कालभैरवाय नमः-उज्जैन

Written by  on April 28, 2008

गणपती दूध पितोय… टिव्हीवर सारखं दाखवत होते, मनोहर पंत पण दुधाचं भांडं हातात धरून सिद्धीविनायकाला दूध पाजताना सारखं टिव्ही वर दाखवत होते. सगळा देश पेटला होता , एका वेगळ्याच फ्रेन्झी ने. नंतर बातमी पसरली की आता प्रत्येकाच्या घरचे देवातले गणपती पण दूध पित आहे . सगळा देश भक्ती भावाने नतमस्तक झाला होता. काही लोकं याला ग्रॅव्हीटी मुळे दूध पितळेच्या मुर्तीमधे ओढल्या जाते (?? म्हणजे नेमकं काय??) असं काहीसं विधान करीत होते. एखादी गोष्ट का होते ते बरेचदा अनुत्तरीतच रहाते त्यातलीच ही एक.

काही दिवसापूर्वी माहीमच्या दर्ग्याच्या मागच्या समुद्रातलं पाणी गोड झालं, हा त्या दर्ग्यातल्या बाबाच्या कृपेने झाले म्हणून मुस्लीम समुदायाची झुंबड  त्या समुद्र किनाऱ्यावर उडाली होती. बरेच लोकं बरोबर आणलेल्या बिसलेरीच्या बाटल्यात भरून ते पाणी नेत होते. टिव्हीवरच्या त्या अ‍ॅंकरच्या तर अंगातच आले होते. दिसेल त्याला मूर्खासारखे ( माफ करा मला मुर्खासारखे ऐवजी “नेहेमीप्रमाणेच” म्हणायचं होतं) प्रश्न विचारत सुटली होती.आपको क्या लगता है ये पानी पिनेसे आपकी बिमारी दूर हो जायेंगी? यावर त्या भावीक मुस्लीम महिलेचे उत्तर होते, की जरूर होगी, ते घाणेरडं मळकट रंगाचं पाणी भक्तीभावाने पिऊन दाखवत म्हणत होता………..

कदाचित वरच्या दोन्ही घटनांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येईल सुद्धा, पण सर्वसामान्यांच्या दृष्टीने मात्र  वरच्या दोन्ही घटना  चमत्कार या सदरात मोडतात. या शिवाय  हिमाचल मधली ज्वाला देवी, आणि तिच्या अनुषंगाने  असलेल्या आख्यायिका आहेतच खोकला आला की तोंडातून कफच्या ऐवजी सोन्याचा गोळा काढणारे सत्य साई बाबा असो किंवा असेच काही बाबा, संत लोक असो, कुठेही चमत्कार सदृष काही दिसले की त्या गोष्टीला एकदम धार्मिक स्वरूप येते.  बरं ही गोष्ट केवळ हिंदू किंवा मुस्लीम धर्मात आहे असे नाही. काही दिवसापूर्वी जिझसच्या फोटोमधून रक्त बाहेर वहाणे, किंवा साईबाबाच्या फोटो मधून अंगारा बाहेर येणे , तसेच ब्रेड टोस्ट वर जिझसचे चित्र दिसले आणि मग तो तो टोस्ट इ बे वर काही हजार डॉलर्स ला विकल्या जाणे  – असे अनेक प्रकार ऐकिवात होते. श्रद्धा म्हणा किंवा अंध श्रद्धा, पण या अशा चमत्कार सदृष्य घटना दिसल्या की नकळतच लोकांचे  हात जोडले जातात.

अशाच एका जागी जाण्याचा योग परवा आला. इंदौरहून घटीया नावाची एक जागा आहे , उज्जैन पासून १७-१८ किमी , तिथे काही कामानिमित्य जाणे झाले.  परतीच्या वाटेवर कालभैरवाचे मंदीर आहे, अर्थात त्यासाठी साधारण पणे दोन एक किमी ची वाट वाकडी करावी लागते, पण माझे  आवडते मंदीर आहे हे ,कारण या मंदीरातले  वेगळंच भितीयुक्त वातावरण , म्हणून ह्या मंदीराला हमखास भेट देतो. तर तिथे आम्ही दर्शनाला थांबलो. या मंदीरात मी पूर्वी पण बरेचदा येऊन गेलेलो आहे -आणि एकदा पोस्ट पण लिहिले होते कालभैरवाय नमः  ^(http://rangmarathiche.com/goto/https://kayvatelte.com/2009/09/18/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%83/)याच नावाने. पण या वेळी मंदीर एकदम फ्रेश दिसत होतं. समोर फुलांच्या दुकानात दारूच्या बाटल्या , उदबत्ती, सुर्ययंत्र वगैरे प्रकार विकायला ठेवलेले होते. तिथे पोहोचलो, आणि तिथल्या सगळ्या फुलं, दारूच्या स्टॉल वाल्यांनी घेराव घातला. ’”भैरवको दारू चढावो, अंग्रेजी दारू केवल १०० रुपया  और देसी ५०.

फुलांच्या दुकानात दारू म्हणजे काही विचित्र वाटतं कां? हो ! इथे कालभैरवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. पुर्वीच्या काळी पंच ’म’काराने कालभैरवाची पूजा करण्याची पद्धत होती. मद्य, मांस, मैथुन ,मीन  आणि मुद्रा हे  प्रकार आहेत . तर त्यापैकी चिताभस्म आणि मद्य  यांचा कालभैरवाला नैवेद्य दाखवला जातो, असंही म्हंटलं जातं की दररोज एक तरी ताजे  चिता भस्म  कालभैरवाला मिळतेच..

मंदीर   हजारो वर्षापेक्षा जास्त जुने आहे असे म्हंटले जाते. या मंदीराचा उल्लेख स्कंद पुराणातही सापडतो. मंदीराचे पुनःनिर्माण पण बरेचदा केल्याने केवळ मुर्ती जुनी आणि मंदीर नविन आहे असे वाटते. मंदीराच्या आवारात एका झाडाखाली भग्न मुर्त्यांचे तुकडे ठेवलेले दिसत होते. त्यांना पण कोणीतरी फुलं वाहून पूजा केलेली होती. अशा विटंबना झालेल्या मुर्त्या देवळापेक्षा एखाद्या म्युझियम मधे ठेवणे जास्त  योग्य असे मला वाटते.

पुजा करायला मंदीरात प्रवेश केला की समोरच एक कोल्हा (की लांडगा?) मंदीराच्या बाहेर नंदीच्या जागी बसलेला दिसतो- हा लांडगा म्हणजे कालभैरवाचे वाहन. त्याला नमस्कार करुन खूप वाकून त्या लहानशा दारातून आत शिरलो. खरं सांगायचं तर माझी त्या लांडग्याला नमस्कार करायची अजिबात इच्छा होत नाही,किंवा कालभैरवाला पण नाही- पण संस्कारांचा नेहेमीच विजय होतो आणि हात जोडले जातात.

आत शिरल्यावर एकदम दारूचा भपकारा नाकात शिरला. त्या वासाकडे दुर्लक्ष करून देवाच्या मुर्तीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करू लागलो, पण मन काही कॉन्सन्ट्रेट करू शकलो नाही.समोर जे दोन पुजारी बसलेले होते, ते पण कालभैरवाच्या “प्रसादाने” झिंगल्यासारखे दिसत होते. आम्ही आपली पूजेची थाळी त्याच्या समोर केली, त्याने फुलं घेऊन देवावर फेकली, आणि दारूची बाटली उघडून त्यातली दारू एका अल्युमिनियमच्या एका प्लेट मधे काढून त्या कालभैरवाच्या तोंडाला लावली.त्या कुंद वातावरणात दारूचा वास भरला होता, एक वेगळंच फिलिंग येतं मला या मंदीरात आलो म्हणजे. श्रद्धा असते का? कदाचित नाही.. पण हा त्या मंदीराचा वेगळेपणा मला इथे  खेचून आणतो प्रत्येक वेळेस  उज्जैनला आ्लो म्हणजे.

या पूर्वी पण मी  जेंव्हा कधी इथे आलो, तेंव्हा  हा प्रसंग रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रत्येकवेळी त्या भटजीने  कॅमेरा बंद करायला लावला होता. या वेळी मात्र मी सरळ कॅमेरा सुरु करण्यापुर्वीच्या त्या भटजीला ५१ रुपये दिले, आणि मग त्या पुजाऱ्याने     काही ऑब्जेक्शन घेतले नाही, आणि   तो दारू पाजण्याचा प्रसंग  पहिल्यांदा रेकॉर्ड करता आला 🙂 .  जशी त्या पुजाऱ्याने ती ताटली  कालभैरवाच्या तोंडाला लावली, तशी हळू हळू त्या ताटलीतील दारू त्या मुर्तीच्या तोंडातून आत रिती झाली.आजूबाजूचे सगळे लोकं त्या कृतीकडे लक्ष देऊन पहात होते.  हात जोडलेले, चेहेऱ्यावर  श्रद्धापुर्ण भाव….

ती दारू कालभैरवाने प्यायलेली कुठे जाते हे कुणीच सांगू शकत नाही. जवळपास प्रत्येकच देवाच्या स्थाना प्रमाणे  इथे पण  बऱ्या अख्यायीका ऐकायला मिळतात की बाजूला बरंच खोल खणून पाहिलं तर , तिथे दारूचा अंश पण सापडला नाही , औरंगजेबाने पण ही मुर्ती तोडण्याचा प्रयत्न केला  पण त्याला जमले नाही आणि मग शेवटी तो पण कालभैर्वाचा भक्त झला …वगैरे वगैरे…

या मंदीराच्या समोर असलेली दगडी दीपमाळ तेलाने भरलेली दिसत होती. दीपमाळ ही बहूतेक शिवरात्र, दिवाळी असे सण असले की पेटवली जाते- आणि नुकतीच दिवाळी झालेली असल्याने  दिव्यातून ओघळलेल्या तेलाने न्हायलेली ती दीपमाळ, नुकतेच केस धुवून आलेल्या स्त्री सारखी स्वच्छ दिसत होती.

असो.. जे काही असेल ते असो, हा चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, मी रेकॉर्ड केलेली  ती लहानशी फिल्म यु ट्युब वर टाकुन इथे लोड करतोय. त्या मुर्तीच्या तोंडाला लावलेली ती ताटली  बघा, त्यातली दारू हळू हळू त्या मुर्तीच्या तोंडातून आत जाते आहे. अजून काही  फोटो पण आहेत, ते नंतर लोड करीन.

बंबैय्या हिंदी..

Written by  on April 18, 2008
महेंद्र कुलकर्णी,

बम्बईय्या हिंदी..

प्रत्येक भाषे मधे स्लॅंग वापरणे  का सुरु होते ?? मला वाटतं की दोन कारणं आहेत, एक म्हणजे  उच्चारायला कठीण असलेले शब्द हे व्यवस्थित  उच्चारता न आल्याने  , सोपे असलेले शब्द स्लॅंग म्हणून   ( अपभ्रंश म्हणता येणार नाही याला)  वापरले जातात.   किंवा दुसरे कारण म्हणजे, बरेचदा आपण काय बोलतोय हे इतरांना समजू नये  म्हणूनही असे काही शब्द बनवले जातात की जे फक्त एखाद्या गृप साठीच मर्यादित असतात.

आईवडीलांच्या समोर  फोन वर बोलायचं, तर त्यांना समजायला नको  की आपण काय बोलतोय ते, असं टीनएजर्सला वाटण साहजिक आहे,  म्हणून टिनेजर्सची स्वतःची डिक्शनरी असते-  काही खास  शब्द तयार केलेले असतात.  जरी तुम्हाला टिनेजर्सचे ते खास शब्द   माहीत असले ,तरीही तुम्ही तसे न दाखवणे श्रेयस्कर ठरते. 🙂

इंजिनिअरींग इंडस्ट्री मधे पण असेच काही खास शब्द जे फक्त त्या ट्रेडमधल्या लोकांनाच समजतील असे वापरले जातात.थोडक्यात काय, तर हे असे  शब्द   म्हणजे बरेचदा नेहेमीच्या कामातला विरंगुळा म्हणूनही वापरले जातात- जस्ट एक मजा म्हणून!   ही  अशी भाषा एक आवश्यकता आहे- तुम्हाला आवडो किंवा न आवडो तरीही!!

प्रत्येक शहराची आपली एक खास भाषा  असते. पुण्याची वेगळी, तर नागपूर कोल्हापूरची अजूनच वेगळी.  असं जरी असलं, तरी पण एक बाकी आहे, की  स्लॅंग म्हटल्यावर   आधी मुंबईची हिंदी आठवते. मुंबईला असलेल्या कॉस्मो कल्चर आणि  झोपडपट्टी मुळे ही भाषा एकदम वेगळीच झालेली आहे.

मुंबईच्या हिंदी ला मोठेपणा किंवा  ’समाज मान्यत” मिळवून दिली ते बॉलीवूडने ने. आय एस जोहर, केश्तो मुकर्जी, जॉनी वॉकर ह्यांनी ह्या मुंबईच्या खास भाषेचा वापर करून, राष्ट्रीय पातळीवर या भा्षे ची ओळख करून देऊन पाया रचला, आणि  अमिताभ बच्चन ( अमर अकबर ऍंथोनी ) संजय दत्त (मुन्नाभाई) हे त्याचा कळस झाले. मुंबईची   टपोरी भाषा ही सुरवातीला फक्त झोपडपट्टी ,  पर्यंतच मर्यादित होती.

काही गुंड मवाली लोकं ही भाषा वापरायचे,  मुख्य कारण , आपण काय बोलतोय ते इतरांना समजू नये हेच असावे. आता हेच बघा ना,  अगदी सगळ्यांसमोर उसको मै खर्चा पानी दूं क्या?? म्हणून कोणी विचारले तरी याचा अर्थ त्याला चांगला चोप देऊ का? हे  काही समान्य पणे लक्षात आले नसते.पण काही दिवसातच ही भाषा एकदम कॉमन झाली आणि मग कॉलेजेस, शाळांमधे सुरु झाली.  दक्षिण मुंबईच्या कॉलेज मधे अशी भाषा न वापरता हिंग्लिश वापरली जाते, पण सबर्ब मधे मात्र हमखास वापरली जाते ही भाषा.

प्रत्येक कॉलेजची खास भाषा असते. काही खास  शब्द, की जे फक्त   त्याच कॉलेज किंवा  एखाद्या गृप पुरते मर्यादित असतात.  पण  या खास शब्दांच्या  व्यतिरिक्त  पण बंबईय्या हिंदी बोलली जाते.  म्हणूनच तर   सगळ्यांनाच माहीत असलेल्या  या ’बंबईया हिंदीचा’ नखरा काही औरच असतो. अजूनही मुंबई मधे  खूप प्रेमाने आणि आत्मियतेने बोलली जाणारी ही भाषा आहे. स्वतःच्या मातृ भाषेपेक्षा इतकेच  या भाषेवर पण प्रेम करणारे लोकं  आहेत या मुंबईत  !

हिंदी सिनेमा जसे वास्तव, मुन्ना भाई वगैरे मधे रिऍलिटी दाखवण्याच्या नादात गुंडा कंपनी कडून वापरले जाणारे खास शब्द जसे घोडा म्हणजे बंदूक, ठोक डाला , खर्चा पानी दिया , खोका, पेटी वगैरे सगळे शब्द कसे अगदी नेहेमीच्या वापरातले असल्यासारखे झाले आहेत- कर्टसी बॉलीवुड.

एक साधं वाक्य, “अबे साले ढक्कन,  कट टू कट बात कर और , चल  कल्टी मार ले.  खाली फोकट्मे बक बक करके  अपुनके दिमागका  दही मत जमा. कट टू कट बात कर और चल फुट ले, कायको  टाइमकी खोटी कररैला है?? “विचित्र वाटत असेल, पण हे असे वाक्य नेहेमीच कानावर पडतात.

आता जेंव्हा मुंबईला रहायचं आहेच, तर ही भाषा   समजून घ्यायला काय हरकत आहे?? इथे खाली काही खास मुंबईकरांचे वापरातले शब्द टाकतोय.  ह्या शब्द संपदेमधे नवीन शब्द नेहेमीच ऍड होत असतात, जर काही नवीन शब्द  राहिलेले असतील, किंवा नवीन ऍड झाले असतील,  तर मुंबईकर  इथे कॉमेंट्स मधे लिहितीलच..

१)कौव्वा

बंदूक

२)अबे चिंधी
अतिशय चिपो  ( भिकारडी )वागणूक असलेला

३)हिल जायेगा यार
तुला आश्चर्य वाटेल

४)लोचा
प्रॉब्लेम आहे पण सहज दुरुस्त करता येईल असा

५)झोल
मोठा प्रॉब्लेम आहे – दुरुस्त करायला कठीण.

६)वांदा
काहीतरी उलट सुलट झालंय. अनपेक्षितपणे झालेला लोचा.

७)राडा
खूप मोठा प्रॉब्लेम, दुरुस्त न होऊ शकणारा.

८)कल्टी मारले भाई..
एखाद्या ठिकाणाहून निघून जातांना वापरला जाणारा शब्द

९)शेंडी लावणे
मूर्ख  बनवणे ( खरा मुंबईकरांचा शब्द आहे च्युतिया   बनवणे)

१०)ए शाण्या, चला हवा आने दे..
गेट आउट यु फुल…

११)अलिबागसे आयेला दिखताय क्या?
मी काय मूर्ख वाटतो का?

१२)गलत फॅमिली
याचा अर्थ पण सांगू??

१३)टल्ली, फुल टू होणे
दारू पिऊन नशेने टाईट होणे.

१४)सुमडी मे वटक ले
हळूच निघून जा इथून कोणाच्या नकळत

१५)पकाव मत भाय
जास्त बोअर करू नकोस.

१६)हटा सावन की घटा
आय डोन्ट केअर  सारखी अटीट्य़ूड.

१७)जगमग , ढिन्चॅक  ( जगमग कपडे, ढिनचॅक पिच्चर वगैरे)
एकदम विचित्र  किंवा एखादी खूप चांगली गोष्ट.

१८)झकास आयटम , रापचिक माल, छावी,
सुंदर मुलगी

१९)खोपचेमे लेके जा
कोपऱ्यात घे रे त्याला…

२०)खर्चापानी दूं क्या?
चांगला चोप देऊ क?

२१)अबे फट़्टू??
घाबरलास का?

२२)अबे, चल खलीवली
चल निघ इथून.. गेट लॉस्ट

२३)बहुत कीडा है तेरेमे?
काय रे उगीच वाकड्यात शिरतोस? पश्चात्ताप होईल ही हिंट आहे या एका शब्दात.

२४)दिमाग की नस मत खिंच
उगाच डोकं खराब करू नकोस

२५)वाट लग गई..
सगळे वांदे झाले आहेत माझे.

२६)अतरंगी
विअर्ड

२७)लालू
मुर्ख माणूस

२८)हूल दे रहा क्या?
घाबरवतोस मला?

२९)अबे लंगूर
मुर्खा

३०)खोपचेमे लूं क्या?
एक झापड मारू का?

३१)फट़्टू
घाबरट

३२)पिंगींग
टेक्स्ट मेसेज साठी शब्द

३३)फिज आऊट
चिल आउट

३४)लोड मत ले
जास्त टेन्शन घेऊ नकोस

३५)व्हयंगा
होईल.

३६)उसने सामनेसे फोन किया
त्याने आपणहून फोन केला

३७)सुट्टा

सिगरेट

३८) मामू

पोलीस

३९)थकेला

या व्यतिरिक्त कर रैला है, जा रैला है वगैरे शब्द तर आहेतच
जर काही शब्द राहिले असतील तर खाली लिहा कॉमेंट्स मधे.

तर मुंबईची ही हिंदी .. “लव्ह इट ऑर हेट ईट, बट यु कान्ट इग्नोर इट!”