पोपट आणि कुत्रा…

Written by  on February 16, 2008

या विषयावर पुलंनी लिहुन ठेवल्यामुळे इतर कोणी यावर लिहिण्याचा प्रयत्नच करत नाही.  पुलंचा जो पोपटावरचा लेख होता त्यावर तर मी अगदी जाम फिदा होतो. सगळ्यात सुंदर लेख होता तो पाळीव प्राणी या  विषयावरचा. त्यातलं ते वाक्य अजुन ही आठवतं, की म्हातारे आजोबा वारले आणि त्या पोपटाने येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना आवाज देणे थांबवले.. 🙂

 

हॉटेल मधे जेवणारा पोपट..

 

पण आपल्या आजच्या लेखाचे दोन ’ हीरो’  पोपटअगदी ठरवून  ठेवल्या प्रमाणे पुलंच्या लेखातल्या पोपटाच्या अगदी विरुद्ध वागत होते. तर  एकदा माझी भाची  गौतमी नाशिकला हॉटेलमधे जेवायला गेली होती.. आता माझीच भाची म्हंटल्यावर जे काही दिसेल त्याचे फोटो काढायची सवय 🙂 अगदी जेवणाच्या डिश पासून तर कसलेही फोटॊ क्लिक करित असते ती, अगदी म्हशीचं शेण जरी पडलेलं दिसलं तर-   ते पण!

तर त्या हॉटेलमधे एक फॅमीली जेवायला आली होती. त्यांच्या बरोबर त्यांचा पाळलेला पोपट पण होता. सगळ्यांच्या बरोबर हा पोपट बसला होता जेवायला. अगदी व्यवस्थित वेगळी डिश दिली होती त्याला. त्या डिशच्या काठावर बसून  तो पोपट व्यवस्थित जेवत होता. घरचे सगळे मेंबर्स जेवायला आले तर मग पोपट का नाही?? आता हैद्राबादला लग्नाच्या निमित्याने भेट झाली भाचीशी तेंव्हा तिने त्याचा काढलेला फोटो मला ब्ल्यु टुथ ने दिला, आणि ही सगळी घटना सांगितली. तर  तोच  फोटो आता इथे पोस्ट करतोय…

हा फोटो पाहिल्यावर मात्र आमच्या घरी  असलेल्या पोपटाची आठवण झाली आणि त्याचा पण फोटॊ शोधून काढला..  जवळपास २५ वर्षं आमच्या घरी होता हा पोपट. हा अगदी   लहान असतांना, म्हणजे त्याच्या अंगावर पिसं पण नसतांना एका आदिवासी बाईने आणून दिला होता. सुरुवातीला त्याला बघून तर आई घाबरलीच होती, की हा जगतो की मरतो म्हणून. पिवळी चोच, अंगावर काटे काटे होते त्याच्या. त्यामुळे तो पोपटच आहे की दुसरा कुठला पक्षी तेच कळंत नव्हतं..पण नंतर हळु हळु काही दिवसांनी अंगावर हिरवी गार पिसं आली.

इतका लहान असल्याने , तेंव्हा त्याला चक्क भाताची पेज भरवून वाढवलं होतं. मोठा झाल्यावर सुध्दा जरी पिंजऱ्याचं दार उघडं ठेवलं तरीही तो कधीच उडुन गेला नाही. पिंजऱ्याचं दार हे केवळ त्याला मांजरापासून  वाचवण्यासाठीच लावावं लागायचं.

रोज सकाळी उठल्यावर पिंजरा स्वच्छ करणं हे एक काम असायचं.हा पोपट मी जेंव्हा ७वीत होतो तेंव्हा आणला होता. मला खूप आवड होती  पक्षी, प्राण्यांची..  म्हणून एक कुत्रा पण पाळला होता घरी.   तो लवकरच वारला, पण हा पोपट मात्र आमच्या घरी जवळपास २६ वर्षं होता. कांही वर्षानंतर त्याला मोकळं सोडण्याचा पण प्रयत्न केला होता, पण त्याला पिंजऱ्यातच सेफ वाटायचं. पिंजऱ्या बाहेर टोमॅटो ठेवला, आणि दार उघडून ठेवलं, तर तो टोमॅटॊ चोचीने उचलून परत पिंजऱयात जाउन बसायचा.

 

आमच्या घरचा पोपट.. दार नेहेमीच उघडं असायचं त्याच्या पिंजऱ्याचं..

आमच्या घरचा पोपट .. दार उघडंच असायचं त्याच्या पिंजऱ्याचं नेहेमी…

 

या व्यतिरिक्त त्याला जरड वांगी  आणि कुठलंही बी असलेली भाजी किंवा फळ खुप आवडायचं. त्या वांग्याच्या बियांना तो बारीक करुन त्या बी च्या आतलं काहीतरी खायचा. दुध साखर पोळी कुस्करलेली , आणि चिवडा म्हणजे त्याचे सगळ्यात आवडते खाद्य. चिवड्यामधले तीळ, खसखस वगैरे त्याला खूप आवडायचे .खसखस, तीळ वगैरे गोष्टी तो बारीक करुन त्याच्या आतलं काय असेल ते तासन तास खायचा.

इतका माणसाळला होता, की अगदी मांजरी प्रमाणे आपले लाड करुन घ्यायचा आपले,डोक्यावरून हात फिरवलेला त्याला खुप आवडायचं- तसेच आयाळ कुरवाळावी तसे त्याच्या मानेला बोटाने खाजवलं की त्याला खुप आवडायचं.  आमच्या घरच्या लोकांना तो कधीच चावला नाही, पण बाहेरच्या माणसाने जवळ यायचा प्रयत्न केला तरी पण चोच मारायचा.

आमच्या घरात माझ्या दोन लहान मुली होत्या, तेंव्हा साहजिकच त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष  व्हायचं, म्हणून काही दिवस थोडा राग केला मुलींचा, पण नंतर लवकरच त्याला बहुतेक समजलं असावं की ही घरचीच मंडळी आहे, म्हणून मग त्याने त्यांना चोच मारणं बंद केलं.

दररोज रात्री त्याच्या पिंजऱ्याला झाकुन ठेवावं लागायचं. कधी विसरलो तर ओरडून ओरडून आकांत करायचा तो पिंजरा झाके पर्यंत.

त्याला पिंजऱ्यात बघून नंतर मग मात्र खुप वाईट वाटायचं .वाटायचं त्याने उडून जाव दुर कुठे तरी.. पण कधीच न उडल्याने कदाचित पंखाचे स्नायु डेव्हलप झाले नसावे त्याच्या… दुसरं म्हणजे , त्याला पिंजऱ्यामधे इतकं सेफ वाटायचं की त्याने कधीच उडून जायचा प्रयत्न केला नाही. मला तर कित्येकवेळा स्वप्नं पडायचं की आपला पोपट उडून गेलाय, आणि उंच आकाशात उडतोय म्हणून.. हे स्वप्न अजुन ही पडतं बरेचदा…

त्याच्या साठी एक मोठा पिंजरा करुन घेतला होता ज्यात तो २० वर्ष तरी राहिला.त्याच्या मृत्यु नंतर मात्र त्या पिंजऱ्याला तोडुन  फेकुन दिलं बाहेर.. नेहेमी करता.. आणि या पुढे आयुष्यात कुठलाही प्राणी पाळायचा नाही याचा प्रण करुन…  आणि कोणी पाळत असेल तर त्याला परावृत्त करायचं हे  ठरवून!!