नतमस्तक

Written by  on January 29, 2008

दिवाळी म्हंटलं की  फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या  साधारण पणे पंधरा दिवस आधी  एक पत्र येतं, सोबत काही ग्रिटींग कार्ड्स असतात. ते पत्र वाचलं, आणि सहा कोरे ग्रिटींग कार्ड्स पाहिले, की मला उगाच स्वतःचे  धडधाकट शरीर असून सुद्धा अंगात भरलेल्या    आळशी पणाची लाज वाटते.

समाजात सध्या खूप जास्त प्रमाणात कॉम्पिटीशन वातावरण आहे.प्री प्रायमरी शाळा  ते अगदी कॉलेज किंवा नंतर नोकरी मधे पण सारखी कॉम्पिटीशन असते. अशा जगात रहायचं तर मग नक्कीच आपणही या वेगाशी जुळवून घ्यावं   लागतं .. आणि तसे झाले नाही, आणि आपण कुठे कमी पडतो का असं वाटत रहातं. बरेचदा तर   लहानशा गोष्टींमुळे आपण  इतके निराश होतो की खूप वैफल्य येतं, आणि त्यातून आत्महत्येचे विचार मनात येतात. अहो, जगण्यातला आनंदच गमावून बसतो आपण! हे असं वैफल्य येण्यासाठी काहीही कारण चालतं. नोकरी मधे वार्षिक इनक्रिमेंट अपेक्षेपेक्षा कमी मिळाले, परीक्षेत मार्क्स कमी पडले,  गर्ल फ्रेंडने लग्नाला नाही म्हंटले, अशा असंख्य लहान सहान गोष्टींसाठी जीवनातला आनंद गमावून बसतो आपण.तसा विचार केला तर या सगळ्या गोष्टी जरी मिळाल्या नाही तरीही काही फारसा फरक पडत नाही. आज नापास झालात, उद्या पास व्हाल, इन्क्रिमेंट पुढल्या वर्षी नक्की मिळेल याची खात्री बाळगायला हवी.,  कुठलीही गोष्ट शाश्वत नाही.  पण मानवी स्वभावाला औषध नाही.

त्या मुलांनी तोंडात ब्रश धरुन केलेली पेंटींग्ज..

एक आठवड्यापूर्वीच गोष्ट आहे, पेपर मधे एक बातमी वाचली, ” ३० वर्ष वयाच्या एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरूण आणि तरुणीने आत्महत्या केली. ते दोघंही म्हणे चांगल्या नोकरीवर होते, सगळं जग पाहून झालं होतं, पुढे काय करायचं? पण तरीही त्यांनी गोव्याला एका खोली मधे गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटने मुळे थोडा नर्व्हस झालो होतो. जगातली प्रत्येक ऐहीक सुखाची गोष्ट जवळ असताना पण का म्हणून त्या दोघांना जीव द्यावासा वाटला असेल? असो विषयांतर होतंय, पण याच पार्श्व भूमीवर मला आलेले नदीम शेख चे पत्र मला एकदम अंतर्मुख करून जाते.

नदीम शेख!  दोन्ही हात नसलेला हा एक मुलगा. पत्रामधे लिहितो, की “बरेच लोकं काही कारणाने

मराठी

त्या पत्राच्या मागचा भाग.. सगळ्या मुलांचे चित्र काढतांनाचे फोटो आहेत इथे..

जन्मापासून किंवा काही आजाराने आपले हात वापरू शकत नाहीत.  हात वापरता येत नाहीत, म्हणून आपल्या पायाच्या बोटात ब्रश धरून किंवा तोंडात ब्रश धरुन  तो पेंटींग करतो. त्याच्यासारखीच अशी बरीच मुलं तोंडात किंवा पायाच्या बोटात ब्रश धरून पेंटींग करतात.ह्या अशा सहा पेंटींगचा एक संच आणि सोबतच गिफ्ट  वर लावण्यासाठी  कार्ड साठी सहा लहान कार्डस आणि दोन बुक मार्क्स.. इत्यादी सगळ्या गोष्टी पाठवीत आहे. जर तुम्हाला ही ग्रिटींग कार्डस आवडली तर त्यांची किंमत ३९५ रुपये  इंडीयन माउथ ऍंड फुट पेंटींग आर्टीस्ट या नावाने पाठवावे ही विनंती. तुम्ही पैसे पाठवणे कम्पलसरी नाही. पण जर तुम्ही पैसे पाठवले तर आमच्या सारख्या हात नसलेल्या मुलांना सेल्फ रिस्पेक्ट आणि डिग्निटी ने जगण्यास मदत होईल. आणि खाली सही होती”.. नदीम शेख!

पत्र वाचले , एका पेक्षा एक सुंदर असलेली ती   ग्रिटिंग  कार्डस मला वेडावून दाखवत होते. एकाही चित्रावर नजर ठरत नव्हती. इतकी सुंदर चित्रं पाहिल्यावर ज्या माणसाने ही चित्रं काढली त्याला हात नाहीत, आणि त्या माणसाने ही चित्रे तोंडात ब्रश धरून काढली आहेत, किंवा पायाच्या बोटात ब्रश धरून काढली आहेत,  ह्या गोष्टी वर विश्वासच बसत नव्हता. डोक्यात विचारांचा गोंधळ  माजला होता. नकळत त्या हुसेनच्या करोडो रुपयांच्या चित्रांशी तुलना केली ह्या चित्रांची.. आणि वाटलं, की” त्या हुसेनने यांच्याकडे येऊन शिकावं, चित्रं म्हणजे काय – पेंटींग म्हणजे काय असतं   ते ! असो..   त्या पत्राच्या मागच्या भागात काही अशाच चित्रकारांची चित्र काढतांनाचे फोटो होते.  एक लहानसा मुलगा  के जगनार्थनन चे तोंडात ब्रश धरून चित्र काढतानाचा फोटो पाहिला आणि उगाच वाटले, की  दैव किती क्रूर असतो बरेचदा नाही?

एक संस्था आहे, शारिरीक दृष्ट्या अपंग, वर दिलेल्या प्रकारातले , म्हणजे हात नसलेल्या लोकांना मदत करणारी ! त्या संस्थे तर्फे भारतामधल्या अशा १७ लोकांना निवडून त्यांनी तयार केलेले पेंटींग प्रॉडक्ट्स मार्केटींग करुन त्यांना नियमित पणे पैसे मिळवून देण्याचे काम करते. एक जागतीक संघटना आहे माउथ ऍंड फुट पेंटींग आर्टीस्ट वर्ल्ड वाईड नावाची.  या संस्थेने  भारता मधे पण आपली शाखा सुरु केलेली आहे.ही संस्था ७४ देशामधे पसरलेली आहे. जवळपास ७००  आर्टीस्ट या संघटनेचे मेंबर्स आहेत आहेत. ह्या मेंबर्सच्या  कलाकृतीना ही  संस्था बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करते. खरंच कौतुकास्पद काम आहे, पण एक प्रश्न आहेच.. फक्त १७ लोकंच का निवडले यांनी भारतातले?मी इंटरनेट वर शोधले असता असे अनेक व्हिडीओ सापडले की ज्या मधे बरेच लोकं तोंडाने किंवा हाताने पेंटींग काढतात.असे अजून बरेच लोकं आहेत  भारतामध्ये- म्हणून १७ ही संख्या वाढायला हरकत नाही.

शारिरीक   दुर्बलता असलेलया या  लोकांच्या जगण्याच्या लढ्याला मनःपुर्वक  अभिवादन !जगण्याची नवीन दिशा   – कुठलेही संकट आले तरीही न घाबरता कसे सामोरा जायचे   याचे उदाहरण  घालून दिलेले आहे या लोकांनी.  थोडं काही झालं की आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या तुलने मधे या लोकांची  स्वाभिमानाने जगण्द्दयाची जिद्द पाहिली की नतमस्तक होतो.

अभिरुची

Written by  on January 18, 2008

पुन्हा पुन्हा पुण्याला जावं लागतंय. या आठवड्यात पुण्याला दुसऱ्यांदा जावं लागलं. अगदी कंटाळलो होतो. पण जाणं भाग होतं. एखादा दिवस वाईट निघाला की प्रत्येक गोष्ट मनाच्या विरुध्दच होते – तसा दिवस होता कालचा. सकाळी ७ वाजता बोलावलेला टॅक्सी वाला चक्क ९-३० वाजता आला. नेहेमी प्रमाणे गाडी खराब हो गई थी, म्हणून लेट हो गया..वगैरे वगैरे झालं.

लवकर चल रे बाबा, म्हणून सरळ, माटुंग्याला मित्राकडे गेलो, आणि त्याला घेउन पुण्याला निघालो. रस्त्यावर मागच्या आठवड्या प्रमाणेच निसर्ग सौंदर्य होतं, पण मागच्या वेळ प्रमाणे ते आज मला मोहवत नव्हतं..माझ्यातला एखाद्या गोष्टीतला आनंद घ्यायची शक्ती कमी तर होत नाही नां?म्हणजे नजर मरते म्हणतात नां.. तसं काहिसं आहे हे.. नजर मेल्यासारखी झालेली आहे निसर्गसौंदर्य बघून सुद्धा!

पण नाही..अगदी खरं सांगू का आमचा एक जवळचा मित्र नेहेमी असे काही तरी भन्नाट डायलॉग्ज मारत असतो, आणि ते एकदम कधीतरी आठवून हसू येतं..कधी तरी कुठल्यातरी इरिलिव्हंट संदर्भातही त्याचे डायलॉगज अगदी चपखल बसतात.. त्यातलाच हा एक..,सुंदर मैत्रीण असेल तर तिची जादू लग्न होऊन ती बायकॊ होई पर्यंत टिकते,  तसं आहे हे! 🙂 काही दिवसांतच नजर इकडे तिकडे घसरते..   तो नेहेमी म्हणतो..,  की कुठल्याही सुंदर स्त्री कडे न पहाणं म्हणजे तिचा अपमान करणं आहे. आणि बिइंग अ जंटलमन मी कधीच कुठल्याही स्त्रीचा अपमान करित नाही.. !! ही सगळी चेष्टा- मस्करी आहे बरं कां.. नथींग  सिरियस अबाउट इट!!!!!!!  🙂 🙂

हा असला की पार्टी मधे एकदम जान येते. काहितरी विचित्र बोलून लोकांना हसवत ठेवण्याचं याचं कसब वाखाणण्यासारखा आहे..

आता एका आठवड्यात दोन वेळा लोणावळा एंजॉय करण शक्य नाही हे एक सत्य आहे – हे लक्षात आलं. एखाद्या ठिकाणी आपण गेल्यावर सारखं वाट्तं की इथे अजुन थोडं रहाता आलं तर काय मज्जा येइल नां? पण खरंच रहायची वेळ आली तर मात्र कंटाळा येतो, हे मी बरेचदा अनुभवलं आहे.कदाचित म्हणुन असेल गाडित बसुन डोळे बंद करुन विचार करु लागलो, की राहिलेल्या दिवसात कसं काय सगळं काम करायचं ते!!

सिंहगड रोडवर एका मित्र कम डीलरकडे जायचं होतं, तिथे पोहोचायलाच १ वाजला.  त्याला आधी फोन केला टोल बुथ पासुन तर तो म्हणाला तुम्ही सरळ सिंहगड रोडवरच्या, अभिरुची हॉटेलमधेच या, तिथे जेवण करुन मग नंतर ऑफिसला जाउ…

त्याने सांगितलेल्या हॉटेल समोर गाडी लावली.. मस्त !!! गेटजवळ खास पुणेरी पध्दती प्रमाणे एक काउंटर होतं.निरनिराळ्या सूचना पण तिथे लिहिल्या होत्या.. इथेच प्रिपेड कुपन्स घेउन आत जा, असं तो काउंटरवरचा माणुस म्हणाला. तिथेच भिंतीवर एक बोर्ड लागलेला होता. बघा इथे…माफ करा, तो फोटो निट आलेला नाही. इथे कोरफड, गवती चहा आणि अशा अनेक वस्तू मिळतील असा बोर्ड होता तो.

Pune

आज शिरल्या बरोबर मस्त हिरव्या गार शेतामधे आल्यासारखं वाटलं. सुंदर हिरवं लॉन असूनही लॉन सारखं न वाटणारं लॉन.. मला काय म्हणायचंय ते समजेल  अशी अपेक्षा आहे.

230720091690

त्यावर फिरणारे बदकं.. डाव्या हाताला, लहान मुलांना खेळायला खेळणी, दोन झाडांच्या खोडांना बांधलेला झोपायचा पाळणा.. आणि बरंच काही.

230720091695

एकदम अहमदाबादच्या हॉटेल विशाला, आणि इंदुरच्या, किंवा राजकोटच्या चोखी ढाणी ची आठवण झाली. नाही…. तसं नाही. हे अगदी वेगळं हॉटेल आहे, चक्क एखाद्या खेड्य़ासारखं वसवलेलं अगदी भर वस्तीतलं हे हॉटेल. इथेच पिकवलेल्या भाज्या वगैरे इथे वापरल्या जातात. मस्त वातावरण होतं. पुणेकरांना निश्चितच माहिती असणार हे सिंहगड रोडवरचं हॉटेल.

इथे आत जाउन बसलो, तर नम्रपणे तो हॉटेलमधला माणुस म्हणाला, साहेब बुट बाहेर काढून ठेवा, बुट बाहेर काढले आणि आत जाउन बसलो. मस्त पैकी थंड गार हवा सुटलेली होती. थोडा थोडा रिमझिम पाउस सुरु होता.अशा वातावरणात त्याने समोर मिरगुंडाचं ताट आणुन ठेवलं.. आम्ही पाचही जण तुटून पडलो.. त्या मिरगुंडावर.हा पापड सदृष्य पदार्थ मुंबईला आल्या नंतरच खाण्यात आला.मिरगुंड म्हणजे दहीभाता बरोबर खायचा पदार्थ नाही.. नुसता पण चांगला लागतो.. याची  जाणिव झाली.. इथून पुढे जास्त लिहित नाही फक्त पोस्ट करतो ते फोटॊ..

230720091696बॅगराउंडला ज्या लहान लहान झोपड्या दिसतात, तिथे बसून पण जेवता येतं.गवताने शाकारलेल्या झोपड्य़ा हिरव्या बॅगराउंडवर मस्त दिसतात..

230720091697जेवण सुरु करण्यापूर्वी फोटॊ काढायचं विसरलो. म्हणून आता अर्धं झाल्यावर काढलाय फोटो. जेवण सुरु झालं आणि मस्त पैकी गरम गरम कांदा भजी ( खेकडे नाही.. घरच्या सारखी 🙂 ) समोर आणून ठेवली. आणि म्हणता म्हणता भज्याचं ताट रिकामं!

सोबत झुणका, चटणी, सॅलड, कोशिंबिरी , तोंडली भात होताच.. अजूनही काही भाज्या होत्या ज्या मी घेतल्या नाहीत. तुमच्या समोर सरळ भांडच आणून ठेवतो तो भाजीची…. 🙂

230720091700या मावशींना बघा, मस्त पैकी चुलीवर गरम गरम , बाजरी, मका, ज्वारीच्या भाकरी करुन वाढताहेत.

230720091698जेवण झाल्यावर स्विट डीश..इतकं जेवलोय की आज रात्रीचं जेवण वर्ज्य!!!! 🙂

230720091711

जेवण झाल्यावर इथे मुलांसाठी काही खास राईड्स पण आहेत. इथे बघा कुठल्या आहेत त्या.. आणि त्याला किती खर्च आहे ते..

230720091703मुलांना मातीमधे खेळायला आवडतं.. म्हणून इथे कुंभारकला ( शब्द बरोबर असेलच ) शिकवण्याची पण सोय आहे.

230720091706आणि ही डायनॉसॉरची घसरगुंडी खुपच आवडेल मुलांना.. ही जागा तुमच्या द प्लेसेस टू बी व्हिजिटेड ड्युरिंग पुणे.. लिस्ट मधे ऍड करा. मी तर खुपच एंजॉय केलं इथे… अ गुड प्लेस टु हॅंग अराउंड!! आणि हो जेवणाचे फक्त १५० रुपये.. !!!!!

बडोदानूं खारी सिंग..

Written by  on January 12, 2008

खूप वर्षापुर्वी  जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर  ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला  सुरुवातीला हे तेल म्हणजे  कुठल्यातरी  जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका  दुकाना समोर ’शेंगका तेल’ लिहिलेले वाचल्यावर  हे   समजलं की ते ’शिंग म्हणजे शेंगदाण्याचं तेल आहे म्हणून.  शेंगदाणा या शब्दाचा शिंग हा अपभ्रंश म्हणजे ’अती’ होतोय असे वाटत नाही का?

मुंबईचे  मराठी लोकं पण दुकानात गेल्यावर शेंगदाणे काय भाव दिले हे न विचारता, सिंग क्या भाव दिया , किंवा नाक्यावरच्या भैय्या कडे भाजी घ्यायला गेले की  ’ भैय्या  वो चवळीका सिंग कैसे दिया? ’ असे विचारतांना दिसतात. असो.

पूर्वी एकदा अहमदाबादला गेलो असतांना एका मित्राकडे पार्टीसाठी गेलो असता तिथे ’खारी लेमन फ्लेवर्ड सिंग’ खाल्ली होती. लेमन फ्लेवर्ड म्हणजे खारे दाणे तळून त्याला लेमन मिरी वगैरे लावलेले नव्हते, तर चक्क लेमनचा स्वाद असलेले खारे दाणे होते ते, या चवीबद्दल   आश्चर्य व्यक्त केले , तर तो  तेंव्हा  तो म्हणाला होता, की  हे तर काहीच नाही, आमच्याकडे काजूच्या , नारळपाणी   ,मिरी फ्लेवर चे पण शेंगदाणे पण  मिळतात बडोद्याला. अर्थात हे काही खरं वाटण्यासारखं नाही, त्यामुळे त्याला चक्क धुडकावून लावलं.

पण तो मित्र मात्र सिरियसली पुन्हा पुन्हा सांगत होता, की बडोद्याला एक दुकान आहे शेंगदाण्यांचं तिथे सगळ्याच प्रकारचे दाणे मिळतात. तेंव्हाच ठरवलं होतं की बडोद्याला गेल्यावर हे दुकान शोधायचे, पण बडोद्याला इतकी वर्ष येऊन सुद्धा ते काही शक्य झाले नव्हते. एक तर दुकानाचा पत्ता माहीत नव्हता, आणि दुसरे म्हणजे वेळेचा पण प्रॉब्लेम असायचा!  फक्त इतकंच लक्षात होतं की गणपती मंदीराजवळ जुन्या शहरात हे दुकान आहे कुठेतरी .

आज कामा निमित्याने बडोदा जुन्या शहरात जाणे झाले , चहा पितांना सहज चौकशी केली तर समजले की ह्या प्रकारचे सिंग बनवणारा एक  रामभाई आहे, आणि त्याचं दुकान पण अगदी शेजारीच आहे. इतकी लहान गल्ली होती, की तिकडे कार नेली तर नक्की अडकेल अशी भिती वाटली, म्हणून कार रस्त्यावरच उभी केली आणि सरळ त्या गणेश मंदीराकडे चालत निघालो. पाच मिनिटातच एका लहानशा घर वजा दुकान -फॅक्टरीत शिरलो. सगळीकडे शेंगदाण्यांचे डोंगर रचलेले दिसत होते. मार्केटला पाठवायला काही लोकं शेंगदाणे  प्लॅस्टीक पिशव्यांमधे पॅक करत होते, तर दोघं जण मोठ्या भट़्टीवर  काळ्या कुळकुळीत कढई मधे रेती मधे शेंगदाणे भाजत होते. दाण्याचा आकार पण नेहेमीपेक्षा मोठाच.. भरूचनूं सिंग मोठी असतेच म्हणा तशी, आणि या भागात तेच दाणे मिळतात.

दुकानात शिरलो तर एक भरपूर लठ़्ठ पोट सुटलेला जाडा माणूस एका खुर्चीवर बसलेला होता.  सहज लक्ष गेलं तर त्याच्या शेजारी, मागे सगळीकडे शेंगदाण्याची पाकीटं किंवा चण्याची पाकिटं रचून ठेवलेली.  इथे बसून नुस्ता खारे दाणे खात असेल दिवसभर म्हणून जाडा झाला असावा का? स्वतःशीच हसलो.आम्ही जेंव्हा आत शिरलो, तेंव्हा थोडा चिडलेलाच दिसत होता, पण जेंव्हा त्याला सांगितले की मी मुंबई हून इथे आलोय, आणि बराच शोध घेतल्यावर त्याचे दुकान सापडले, तेंव्हा मात्र तो भाऊ एकदम खूश झाला आणि मस्त गप्पा मारणं सुरु केलं.

म्हणाला आम्ही इथे रिटेल विकत नाही, जे काही आहे, ते सगळं इथल्या काही   दुकानात पाठवलं जातं, पण आता तुम्ही आले आहात म्हणून तुम्हाला दोन चार पाकीटं देईन. सांगत होता की , दाणे  व्यवस्थित भाजणे ही एक कला आहे, जर चांगले भाजले गेले नाहीत तर ते लवकर खराब होतात, आणि जास्त भाजले गेले तर फ्लेवर बिघडतो खूप काळजीपुर्वक काम करावे लागते इथे. कढईमधे दाणे घातले की सारखे हलवत रहावे लागतात- त्या कढईवरच्या माणसाचा फोटो काढलाय, त्याची मुव्हमेंट इतकी जास्त होती   की फोटो पण हलल्यासारखा दिसतोय. 🙂

इथे लेमन  , मिरी  , काजू  , तसेच नारळपाणी फ्लेवर्ड शेंगदाणे मिळतात. हे  प्रकार म्हणजे रामभाईची खास स्पेशालिटी आहे, त्याच्याशिवाय असे फ्लेवर्ड दाणे कुणीच बनवत नव्हते, पण हल्ली अजून काही लोकांनी बनवणे सुरु केले आहे, तरीही म्हणाल की त्याचा ब्रॅंड जास्त फेमस आहे .आता बरीच वर्ष म्हणजे जवळपास पन्नास एक वर्ष   हाच व्यवसाय असल्याने ब्रॅंड इमेज तर आपोआप तयार होतेच. सुरुवातीच्या काळात फक्त खारे दाणे बनवून विकायचे, पण नंतर वेगवेगळ्या  चवीचे  आणि फ्लेवरचे दाणे तयार करणे सुरु केले. जेंव्हा ह्या सगळ्यांना प्रतिसाद चांगला मिळायला लागला, तेंव्हा  इथल्या मोठ-मोठ्या दुकानात हे दाणे एका ब्रॅंड ’हरी ’ च्या नावाने पॅक करून विकायला देणे सुरु केले.   आम्ही जेंव्हा तिथे होतो तेंव्हा सध्या फक्त काजू  आणि कोकोनट वॉटर फ्लेवरचीच शेंगदाणे  बनवणे सुरु असल्याने आम्हाला फक्त हे दोन प्रकारच मिळाले, उरलेले प्रकार पुढल्यावेळी बडोद्याला गेल्यावर  नक्की आणणार..

पाकीटं घेतल्यावर, खरं तर तिथेच एक पाकीट फोडून खाण्याची इच्छा होत होती, पण कार मधे पोहचेपर्यंत धीर धरला आणि मग पाकीट उघड्ले. खरोखरच एक अप्रतीम प्रकार आहे हा. साधे खारे दाणेच..पण एका वेगळ्या चवी मधे  छान  वाटतात. काही दिवसापूर्वी दाण्यांना शुगर कोटींग केलेले चॉकलेट्स  स्ट्रॉबेरी चवीचे   खाल्ले होते, पण ते काही तितकेसे आवडले नव्हते..   हा प्रकार म्हणजे   एकदम मस्त!! मस्ट ट्राय!!!

बाय द वे, याचं दुकान श्री हरी सिंग सेंटर, गजराज वाडी ,गोमितपुऱ्याला गणपती मंदीरा जवळ आहे.