चवीने खाणार अमरावतीला..

Written by  on November 12, 2007

खरं सांगायचं तर चव ही आपल्या जिभेवर नसते तर ती मेंदू मधे कुठेतरी दडलेली असते.  लहानपणी कधी

रघुवीर ची कचोरी.

रघूवीर कचोरी-सांबरवडी.

तरी अनुभवलेल्या चवी या मेंदू मधे घट्ट बसलेल्या असतात. मग तुम्ही कितीही वर्षाच्या गॅप नंतर ती चव   पुन्हा अनुभवायला मिळाली, की मेंदू ताबडतोब त्या जुन्या रजिस्टर्ड चवीशी आजच्या चवीची तुलना करतो.  आवडीची वस्तू एकट्याने जाऊन खाण्यापेक्षा आपल्या बेस्ट कंपनी सोबत खाण्यात जी मजा आहे ती वेगळीच! प्रत्येक शहराची आपली एक वेगळी खाद्यसंस्कृती असते, तशीच अमरावतीची पण आहे.

आमच्या कुलकर्ण्य़ांच्या  घरात  जवळपास १६-१७ वर्षानंतर  लहान मुलाचा जन्म झाला. चुलत बहीणीला मुलगी झाल्याने, एक    आनंद  सोहोळा म्हणून आम्ही सगळे भावंडं एकत्र जमलो होतो. असा योग फार कमी वेळा येतो. आता सगळे जातीवंत खवय्ये एकत्र जमल्यावर सगळ्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत लहानपण पुन्हा एकदा जगायचं हे तर न ठरवताच ठरलं !लहानपणी उन्हाळ्याच्या सुटी मधे  आम्ही सगळी भावंडं अमरावतीला  जमायचॊ   आणि उन्हाळा भर धमाल चालायची. सकाळी घराबाहेर पडलो तर  “बाहेर काही खाऊन येऊ नका रे, सरळ घरीच पॅक करून आणा” म्हणून इन्स्ट्रक्शन्स मिळाल्या.

रघुवीरची मुंग दाल कचोरी आणि सांबरवडी..

शाम टॉकिज जवळ असलेले एक लहानसे रघुवीरचे कचोरी, समोसा आणि सांबरवडी मिळण्याचे दुकान.ह्या दुकानाला हॉटेल म्हणणे पण योग्य होणार नाही- कारण बसण्यासाठी पण पुरेशी जागा नाही.  मी लहान असतांना पासून या ठिकाणी जायचो- शाम टॉकिज मधे सिनेमा पहायचा आणि इथे कचोरी खायची हा शिरस्ता होता. आज इतक्या वर्षानंतर पुन्हा तिथे गेल्यावर पण त्या हॉटेल मधे काहीही फरक जाणवला नाही. समोर असलेले काचेचे डिस्प्ले युनीट, आणि त्यातून डोकावणाऱ्या कचोरी -समोसे….गेल्या ४० वर्षा पूर्वी हे दुकान जसे  होते, आजही  तसेच आहे. ह्याच दुकानातून मिळवलेल्या प्रॉफिट वर  नंतर रघुवीरने दोन तिन मोठी दुकानं सुरु केली, पण मूळ दुकान मात्र अजिबात बदलेले नाही.

दुकान सकाळी साडे आठ वाजता उघडते. कचॊरी म्हणजे माझा विक पॉइंट. प्रत्येक ठिकाणची कचोरी ही वेगळी असते. मुंबईला मिळणारी चिंच चटणी , दही, हिरवी चटणी आणि शेव घातलेली गुजराती पद्धतीची कचोरी मला फारशी आवडत नाही. त्या पेक्षा इंदौरची प्याजी, आलु कचोरी, किंवा रघुवीर ची मुंगडाळ कचोरी , किंवा राजस्थानी उडीदडाळीची खस्ता कचोरी ही जास्त  आवडते. कचोरीला आपली मूळ चव म्हणजे स्वतःची चव असावी , त्या वर दही, चटणी वगैरे काही न घालता तिची ती  अंगची चव असली की मग   सोबत फक्त तळलेली मिरची असली तरीही पुरते. किंबहुना कचोरी सोबत मिरचीशिवाय इतर काही लागू नये हीच अपेक्षा असते माझी.

रघुवीरच्या कचोरी मधे फक्त मुगाचं सारण भरलेले असते. याची स्पेशालिटी म्हणजे वरचं  कव्हर. अतिशय खुसखुशीत असलेले  पण अजिबात तेलकट नसलेले बाह्य आवरण म्हणजे या रघुवीरच्या कचोरीची यु एस पी. आत शिरल्यावर फक्त चार पाच टेबल बसतील एवढी जागा, आणि वर पोटमाळ्यावर तळणाची केलेली सोय- हे असे रघुवीरचे दुकान.इथे आल्यावर ३-४ कचोरी कशा संपवल्या   जातात तेच लक्षात येणार नाही.

इथली कचोरी तर प्रसिद्ध आहेच, पण  त्याच सोबत  इथे मिळणारी सांबरवडी पण तुम्हाला स्वतःची चव विसरू देणार नाही. विदर्भात कोथिंबीरीला सांबर/सांभार म्हंटले जाते. सांबरवडी मधे किंचित आंबटगोड चव असलेले खोबरे आणि कोथिंबीरिचे सारण भरलेले असते. तुमच्या हातातली सांबरवडी संपल्यावर पण त्याची चव ही जिभेवर रेंगाळत रहाते, आणि आपसूकच दुसऱ्या वडीकडे हात वळतो. खरं सांगायचं तर त्या सांबरवडी खातांना थोडी थॊडी चितळ्यांच्या बाकरवडीची चव आठवते. गेली चाळीस एक वर्ष तरी एकच चव मेंटेन करून ठेवली आहे रघूवीर ने.

आलूबोंडा, रस्सा, Alubonda rassa

जलारामचा आलुबोंडा रस्सा..

रघूवीर मधून कचोरी आणि सांबरवडी पॅक करून घेतली आणि घरी निघालो, तर माझ्या भाचीची डिमांड होती ती आलूबोंडा रस्साची! आलूबोंडा – रस्सा म्हणजे  ” कट वडा, तर्री वडा” सारखा प्रकार असतो  . आलुबोंडा  आणि बटाटे वडा पूर्ण पणे वेगवेगळे असतात.   आलुबोंड्यामधे लसूण , आल्यासोबतच कांदा आणि मसाला  पण घातलेला असतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आलूबोंड्य़ाचं वरचं कव्हर हे  बटाटे वड्या  पेक्षा थोडं जास्त जाड असतं. तर हा असा आलूबोंडा एकदा तर्रीवाल्या रश्श्यात बुडवला, की याचं कव्हर सगळा रस्सा शोषून घेतो आणि एक अफालतून टेस्ट चाखायला मिळते.

अमरावती रेल्वेस्टेशनच्या समोर असलेल्या जलाराम मधून आलुबोंडा रस्सा  पॅक करून घेतले. इथल्या रश्श्या मधे आलं लसूण सोबतच पुदिन्याचा भरपूर वापर केलेला असल्याने मस्त फ्लेवर येतो. घरी पोहोचल्यावर वडे , कचोरी, काढून टेबल वर ठेवले, आणि केवळ पंधरा मिनिटात किती तिखट रे …. म्हणत नाकं पुसत सगळ्यांचा मिळून  फडशा पाडला .

गिला बडा, गिला वडा,gila vada, amravati,

जवाहरगेटच्या आतला गिला वडा आणि मुंगुस..

अमरावतीला फक्त रघूवीरची कचोरी ,सांबरवडी एवढंच फेमस नाही, तर  गिला वडा नावाचा एक खास प्रकार पण इथे मिळतो.  जवाहरगेटच्या आत असलेल्या एका लहानशा दुकानात सकाळी ८ च्या सुमारास ते दुकान सुरु होते. हा गिला वडा म्हणजे एक मस्त प्रकार आहे. या मधे दोन प्रकारचे वडे असतात . एक म्हणजे चपटे आणि दुसरे म्हणजे गोल. दुसऱ्या प्रकारच्या वड्याला मंगूस म्हणतात. हा वडा आंबवलेल्या उडदाच्या डाळीचा बनवलेला असतो.  मस्त पैकी खरपूस तळल्यावर पाण्यात कमीत कमी अर्धा तास तरी घालून भिजत ठेवला जातो. अर्ध्या तासाने वडे पाण्यातून काढून  पिळून त्यातले पाणी काढून   डिश मधे   त्यावर लाल मिरची, लसूण, पुदीना यांची चटणी  पसरली की हा गिला वडा खाण्यासाठी तय्यार. आणि जर फार तिखट नको असेल तर थोडं दही ( एक लहान चमचाभर) आणि गोड चटणी  घालून खायला दिले जाते. हा गिला वडा फक्त अमरावतीलाच खाण्यात आलाय माझ्या तरी. तसं म्हंटलं, तर हा प्रकार खरा राजस्थानातला. यावर लाल तिखट चटणी सोबतच कधी तरी आंबाडीची फुलं वापरून केलेली तिखट चटणी पण दिली जाते. तिचा स्वाद तर अविस्मरणीय़ आहे. मी सुरुवातीला म्हंटलंय ना, की सगळ्या चवी आपल्या मेंदूमधे नोंदवलेल्या असतात- तशी ही चव पण. या वेळी मात्र आम्हाला आंबाडीची चटणी मिळाली नाही. 😦 त्यामुळे फक्त लसूण पुदीना आणि लाल मिरचीच्या चटणीवरच समाधान मानावे लागले.

मटका कुल्फी

३० मट्का कुल्फी पॅक करून घेतांना आमचे बंधूराज

ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण अमरावती म्हंटलं की मटका कुल्फी ला पर्याय नाही. इथे मिळणारी मटका कुल्फी  गेल्या कित्येक वर्षात आपली वेगळी ओळख आणि चव टिकवून आहे. गेल्या पन्नास वर्षात या कुल्फीच्या चवीत काही फरक पडलेला नाही. एका मोठ्या रांजणात बर्फ, मिठ घालून त्या मधे कुल्फीचे मोल्ड ठेवले जातात.  मोल्डचं झाकण रबरच्या तुकड्याने बंद केलं असतं. मी लहान असतांना ही कुल्फी पळसाच्या पानावर तुकडे करून दिली जायची, पण हल्ली मात्र या कुल्फी मधे लाकडी काडी घुसवून दिली जाते. आजपर्यंत बऱ्याच ठिकाणची कुल्फी खाल्लेली आहे, पण अमरावतीसारखी कुल्फी मात्र कुठेच खायला मिळालेली नाही. बरं किंमत पण अगदी माफक असते फक्त १० आणि २० रुपये. हे कुल्फी वाले राजकमल चौक च्या फ्लायओव्हर वर रात्री बसलेले असतात, पण जर तुम्हाला दुपारी ही कुल्फी खायची असेल तर जयस्तंभ चौकात कोपऱ्यावर एक लाल रंगाचं रांजण घेऊन बसलेला एक भैय्या दिसेल कुल्फी विकताना.. तोच आमचा नेहेमीचा कुल्फीवाला.

अमरावतीची मटका कुल्फी. हल्ली मागणी इतकी वाढली आहे की मटक्याच्या ऐवजी चक्क रांजण घेऊन बसतो तो भैय्या विकायला.

हे सगळं तर नेहेमीचंच.. पण इथे आल्यावर आठवण होते ती खारवडीची. खारवडी  आणि लाह्यावडी हा एकेकाळी खास विदर्भात घरोघरी केला जाणारा पदार्थ आज व्हिंटेज पदार्थांच्या लिस्ट मधे जाऊन  बसलाय.

खार वडी

खार वडी म्हणजे वाफवलेली  बाजरी, तिळ वगैरे घालून सुकवलेली वडी. ही वडी नुसती तळून जरी खाल्ली तरी छान लागते.अमरावतीला कोर्टाच्या रस्त्यावर एक मायबाईचे दुकान म्हणून सुरु झालेले आहे, तिथे खारवड्य़ा , आणि इतर अनेक घरगुती वस्तू ज्या काळाच्या ओघात विसरल्या गेल्या आहेत त्या मिळतात. तिथे जाऊन दोन पाकिटं आणली खारवडीची, पण लाह्यावडी जी ज्वारीच्या लाह्यांची केलेली असते ती  मात्र मिळाली नाही.

अमरावतीला गौदुग्ध सागर हॉटेलच्या मागच्या गड्ड्यातले हॉटेल बंद झाल्याने तिथले पळसाच्या पानाच्या  द्रोणात मिळणारे गुलाबजाम  मात्र खायला मिळाले नाही.  केवळ दोन दिवस असल्याने दोन दिवसातच सगळ्या जागी भेट देता आली  नाही याची रुखरुख  मनात घेऊन  मुंबईला परत  आलो.