीच पुटपुटत वाचन करणा्रे शेजारी .
१६)जोरात शिंक आल्यावर समोर हात धरणारे, पण थोडा दूर.. 😦
१७)जेवायला बसल्यावर, आधी मुद्दाम हात भरवून , मग नंतर बोटं चाटत जेवणारे.
१८)एखाद्याशी बोलतांना, ” आय अॅम सॉरी टू से बट… असे म्हणून वाटेल ते बोलणारे” हे वाक्य सारखे वापरणारे लोकं.
१९)एखाद्याच्या ऑफिस मधे फोन केला, आणि ज्याच्याशी बोलायचे आहे तो नसेल, तर त्याच्यासाठी निरोप लिहून घे्णारा जेंव्हा ’मिस्टर’ की ’मिस’ ते विचारतो तेंव्हा.(आवाजावरून समजतं मी मिस्टर की मिस आहे ते)
२०)दिवाळी संपल्यावर पण आकाशकंदील पुढचे सहा महीने न काढणारे आणि न चुकता अधुन मधुन लावणारे लोकं.
२१)खातांना तॊंडाचा मचक मचक आवाज करणारे . मला स्वतःला असं कोणी समोर बसुन जेवलं की जाम इरीटेट होतं.
२२) कढी वगैरे जेवणात असेल तर जोरात फुर्र्र्र्र्र्र्र्र करून हातानेच कढी खाणारे .( सन्मानीय वृद्ध लोकं सोडून)
२३) तुम्ही काही बोलत असताना , कानात बोटं घालून किंवा कानावर हात ठेऊन झालं! संपलं! मला ऐकायचं नाही -मी बोअर झालोय – हे कन्व्हे करणारे मित्र.
२४)इ मेल लिहितांना, अप्पर केस मधे किंवा फक्त लोअर केस मधे लिहीणारे . मधे पंक्चुएशन मार्कस न देणारे .पॅरीग्राफ न करता एकच एक मोठं वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स लिहीणारे लोकं.
२५)लोकल मधे एखादी सिनेमाची थिम – जेम्स बॉड किंवा एखाद्या टिव्ही सिरियलची थिम सॉंग पुन्हा पुन्हा गुणगुणत रहाणारे अनोळखी लोकं. एकदा म्हणून झाली की ” अरे मी चुकलो वाटतं” म्हणून पुन्हा पुन्हा रिपीट करणारे.
२६)एखाद्याशी बोलत असतांना समोरच्या टेबलवर तबल्याचा ताल धरणारे.
२७) पेपर्स ला एकत्र करून ते मध्यभागी स्टेपल करून पाठवणारे.
२८) पत्र पाठवतांना त्याला सेलो टेपने सिक्युअर करून वर स्टेपल्स मारणारे. स्टेपल्स या मधल्या पत्रावर पण मारणारे.
२९) बोलतांना अजीबात नजरेला नजर न मिळवता किंवा नजर चुकवत बोलणारे .
३०) समोरच्या व्यक्तीशी बोलतांना रोखून पहात बोलणारे. आय कॉंटॅक्ट तुटु न देणारे .
३१) समोरच्या व्यक्तीशी बोलतांना तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूला चार इंच दुर पहात बोलणारे.
३२)समोर कोणी येऊन बसला, की उगीच जोरात श्वास घेऊन , आज तू डिओ वापरलं नाहीस? असे विचारणारे.
३३) कोणी काहीही सांगितले की खूप मजेदार जोक ऐकल्याप्रमाणे ख्या ख्या करून हसणारे लोकं.. अगदी हास्य क्लब प्रमाणे.
३४) तुमच्याशी बोलताना नाकातले केस उपटाणारे किंवा नाक कोरत बसणारे लोकं.
३५)एखादी नको असलेली गोष्ट कोणी सांगायला लागलं , की बहीरे झाल्यासारखे वागणारे लोकं . से इट अगेन.. असं म्हणून एकच गोष्ट अनेकदा रिपिट करायला लावणारे .
३६)इतक्या हळू आवाजात बोलतात, की कितीही लक्ष दिलं तरीही ऐकू येत नाही, आणि पुन्हा पुन्हा काय म्हणणं आहे ते ,त्यांना विचारावं लागतं असे लोकं.
३७) एखादा शब्द ’तकीया कलाम’ म्हणून सारखा वापरणारे.
३८)कोक, पेप्सी प्यायल्या नंतर मोठ्याने ढेकर देणारे !
३९)समोरचा माणूस काही तरी सांगत असताना उगीच तोंडातल्या तोंडात पुट्पुटणारे .
४०)रस्त्याने जातांना कानामधे ब्लु टुथ डिव्हाइस अडकवलेले, रस्त्याने जातांना स्वतःशीच बोलत असल्याप्रमाणे वेडसर दिसणारे लोकं.
४१) कधीतरी खूप पूर्वी भेटलेले पण एखाद्या लग्नात पुन्हा भेटले की ” मी कोण आहे ते ओळख बरं?” असं म्हणणारे लोकं.
४२) फोन करुन मी कोण ते ओळख म्हणणारे …
४३)काही लोकांना काहीही सांगितलं की प्रुव्ह इट म्हणायची वाईट खोड असते. असे लोकं..
४४)अपॉइंटमेंट देऊन त्यांना भेटायला गेल्यावर रिसेप्शन मधे बसायला लावणारे.
४५) एखाद्या पार्टी मधे आपली डीश न घेता, इतरांच्या डीशमधून एक एक घास घेऊन खाणारे लोकं.
४६) स्वतःच्या उष्ट्या चमच्याने तुमच्या डीशमधली स्विट डीशची चव घेणारे !
४७)विनाकारण कपड्यांवर कॉमेंट करणारे. ( टीपीकल बायकी लोकं)
४८) हॉटेलच्या वॉश बेसीन मधे शिंकरणारे, केस विंचरणारे!
४९)जेवणाच्या टेबल वर जोरात खाकरणारे.
५०) तुम्हाला समोर बसवून फोन वर दुसऱ्याशी बोलत रहाणारे लोकं.
५१) कार चालवतांना मधेच दार उघडून खाली पान , गुटका थुंकणारे.
५२) एखादी नवीन गोष्ट सांगितली की माहीत नसेल तरीही ’आय नो’ म्हणणारे.
५३) सर्दी झालेली असतांना कफ खाकरून न थुंकता , पुन्हा गिळणारे लोकं.
५४) खिशात नाही आणा, आणि मला बाजीराव म्हणा टाईपचे लोकं.
५५) जातीयवादी विषय काढून त्यावर उगीच भांडण करत सामाजिक समरसतेची वाट लावणारे.
५६) कुठल्यातरी सिलेब्रिटी बद्दल उगीच काहीतरी गॉसिप करणारे.
५७) जागोजागी वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बोर्ड लावणारे.
बस्स झालं, थांबतो आता. माफ करा थोडं मोठं झालंय पोस्ट!
बरेच लोकं कव्हर केलेत मला इरीटेट करणारे, आता या मधे जर कोणी सुटले असतील तर तुम्ही लिहा खाली कॉमेंट मधे.
पायाखालची वाळू…
तुमचं वय साधारण २५ ते ३५ कितीही असेल. कधी रस्त्यावरून तुम्ही बाइक वर एखाद्या सिग्नलला उभे आहात , एक सुंदर -हो, कारण मुलगी नेहेमीच सुंदर असते हो. जगातली प्रत्येक मुलगी ही किमान एकदा तरी वळून पहाण्यासारखी असतेच, मुलींकडे न पहाणं म्हणजे त्यांचा अपमान करणं!! बिइंग अ जंटलमन , तुम्ही त्यांचा अपमान करायला नको- किमान या ( २५-३० ) वयात तरी!!
चेहेरा पुर्णपणे ओढणीने झाकलेला, अंगावर तो टिपिकल पांढरा पुर्ण बाह्यांचा ड्रायव्हिंग गीअर – ग्लोव्हज सुध्दा- अशा वेशात बाजूला येऊन उभी रहाते. तुम्ही आपली बाईक आयडल करीत इकडे तिकडे पहात टवाळक्या करताय, तेवढ्यात सिग्नल पिवळा होतो, आणि ती मुलगी सुसाट वेगाने टेक ऑफ घेउना तुमच्या पुढे भुर्रकन निघून जाते. तुम्ही पहिला, दुसरा, तिसरा गिअर करीत हळू हळू पुढे जाता – त्या मुलीला गाठून ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत, पण तेवढ्यात दुसराच एक मुलगा एकदम सुसाट वेगाने तिला ओव्हरटेक करून पुढे निघून जातो- आणि तुम्ही .बसता आपले हात चोळत………..!
असं झाले की विचार काय येतो मनात? च्यायला, वय झालं आपलं, अरे काय पळवते ती मुलगी गाडी.आपल्याला पण पुढे जाऊ देत नाही. थकलो आपण आता!!
असंही वाटतं की चार पाच वर्षापुर्वी हे शक्य नव्हतं कोणालाच. सिग्नलला बाईक सगळ्यात पहिले पुढे जाणार ती आपली. झालं.. च्यामारी , वय झालं आपलं, म्हातारा व्हायला लागलो आपण. होतं की नाही असं?? ्तीशीमधे असतांना माझं तर व्हायचं बॉ असं !!
हल्ली तसं काही होत नाही – कारण खरंच मध्यम वयात पोहोचलोय.सिग्नलला कार उभी असली, आणि शेजारून कोणी एखादा मुलगा किंवा मुलगी अशी फास्ट निघून पुढे गेली तर काळजी वाटते- अरे पडली तर? वयाचा परिणाम असेल कदाचित!
असो, तर काय सांगत होतो, की वय झालंय, किंवा आपण म्हातारं झालोय/होतोय ही भावना येणं जरी साहजिक असलं तरी वाढणारं वय काही थांबवता येत नाही. पहिला पांढरा केस दिसला होता तो दिवस अजूनही आठवतो..सकाळी ऑफिसला जाण्याची तयारी करत होतो . भांग काढतांना एकदम पांढरा केस दिसला – अरे?? हे काय झालं? असं होणं शक्यच नाही.. कदाचित प्रकाश असेल परावर्तीत झालेला- असं म्हणून तो केस निरखून पाहिला आणि लक्षात आलं की तो खरंच पांढरा आहे.. मग कात्री उचलून कापायचा की मुळापासून उपटायचा ? हा गहन प्रश्न समोर आल्याने मी बराच वेळ तो केस हातात धरून विचार करीत राहिलो. थोड्या वेळाने सरळ त्याला उपटायचा प्रयत्न केला, तर तो खूप लहान असल्यामूळे हातातून निसटून जायचा.तेवढ्यात लक्ष गेलं आणि लक्षात आलं की तो एकटाच नव्हता, बरेच त्याचे साथीदार पण होते आजूबाजूला.
तेंव्हा वय होतं २६ !हे काय वय आहे का केस पांढरे व्हायचं. च्यायला लग्न पण व्हायचंय आणि पांढरे केस?कुठली मुलगी लग्न करणार आपल्याशी? माझ्या मेंदू मधे टिव्ही वरच्या सगळ्या जाहिरातीतल्या मुली फेर धरून भोवती नाचू लागल्या- आमचा हेअर डाय लाव म्हणुन- सगळ्या जाहिराती आठवल्या . दोन ऑ्प्शन्स होते, एक काळी मेहंदी ( म्हणजे पण डाय असतो हे नंतर समजले) आणि खरोखरचा डाय.. शेवटी गोदरेज काली मेहेंदी ( तेंव्हा लिक्विड हेअर डाय नव्हतं) आणली केस काळे करायला. अगदी जय्यत तयारी केली होती. जुना टुथ ब्रश, जुनी बशी वगैरे.. एकदाचं केस काळे केले टुथ ब्रश ने.
केस काळे करतांना सवय नसल्याने इकडे तिकडे बराच रंग लागला होता. जेंव्हा केस धुतले तेंव्हा केसांचा रंग इतका काळाकुळकुळीत होता की तो मिशा आणि भुवयांच्या ब्राउन रंगाशी एकदम विसंगत दिसत होता. बरं कानाला लागलेला डाय पण थोडा काळे डाग मागे ठेवून गेला होता. गालावर पण थोडा काळसर डाग दिसतच होता. आता काय करायचं? बराच प्रयत्न केला काढायचा, पण काही निघाला नाही.शेवटी तसाच गेलो ऑफिसमधे.
ऑफिस मधे गेल्यावर सगळे जण ते काळे डाग पाहून अरे डाय केलास? म्हणून विचारत होते. या पेक्षा ते पांढरे केस परवडले असते, असं झालं होतं मला. एका मित्राने – ज्याला डाय करण्याचा पुर्ण अनुभव होता सांगितले की डेटॉल घेउन ये , आणि त्यानी पूस, म्हणजे ते काळे डाग जातील. ताबडतोब डेटॉल आ्णून ते काळे डाग पुसले वॉश रुम मधे जाऊन. पुढल्या वेळेस कसं करायचं ह्याचा विचार करत बसलो जागेवर जाऊन. छेः , काहीही आठवतंय आज, इतक्या जुन्या गोष्टी , पण अगदी कालच झाल्यासारख्या झाल्या असं वाटताहेत..
पांढरे केस हा एक मोठा सेन्सिटीव्ह इशु आहे. पांढरे केस म्हणजे एजिंगचं लक्षणं. आपण म्हातारे झालो याची जाणिव. आधी सुरुवातीला कानाखाली एखादा पांढरा दिसणारा केस जेंव्हा नंतर बऱ्याच पांढऱ्या केसांसोबत दिसतो तेंव्हा आता काहीतरी केलं पाहिजे, आणि हे लपवले पाहिजे असे वाटायला लागते.काही लोकं इतके सेन्सिटीव्ह असतात की अगदी सत्तर वय झालं तरी पण केस आणि मिशा डाय करतात. केस आणि मिशा वगैरे डाय करणे ठिक आहे, चांगलं दिसतं, पण जेंव्हा केस वाढतात तेंव्हा मुळाकडचे नवीन वाढणारे पांढरे केस दिसले की तो एक केविलवाणा वय लपवायचा प्रयत्न वाटतो मला . हे जर टाळायचं असेल तर पिरिऑडीकली केस टच अप करावे लागतात. मला स्वतःला ग्रेसफुली एजिंग झालेलं आवडतं- वय वाढतंय, केस पांढरे होताहेत.. तर ठीक आहे. काय हरकत आहे? एक नॅचरल प्रोसेस आहे ती. आणि हो.. ते केस काळे करून कोणा पासुन वय लपवायचं??
केस इतका सेन्सिटीव्ह विषय आहे ,ज्याचे जातात त्यालाच मी काय म्हणतोय ते समजेल. लग्नापूर्वी बायकोचे केस कंबरेच्या खालपर्यंत लांब होते. काही दिवसांनी रोज केसांचा पुंजका दाखवायची केस विंचरल्यावर- मेले कित्ती केस जातात म्हणुन . केस गळायला लागले की मग डॊक्याची प्रयोगशाळा केली जाते. निरनिराळॆ शॅम्पु, तेलं, ( जबाकुसुम ते डाबर वाटीका, खोबरेल तेल शुध्द नारियलका , बदामाचं तेल, वगैरे) आणि व्हिटॅमिन ई च्या गोळ्या वगैरे घेणं सुरु होतं. कधी तरी कोणीतरी सांगतं की शाम्पु मधे खूप के्मिकल्स असतात, मग शिकेकाई, नागरमोथा, रिठा वगैरे आणुन आणि आधी उन्हात वाळवून मग बारीक कुटणे हा प्रकार पण केला जातो. अर्थात त्याने पण काही फायदा होतो असे नाही. पण एक मानसिक समाधान मात्र मिळते. हे शिकेकाईचे प्रकरण फक्त स्त्रियाच करतात बरं कां.. एक अनूप तेल की कुठलं तरी एक तेल आहे, ते लावलं की म्हणे टकलावर पण केस येतात .( नका हो जाउ विकत घ्यायला, उ्गाच पैसे वाया जातील )
स्त्रियांचं तर समजू शकतो, पण पुरुष? ते पण काही कमी सेन्सिटीव्ह नसतात केसांच्या बाबतीत. आमच्या ऑफिसमधे एक अकाउंटंट होते, त्यांचे टकलावरचे मध्य भागातले सगळे केस गेले होते , म्हणजे फक्त झाल्लरच शिल्लक होती. ते काय करायचे, आपले डावीकडचे केस जवळपास १०-११ इंच लांब करुन , टकलावरून फिरवून उजवी कडे न्यायचे आणि टक्कल झाकायचे. पण कधी तरी थोडी हवा वगैरे आली की ते केस सरकायचे आणि टक्कल दिसायचं. मग काय, दिवसभर केसच सांभाळत रहायचे हे. कित्ती मोठं काम ना? डाविकडले केस टकलावरून उजवीकडे नेऊन नीट टक्कल झाकलं राहील याची काळजी घेण? माझं आपलं साधं सोपं काम आहे, केस गळतात- ठिक आहे, एकदम बारीक कटींग करून येतो. त्या न्हाव्याला लालू कट मार म्हणून सांगतो.
लग्न झाल्यावर मुलं पण होतातच. मुलं झाल्यावर पण ते कसे पटापट मोठे होता आणि कधी खांद्यापर्यंत पोहोचतात हे लक्षातच येत नाही. पण जेंव्हा मुलीला आईची साडी घालून पाहिलं किंवा मुलाला आपला रेझर वापरताना पाहिल, जेंव्हा मुलींची उंची झालेली दिसते तेंव्हा किंवा मुलगा तुमच्या पेक्षा पण उंच दिसतो -की मग थोडी जाणीव होते आपण मोठे ( म्हातारे नाही) झाल्याची . मुलं मोठी होत आहेत – म्हणजे आपण म्हातारे होतोय . आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
म्हातारे होणं किंवा एजिंग होणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. त्यामधे लाज वाटून घेण्यासारखे काय आहे? हे कळत असतं, पण बरेचदा वळत नाही… समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिल्यावर कशी पायाखालची वाळू वाहून जाते, आणि आपण काहीच करू शकत नाही- तसच असतं वयाचं पण..
फार मोठा झालाय लेख… अ्सो…