बिन चेहेऱ्याची माणसं.

Written by  on June 30, 2008

upset…… तुमच्या ब्लॉग वर ऍनोनिमस कॉमेंट्स, शिवराळ भाषेत  टाकुन तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जातो का?? निश्चितच होत असेल तसं. .. मग हा लेख नक्कीच वाचा..

मी तसा नवीनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. आता सात महिने झालेत इथे पोस्टिंग सुरू करुन.जेंव्हा ब्लॉग सुरू केला तेंव्हा तर नीटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र  सगळं कसं सुरळीत झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात  असं माझं मलाच वाटतंय बरं का.

सगळं आयुष्य  इंग्रजीचा वापर करण्यात गेलं. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरू करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधीच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दीर्घाच्या चुका होणं साहजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत तरी..

इथे येण्यापूर्वी मी ऑर्कुटवर बऱ्यापैकी ऍक्टीव्ह होतो. तिथे बरीच बिन चेहऱ्याची माणसं होती. नांव खोटं, वय खोटं. सगळं खोटं असायचं काही लोकांचं . कारण मला कधीच कळलं नाही. तशाच काही लोकांनी आता ब्लॉग वर पण कॉमेंट टाकणं सुरु केलंय.. स्वतःचं आणि आपल्या बापाचं/ बापाने दिलेले आडनांव ( अशी अपेक्षा करतो की त्यांना माहिती असावं ते) लपवून  🙂

नंतर ऑर्कुट अकाउंट डिलिट केल्यानंतर निर्माण झालेली पोकळी मात्र या ब्लॉगिंगने भरुन काढली. मी इंटरनेटवर कुठेही असलो तरीही नेहेमीच आपल्या खऱ्या नावाने वावरलो. माझ्या नावाची किंवा माझ्या वडिलांनी दिलेल्या आडनावाची मला लाज वाटत नाही.

पण आजकाल एक नवीन ट्रेंड आलेला दिसतोय. बऱ्याच लोकांना आपण कोण म्हणजे स्वतःचे नांव लिहिण्याची किंवा आपल्या बापाने दिलेले आडनांव लिहायची लाज वाटते.  मला तर बरेचदा असा पण संशय येतो की या लोकांना आडनांव असते का?? की नसते??  🙂 कारण जी गोष्ट अभिमानाने सांगायची ्तीच हे लपवून ठेवतात म्हणून वाटलं.  🙂  इंग्रजी मधे एक छान शब्द आहे अशा लोकांसाठी बास्टर्ड्स.. मरा्ठीत काय म्हणतात हो त्याला?

मग बिना नावाने ऍनोनिमस कॉमेंट्स टाकतात लोकांच्या ब्लॉग्ज वर.स्वतः मधे अगदी ्शून्य टक्के कॉन्फिडन्स असला की लोकं असे कुठल्या तरी पडद्याआड उभे राहुन इतरांवर कॉमेंट्स करणं, किंवा शिवीगाळ करणं पसंत करतात. या लोकांचा आत्मविश्वास कमी असल्यामुळे त्यांची जगाच्या समोर येउन आपली ठाम मते सांगण्याची तयारी नसते. स्वतः तर काहीच करायचं नाही , पण दुसरा जर काही करित असेल तर मात्र त्याच्या चुका काढण्यातच ही अशा लोकांची जमात विकृत आनंद घेते.

माझ्या ब्लॉग वर मी माझी मतं मांडतो. आज पर्यंत बरेचदा लोकांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की माझी मतं त्यांना पटलेली नाहीत म्हणून, आणि ती मतं पण मी ब्लॉग वर प्रसिद्ध केली . अर्थात मत- मतांतरे सहाजिकच आहे. पण दुसऱ्या माणसाला खोट्या इमेल आयडी वरुन शिव्या घालण्यात कसला पुरुषार्थ आलाय?हिम्मत असेल तर स्वतःच्या खऱ्या नावाने कॉमेंट टाका, आणि ती पण पर्सनल   नको.. लेखाच्या अनुषंगाने ..मी ती प्रसिद्ध करिन आणि तिला  उत्तर पण देईन.

शिवराळ भाषा वापरुन लिहिलेल्या कॉमेंट्स मुळे मात्र डोकं पार खराब होतं. ज्याने असं केलंय त्याला सरळ भोसडुन काढायची इच्छा होते. पण हे वैचारिक दृष्ट्या नपुंसक असलेले लोकं पडद्या आड लपून स्वतःला सेव्ह करतात . कॉमेंट्स पोस्ट करतांना हे षंढ लोकं  अगदी खोटे इमेल आयडी देऊन कॉमेंट टाकतात. इमेल आयडी नसल्याने, ज्याला यांनी शिव्या घातल्या आहेत त्याला यांना काहीच उत्तर देता येत नाही आणि तो माणुस मात्र मग हात चोळत चिडचिडकरित बसतो. खरंच सांगतो, कालच्या त्या कॉमेंटने माझा एक दिवस पुर्ण खराब झाला. दिवस भर चिडचिड होत होती. म्हणून कालच ठरवलंय , की त्याला सोडायचं नाही.. !!!!

हाच अनुभव माझ्या मित्र, मैत्रिणिंना पण आलाय. अशा लोकांच्या कडे दुर्लक्ष करावं असं वाटतं.. पण त्या मुळे काय होणार? हे लोकं तर पुन्हा पुन्हा कॉमेंट्स टाकत रहाणार. तेंव्हा हर्षद  ^(http://rangmarathiche.com/goto/http://harshad.wordpress.com/)ने यावर एक चांगला उपाय सांगितलाय. सरळ कॉमेटला अप्रुव्ह न करता स्पॅम म्हणून मार्क करा. पुन्हा त्या आयपी वरुन कॉमेंट्स येणार नाहीत.

माझं एकच म्हणणं आहे, जर टीका करायची ईतकी खाज आहे तर आपला इ मेल आयडी सहीत कॉमेंट द्या.. म्हणजे तुम्ही ज्याच्यावर कॉमेंट करता तो पण तुम्हाला तुमच्याच भाषेत उत्तर  देऊ शकेल. एखाद्याच्या आयुष्यातला एक दिवस खराब करण्याचा तुम्हाला काहीच  अधिकार नाही!

मी अगदी खरोखरंच हर्ट झालोय कालच्या कॉमेंट मुळे, म्हणून वरची भाषा जरा बिघडलेली आहे त्याबद्दल क्षमस्व!!

मुंबई-जबाबदार कोण?

Written by  on June 21, 2008

मुंबई ब्लास्ट!! या सगळ्या ब्लास्ट साठी जबाबदार कोण? कोणाची जबाबदारी आहे जनतेच्या सुरक्षेची? हा प्रश्न मनात आला. कुठल्यातरी आतंकवादी संघट्नेवर या  ब्लास्टची जबादारी टाकून आपला पदर झटकण्याचे  काम सरकार  करणार आहे हे मी आजही सांगु शकतो.

सहज विचार मनात आला की  कालचा ब्लास्ट जर लोकल मधे झाला असता तर?? आणि पुन्हा एकदम अस्वस्थ वाटायला लागलं. लोकल मधे होणारं नुकसान हे खूप जास्त असतं. एका बंद जागेत केलेला स्फोट हा नेहेमीच जास्त परिणाम कारक असतो.माझ्या डोळ्यापुढून सगळी लोकलची स्टेशन्स वरची सुरक्षा व्यवस्था गेली .

प्रत्येक स्टेशनच्या प्लॅटफॉर्म एक एक टेबल आणि बेंच ठेवलेला असतो, त्यावर एक-दोन पोलीस उगाच पेंगत बसलेले असतात. मधेच टाइम पास म्हणून एखाद्या माणसाला बोलावून त्याच्या हातातल्या प्लास्टीकच्या पिशवीत हात घालून काहीतरी शोधल्या सारखं करतात. नाही तर इकडे तिकडे पहात टंगळ मंगळ करत बसलेले असतात. पोलिसांना प्लॅटफॉर्म वर बसवल्याने काय होतं हो??

कधी तरी एखादी बातमी येते की सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे , म्हणजे याच अर्थ काय घ्यायचा- तर प्लॅटफॉर्म वर दोन ऐवजी चार पोलीस बसवले आहेत. त्या पोलीसांनी प्लॅटफॉर्म वर बसून काय काम करताहेत? माहीत नाही.. हातात दांडू घेऊन उभे रहाणे. हल्ली हातात मशिनगन पण दिसते. सुरक्षा ठेवायची म्हणजे नेमकं काय करणं अभिप्रेत आहे त्या प्लॅटफॉर्म वरच्या  पोलीसांनी  हे काही समजत नाही मला?

काही दिवसा पुर्वी तर दादरच्या एका प्लॅटफॉर्म वर महिला पोलीसाला चक्क मटार सोलत बसलेले पाहिले आहे मी ! असो. मुद्दा पोलीसांवर दोषारोप करण्याचा नाही, तर खरंच सुरक्षा व्यवस्था कशी  अस्तित्त्वात नाही हे दाखवण्यासाठी हे पोस्ट आहे. चर्चगेटच्या प्लॅटफॉर्म वर आणि सिएसटी वर मेटल डीटेक्टर्स लावलेले आहेत. तुम्ही त्या मेटल डिटेक्टर्स च्या चौकोनी फ्रेम मधून पास होता. उगाच बिप आवाज येतो, एखादा पोलीस बाजूला उभा असला, तरीही तुमच्याकडे  लक्ष देत नाही, तुम्ही निघून जाता.

रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येकच माणसाच्या खिशात सुटे पैसे, पेन वगैरे असणार, मग हा बिप आवाज हा येणारच! आणि जर आवाज कसला आला हे जर तो पोलीस पहाणार नसेल तर काय फायदा ह्या मेटल डिटेक्टरचा?? दुसर्‍या बाजूने विचार केला तर, प्रत्येकाच्या खिशात काय आहे, ते पाहून जर प्लॅटफॉर्म वर जाऊ द्यायचं हे ठरवलं तर स्टेशनच्या बाहेर लाखो लोकांची रांग लागेल, तुम्ही सकाळी सात वाजता स्टेशन ला पोहोचलात तर मग रात्री पर्यंत तरी तुमची तपासणी होईल की नाही ही शंकाच आहे. मग अशा या परिस्थिती मधे हे  अजिबात शुन्य उपयोगाचे मेटल डीटेक्टर्स  का बसवण्यात आले?   पैसे खाण्यासाठी    केलेला हा उपद्व्याप दिसतो.

तसं म्हटलं तर मुंबईच्या सुरक्षेची  आणि कायदा सुव्यवस्था ठेवायची जबाबदारी पोलीसांवरच आहे. मी पण काल ह्या घटने  साठी  “फक्त” पोलीसांनाच दोष देत होतो. गहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,  असे विचार माझ्याही मनात येत होते.  पण तेवढ्यात वर लिहिलेल्या फॅक्ट्स पण आठवल्या आणि लक्षात आलं की ह्या सगळ्या प्रकारासाठी  फक्त  पोलीस नाही तर फक्त आणि फक्त राजकीय नेतेच   जबाबदार आहेत.

आज मुंबईची कित्येक करोड असलेली लोकसंख्या, अस्ताव्यस्त पणे फोफावलेली झोपडपट्टी! दर वर्षी सरकार काही झोपडपट्ट्या अधिकृत करते.  एकदा सरकारने डिक्लिअर केले की आता २००५ पर्यंतच्या झोपडपट्ट्या अधिकृत झाल्या आहेत, की मग  सरकारी खर्चाने मतं मिळवण्यासाठी या अनधिकृत झोपडपट्ट्यांना  अधिकृत करण्याचे काम रा्जकीय पक्षच करतात.

काही वर्षांनी हीच  जागा बिल्डर्स ला देऊन  त्याच जागी झोपडपट्टीवासीयांनी घरं फुकट  बांधून दिली जातात. बिलडर कडून होणारा फायदा (!)   वेगळाच. जी घरं झोपडपट्टीवासीयांना फुकट दिली जाते त्यांचा पैसा तुमच्या आमच्या कडून  उरलेल्या घरांसाठी दाम दुप्पट भाव लावून वसूल केला जातो. हे चक्र अव्याहत पणे सुरु आहे गेली कित्येक वर्ष. मग सरकार भाजपा शिवसेना असो की कॉंग्रेस असो. सगळे जण हे काम अगदी मनलावुन करतांना दिसतात.

अशा तऱ्हेने  झोपड्या रेग्युलराइझ  करण्यापेक्षा जर सगळ्या झोपडपट्ट्यांच्या वर सरळ बुलडोझर फिरवला, आणि ह्या सरकारी जागेवर झोपडपट़्टी लावायची नाही , असे ठणकावून सांगितले तर पुन्हा कोणी अशा प्रकारे  झोपड्या उभारण्याचे धाडस करणार नाही. पण दुर्दैवाने तसे होत नाही. सरकारचे हे तमाशे असे किती दिवस सुरु रहाणार आहेत ते देवच जाणे.

आजही मुंबई मधे असे बरेच भाग आहेत की जिथे झोपड्या उभ्या होऊ दिल्या जात नाहीत.  यावरून हे सिद्ध होते की जर सरकारने मनात आणले तर झोपडपट्टी होऊ न देणं हे सहज पणे करू शकतं.पण दुर्दैवाने प्रबळ इच्छाशक्तीची कमी , किंवा नोकरशाही ला मिळणारा पैशाचा मलिदा , तयार होणारी नवीन व्होट बॅंक,  ह्या मुळे झोपड्या उभ्या  होऊ देत असावे.

हा झोपडपट़्टी रेगुलराइझ करण्याचा खेळ  भाजपा, कॉंग्रेस, शिवसेना तिन्ही पक्षांनी खेळला आहे.  या मुळे मुंबईची मुळात जास्त असलेली लोकसंख्या शतपटीने वाढलेली आहे. तितकं इन्फ्रास्ट्रक्चर  वाढवण्याकडे लक्ष दिलं जात नाही- आणि मग लोकल , बस, बाजारातली गर्दी वाढते आणि अशा  प्रकारे ब्लास्ट करणाऱ्या लोकांचं फावतं..

वरचं सगळं वाचल्यावर कोणाला दोष द्याल? पोलीसांना? की ज्यांना आपण सुरक्षा व्यवस्था ठेवायची म्हणजे फक्त हाता मधे दांडकं धरून उभं रहायचं इतकच ठाऊक आहे, की राजकीय नेते की इथे वाढलेली अव्वाच्या सव्वा लोक संख्या आणि ढेपाळलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरला? 

माझ्या मते मुंबई आजही शंभर  टक्के असुरक्षित आहे.   ज्या प्रमाणे दररोज एक या प्रमाणे रेल्वे मधे दररोज एक ब्लास्ट होत होता,  आणि सरकार काहीच करू शकत नव्हतं, त्या प्रंमाणे अशा  प्रकारच्या   होणाऱ्या ब्लास्ट वर , नियंत्रण  ठेवणे अजिबात शक्य होणार नाही. यावर इथली  लोकसंख्या कमी करणे, अनियमीत झोपडपट़्यांना सरकारी संरक्षण  न देणे हा एकच उपाय दिसतो.

मढ्यांच्या टाळूवरचे लोणी तर बरेच जण खाणार आहेतच. मुख्यमंत्र्यांच्या बायकोची पर्स काय चोरीला गेली तर इतका गाजावाजा…. पण इतके सुरक्षा रक्षक असूनही जर असे घडू शकते तर मग सामान्य माणसाचे काय? त्याने फक्त करच भरायचा का? आणि तोही हे दिवस पाहण्यासाठी…..

चिरंजीव बाबांना….

Written by  on June 18, 2008

चिरंजीव बाबांना,
शिरसाष्टांग नमस्कार .

काल सकाळी उठल्यावर तुम्हाला झोपलेले पाहीले, वयोमानामुळे कृश झालेला ८५ च्या आसपास वय असलेला देह, अगदी सडपातळ  शरीरयष्टी, बरेच दात पडल्यामुळे खपाटी गेलेले गाल, आणि बंद असल्याने खोल गेलेले डोळे- हे सगळं पाहीलं आणि मला गलबलून आलं. आयुष्यात आजपर्यंत कधी वाटली नसेल इतकी आत्मियता एकदम दाटून आली- थोडं भरून आलं, नक्की कशामुळे हे माहीत नाही.तुमचा थकलेला चेहेरा पाहून मनात कालवाकालव झाली.

खरं तर तुमचे वय मोठे, मी तुम्हाला तीर्थरूप लिहायला हवे पण, तुमचे छत्र कायम डोक्यावर रहावे असे वाटले, म्हणजेच त्यासाठी  तुम्ही ’चिरंजीव’ रहायला हवे  असे मनात आले म्हणून  हा असा मायना…

आज अगदी खरं खरं लिहितोय- तुमची साधी राहणी मला   लाजिरवाणी वाटायची मित्रा मधे. सगळ्यांचे वडील जेंव्हा पॅंट शर्ट वापरायचे, तेंव्हा तुमचा साधा धोतर आणि शर्ट घातलेले पाहिले की मला उगीच कमीपणा वाटायचा- आणि खरं सांगायचं तर  आपले वडील असे कपडे का घालतात म्हणून मित्रांसमोर लाज पण वाटायची.  त्या लहान वयात कपडे सगळ्यात महत्वाचे, आणि त्यावरून समाजात तुमचे स्थान तयार होत असते, असा एक  समज झाला होता हे तर कारण होतेच. बरं  इतर मुलं मित्र वगैरे आपल्या सारखीच मध्यम वर्गीयांचीच, वडीलांच्या पॅंट्स आल्टर करून त्याच्या हाफ पॅंट बनवून घालायचे, आणि तुम्ही पॅंट न वापरल्याने मला त्या मिळायच्या नाहीत-  म्हणून असेल कदाचित. तुमच्या त्या साध्या कपड्या आड दडलेलं तुमचं मन मला कधी ओळखता आलं नाही.

लहान वयात वडील गेल्याने अंगावर पडलेल्या जबाबदारीने तुम्हाला अकाली ’मोठं’ केलं होतं का??  वडलांचा झालेला मृत्यु  आणि आकस्मिकपणे पडलेली  भाऊ आणि बहिणींची जबाबदारी- कदाचित स्वतःच्या बहिणींचे लग्न जुळवताना आलेला कडू अनुभव, गाठीशी असल्यामुळे तुम्ही  लोकांकडून  एकही पैसा न घेता लग्न जुळवण्यासाठी केलेली मदत, स्थळं सुचवणे, आणि हा असा लग्न जुळवण्याचा घेतलेला वसा , आणि  त्यासाठी प्रसंगी स्वतःची पदरमोड करून लोकांना केलेली मदत…..त्यानिमित्त घरी येणारे लोकं… यांचा आम्हाला खूप राग यायचा. इतरांकडे फक्त त्यांचे नातेवाईक पाहुणे येतात, पण आपल्याकडे हे असे लोकं  (ज्यांच्याशी कुठलाही नाते  संबंध नाही असे)का म्हणून येतात पाहुणे म्हणून??  आमच्या आयुष्यातल्या प्रायव्ह्सी वर हे येणारे लोकं आक्रमण करताहेत असे वाटायचे.

शासनाचे  ’वर्ग एकचे’ (Claas I)अधिकारी होता तुम्ही ! पण स्वतःसाठी पैसा खर्च करणे कधीच मान्य नव्हते. नेहेमी अगदी फाटेपर्यंत वापरलेल्या चप्पल, आणि धोतर कुर्ता, असा वेश. बरोबरच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी स्कुटर घेतली होती, घरात फ्रिझ वगैरे चैनीच्या समजल्या जाणाऱ्या वस्तू घेतल्या होत्या, पण तुम्ही मात्र  आम्ही कितीही मागे लागलो, तरी कधीच ह्या गोष्टींसाठी खर्च केला नाही. स्वतःच्या गरजा अगदी कमीत कमी ठेऊन उरलेल्या पैशातून समाजाचे काहीतरी देणं लागतो, म्हणून केलेले एखाद्या दूरच्या नातेवाईक असलेल्या बहिणीचे लग्न, किंवा परगावाहून कोणी मुलगी दाखवायला आणली, तर तो कार्यक्रम पण आपल्याच घरी करायचे- असो, परंतु हे सगळं पाहिले की आम्ही चिडून जायचो.  तेंव्हा नेमकं हे विसरायचो, की आमच्या  नेहेमीच्या गरजांना तुम्ही कधीच कमी पडू दिले नाही- विनाकारण तुमचा राग करत रहायचो..

घरी तुमच्याकडे येणारा माणूस कितीही मोठा असला तरीही   तुम्हाला नमस्कार करायचा, आणि ते  पाहून बरं वाटण्या ऐवजी राग यायचा. वाटायचं, की तुम्ही हे जे काही समाज कार्य करताय, ते केवळ  लोकांना दाखवायला, आणि समाजातली प्रतिमा उजळ रहावी  म्हणून. पण लोकं तुम्हाला जे नमस्कार करतात ते कृतज्ञ ते पोटी, आणि  त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असलेल्या  माना पोटी, ही गोष्ट समजायला इतकी वर्ष का जावी लागावी हेच समजत नाही?

तुम्ही कोणाकडून कधी स्थळं सुचवायला किंवा पत्रिका पाहायला पैसा घेतला नाही याचा हा परिणाम म्हणजे प्रत्येकाशी एक वेगळेच भावनिक नाते तयार व्हायचे तुमचे- जे आम्हाला कधीच समजले नाही!येणारा प्रत्येकच माणूस तुमच्या रुपात, वडील , मोठा भाऊ, किंवा एखाद्या मान्यवराला पहायचा  . स्थळं सांगायला , पत्रिकेला एकदा पैसे घेतले की मालक – नोकर नाते तयार होते, आणि पैसे घेतले नाही की ’उपकाराचे नातं”- पण हे   जे ’उपकाराचे नातं”तयार व्हायचे ते तसे  जाणवू न देण्याचा मोठेपणा पण तुमच्या मधे आहे हे नक्की. एखादा नेता असो, किंवा दुसरा कोणी सा्धा माणूस  असो, सगळ्यांशी एकाच तऱ्हेने वागण्याची तुमची पद्धत पण मला नेहेमीच  विचित्र वाटायची.

या व्यतिरिक्त पत्रिका पहाणे हा छंद होताच. दररोज सकाळी न चुकता गुरुचरीत्राचा अध्याय वाचायचा, आणि मी जे सांगतो ते मी नाही, श्री गुरुंची कृपा म्हणून खरं निघतं ही श्रद्धा- ज्योतिष्य पहाणे हा व्यवसाय नाही, तर एक छंद आहे, म्हणून जवळपास ५६ वर्ष या छंदाची केलेली जोपासना.. मला नेहेमी वाटायचं , की    तुम्ही  पत्रिका पहाता, भविष्य सांगता, मग पैसे घ्यायला काय हरकत आहे? पण या छंदाकडे जोडधंदा म्हणून न पहाता, केवळ छंद म्हणूनच पाहिले..  आणि त्यामुळे  तुम्ही जी गुडविल कमावली आहे तिचे महत्त्व मला आज तुमच्या बरोबर रस्त्याने जातांना कोणीतरी भेटलेला माणूस रस्त्यावर तुम्हाला वाकून नमस्कार करतो तेंव्हा लक्षात येते.

संस्कृतचा प्रचंड अभ्यास, रुद्र, सुक्त,ऋचा  आणि इतर बरंच काही    मुखोद्गत असल्याचा कधी वृथा अभिमान कधीच दाखवला नाही. पुजा सांगत असलेल्या पंडीतजींना तुमच्या पेक्षा जास्त मला माहीत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करतांना तुम्ही कधीच दिसला नाहीत- आणि तुमचे हे गुण कधीच लक्षात आले नाहीत. कदाचित त्या गुरुजींचा पोटापाण्याचा व्यवसाय आहे, म्हणून  त्यांच्या चुका वगैरे दाखवण्याचे तुम्ही टाळत असाल, हे आज लक्षात येतंय.

पतंग उडवायला म्हणून घरचे पाच रुपये चोरून पतंग आणली, आणि तेंव्हा छत्रीने मार खाल्ला होता ती आठवण, आणि नंतर कधीच पैसे चोरायचे नाहीत, अशी देवासमोर बसून घेतलेली शपथ, अजूनही आठवणीत आहे. पण त्या प्रसंगा व्यतिरिक्त कधीच मार खाल्ल्याचे लक्षात नाही.

आजी असतांना , ती बाहेरच्या खोलीत झोपलेली असतांना, जेंव्हा न्यायमूर्ती …. आले होते, तेंव्हा आजीला सोफ्यावरून न उठवता, खाली जमिनीवर सतरंजी टाकुन बसलेले – आणि त्यांनाही बसवलेले  जेंव्हा तुम्हाला पाहीले, तेंव्हा मात्र  कितीही मोठा माणूस घरी आला, तरी तो आईपेक्षा मोठा नसतो ही गोष्ट मात्र अगदी पक्की कोरल्या गेली मनावर.

लहानपणापासून जवळपास सगळेच लोकं  ” अमुक अमुक चा मुलगा” म्हणूनच ओळखायचे. का कोणास ठाऊक पण त्यामधे खूप कमीपणा वाटायचा- स्वतःचे काही अस्तित्वच नाही असे वाटायचे. पण आज मात्र लक्षात येतंय की माझं अस्तित्व जे आहे , ते केवळ तुमच्याच मुळे, आणि म्हणूनच आज तुमचा मुलगा म्हणवून घ्यायला अभिमान वाटतो .आता या परमेश्वराकडे एकच मागणे आहे की ”  तुम्ही चिरंजीव व्हा, आणि असेच संस्कार माझ्या मुलांवर करण्याची पण शक्ती मिळू दे म्हणून आशीर्वाद द्या..”

प्रजासत्ताक दिन

Written by  on June 16, 2008

प्रजासत्ताक दिन झाला काल.  प्रजासत्ताक म्हणजे नेमकं काय? प्रजेवर नेत्यांनी सत्ता गाजवायचा दिवस? की प्रजेने नेत्यांवर ??   असे अनेक प्रश्न मनात येतात. सरकारी संस्थानं ( हा शब्द विचार करून वापरतोय मी) आणि सरकारी मालमत्ता आपली तिर्थरुपांची वंशपरंपरागत देणगी असल्या प्रमाणे वागणारे त्यांचे अनभिषिक्त राजे ! असो..  पण यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नका. कारण उत्तर सापडणार नाही पण मनःस्ताप मात्र होईल.

२६ जानेवारीला मला मुंबई सेंट्रल स्टेशनला काही कामानिमित्य जावे लागले. भारतीय रेल्वे !भारता मधे सगळ्यात जास्त (२० लक्ष लोकांपेक्षा जास्त)लोकांना रोजगार देणारे सरकारी  संस्था(न)  आहे.    वर्कर वेल्फेअर अंतर्गत  कर्टसी म्हणून,रेल्वे मधे काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराला  दर वर्षी   ठराविक वेळा (४-५ वेळा)सहकुटुंब प्रवास करण्यासाठी फुकट प्रवासाचे पासेस देण्याची प्रथा आहे.  आता पर्यंत कोण कुठल्या  पदावर  आहे, किंवा कोणाचे किती बेसीक आहे यावर कुठल्या क्लासचे पासेस द्यायचे हे अवलंबून होते.  साधारण पणे ऑफिसर केडरला एसी किंवा फर्स्ट क्लास मधे प्रवास अलाऊ केला जायचा, आणि इतर कामगार वर्गाला स्लिपरक्लास !  अशीच प्रथा एअरलाइन्स, बस वगैरे मधे पण आहे, पण इथे फक्त रेल्वे बद्दल लिहितोय मी.

डीआरएम ऑफिस समोर एक बोर्ड लावलेला होता त्यावर कोणा एका युनीयन लिडरचे आभार मानलेले होते. त्या कामगार नेत्याच्या पुढाकारामुळे , या पुढे सरसकट सगळ्याच कामगारांना (क्लास ३, किंवा क्लास ४ सुद्धा)  एसी मधे प्रवास करण्यासाठी फ्री पासेस देण्यात येतील असे रेल्वेने जाहीर केले म्हणून त्या नेत्याचे कौतूक केलेले होते. या पुढे अगदी स्विपर पासून तर पोर्टर पर्यंत सगळ्यांनाच   सहकुटुंब एसी चे फ्री पास देण्याचे रेल्वेने मान्य केले आहे.अशा तऱ्हेने   फ्री पासेस द्यावे की नाही हा मुद्दा तर फारच महत्बाचा वाटला म्हणून हे पोस्ट.

रेल्वे मधे जवळपास २० लाख कर्मचारी आहेत. रेल्वे दर वर्षी प्रत्येकाला ३ पुर्ण पणे फ्री पास ( कुटुंबासाठी) आणि काही अर्ध तिकीट पासेस ( म्हणजे निम्मे पैसे देऊन तिकीट मिळणार त्यांना ), आणि अजून काही तरी प्रकारचे पासेस देतात. ( माझे सासरे पण रेल्वे मधे होते म्हणून इतकी माहिती आहे मला )  २० लाख कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी चार कुटुंबाचे मेंबर्स धरले, आणि प्रत्येकाने एकदा जरी प्रवास केला तरीही दर वर्षी कमीत कमी ८० लाख तिकीटं फुकट वाटण्यात येणार आहेत. जर प्रत्येक माणुस वर्षातून दोन किंवा ३ दा गेला तर ही संख्या होणार आहे दोन ते अडीच कोटी. अडीच कोटी जर फ्री पास वाले असतील, तर एसी कोचेस मधे सामान्यांसाठी  जागा शिल्लक रहातील का? हा एक मोठा प्रश्न आहे. इतरांनी स्लिपर क्लासने प्रवास करायचा हा संदेश देतंय सरकार.

फ्री पासेस चं लोण हे इथेच समजत नाही प्रत्येक मंत्री, एमएलए, एमपी,पद्म विभुषित, खेळाडू  आणि फ्रीडम फायटर्स( खरे आणि खोटे – अर्थात खऱ्या लोकांना दिल्यास आमची हरकत नाही, पण एका पटवाऱ्याच्या प्रमाणपत्रावर पण लोकं फ्रीडम फायटर्स ठरतात) आणि  वर दिलेल्या कॅटगरी व्यतीरिक्त अजूनही असंख्य लोकांना फ्री प्रवासाचे पासेस वाटले जातात- ज्या बद्दल मला माहीती नाही.

इतकी फ्री तिकीट्स वाटल्यावर रेल्वे मधे तुम्हा आम्हाला (तिकीटं काढून जाणाऱ्यांना) रिझर्वेशन मिळण्याचे चान्सेस किती रहातील? सध्या मध्यमवर्गीय एसी ३ ने प्रवास करतो, इतके फ्री तिकीटं वाटल्यावर त्याला तिकीटे मिळणार का? हा एक मोठा प्रश्न आहेच. रेल्वे मधे अजुन एक फंडा आहे – व्हिआयपी कोटा! या मधे एखाद्या नेत्याची चिठ्ठी आणली की तुम्हाला शेवटल्या क्षणी तिकीट मिळू शकतं- आधीच्या  सगळ्या रांगेत असलेल्यांना  ( वेटींगच्या) बाजूला सारून. या विभागांना संस्थान म्हणतोय ते म्हणूनच. स्वतःची जहांगीर असल्याप्रमाणे मंत्री लोकं मतांच्या लालचेने असे सवंग निर्णय घेत असतात.

एम्प्लॉई वेलफेअर असायलाच हवे नाही असे माझे म्हणणे नाही , पण प्रत्येक गोष्टीला कुठे तरी धरबंद किंवा सीमा असायलाच हवी  .   या सगळ्या फुकट पासेस मुळे   रेल्वेचे होणारे नुकसान भरून कसे निघत असेल?? अहो तुमच्या आमच्या सारखे लोकं आहेत नां, तिकीट करून प्रवास करणारे!

रेच निर्णय असे का घेतले जातात हे काही माझ्या लक्षात येत नाही. प्रत्येकाला एलटीसी चे पैसे द्यावे, आणि त्याला हवे तिथे , आणि हव्या त्या साधनाने जाण्याची परवानगी द्यावी – हे जास्त योग्य ठरेल – आणि ही खरी एम्प्लॉइ वेल्फेअर मुव्ह ठरेल असे वाटते.

जय हो!